❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, १४ मार्च, २०२२

रामस्वामी-१

एकदा संध्याकाळी रामरक्षेची तयारी करत असताना एक माणूस घरात आला. मी विचारलं कोण हवय तर ईतक्या अगम्य भाषेत बोलला की मला हसुच आलं. आतुन बाबा घाईत बाहेर आले. मी वात वळताना दोघांकडे पहात होतो. बाबांनी विचारलं “कोण हवय?” तो माणूस पुन्हा त्याच अगम्य भाषेत काहीतरी बडबडला. बाबा गोंधळले. हा कोण माणूस आहे?, याचं नक्की काय काम आहे आपल्याकडे? हा कोणत्या भाषेत बोलतोय? काही कळेणा त्यांना. मग त्यांनी त्याच्या छातीवर बोट ठेऊन हातवारे करीत म्हटलं “कोण आहेस तू? काय काम आहे?” मग तो माणूस स्वतःच्या छातीवर दोन्ही हाताची बोटे रोवत म्हणाला “रामस्वामी रामस्वामी” बाबा म्हणाले अरे आमचाही स्वामी रामच आहे रे. तु कोण? काय काम काढलय ईकडे? एवढ्यात आई चहा घेऊन आली. बाबांनी त्याच्यापुढे कपबशी धरत म्हटलं “चहा चहा.” आई म्हणाली “अहो त्याला भाषा कळत नाही आपली पण चहा कळणार नाही का? चहा चहा काय करताय” त्याने कपबशी हातात घेतली आणि नांद्री असं काहीसं पुटपुटला. आई गडबडली. अहो त्याला नकोय का चहा? आपण ऊगाच एखाद्याला संकटात कशाला टाकायचे? बहुतेक त्याला आईच्या एकून हावभावावरुन कळाले असावे काय गडबड झालीय. तो जोरजोरात मान हलवून म्हणाला “तॅंक्यू तॅंक्यू” मग त्याचा चहा संपेपर्यंत आई, बाबा आणि मिही एकदम शांत बसलो. चहा संपल्यावर त्याने कपबशी आत नेऊन ठेवायचा प्रयत्न केला. आईने त्याला तेथेच थांबवले व त्याच्या हातातून कपबशी घेतली. बाबांना म्हणाली “जाऊद्या हो याला. अगदी घरात घुसायला बघतोय मेला” मग बाबांची पुन्हा तिच कसरत सुरु झाली. कोण आहात तुम्ही? काय काम आहे तुमचे? हे दोन प्रश्न विचारताना बाबांनी केलेले हातवारे पाहून मला हसूच आवरेना. समोरचा माणूस चार वेळा छातीवर मुठ आपटून रामस्वामी रामस्वामी बोंबलत होता आणि बाबा म्हणत होते अरे हो रे आम्हीही रामाचे दासच आहोत. त्याच्या ईच्छेविन पान तरी हालते का सांग बरं? तुम्ही कोण? ईतका रामावर विश्वास आहे म्हणजे छानच असणार तुम्ही. पण काम काय आहे माझ्याकडे? मग त्या माणसाने डाव्या हाताची तर्जनी स्वतःच्या छातीवर ठेवून म्हटले ‘रामस्वामी’ आणि दुसऱ्या हाताची तर्जनी बाबांच्या छातीवर ठेवून प्रश्न विचारावा तसे हातवारे केले. तेंव्हा कुठे बाबांना कळले की तो नाव विचारतोय. मग बाबा विनाकारण स्वतःच्या छातीवर बोट ठेवत चार वेळा म्हणाले “मी रंगनाथ, मी रंगनाथ” मग त्यांच्या तासभर गप्पा चालल्या. आईने दोन वेळा चहा आणून दिला. बाबांना त्या माणसाला घालवून द्यायच्या सुचनाही देवून झाल्या तिच्या. पण बाबा छान रमले होते. तासाभराने तो मानूस गेल्यावर बाबा आत येऊन आईला म्हणाले “काय म्हणाला काही कळले नाही. मी काय म्हणत होतो ते त्याला कळले असेल असं वाटत नाही पण माणूस फार छान होता. मी माणसे ओळखायला चुकत नाही कधी” आईने फक्त मान हलवली. बाबा जे करतात