❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, १४ मार्च, २०२२

मुंगी साखरेचा रवा

घरातून पळून जायचं मोठं होऊन खुप पैसा कमवायचाहे माझं लहानपणच्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न होतं. ड्रायव्हर व्हायचं, पोस्टमन व्हायचं आणि हे काही नाहीच जमलं तर गेला बाजार निदान पिंजारी तरी व्हायचंच व्हायचं ही देखील स्वप्न होतीच. पिंजारी होऊन त्या भल्या मोठ्या धनुकलीने टॉन्गऽ टॅईऽन्गऽऽ असा मस्त आवाज काढत चौफेर मऊसुत कापूस ऊधळत पिंजून काढायचा. दुसरं काय हवं मग आयुष्यात असं वाटायचं. बाकीची स्वप्ने ही अगदी मनापासूनची होती पण पळून जायचे स्वप्न मात्र आई-बाबांवरच्या रागामुळे होतं. व्हायचं काय की, शाळा सुटल्यावर शाळेपासून ते घरी येईपर्यंत ईतकी प्रलोभने असत की मन अगदी मोहून जाई. मग घरी येऊन अगोदर आईच्या मग बाबांच्या मागे लागून हट्ट करावा लागे. तोही पुर्ण होईलच याची शाश्वती नाही. किती तरी ईच्छा मग अशाच राहून जात. शाळेसमोर बसणाऱ्या मावशीकडची बिस्किटे, पाराखाली दुकान लावणाऱ्या मामांकडे असणारी खेळणी, रामकाकाच्या दुकानात असलेल्या त्या सुरेख वासाच्या कव्हरच्या वह्या, ते निळ्या, विटकरी रंगाचे चमकदार पेन्स, त्यांचे ते लखलखते निब, सुट्टीच्या दिवशी सायकलवर येणारा तो आईस्क्रिमवाला, ती वडाच्या पानावरची घट्टमुट्ट कुल्फी एक की दोन ईच्छा होत्या? त्यात पुन्हा मधेच येणारी आमची यात्रा, मग आत्याच्या गावची यात्रा. त्यातली प्रलोभने वेगळीच. यातल्या एक एका ईच्छेसाठी आईकडे तास तास भर हट्ट करावा लागे. तिचा पदर धरुन ती जाईल तेथे फिरावे लागे, ती सांगेल ती सगळी कामे करावी लागत. एवढं करुनही आई प्रसन्न होईलच याची खात्री नसे. मग तासभर भोकाडही पसरावं लागे. तेंव्हा कुठे मग कुल्फीचा गोळा दाबलेलं ते हिरवेगार वडाचं पान हाती येई. थोडी का यातायात होती. मला वाटतेहजारो ख्वाहीशे ऐसी की हर ख्वाहीश पे दम निकलेही गझल गालीबला त्याचे बालपण डोळ्यापुढे आल्यानेच सुचली असणार. त्याचे आई बाबा काय वेगळे असणारेत का? ईथून तिथून सारखेच असतात हे आई-बाबा. यावर एकच जालिम ऊपाय-पळून जाणे. नको ते सारखं सारखं आई-बाबांपुढे भोकाड पसरायला. मोठं व्हावं, भरपुर पैसा कमवावा, हवी तेवढी बिस्किटं खावीत, हवी तेवढी शाईपेनं घ्यावीत, पाहिजे तेवढ्या वह्या घ्याव्यात. दोन आईस्क्रिमवाले सायकल घेऊन घरापुढेच ऊभे करावेत दिवसभर. वडाच्या पानांना काही तोटा नाहीच्चे. हवी तेवढी झाडे आहेत आपल्या गावात. कुणाला काही विचारायचे नाही कुणाकडे काही मागायचेही नाही. मग हे पळून जायचं अगदी नक्की व्हायचं. पण मग विचार यायचा; पळून जाऊ, पैसाही कमावू पण आजोबा अधून मधून जी काकवी आणतात ती कुठे मिळणार आपल्याला? आजोबांच्या गुऱ्हाळातली काकवी मधाच्याही तोंडात मारेल अशी असायची. गरम पोळीला हे काकवीचे मध लावून खाणे म्हणजे स्वर्ग. आजीच्या हातच्या रेशमी शेवया कुठे मिळायच्या? दुध संपल्यावर ती पातेल्यातली सायी शिंपल्याने खरवडून देते तसं कोण देणार? आणि आईच्या हातच्या मऊसुत पोळ्या मिळतील का? दुधात ही पोळी गुळ कुस्करला की तोंडाला पाणी सुटे. बरं जगात फक्त माझ्या आईच्याच हातच्या पोळ्या मऊ होतात. तिच्यासारखा सांजा आख्ख्या दुनियेत कुणालाच करता येत नाही. मोदकही फक्त तिलाच जमतात. शेजारच्या काकूसुद्धा तिला विचारुनच करतात दर वेळी मोदक यावरुन पहा मग. आणि रात्री बाबांच्या दंडाची ऊशी नसेल तर झोप येईल का? असा भारी दंड कुणाचा असेल का कुठे? मग वाटे नको तो पैसा कमावनं आणि नको ते पळून जाणं.


