❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

आज्जी

दिवस कलला की आज्जी अंगणात बसायची. तुळशीवृंदावनाला टेकून, एक पाय मुडपून, दुसरा लांब करुन ती सप्पय टेकायची. शेजारी मोठी चाळण, आठवा-निठवा, सुप, जडशिळ खलबत्ता वगैरे हत्यारं असायची तिची. मग दिवेलागणीची तुळशीची पणती लागेपर्यंत तिची काही ना काही कामे सुरु रहात. संध्याकाळच्या रांधपासाठी गवार-घेवड्यासारख्या शेंगा मोड, मेथीची भाजी निस वगैरे कामे ऊरकली की ती शेंगदाणा-तिळाचा कुट करुन ठेवी. नंतर ऊरलेल्या वेळात धान्य निट करायचं काम करीत बसे. अतिशय एकाग्र होऊन ती सुपात धान्य पाखडीत राही. त्यावेळी तिच्या गळ्यातली ठुशी सोडली तर सगळ्या दागिन्यांना सुरेख लय येई. गळ्यातली बोरमाळ, जोंधळी पोत सुपाच्या तालावर लवत राही. बुद्धासारख्या लांब झालेल्या कानाच्या मऊसुत पाळ्याही कुड्यांच्या वजनाने मंद झुलत रहात. नथ ओठांवर आघात करत राही. लांब केलेल्या पायाच्या सुरकुतलेल्या बोटातली जड जोडवी टचटचत, सुबक मासोळ्या हिंदकळत. सोबत धान्य पाखडताना सुपावर दोन्ही हातांच्या बोटांनी केलेला आवाज व मनगटावरल्या चांदीच्या जडशिळ गोठांची किणकिण याचे पार्श्वसंगीत असे. दाणे पाखडताना हात शिणले, कमरेला रग लागली की मग पाठीची धनुकली करुन ती पाठच्या तुळशीवृंदावनावर जोर देई. अशा वेळी तिच्या गोऱ्या कपाळावरचा मेनात मळलेला जर्द कुंकूवाचा रुपया सुरकुत्यांमध्ये अर्धाअधिक दिसेनासा होई. कुंकवाखाली गोंदलेल्या हिरव्या सुर्याची किंचीत कड दिसे. अशा वेळी आज्जीकडे आम्ही पोरं पायाची बोटे, गुडघे, दोन्ही तळहात शेणसारवल्या जमीनीवर रोवून कुत्र्याच्या पिल्लांसारखे बसुन कुतूहलाने पहात रहायचो. संधिप्रकाशात आज्जी अगदी सुरकतलेल्या सायीसारखी भासायची, गोड दिसायची. शिणवटा मोडत आज्जी मऊ आवाजात आम्हाला म्हणायची "तांब्याभर पाणी आणतो काय रे पुता?"
मग "मीच आधी पाणी देणार" असं म्हणत आम्ही सगळे घरात धावायचो. मिनिटभरात आज्जीपुढे तिन तांबे हजर होत. मग एकाच्या पाण्याने गुळणा कर, एकाच्या पाण्याने तोंड पुस असं करत आज्जी सगळ्यांना खुश करी. ऊरलेलं पाणी तुळशीला घालायला लावून मग आज्जी काहीबाही कथा सांगत राही.
या कथा कधी राजा-राणीच्या, पऱ्यांच्या, जादुगारांच्या किंवा रामायण महाभारतातल्या नसत. सगळे विषय रोजच्या जगण्यातले असत. अर्थात आम्हाला काहीएक कळत नसे. पण आज्जीचा तो गोड हेल असलेला आवाज ऐकत रहायचो आम्ही.
या कथांमधे आज्जी जाईपर्यंत कधी खंड पडला नाही. सुरवातीला आज्जी काय सांगायची ते कळत नसे. मी नववी दहावीला गेल्यावर मात्र ती जे सांगायची त्याचा अर्थ कळायला लागला. मात्र फक्त अर्थच. ती गेल्यानंतर कित्येक वर्षांनी तिच्या या कथांची खरी ऊकल हळूहळू होत गेली. त्यातली वेदना, वैषम्य, हतबलता जाणवत गेली. तिच्या कहाण्या आठवल्या की आज्जीच्या कणवाळूपणाबद्दल तिचं फार कौतूक वाटे.
हळू हळू मीही 'कुण्याकाळचे पाणी डोळ्यात येते' या वयात पोहचलो. आज्जीच्या या कहाण्या सोबत आहेतच. मात्र आता त्या कहाण्या आठवल्या की आज्जीचे कौतूक वाटण्यासोबतच गलबलूनही येते. हुंदका दाटतो गळ्यात. खरे तर आज्जीचं सासर सुखवस्तू. सधन शेतकरी. माझे आजोबा अतिशय प्रेमळ. त्याकाळातही बायकोला प्रत्येक विचारात, निर्णयात सामिल करुन घेणारे. मुलगी झाली तर तिचे नाव 'नकुशी' ठेवणार काळ होता तो. अशा काळात कौतूकाने झालेल्या मुलीचे नाव 'हौसा' ठेवणारे आजोबा. आज्जीला नेहमी बरोबरीने वागवणारे. पण आजूबाजूच्या बायाबापड्यांची अवस्था केवीलवाणी. आज्जी त्याच कहाण्या सांगायची. त्या सासुरवाशीन पोरींना जमेल तशी मदत करायची. आपल्या दोन हातांनी परिस्थितीमधे काडीचाही बदल होणार