❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

इष्ट मित्र सज्जन सखे ही तो सुखाची मांडणी. (गटग वृत्तांत-२०१८)

कोजागिरीसाठी मी आमच्या शेतावर गेलो होतो. रात्रभर गप्पा मारुन पहाटे अंघोळी उरकुन पुन्हा शेतात आंब्याच्या झाडाखाली येऊन आम्ही लवंडलो होतो. इतक्यात ग्रुप मेसेजचा विशिष्ट टोन वाजला. कालपासुन तिकडे फिरकलो नव्हतो त्यामुळे उत्सुकतेने पाहिले. साधनाताईने गटगची (गेट टुगेदर) दवंडी पिटली होती. अगोदर तारीख पाहीली तर खुप वेळ होता. दिवाळीनंतर जायचे होते त्यामुळे फारशी चिंता नव्हती कामांची. मुळात यावेळी गटग दिवाळी फराळासाठीच होते. दुसरं कारण म्हणजे आमच्या गावाकडील मित्रांचे रात्रीच जोरदार गटग झाल्यामुळे लगेच दुसऱ्या गटगचा मेसेज पाहून फारसा उत्साहही वाटला नाही. म्हणतात ना पोट भरल्यावर मग पक्वान्नही समोर नकोसे होते, तसाच काहीसा प्रकार. मी मोबाई बंदच करुन ठेवला आणि रात्रीच्या कोजागरतीला उत्तर दिल्याची कसर भरुन काढायला कुशीवर वळलो.
संध्याकाळी जाग आली. शेतातच तोंड वगैरे धुवून बायकोला फोन करुन हायवेलाच बोलावून घेतले आणि मग कुठेही न थांबता पुण्याला परतलो. रात्री झोपायच्या अगोदर ग्रुपवर नजर टाकली. गटगला येणाऱ्यांच्या नावाची यादी झळकली होती. पुर्वी दिवाळीची चाहूल अंगणात वाजणाऱ्या लहान मुलांच्या टिकल्यांच्या आवाजाने लागायची. आता ती व्हाटसॲपवर लागते. तशी ती लागली. ग्रुपवर फराळांच्या तयारीचे फोटो यायला लागले. खरेदीचे फोटो यायला लागले. दारातल्या रांगोळ्या मोबाईल स्क्रिनवर झळकायला लागल्या. चकली, लाडु करतानाच्या अडचणी पुढे आल्या, सोडवल्याही गेल्या. टिप्सची देवाणघेवाण सुरु झाली. साड्या, दागीन्यांचे सुरेख फोटो यायला लागले. आम्ही ग्रुपवरची पुरुषमंडळी काही काळ केविलवाने, बापुडे झालो. आम्ही टाकलेल्या एखाद्या गझलेला, सुंदर फोटोला कुणी विचारेनासे झाले. दिवाळी आली, शुभेच्छांची बरसात झाली. सुरवातच शशांकदांच्या सुरेख अभंगाच्या शुभेच्छेने झाली. या दिवाळीच्या चार दिवसात ग्रुपवर इतके क्षणोक्षणीचे अपडेट असत की प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी साजरी करुनही जणू काही एकत्रच असल्याचा फिल आला. कुणाच्या घरी चकल्या कुरकुरीत झाल्यात, कुणाच्या घरी लाडु मस्त झालेत, कुणाच्या करंजीला सुरेख पुडं सुटलीत, कुणाला गोड आवडत नाही, कुणाला अनारसे आवडत असुन करायला वेळ मिळाला नाही, तर कुणाच्या घरी काही कारणाने दिवाळीचा फराळ केलाच गेला नाही हे इतकं बारीक सारीक माहीत होतं की दिवाळीच्या पहाटे, अभंग्यस्नानानंतर घरातल्या सोफ्यावर बसुन फराळ करताना वाटले की सोबत शांकलीताई, साधनाताई, जागुताई, सायुताई, टीना, उजु, निरुदा, तुदा, जिप्सि आणि इतर सगळे सगळे एकत्रच बसुन फराळ करतोय. आणि शशांकदा सगळ्यांवर प्रेमाने लक्ष ठेऊन आहेत.
