❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

बुधवार, १९ जून, २०१९

वळीव

आज सुट्टी असल्याने मला फारशी घाई नव्हती. फक्त पोळ्या केल्या तरी पार्थचे आणि गार्गीचे काम भागणार होते. बाप लेकी दुध पोळी आवडीने खातात. दुपारी काहीतरी घाट घातला की झाले. पार्थ सकाळीच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता, दोन पोळ्या होईतोवर तो आला असता. मी एका बाजुला थोडी वेलची पुड टाकुन दुध गरम करायला ठेवले होते व दुसरीकडे पोळ्या करत होते. मागे फ्रिज उघडल्याचा आवाज आला. मला जरा आश्चर्य वाटले. पार्थ कसा काय इतक्यात आला?
त्याला काही विचारावे म्हणून मी मागे पाहीले तर गार्गी फ्रिजमधुन काहीतरी काढत होती. तिने फ्रिजचे दार बंद केले आणि किचनओट्यावरचे सामान जरा बाजुला करुन हातातल्या सफरचंदाचा लचका तोडत ती टुनकन उडी मारुन ओट्यावर बसली. ही तिची नेहमीची सवय. इतरवेळी मी हसुन लेकीच्या गालाला पिठाचा हात लावला असता. पण आज माझ्या कपाळावर आठ्या आल्या.
मी जरा तुटक आवाजात म्हटले “किती वेळा सांगितले जीजी ओट्यावर बसत जाऊ नकोस अशी म्हणून. आणि पारोश्याने तर अजिबात नाही. जा अगोदर अंघोळ उरक. बाबा येईल इतक्यात”
गार्गी अगदी ठेवणीतला लडीवाळ आवाज काढत म्हणाली “असं काय गं अनू! मला आवडतं येथे बसुन तुझ्याशी गप्पा मारायला आणि तुला नुसतं पहायला सुध्दा. अन् सकाळीच अंघोळ झालीय माझी. तु लाटून दे, मी चटकन भाजते पोळ्या”
हे बोलताना ती गॅस लायटरचा टक टक आवाज करत होती. कमाले या पोरीची. रविवार असुन सकाळीच अंघोळ काय करतेय, पोळ्या भाजते काय म्हणतेय, काही समजेना. आज स्वारीचे काहीतरी काम असणार. तसही तिचे ते लायटर वाजवणे मला जरा अस्वस्थपणाचेच वाटले होते.
मी तिच्याकडे पक्कड सरकवत म्हटलं “झाल्यात माझ्या पोळ्या करुन. तू ते टक टिक करायचे थांबव आधी आणि हे दुधाचे भांडे घेऊन जा बाहेर. मी आलेच”
गार्गी भांडे बाहेर घेवून गेली. मीही तिच्या मागे पोळ्यांचा डबा घेवून बाहेर आले. समोरच पार्थ सेंटरटेबलवर पाय ठेवून सोफ्यावर निवांत बसला होता. बसला कसला, चक्क पसरला होता. “शिस्त म्हणून नाही अजिबात. रविवार म्हणजे काय वाटते दोघांना समजत नाही मला. अंगी नसलेला आळस मुद्दाम अंगात आणायचा, पसारा करायचा, नेहमीची कामे मुद्दाम उशीरा करायची किंवा करायचीच नाहीत, या गोष्टींमधे कसला आलाय सुट्टीचा आनंद? नाहीतर काय?” असल्या नको त्या विचारांनी अगदी वावटळ उठवली होती मनात. अशाच विचारात गुंतले तर ते ओठावर येतील की काय याची मला भिती वाटली. मन ताळ्यावर आणत आणि आवाज कमालीचा शांत ठेवत मी म्हणाले “अरे पार्थ, तू कधी आलास? आणि घामेजल्या अंगाने लोळतोय काय असा सोफ्यावर? उठ, अंघोळ उरक. मी पुन्हा दुध गरम करुन देणार नाही हां”
एवढा शांतपणा ठेवूनही शेवटचा ‘नाही हां’ जरा चढ्या आवाजातच आला असावा. कारण ‘काय वैतागे’ असा चेहरा करत, कानातले हेडफोनचे बोळे काढत पार्थ पाय ओढतच बाथरुमकडे गेला. मॉर्निंग वॉकवरुन आल्यावर फक्त दहा मिनिट सोफ्यावर बसला असेल पण एक पिलो जाग्यावर राहीली नव्हती. पानपतावर धारातिर्थी पडल्यासारख्या सगळ्या पिलो इकडे तिकडे माना टाकून पडल्या होत्या. मला आज सगळंच खटकत होतं.