नाही हे पाहून हतबल व्हायची. याच ठसठशीच्या कथाकहाण्या करुन ती सांगायची. कदाचित या चिमुरड्यांना काही कळणार नाही हे माहित असल्यानेच मन मोकळं करण्यासाठी हे सगळं ती आम्हाला सांगत असावी. आज आज्जी असायला हवी होती. हे सगळं सगळं मी रेकॉर्ड करुन घेतलं असतं. अनुस्वारही न बदलता सगळं लिहून काढलं असतं. कदाचित मी आता जाणता झाल्याचे पाहून आज्जीने मनातल्या अगदी आतल्या गाठीही ऊकलून दाखवल्या असत्या. सगळं लक्षात आहे असं वाटत असलं तरी आज्जीने सांगितलेल्या कित्येक कहाण्या माझ्या विस्मरणात गेल्या असणार. आता तो ठेवा काही रिस्टोअर करता येणार नाही. काय काय होतं आज्जीच्या गाठोड्यात! आता ते सगळं तिच्यासोबतच गेलं. तर असो. हे झालं फक्त नमन. घडाभर तेल येथेच जाळलं मी. विषय होता अशाच एका अंगणात रंगलेल्या व आता नुकत्याच आठवलेल्या गप्पाष्टकाचा.
आपली सुन नोकरी करते व तिही शिक्षिकेची याचं आज्जीला कोण कौतूक. ती जमेल तशी आईला मदत करायची. तिचा भार हलका करायची. आपल्याला तिच्या नोकरीचं किती कौतूक आहे हे ती माझ्या आईपर्यंत सतत कुठल्यान कुठल्या मार्गाने पोहचवत रहायची. "गुणाची आहे पोर माझी!" असं माझ्या आईचे माझ्याच पुढे कौतूक करायची. अशा वेळी तिला हमखास तिचा तरुणपणचा काळ व त्यावेळच्या सासुरवाशीण लेकीबाळींचा त्रास आठवे. सांगे "रे पुता, वंगाळ दिस व्हते रे त्ये बाईमाणसासाठी. खटल्याचं घर. धुरात डोळं चोळत विस पंचवीस माणसांचं रांधायचं. भाकऱ्या बडवायच्या. खवाटं निकामी व्हत्यात की काय असं व्हायचं. भाकऱ्या झाल्यावर काठवट ऊचलायलाबी जीव नसायचा. पाटल्या जड व्हायच्या मनगटावं. बेड्याच त्या. एव्हढं करुनबी जीवाला ईश्रांती न्हाई. झाकपाक करुन शिकाळं आबादाणी करुस्तवर रानात निंदनं खुरपणं वाट पघत असायचं. खुरपं कमरंचाच भाग झाल्यालं. कमरपट्टाच त्यो कुणब्याच्या बाईचा. बरं एव्हढं जित्राबासारखं राबून बी घरच्या माणसाला काय जाण असावी ना? त्ये बी नाय! सासर द्वाडच असतय पुता, पण आपल्या माणसाला जाण असली की जीव सुखावतोय बाईमाणसाचा. पण त्ये बी नशिबात नाय! कधीनव्हं ते सासूनं 'जेवून घे पोरी!' असं म्हटलं तरी काळीज भरुन यायचं. तेवढी मायाबी झेपायची नाय. एक माह्येराचा आधार, पर त्योबी कच्च्या सुताला बांधल्येला. कव्हा तुटन याचा भरोसा नाय. बाप कव्हा भेटायला आला तरी धड भेट नाय का बोलचाल नाय. पोरींनी रडायचं गागायचं तरी कुणाम्होरं? सासरी आलेला बाप माजघराच्या दाराआडूनच डोळे भरुन पघायचा. पाणी द्यायला गेलं तर 'बरं हाय ना?' एवढं ईचारायची बी चोरी. बापाचं जाणारं जोडं ऐकलं की घाई घाई कळशी घ्यायची व पाणवठा गाठायचा. तिथं विहिरीवर बाप डोळ्यात जीव आणून वाट बघत थांबायचा. मंग काय घटकाभर बोलणं व्हायचं तेवढ्यावरच दिवस ढकलायचे. त्या घटकाभरात काय काय बोलायचं, ईचारायंच असायचं, पण शबुद फूटायचा नाय. दोघांचाबी जीव तहानलेलं पाखरु झालेला असायचा. 'वर्षाच्या सणाला तुझ्या दादाला पाठवीन मुऱ्हाळी म्हणून' बापाच्या एवढ्या म्हणन्यावर दिवाळीपर्यंत दिस ढकलायच्या पोरीबाळी. तुझा आज्जा देवमाणूस या राकुसांम्होरं. म्हणून ईथवर आल्ये पुता." ही कहाणी कितीतरी वेळ सुरु राही. आई तुळशीवृंदावनाच्या कोनाड्यातल्या पणतीची वात बदलायला येई तेंव्हाच आज्जीची मांडी मोडे व हे गप्पाष्टक थांबे.

1 टिप्पणी:

  1. १ वर्ष झालंय अप्पा. काहीतरी नवीन लिखाण प्रकाशित करा. वाट बघतोय आतुरतेने.

    उत्तर द्याहटवा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

आज्जी

दिवस कलला की आज्जी अंगणात बसायची. तुळशीवृंदावनाला टेकून, एक पाय मुडपून, दुसरा लांब करुन ती सप्पय टेकायची. शेजारी मोठी चाळण, आठवा-निठवा, सुप,...