मग हळू हळू मोठा झालो. नुसताच मोठा झालो. ‘ऊगाच मोठा झालोअसं वाटेपर्यंत मोठा झालो. यथाशक्ती पैसाही कमावला. आता मी माझ्या कोणत्याही ईच्छा पुर्ण करु शकत होतो. पण दुर्दैवाने आता त्या ईच्छाच राहिल्या नाहीत. ऊलटकाय बावळट ईच्छा होत्या आपल्या!” असा स्वतःच्याच ईच्छेंची टिंगल करण्याचा निगरगट्टपणा अंगात आला. मित्र, भाऊ, नातेवाईकआलोच तालूक्याला जाऊनअसं म्हणावं ईतक्या सहजतेने जगभर भटकतात. येताना आवर्जुन माझ्यासाठी चॉकलेट्स, बिस्किटस्, महागडे पेन्स आणतात. तेवढ्यापुरते कौतूकही वाटते. पण आता तो शाईपेनमधला रस राहीला नाही पुर्वीचा. एकदा आईने तिचा वापरताएअरमेलकंपनीचा शाईपेन मला दिला होता तेंव्हा मी तो मुठीत घेऊनच झोपलो होतो रात्रभर. आणि परवा थोरल्याने त्याच्या खिशाचा महागडा क्रॉसचा पेन काढून मला दिला तर मी फक्त एक सही करुन पाहीली छानेम्हणत पेनच्या मगमधे ठेऊन दिला. मला आठवतय, ओट्यावर बसुन बाबा मला शिकवायचे की बांबू कसा धरायचा, कोणत्या बोटाचा त्याला खालून आधार द्यायचा, सुरी कोणत्या ऍन्गलने कशी चालवायची. बोरु तयार झाला की त्याचे टोक कोणत्या कोनात कापायचे. अगदी मनासारखे चारपाच बोरु तयार झाले की मग मोठा तक्ता शाईची दौत घेवून बसायचे देवनागरी अक्षरे गिरवायला शिकवाचे. तो कुरु करु आवाज करत चालणारा बोरु का मिळत नाहीए मला आज? कुठे गेला तो कुरु कुरु असा येणारा नाद? कुठेय ती काळीभोर शाई आणि तिचा तो मिरमिरीत वास? काय करु हे दहा दहा हजाराचे पेन घेऊन? कशात होता माझा आनंद नक्की? वस्तूंमधे होता तर मग आता हाताशी ईतक्या वस्तू असताना तो लहानपणीचा आनंद का होत नाहीए मला? ती पाच पैशाची बिस्किटे खिशात असली की मला जग माझ्या पायाशी आल्यासारखे वाटायचे. दिवसभर ती बिस्किटे पुरवून पुरवून खाताना त्यासमोर ब्रम्हानंद तुच्छ वाटायचा. मग आज ही एवढी वेगवेगळी बिस्किटे, कुकिज का घशाखाली ऊतरत नाहीत? तांब्यात विस्तव टाकून ईस्त्री केलेला माझा शर्ट मऊ रेशमाशीही पैजा घ्यायचा. मग आज हे दुनियाभरचे ब्रॅन्ड माझ्या मनाला, शरीराला का रिझवत नाहीएत? कुठे गेले आजोबा आणि त्यांची तीमधाच्या तोंडात मारणारीकाकवी? कुठय ती आज्जी आणि तिने माझ्या कानशिलावर सुरकुतलेली बोटे मोडून घेतलेल्या आलाबला? ती शाळेबाहेरची मावशी, तो पारावरला दुकानदार, ते रामकाकाचे दुकान कुठाय सगळं?

मला पळून जाऊन खुप खुप मोठं व्हायचं होतं. आज मला पळून जाऊन खुप खुप लहान व्हायचय.
तेंव्हाही पळने शक्य झाले नाही आणि दुर्दैवाने आजही ते शक्य होत नाहीए.