त्यावर आईचा फार विश्वास. बाबा म्हणतायेत म्हणजे तो माणूस छानच असणार यावर आईचे मत ठाम. मधे पंधरा विस दिवस गेले. मग तो रामस्वामी पुन्हा एका माणसाला घेवुन घरी आला. या बद्रीचे फाट्यावर गॅरेज होते. तमीळी होता व मराठीही छान बोलायचा. मग बाबांचे व रामस्वामीचे बद्रीला मध्यस्त करुन बोलणे झाले. रामस्वामी विद्युत मंडळाचे टॉवर ऊभरण्यासाठी गावी आला होता. त्याला मराठी शिकायचे होते. कुणीतरी त्याला सांगीतले की तू गुरुजींकडे जा, ते ऊत्तम शिकवतील म्हणून तो बाबांकडे आला होता. त्याला मराठी शिकवावे असं त्याचे म्हणने होते. बाबा एका पायावर तयार झाले. तुही मला तमीळी शिकव बरं का असं म्हणत दुसऱ्याच दिवसापासून आमच्या मराठी शाळेत वर्ग घ्यायला सुरवात झाली. रात्री जेवणं ऊरकली की बाबांसोबत मी कंदील घेवून आमच्या शाळेत जायचो. तिथे हे पाच सहा जण निळ्या चौकडीच्या लुंग्या घालून फार ऊत्सुकतेने हातात पाट्या घेवून बसलेले असायचे. बाबा फळ्यावर अ आ ई लिहायचे व हे धडा व्यवस्थित गिरवतात की नाही हे मी कंदील घेवून पहायचो. ईतकी मोठी माणसे अ आ ई गिरवताना, चुकताना पहाताना मला फार गम्मत वाटायची. माझ्यासारख्या लहान मुलाला जे येतं ते यांना कसं जमत नाही याचं फार हसु यायचं. हळू हळू रामस्वामी मराठी बोलायला शिकला. लिहिता मात्र येत नसे. तुमचा क्ष किती अवघड आहे म्हणायचा. हायला त्याचे प्रत्येक तमिळ अक्षर रांगोळी काढल्यासारखे अवघड व वाटोळे असे. तरीही त्याला मराठीच्या क्ष ची भिती वाटायची. एकदा रामस्वामी घरी आला. आज बाजार आहे ना, चल आपण आईसोबत बाजारात जावू. म्हणून मागे लागला. बाबांनी त्याला किती वेळा सांगीतले की तिला वहिणी म्हण, काकू म्हण, ताई म्हण. पण त्याला ते काही कळत नसे. मी आई म्हणतोय म्हणून तोही आईच म्हणायचा. बाजारात या साठी की त्याला मराठी बोली भाषा कळेल. गमतीही करायचा. आई एखाद्या भाजीवाल्याबरोबर बोलताना “नको, फार महाग आहे” असं म्हणून तिच भाजी घेताना पाहून त्याला वाटले की नको म्हणजे द्या. मग तोही म्हणायचा ही भाजी नको, ती भाजी नको.त्याला म्हणायचे असायचे की ही भाजी द्या, ती भाजी द्या. मग हळू हळू तो छान मराठी बोलायला लागला. आमच्या मराठी शाळेसमोरच त्यांचे मोठमोठे कॅन्व्हासचे तंबू असायचे. बाहेर कितीही छान अल्हादायक हवा असली तरी या तंबुत नेहमी ऊकाडा असायचा. मी अनेकदा या तंबुत जाई. एक जव्हारीने विनलेली बाज, एक रेडीओ आणि चार जर्मलची भांडी असा संसार असे त्यात. आजुबाजूला पाचसहा लुंग्या वाळत घातलेल्या. मी गेलो की रामस्वामी “आव गुर्जी” म्हणून स्वागत करायचा. बटाटे व टोमॅटो घातलेला रस्सा व वर दोन ऊकडलेली अंडी घालून ढिगभर भात वाढायचा. काय सुरेख चव असायची त्याची. मग जेवून झालं की तो रेडिओची बटने फिरवून काहीबाही लावायचा. तंद्री लागायची त्याची ते ऐकताना. एकदा मी रामस्वामीकडे हट्ट केला की मला त्या टॉवरवर घेवून जा. तेथून जमिन कशी दिसतेय ते मला