दिवाळी आली, धमाल करुन, आनंदाचा बाजार भरवून गेलीही. दिवाळीनंतर येणाऱ्या उदासीची चाहुल लागायला लागली तोच साधनाताईने अगदी जोरदारपणे गटगची कल्पना उचलुन धरली. दिवाळीनंतर येणाऱ्या पोकळीची जागा गटगच्या चर्चेने घेतली आणि परत धमाल सुरु झाली. पु्न्हा यादी बाहेर निघाली. रोज कुणा ना कुणाची यादीत भर पडायला लागली. मेनु ठरवायला सुरवात झाली. कोण कोण काय आणनार याची चर्चा मुळ धरायला लागली. साधनाताईने अगदी फक्कड मेनु नक्की केला. चिकन भुजिंग, कोंबडी वडे शाकाहारींसाठी काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळी. जागुताईपण बरेच काही आणनार होती. एकुणच सगळ्यांनाच आता गटगचे वेध लागले होते. रोजचे धकाधकीचे आयुष्य सुरुच होते. प्रत्येकजण कामानिमित्त कुठे ना कुठे पांगले होते ते सर्व आता रविवारी साधनाताईकडे जमुन थोडे विरंगुळ्याचे क्षण अनुभवणार होते. पण अचानक चार दिवसांवर रविवार असताना साधनाताईचा मेसेज धडकला “तब्बेत बरी नसल्याने या रविवारचे गटग पुढच्या रविवारी होईल.” मग काय, “कुठवर आली आहे तयारी?” असे विचारणारे मेसेज एकदम “गेट वेल सुन, अगोदर बरी हो मग पाहू गटगचे, काळजी घे” या सारखे मेसेज सुरु झाले.
तो रविवार तसाच गेला. साधनाताईलाही आता बरे वाटत होते. पुढचा रविवार जवळ आला. पण पुर्वी जसे एखाद्या लढाईच्या अगोदर सेनापती सैन्य जमवत असे व तह वगैरे झाल्यावर सरदार आपापल्या मुलखात परतत असत तसे आता बरेच जण दिवाळीच्या सुट्टीची मजा केल्यानंतर आपापल्या कामाच्या मुलखात परतले होते. अगोदरच्या गटगच्या यादीतील नावांना गळती लागली होती. आता कितीही एल्गाराची हाक दिली तरी सरदार काही जमायला तयार नव्हते. अर्थात ते बरोबरच होते. दिवाळीमुळे तुटलेली प्रत्येकाच्या रोजच्या कामांची साखळी आता व्यवस्थीत जुळली होती. सर्वांचे रुटीन आता व्यवस्थित सुरु झाले होते. पण हट्टी साधनातैने मात्र “गटग ठरले म्हणजे व्हायलाच हवे” असा पवित्रा घेतला. शेवटी यादीत जे उरले त्यांनी जमायचे ठरवले. मी, निरुदा,जागुताई, भरत, श्री व सौ. तुषारदा, पलक यांनी जमायचे ठरवले. मेनु आता शक्यतो साधनाताईला ‘फारसा त्रास नको’ असा ठेवला गेला. 