मंगळवार, १ मार्च, २०२२

यार कुछ भी हो यार होता है

लग्नानंतर बायकोला खुष करण्यासाठी मी काही गोष्टी केल्या. पण त्यातला फायदा लक्षात आल्यावर मी त्यातल्या काही पुढे कंटिन्यू केल्या. त्यातल्या दोन म्हणजे पैशाचे पाकिट व मोबाईल स्वतःजवळ न ठेवणे. जे काही लागतील ते तिच्याकडून घ्यायचे. हिशोब ठेवायची भानगड नाही, काटकसर करायची यातायात नाही, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुणाला ‘नाही’ म्हणायचे संकट नाही. मोबाईलचेही तेच. येणारे कॉल व्यवस्थित फिल्टर होऊनच येतात. नको असलेले कॉल बायको परस्पर निकालात काढते. पण या सवयीमुळे एकदोन वेळा अडचणीत आलो आणि मग मोबाईलच्या कव्हरमधे, गाडीच्या सन व्हायजरमागे, लॅपटॉपच्या केसमधे, कार्ड होल्डरमधे वगैरे ठिकाणी ईमर्जन्सिसाठी एखादी मोठी नोट ठेवायची सवय लागली. आता गावी असल्याने या दोन्ही गोष्टी जवळ ठेवाव्या लागतात व सवय नसल्याने त्या कुठेही विसरतात.
परवा बायकोचा टेलेग्रामवर मेसेज आला की दिवसभर तुझा फोन लागत नाहीए. नानाला फोन केलाय. संध्याकाळी येईल तो घरी. त्याच्याच मोबाईलवरुन फोन कर लगेच मला. मेसेज दुपारी पडला होता. मी तो संध्याकाळी पाहीला. खरेच, दोन दिवस मलाही मोबाईल दिसला नव्हता. विसरलो की काय कुठे? असं म्हणत शोधायला ऊठणार तर बेल वाजली. दार ऊघडले तर नानासाहेब दारात ऊभे. ‘संधी मिळूनही शिव्या न देणारा मित्र’ ही कविकल्पना आहे. दोघेही मोबाईल शोधायला सुरवात केली. नानाच्या शिव्या सुरुच होत्या. “तुझा निष्काळजीपणा मला भोगायला लागतो नेहमी. साधा मोबाईल सांभाळता येत नसेल तर व्यर्थ आहे तुझं आयुष्य. (बापरे) वेगेरे वेगेरे.” एकदाचा मोबाईल सापडला. बॅटरी पुर्ण संपली होती. त्याला अगोदर चार्जिंगला लावला. सुरु झाल्यावर सिमकार्डसंदर्भात काही मेसेज पॉपप झाला. शेवटी सिमकार्ड काढण्यासाठी नान्याने मोबाईलचे कव्हर काढले. आतली नोट पाहून त्याने कचकचीत शिवी घातली आणि म्हणाला “गाढवा, मोबाईलच्या कव्हरमधे कुणी दोन हजाराची नोट ठेवतो का? मोबाईल हरवला किंवा कुणी चोरला तर गेले ना दोन हजार फुकट. म्हातारा होत आला पण मोठा काही झाला नाही तू” मी कपाळावर हात मारुन घेतला. च्यायला मोबाईल जर चोरीला गेलाच तर मला पाऊन लाखाला फटका बसल्याचे टेन्शन येईल की दोन हजार गेल्याचे? पण नान्याला काय बोलणार? मी चेहरा निरागस करत म्हणालो “जर कधी माझा मोबाईल हरवलाच तर ज्याला सापडेल त्याला ‘मोबाईल सापडल्याची’ पार्टी करण्यासाठी मी ते पैसे ठेवतो नेहमी. कुत्र्याने नाही का नाथांची भाकरी पळवली तर नाथ त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले! तसच आहे हे.”
त्या दिवशी संध्याकाळी माझ्याच घरात हरवलेला माझाच मोबाईल मिच शोधून काढल्याबद्दल माझ्याच दोन हजारच्या नोटेचा बळी देऊन नान्याने माझ्याकडून पार्टी ऊकळली. 😆😆😆
चालायचंच. यार कुछ भी हो, यार होता है.

गुरुवार, १० जून, २०२१

पडद्याआडचे मोती

मी कुठेही गेलो तरी काही लोकांबरोबर माझी फार चटकन मैत्री होते. आणि नाही झाली तर मी ती आवर्जून करतो. या मधे प्रामुख्याने असतात परिसरातील हॉटेलमधले आचारी, वेटर, परिसरातील डेअरीवाला आणि खाटीक. पुस्तकं मानसाची खरे मित्र असतात तर असतील बापडे पण मला कधीच ग्रंथालयात तास तासभर घालवूनही कुणी मित्र कधी मिळाला नाही. तेथे समविचारी नक्की मिळतात पण मैत्रीची नाळ जुळतेच असे नाही. एखाद्या मटन खानावळीत मात्र कधी, कोण, कुठला मित्र मिळेल व जीवाभावाचा होईल हे सांगता येत नाही. एखाद्या अप्रतिम बिर्याणी मिळणाऱ्या कुठल्याशा अगदीच अप्रसिद्ध ठिकाणी तुम्ही अगदी चवीने बिर्याणी खात असता आणि समोर बसलेला एखादा मुसलमान भाताच्या शितांनी भरलेला हात अधांतरी तरंगत ठेऊन तुम्हाला विचारतो “कहा से हो साब?” आणि तुम्ही येथलेच असुन मराठी आहात हे समजल्यावर “ह्या! तुम मराठी लोगों को क्या मालूम बिर्याणी क्या होती है! तुम्ही लोग कोंबडीची खिचडी करुन खाता आणि तिलाच बिर्याणी म्हणता” असं बिनदिक्कत आपल्या तोंडावर सांगतो. “बिर्याणी पकती है तो सिर्फ मुसलमान के घर मे, बाकी सब खिचडीवाले” वर हेही ठणकावयाला तो अनमान करत नाही. मग पुर्ण बिर्याणी संपेपर्यंत त्याच्या गप्पा सुरुच रहातात. जेवण संपल्यावर “मराठ्यांना काय माहित गोश्त कशाशी खातात” असं म्हणत हा आपल्या हातावर कौतूकाने पाणी घालतो. येथे धर्मावरुन, जातीवरुन भेदही केले जात नाही व अपमानही केले जात नाही. तेच एखाद्या ग्रंथालयात बसून “अमुक लेखक काही खास लिहित नाही” असं म्हणायची खोटी, तुमच्यावर दोन चार जण शाब्दीक हल्ला करायला तयारच असतात. ग्रंथालयात एखाद्या गोष्टीवरुन मतभेद झाले की मनभेद व्हायला वेळ लागत नाही पण एखाद्या पदार्थावरुन जर तुमचे कुणाबरोबर मतभेद झालेच तर समोरचा तुम्हाला हट्टाने तो पदार्थ खिलवून तुमची मतं खोडतो व मनभेद व्हायच्या ऐवजी मनमिलाफ करुन जातो. कुणी मित्र तुमच्यासमोर तासभर एखाद्या पुस्तकाचे कौतूक करतो व तु्म्ही भारावलेल्या आवाजात त्याला विचारता “भारीच आहे रे पुस्तक, तुझ्याकडे आहे का?” तर तुमचे वाक्य संपायच्या आत उत्तर येते “म्हणजे काय, प्रश्न आहे का? पण भावाने दिलेय कुणाला तरी वाचायला. आले की देईन तुला.” पुस्तक प्रेमी एक वेळ आपल्या कमरेचे सोडून तुम्हाला देईन, पण पुस्तक देणार नाही. तेच एखादा जीवलग मित्र तुम्हाला कट्यावर चहा पिता पिता सकाळी खाल्लेल्या नल्ली निहारीचे रसभरीत वर्णन ऐकवतो व तुमच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून म्हणतो “क्या बात कर रहे हो? निहार चखी नही आजतक? हायला मग आजवर खाल्लं काय आयुष्यात? सकाळी नाष्टा करु नकोस, मी येतो न्यायला. रहेमियामधली निहारी खिलवतो तुला.” आणि खरच तो सकाळी सातलाच घरी हजर होतो. त्याच्या आवडत्या रहेमियामधे बसून आपण निहारी खात असतो आणि कौतूक मात्र त्याच्या चेहऱ्यावर असतं. समोरचा दोन घास जास्त जेवल्यावर सुगरण बाईच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तोच आनंद मित्राच्या चेहऱ्यावर असतो. “हौर, कैसी लगी निहारी? अरे सवाबवालों को ही नसिब होती है अच्छी निहारी” असं म्हणत तो जेंव्हा काऊंटरवर बिल देतो तेंव्हा “अरे राहू दे, मी देतो बिल” असं म्हणून त्याच्या शिव्या खाऊ नयेत आणि त्याच्या आनंदावर विरजणही घालू नये. निमूटपणे समोरची बडीशेप उचलावी व हातावर चोळत बाहेर पडावे. याचा अर्थ मी पुस्तकांच्या छंदाविरुद्ध आहे असं नाही पण माझी कुंडली ‘तबियतने खानाऱ्याबरोब व खिलवणाऱ्याबरोबर’ जास्त जुळते. त्यामुळेच मी कुठेही गेलो की तेथले ग्रंथालय कुठे आहे याची चौकशी करण्याअगोदर तेथली खानावळ कुठे आहे याची प्रथम चौकशी करतो. 

