❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

गण्या

गण्या सातवीत सातव्यांदा नापास झाला आणि वैतागलेल्या गुरुजींनी त्याला मनसोक्त हाताखालून काढला. गण्या त्यादिवशी गुरुजींच्या हातातून जो सुटला ते पुन्हा म्हणून त्याने शाळेचे तोंड काही पाहिले नाही. बापालाही गण्याच्या मेंदुचा आवाका लक्षात आला आणि त्याने त्याच्या बुद्धीची किव येऊन त्याला गुरांकडे धाडला. गण्या आता घरच्या चार व गावकीच्या पाच सहा म्हशी घेऊन रानात जायला लागला. गुरं कुरणात सोडून प्रशस्त वडाच्या झाडाखाली बासरी वाजवण्याईतपत तरलता गण्याकडे असती तर तो कशाला शाळा सोडून आला असता? गण्याने शाळा सोडली आणि फेसबुक धरले. अल्पावधीत गण्या फेसबुकवर फेमस झाला. त्याच्या मनमिळावू, हरहुन्नरी स्वभावामुळे त्याची फ्रेंडलिस्ट भरुन वाहू लागली. गण्याला लोक ओळखायला लागले. गण्या फेसबुकवर चांगलाच रमला आणि येथेच घोटाळा झाला. गण्या फेसबुकवर रत राहू लागला व त्याची गुरे ईतरांच्या रानात घुसून पिकं खाऊ लागली. गण्याच्या बापाकडे रोज नविन तक्रार यायला लागली. तो वैतागला. वैतागलेल्या बापाने एक दिवस गण्याला बेदम चोपला. गुरुजींनी तुडवलं तेंव्हा शाळा सोडली होती, आता बापाने हात साफ केल्यावर घर कसे सोडायचे? गण्याने मग फेसबुक सोडले. रिवाजाप्रमाणे त्याने “येथे काही आता मजा राहीली नाही. सगळा कचरा झालाय फेसबुकचा. मित्रांनो रामराम घ्या. संपर्कात राहूच” अशी पोस्ट त्याने टाकली आणि ‘खातं’ डिलिट केलं.
गण्या गेला आणि फेसबुकवर गदारोळ ऊसळला. ‘सर तुम्ही परत या” “टिका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका सर” “आमच्यासाठी तरी लिहिते व्हा” अशा आशयाच्या अनेक पोस्ट पडल्या. गण्या काही परत येत नाही हे लक्षात आल्यावर त्याचं गुणगाण गाणाऱ्या काही पोस्ट पडल्या. गण्या कसा हरहुन्नरी होता! कसा अजातशत्रू होता! त्याला कशी माणुसकी होती! वगैरे वगैरे. गण्याच्या जाण्याने फेसबुकचं कसं नुकसान झालय यावर तर चर्चासत्र आयोजित होता होता राहिलं. हे सगळं सुरु आहे तोच गण्याच्या एका मित्राची पोस्ट पडली. “अरे गण्यावर चिखल ऊडवताना लाज वाटत नाही का? गण्याला खुशाल गाढव म्हणताय म्हणजे काय! गण्या काय गाढव होता का? तो काय होता ते समजायला तुम्हाला चार जन्म घ्यावे लागतील. गण्याला गाढव म्हणताहेत म्हणजे यांचे धारिष्ट्य पहा किती आहे ते! आमचा गण्या आणि गाढव? अरे ह्यॅट!” पोस्ट आली आणि कॉमेंटकर्त्यांची गर्दी ऊसळली. सुरवातीला “कोण आहेत ते” किंवा “लिंक द्या फक्त, आम्ही पाहून घेतो” अशा काही कॉमेंटस् आल्या. मग बाकीच्यांनीही आपापले मत मांडायला सुरवात केली. “अरे गण्याला गाढव म्हणताहेत ‘ते’ लोक पण काल तर एक जण गण्याला डुक्कर म्हणत होता. अरे यांना काय कळणार गण्या काय चिज होती ते” असंही कुणी सांगुण गेलं. त्याला ऊत्तर देताना गण्याचा दुसरा मित्र पेटला. “अरे हे तर काहीच नाही. एकजण गण्याला गव्हाणीतलं कुत्रं म्हणाला. आता बोल. किती हलकट आहेत ‘हे’ लोक” त्यावर चौथा मित्र शंका घेऊन आला “हे गव्हाणीतलं कुत्रं म्हणजे काय रे?” पुढच्या विस पंचविस कॉमेंटस् ‘गव्हाणीतलं कुत्रं’ म्हणजे काय हे समजावणाऱ्या आल्या. एवढ्यात नविन पोस्ट पडली. “गण्याला गव्हाणीतलं कुत्रं म्हणनाऱ्यांचा निषेध. याच लोकांमुळे गण्या फेसबुक सोडून