❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

वसंतराव

साल आठवत नाही. कॉलेजचे दिवस होते ईतकं सांगीतलं तरी पुरेसं होईल. 'ईंजीनिअरकेलं की पोराचं आयुष्य मार्गी लागतं, आणि बोर्डींगला किंवा होस्टेलला पोरगं ठेवलं की त्याला शिस्त लागते असं आई-बापांना वाटायचा काळ होता तो. आई-बापही भाबडे होते त्या काळी. त्या मुळे आमची रवानगी सहाजीकच ईंजीनिअरींगला आणि बाड-बिस्तरा होस्टेलला जाऊन पडला. गाव, शाळा सुटलेली. शहर, कॉलेजची ओळख नाही. त्या मुळे सुरवातीच्या दिवसात कॉलेजच्या आवारात आणि सुट्टीच्या दिवशी पुण्याच्या अनोळखी रस्त्यांवरुन 'मोरोबासारखा चेहऱा करुन निरर्थक भटकायचो. मोरोबा म्हणजे आमचा घरगडी. निव्वळ शुंभ. त्याला कितीही आणि काहीही काम सांगीतलं की तो वेंधळ्यासारखा मान हलवत हो-हो म्हणायचा आणि काम करताना मनाला येईल तिच आणि तेवढीच कामे करायचा. वडीलांनी त्याला का ठेवला होता कुणास ठाऊक. बहुतेक आम्हाला द्यायला एक शिवी जास्त म्हणून त्याची नियुक्ती असावी. आमच्या हातून काही वाह्यातपणा घडला की ते चिडत. वडील चिडले की त्यांचा आवाज चढत नसे पण त्याला विशिष्ट धार चढे. मग ते ओरडत "मोऱ्या, गाढवा देव अक्कल वाटत होता तेंव्हा काय शेण खायला गेला होतास का?" त्यांचा आवाज ऐकूण आतमधे माझा आणि अंगणात मोरोबाचा चेहरा भेदरुन जाई. जणू काही खरच देव अक्कल वाटताना मी शेण खायला गेलो होतो आणि मोरोबा मला वाढायला आला होता. खुपदा "मोऱ्या" म्हणून वडील ओरडले की ते मला ओरडले की मोरूला ते समजायला वेळ लागत असे. पण कॉलेज आणि हे नविन शहर पाहीलं की वाटायचं, या पेक्षा वडीलांचा राग आणि मोऱ्याची शुंभ संगत परवडली. बरं होस्टेलवर तरी जरा बरं वाटावं? पण तिथेही 'सिनिअर्स' नावाच्या प्राण्यांचा वरचष्मा. त्यांच्याशी जमवून घ्यायचं म्हणजे त्यांचा 'बारक्या' व्हायचं. "बारक्या, सिग्रेटी आण", "बारक्या, पानपट्टी आण" "बारक्या, बिअर आण" हे चालवून घ्यायचं. जरा बुड टेकलं की यांची ऑर्डर सुटलीच. तेही करायला हरकत नाही. पण हे सगळं मैत्रीत नाही, गुलामासारखं. आपल्या बापाच्यान काही हे जमेना. हळू हळू लक्षात आलं की मी एकटाच नाही या चक्रात अडकलेला. ईतर गावावरून आलेल्या मुलांचीही काही फारशी वेगळी स्थिती नाहीए. मग कळत नकळत आम्हा 'गावकऱ्यांचा' एक ग्रुप तयार झाला. एकमेकांना आधार मिळाला. पुण्यातल्या मुलामुलींचे कपडे पाहून स्वतःच्या कपड्यांची लाज वाटेनाशी झाली. गावाकडचा इरसालपणा जागा झाला. शेतातल्या मातीतली रग डोकं वर काढू लागली. आत्मविश्वास वाढला. मुळात होताच. हरवलेला परत सापडला ईतकंच. पुण्यातल्या मुलांमधे खरंतर काही दम नाही हे जाणवलं. आणि मग आम्ही यथावकाश होस्टेलला सरावलो, कॉलेजला निर्ढावलो