हे मटनवाले, डेअरीवाले यांचा एक अवतार ठरलेला असतो आणि सहसा ते त्याच अवतारात वावरतात. आचारी, वेटर, खाटीक, मासेवाली मावशी यांची एक विशिष्ट कुवत आपण डोक्यात ठेवलेली असते. एक पडदा उभा केलेला असतो आपण त्यांच्या व आपल्यामधे. त्यापलिकडे आपण या लोकांचा फारसा विचार करत नाही. पण त्यांच्यातला खरा माणूस नेमकी त्या पडद्या पलिकडे असतो. तो सदैव आपल्याला अनोळखीच रहातो. कधी कधी आपण टेबलवर बसून चहाची ऑर्डर देतो व चहा येईपर्यंत गालिबचा दिवाण उघडून बसतो. चहा घेवून आलेला पोरगा तुमच्या समोर कप ठेवून म्हणतो “अरे वाह, गालिब का?” आणि जाता जाता “ये मसाईले तसव्वुफ, ये तेरा बयान ‘गालिब'। तुझे हम वली समझते जो न बादा-ख्वार होता” असं काहीसं पुटपुटत गालिबच्या वर्मावरच बोट ठेवतो तेंव्हा आपल्याला चहा पिता पिता ठसका लागतो. या मागे कारण हेच असते की वेटरची एक इमेज आपण मनात केलेली असते. त्यापलीकडचा रसीक माणूस असा अचानक दिसला की आपल्याला चकित व्हायला होते. मी नेहमी या पडद्यापलीकडील माणसांबरोबर मैत्री करायचा प्रयत्न करतो. आपण पडदा दुर करायचा अवकाश असतो, पलिकडे ही माणसे मैत्रीचे दरवाजे सताड उघडून बसलेलीच असतात. 

एकदा का तुम्ही हा पडदा हटवला की पलिकडे काय रत्ने मिळतिल ते सांगता येत नाही. लांब बाह्याचे बनियन घालून बसलेला, ओघळत्या ढेरीचा, तेलकट केसांचा पण नुकतीच पुजा आटोपल्यासारखा चेहरा असलेला आमचा डेअरीवाला भैय्या पडद्यामागे वेगळाच असतो. कधी पनिर घ्यायला गेलो की काचेच्या कपाटात पनिरचा मोठा ठोकळा असुनही “आजका पनिर मत लो साब, आवो, अंदर आवो। कुछ सुनाते है” असं म्हणत हाताला धरुन मला काऊंटरच्या आत घेतो व युपीमधल्या त्याच्या गावात गायली जाणारी गोपींची गीते व मराठी गवळणी यातली साम्यस्थळे तो मला समजावून सांगत बसतो. “गोपींची गीते ही पिलू रागातच छान खुलतात. इतर राग कितीही गोड असले तरी कन्हैया की तकरार पिलू रागमेही दिल को छुती है” असं सांगत एखादी ओळ तो पिलू रागात गाऊनही दाखवतो. तेंव्हा वाटते की या दुधा-तुपाच्या वासात बसून हा दुध पनिर का विकत बसला असेल? याच बिस्वासने मला त्याच्या दोन रुमच्या खोलीत अनेक युपीचे पदार्थ खावू घातले. त्याच दोन रुममधे बाहेरची खोली संध्याकाळी मोकळी करुन तेथे रात्र रात्र रंगवलेली भजने ऐकवली. आपल्या वयाला न शोभणाऱ्या ढेरीवर हातातले दोन्ही पितळी टाळ उपडे ठेवून हा भैय्या जेंव्हा त्याच्या ईश्वराला आळवताना तल्लीन होतो तेंव्हा ‘परप्रांतिय' वगैरे भानगड माझ्या मनातून कधीच पुसलेली असते. त्या ‘दुधवाल्या भैय्या’चे ते रुपडे मला प्रचंड भावते. त्याच्या माझ्यामधला ‘दुधवाला भैय्या’ हा पडदा दुर केला म्हणुन मला बिस्वास नावाचा हा हिरा सापडलेला असतो. अन्यथा तो माझ्यासाठी फक्त दुधवालाच राहीला असता. नुकसान त्याचे नाही, माझे झाले असते. 

