❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

मंगळवार, २६ मे, २०२०

ऋतुचक्र - १

मी नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर सकाळी सकाळी अजुन कोण कोण बाहेर पडते हे आता मला अगदी पाठ झाले होते. गेटमधून बाहेर पडताना उजवीकडील कंपाऊंडच्या भिंतजवळ एक चिरकची जोडी भल्या सकाळी जमिनीवर किडे शोधत असते. त्याच भिंतीवर एक भारद्वाज किल्ल्याच्या तटावर एखाद्या सैनिकाने गस्त घालावी तसा फिरत असतो. गस्त घालणाऱ्या सैनिकाप्रमाणेच तो एक एक पाऊल दमदारपण उचलत चालत असतो. मधेच थांबून भिंतीखाली चाललेली चिरकांच्या जोडीकडे कटाक्ष टाकून तो पुन्हा चौफेर लक्ष ठेवत गस्त सुरु ठेवतो

थोड्या अंतरावर भिंत संपते, तेथे दोन बोरीची एक पाचूंदाचे झाड आहे. या बोरीवर भोरड्यांचा गोंधळ सुरु असतो. कान किटवतील असा त्यांचा गोंधळ ऐकत काही वेडे राघू बाजूच्या तारेवर बसलेले असतात. त्या झाडांपैकी एक बोरीचे झाड पाचूंदाचे झाड अगदी एकरुप झाल्यासारखी उभी आहेत. दुरुन पाहीले तर एकाच झाडाला दोन खोडे असल्याचा भास होतो. एकाच झाडाला डाव्या बाजूला नाजूक तुरे फुललेले तर दुसऱ्या बाजूला पोपटी-शेंदरी बोरांचे घड लागलेले असे ते दृष्य असते. अलीकडील भोरड्यांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करुन दोन शिंजीर या पाचूंदाच्या झाडावर एखादी बाहेर आलेली फांदी पाहून बसलेले असतात. ते दोघेहे आळीपाळीने नाजूक पण आर्त आवाजात गात बसलेले असतात. जरा बारकाईने पाहीले तर याच पाचूंदाच्या काटेरी जाळीत दोन तिन वटवटे दिसतात. लहान मुलाने एका पायरीवरुन दुसऱ्या दुसऱ्यावरुन तिसऱ्या पायरीवर टुनटून उड्या मारत जीना चढावा तसे ते वटवटे एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर उड्या मारत त्या जाळीत फिरत असतात

याच पाचूंदाच्या खालून तारांची एक जाळी लोखंडी पाईपचा आधार घेत गेलेली आहे. त्या जाळीवर सुर्योदयाची वाट पहात दोन सरडे ध्यान लावून बसलेले असतात. यातला नर नेहमी पाय ताणून, छाती पुढे काढून, हनूवटी किंचीत उचलून रुबाबत बसलेला असतो. दुसरी मादी मात्र लोखंडी पाईपमधून फक्त डोके बाहेर काढून कधी नराकडे तर कधी समोरच्या रस्त्यावर फक्त बुबूळे हलवून लक्ष ठेवून असते. अंगणात बसलेल्या नवऱ्याबरोबर दाराच्या आड उभी राहून, पदर सावरत बोलणाऱ्या नव्या नवरीच्या डोळ्यात जे भाव असतात तेच भाव या मादी सरड्याच्या डोळ्यात मला दिसतात

याच बोरींच्या झाडांनंतर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला तामणाची ओळीने पाच झाडे आहेत. या पाच झाडांवर दोन वटवट्यांचे राज्य आहे. त्या दोघांशिवाय मी दुसऱ्या कोणाला येथे पाहीले नाही. कधी कधी मात्र एक कोतवाल येतो दोन नंबरच्या झाडावर बसतो. तो आला की दोघे वटवटे फार गोंधळ घालतात. त्यांचा त्रास फारच वाढला की मग कोतवाल एक वेगवान भरारी मारतो त्या दोघांची तारांबळ उडवतो. पण कोतवाल झाडावर येऊन बसला की दोघे वटवटेही त्याला अजिबात दाद देता पुन्हा ताम्हणवर येऊन बसतात