पुण्यातुन शशांकदा (शशांक पुरंदरे) येणार नव्हते, टीनानेही क्लासचे निमित्त पुढे केले. त्यामुळे सकाळी सात वाजता गाडी काढली आणि निघालो. सोबत फक्त बायको होती. तिन तासाचा प्रवास असल्याने तशीही काही घाई नव्हती. रविवारची सकाळ असल्याने रस्त्यावरही ट्रॅफिक नव्हते. सकाळची हवा मस्त थंड पडली होती. रमत गमत निघालो. विचार आला की कितीतरी दिवस झाले जुना मुंबई-पुणे रोड पाहीला नाही. त्यामुळे तिकडुन जावूयात. पण सवयीने गाडी एक्सप्रेसवेवर घेतली आणि मग लक्षात आले की आपल्याला जुन्या रोडने जायचे होते. येताना येवू म्हणत निघालो. आदल्या रात्रीपर्यंत ‘जायचे नाही’ असेच ठरले होते व सकाळी ऐनवेळी निघालो असल्याने यजमानांसाठी काही घ्यायचे जमले नव्हते. नाही तर पुण्यातून कुणाकडे जाताना बाकरवडी आणि काका हलवाईची मिठाई घेतली नाही असे सहसा होत नाही. लवकर निघाल्यामुळे नाष्टाही केला नव्हता. रस्त्यात फुड जंक्शनला कधी थांबत नाही त्यामुळे आता साधनाताईचे घर गाठने गरजेचे होते. कारण जरा जरा भुक लागली होती. डेस्टीनेशन जसजसे जवळ येत होते, भुक तसतशी वाढत होती. विचार केला की ताईच्या घरी गेल्या गेल्या जे काही असेल ते प्रथम मागुन घेवून खावू मग दुपारच्या जेवणाचे पाहू. भले रात्रीची भाजी असली तरी चालेल. भुकच तेवढी लागली होती. मधेच निरुदांचा फोन येऊन गेला “कुठवर आलात?” हे विचारण्यासाठी. ड्राईव्ह करत असल्याने “आलोच” असे मोघम बोलुन फोन ठेवला. पण तेवढ्या फोनमुळेही नेमकी जेथुन डावीकडे वळायचे होते ते ठिकाण मागे गेले. मग पुन्हा पुढे जावून यु टर्न घेवून मागे आलो. यात दहा मिनिटे गेली. आता दहा मिनिटे सुध्दा जास्तच वाटत होती. आम्ही एकदाचे साडे अकराला पोहचलो. साधनाताईच्या घरापुढेच गाडी पार्क केली. 
निरुदा टेरेसमधेच उभे होते. कॅमेरे वगैरे होते गाडीत पण ऐनवेळी ते सगळे तसेच ठेवून आम्ही घरात एन्ट्री केली. निरुदांनी इतके उत्साहाने, सुहास्यवदनाने स्वागत केले की पुणे-मुंबई प्रवासाचा जो थोडाफार शिणवटा होता तो पार पळाला. किचनमधे महिलामंडळाचे आवाज येत होते. बायको तिकडे वळाली. मी सोफ्यावर रिलॅक्स होवून बसलो. ज्या गटगची जवळ जवळ महिनाभर चर्चा सुरु होती ते गटग छोट्या स्वरुपात का होईना साजरे होत होते. मी यायच्या अगोदर निरुदा आणि जागुताई श्रावणीला घेवून आली होती. भरतही आम्ही यायच्या अगोदर पोहचला होता. तुषारदांची जोडी आणि पलक आले नव्हते. साधनाताईने बाहेर एक चक्कर टाकुन ‘हाय’ केले आणि पुन्हा किचनमध्ये गुप्त झाली. पण निरुदा समोर असल्यावर मग गप्पांना काय तोटा! हळू हळू एक एक विषय निघत गेला आणि गप्पा सुरु झाल्या. आमच्या गप्पांच्या गाडीला कोणताही रुळ वर्ज्य नव्हता, त्यामुळे अगदी ‘वाघांची कमी होत जाणारी संख्या’ ‘सामन कॅननचा उपयोग करुन सामन माशांचा अंडी घालण्यासाठीचा प्रवास कसा सुखकर