परिस्थितीने माणसे कुठेही पोहचतात, कुठलाही व्यवसाय करतात. पण काहीजण या जगरहाटीत आपापला छंद आवर्जून जोपासतात. माणूसकी टिकवतात. आपण फक्त त्यांना दाद द्यायची खोटी, ते भरभरुन आपल्यासमोर त्यांच्या पोतडीतला खजिना ओततात व आपले डोळे दिपवतात. आमच्या सोसायटीत पाच वर्षांपुर्वी एक वॉचमन भरती केला होता. मी महिनाभर कामाच्या गडबडीत त्याच्याकडे लक्ष द्यायला विसरलो. जाता येता तो सलाम करताना दिसायचा. एकदा गाडी पार्क करुन मी बाहेर आलो तेंव्हा सोसायटीचा सेक्रेटरी या वॉचमनची चांगलीच खरडपट्टी काढताना दिसला. काय झाले याची सहज चौकशी केली. सेक्रेटरीचे एव्हाना शिव्या देवून झाले होते. तो तणतणत गेला आणि मी त्या वॉचमनला सहानभुती दाखवायला त्याच्या पाठीवरुन हात फिरवला. त्या क्षणी त्याचा बांध फुटला. रडत रडत आपल्या केबिनकडे जाताना तो प्रेमचंदची काही वाक्य पुटपुटत गेला आणि मी चकितच झालो. पुढे या वॉचमनबरोबर मी कित्येक रात्री त्याने लिहिलेल्या कथा त्याच्याच तोंडून ऐकत जागवल्या. स्वतःच्या कवितेंना स्वतःची स्वतंत्र चाल लावून गायलेल्या अप्रतिम हिंदी काव्यरचना मला त्याने ऐकवल्या. त्याच्या नाटकांच्या कथानकांवर मी तास तासभर त्याच्याशी चर्चा केल्या. तिशीच्या आसपास असलेल्या या ‘वॉचमन’ने “सलाम मत करो यार” या माझ्या हट्टापुढे मान तुकवली, तरीही आमच्या सोसायटीतल्या एखाद्या बथ्थड डोक्याच्या व्यापाऱ्याला तो सलाम करतो तेंव्हा उगाच माझ्या काळजात काहीतरी तुटतं. 