'कॉलेजचे दिवस' म्हणजे कॉलेजचेच दिवस. त्याला दुसरी ऊपमा नाही. कशानेही भाराऊन जायचं वय आणि झपाटून टाकणारा चित्रकलेसारखा विषय, त्यामुळे वर्षभर प्रत्येकजण कशाने ना कशाने तरी भारावलेला किंवा झपाटलेलाच असायचा. "विचारांना ठाम दिशा मिळाल्याशिवाय आपल्याला रंगांमधून पुरेपुर व्यक्त होता येत नाही" असं कुठं वाचनात आलं की कुणी 'विवेकानंद वाचायला घ्यायचा, तर कुणी "भुकेने कळवळल्याशिवाय चित्रात वेदना ऊतरत नाही" असं कुठल्याशा पुस्तकात वाचुन चार-चार दिवस ऊपाशी रहायचा प्रयोग करी. आज मागे वळून पहाताना वाटतं "अहा! काय मजेचे दिववस होते ते आयूष्यातले!" कोणती गोष्ट गांभीर्याने घ्यावी आणि कोणती सहज याची त्यावेळेची आमची गणिते फार फार वेगळी होती. आयूष्याच्या मधल्या काळात एकदम बदलून गेली. आणि आज परत तिच खरी वाटायला लागली आहेत. असो. तर होस्टेलची आणि आमची काही पत्रीका जुळली नाही त्यामुळे आम्ही कॉलेजच्या जवळच एक फ्लॅट भाड्याने घेतला. एक प्रश्न तर सुटला पण दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न बाकीच होता. शिक्षणाच्याच काय कोणत्याच निमित्ताने कधी गाव सोडलं नव्हतं आजवर. त्यामुळेखायचे हालफक्त कादंबऱ्या आणि मोठ्या लोकांची आत्मचरीत्रे वाचूनच माहीत होता. पण जेंव्हा मेस नावाची ओळख झाली आणि वैतागलो. महिनाभरात किमान तिन मेस बदलल्या. वजन किलोभराने तरी कमी झालं असावं. मेसला भरलेले पैसे तिन वेळा वाया गेले ते वेगळेच. वर्गात बसलेलो असलो तरी डोक्यातआज जेवणाचं काय?’ हाच प्रश्न असायचा. मग रोज एका मित्राबरोबर गेस्ट म्हणून त्याच्या मेसला जेवायला जायचो. वाटलं, एक तरी आवडेल. पण छे. मित्रही मला वैतागले होते. अशातच एकाने सांगीतलंईथे जवळच एक अन्नपुर्णा नावाची मेस आहे. कुणी जास्त फिरकत नाही तिकडे पण बघ प्रयत्न करुन. तेवढी एकच खानावळ राहीलीय आता.” त्याच दिवशी मी अन्नपुर्णा शोधत गेलो. फारसं कठीण गेलं नाही. अन्नपुर्णा चांगलीच नावाजलेली होती. मला कळेना मित्र का टाळतात ही मेस ते. अन्नपुर्णेसमोर ऊभा राहीलो. चांगला ऐसपैसे बैठा बंगला होता. समोर छान मेहंदीचं कुंपण होतं. कुंपणाच्या आत तिन चार पुर्ण वाढलेली बदामाची झाडे होती. छोटसं पोर्च होतं. पोर्चच्या पुढील भागात पितळी अक्षरातअन्नपुर्णालिहिलं होतं. म्हणजे अन्नपुर्णा हे बंगल्याचं नाव होतं तर. मला वाटलं, मी चुकून भलतीकडेच आलो. पायऱ्या उतरून पोर्च मध्ये गेलो. नेहमीपेक्षा जरा जास्तच रुंद असलेलं सागवानी दार पुर्ण ऊघडंच होतं. बेल वाजवावी की नको याचा विचारच करत होतो ईतक्यात एका पन्नाशीच्या स्रीने आवाज दिलाया, आत यामी निमुट आत गेलो. डाव्या बाजूला सोफा, टिव्ही, सेंटरटेबल वगैरे होतं तर ऊजव्या बाजुला साधारण दहा जण बसतील असा डायनिंग टेबल होता. मी सोफ्यावर बसलो होतो ईतक्यात आतुन दुसरी एक पन्नाशीची स्री बाहेर