होईल’ या पासुन ते ‘पानिपताच्या पार्श्वभुमीवरील कादंबऱ्या आणि मायबोलीवरचे आजकालचे लेखन’ असा कुठलाही रुळ कधीही बदलत आमच्या गप्पांची गाडी धावत होती. मधेच ‘दुर्दैवी रंगु’ या जुन्या कादंबरीचा विषय निघाला आणि लेखकावरच गाडी अडली. निरुदांनी त्यांच्या आईला फोन करुन विचारुन घेतले. आईंनी अगदी लेखकाचे नाव, कादंबरी लिहिताना कोणत्या ऐतिहासीक रुमालांची मदत झाली वगैरे इत्यंभुत माहिती दिली. ते पाहुन मात्र आश्चर्य वाटले. मराठी साहित्याचा चांगलाच अभ्यास होता निरुदांच्या आईंचा. मधेच साधनाताईने चिकन भुजिंगच्या प्लेट आणुन दिल्या तेंव्हा कुठे मला ‘येताना मी भुकेने कासाविस झालो होतो’ हे लक्षात आले. म्हणजे एकुनच गप्पांच्या नादात आम्ही चांगलेच भान विसरलो होतो. चिकन भुजिंग हा प्रकार वसईची खासियत. मी युट्युबवर याची रेसेपी खुपदा पाहिली होती. पण एकुणच पोहे आणि चिकन यांना एकत्र करायचे कधी धाडस केले नव्हते. पण आता ऐन भुकेच्या तडाख्यात समोर भुजिंग आल्यावर मात्र दुसरा काही विचार सुचला नाही. निरुदा, मी आणि बायको यांच्या तिन प्लेट समोर होत्या. निरुदांनी त्यांची प्लेट घेतली. मी आणि बायकोने एकाच प्लेट मध्ये खायला सुरवात केली. त्यावरुनही जागुताईने आमची खेचायची संधी सोडली नाहीच. पहा कसे एका ताटात खाताहेत म्हणुन भरपुर हसुन घेतले. भुजिंगचा पहिला घास घेतला आणि ती चव सगळ्या टेस्ट बडस् ला चेतवत तोंडभर पसरली. आहाऽऽहा! निव्वळ अप्रतिम चव होती भुजिंगची. तेवढ्यात साधनाताईने भुजिंगचे पातेलेच समोरच्या सेंटर टेबलवर आणुन ठेवले. त्यामुळे संकोचाचे काही कारणच राहीले नाही. भरतही एक प्लेट घेवून जमिनिवरच खात बसला होता. किचनमधले बरेचसे काम उरकल्यातच जमा होते त्यामुळे जागुताई आणि साधनातैपण आमच्याबरोबर बाहेर येवून गप्पा मारत बसल्या. मुळात आमचा ग्रुपच ‘निसर्गप्रेम’ या एका गोष्टीमुळे तयार झाला होता. त्यामुळे प्रत्येकाचे त्यावर आपापली मते होती. निरुदांच्या आणि माझ्या गप्पांमधे आता साधनाताईनेही भाग घ्यायला सुरवात केली. परदेशात किती प्रयत्न केले जातात वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी, त्या मानाने आपल्याकडे काहीच विचार केला जात नाही यावर चर्चा सुरु झाली. ‘निसर्गामधे मानवाचा हस्तक्षेप’ यावर साधनातैची मते अगदी जहाल म्हणावी अशी आहेत. “मुळात पृथ्वीवरील अन्नसाखळीत मनुष्य कुठेच बसत नाही त्यामुळे तो नाहीसा झाला तरी निसर्गाला फारसा फरक पडणार नाही.” अशी मते ती बिंधास्त मांडते. वरती ‘माझं आहे हे असे आहे, पटले तर घ्या’ असा मामला आहे तिचा. अर्थात त्यामुळे गप्पा कशा कुरकुरीत होतात नेहमी. उगाच नाही तिला आम्ही सगळे ‘आज्जी’ म्हणत. जागुताईकडे फक्त एकच काम. आई जशी आपल्या मुलांकडे ‘त्यांनी काहीही केले’ तरी कौतुकाने पहाते, तसे पहात रहाणे. ते काम ती करत