पहायचय. रामस्वामी अर्ध्या तमिळीत अर्ध्या मराठीत म्हणाला “ त्यात काय एवढं. ऊद्याच जावू तुला घेवून” मला रात्रभर झोप आली नाही. सकाळी त्याने हार्नेस आवळले माझ्या कंबरेभोवती आणि काहीतरी काम निघालं म्हणून एकटाच वर गेला. त्यानंतर पंधरा दिवस मी हार्नेस बांधत होतो पण रामस्वामीने मला कधीच टॉवरवर नेले नाही. पळ, खोटारडा आहेस तु असं म्हणून मी चिडलो तेंव्हा त्याने दिवसभर सुट्टी काढली आणि तंबुत बसुन त्याने त्याच तारेच्या काही तारा काढून ईतका सुरेख टॉवर करुन दिला की मी हरखूनच गेलो. एकदा घरी आला. ईडली खाल्लीय का तुम्ही असं विचारलं तेंव्हा आई म्हणाली ते काय असतं? मग त्याने तांदूळ भिजत घातले. दुसऱ्या दिवशी येवून ते पाट्यावर वाटले. त्याचा तो वरवंटा चालवणारा सराईत हात पाहून आई चकीत झाली. मग रितसर त्याने ईडली करुन खावू घातली तेंव्हा आम्ही सगळेच चकित झालो. हा पदार्थ कधीच खाल्लेला नव्हता. आणि आईच्याच किचनमधे बसुन हा रामस्वामी “आवडली का ईडली आई? अजुन घे दोन” असं म्हणत वाढत होता. आईला कधीही तिच्या किचनमधे कुणाची लुडबुड चालत नाही. आणि हा रामस्वामी तिच्याच किचनमधे तिलाच आग्रह करुन करुन वाढत होता. कालांतराने टॉवरचे काम पुर्ण झाले. रामस्वामी नंतर मुंबईला गेला. त्याचे दर आठवड्याला पत्र यायचे. सगळ्यांची ख्याली खुशाली विचारायचा. एकदा त्याचे पत्र आले की मी लग्न करतोय. आईची किती धावपळ. याला काय काय द्यायचे, काय काय घ्यायचे, मद्रासला जावे लागेल आता. ती तयारी वगैरे वगैरे. मग सहा महिने रामस्वामी संपर्कातच राहीला नाही. त्याचे लग्नही राहीले, त्याचे ते मद्रासला जावून गाव पहायचे राहीले. सगळंच राहीले. आई मधेच बाबांना म्हणायची “अहो कार्ड टाकून पहा त्याला. काय झालय काही समजत नाही. ह्या मुडद्यालाही कळत नाही का एखादे कार्ड टाकावे म्हणून” मग रामस्वामी मागेच पडला. फक्त आई त्याची आठवण काढायची मधे मधे. दिवाळी जवळ आली होती. अनारशाचे पिठ कुटण्यासाठी आई मागे लागली होती. अचानक दारात रामस्वामी ऊभा राहीला. “अहो बघा तरी कोण आलय” म्हणेपर्यंत बाबा रामस्वामीच्या मिठित सामावले होते. दोघेही रडत होते. जरा वेळाने रामस्वामीने बाबांना दुर केले व जादूगार जसा टोपीतून ससा काढतो तसे हळूच मागे ऊभ्या असलेल्या मुलीला पुढे केले. “आई, बायको” एवढंच म्हणाला. ती काळीसावळी, पोटरीपर्यंत केस असलेली, मोगऱ्याच्या फुलांनी मढलेली, तेजस्वी डोळे असलेली पोर पाहून आई हरखलीच. जरा म्हणून अक्कल नाही असं म्हणत ऊंबऱ्याच्या आत आलेल्या त्या दोघांना पुन्हा मागे ढकलत आई भाकरी आणायला आत गेली. तुकडा पाणी ओवाळून टाकल्यावर दोघे आत आले. त्या दिवशी रामस्वामी राहीला. सकाळीच “आई जरा काम आहे, हिला न्यायला दोन दिवसात येतो” म्हणत तो गायब झाला. रामस्वामीच्या बायकोला शुन्य मराठी, हिंदी, ईंग्रजी कळत होतं. रामस्वामी महिन्याभराने ऊगवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...