या ताम्हणांच्या झाडांनंतर पुन्हा कंपाऊंडची जाळी सुरु होते. या जाळीवर वर्षभर उतरणीचे वेल असतात. ते ऋतूनुसार कधी सुकलेले तर कधी हिरवेगार असतात. पावसाळा संपला की याला कोयरीच्या आकाराची मस्त काटेरी फळे लागतात. पावसाळा सरुन हवा मस्त गुलाबी होते तेंव्हा ही काटेरी फळे सुकून उमलतात आतून अतिशय चमकदार रेशीम दिसायला लागते. फळ पुर्ण उमलले की मग शंकराच्या पिंडीसारख्या दिसणाऱ्या इवल्याशा बीया डोक्यावर चमकदार मऊ केसांचा मुकूट घेवून सर्व सोसायटीत उडत राहतात. संध्याकाळच्या मावळत्या उन्हात उडणाऱ्या या चमकदार म्हाताऱ्या पकडायला लहान मुले अगदी भान हरपून धावत असतात. संध्याकाळी फिरायला जाताना डोळ्यांच्या कोपऱ्यात काही चमकताना दिसते. नजर टाकली की एखाद्या झाडाच्या पानावर, कंपाऊंडच्या तारेत किंवा एखाद्या झुडपाच्या काट्यावर विसावलेली म्हातारी स्वयंप्रकाशित असल्यासारखी चमकताना दिसते. एकदा मी चिरकच्या नराला या म्हाताऱ्या गोळा करताना पाहीले होते. लहान मुलात आणि या चिरकमधे मला काहीच फरक वाटला नव्हता. चिरक जमिनीवर उड्या मारत या बी जवळ जायचा पण चोचीत पकडायच्या आत ती बी हवेने काही फुट दुर जायची. हा पाठलाग पाच सहा मिनिटे चालायचा. मला वाटते चिरक या बिया घरट्यात गादी करायला नेत असावा

ही जाळी संपली की रस्ता डावीकडे काटकोनात वळतो. या वळनावर कांचनाची सहा सात झाडे आहेत. हा मात्र जांभळ्या शिंजिरांचा अड्डा आहे. जानेवारीच्या आसपास हे कांचन अगदी लाल गुलाबी होऊन जातात. त्यावेळी येथे जांभळ्या शिंजिरांची अगदी झुंबड उडते. अनेकदा कांचनाच्या गुलाबी फुलांमधून चमकदार शेपटी बाहेर आलेली दिसते. कारण हे शिंजीर भान विसरुन या फुलात पुर्ण बुडून जातात फक्त त्यांची शेपटी मात्र बाहेर चमकत रहाते. या कांचन वृक्षांच्या खाली मी अनेकदा एक साप फिरताना पाहीला आहे. सापांची मला खुप भिती वाटत असल्याने तो कोणत्या प्रकारचा आहे? विषारी आहे का? या चौकशा मी कधी केल्या नाहीत. तो ही कधी पुर्ण दर्शन देत नाही. काटकोनात वळलेला हा रस्ता दोनशे मिटर अगदी सरळ जातो. या भागात दोन्ही बाजूला बाभळींचे गच्च रान आहे. श्रावणात या बाभळी लहान लहान सोनेरी गोंड्यांनी अगदी फुलून येतात. रस्त्यावरही या पिवळ्या फुलांचा सडा पडतो. हा रस्ता दोनशे मिटरनंतर पुन्हा उजवीकडे काटकोनात वळतो. या वळणावर आमच्या सोसायटीत असलेल्या देवराईचे गेट आहे. गेट समोरच दिड-दोनशे मानसांची पंगत आरामात बसेल असा प्रशस्त ओटा आहे. या प्रशस्त ओट्याला पुरेल एवढी सावली देणारा अजस्त्र असा लिंब आहे. या लिंबाचा आकार जरी ऐसपैस असला तरी उची मात्र फार कमी आहे. असे लिंबाचे झाड मी आजवर कधी पाहीले नाही. ओट्यावर चढले की या लिंबाच्या खाली असलेल्या कोवळ्या पानांची तोरणे अगदी डोक्याला स्पर्श करतात. याच ओट्याच्या एका टोकाला देवराईचे राखण करणारा शेंदूर फासलेला देव आहे. अगदी लहान अशी घुमटी फुलपात्राएवढी एक पितळी घंटी एवढीच या देवाची संपत्ती आहे. या ओट्यावर मात्र सकाळी संध्याकाळी अगदी सम्मेल भरते. चिरक, गप्पीदास, कुंचीवाले बुलबूल, वटवटे, कधी कधी सातभाईंचा थवा, चिमण्या यांची अगदी वर्दळ असते. या वर्दळीमधे दोन तिन खारुताई एकमेकांचा पाठलाग करत धावत असतात. या लिंबाच्या झाडावर पाच सहा नाचरे नेहमी खेळत असतात. कोकीळ आणि भारद्वाज यांचा तर हा लिंब अतिशय आवडता आहे. या लिंबाच्या झाडाखाली गेलो की काही समजायच्या आत अचानक एखादा भला थोरला भारद्वाज धडपडत बाहेर येतो जमिनीला समांतर असा अत्यंत खालून उडत निघून जातो. चष्मेवाल्यांचा थवा भर्रकन लिंबाच्या आत वर कुठेतरी चढतो.

