❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

तत्वज्ञान

संध्याकाळी तळ्यावर फिरायला येणारी दोन तिन मंडळे आहेत. आठवी दहावीची मुलं. ती आपापल्या सायकल्स, स्केटींग गिअर्स वगैरे घेऊन येतात व तळ्याला चकरा मारत बसतात. नंतर तळ्यात मासेमारी करणारी मुलं येतात. मासेमारी सकाळी करतात, संध्याकाळी मात्र सहज कट्ट्यावर येऊन बसतात. कदाचित त्यांना तळ्याशिवाय करमत नसावे. मग सात आठ म्हातारे येतात. जांभळाखाली त्यांची जागा ठरलेली आहे. यातले सगळेच कोळी समाजाचे म्हातारे आहेत. मोठ्यांमधे बसायचं वय नव्हतं तेव्हाही माझी सलगी नेहमी मोठ्यांबरोबरच असे. आतातर हळू हळू त्यांच्यातलाच व्हायला लागलोय, त्यामुळे प्रश्नच नाही. यात सत्तरी पार केलेले एक बाबा आहेत. स्वच्छ धुवट बंडी व फिकट गुलाबी रंगाचा सुरका घालून येतात. सुरक्यावरच्या फुलांचा पॅटर्न बदलतो फार तर, पण ड्रेसकोड असल्यासारखा बाकी ड्रेस सेम. फारसं बोलत नाहीत. शांत असतात. चेहरा नेहमी प्रसन्न असतो. जाणारे येणारे सगळेच त्यांना अदब बजावल्याशिवाय पुढे जात नाही. आयुष्यभर मासेमारी आणि त्यांच्या समाजाचे नेतृत्व करण्यात गेलं. समाजासाठी, स्थानिकांच्या अडचणींसाठी, एकोप्यासाठी सदैव संघर्ष केलेला. तो चेहऱ्यावरच्या सुरकत्यांमधे दिसतो. रंगात आले की आनंद दिघे, बाळासाहेब यांच्या आठवणी सांगतात. त्यांच्या काळातल्या मासेमारीबद्दल फार कौतूकाने बोलत रहातात. वादळात भरकटलेली नाव, गमावलेले दोन मित्र, ऊरलेल्या सोबत्यांना जीवावर ऊदार होऊन कुठल्याशा किनाऱ्यावर पोहचवल्याचे किस्से असं बरच काही सांगत रहातात. समुद्र पुर्वी होता तसाच आताही आहे, मात्र हे जास्त दिवस रहाणारा नाही याची खंत बोलून दाखवतात. मासेमारी करणाऱ्या यांत्रीक बोटींबद्दल फार तिटकाऱ्याने बोलतात. मुलगी लग्न करुन जर्मनीला गेलीय. दोन मुलं मात्र पारंपारीक व्यवसाय न करता कपड्यांचा व्यवसाय करतात. अर्थात त्याबद्दल बाबांची तक्रारही नाही आणि खंतही नाही. ऊलट कौतूकाने पोरांचं कर्तृत्व सांगत रहातात. मात्र हे सगळं कधीतरी क्वचित. ईतर वेळी म्हातारा नेहमी मिश्किल हसत कुणाची ना कुणाची मस्करी करत रमलेला असतो. बाजूच्या लिंबाच्या पानांच्या काड्या घेऊन पक्षी बनव, पाम ट्रिच्या पानांच्या पट्ट्या घेऊन होड्या, मासे बनव असे ऊद्योग सुरु असतात. जांभळाच्या दिवसात बोळक्या तोंडात जांभळे चघळून जीभ किती रंगलीय हे निरखून पहायचा प्रयत्नही करत असतात. नातवाकडून एखादा ईंग्रजी शब्द शिकून येतात आणि मग कुठेही तो वापरत बसतात. मजेत दिवस कंठतात एकूणच सगळे म्हातारे.
आज पावसाने ऊघाड दिला. चार पाच दिवस बाबा दिसले नव्हते. आज दिसतील म्हणून तळ्यावर गेलो. सगळी बुढ्ढी गॅंग जांभळाखाली बसली होती. बाबांनी शेजारची जागा साफ केल्यासारखं केलं व मला बसायला सांगितलं. 'आज लांडगा नाही आणला सोबत?' अशी रुमीची चौकशी केली. मग मात्र समोरच्या तळ्यातल्या एकुलत्या एक प्लॅस्टिकच्या बोटीला निरखत शांत बसुन राहीले. मीही पाण्यावरचे तरंग पहात शांत बसलो. जरा वेळाने बाबांनी अचानक विषय काढला. "पद्माकर, तुला आज संसाराचं रहस्य सांगतो, ऐक." आज काहीतरी नवीन ऐकायला मिळेल म्हणून मी मांडी मोडून निवांत बसलो.
बाबा म्हणाले "आयुष्यात जे काही करशील. भलं, बुरं सगळं काही. ऊंबऱ्याच्या आत आणि बाहेरही. अभिमानाने सांगावं असं आणि लाज वाटेल असही, सगळं काही घरच्यांना विश्वासात घेतल्याशिवाय करायचं नाही. कितीही किरकोळ निर्णय असुदे, बायकोला, पोरांना समोर बसवायचं. सविस्तर सांगायचं, आणि त्यांनी होकार दिला तरच पुढं पाऊल टाकायचं. मग तुला धोका नाही."
बाबा एवढे पुढारलेल्या विचारांचे असतील, बायकोच्या मताला किंमत देणारे असतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे बाबा गोडच आहेत पण त्यांचा काळच अशा गोष्टींना मान्यता देणारा नव्हता. निरक्षर असुनही बायकोला, मुलांना एवढी किंमत देणारा पुरुष मी प्रथमच पाहीला. मला बाबांचं कौतूक वाटलं. मी तसं बोलून दाखवल्यावर बाबा मिश्किल हसले व म्हणाले...
"नशिब फार हलकट असतं पद्माकर. कधी गचांडी धरुन गोत्यात आणेल सांगता येत. कोणती वेळ घातवेळ असेल ते कुणी सांगावं! कधी कोणत्या टायमाला बायको पोरं आपला वाल्या कोळी करतील याचा काही भरोसा नाही. अशा टायमाला बायका पोरांना ऊलटायला जागा ठेवायचीच नाही कधी. सगळी संतमंडळी सांगून गेली ते ऊगाच का. तुकारामबाबा ऊगाच नाही म्हणत 'तुका झाला सांडा ! विटंबती पोरे रांडा' आपण सावध रहायचं पद्माकर. आपुलिया हिता जो असे जागता"
एकूण बाबा बिलंदर निघाले. 🥰😘😂
असो..
मला ऊगाचच कबिर आठवून गेला.
खानेपिनेकूं पैसा होय तो जोरू बंदगी करे ।
एक दिन खाना नहीं मिले तो फिरके जबाब करे ॥



Share

गण्या

गण्या सातवीत सातव्यांदा नापास झाला आणि वैतागलेल्या गुरुजींनी त्याला मनसोक्त हाताखालून काढला. गण्या त्यादिवशी गुरुजींच्या हातातून जो सुटला ते...