आली. गोरी पान, चंदेरी केस, तू प्रसन्न हसु, चेहऱ्यावर एक आपुलकीचा भाव. मला तर त्या पहाताच आवडल्या. खुप दिवसांची ओळख असावी अशा आवाजात त्यांनी विचारलंकाय काम होतं बाळ?” मला समजेनाच की मेस बाबत कसं विचारावं? कारण मी ज्या हॉलमध्येा बसलो होतो तो पाहून हे लोक सधन असणार हे कळत होतं. शोकेसमध्ये बरेच कप, बक्षिसे, पदकं, सन्मान वगैरे ठेवले होते. मित्रांनी फिरकी घेतली की काय? मी चाचरत म्हणालोनाही, कुणी तरी खोडसाळपणे खानावळ म्हणून हा पत्ता दिला होता. त्या मुळे आलो होतो. माफ करा.” मी ऊठायच्याच तयारीत होतो ईतक्यात त्या म्हणाल्याजेवायला येणारेस का तू? कधी पासून? बरं तू असं कर, पहिल्यांदा दोन घास खावून घे मग बोलू.” त्यांनी आत पाहूनयमूताईम्हणून हाक मारली. यमूताई बाहेर आल्या. “याचं पान वाढाम्हणत त्या मला म्हणाल्यातू जेव पोटभर मग बोलूमी निमुटपणे ताटावर बसलो. यमूताईंनी जेवण वाढलं. माझा गोंधळ अजून वाढला होता. समोरच्या ताटाकडे पाहीलं. अत्यंत साधे पदार्थ दिसत होते. पण वाढलं फार सुंदर होतं. एका वाटीत आमटी, एकात भाजी, कोशींबीर, चटणी आणि घडीच्या पोळ्या. भुक लागलीच होती. विचार केला पहिल्यांदा जेवून घेऊ. काय होतय ते नंतर पाहू. पहिला घास घेतला आणि जाणवलं, हेच तर शोधत होतो. किंचीत चिंच-गुळ टाकलेली आमटी, भाजी कसली होती ते आठवत नाही, चोचवलेल्या काकडीची कोशीबींर आणि मऊ पोळ्या. जेवण झालं. असं वाटलं की खुप दिवसांनी जेवलो. तिथे बाजूलाच ठेवलेली बडीशेप खात होतो तोच काकू आल्या. त्यांनी विचारलंआवडलं जेवण?” मी मान डोलावली. त्यांनी सकाळची आणि संध्याकाळची वेळ सांगीतली जेवणाची. मी हो म्हणून निघालो. पैसे किती होतील, सुट्टी असते का, किती खाडे हिशोबात धरता वगैरे काही विचारायचं सुचलच नाही. सरळ फ्लॅटवर आलो आणि तानून दिली. जेवणाची तृप्ती अनूभवत राहीलो. ही माझी आणि काकूंची पहिली भेट. हा बंगला मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं व्यक्तीमत्वगजानन सरपोतदार यांचा. पुना गेस्ट हाऊसही त्यांचेच. काकू हौस म्हणून मेस चालवायच्या. त्यामुळे प्रत्येक पदार्थ हा मायेने बनवला, वाढला जायचा. ब्राम्हणी पध्दतीचे जेवण असल्याने मराठी पोरे तिकडे फारसी फिरकत नसत. याच मेस मध्ये माझी आणि अण्णांची पहिली भेट झाली. अण्णा म्हणजे मराठी चित्रपटातले कसलेले नट वसंत शिंदे. आणि मग ही ओळख वयाच्या मर्यादा पार करत जिवलग मैत्रीध्ये बदलली. अण्णा पडद्यावर जेवढे मिश्किल होते त्याच्या कैक पटीने जास्त ते प्रत्यक्ष आयुष्यात मिश्किल होते. आजही त्यांची आठवण आली तर चेहऱ्यावर पहिल्यांदा हसू फुटते आणि मग डोळ्यात पाणी ऊभे रहाते. याच फार मोठ्या कलाकाराच्या आठवणी सांगण्यासाठी हा लेखप्रपंच. पण आज ईतकच पुरे. आठवणी पुढच्या लेखात पोस्ट करेन.