होती. मधे मधे बायकोला “किती वाजता निघाले? सापडले का घर?” वगैरे विचारत होती. इतक्यात पलकचा फोन आला. मग साधनाताईने “आमचे प्लॉट बांधताना कसे चुकीचे नंबर दिले, शेजारी शेजारी यायचे तर समोरा समोर नंबर कसे आले” हे परत एकदा आम्हाला ऐकवत खालीच उभ्या असलेल्या पलकला खिडकीतुन आवाज देत घराचा पत्ता सांगितला(?). दोन मिनिटातच पलक आत आली. सोबत तिचा मुलगा वेद होता. प्रचंड अवखळ. भुजिंग खावून झाल्यावर मी आणि निरुदांनी पुन्हा गप्पा सुरु केल्या आणि बाकी सगळे हॉलच्या समोरच असणाऱ्या प्रशस्त टेरेसमधे गप्पा मारत बसले. वेदला खेळायला टेरेसमधला झोपाळा आणि साधनाताईचे मांजर होतेच. भरतनेही मग साधनाताईच्या बागेत माळीकाम सुरु केले. टोमॅटोची रोपे लावून दिली. कोकेडामा बॉल करायला घेतले. गप्पा मारता मारता त्याने इतक्या सफाईदार पणे हँगीग कोकेडामा बॉल बनवुन दिले की विचारु नका. काही बॉल खिडकीतल्या मोराच्या पिसमध्ये ठेवायलाही केले. इतक्यात तुषारदांनी एन्ट्री घेतली. तुषारदा म्हणजे हलक्या फुलक्या विनोदाचे तुषारच. ते साध्या साध्या वाक्यातही अशी काही कोटी साधुन जातात की आपोआप खसखस पिकते. मी विचारले “काय म्हणताय तुषारदा?” तर समोरच्या सेंटर टेबलवरचे कविता महाजन यांचे “ब्र” पुस्तक पाहुन तुषारदा म्हणाले “समोर ब्र असल्यावर आम्ही काय ब्र काढणार?” या माणसाचे एकुण व्यक्तीमत्वच आजुबाजुला आनंद पसरवणारे. तेवढ्या वेळात साधनाताईने येवून एकदा निरुदा आणि मला वॉर्नींग दिली होती की गप्पा थांबवा नाहीतर विषय बदला. गप्पा जरा जमिनीवर येवूद्या. पण तुषारदा आल्यावर गप्पा आपोआप हलक्याफुलक्या झाल्या. नैसर्गीक शेतीचा विषय निघाला. पाळेकर गुरुजींच्या वेगवेगळ्या सत्रांचा विषय निघाला. एव्हाना दुपार टळुन गेली होती. भुकेची अजुनही जाणीव नव्हती पण जागुताईने घाई केली आणि एक एक पदार्थ हॉलमधे आणुन ठेवला गेला.
एक एक पदार्थ जसजसा हॉलमधे यायला लागला तसतशी भुकेची जाणिव व्हायला लागली. जागुताईने येताना सोलकढी आणि प्रॉन्स मसाला आणला होता. तुषारदा येताना सोबत कोळंबी पुलाव घेवून आले होते. निरुदांनी भेजा फ्राय आणला होता. भरतने येताना खारुड्या की काय नाव असलेले पापड आणले होते. जागुताईने आल्या आल्या बिटाची कोशिंबिर केली होती. साधनाताईने झणझणीत कोंबडी-वडे करुन ठेवले होते. हे सर्व मधे मांडुन ठेवल्यावर मात्र आमच्या गप्पा आपोआप थांबल्या आणि आमची छान अंगत-पंगत बसली. जागुताईने इतकी सोलकढी आणली होती की तुषारदा म्हणाले देखील की “एवढी कढी कशासाठी? काय अंघोळ करायचीय का?” मग ताटे दिली गेली. कुणीही कुणाला वाढायचे नव्हते. त्यामुळे एक एक पदार्थ प्रत्येकाने वाढुन घेवुन पुढे सरकवला. सगळ्यांची ताटे वाढून झाल्यावर जेवणे सुरु झाली. पुण्यात एकुणच ओरीजनल सोलकढी प्यायला मिळत नसल्याने माझी जेवणाची सुरवात अर्थातच