❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

अण्णा

      परवा सहज मंगलकार्यालाया जवळून जाताना कानावरसनईचेस्वर पडले आणि नाकाभोवती अनेक वासांचा दरवळ आला. एकदम कळ दाबावी तशा खुप जुन्या आठवणी अचानक मनाभोवती पिंगा घालून गेल्या. काही काही वास माणसाच्या मनात कायमच्यावासकरून राहतात हे खरय. आणि ते एकटे कधी राहत नाहीत. आलेच तर सोबतीला अनेक आठवणी घेऊन येतात. चोचलेल्या काकडीचा वास येताना बरोबरसाग्रसंगीत सजवलेलं, डावं-उजवं निगुतीनं मांडलेलं, भाताच्या मुदीवर पिवळ्या धम्मक वरणाच्या सोबतीने ओघळणारे साजूक तूप असलेलं असं भरगच्च ताट घेऊन येतो. सनईचा स्वर कानावर आला की मला उगाचच भूक लागल्या सारखं होतं. गुलाबपाणी, अत्तरं, चुरगळलेल्या फुलांचे वास, नवीन कपड्यांच्या वासाबरोबर येणारा सेंटचा आणि घामाचा संमिश्र, पण हवा हवा वाटणारा वास, अशा अनेक सुगंधांना घेऊन सनईचा सूर येतो. जोडीला अस्ताव्यस्त गुलाबाच्या कळ्या, सकाळी व्यवस्थित अंथरलेली आता जागोजाग गोळा झालेली सतरंजी, पायाखाली येणारे भेटवस्तूंचे चकचकीत कागद, थकलेले पण अत्यंत समाधानी चेहरे असं बरंच काही डोळ्यापुढे उभं राहतं.

      कधीतरी अवचितहरे राम, हरे राम, राम राम हरे हरेचे स्वर कानावर येतात आणि मनात एकदम पंगतच उभी राहते. केळीच्या खांबांची कमान आठवते. तात्पुरत्या उभारलेल्या आडोश्यामागे उकळी आलेल्या आमटीचा वास पानासमोर लावलेल्या उदबत्तीच्या वासाशी लगट करून जातो. मीठ-लिंबू वाढण्यावरून दोन चिमुरड्यांनी केलेली कुरकुर ऐकू येते. वाढून होईपर्यंत चाललेलं खर्जातलं भजन ऐकायला येतं. मधेच अबीर-बुक्याचा वास रुंजी घालून जातो. हातभर लांब केळीच्या पानाखाली झाकलेल्या प्रसादाचा गोड वास छातीत भरून घ्यावा वाटतो. हळदी-कुंकवाने माखलेली, उजव्या हाताला किंचित डाव्या हाताचा आधार दिलेली ओंजळ आठवते. त्या ओंजळीत भटजींनी, स्पर्श होणार नाही याची काळजी घेत पळीने टाकलेलं, छान मधाळ पंचामृत आठवतं आणि मग उगाचच अस्वस्थ व्हायला होतं.