गार्गीने बाऊल काढुन टेबलवर घेतले होते. मला काही खायचे नव्हतेच. एखादे सफरचंद चालले असते. नावाला अंग ओले करुन पार्थ आला. तोवर गार्गीने त्याच्या बाऊलमधे पोळी अगदी बारीक चुरुन ठेवली होती. फोर्कने एक केळे कुस्कुरुन दिले होते. पार्थने खुर्ची ओढली आणि गार्गीने त्याच्या बाऊलमधे दुध ओतुन चमचा त्याच्या पुढे केला. तिची ही तत्परता पाहुन त्यालाही जरा आश्चर्य वाटले असावे. त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मीही फक्त ओठ बाहेर काढले. मलाही गार्गीचे काय चालले होते सकाळपासुन ते समजत नव्हते. गार्गीचेच काय, मला माझेच काय चालले होते ते उमजत नव्हते. गार्गीने पोळी गुंडाळून रोल केला आणि मगामधल्या दुधात बुडवला. ते पहाताच माझ्या मनात आलेच “काय एकेक तऱ्हा आहेत हिच्या”
मी कुरबुरत म्हणालेही “अगो कुस्करुन खा की पोळी व्यवस्थित. हे काय रोल करुन खातेस? मला नाही आवडत अजिबात”
तरीही रोलचा मोठा तुकडा दातांनी तोडत, बोबड्या आवाजात गार्गी म्हणाली “हे काय गं अनु! मी सकाळपासुन पहातेय. तुझा सकाळपासुनच मुड बरा नाहीए अजिबात. लहान लहान गोष्टींवरुन कुरबुर सुरु आहे तुझी”
पार्थचे आमच्याकडे लक्षच नव्हते. तो चमच्याने दुधपोळी खात होता आणि दुसऱ्या हाताने फोनची स्क्रिन वर खाली फिरवत होता.
गार्गीने त्याच्याकडे मोर्चा वळवत म्हटलं “बाबा, तू काय करतोय आज? कुठे जाणार आहेस का”
पार्थ मान हलवत म्हणाला “नक्की नाही अजुन. तुझं काही काम होतं का? येईन मी सोबत”
गार्गी तिच्या चेअरवरुन उठली आणि पार्थच्या शेजारच्या चेअरवर बसत म्हणाली “माझं नाहीए काही काम. पण तू आज अनुला मुव्हीला का घेवून जात नाहीस? ती नाही का, तुला खुप दिवस पहायची होती, ती मुव्ही लागलीए. मी करते हवं तर बुकिंग”
पार्थचे लक्ष अजुन मोबाईलमधेच होते. मान वर न करताच तो म्हणाला “कोणती मुव्ही गं?”
आता मात्र गार्गीने पलिकडे वाकुन त्याचा मोबाईल घेतला आणि बंद करत म्हणाली “असा कसा आहेस रे बाबा तू? मी तुला सरळ सरळ सुचवतेय की अनुला घेवून जा आज दिवसभर बाहेर कुठे तरी. मुव्ही वगैरे पहा. तर कुठे आणि कोणती काय विचारत बसलास लगेच. की मुद्दाम करतोस असं?”
सकाळपासुन मला जरा अस्वस्थच वाटत होते, पण गार्गीची बडबड ऐकुन मात्र आता माझा मुड खराब व्हायला लागला. मी उठुन उभी राहीले आणि खुर्चीची पाठ घट्ट धरुन म्हणाले “मी कुठे जायचे आणि नाही जायचे ते परस्पर कसे ठरवताय तुम्ही दोघे? मी कुठेही जाणार नाहीए जीजी. माझे एक दोन लेख राहीलेत तसेच, ते पुर्ण करणार आहे आज. आणि हे काय सारखं ‘अनु अनु’ लावलं आहेस? कित्ती वेळा तुला सांगितलय की आई म्हण म्हणुन?”
माझ्याही नकळत माझा आवाज चढला. ते ऐकुन पार्थही जरा गडबडला. गार्गीच्या हातावर थोपटत तो मला म्हणाला “असं काय करतेस अनु? काय झालंय? खरच बरं वाटत नाहीए का तुला? गार्गीवर कशाला चिडतेय उगाच?”
