❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

देवा जाग्यावर...२

जरी आम्ही दोघांनी फाऊंडेशनला ऍडमीशन घेतले असले तरी आम्ही इंजीनिअरींगची डिग्री घेवून वर्षभर घरी बसून मग ऍडमिशन घेतले होते. त्यामुळे वर्गात सर्व मुलं दहावी किंवा बारावीनंतर प्रवेश घेतलेली, ओठांवर नुकतीच सोनेरी लव उमटायला लागलेली असली तरी आमच्या ओठांवर मात्र भगतसींगचा आकडा होता. आम्ही त्याची निगाही राखली होती. खरेतर आमचं वर्गात बसनेच फार विनोदी होते. बाकी पोरं नुकतीच कॉलेज जीवनाला सरावत होती व आम्ही मात्र ते जीवन कोळून प्यायलो होतो. होस्टेल लाईफचे सर्व फेरे घेवून आलो होतो. त्यात नान्या म्हणजे फार महामिश्किल माणूस. फार राग आला की कुणी नकळत मातृभाषेत बोलतो किंवा कुणी फार चिडल्यावर नकळत इंग्रजीत शिव्या देतो तसे नाना फार रंगात आला की स्वतःचं सारे बाजूला सारुन हमखास एखाद्या नाटकातले, चित्रपटातले, कादंबरीतले वाक्य वापरायचा. त्याच्या या सवयीने खुपदा गंभीर प्रसंगातही अगदी धमाल उडायची. एकदा तर त्याने सरांनाही जेरीस आणले होते. त्याचे झाले असे की प्रभातला ‘बोट लावीन तेथे गुदगुदल्या’ लागल्याची बातमी आली. शंभर वेळा पाहीलेला असुनही आम्ही त्याच दिवशी संध्याकाळच्या शोला हजेरी लावली. चित्रपटातील पहिलाच प्रसंग असा होता की दादा कोंडकेंना स्वर्गात जायचे असते व त्यांचे शिष्य त्यांना विचारतात की महाराज तुम्ही स्वर्गात गेल्यावर तुमच्या सामानाचे काय करायचे? तेंव्हा साधू बनलेले दादा म्हणतात की “आम्हा साधूपुरुषांजवळ कसलं आलं आहे सामान?” रात्री पिक्चरमुळे तसाही उशीर झाल्याने आम्ही दुसऱ्या दिवशी कॉलेजलाही उशीराच पोहचलो. पहिला तास कसला होता आठवत नाही पण तो संपला होता. सर पुस्तके घेवून बाहेर पडता पडता म्हणाले “सकाळी सगळ्यांनी कॉलेजला न येता परस्पर सारसबागेत या. तेथेच तुम्हाला मी वॉटरकलरचा प्रात्यक्षिक देईन. येताना सर्वांनी आपापले सामान घेवून यावे” सरांनी शेवटचे वाक्य उच्चारायला आणि आम्ही दारातून आत यायला एकच वेळ झाली. नान्याने सरांचे शेवटचे वाक्य ऐकले आणि एखाद्या ऋषीने शापवाणी उच्चारताना हातातली कुबडी वर करावी तसे दारात उभे राहून त्याने हातातला टी-स्क्वेअर उंचावला व छाती काढून अतिशय धिरगंभीर व मोठ्या आवाजात म्हणाला “सामाऽन? आम्हां साधूपुरुषांजवळ कसलं आलं आहे सामान?” सगळा वर्ग एकदम स्तब्ध झाला. सरही अवाक झाले होते. काही झालेच नाही अशा थाटात नान्या चालत शेवटच्या बँचवर जावून बसला. मागोमाग मी. नान्या बँचवर बसला आणि वर्गात हास्याचा एवढा मोठा स्फोट झाला की सर वैतागून कधी वर्गाबाहेर गेले व दुसऱ्या विषयाचे सर कधी वर्गात आले हे कुणाच्याही लक्षात आले नाही. 
हा नान्या कुणाला कधी काय बोलेल याचा काही नेमच नसायचा. कॉलेजला जाताना एका मुलीच्या स्कुटीने आम्हाला असा काही कट मारला की आम्ही पडता पडता वाचलो. “जाऊदे नाना तिला” असं मी म्हणत असतानाही नान्याने भर ट्रॅफीकमधे त्या मुलीचा पाठलाग करुन अडवले. मला टेन्शन आले होते. ती मुलगी घाबरुन उभी होती. नान्याने बाईक स्टँडवर लावली. त्या मुलीपुढे दोन्ही हात जोडून कमरेत वाकून उभा राहीला व अतिशय नाटकी अंदाजात म्हणाला “धन्यवाद आक्कासाब!”
