❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

गावाकडची माणसे - २

“ज्याला मुर्ख माणूस विचलीत करु शकत नाही तो खरा शहाणा” ही माझी शहाणपणाची व्याख्या आहे. बरं हे मुर्ख जागोजाग आढळतात. त्यांना खुमखुमीही असते वाद घालण्याची. तुम्ही डुकरांबरोबर वाद घालायला चिखलात ऊतरलात की त्यांना फार आनंद होतो. अर्थात अशा माणसांना मी टाळत नाही. जगात या लोकांईतका विरंगुळा दुसरा नाही. फक्त तुम्हाला आनंद घेता यायला हवा. अशीच एक वराहवृत्ती परवा भेटली. खरे तर पहाटेचा छान गारवा, आजूबाजूची पाचूसारखी शेती, आणि कानात हेडफोनवर कधी तलत तर कधी भिमेसेनअण्णा. अशा वेळी शक्यतो माझे आजुबाजूला चालणाऱ्या माणसांकडे फारसे लक्ष जात नाही. अगदीच कुणी ओळखीच्या माणसाने राम राम घातला तर ते तेवढ्यापुरते जरा थांबणं होतं. हा वराहावतार रोज मॉर्निंग वॉकला येत असणार. माझे आज लक्ष गेले ईतकच. मी सिम्बाला घेऊन चाललो होतो. हे महाशय समोरुन आले व अगदी फुटपाथच्या कडेने आम्हाला टाळून गेले. जाताना अगदी तुच्छ असा कटाक्ष टाकला आमच्याकडे. जणू काही आमचा स्पर्श झाला तर त्यांचा आख्खा जन्म बाटेल व जगभराच्या तिर्थांमधे स्नान करुनही तो बाट काही जाणार नाही. मी काहीही सहन करतो पण कुणी तुच्छ लेखलेलं काही मला झेपत नाही. माझ्या टाळक्यातला बुद्ध एकदम पद्मासन सोडून ऊभा राहीला व जटा सोडलेल्या जमदग्नीचा अवतार धारण करुन त्याने कमंडलूला हात घातला. काहीतरी सणसणीत शिव्या तोंडात येणार होत्या. पण एवढ्यात आठवले, अरे हा तर मस्त टाईमपास आहे. विरंगुळा, विरंगुळा. डोक्यातला बुद्ध गालात हसला. त्या माणसाचे माझे लक्ष वेधून घ्यायचे काम झाले होते. दुसऱ्यादिवशी मी त्याची वाटच पहात होतो. तोही आमची वाट पहात असावा. आम्हाला पाहिल्यावर त्याने घाईमधे रस्ता ओलांडला व पलिकडच्या फुटपाथवरुन चालायला सुरवात केली. हा नविन प्रकार होता आम्हाला तुच्छ लेखण्याचा. मी ही मग रस्ता ओलांडला व पलिकडे गेलो. मला रस्ता ओलांडताना पाहून महाशयांनी पुन्हा रस्ता ओलांडला व अलिकडे आले. मग मीही पुन्हा अलिकडे आलो. एव्हाना तो वराहवतार बराच जवळ आला होता. त्याने पुन्हा रस्ता ओलांडला. मग मी सिम्बाच्या हार्नेसमधुन लिश काढली व रस्ता ओलांडला. मी सिम्बाला मोकळे सोडलेले त्याने पाहीले. आता त्याला मागेही जाता येईना व पुढेही यायची हिम्मत होईना. मी खडूससारखा हसलो. पाहू किती वेळ हा कबड्डी खेळतोय ते. त्याने जरा विचार केला व रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या टपरीत तो घुसला. आज सुटला. मलाही आजच्यापुरती एवढी गम्मत ठिक वाटली. सकाळी पुन्हा पाहू म्हणत मी पुढे गेलो. पुढे दोन तिन दिवस झाले, हे महाशय काही दिसले नाहीत. कदाचित मी सिम्बाला मोकळे सोडले तर काय करायचं हे न समजल्यामुळे एक तर त्यांनी मॉर्नींग वॉकचा रुट बदलला असावा किंवा वेळ तरी बदलली असावी. माझी चांगली करमणूक गेली. 