त्याचे बोलणे ऐकुन मी गप्प झाले पण माझे धुमसने त्याच्या लक्षात आले. तो सावकाश उठला आणि त्याने मला खांद्याला धरुन चेअरवर बसवले. ग्लासात पाणी ओतुन माझ्या हातात देत तो नुसताच माझ्या शेजारी बसुन राहीला. गार्गीने निमुटपणे पोळीचा उरलेला रोल उलगडला आणि दुधात कुस्करला. तिलाही ‘आई नक्की कशाने चिडली आहे अचानक?’ हे लक्षात नसेल आले. भाबडी पोरं. तिला दुधात पोळी कालवताना पाहून मला एकदम भरुनच आलं. पाणी पिता पिता मला उगाचच हुंदका फुटला. डाव्या डोळ्यातुन नकळत एक टप्पोरा अश्रू गालावरुन ओघळला. काहीही कारण नसताना आजची प्रसन्न सकाळ मी एकदम तणावाखाली घेतली होती. लाडका नवरा आणि एवढी गोड लेक माझी, माझ्यामुळे विनाकारण दुखावली होती. आता काही केले तरी रविवारची ती आमची ‘खास’ तार आज जुळणार नव्हती. मी खुप विचार करुनही मला काय झाले होते ते नक्की समजत नव्हते. मी डोळे न पुसताच पार्थकडे केविलवाण्या नजरेने पाहिले. त्यानेही अगदी मुकपणे नुसत्या डोळ्याने मला आश्वस्त केले. त्याचं असं मनापासुन समजुन घेताना पाहुन मला एकदम धिर आल्यासारखे झाले. मी गार्गीकडे पाहीले. तिने उरलेली पोळी संपवली होती आणि खरकटा हात तसाच ठेवून माझ्याकडे पहात होती.
मी तिच्याकडे पाहुन नेहमीचं हसले तेंव्हा फुरगटून म्हणाली “गेला का तुझा फेरा येवून? गेला असेल तर सांग म्हणजे मी माझा सुरु करते आता”
वातावरण जरा निवळतय हे पाहुन पार्थ हसत उठला आणि बाऊल, दुधाचे भांडे उचलुन किचनमधे गेला.
आतुनच त्याचा आवाज आला “झारा, लाटणे वगैरे काही आयुधे लागली तर सांगा गं बायांनो”
पण त्याचा विनोद ऐकुनही गार्गी हसली नाही. तशीच टप्पोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात राहीली. तिचेही डोळे पानावले होते. तिच्या आवाजातला लटका रुसवा मला जाणवला. त्याबरोबरच “मला खरच तुम्हा दोघांना काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे” हा टोनही अगदी खोल कुठेतरी जाणवून गेला. शेवटी आई होते मी तिची. माझी लेक मला नाही कळणार मग कुणाला कळणार! नेहमी स्पष्ट बोलणाऱ्या गार्गीने आज सकाळपासुन जे नमन लावलं होतं त्यावरुन मला एक मात्र लक्षात आलं होतं की तिच्या मनात जे चाललं आहे ते येताना सोबत काही तरी वादळ नक्की घेऊन येणार होतं. काय असेल? सकाळ पासुन आपल्याला जे अस्वस्थ वाटत होते, उगाच हळवं व्हायला होत होतं ते सगळे म्हणजे या अज्ञात आगंतुकाची तर चाहूल नसेल? मी कशी माझ्यातच गुंतले इतकी आज की लेकीला काही बोलायचेय हेच माझ्या लक्षात आले नाही? मला स्वतःचाच राग आला. गार्गीकडे पाहुन एकदम माझ्या आईचीच आठवण झाली. मी लगबगीने हातातला ग्लास बाजुला सारुन उठले. तिचा दुध-पोळीचा खरकटा तळहात एका हातात घट्ट दाबून धरुन दुसऱ्या हाताने तिला कव घातली आणि पोटाशी ओढत विचारले “काय झालं ग जीजे? माझंच मेलीच लक्ष नव्हतं आज बघ. काय झालं बाळ, मला नाही सांगणार?”