मागे फिरुन गाडीला किक मारुन आम्ही तेथून क्षणात निघूनही गेलो. मागे त्या मुलीची काय अवस्था झाली असेल हे आठवून आजही मला हसु येते. एकदा सारसबागेजवळून जाताना, कमरेपर्यंत केस असलेली मुलगी पाहून या नान्याने तिला “फार सुंदर आहेत केस तुमचे अक्का” म्हणत मला घाम फोडला होता. तर असो.
मुर्तीकलेतील काही बेसीक गोष्टी शिकणे एवढाच माझा उद्देश असल्याने आम्ही फक्त फाऊंडेशनचे एकच वर्ष कॉलेजमधे थांबणार होतो. ऍडमिशन घेताना मी प्राचार्यांना तसे स्पष्ट सांगीतले होते. तसेच वर्षभर कोणत्याही वर्कशॉपला, कुठल्याही वर्गात बसण्याची परवानगीही मी त्यांच्याकडून मिळवली होती. करीअर करायच्या दिवसात दोन मुले कलेसाठी एवढी धडपडतात हे पाहून प्राचार्यांनीही कौतूकाने सगळ्या परवानग्या आनंदाने मान्य केल्या होत्या. अर्थात हे करण्यासाठी त्याच कॉलेजमधे नुकताच शिक्षक म्हणून रुजू झालेल्या आमच्या मित्राचीही मला खप मदत झाली होती. सकाळी मी आणि नान्या कॉलेजला पोहचलो की वेगवेगळ्या वाटांनी जावे तसे वेगळे व्हायचो. मी आजचा दिवस कुठे घालवायचा हे एकदा सर्व कॉलेज फिरुन अंदाज घेई व अॅनॉटॉमी स्केचींग किंवा क्लेवर्क वगैरे सुरु असलेल्या वर्गात बसत असे. नान्याला कलेची उत्तम जाण असली तरी रस अजिबात नव्हता. मग तो कॉलेजच्या पोर्चसमोरच्या कट्ट्यावर आपला दरबार भरवत असे. कॉलेजमधे टगेगीरीत नाव कमावलेली सिनिअर पोरेही नान्याच्या वयापुढे व अनुभवापुढे ज्युनिअर असत त्यामुळे त्याला फारसा विरोध होत नसे. त्याच्या या दरबारात अनेक कथले येत व नान्याही ते उत्साहाने सोडवत असे. कुणाच्या होस्टेलमधल्या रुमचा प्रश्न असे, कुणा मुलीला कुणी त्रास देत असे तर कुणा ज्युनिअरला टगे मंडळी त्रास देत असत. ही सगळी त्रस्त जनता नानासाहेबांच्या दरबारात काकूळतीने हजेरी लावत असत व नाना त्यांच्या कथल्यांचा निवाडा करत असे. नान्याने केलेल्या निवाड्याला शक्यतो कुणी विरोध करत नसे कारण एक तर तो निवाडा न्याय्य असे व कुणाला नाहीच पटले तरी नान्याला विरोध करायचे त्यांच्यात धाडस नसे. एकदा काही मुलांनी “सकाळी नान्या कॉलेजला आला की त्याची सोय करु” अशी धमकी दिली. मी नान्याला या सगळ्यात पडू नकोस म्हणून खुप विनवण्या केल्या पण बेदरकार नान्याने माझे ऐकले नाही. त्याच्या वडीलांचे मार्केट यार्डमध्ये दोन गाळे होते. मी दुपारीच सायकलवरुन मार्केटयार्ड गाठले व तेथील कामगारांना या प्रकरणाची कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी चार पाच हमाली करणाऱ्या आडदांड पोरांनी कॉलेजमध्ये येवून “कंच्या भाडखावने आमच्या नानाशेठला तरास धिला रं?” म्हणत सगळ्या कॉलेजमधे चौकशी केली व नान्याच्या दहशतीचा खुंटा आणखी भक्कम झाला. अर्थात सरळमार्गी नानाने कधी कुणाला त्रास दिला नाही. उलट दोन तिन महिन्यात कॉलेजमधली राडेबाजी बरीचशी कमी झाली. 