सोलकढीने झाली. काय सुरेख सोलकढी केली होती जागुताईने. खरोखर अप्रतिम. गप्पा मारत जेवायचा प्लॅन असला तरी प्रत्यक्षात जेवणे सुरु झाल्यावर मात्र “हे इकडे सरकव” किंवा “ते जरा तिकडे दे” “वड्यांचा डबा सरकवा इकडे” “कोळंबी द्या जरा तिकडे” याव्यतिरिक्त फारशी वाक्ये काही ऐकायला येईना. तुषारदांनी सोलकढीतला चमचा काढून चक्क बाजुला ठेवला आणि चक्क स्टिलचा ग्लास हातात घेवून सोलकढी वाढायला सुरवात केली. सगळेच इतकी सोलकढी पिले की जेवणे उरकल्यावर सगळ्यांच्या लक्षात आले की जेवताना तसेच जेवण झाल्यावरसुध्दा कुणी पानी मागीतले नव्हते. फक्त सोलकढी. “एवढी सोलकढी कोण पिणार?” असा प्रश्न सुरवातीला पडला होता पण जेवण संपता संपता सोलकढीच्या डब्याने अक्षरशः तळ गाठला. मी जागुताईकडे पाहीले तर ती फक्त “मला माहित होते.” एवढेच हसुन म्हणाली. मी तसा बऱ्यापैकी नॉनव्हेज खाणारा असलो तरी आजवर कधी भेजा फ्राय खाल्ला नव्हता. म्हणजे धाडस झाले नव्हते. टॅबुच म्हणा हवं तर. पण निरुदांनी “एकदा खावून तर पहा” असा आग्रह केल्यामुळे मी प्रथमच त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भेजा फ्राय खाल्ला. आणि इतके दिवस आपण का भेजा फ्राय खाल्ला नाही याचा पश्चाताप करुन घेतला. सौ तुषार यांनी आणलेला कोळंबी पुलाव तर खासच होता. उन्हात वाळवलेला कांदा तळून त्याचा कुरकुरीत जाड थर सर्व पुलाव्यावर दिला होता. पुलाव जितका चविष्ट होता त्यापेक्षा तो कांदा चवदार लागला. निरुदांनी तर वरचा थोडासा कांदा चमचाने काढून खाल्ला. आमच्या या जेवणाकडे जागुताई अगदी कौतुकाने पहात होती. तिने आणलेली सोलकढी, प्रॉन्स मसाला, कोशिंबिर आम्ही सगळे मनापासुन खात होतो आणि आनंद मात्र जागुताईच्या चेहऱ्यावर पसरत होता. ते चवदार पदार्थ खावुन तृप्त आम्ही होत होतो आणि ती तृप्तता जागुताईच्या चेहऱ्यावर उमटत होती. जर खरच अन्नपुर्णा असेलच तर ती अगदी या जागुताईसारखी दिसत असणार हे नक्की. तसेही ग्रुपमधे तिला सगळे अन्नपुर्णाच म्हणतात. या सगळ्यात पलकची आणि वेदची धावपळ सुरु होती. खाऊ घालणारी आई आणि हट्ट करणारं तिचं बाळ असं नेहमीचे दृष्य. तरी भरत त्याला अधुन मधून एक एक घास भरवत होता. जेवणे उरकली. ताटे, भांडी उचलली गेली. आम्ही जरा सोफ्यांवर विसावलो. तेवढ्या वेळात साधनाताईने वेदला भरवले. कधी शोकेसमधला हत्ती काढुन दे तर कधी काय असं करत करत वेद अखेर जेवला. साधनाताईला एवढं लहान मुलात मुल झालेल पाहुन गम्मत वाटली. हॉल आवरला नाही तोच साधनाताईने आईस्किमचे पॅक मधे आणुन ठेवले. पोटात आता खरच जागा नव्हती. पण साधनाताईने आणि निरुदांनी आईस्किमचे बाऊल मँगो आणि व्हॅनिलाने भरले आणि वर दोन दोन गुलाबजाम ठेवले. मग काय, पुन्हा एकदा डेझर्टच्या नावाखाली आमची खादाडी परत सुरु झाली. आता मला तर असं झालं होतं की मी खाता खाता