दिवसभर मग उगाचच मळभ दाटून आल्यासारखं झालं. रवीवार असुनही दिवस अगदी गोगलगाईसारखा सरकत राहीला. पार्थनेही बाहेर कुठे जाणे टाळले. तो उगाचच गार्गीच्या आजुबाजूला वावरत राहीला. गार्गीही नेहमीपेक्षा जास्त अवखळ वागत राहीली. पण हे सगळं ओढुन-ताणून चाललय हे सारखं जाणवत होतं. दुपारी जेवतानाही पदार्थांचे जरा जास्तच कौतुक झाले. पण एकुन हे असं नाटकी वागणे कुणालाच झेपेना. शेवटी “पडतो ग जरा” म्हणत पार्थ बेडरुममधे निघून गेला. मीही मग चटक्या हाताने किचन आवरले आणि स्टडी निट लावायला घेतली. स्टडीरुम आवरायची म्हणजे तिनेक तासांची निश्चिंती होती. पार्थच्या फाईलींचा पसारा, ड्रॉईंग शिट्सच्या गुंडाळ्या, पेन्स, ड्राफ्टर, पुस्तके-मासिके हे सगळं आवरताना नकळत एकतानता येते मला. त्यातही जर वेळच काढायचा असेल तर मग पुस्तके आवरताना जराशी चाळायची, ड्रॉईंग्ज त्या त्या होल्डरमधे सरकवताना त्यांच्यावरुन नजर टाकायची हे उद्योग केले की मग हवा तेवढा वेळ स्टडी आवरताना काढता येई. पाच दहा मिनिटे झाली असतील. गार्गी स्टडीमधे आली. तिने न बोलता मला मदत करायला सुरवात केली. मला उगाचच अस्वस्थ झाल्या सारखे झाले. मी चेअरवर बसुन नुसतीच ड्राफ्टरचे व्हिल कधी उजवीकडे तर कधी डावीकडे फिरवत राहीले. मी व्हिलबरोबर चाळा करत असतानाच गार्गीने मागुन माझ्या गळ्यात हात टाकले आणि माझा नाकाचा शेंडा हलकेच हलवत म्हणाली
“इतकी काय अपसेट होतेस अनू? काही झालेलं नाहीए एवढं अस्वस्थ होण्यासारखं”
तिने गळ्यात टाकलेले हात न काढताच मी म्हणाले “हे बघ जीजी, तुला जे काही सांगायचेय ते तू बाबाला सांग. तशीही तू मला कधी काही महत्वाचे सांगतेस का? तुला कुठे अॅडमिशन घ्यायचेय, तुझे मार्क-रँक सगळं काही मला पार्थकडून कळायचं. अगदी तुझ्या लग्नाचा निर्णय सुध्दा मला पार्थकडुनच कळवलास तू. मी काय बापडी, तुझी शाळा कॉलेजातली मैत्रीणींची भांडणे सोडवण्यापुरतीच होते”
गार्गीने माझी चेअर आर्मला धरुन गर्रकन फिरवली आणि मला तिच्या सामोरी घेतले. क्षणभर मला तिच्या चेहऱ्यावर दुखावल्याचे भाव दिसले. पण ती चटकन हसतमुख होत म्हणाली “अनू, मी गेले आठ-दहा दिवस पहातेय. तू जरा जास्तच विचार करायला लागली आहेस कुठल्याही गोष्टींचा. म्हातारी झालीस बघ तू आता. बस मी कॉफी आणते दोघींसाठी छान जायफळ घालून. मग बोलूयात”
मला काय वाटत होते ते मलाच समजत नव्हते. गार्गीला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे जाणूनही घ्यायचे होते आणि दुसऱ्या बाजुला तिने पार्थशी बोलावे, माझ्याशी नको असेही वाटत होते. सकाळपासुन जी अनामीक भित वाटत होती ती काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नव्हती. मी अडचनींपासुन दुर पळत होते का? गार्गी किचनकडे वळाली आणि मी तळहातांना आलेला घाम वेंधळ्यासारखा मांडीवरच साडीला पुसला. हात पुसतानाच लक्षात आले की मी किचन आवरताना बांधलेला अॅप्रन अजुन तसाच कंबरेला होता. “रे देवा” म्हणत मी चेअरवर मागे रेलून बसले.