गेला. याच लोकांनी सगळ्या सोशल मिडीयाचा रंडीखाना केला” मागची पोस्ट मागे पडली, नव्या पोस्टवर प्रतिसादांचा पाऊस सुरु झाला. एकाने कळवळून लिहिले “अरे ‘ते’ कसेही लोक असले तरी आपण सभ्य आहोत. रंडीखाना हा शब्द काही पटला नाही मला” त्याला मागे सारुन पुढचा मित्र म्हणाला “मान्य आहे गण्या काही गुणांचा पुतळा नव्हता. होते त्यात काही गव्हाणीतल्या कुत्र्याचे गुण. पण तो त्याच्या वैयक्तीक आयुष्यात काय करतो याच्याशी आपले काही देणेघेणे नाही. आपण त्याच्या पोस्ट वाचून जो आनंद घेतला तो महत्वाचा. वैयक्तीक आयुष्यात गण्या एक काय दहा नालायक असेल, आपल्याला काय त्याचे. कलंदरच होता तो. असे लोक मनस्वीच असतात” या प्रतिसादाला अनुमोदन देणारे पाच पन्नास प्रतिसाद येताहेत न येताहेत तोवर गण्याच्या नविन मित्राने नविन पोस्ट नवं काहीतरी सांगत असल्यासारखी टाकली. “एकदा गण्या गुरांकडे गेला असता चंxxच्या नादी लागला होता. (तिही फेसबुकवर असल्याने मी नाव घेणार नाही.) तिच्या बापाने रंगेहाथ पकडले दोघांना आणि गण्याला रानातच घोळसला. तोंडात गेलेली काळी माती तशीच घेऊन माझ्याकडे आला होता रडत. मिच त्यावेळी त्याला आधार दिला. होतात माणसाच्या हातून चुका. आपण तरी कुठे धुतल्या तांदळासारखे आहोत? म्हणून कुणी ऐऱ्यागैऱ्याने गण्याला ‘चमडी’ म्हणावं? तेही या फेसबुकवर, जेथे गण्याच्या पोस्टसाठी लोक वेडे व्हायचे! असेल गण्याला जरा तसला नाद म्हणून गण्या काय अगदीच चवचाल नाही ठरत. आणि ‘हे’ लोक गण्याच्या नथीच्या नादावर पोस्ट टाकताहेत! यांची लायकी आहे का? कुठे फेडाल हे पाप?” आणि मग पुन्हा ते प्रितीसाद आणि लोकांची ती गण्यावरची थक्क करणारी प्रीति. “अरे बुडवले गण्याने माझे हजारभर रुपये. त्याने काही माडी बांधली नाही आणि हजार रुपयाने मीही काही भिकारी झालो नाही. दोस्तीत पैसा महत्वाचा मानतच नस्तोय आपण. गण्यासारख्या मित्रावर करोडो रुपये कुर्बान. गण्याला नावे ठेवणारे नरकात जातील आणि आम्ही ते पाहू” वेगेरे वेगेरे, वेगेरे वेगेरे!
सुरवातीला गण्याचं गुणगाण गाणाऱ्या पोस्ट पाहून आधिच मी गहिवरलो होतो. त्यातच या नविन पोस्ट. एका सातवी नापास असणाऱ्या, म्हशींमागे जाणाऱ्या पोराच्या समर्थनार्थ ईतके मित्र ऊभे राहीलेले पाहिले आणि माझा कंठ दाटून आला. गण्याला नावे ठेवणारे ‘ते’ लोक व त्यांच्या ‘तसल्या’ पोस्ट मी खुप शोधल्या पण एकही पोस्ट सापडली नाही हा भाग वेगळा पण हे दुर्मिळ मित्रप्रेम पाहून मला मात्र गण्याचा हेवा वाटला. गण्यालाही बरं वाटलंच असेल पण तो काही अजुनही फेसबुकवर पुन्हा यायला तयार नाही. असो, सगळ्यांनाच आयुष्यात असे मित्रप्रेम मिळो, असे यार दोस्त मिळोत. गण्याला माझी वैयक्तीक विनंती आहे की “सर, मी तुम्हाला ओळखत नाही, तुमच्या पोस्टही कधी वाचण्यात आल्या नाहीत, पण तुमच्या मित्रांच्या निर्व्याज प्रेमाखातर तरी तुम्ही परत या. मी तुमच्या नुतन पोस्टची वाट पहात आहे.”
(कुणी म्हणते की गण्या फेक आयडीने फेसबुकवर आहे आणि त्याने या ‘कौतुकाच्या’ सगळ्या पोस्ट वाचल्यात. त्यामुळे तो आता फेक अकाऊंटही डिलिट करायच्या विचारात आहे म्हणे.)

Share

गण्या

गण्या सातवीत सातव्यांदा नापास झाला आणि वैतागलेल्या गुरुजींनी त्याला मनसोक्त हाताखालून काढला. गण्या त्यादिवशी गुरुजींच्या हातातून जो सुटला ते...