      काही वास मला अजिबात आवडत नाहीत पण त्यांचा पदर धरून येणारया आठवणी मात्र अंगावर मोरपीस फिरवतात. लाईट आल्यानंतर आपण विझवलेल्या मेणबत्तीच्या वातीचा जळकट वास मला सहन होत नाही. पण तो वास आला की माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आमचं देवघर. भिंतीत असलेला दोन खणाचा कोनाडा म्हणजे आमचं देवघर. वरच्या खणात सर्व देव असायचे, आणि खालच्या खणात किरकोळ सामान. म्हणजे वातीचा कापूस, देवांची वस्त्रे, उदबत्तीचा डबा, चंदन उगाळायची छोटी सहाण आणि चंदनाचं अर्धवट उगाळलेल खोड, आणि असचं बरंच काही. माझे वडील, आम्ही त्यांनाअण्णाम्हणत असू, संध्याकाळी देवघरासमोर बसून दिव्याची वात वळायचे. वातही अशी सुरेख करायचे, एका जाडीची, लांबसडक आणि नाजूक. वात वळताना तोंडाने रामरक्षा चालू असे. आजही ती रामरक्षेचीअनुष्टुभछंदातली लयबद्ध चाल आठवते. अण्णांच्या आजूबाजूला कोंडाळं करून आम्ही बसत असू. बाजूलाच पोळ्या करीत बसलेली आईही मधे मधे आपला किंचित किनरा आवाज अण्णांच्या आवजात मिसळत असे. वात वळून झाली की अण्णा निरांजन स्वच्छ करायला घेत. तोपर्यंत त्यांची रामरक्षा संपूनभीमरूपी महारुद्रासुरु झालेलं असे. भीमरूपी नंतर मग अण्णा त्यांच्या सद्गुरूंच्या नावाचा जयजयकार करीत देवापुढे नतमस्तक होत. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर असणारे भाव, डोळ्यात दाटून आलेली व्याकुळता आजही आठवली की गलबलून येतं. त्या वेळी अण्णांची ती ठेंगणी, सावळी, मुर्तीसारखं तरतरीत नाक असलेलीमूर्तीखुप सुंदर दिसे. मग अण्णा खडीसाखरेचे चार चार दाणे प्रत्येकाच्या हातावर ठेवत आईला पानं घ्यायला सांगत. नऊ-साडे नऊ पर्यंत अंथरुणे पडत. सगळ्या घरात देवासमोरच्या निरांजनाचा फिकट, सोनेरी उजेड भरून राही. मग कधीतरी मी अर्धवट झोपेत असताना निरांजनातील तेल संपे. विझलेल्या वातीचा वास येई आणि अर्धवट झोपेतच असताना परत एकदा देवाला मनातल्या मनात हात जोडून मी झोपी जात असे.

     मला आवडणारा अजून एक वास म्हणजे तंबाखूचा. पण लहानपणी मला तो आवडायचा. कारण तो माझ्या सगळ्यात लहान काकांच्या अंगाला यायचा. आजही तंबाखू किंवा तपकिरीचा वास आला की मला काकांची ती अंगणातून मारलेली खणखणीत आरोळी आठवते. आठवते म्हणजे अक्षरशः कानावर येते. असं वाटतं, की आता काका दार उघडून आत येतील आणि आईला म्हणतीलवाहिनी, तव्यावर काहीतरी परत गं, खुप भूक लागलीये. दादा आले की भाता ऐवजी पिंडे खावे लागायचे.”
काका तसे वृत्तीने खुप बंडखोर. पण अण्णांना घाबरायचे. बहुतेक म्हणूनच घाबरत असावे. अण्णा घरात असले की ते अगदी सुतासारखे वागत, पण एकदा अण्णांची पाठ फिरली की त्यांच्या नाकातली जणू वेसणच निघत असे. पण अण्णांनी त्यांच्यावर खुप प्रेम केलं. आम्हा मुलांची त्यांना कधी काळजी नाही वाटली, पणयाचं कसं व्हायचं?’ म्हणून खुप वेळा चिंता करत बसायचे. तसा आमच्या घराचा आणि चळवळीचा काही संबंध नव्हता. पण काका म्हणजे वादळ; एके दिवशी संध्याकाळी घरी आले तेच खुप गंभीर होऊन. सरळ देवघरासमोर गेले आणि साष्टांग नमस्कार केला. मग आईच्या आणि नंतर अण्णांच्या पाया पडले. “दादा, तू आहेस, मला काळजी नाही.” असं काहीसं पुटपुटले आणि कातरवेळच्या अंधुकशा प्रकाशात मोठ मोठ्या टांगा टाकत अदृश्य झाले. त्या नंतर मला काकांचं दर्शन झालं ते आजोबांच्या क्रीयाकर्माच्या दिवशी. दोन दिवस थांबले, आणि मग जे गेले ते आजतागायत दिसले नाहीत.