माझ्या सोसायटीसमोरच एक महादेवाचे फार जुने मंदिर आहे. रोज शंखध्वनिने मला जाग येते. गॅलरीत ऊभे राहीलो की सकाळच्या कोवळ्या ऊन्हात तेजाने तळपणारा गाभारा दिसतो. आज महाशिवरात्र होती. मी पहाटेच छान धोतर वगैरे घालून दर्शनाला जाऊन आलो होतो. पिंडीला मनसोक्त कवेत घेतल्याने अगदी प्रसन्न वाटत होते. घरी जायचे मन होत नव्हते. मी सिम्बाला घेऊन सोसायटीच्या ओट्यावर बसलो होतो. हातात फुलांची तबके घेतलेली, कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेली भक्तमंडळी दर्शनाला येत होती. त्यांना पहायलाही किती छान वाटत होतं. मधे मधे शंखाचा नाद, घंटेचा आवाज व “शंभो हर हर” असे घोष ऐकायला येत होते. म्हादेवापेक्षा त्याचे भक्तगणच देखणे दिसत होते. माझी छान तंद्री लागली होती. ईतक्यात सिम्बा जोरजोरात भुंकायला लागला. मी मागे वळून पाहिले तर हातात फुलांनी भरलेले तबक घेऊन मॉर्निंग वाकला भेटणारे साहेब सोसायटीच्या पायऱ्या ऊतरत होते. सिम्बापासून जरा अंतर राखतच त्यांनी मला राम राम केला. मी ही हसुन प्रतिरामराम करत त्यांना शेजारी बसायची खुण केली. मंदिरातल्या रांगेकडे पहात ते माझ्या शेजारी टेकले. गर्दी हे कारण तर असावेच पण त्यांचा चेहराच सांगत होता की ते आज काहीतरी कुरापात काढणार आहेत. हातातले तबक व गडू खाली ठेवत त्यांनी फरशीवर पांढरा शुभ्र रुमाल अंथरला व आरामत बसले. क्षणभर आजुबाजूला पहात ते म्हणाले “काय म्हणतय तुमचं कुत्र?” माझा अंदाज खरा ठरला होता. त्यांना काय राग होता कुत्र्यांचा काय माहित. मी काही ऊत्तर द्यायच्या आत ते पुन्हा म्हणाले “काय मिळतं हो कुत्रं पाळून? ते काय दुध देते, शेण देते की लोकर देते? ऊगाच खर्च.” त्यांनी सुरवात केली होती, शेवट मी करणार होतो. मी हसत म्हणालो “नाय हो. ही अशी कुत्री पाळायची म्हणजे मोठ्या लोकांची कामं. आपल्यासारख्या नी कुठं कुत्री पाळून जमतं का? आता याच्या मुळे माझी रोजी रोटी चाललीय म्हणून ठेवलाय याला.” त्यांना अगोदर मी काय बोलतोय ते समजले नाही. मी जरा समजावत म्हणालो “हे पहा, आपल्या तालूक्यात बेण्याचे फक्त तिनच कुत्रे आहेत. बाकीच्या कुत्र्यांचे वयात यायच्या आधीच खच्चीकरण करुन घेतात. त्यामुळे याला चांगली मांगणी आहे. वर्षाकाठी पंधरा माद्या तरी येतात लावायला. एका मादीचे मी पंधरा हजार व एक नर पिल्लू घेतो. किती झाले?” कॅलक्युलेटरपेक्षाही गतीने हिशोब करत साहेब म्हणाले “२,२५,००० तर येथेच झाले. एक पिल्लू केवढ्याला जाते मग?” मी हसत म्हणालो “साधारण पंधरा हजार मिळतात एका पिल्लाचे. त्यात घरी माझ्या स्वतःच्या दोन माद्या आहेत. त्यांचे एक वेत किमान सहा ते आठ पिल्लांचे होते. म्हणजे सोळा पिल्ले वर्षाकाठी मिळतात. किती झाली पिल्ले?” आता मात्र साहेबांनी खिशातली डायरी व पेन काढले व हिशोब केला. “बाहेरच्या माद्यांची मिळालेली पंधरा व तुमच्या माद्यांची सोळा. चला पंधराच धरु. तरी सगळ्यांचे मिळून ४,५०,००० झाले. अगोदरच २,२५,००० धरले तर एकूण ६,७५, ००० झाले.” मी त्यांच्या डायरीत पहात म्हणालो “आता ही एवढी तिस पिल्ले आहेत, त्यातल्या किमान पाचसहा पिल्लांच्या कपाळावर चांद, किंवा पाय काळे किंवा फक्त शेपटीचे टोक काळे असा प्रकार असतो. असं पिल्लू तिस हजाराच्या खाली जात नाही. किती झाले आता?” आता लॅबच्या कपाळावर कप्पाळाचा चांद असतो? पण आज या साहेबांच्या धोतरात ऊंदीर सोडायचाच हे मी ठरवलच होतं. त्यानी पुन्हा हिशेब केला व मला आकडा सांगितला “७,७५,००० झाले हो” त्यांच्या आवाजात कमालीची ऊत्सुकता दिसली. “आता यात २५,००० अजून जोडा. पिल्लू दिलं की त्याच्या सोबत त्याची काही औषधे, जेवायचे भांडे गळ्यातला पट्टा, दोरी वगैरे भरपुर लटांबर असते. ते माझ्याकडेच घेते पार्टी. त्यात आता कोरोना कमी झाल्याने पुन्हा कुत्र्यांना मागणी आलीय. त्यामुळे पुढच्या आठवड्यात दोन माद्या अजुन घ्यायच्या म्हणतो आहे. बरं यांना खर्च काहीच नाही. सकाळी पातेलंभर भात व अंडी देतो. सध्याकाळी पाच सहा भाकरी केल्या की काम झाले. आठवड्यातून एकदा चिकन आणतो.” साहेबांनी मी विचारले नसतानाही हिशोब केला व म्हणाले “म्हणजे साधारण ६५, ००० रुपये महिना पडतो तुम्हाला? त्यात अजुन दोन माद्या घेतल्या तर ते वेगळे. ही आकडेमोड करताना त्यांचा चेहरा मुंगेरीलालसारखा दिसायला लागला होता. घरच्या म्हशींचे चार-पाणी करुन, शेणवारे करुन, भल्या पहाटे दुध काढून याच्या निम्मेही पैसे आपल्या मिळत नाहीत याचा हिशोब त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. डोळ्यात अगदी हरवल्याचे भाव होते. “चला येतो मी. यांची जेवायची वेळ झालीय” म्हणत सिम्बाला हाक मारली व घरी निघालो. मी गॅलरीत येऊन पाहीले तेंव्हा साहेब गेलेले होते. आता ते विचारांच्या नादात मंदिरात न जाताच मागे फिरले होते की मंदिरात दर्शनाला गेले होते हे काही मला दिसले नाही. मी त्यांच्या धोतरामधे यशस्वीपणे ऊंदीर सोडला होता. गावाकडीची माणसे बिलंदर असतात म्हणे. खरेच आहे ते. मी ही गावाकडचाच आहे शेवटी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...