तोंडातच अर्धा घास ठेऊन झोपतो की काय. पण तुषारदांच्या मिश्किल बोलण्याच्या नादात आम्ही ते बाऊलही रिकामे केले. तोवर जागुताईच्या श्रावणीने पलकच्या मदतीने मस्त पाने बनवली. तुषारदांनी गुलकंदाचा डबाच आणला होता. चुना आणि सुपारी वगळलेली, भरपुर गुलकंद आणि सौंफ टाकलेली ती पाने अगदी गोड लागली. आता मात्र मन आणि पोट तुडुंब भरले. गटगचे समाधान सगळ्यांच्याच चेहऱ्यावर होते. पण मला पुणे गाठायचे होते आणि माझे तर डोळे मिटायला लागले होते. जेवणे उरकल्यावर अर्धा तास बसलो असेन नसेन, साधनाताईने टेकडीवर फिरायला जाण्याचा फतवा काढला. जणू काही तिला म्हणायचे होते “भरवले मी, आता जिरवणार पण मीच” पण मला घाई करणे भागच होते. त्यामुळे निरुदांच्या मागे लागुन शेवटी निघण्याची परवानगी मिळवली. मग निघताना एकमेकांना भेटी देण्याचा छोटासा कार्यक्रम पार पडला. यातही पर्यावरणाचे प्रेम दिसलेच. तुषारदांनी एक एक संतरे आणि सर्व औषधी भाज्यांची पाककृती आणि औषधी माहिती देणारे अतिशय सुंदर पुस्तक भेट दिले. निरुदांनी सुपारीच्या झाडापासुन बनवलेल्या केसमधे पॅक केलेके हँडमेड साबण आणि चविष्ठ असे मिरचीचे लोणचे दिले. जागुताईने नेहमी उपयोगी पडेल अशी छोटीसी सुरेख प्रवासी बॅग दिली. तसेच वड्या करण्यासाठी खास आळुची पाने दिली. (बॅगचा उपयोग पुण्याला परततानाच झाला.) मी मोकळ्या हाताने गेल्याने माझ्याकडे परतभेटी साठी काही नव्हते. हे गटग लहान पण फारच संस्मरणीय झाले होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सगळ्या सदस्यांचे जंबो गटग माझ्या गावच्या शेतात करायचा ठराव पास करुन तसेच पोहचल्यावर लगेच मेसेज किंवा फोन करेन असे आश्वासन देऊन मी सगळ्यांचा निरोप घेतला. पाय जड झाले होते, मन भरुन आले होते हे तर खरच पण “जानेवारीत भेटणारच आहोत सगळे” असं मनाला सांगत मी पुण्याच्या दिशेने गाडी वळवली.
(मी गेल्यानंतर साधनाताईने खरच सगळ्यांना टेकडीवर फिरायला नेले. या बाईचा उत्साह, एनर्जी पाहुन खरच चकित व्हायला होतं हे नक्की. ते फोटोही मी येथे देत आहे. निरुदांसारखा उत्कृष्ट फोटो काढणारी व्यक्ती तेथे असल्याने मी मोबाईलला हातही नाही लावला. खालील पदार्थांचे सर्व फोटो हे निरुदांनी काढलेले आहेत. तसेच गटग चुकवणाऱ्या सदस्यांना जळवण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी या फोटोंचा उपयोग तर झालाच पण त्यावर अजुन कळस करण्यासाठी मी ड्रायव्हींग करत असतानाच एक कविता केली होती तीही येथे देतो आहे. कविता म्हणुन तिला फारसा दर्जा नसला तरी तिने तिचे काम अगदी बरोबर केले. आता वेध जानेवारीतील माझ्या शेतातील गटगचे.)
----------------------------------------------------------------------
जे गटगला आले नाही त्यांनी मनाला लावून घ्यायचं काम नाय
कारण गटग तसं काय फारसं मनासारखं जमुन आलं नाय.