दुपारच्या शांत वेळी मोबाईल वाजतो. स्क्रिनवर शब्बिरचे नाव पाहून मी फोन उचलतो. हॅलो म्हणायच्या आतच समोरुन सलाम येतो. या सलामला प्रत्युतर द्यायच्या आत शब्बिरचे सुरु होते “देखो साब, सातो दिन भगवानके, क्या मंगल, क्या पीर” त्याला मधेच थांबवून मी म्हणतो “ते माहितीय शब्बीर पण मी आज नाही येऊ शकणार जेवायला. आपण पुन्हा कधीतरी जमवू” हसून शब्बिर म्हणतो “साब दावत पे नही बुला रहा हू. गोश्त बिलकूल आपको चाहिए वैसा मिला है आज। मै निकाल के रखता हूं, पाच बजेतक आ जाना। वोह आपका पीरका मसला मत रखो सामने” गोश्तपेक्षा शब्बिर आज वेळ काढतोय म्हटल्यावर मी पाच ऐवजी साडेचारलाच दुकानावर पोहचतो. अशा वेळी दुकानात कितीही गर्दी असली तरी शब्बिर मला घेवून पलिकडच्या त्याच्या बंद गाळ्यात घेवून जातो व तेथे मग आमची बैठक बसते. हा शब्बिर व्यवसायाने खाटीक आहे. त्याची आठ दहा मटण चिकनची दुकाने आहेत. पण याचा खरा शौक आहे किचन. हा शौकीया खानासामा आहे. याच्या बरोबर राहून मला किचनमधली असंख्य गुपिते कळाली. अगदी कमी दर्जाच्या गव्हाच्या पिठाच्या रोट्या उत्तम गव्हाच्या रोटीसारख्या कशा बनवायच्या येथपासून ते आपण कांदा कसा कापतो यावर पदार्थाची चव कशी अवलंबुन असते येथपर्यंत त्याने अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकवल्या. एखाद्या सुगरण बाईचेही स्वयपाकात इतके लक्ष नसेल ईतके शब्बिरचे असते. लौकी की सब्जीपासून ते हलीम पर्यंत वाटेल ते पदार्थ बनवणाऱ्या शब्बिरला माझ्याकडचे वरण भात आवडते. पहिल्यांदा तो जेंव्हा माझ्याकडे जेवायला आला होता तेंव्हा वरण भाताच्या पहिल्याच घासाला ‘वाह’ म्हणायच्या अगोदर हा म्हणाला होता “भाभी हिंग फोडणीत नका टाकत जावू. हिंगाचे पाणी करुन ठेवा व ते वापरत जा” नंतर मात्र कौतूक करत तो तब्बेतीत वरण भात चेपून गेला. हिंग फोडणीत टाकलाय की वरुन टाकलाय हे पहिल्याच घासात ओळखणारा शब्बिर मग अगदी ‘फॅमिली फ्रेंड’ झाला. एखादा मुसलमानही रमझानची जेवढी वाट पहात नसेल तेवढी मी पहातो. याला कारण शब्बिरच्या बायकोच्या हातचे रोट व खुद्द शब्बिरच्या हातचे हालिम. मी अगदी जानेमाने खानसामे पाहिले. पण एकाच्याही हातच्या हालिमला शब्बिरच्या हातच्या हालिमची चव नाही. याच शब्बिरला घेवून मी मित्राच्या फार्महाऊसवर किंवा जवळच्या टेकड्यांवर कित्येकदा निहारीची हांडी लावलीय. सात आठच्या दरम्यान घरुन डब्बा घेवून जायचे. गेल्या गेल्या प्रथम टेकडीवर छान जागा पाहून जेवण उरकायचे. अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या की निहारीसाठी चुल पेटवायची. रात्रभर पकवलेल्या निहारीचा आस्वाद पुर्वेला जरा फटफटले की मग घ्यायचा. सुर्याच्या पहिल्या किरणांना आपली रिकामी ताटेच दिसायला हवीत. रात्रभर मारलेल्या गप्पा व पहाटे पहाटे शब्बिरच्या हातची खाल्लेली निहारी याचे वर्णन ‘स्वर्गसुख’ या शब्दातही करता येणार नाही. कितीवेळा मी शब्बिरबरोबर ही हांडी लावलीय पण प्रत्येकवेळी त्याचे काहीतरी प्रयोग सुरु असतातच. आज मी माझ्या घरी जी निहारी बनवतो त्याची पाककृती पाहून कुणी खानसामा नाक मुरडेलही पण कित्येक रात्री जागवून केलेल्या प्रयोगातून ही निहारी शब्बिरने सिद्ध केली आहे. त्यामागे त्याचा रियाज आहे. बुद्धिमत्ता आहे, कष्ट आहेत. घरच्या व्यवसायामुळे एम फिल करता करता राहीलेला शब्बिर जेंव्हा जे कृष्णमुर्तींवर बोलतो तेंव्हा हरखुन जायला होते. 

मी कधीही श्रद्धेचा, वारांचा आणि आहाराचा एकमेकांशी संबंध जोडत नाही, आणि मानतही नाही. त्यामुळे पहाटेच्या गार वाऱ्यात दोन पेग व्होडका झाल्यावर नल्ली निहारी खाता खाता शब्बिरच्या तोंडून उर्दूमधे जे कृष्णमुर्ती ऐकणे हा माझ्या आयुष्यातल्या मोजक्या आनंदांपैकी एक आनंद आहे.

आज निहारीची पाककृती द्यायची म्हणून लिहायला बसलो आणि विषय भलतीकडेच गेला. त्यामुळे पाककृती पुढच्या वेळी देईन, सध्या या रविवारी केलेल्या निहारीचा फक्त फोटो देत आहे.