जेथे देवराईचे गेट आहे तेथून हा रस्ता शेवटचे वळण घेतो काटकोणात उजवीकडे वळतो. या वळणावरुन तो ४०० मिटर दोरी सारखा सरळ जातो आडव्या जाणाऱ्या मुख्य रस्त्याला मिळतो. या चारशे मिटरमधे हा रस्ता अत्यंत देखना श्रीमंत आहे. या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शंकासुर, वेगवेगळ्या जातीचे लाल, पांढरे, पिवळे चाफे, दोन तिन ताम्हण, अधून मधून सोनमोहर  अशी भरगच्च झाडे आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शोभा आणन्यासाठी जट्रोफाची लाल चुटूक रंगाच्या फुलांनी बहरलेली रांग आहे. या पुर्ण रस्त्यावर मात्र फक्त शिंजीर पोपटांचे राज्य असते. रस्त्याचा हा भाग म्हणजे जणू काही पक्ष्यांची उच्चभ्रू वस्तीच आहे. येथे अधेमधे साळूंख्या बुलबूल येतात पण ते जास्त थांबत नाहीत या भागात. त्यांची सलगी देवराईतील लिंबाच्या झाडाशी जास्त असते. ते तिकडेच जास्त रमतात. या भागात जांभळे शिंजीरी जांभळ्या पोटांचे शिंजीर शंकासुराच्या नाजूक फुलांमधे चोची घालताना दिसतात. जेंव्हा फुलांचा बहर सरुन शंकासुर शेंगावर येतो तेंव्हा या शेंगा खायला पोपटांचा मोठा थवा येथे गोंधळ घालत असतो. पोपट हा मिठू मिठू असं गोड बोलत असेल असा जर कुणाचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. हे पोपट अतिशय कर्कश्श आवाजात भांडत असतात. एकदा थवा या शंकासुरांवर उतरला की प्रथम पाच सहा मिनिटे त्यांचा नुसता वाद सुरु असतो. मग जो तो आपापली फांदी निवडून घेतात निवांत बसतात. प्रत्येकाच्या एका पायात शंकासुराची हिरवीगार शेंग पकडलेली असते. लहान मुल जसे कुल्फी खाते तसे हे पोपट पाय वर करुन ही शेंग चोचीजवळ नेतात बाकदार चोचीने सोलून आतले दाणे खातात. या पोपटांनी खावून टाकलेल्या शेंगाच्या साली पाहील्या की समजते की त्यांनी किती नेटकेपणाने शेंग सोलून खाल्ली आहे. एकाही सालामधे चुकूनही दाणा शिल्लक ठेवत नाही. त्यांचे हे अगदी सफाईने शेंगा सोलने पाहून मला नेहमी वाटते की एक थवा जर मटार सोलायला बसवला तर पाच मिनिटात दहा किलो मटार सहज सोलून देतील. या पोपटांचा किरकिराट ऐकत शिंजीरांची लगबग पहात चालताना सोसायटीचे मेन गेट कधी येते ते समजतच नाही. गेटवरच्या वॉचमनला हात करुन पुन्हा मागे फिरायचे पुन्हा या पक्ष्यांचे खेळ पहात निघायचे

एव्हाना साडे आठ वाजत आलेले असतात. उन्हे अगदी स्पष्ट झालेली असतात. मागे फिरल्यावर पुन्हा देवराईच्या गेटपर्यंत यायचे तेथून आत जावून एक चक्कर देवराईत मारायची. देवाचा ओटा चढून वर आलो की ओट्याला अगदी समांतर काठ असलेली विहिर अचानक दिसते. म्हणजे विहिर तेथे गेले १०० वर्षे आहे. नंतर सोसायटी झाली. देवाला ओटा बांधला गेला. हे बांधकाम करताना ही विहिर ओट्यावर आली तिंच्या कठड्यापासूनच ओटा बांधायला सुरवात झाली. म्हणजे जमीनीत जसे उखळ असते तशी ही विहिर आहे. अगदी जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. चालून कंटाळा आलेला नसतो पण मोठ्या लिंबाची गार सावलीमुळे हवा एसीसारखी असते. तिचा मोह आवरत नाही म्हणून या विहिरीत पाय सोडून निवांत बसायचे. या विहिरीच्या काठावर एक पिंपळाचे औदूंबराचे झाड अगदी हातात हात घालून उभे आहेत. या पिंपळाची एक फांदी या विहिरीत जरा आतवर उतरलेली आहे. या फांदीवर दरवर्षी एक सुगरण जोडी घरटे बांधायचा प्रयत्न करते अर्धवट सोडून देते. मी इतके वर्ष पहात आहे, त्या जोडीने कधीच हे घरटे पुर्ण केले नाही. पण दरवर्षी बांधायला सुरवात मात्र करतातच. याच पिंपळाच्या पानावर काही नाचरे सकाळी दुपारी चारच्या आसपास खेळत असतात. अनेकदा भांगपाडी मैनांचा थवा येथे केस पिंजारुन वावरत असतो. या विहिरीच्या पलीकडील बाजूला अगदी रेशमासारखे गवत पसरलेले असते. हा भाग म्हणजे नाचरे, पांढऱ्या कंठाची मनोली, ठिपकेवाली मुनीया आणि चिरक यांचे माहेर आहे. येथे सदैव या मनोलींचा गोंधळ सुरु असतो. या विहिरीवर दहा पंधरा मिनिटे बसुन मग मी घराकडे निघतो. पुन्हा आल्या वाटेनेच जायचे असते. आता पक्ष्यांची धांदल जरा कमी झालेली असते. ही वेळ असते शिक्रा कापशी घारींची. त्या दोघांपैकी कोणीतरी एव्हाना आलेला असतो. जाताना डावीकडे उजवीकडे अशी दोन बांबूची बेटे आहेत. यातल्या पश्चिमेकडच्या बांबूच्या बेटातल्या सगळ्यात उंच बांबूवर हमखास कापशी घार बसलेली दिसते. पक्ष्यांची वर्दळ कमी झाल्यावर ही का येत असेल असा मला खुपदा प्रश्न पडायचा. पण नंतर लक्षात आले की या शिक्राचे कापशी घारीचे शिकार कण्याचे ठिकाण दुसरीकडे कुठतरी असणार. शिकार करुन, पोट भरुन झाल्यावर हे दोघे आमच्या सोसायटीत विश्रांतीसाठी येत असावेत. कारण शिक्रा किंवा ही कापशी घार आली तरी आमच्या येथले पक्षी अजिबात घाबरत नाहीत

