❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

सहज जाता जाता - १

कधी दिवाळी सुट्टीसाठी गावी गेलो की पहिल्या एक दोन दिवसातच माझी शहरी वस्त्र उतरली जावून पुन्हा गावाकडली वल्कलं अंगावर दिसायला लागतात. सगळे मुखवटेही गळून पडतात. यात काही मानाचे, काही अहंकाराचे, काही अधिकाराचे असतात तसेच त्यात एक मुखवटा वयाचाही असतो. हे मागून घेवून, हट्टाने अंगावर घातलेले बेगडी मुखवटे गळून पडले की अगदी मोकळा श्वास घ्यायला मिळतो. आपण म्हणतो गावाकडची हवा शुद्ध असते. ते खरही आहे पण खरे तर हे मुखवटेच आपल्याला कधी छातीभरुन श्वास घेवू देत नाहीत. या मुखवट्यांना अनेक गोष्टींची ऍलर्जी असते. दिवाळीतल्या फटाक्याच्या धुराने या मुखवट्यांचे डोळे चुरचुरतात. होळीच्या रंगाने या मुखवट्यांची त्वचा खराब होते, दहीहंडीच्या गदारोळात हे मुखवटे चुरगळतात. पण एकदा हे मुखवटे काढून फेकले की मग मात्र फटाक्याच्या धुराचा वास आवडायला लागतो, कल्हईवाल्याच्या धुराचा वासही पुन्हा आवडायला लागतो. हे मुखवटे कधी आपल्याला उकळत्या आमटीच्या भांड्याजवळ नाक नेऊन तो वास छातीभर भरुन घेऊ देत नाही, बायकोचे कौतूक करु देत नाही. पण हाच मुखवटा गळाला की मग मात्र आपल्याला आईने स्वयंपाकघरात पालकच्या भाजीच्या पोटात दिलेल्या लसणीच्या कडकडीत फोडनीचा वास चार दालने ओलांडून अंगणातही येतो. कमाल असते या मुखवट्यांची. दिसत नाहीत पण लगाम फार घट्ट आवळतात ते. ते गळाले की मग मन चौखूर उधळायला मोकळे होते. पंगतीत बसलो की तर्जनी बाहेर काढून चार बोटांनी घास घ्यावा वाटतो. “मेल्या, अजुनही बोट चाळतो का जेवताना?” असं म्हणत थकलेली आई कौतूकाने लटके ओरडली की बरं वाटतं. अशा वेळी पंगतीतल्या पोरांच्या खुसखूस हसण्याचा राग येत नाही. उलट एक घास जास्तच जेवून आचवले की अंगणात रंगलेल्या या पोरांच्या क्रिकेटमधे बळेच घुसखोरी करायला मजा येते. “नेहमी प्रामाणिकपणे वागावे” हे मुलांना सांगणारे आपण जेंव्हा मुखवट्यावीना असतो तेंव्हा चिडीचे खेळूनही “आऊट नाय्ये” म्हणत तावातावाने भांडतो तेंव्हा मजा येते. ते भांडण काही लुटूपुटीचे नसते. तो आवेग खराच असतो. दुपारच्या वेळी जेंव्हा जरा निवांत जागा पाहून पोरं कॅरमवर पावडर टाकतात, डाव मांडतात. तेंव्हा त्यांना पावडरच्या नव्या कोऱ्या बॉक्सची लाच देवून त्यांच्यात सामील होताना फारसा त्रास होत नाही. तसेच अगदी ऐन वेळी क्विनसोबत कव्हर घेता आला नाही की हाताने सगळ्या सोंगट्या विस्कटून डाव मोडतानाही काही चुकीचे वाटत नाही. मुखवटे गळाले की खरच धमाल असते.
