❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

घोणस

समुद्रमंथनातुन जशी उपकारक रत्ने निघाली तशी अपकारकही निघाली. देवांनी चलाखी करुन अपकारक रत्ने असुरांच्या गळ्यात मारली. हलाहलसारखे रत्न तर स्वतःच्याच पार्टीच्या भोळ्या शंकराच्या शब्दशः गळ्यात मारलं. अगदी तसंच आमच्या भागात झालेल्या धरणांमधुनही उपकारक-अपकारक रत्ने निघाली. मात्र अपकारक रत्ने कुणाच्या गळ्यात मारण्यासाठी आमच्याकडे पर्याय नव्हता. दोन्हीही आम्हालाच स्विकारावी लागली. यातली काही तर हलाहलपेक्षाही जहाल होती. म्हणजे जमिनी पाण्याखाली गेल्या तर जाऊद्या हो, पण शेकडो हजार वर्षांपुर्विची मंदिरेही पाण्याखाली गेली. गावकऱ्यांना नवं गाव वसवून दिलं सरकारने, मात्र जुनी गावे कायमची पाण्याआड गेली त्याचे काय! शिवकालाच्या कितीतरी आधिपासून असलेली ही गावे. येथल्या प्रत्येक ऊंबऱ्याला ईतिहास होता, वडा-पिंपळाच्या पाराभोवती कहाण्या होत्या. येथल्या गावमारुतिंच्या देवळाने कित्येक पिढ्या पाहिलेल्या. येथल्या तालमींनी कित्येक सत्ता ऊलथताना पाहिल्या असतील, त्यात मदत केली असेल. गावच्या वेशींनी कित्येक विरांचे वाजत गाजत स्वागत केलं असेल, कित्येक पालख्या बेल-भंडाऱ्याच्या झडीत वेशीतून आत आल्या असतील, रगेल बांडी पोरं याच वेशीतून कंबरेला तेग बांधून शिवकार्यासाठी बाहेर पडली असतील. ते सगळं गेलं. पार नजरेआड झालं. सासरी खुप जाच असल्याने वर्षांनुवर्षे माहेरी न आलेली लेक कधीतरी अवचीत घरी आली तर तिचं माहेर जसं हरखून जातं, तसं कधी कधी एखाद्यावर्षी पाऊसमान कमी झालं की धरणाचं पाणी ओसरतं आणि हे मंदिरांचे कळस दर्शन देतात. तेव्हा गावकरी सगळं काम टाकून त्याचं दर्शन घ्यायला धावतात. आता या मंदिरांच्या आठवणी जागवणारी पिढीही संपत आली.
असो, तर या अशा अनेक अपकारक रत्नांपैकी अजुन दोन रत्ने आम्हाला मिळाली, ती म्हणजे घोणस आणि बिबट्या. धरणांच्या बॅकवॉटरमुळे अनेक जनावरे घाट ऊतरुन खाली सरकली व अनेक जनावरे आमच्या भागात सरकली. त्यात ही दोन रत्ने आमच्या वाट्याला आली. या दोन्ही रत्नांनी अगदी धुमाकूळ घातलाय आमच्याकडे. या बिबट्यांनी कित्येक गावे ग्रामकेसरीविरहीत करुन टाकलीत. मळ्यात कित्येक बंगल्यांपुढे हे असे रिकामे, सुनेसुने पिंजरे व मोकळ्या पडलेल्या साखळ्या दिसतात. त्या पिंजऱ्याचे धनी खंड्या, मोत्या, वाघ्या वगैरे गायब झाले. निदान एक बरे आहे, घोणस चावल्याच्या फारशा केसेस नाहीत आमच्याकडे. तरी वैताग आहेच ना.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

आज्जी

दिवस कलला की आज्जी अंगणात बसायची. तुळशीवृंदावनाला टेकून, एक पाय मुडपून, दुसरा लांब करुन ती सप्पय टेकायची. शेजारी मोठी चाळण, आठवा-निठवा, सुप,...