नाना त्याच्या दरबारात दंग होता तर मी जे काही शिकता येईल ते अक्षरशः अधाशासारखे ओरबाडत होतो. मुर्तीकलेला शरीरशास्त्राचाही अभ्यास हवा हे माझ्या डोक्यात बसल्याने मी आता संध्याकाळचा बराचसा वेळ स्वारगेट एसटी स्टँडवर लोकांचे स्केचेस करण्यात घालवायला लागलो. नान्याही शेपटाप्रमाणे तेथे माझ्या मागे असेच. तेथेही आठ दिवसात अगदी कंट्रोलरपासून सगळे नान्याचे मित्र झाले. नान्याचा एक गुण मला फार आवडे. लखपती बापाचं हे कार्टं पण त्याला नावालाही अहंकार नव्हता. अगदी कामापुरताही नाही. त्याला स्टँडवरील हमालांचे कष्ट पाहून कळवळताना व त्यांना अवजड सामान एसटीच्या टपावर चढवायला निःसंकोच मदत करताना मी कैकदा पाहीले होते. पण स्टँडवर केलेल्या स्केचेसने माझे काही समाधान होईना. असे म्हणतात की दा विंची स्मशानातली प्रेते उकरुन आणायचा व पाण्यात ठेवायचा. मग दोन दिवसाने घोड्याच्या केसांपासून बनवलेल्या ब्रशने त्या प्रेताच्या त्वचेचे थर घासून काढून आतल्या शिरांचे वगैरे स्केचेस करायचा. ही दंतकथा बाजूला ठेवली तरी मला निदान बेसीक स्केचेस गरजेचे वाटायला लागले. मला काही मुलांनी सांगितले की मुंबईला जेजेमधे प्रत्यक्ष न्युड मॉडेल बसवतात. पण ते पुण्यात तर शक्य नव्हते. मग यावरचा उपायही याच सिनियर्सनी सुचवला. पुण्यातील रेड लाईट भागात कुणाला पैसे दिले तर मॉडेल मिळणे शक्य होते. हे ऐकलं आणि नान्या एकदम खुष झाला. कारण मॉडेलची अडचण माझी होती पण टेन्शन मात्र त्याला होते. हा मार्ग कितपत योग्य आहे हे अजुन मला ठरवता येत नव्हते. नान्या मात्र पुलंच्या स्टाईलमधे “अप्पा, रांडेच्या तु एक नंबर शेपूट घालणारा आहे बघ” म्हणत उद्याच जावू म्हणून मागे लागला. सकाळी अर्थातच कॉलेजला दांडी मारली. समोर मॉडेल बसवून स्केचींग करणे ही कल्पना जरी छान वाटत असली तरी प्रत्यक्षात निघताना मात्र माझे अवसान गळाले. मला खरे तर जायचे होते, फक्त धाडस होत नव्हते. त्यामुळे मी नान्याला जोरदार विरोधही करु शकत नव्हतो व मोकळ्या मनाने त्याच्यासोबत जातही नव्हतो. नानाला बहुतेक माझ्या या अवस्थेचा अंदाज आला असावा. त्याने यावर मधला मार्ग काढला. सध्या घरातून निघू. तेथे गेल्यावर जर नाहीच मन झाले तर श्रीदत्ताचे दर्शन घेऊ व प्रभातला जो लागला असेल तो शो पाहू किंवा बालगंधर्वला नाटक पाहू. “आज नाटकच पहायचे” असे मनाला सांगत मी नान्याच्या गाडीवर बसलो. तासाभरात आम्ही मंडईमधे होतो. उगाच इकडे तिकडे वेळकाढूपणा करत मी मागे मागे रेंगाळत होतो. नान्याने गाडी पार्क केली व माझे मनगट धरुन ‘त्या’ गल्लीकडे मला ओढले. मी एका हातात पॅड व चारकोल सावरत नान्यामागे कसायाने बकरू न्यावे