मागच्या वर्षी आम्ही असेच दिवाळीला गावी गेलो होतो. कधी तरी निवांत दुपारी जेवणं वगैरे उरकून माडीवर बाबांच्या खोलीत त्यांची अध्यात्मावरची पुस्तके चाळत बसलो होतो. त्यांनी काढलेली टिपने पहात होतो. अशा वेळी मला खरं तर भान रहात नाही. ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या ओवीचा मी लावलेला अर्थ व बाबांनी त्याच ओवीवरची काढलेली टिपने वाचताना नेहमीच ‘अरेच्चा’ व्हायला होते. बाबांच्या त्या डायरीत कधी काय सापडेल ते सांगता येत नाही. अशातच कानाच्या पाळीवर मागून कुणी तरी जोरात टिचकी मारली. मी दचकायला हवे होते पण अशी सवय कोणाला आहे ते माहित असल्याने मी मान न वळवताच “खड्यात जा तिकडे” म्हणत आनंदाने समोरची डायरी मिटली. सावकाश खुर्ची वळवली. आजही अगदी तशीच खट्याळ व गंभीर अशा दोन्ही भावांचे मिश्किल मिश्रण चेहऱ्यावर घेवून ती उभी. डोळ्यात तोच नेहमीचा अलीबाबाची गुहा सापडल्याचा चकीत भाव. बदल इतकाच की या दिवाळीत कानावरचे पांढरे केस व तब्बेत जराशी जास्त.
मी बाजूची खुर्ची तिच्याकडे सरकवत म्हणालो “नवरोबा नाही आला तुझा? आणि मुलाला का नाही आणले सोबत?
गळ्यावरचा न आलेला घाम पदराने पुसत ती म्हणाली “दादा आला होता सकाळी न्यायला. त्याच्यासोबत आलेय. नवरा गेलाय त्याच्या बहिणींना आणायला. मग त्याला कशाला उगाच जास्तीचा त्रास. आठ दिवसांनी येईल न्यायला.”
मी नुसताच हसलो.
ती हातातली बाबांची डायरी पहात म्हणाली “मी वर आले तेंव्हाच वाटले की तू नक्की काकांची डायरी उघडून बसला असणार. काय सापडले रे नवीन?”
मी डायरी कुरवाळत म्हणालो “अरे मी सुरवातच केली होती डायरी चाळायला तर तू टिचकी मारलीस. आता कसली वाचतोय डायरी!”
तिने डोळे मोठे करत मिश्किल आवाजात विचारले “तू दहाविला असल्यापासून ज्ञानेश्वरी वाचतोस, कंटाळा येत नाही का रे? आणि इतक्या वर्ष ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस विरक्तच व्हायला हवा. तू तर तसाच आहेस अजून लोभी” 
तिने लोभी शब्दावर विशिष्ट जोर दिला आणि मी चिडलोच. मी रागातच टेबलाचा खण बाहेर ओढला, त्यात डायरी ठेवली व आवाज करत धाडकन खण बंद केला. माझ्या चिडण्याचा तिच्यावर काहीच परिणार होणार नाही हे माहित असूनही माझा आवाज जरा वर लागलाच “असाच आगाऊपणा करणार असशील तर पाठीत गुद्दा घालीन हां. आताच सांगतोय.”
तिने खुर्ची जरा तिरकी करत म्हटलं “घाल पाठीत गुद्दा. मला तेच हवय”
मी चिडून म्हणालो “तुला हज्जारदा सांगितलय की मी ज्ञानेश्वरीकडे फक्त एक उत्तम साहित्यकृती म्हणून पहातो नेहमी. त्यातल्या अध्यात्माशी मला काही घेणे नाही”
तिनेही तितक्याच ठसक्यात उत्तर दिले “मी देखील तुला इतकी वर्ष तेच सांगतेय की जोवर ज्ञानेश्वरीतील अध्यात्मात तू रस घेत नाही तोवर तुला त्यातली एकही ओवी समजणार नाही, त्या ओवीतले काव्य तुला समजणार नाही”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...