लेखनकंटाळ्यामुळे लेखनसिमा.
😂😍🤤



बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

मुनियाचा खोपा

सुगरणींचा मोठा थवा जेंव्हा एखादे झाड निवडतो व त्यावर घरटी बांधायला सुरवात करतो तेंव्हा तेथे फार धांदल असते. एखाद्या बिल्डरच्या मोठ्या साईटवर जी अव्याहत गडबड उडालेली असते तेच दृष्य येथे असते. फांदी निवडने, मग घरटे बांधने, मादीला आकर्षीत करणे, अंडी, मग पिल्ले, त्यांचे पोषण, उडायला शिकणे, मग यथावकाश सगळ्या थव्यानेच कष्टाने बांधलेली ती वसाहत अगदी निर्मोही मनाने सोडून निघून जाणे हा सगळा प्रवास मी फार जवळून पाहीलाय. ज्या नरांना आळशीपणाने मादी मिळत नाही असे वेडे ब्रम्हचारीही मग या थव्यामागे निघून जातात. तेथून जाताना मग अशी मोकळी पडलेली वसाहत काही दिवस उदास करत रहाते. दिवाळी संपल्यानंतर किंवा आठ दिवसांसाठी आलेले जिवलग पाहूणे गेल्यानंतर घर जसं उदास वाटतं ना अगदी तसच या वसाहतीकडे पाहून वाटत रहातं. तोवर निसर्ग मस्त हिरवा झालेला असतो. इतर पक्ष्यांची वर्दळ सुरु होते आणि मग नकळत ही उदासी मागे पडते आणि मनावरुन झटकली जाते. तेथून जाताना मग या वसाहतीकडे फारसे लक्षही जात नाही.
असेच एकदा भल्या सकाळी त्या वसाहतीशेजारुन जात होतो. लक्ष अर्थातच आजूबाजूच्या झाडांवर होणाऱ्या हालचालींकडे होते. एक नजर या वसाहतीवरुनही फिरली. आणि मी क्षणभर थांबलो. पुन्हा दोन पावले मागे आलो. या समोरच्या पन्नास एक खोप्यांमधला एक खोपा हलके हलके झोका घेत होता. खरं तर सुरवातीला त्यात लक्ष देण्यासारखे काही वाटले नाही. मग झटकन डोक्यात प्रकाश पडला. सगळे खोपे (घरटी) अगदी शांत असताना हे एकच खोपटे का हलत असावे. एखादा वेडा ब्रम्हचारी अजुनही रमला असेल का? पण वसाहत खाली होऊन बराच काळ लोटला होता. असा ब्रम्हचारीही मागे रेंगाळणे शक्य नव्हते. एवढ्यात पुन्हा तो खोपा हलला व त्यातून काहीतरी फर्र आवाज करत वेगाने उडून गेले. एखाद्या ओसाड पडलेल्या गावातील झपाटलेल्या घराचे दार हलावे तसे दृष्य होते ते. विचार करुनही काही समजले नाही. मला वाटले एखादा चुकार पक्षी खोप्यावर बसला असेल. चाहूलीने उडाला असेल. मग वसाहतीचा नाद सोडला व पलीकडच्या शेताकडे निघून गेलो.
तासाभराने परतताना जेंव्हा मी त्या वसाहतीशेजारुन गेलो तेंव्हा सगळे विसरलोही होतो. आज काय पहायला मिळाले याचेच विचार माझ्या डोक्यात सुरु होते. इतक्यात पुन्हा त्याच खोप्यातून काही तरी उडाले. आता मात्र माझी खात्री झाली की नक्की काहीतरी वेगळे घडतेय. वेगळे या साठी की या अशा वसाहती मी कैक वर्ष पहातोय पण अशी हालचाल कधी पाहीली नव्हती. पक्ष्यांकडे कधी आवर्जून पहायची सवय नसल्याने कधी ते जाणवले नव्हते ईतकेच. आता गेले काही महिने सगळ्यां गोष्टींची नोंद ठेवायला सुरवात केल्याने अशा हालचाली सहज नोंदवल्या जात होत्या. जो कुणी पाहूणा त्या वसाहतीत आला होता तो तासाभरात दोनदा दिसल्याने एक गोष्ट लक्षात आले की उद्याही तो नक्कीच दिसेल. त्यामुळे मी खोप्याच्या जवळ न जाता घरी परतलो. दुसऱ्या दिवशी मी त्या वसाहतीजवळच निवांत बसून तासभर घालवणार होतो.
मी त्या खोप्यांपुढे येवून बसलो होतो. सुर्योदय नुकताच झाला होता. मी आल्यानंतर दहाच मिनिटांनंतर मला एक लहान पक्षी पलिकडील बाजूने खोप्यांकडे आलेला दिसला. नक्की कोण होता ते ओळखता आले नाही पण मला आता जागा सोडता येणार नव्हती. ईकडे तिकडे उडून तो कालच्याच खोप्याशेजारी येवून बसला. मी कॅमेरा झुम करुन पाहिले आणि माझा एकदम भ्रमनिरास झाला. ती पांढऱ्या कंठाची मनोली होती. (Indian Silver-bill) या मुनियांना मी नेहमीच सुगरणींच्या जुन्या घरट्यांच्या काड्या नेताना पाहीले होते. घरटे बनवन्यासाठी एकाच जागी मिळणारे असे मटेरिअल म्हणजे लॉटरीच. सुगरणींनी आधीच खुप बारकाईने निवडून आणलेल्या असतात या काड्या. त्यामुळे मुनियांना वेगळी निवड करावी लागत नाही. येथे उगाच अर्धा तास वाया घालवला असं वाटून मी ऊठणारच होतो पण अचानक लक्षात आले की या मुनियाला मी काल दोन वेळा व आज एकदा पाहीले होते. तिन्ही वेळेस ती इतक्या खोप्यामधील त्या विशिष्ट खोप्यावरच येवून बसली होती. माझ्या हेही लक्षात आले की काल घरी जाताना मी या मुनियाला घरट्याच्या आतून बाहेर पडताना पाहीले होते. जर काड्याच न्यायच्या असत्या तर ही मुनिया खोप्याच्या बाहेरील बाजूवरच बसली असती. कारण तेथीलच काड्या विस्कटलेल्या असतात. खोप्याच्या आतली बाजू तर घट्ट बांधणीची असते. या मुनियाचे काहीतरी वेगळेच चालले होते हे नक्की.