तसा रडत-खडत निघालो. त्याच्या मागे मी चार पावले टाकली असतील नसतील, मला एकदम वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखे वाटायला लागले. सुर्यग्रहणाच्यावेळी जो विचित्र अंधार पडल्यासारखा वाटतो व पाखरे सैरभैर होतात तसे त्या गल्लीत एकप्रकारे अंधारुन आल्यासारखे वाटत होते. आधिच गोंधळलेला मी पाखरासारखा आणखी सैरभैर झालो. नान्याने हात सोडला होता पण तरीही मी त्याच्यामागे भारल्यासारखा चालत होतो. मागे फिरायचे मला सुचत नव्हते. नान्यावर फारसा काही परिणाम झाल्याचे दिसत नव्हते. पाच दहा मिनिटे चालल्यावर एक सप्तरंगी चष्मा घातलेला, गळ्यात मफलर असलेल्या माणसाने नानाला थांबवले. मीही आपसुक थांबलो. नान्याचे आणि त्याचे काही बोलणे झाले आणि नाना त्या माणसाच्या मागे चालू लागला. मीही नान्यामागून निमूट चालत होतो. माझ्यात आजूबाजूला पहायचे धाडस नव्हते तरीही डोळ्यांच्या कोपऱ्यातून जे दिसत होते ते अगदी अगम्य होते. कुणीतरी एकदोन वेळा माझ्या शर्टची बाही ओढल्याचाही मला भास झाला. एक प्रकारचा अनामिक दर्प सगळीकडे भरुन राहीला होता. आजुबाजूला दुर्लक्ष केले तरी समोर तर पहावेच लागत होते. पण त्या रस्त्यावरुन येणारे जाणारेही या विश्वातले वाटत नव्हते. नाही म्हणायला मधेच कुणी माझ्या जगातले वाटणारे नवरा-बायको बाईकवरुन जाताना दिसत होते. त्यांना पाहून मला उगाच धिर आल्यासारखे होत होते. या नान्याच्या नादी लागून मी आज चांगलाच गोत्यात आलो होतो. मोठ्या उत्साहात एखाद्या झाडावर चढावे व एकवेळ अशी यावी की वरही चढता येवू नये व खालीही उतरता येवू नये तशी माझी अवस्था झाली होती. काही बोळांमधून एकदोन वळणे घेतल्यावर आम्ही एक दोन जिने चढलो. सोबतच्या माणसाने एक दरवाजा उघडून दिला आणि तो आल्या पावली माघारी फिरला. आम्ही आत गेलो. बाहेरच्या परिसराशी अगदी विपरीत तेथले वातावरण होते. एकदम चकचकीत पण भडक अशी अंतर्गत सजावट होती. पांढरे झिरझीरीत पडदे. मध्ये मध्ये काचेच्या बांगड्या व रंगीत मण्यांच्या माळा. सर्व भिंतींच्या कडेन लाल भडक सोफे त्यावर बसलेली एक दोन माणसे व बऱ्याच बायका, उग्र सुगंध आणि कर्कश्श व मोठ्या आवाजात वाजणारे संगीत. नान्या अगदी सराईत असल्यासारखा सोफ्यावर जाऊन बसला. मुळात त्याचे मन एखाद्या झऱ्यासारखे निर्मळ असल्याने त्याच्या मनात कधी अपराधीपणाची भावना येत नसे व न्युनगंड हा शब्दच नान्याच्या शब्दकोषात नव्हता. मी मात्र पुर्वी मुली दाखवण्याच्या कार्यक्रमात ती बिचारी मुलगी दाराशी जशी ओठंगून उभी राही तसा बुजून नान्याच्या बाजूला उभा होतो. जरा वेळाने नाना त्या लठ्ठ बाईने खुणावल्यावर तिच्या मागे आत गेला.