      अण्णांचा खुप दरारा होता असं काही नाही, पण त्यांचं व्यक्तिमत्वच असं काही होतं की त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती वाटायची. अण्णा गावातीलच शाळेत शिक्षक होते. महिन्याला मिळणारा पगार ते स्वीकारायचे आणि घरी आणून द्यायचे म्हणून त्याला नोकरी म्हणायचं. नाहीतर अण्णांनी शिकवण्याचं काम एक व्रत म्हणूनच केलं.निवृत्तीपर्यंत आणि निवृत्तीनंतरही. सरकारी नियमानुसार ठराविक वयानंतर ते निवृत्त झाले पण त्यांच्यातला शिक्षक मात्र कधीही निवृत्त झाला नाही.

      पण वर्षातले दोन आठवडे मात्र अण्णा खऱ्या अर्थाने निवृत्त व्हायचे. वर्षातून दोन वेळा आमच्या आजोळी सप्ताह असे. दत्तजयंती आणि गुरुपौर्णिमा. आठ दिवस अखंड नामस्मरण चाले. शेवटचा दिवस काल्याचा म्हणजे महाप्रसादाचा असे. काल्याचे कीर्तन होऊन सोहळ्याची सांगता होई. मीही अण्णांबरोबर जात असे. एकही दिवस शाळा बुडउ देणारे अण्णा या आठ दिवसात मात्र दांडी मारायची परवानगी देत. आठ दिवस सुट्टी हा आनंद तर असेच पण महत्वाचं म्हणजे आम्हा भावंडांवर करडी नजर ठेवणारे अण्णा या आठ दिवसात मात्र मलादेवाला वळू सोडवातसं सोडत असत. मग माझं खाणं-पिणं, झोपण्याची व्यवस्था काय, कुठे जातो, काय करतो कशाकडेही त्याचं लक्ष नसायचं. खरं तर अण्णांचं या आठ दिवसात कुठेच लक्ष नसायचं. हे वर्षातून दोनदाच मिळणारऔटघटकेचं स्वातंत्र्यउपभोगायला मजा तर वाटायचीच पण त्याहून अण्णांच्या या अलिप्तपणाची जास्त भीती वाटायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत, आमच्या बरोबरचल्लस आठखेळताना उलट्या पाटावर खडूने आखलेल्या पटावर अर्ध्या चिंचोक्यांनी दान टाकणारे अण्णा खुप जवळचे वाटायचे, आपले वाटायचे, आवाक्यातले वाटायचे. पण या आठ दिवसातले अण्णा मात्र खुप दूरचे, आवाक्याबाहेरचे, परके वाटायचे. हातातून सुटतायेत की काय असं वाटायचं. ही भावना मात्र, का कोणास ठाऊक, पण अजूनही मला अधून मधून छळते. ते लहानांबरोबर लहान होतच पण मोठ्यांबरोबरही ते लहान होऊनच वागत. प्रत्येकाबरोबर त्याला समजून घेणारे, त्याच्या पातळीवर जाऊन बोलणारे अण्णा, पण मला मात्र त्यांची खरी पातळी, योग्यता नाही कळली कधी. त्यांना मी सदैव माझ्याच पार्ड्यातून तोलायाचा प्रयत्न करीत राहिलो. माझे वडील असूनही ते सदैव मला अगम्यच राहिले. सप्त्याचा शेवट होई कीर्तनाने. मी कैकदा कीर्तन ऐके, बऱ्याचदा नाहीही. पणकरा क्षमा अपराधही भैरवी सुरु झाली की मी कीर्तनाच्या मंडपाकडे धावे. आठ दिवस, चोवीस तास याच्या त्याच्या खांद्यावर विसावणाराविणाखाली ठेवायची वेळ झालेली असे. या वेळेस वीणा अण्णांच्या हातात असे. मंदिराच्या दारासमोर पायघड्यांसारखी लांब सतरंजी अंथरलेली असे. सतरंजीच्या दुतर्फा श्रोत्यांची गर्दी असे. सगळं वातावरण गंभीर आवाजातल्या नामोच्चाराने भारलेले असे. सतरंजीच्या एका टोकाकडून अण्णा मंदिराच्या गाभाऱ्याकडे अतिशय सावकाश गतीने पुढे सरकत असत. मुखाने अखंडश्रीराम जय राम जयजय रामचालू असे. पाणावलेले डोळे मिटलेले असत. सगळ्यांची त्यांच्या पाया पडण्यासाठी गर्दी उसळे. एखादी लेकुरवाळी आपलं लहान पोरगं त्यांच्या पायावर ठेवि. अण्णांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावरच जानवे की ते या जगात नाहीच मुळी. कोण पाया पडतय, काय म्हणतय कशाचंही त्यांना भान नसायचं. मला हे दृश्य नेहमी डोळे भरून पाहावसं वाटे पण प्रत्येक वेळी डोळे भरल्या मुळे पहाताही येत नसे. हे सर्व पहाताना तेथून खुप दूर पळून जावं वाटे पण पाय हलत नसत. त्या वेळी मला का भरून यायचं माहित नाही, पण एकदम पोरकेपणाची भावना जागी व्हायची हे मात्र खरं. आपले मनोव्यापार बऱ्याचदा आपल्यालाच कळत नाही हेच खरं.