बाजूच्या फांदीवर बसलेल्या मुनियाकडे पहात असताना दुसरी एक मुनीया आली व अगदी सराईतपणे खालील बाजूने आत गेली. तिच्या तोंडात चक्क एक काडी होती. ती कधी बाहेर येतेय याची मी वाट पहात होतो तोवर बाजूच्या फांदीवर बसलेली मुनियाही आतमधे गेली. आता खोपा हलके झोका घेत होता. आत गेलेल्या मुनियांपैकी एक मुनिया खालील बाजूने मान काढून आजूबाजूला लक्ष ठेवावे तशी पहायला लागली. माझे डोके आता काम करेना झाले होते. इतक्यात एक मुनिया बाहेर येवून पुन्हा मघाच्याच फांदीवर बसली. जरा वेळाने दुसरी आली व दोघीही एकत्रच उडून दिसेनाशा झाल्या. मला पक्ष्यांचे वेड लहानपणापासूनच असले तरी रितसर पक्षीनिरिक्षण सुरु करुन मला सहाच महिने झाले होते. समोर जे दिसतय ते या अगोदर कधी पाहीले नसल्याने व फारशी ऐकीवातही नसल्याने अगदी वेगवेगळे तर्क लावूनही मला त्याचा अर्थ लागत नव्हता. जवळ जवळ अर्धा तासाने एका मागोमाग एक दोन्ही मुनिया पुन्हा आल्या. त्यातली एक पुन्हा बाजूच्या फांदीवर बसली व दुसरी आत गेली. मग मघाप्रमाणेच दुसरीही आत गेली. पुन्हा एक मान बाहेर काढून लक्ष ठेवू लागली व दुसरी आत काही काम करत राहीली. दिड तासात मी त्या जोडीला पाच खेपा घालताना पाहिले. त्यातल्या दोन वेळा एका मुनियाच्या चोचीत काडी होती. मी हे निरिक्षण सलग तिन दिवस केले. तिनही दिवस त्यांचा तोच क्रम होता. या तिन दिवसात मी नोंदवलेली अजुन एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे या दोन्ही मुनियांचे वागणे अगदी सुगरणींच्या जोडी सारखेच होते. सुगरण व मुनिया यांचा दुरान्वयानेही काही संबंध नाही हे मला माहित होते. काही पक्षी दुसऱ्या पक्ष्यांच्या अंड्यांमधे आपले अंडे घालतात, हे माहित आहे. काही पक्षी दुसऱ्या पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करतात हेही माहीत आहे पण एक पक्षी दुसऱ्या पक्ष्यांच्या वागण्याची का नक्कल करेल हे काही मला समजत नव्हते. मी नेटवर या प्रकाराची माहीती शोधायचा प्रयत्न केला तर मला काहीही माहिती मिळेना.
तिन दिवसांनंतर मात्र मला एकच मुनिया दिसायला लागली. याचा अर्थ मुनियाने खोप्यामधे अंडी दिली असावीत.
या सगळ्या प्रकारातून मी काढलेला अंदाज असा…
सुगरणींनी सोडलेल्या घरट्यातून काड्या न्यायच्या ऐवजी मुनियांनी ते घरटेच वापरायचे ठरवले असावे. एकदा घरटे वापरायचे ठरल्यावर मुनियाच्या जोडीने त्या खोप्याची बारकाईने पहाणी केली. नुकत्याच संपलेल्या पावसाने व वाऱ्याने जे काही नुकसान झाले होते ते त्या जोडीने आपल्या मनासारखे दुरुस्त केले. आतले मला पहाता आले नाही पण नर किंवा मादीने आतला भाग त्यांच्या मनासारखा बदलून घेतला असावा.
मुनियांचे घरटे अगदी अडचणीच्या ठिकाणी, एखाद्या काटेरी झाडावर कमी उंचीवर असते. त्यांनी ताब्यात घेतलेले सुगरणीचा खोपाही अतिशय अडचणीच्या जागी, बाभळीच्या झाडावर कमी उंचीवर होता. या साम्यामुळेही त्यांनी तो खोपा ताब्यात घेतला असावा.
रहाता राहीले त्या मुनियांचे वागणे अगदी सुगरणींसारखे का होते. तर त्याचा मी लावलेला अर्थ असा…
सुगरणीचा आकार असतो १५ सेमि व मुनियाचा आकार असतो ११ सेमि. म्हणजे बराचसा सारखा.
सुगरणींचा खोपा अशा पद्धतिने विणलेला असतो की त्यात ठरावीक पद्धतिनेच प्रवेश करता येतो. मुनिया जरी आत गेली तरी तिला त्याच पद्धतिने जावे लागले.
सुगरण खोप्यातून बाहेर मान काढून ज्या पद्धतिने लक्ष ठेवते तसे लक्ष ठेवण्यासाठी मुनियालाही तसेच बसणे भाग होते. खोप्याचा आकार लक्षात घेता त्यावर सुगरण बसली किंवा मुनिया जरी बसली तरी त्यांना एकाच लकबीने बसणे भाग आहे.
दोघांच्याही घरट्यांचा आकार जरी पुर्णपणे वेगळा असला तरी वापरले जाणारे मटेरिअल सारखेच असते.
सुगरण घरटे बांधण्यासाठी गवताची पाती आणते व मुनिया दुरुस्तीसाठी आणत होती, एवढाच फरक.
आणि मी दिड महिण्यांपुर्वीच सुगरणींचे खोपा बांधणे ते पिल्ले उडायला शिकणे हा पुर्ण प्रवास बारकाईने पाहील्याने त्याचा प्रभाव अजुन माझ्यावर होता.
या सगळ्यामुळे मला उगाचच मुनिया व सुगरणींच्या वागण्यात अतोनात साम्य वाटले होते.
मी या प्रकाराचा नेटवर फार शोध घेतला. विकीपिडियावर एका ओळीचा संदर्भ होता. त्या व्यतिरिक्त हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याच्या फक्त दोनच नोंदी मला आढळल्या. याचा अर्थ मला पांढऱ्या कंठाच्या मनोलींचे एक दुर्मिळ वर्तन पहायला मिळाले. नशिब म्हणतात ते हेच.
सुगरणीच्या खोप्यात बसलेली मनोली.

खोपा विणत असलेली सुगरण.

सुगरणींची वसाहत.


Share

आज्जी

दिवस कलला की आज्जी अंगणात बसायची. तुळशीवृंदावनाला टेकून, एक पाय मुडपून, दुसरा लांब करुन ती सप्पय टेकायची. शेजारी मोठी चाळण, आठवा-निठवा, सुप,...