पाच मिनिटांनी बाहेर येवून मला म्हणाला “अप्पा, घाबरु नकोस रे. समोर तर दत्तमंदिर आहे. कुठे चंद्रावर नाही आलोय आपण. स्केचींगवर लक्ष दे. मला खाली काम आहे. आलो तर येईन मी येथे नाहीतर तुच खाली ये”
“अरे नान्या, आपण पुन्हा कधी तरी येवू. आता जावूयात” मी असं काही बाही बोलत असताना नाना तेथून गेलाही. त्या लठ्ठ बाईने मला एक दरवाजा उघडून दिला. मी आतल्या खुर्चीवर पॅड सावरत बसलो. काही तरी चाळा हवा म्हणून चारकोलचा बॉक्स काढून उगाचच त्यातले चारकोल निवडत बसलो. पाच दहा मिनिटांनी एक पंचविसच्या आसपास वय असलेली मुलगी आत आली. नान्याने त्या लठ्ठ बाईला व तीने या मुलीला समजावून सांगीतले असणार. पण तिच्या चेहऱ्यावरुन तिला काही समजले नव्हते हे कळत होते. तिने आत येवून दार लावले. मी कारण नसताना पॅडच्या वर असलेला पहिला पेपर स्वच्छ असुनही फाडून काढला. त्याचे बारीक तुकडे करुन ते व्यवस्थित बाजूला ठेवले. चारकोल पुन्हाएकदा सँडपेपरवर घासला. पायावर पाय ठेवून मांडीवर पॅड ठेवले आणि समोर पाहिले. एवढ्या वेळात त्या मुलीने अंगावरचे जवळ जवळ सगळे कपडे उतरवले होते व “पुढे काय करायचेय?” असा प्रश्न चेहऱ्यावर घेवून ती माझ्याकडे पहात होती. मी तिच्याकडे पाहीले आणि ते दृष्य पाहून माझे अवसानच गळाले. घशाला कोरड पडली. कसले न्युड मॉडेल व कसले स्केचींग, येथे पेपरवर साधे वर्तुळ काढायची माझी अवस्था राहीली नाही. बंद खोलीत कोंडलेल्या मांजरासारखी माझी गत झाली. कपाळ, गळा आणि सांगता येईना अशा ठिकाणी मला घाम फुटला. बेंबीला रग लागते हे मला नव्यानेच समजले. माझा तो गोंधळ ती मुलगी मजेने पहात होती. तिला या सर्वाची सवय असावी हे जाणवत होतं. मी समोरची तिची ओढणी मेलेले झुरळ बाहेर फेकावे तशी तिच्या अंगावर दुरुनच टाकून तिला कपडे घालायला सांगितले. माझे सामान मी घाईत आवरले व निघायची तयारी केली. तिने मोडक्या तोडक्या हिंदीत “होताय साएब ऐसा कबी कबी” असं म्हटल्यावर मी चिडलो. हातातले पॅड उघडून मी तावातावाने तिला माझे काही स्केचेस दाखवून माझा हेतू स्वच्छ असल्याचे पटवून द्यायला लागलो. मला समजेनाच मी कुणाला, काय आणि का हे पटवून देत आहे. काय मुर्खासारखा वागत होतो मी! की माझ्यासमोर माझाच हा नविन चेहरा आला होता? आणि मी ते स्वतःशीच नाकारत होतो? तिच्या अंगावर ओढणी फेकताना, तिला पॅडवरचे स्केचेस दाखवताना माझे वागणे असे होते की जणू तिचा नुसता स्पर्श जरी झाला तर मी बाटला जाईल. कोणत्याही प्रायश्चित्ताने मी पुन्हा कधीच शुध्द होवू शकणार नाही. हे सर्व त्या नान्यामुळे झाले होते. मला नान्याचा प्रचंड राग आला. त्या रागातच मी दार उघडून बाहेर पडलो. ज्या मोठ्या हॉलमधून आम्ही आत आलो होतो तेथून बाहेर पडताना सगळ्या बायका मला हसल्या. निदान मला तरी तसा भास झाला. मी धाड धाड करत सगळे जीने उतरुन रस्त्यावर आलो. स्वतःवर व नान्यावर प्रचंड चिडल्याने मला आजुबाजूच्या त्या विचित्र रहदारीचे भान राहीले नव्हते. मी नान्याला शोधत होतो. हाका मारत होतो. तेथून कधी बाहेर पडेन असे मला झाले होते. पाच दहा मिनिटे नान्याला शोधले. तो रस्त्याच्या पलिकडील फुटपाथवर धुळीतच मांडी घालून बसला होता. त्याच्या आजूबाजूला दहा बारा वयाच्या मुलांचा मोठा घोळका होता. मी मुसंडी मारावी तशी डावी उजवीकडे न पहाता रस्ता ओलांडला. बाईकवाल्यांनी घातलेल्या शिव्या कानामागे टाकत मी नान्याची कॉलर धरायला धावलो. त्या मुलांचा घोळका मी बाजूला केला. समोर नान्या फुटपाथवर खडूने आखलेल्या चौकोनांसमोर बसून त्या पोरांबरोबर “कोण चिडीचे खेळले” यावरुन तावातावाने भांडत होता. त्यातली दोन मुलं हिरिरीने नान्याचे बोलणे खोडून काढत होती. आमचेच बरोबर आहे म्हणत होती. नान्याही ऐकायला तयार नव्हता. ते दृष्य पाहून मला हसावे की रडावे तेच समजेना. मी त्या मुलांवर ओरडलो तशी ती दुर पळाली. नाना बुड झटकत उठला.