साधनाताईंच्या भुजींगला मात्र जगात कुठं तोड नाय
तेवढं सोडलं तर गटग काय मनासारखं जमुन आलं नाय.
गप्पाही रंगल्या मनसोक्त, शेवटी विषयांना वेळ पुरला नाय
तेवढं सोडलं तर गटग काय मनासारख जमुन आलं नाय 
निरुदांच्या भेजाफ्रायने भेजाला दिला असला शॉट
भेजाफ्राय आणि भेजाफ्राय मनात येईना दुसरा थॉट
जागुताईची सोलकढी आणि ग्लास भरायला तुषारदा
असला योग जुळून येवो, बारा महीने अन् सदा कदा
गुलाबी सोलकढीची चव काय जीभेवरुन जात नाय
तेवढं सोडलं तर गटग काय मनासारखं जमुन आलं नाय
काय तो कोळंबी पुलाव आणि त्यावरचा कांद्याचा थर
मधे मधे गुलाबी कोळंबी अन् गुलाबी कोशिंबिरीची भर
हे खावू की ते खावू, मला तर काय बी सुधारलं नाय
तेवढं सोडलं तर गटग काय मनासारखं जमुन आलं नाय
प्रॉन्स मसाला खाता खाता ब्रम्हानंदी लागली टाळी
आठवेणा कधी खाल्ली होती अशी डिश कोण्या काळी
जागुचे हातच मागुन घ्यायचे होते, तेच लक्षात राहील नाय
तेवढं सोडलं तर गटग काय मनासारखं जमुन आलं नाय
शेवटी तर या आईस्कीमने अगदीच हो केला कहर
दोन दोन फ्लेवर, आणि त्यात वर गुलाबजामची भर
भरगच्च झाले पोट तरी हा मोह सुटायचं काय नाव नाय
तेवढं सोडलं तर गटग काय मनासारखं जमुन आलं नाय
असली माणसं, असलं प्रेम, पाय काय तिथून निघत नाय
तेवढं सोडलं तर गटग काय मनासारखं जमुन आलं नाय
म्हणून म्हणतो
जे गटगला आले नाही त्यांनी मनाला लावून घ्यायचं काम नाय
कारण गटग तसं काय फारसं मनासारखं जमुन आलं नाय.

--------------------------------------------------------------------------------------------

सकाळचा नाष्टा - चिकन भुजिंग

तुषारदांनी आणलेला कोळंबी पुलाव
साधनाताईने केलेले कोंबडी वडे
निरुदांनी आणलेला भेजा फ्राय
जागुताईच्या हातचा चविष्ट प्रॉन्स मसाला
सोलकढी. या कढीने जेवण संपेपर्यंत पाण्याची आठवणच होऊ दिली नाही.
जागुताईने केलेल्या बिटाच्या कोशिंबिरीने जेवणाची लज्जत वाढवली.
सर्व मेन्यु एकत्र
जेवणानंतर गोड हवेच. गुलाबजाम.
आणि सोबत मँगो आणि व्हॅनिला फ्लेवर आईस्क्रीम.
श्रावणीने केलेले गुलकंद तांबुल.
तुदांसोबत रंगलेल्या गप्पा.
जेवणानंतर केलेली शतपावली.
शतपावली करताना टिपलेले काही क्षण.
निघताना निरुदांनी दिलेली कल्पक व सुंदर भेट.
भरतने केलेल्या कोकेडामा बॉलची तयारी.
भरतने केलेले कोकेडामा बॉल्स
हे मोराच्या कुंडीत ठेवलेले कोकेडामा बॉल्स













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

गण्या

गण्या सातवीत सातव्यांदा नापास झाला आणि वैतागलेल्या गुरुजींनी त्याला मनसोक्त हाताखालून काढला. गण्या त्यादिवशी गुरुजींच्या हातातून जो सुटला ते...