गार्गी दोन कॉफीचे भले थोरले वाफाळते मग घेऊन आली. एक माझ्या हातात देत म्हणाली “नुसता मग कुरवाळत बसू नकोस. तुला आवडते तशी केलीय. अगदी अगोड. बरे वाटेल तुला जायफळाने”
मी मग हातात घेऊन खरचं नकळत कुरवाळत विचार करत बसले. कसं वागतात आजकालच्या या मुली? हिला काहीतरी टेंशन आहे आणि उर माझं दडपलय. तिच्या चेहऱ्यावर मात्र त्याचा मागमुसही नाही. की खरच गार्गी म्हणतेय तसं मी आजकाल जरा जास्तच विचार करतेय का सगळ्याचा? रोजच्या अडचणींना सामोरं जायची ताकद कमी झालीय का माझी? आज आई असती तर म्हणाली असती “तुला सुख खुपतय अनू, दुसरं काही नाही” खरच आज आई असायला हवी होती. विचार करता करता माझी कॉफीच्या मगावरची पकड उगाचच घट्ट झाली. त्यामुळे हाथ थोडे थरथरलेही.
गार्गीने माझा खांदा हलवत विचारलं “असं काय बघतेस माझ्याकडे एकटक? कॉफी पी बरं अगोदर. मग बोलू”
काय करावं बाई या मनाला. किती वेळ बघत होते मी गार्गीकडे कुणास ठाऊक. हातातली कॉफी अजुन छान वाफाळत होती म्हणजे जास्त वेळ नसणार. मी अगदी झडझडून चेअरवरुन उठले आणि मनातील सगळे विचार निपटून काढत टेबलला टेकून उभी राहीले. अगदी मनापासुन आनंद घेत मी कॉॅफीचा एक घोट घेतला. कॉफीच्या कडवट स्मोकी चवीअगोदर जायफळाचा सुगंध जिभेवर पसरला. नाकाच्या शेंड्याला वाफेमुळे छान उबदार गुदगुल्या झाल्या. त्या एका घोटाने सगळं शरीर सैलावल्यासारखं झालं. मला कॉफीची खरच किती गरज होती ते त्या एका घोटाने लक्षात आले. मी गार्गीकडे “गुणी माझी पोर ती” अशा अर्थाचा कटाक्ष टाकला. तिनेही सगळं समजल्यासारखं छानसं हसून चिअर्स केल्यासारखा मग वर केला.
कॉफी पिऊन झाली. मी गार्गीच्या हातून मग घ्यायला हात पुढे केला तर माझाच हात धरुन म्हणाली “राहूदे मग. मी विसळेन नंतर. तू बस बरं येथे अशी”
वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे, वाघ्या म्हटलं तरी खाणारच आहे असा विचार करुन मी चेअरवर बसले. सैलावलेले शरीर पुन्हा अवघडले. डोळ्यात जगभराची चिंता, उत्सुकूता दाटून आली. गार्गीने तिची चेअर माझ्या समोर आणून अगदी गुडघ्याला गुडघे लावून बसली. माझे हात हातात घेत म्हणाली “अनू, तुला सकाळपासून आठवण येतेय ना अाज्जीची? होतं ग असं कधी कधी. कशाला किचनमधे राबत बसलीस मग आज? त्याने काय आठवण यायची थांबणारे का? जीव शिणवलास उगीच. इतकी हळवी नव्हतीस गं तू कधी”
लहानपणापासुन ही पोर अगदी अशीच. आईच्या मनातला आनंद एक वेळ नाही लक्षात यायचा तिच्या पण आतली खळबळ तिच्या नजरेतून सुटली नाही कधी. पार्थला जे समजावं असं मला वाटायचं ते नेहमी हिला अगोदर समजायचं. आज दुपारीही स्वतःला काय खुपतय ते बाजुला ठेऊन बाबाच्या मागे लागली ‘आईला बाहेर ने’ म्हणून. माझ्या हाताची बोटे तिच्या दोन्ही मुठीत होती. मग मीही मुठी घट्ट करत म्हणाले “माझं राहुदे गं जीजी. आजकाल होतं अधुनमधून थोडं असं सैरभैर झाल्यासारखं. तू गेलीस ना कबीरच्या मागे मागे त्याचं, तुमचं घरटं सजवायला. तेंव्हापासुन जरा जास्तच होतय असं. माझ्या मेलीचं राहूदे. तू सांगत होतीस ना काहीतरी?”