आश्चर्याने त्याने विचारले “काय रे अप्पा, झाले इतक्यात? मला तर वाटले तुला ओढून आणावे लागेल तेथून. बघू पॅड”
मी त्याचा दंड धरुन ओढले व म्हणालो “अगोदर येथून बाहेर पडू मग सांगतो तुला काय झाले ते. चल लवकर”
दहा मिनिटात नान्याने पार्कींगमधून गाडी बाहेर काढली. नाना गाडी चालवत होता व मागे बसुन मी त्याला खुप शिव्या घालत होतो. तुला कुणी हा उपद्व्याप करायला सांगीतला होता? तूला कशी माहिती तेथली? वगैरे वगैरे. नान्या रुमवर येईपर्यंत काही बोलला नाही. मीच एकटा मागे बसुन बडबड करत होतो. मी हातपाय न धुताच गादीवर लवंडलो. मला अगदी गळून गेल्यासारखे झाले होते. नान्या सावकाश अंघोळ करुन, चहाचे कप घेवून बाहेर आला. कसे कुणास ठाऊक पण मला नुकतेच आजारातून उठल्यासारखे वाटत होते. समोर चहाचा कप पाहूनच मला बरे वाटले. एक दोन घोट घेतल्यावर नान्या म्हणाला “अप्पा, मला जरा अंदाज होताच. एक तर तू भरपुर स्केचेस घेवून बाहेर पडशील नाही तर आता आला तसा येशील. तुझं काही एक चुकलं नाहीए”
मी नुसतच हं म्हणून चहा पित राहीलो.
“हे बघ अप्पा, बहुतेक जण आतून वाह्यातच असतात हे लक्षात ठेव आणि तसं कबुल कर स्वतःशी. आणि त्यात काही गैरही नाहीए. त्या पोरीला तशा अवस्थेत पाहून तू जर गडबडला नसता तर तुला मी एक तर डॉक्टर दाखवला असता नाहीतर भगवी कफनी घालून हिमालयात धाडला असता. आयला नशिब तू नॉर्मल निघालास”
नान्या भारी विनोद केल्यासारखा जोरात हसला.
मला पटतही होते आणि नाहीही. मी मान हलवत नान्याकडे नुसता पहात राहीलो.
नान्या मला उठवत म्हणाला “चल उठ. हनीला जाऊन बसू. एखादी बिअर प्यायलो की बरे वाटेल. तेथेच जेवू आज. अन्वरला बैदा-करी करायला सांगू खास”
“नको नाना. बरे वाटत नाहीए अजिबात. त्राण गेल्यासारखे झालेय मला. उद्या जाऊ” असं म्हणत मी पुन्हा गादीवर लोळायला लागलो.
नान्या हसत म्हणाला “च्यायला शक्तिपात झालाय तुझा. एनर्जी भरुन घेवू पहिल्यांदा. उठ लवकर”
“अरे काय लाज विकून खाल्ली की काय नान्या? कसल्या उपमा देतोय निर्लज्जसारख्या” असं कुरबूरत शेवटी मी नान्याच्या मागून निघालो. हनीला निवांत जागा पाहून बसलो. नान्याने अन्वरला बैदा करी कशी हवीय ते किचनमधे जाऊन सांगीतले आणि वेटरला ऑर्डर देवून तो माझ्यासमोर येऊन बसला. पाच दहा मिनिटात वेटरने बिअरचे फेसाळते ग्लास समोर आणून ठेवले.