आता उन्हे जाणवायला लागलेली असतात. सकाळचा गारवा नाशीसा झालेला असतो. फिरायला निघताना अगदी रमत गमत चालणारी पावले आता झपाट्याने पडत असतात. पुन्हा सोसायटीच्या जवळ आलो की अगदी पार्कींगच्या समोर एक प्रशस्त शेत आहे. अर्थात त्याला कुण्या बिल्डरने कंपाऊंड बांधल्याने हे अगदी ओसाड आहे. दर पावसाळ्यात वेगवेगळी गवते, रानफुले, झुडपे वगैरेंची येथे गर्दी होते. दिवाळी संपता संपता हे शेत हिरव्याचे पोपटी पोपटीचे पिवळेजर्द होत जाते. घरी परतताना जेंव्हा इतर पक्ष्यांची वर्दळ कमी होत जाते तसतशी या शेतात चंडोल, तपकिरी गप्पीदास, धान तिरचिमणी, कस्तूर वगैरे पक्ष्यांची लगबग सुरु होते. मग दुपारपर्यंत याच पक्ष्यांची येथे धावपळ सुरु असते. हे उन्हाला सरावलेले पक्षी असल्याने त्यांना सुर्य डोक्यावर आला तरी फारसा फरक पडत नाहीत. हे जमिनीवर तुरुतुरु धावत गवताचे बी, लहान किडे वगैरे पकडत असतात. :३० मी घरी येतो. घरी आल्यानंतर अगदी अलार्म लावावा तशी खंड्याची किलकारी ऐकायला येते. हॉलच्या खिडकीतून पाहीले की समोरच्याच विजेच्या खांबावर तो आरामात बसून किलकारी देत असतो. हा रोज येत नाही पण जेंव्हा येतो तेंव्हा त्याची बसायची जागा अगदी तिच असते. रोजच्या या प्रभातफेरीने मला पुर्ण दिवस पुरेल इतकी उर्जा दिलेली असते. या रोजच्या फिरण्यात अनेक पक्षी हे अगदी ओळखीचे झालेले असतात. लहानशा चाहूलीनेही उडून जाणारे पक्षी, मी आल्यावर मात्र फारसे घाबरत नाहीत. त्यांच्या हालचालीवरुन त्यांनी मला स्विकारलं आहे हे जाणवते. त्यातल्या अनेकांना मी नावेही दिली आहेत. शेंदऱ्या कोण, लांबचोच्या कोण, नाजूका कोण, रावसाहेब कोण हे मी अगदी थव्यात असले तरी ओळखू शकतो. तेही मला ओळखतात. चिरक, मनोली यासारखे सावध पक्षीही माझ्यापासून काही इंचावर येवून बागडतात तेंव्हा फार आनंद होतो. यांची मैत्री अगदी निरपेक्ष असते. असे मित्र भाग्याने लाभतात आणि मी खरेच खुप भाग्यवान आहे


पक्षी शोधण्यासाठी खाली त्यांची इंग्रजी नाावे दिली आहेत. तसेच आमच्या सोसायटीत दिसणाऱ्या अनेक पक्ष्यांची नोंद करायची राहीली आहे. पुन्हा कधी तरी सवीस्तर लिहिल.

1 टिप्पणी:

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...