❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

धुम्रवलयं

एकदा सकाळी देवापुढे दिवा व अगरबत्ती लावली की त्या दिवसापुरता माझा व त्याचा संबंध संपतो. दिवसभराच्या व्यवहारात कुठे ठेच लागली तर तेवढ्यापुरता तो आठवतो, नाही असं नाही. आज वात करायचा कंटाळा आल्याने त्याची समजूत काढायला दोन ऐवजी चार अगरबत्त्या लावल्या. दिवसभरात जे गुन्हे करणार आहे त्याची आघाऊ माफी मागून घेतली. खडीसाखरेची लाच दिली व आवरायला घेतले. आजचा अगरबत्तीचा धुर जरा वेगळाच वाटल्याने सहज लक्ष गेले. कदाचीत निरांजनाचा प्रकाश नाही व दोन ऐवजी चार अगरबत्ती असल्याने असेल पण आजचा धुर गहन, गुढ वाटला. मग एक दोन फोटो काढले, मनासारखे येईनात. मग अगरबत्तीचे स्टँड बेडवर घेतले. काही फोटो काढल्यावर कॉम्प्युटर टेबलवर ठेवले. तेथे काही फोटो काढल्यावर हॉलमधे येणाऱ्या उन्हाच्या तिरिपीत ठेवले.
काय सुरेख वलय उठतात या धुरातून. एखादी अगम्य लिपी असावी तशी अगदी नागमोडी, वळणदार व लफ्फेदार वलये. एक एक वेलांटी अद्भुत असल्यासारखी. उकार जणू काही पाताळ ढवळतील असे. असं वाटलं की मंत्रोच्चाराने एखादी भारलेली शक्ती जागी होते तशी ही लिपी जर वाचता आली तर एखादी धुम्रदेवता प्रकट होईल या वलयांमधून. कधी एखाद्या धबधब्यासारखा पण उलटा वाहणारा संथ, सलग धुराचा पडदा तर कधी आवेशाने फेकलेल्या सुदर्शनासारखी एका मागोमाग एक सरकणारी वर्तूळे. जितके या धुराच्या लिपीकडे पाहू तितके हरवून जायला होते. देवापुढे अगरबत्ती लावायच्या ऐवजी या अगरबत्तीलाच एखादी अगरबत्ती लावावी असं वाटतं कधी कधी.
मनासारखे फोटो तर मिळाले नाहीच पण अर्धा तास मात्र त्यात गेला. धुर का बंद झाला म्हणून पाहीले तर उदबत्ती संपलेली. अगरबत्तीचे स्टँड डस्टबिनवर ठेवलेले व डस्टबिनला खालून लँपशेडचा आधार दिलेला. स्टँडमधे आता फक्त विझलेल्या चार लाल पिवळ्या रंगाच्या काड्या. फोटोंच्या नादात मी देवापुढे लावलेल्या अगरबत्तीने सोफा, टेबल, लँपशेड, टिव्ही, झाडू व शेवटी तर डस्टबिनला देखील ओवाळले. हे पाहून तो देवबाप्पा एखाद्या दिवशी सरळ देवघरातून घंटी फेकून मारील माझ्या टाळक्यात हे नक्की. 😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...