मी नान्याकडे पहात म्हणालो “हायला नान्या, घाबरलो मी आणि राग काढला त्या पोरीवर. मी फार तुच्छतेने वागलो रे तिच्याबरोबर”
नान्याने काही न बोलता ग्लास उचलला. मग मीही त्याला कंपनी दिली. सुरवातीला दोघेही काहीही न बोलता बिअर पीत राहीलो. दोन ग्लास नंतर मला त्या मुलीविषयी फार वाईट वाटायला लागले, मग अपराधी वाटायला लागले व नंतर खुप दुःख व्हायला लागले. नान्या माझ्या मनातील गिल्ट काढण्याच्या नादात महाराज झाला. “ज्याला मनाचे आवेग आवरता येतात तो साव, ज्याला आवरता येत नाही तो चोर ठरतो अप्पा या जगात. आवेग वाईट नाये, ते आवरता येणे न येणे येथे गोम आहे खरी” वगैरे वगैरे. नान्याचे प्रवचन सुरु झाले. प्रवचन देता देता त्याला दाढी मिशा फुटल्या. हळू हळू त्या पोटापर्यंत वाढून पांढऱ्याशुभ्र झाल्या. त्याच्या डोक्यावर जटांचे जंगल उगवले. टीशर्ट नाहीसे होवून तेथे कधीच भगवी कफनी आली. एखादा तुटका नळ गळावा तसं त्याच्या तोंडातून अविरत प्रवचन गळायला लागले. आणि मग प्रवचन देता देता नानामहाराज हळू हळू हुंदके देत रडायला लागले. “त्या पोरांसाठी काही करता येत नसेल तर व्यर्थ जन्माला आलो आपण अप्पा” असं काहीसे बरळत तो स्वतःचे केस विस्कटायला लागला. तो काय बोलतोय त्याचा मला काहीच संदर्भ लागत नव्हता व मी काय बोलतोय याच्याकडे त्याचे लक्ष नव्हते. दिडेक तासाने “वाढू का?” विचारायला अन्वर आला व आमची अवस्था पाहून त्याने वेटरला हाक न मारता स्वतःच टेबल साफ करायला घेतला. जेवण संपता संपता मला एवढेच समजले की नान्या त्या गल्लीतल्या बायकांच्या मुलांसाठी व्याकूळ झाला होता. आम्ही रुमवर कसे आलो, कोणी सोडवले हे आम्हाला काहीच आठवत नव्हते पण सकाळीही नान्याच्या डोक्यातून ती मुले गेली नव्हती. माझे नेहमीसारखे कॉलेज सुरु होते. पण आता नाना मला कॉलेजच्या गेटपर्यंतच सोडायचा व गायब व्हायचा. कुठे जातो, काय करतो काही सांगेना. मध्ये दोन दिवस एकटाच गावीही जाऊन आला. आठ दिवसांनी मला घेवून सदाशिवातील कुठल्याशा ऑफिसमधे आला. तेथील दोन मुलींबरोबर तासभर चर्चा करुन त्याने बरेच काही ठरवले त्या मुलांपैकी पाच मुलांची सर्व जबाबदारी नानाने उचलली. या पाच मुलांची बॅच दर वर्षी बदलायचेही त्याने ठरवले. एखाद्या वारकऱ्याने जीवाच्या कराराने एकादशीचे व्रत पाळावे तसे नान्याने ‘पाच मुलांचे पालकत्व’ हे व्रत शेवटपर्यंत पाळले. विशेष म्हणजे बापूंनी त्याला यात सर्वतोपरी मदत केली. आम्हाला भेटायला ते जेंव्हा जेंव्हा रुमवर येत तेंव्हा जाताना ते “हं हे घे. घाल त्या रांडांच्या पोरांच्या बोडक्यावर” असं म्हणत नान्याच्या अंगावर पैशांचे बंडल फेकत. नंतर नंतर नान्या कॉलेजकडे फिरकेनासा झाला. मला गेटवर सोडून तो तिकडे जाई. दुपारी घरी परते. त्यानंतर मला नानाने खुपदा त्या भागात नेले. ती मुले भैय्या भैय्या करत त्याच्या भोवती नाचत. मी मात्र कधीच या मुलांमधे रमू शकलो नाही. त्यांच्या आयांबरोबर कधी विनासंकोच बोलू शकलो नाही. पण समाजाने नेहमीच तुच्छतेने पाहिलेल्या या गल्लीमधे नान्याने माझ्यावर खुपदा “हे धरणीमाय आता तुच ठाव दे” म्हणायची पाळी आणली आणि याच गल्लीत त्याने माझ्यातल्या अहंकाराचा रेच मोडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...