      मला जे अण्णा आठवतात ते असे. नंतरचं मला फारसं काही आठवत नाही. पाटी पुसून टाकावी तशा मधल्या काळातील आठवणी एकदम पुसल्यासारख्या झाल्यात. नंतर जे काही आठवतंय ते काही फारसं सुखद नाही. अण्णा आपल्या हातातून सुटतात की काय असं वाटत असताना मीच अण्णांच्या हातातून केंव्हा सुटलो, दूर गेलो माझं मलाच कळलं नाही. एका घरात राहून अण्णां आणि माझ्या मधे मैलोगणती अंतर निर्माण झाले. अर्थात हे माझ्याकडूनच. अण्णांना याची सुरवातीला कल्पनाही नसावी. हे आज लक्षात येतं. पण कालांतराने हे अंतर वाढतच गेलं. अण्णांनाही हे जाणवलं असेल. लहानपणी आज्जीने एक गोष्ट सांगितली होती. लांडगा शेळ्यांच्या कळपाजवळ येऊन एखाद्या शेळीकडे टक लाऊन पहातो. नंतर ती शेळी आपला कळप सोडून सोडून त्या लांडग्याच्या मागे मागे जाते. म्हणूनच म्हणतात ना लांडग्याला शेळी धार्जिण. माझही तसचं झालं. रानभूल पडल्यासारखा मी भटकतच राहिलो. भूल पाडणारे लांडगे बदलत राहिले इतकचं. पण माझा स्वत:चा असा जोकळपहोता तो सुटलाच. तसंही लांडग्यामागे जाणाऱ्या शेळीला तरी आपला कळप परत कुठे दिसतो म्हणा. पण सगळ्या गोष्टींचा इतका सर्वांगाणे विचार करणारे अण्णा, पण त्यांच्याही ही साधी गोष्ट लक्षात का आली नसावी की लांडग्यामागे जाणाऱ्या शेळीलाच खरी कळपाची गरज असते. आणि त्याच वेळी कळपाची किंमत कळते. दैव सुद्धा फार पाताळयंत्री असतं. तुमच्या जवळ जे असतं त्याची किंमत ते तुम्हाला कळून देत नाही, पण एकदा का ते तुमच्या हातातून निसटलं की ते तुम्हाला येवून सांगततुमच्या हातातून काय सुटलं, काय गेलं.’ मग ते सांगतं तुमचंस्वत:चंअसं हेच होतं आणि आता ते तुमचं नाही. तुमचं होणारही नाही. धत्... “त्या नाम दैवहे त्यावेळेस कळतं. अनुभवासारखा शिक्षक नाही हे शाळेत शिकलो होतो, पण त्या शिक्षकाची फी एवढी जबरदस्त असेल हे नव्हतं माहित.

या शिक्षकाला दिलेल्याफीविषयी परत कधीतरी सांगेन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...