माझा एक हात सोडून दुसरा हात थोपटत गार्गी म्हणाली “नको अनू, आज राहूदे. तूच सांग ना आज्जीच्या काही आठवणी. तू आणि मामा कैऱ्या चोरताना तू झाडावरुन पडली होतीस ती. आणि मामाला शाळेत रागावले म्हणून तू गुरुजींना पट्टी मारली होतीस आणि मग घरी माळ्यावर लपली होतीस अंधार पडेपर्यंत ती सांग. कसली होतीस ग तू लहानपणी. मामाने तुला सांभाळायचे तर तुच त्याला सांभाळत होतीस. मामा ऐवजी तुलाच घाबरायचे ना शाळेत सगळे?”
गार्गीच्या बोलण्याने सगळं बालपण क्षणात डोळ्यांपुढून सरकुन गेलं. आई बाबांच्या आठवणीने अगदी व्याकुळ व्हायला झालं. पण स्वतःला सावरत मी हसले. गार्गीचा गाल जोरात ओढत म्हटलं “जीजी आईय्ये मी तुझी समजलं! समजतय मला सगळं. मी ठिके. तू सांग बरं काय झालय ते. ऑफिसमधे काही प्रॉब्लेम आहेत का?”
गार्गी जरा विचारात पडल्यासारखी झाली. मग एकदाचं घडा घडा बोलून मोकळं व्हावं तसं म्हणाली “अनू माझं आणि कबीरचं भांडण झालंय खुप. काही झाले तरी मी परत जाणार नाहीए आता त्याच्याकडे. तू ही गळ घालू नकोस”
गार्गीचे बोलणे ऐकले आणि मला एकदम हुश्श झालं. कार्टीने सकाळपासुन माझ्या उरावर धोंड ठेवली होती जणू. मी अगदी सकाळपासुन श्वास घेतच नव्हते असा मी दिर्घ श्वास घेतला आणि गार्गीच्या हातातून हात सोडवून घेतले. हसुन म्हटलं “छान! अजुन काही?”
डोळे मोठ्ठे करत गार्गी म्हणाली “बरी आहेस ना अनू? अगदी डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं काय हसतेस? मी जाणार नाहीए परत कबीरकडे. तुला नको असेल तर येथेही नाही राहणार”
मी फक्त तिच्याकडे पहात राहीले. गार्गी आणि कबीरची भांडणे काही नविन नव्हती. लग्नाला दोन वर्ष झाली तरी अजुन लहान मुलांसारखं भांडण सुरुच. या वेळी गार्गी जरा जास्त अस्वस्थ वाटत होती एवढंच.
मला शांत बसुन तिच्याकडे बघताना पाहुन गार्गी पुन्हा धुसफूसली “मी बाबाबरोबरच बोलायला पाहिजे होतं. तू कितीही जगापेक्षा दोन पावले पुढे असली विचारांनी तरी कबीरचा विषय निघाला की तू टिपीकल सासू होतेस हे काय मला माहीत नाही का? आणि तोही आई आई म्हणत चोंबडेपणा करत राहतो तुझ्यापुढे”
भांडणे आजची नसली तरी गार्गीला एवढं चिडताना मी कधी पाहिले नव्हते. तिला शांत करत मी म्हणाले “अगं ऐक तर जीजी. असं काय करतेस वेड्यासारखी”
माझं बोलणं मधेच तोडत गार्गी म्हणाली “काय ऐकू? तुझा लाडका जावई आहे ना तो! नेहमी त्याचीच बाजू घेतेस अनू तू”
तिने रागाने मागे ढकललेली तिची खुर्ची मी जवळ ओढली आणि विचारले “जीजी शांत होणारेस का? मला सांग काय झाले ते. कधी येणारे कबीर दिल्लीहून? कशावरुन भांडला तो तुझ्याशी? आणि असं भांडून गेल्यावर त्याचे लक्ष लागणार आहे का तिकडे कामात? एवढी शहाण्यासारखं वागतेस जीजी तू मग अशा वेळेस काय होतं ग तुला? मला सगळं व्यवस्थित सांग म्हणजे तो आला की तुझ्यासोबत मीही भांडते त्याच्याबरोबर”
गार्गी माझ्याकडे काही क्षण अविश्वासाने पहात राहीली मग गोड हसुन म्हणाली “खरच अनू?”
डोळ्यात पाणी ओठांवर हसु असलेली गार्गी किती गोड दिसत होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...