                                            

आतासातो दिन भगवानके, क्या मंगल क्या पीरअसं असलं तरी कॉलेजच्या काळात शुक्रवारी संध्याकाळीचरविवारचढायला लागायचा. आणि त्याचा हॅंगओव्हर मंगळवारपर्यंत टिकायचा. (वेगळा अर्थ काढू नका.) यादीच फार मोठी असे. रद्दीची दुकाने पालथी घालणे, पेपरची कात्रणे काढणे, अप्पा बळवंतला जावून ऊगाचंच पुस्तकांच्या दुकानात पुस्तके चाळणे, मित्राच्या रुमवर तबला-पेटी घेऊन मैफील रंगवणे. (कुणी काही म्हणो, आम्ही तिला मैफीलच म्हणायचो) शंकरच्या स्टुडीओत जावून मातीशी खेळणे असल्या अनेक भानगडी असायच्या. त्यामुळे कॉलेजच्या कामासाठी खऱ्या अर्थाने दोनच दिवस मिळायचे. बुधवार आणि गुरुवार. रविवारी जाग यायची तिच पसाऱ्यात. पुस्तके, मासीके, कलर ट्युब, कॅन्व्हास, रद्दी, लिहायचे कागद, खेळायचे पत्ते, बुद्धीबळाचा पट, प्यादी. काही विचारू नका. एकदा कॉलेजच्याच कामासाठी दोन दिवस मुंबईला जावं लागले होते. मी आणि मित्र गेलो. दिवसभर काम करुन रात्री हॉटेलच्या खोलीवर आलो. दमलो होतो. पण झोप लागता लागेना. जागा बदलामुळे असेल असं वाटलं. सकाळी डोळे चोळतच कामावर गेलो. रात्री पुन्हा दमुन-भागून खोलीवर आलो. पुन्हा तोच प्रकार. झोप काही येइना. मित्राच्या अचानक काहीतरी लक्षात आलं. तो उठला आणि त्याने चादरी जमीनीवर फेकल्या. बॅग्ज अस्ताव्यस्त केल्या, पाण्याचे ग्लास इकडे तिकडे टाकले. खोलीत मनसोक्त पसारा केला. मग मात्र एकदम घरी असल्यासारखं वाटलं आणि झोपही शांत लागली. लग्नानंतर माझी ही सवय बदलायला बायकोला फार संयमी प्रयत्न करावे लागले. तर ते असो

रविवार होता. घाई नव्हतीच. सगळ्या कामांची गोगलगाय झाली होती. दुपारपर्यंत कसं बसं आवरुन अन्नपुर्णावर हजर झालो. या आठ दिवसात अन्नपुर्णा म्हणजे दुसरं घरच झालं होतं माझं. “यमुताईअशी हाक मारतच मी बुट काढले आणि आत येवून माझ्या खुर्चीवर कुणी बसलं नाही ना हे पाहून घेतलं. ही एक काय सवय लागलीय कॉलेजच्या दिवसापासून समजत नाही. एका विशिष्ट खुर्चीवर बसुनच जेवायचं. सगळा टेबल मोकळा असला आणि त्या खुर्चीवर कुणी बसलं असेल तर त्याचं होईपर्यंत थांबायचं. पण तिथेच बसुन जेवायचं. मी खुर्ची ओढून बसलो. रविवार असल्याने मेस रिकामीच होती. जेवताना काही चाळायला हवं म्हणून मी पुस्तकांच्या कपाटाकडे वळलो तर तिथे ठेवलेल्या वेताच्या खुर्चीवर तब्बेतीने किरकोळ पण भारदस्त व्यक्ती बसलेली. पायघोळ धोतर, मलमलची शुभ्र बंडी, करड्या रंगाचं जॅकेट, डोक्यावर फरची टोपी आणि हातात शिसवी काठी. कुठल्या तरी जुन्या मराठी चित्रपटातील पाटील मळ्यात जायच्या ऐवजी चुकून ईकडे आले की काय असं वाटावं असा सगळा जामानिमा. त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत होतं की यांना कुठेतरी पाहिलय. खुप जवळून ओळख आहे आपली. पण काही लक्षात येईना. कुतुहलाने मी परत मागे फिरलो आणि खुर्चीवर येवून बसलो. त्यांना याची दखलच नसावी. खुर्चीच्या पाठीवर त्यांनी मान टेकवली होती. दोन पायांच्या मध्ये ऊभी धरलेली काठी हाताने फिरवणं चाललं होतं. इतक्यात यमुताई बाहेर आल्या. त्यांचं त्या व्यक्तीकडे लक्ष जाताच त्या आत पाहून जरा जोरात म्हणाल्याबाई, अण्णा आलेत होआणि त्यांनी मला वाढायला घेतले. तोवर काकूही बाहेर आल्या. त्यांच्या हातात पाण्याचं तांब्या-फुलपात्र होतं. ते त्यांनी समोरच्याच सेंटर टेबलवर ठेवलं. काकूंनी स्वतः पाणी आणले म्हणजे  मानूस मोठा असणार याचा अंदाज आला
काकूंनी विचारलंकसा झाला कार्यक्रम अण्णा? आणि घरी जावून आलात की सरळ ईकडेच आलात?”
त्यांनी डोळे ऊघडून काकूंकडे पाहीलं आणि तोंडभरुन हसत म्हणालेऊत्तम
काय गोड हसला म्हातारा म्हणून सांगू! मी तर एकदम खुश झालो त्यांच्यावर. त्यांनी तांब्यातलं सगळं पाणी संपवलं. गळ्यातल्या ऊपरण्यासारख्या लांब पांढऱ्या कापडाने मिशा पुसल्या आणि म्हणालेनाही, सरळ ईकडेच आलो. बाबू गेलाय सामान घेऊन घरी. मीही अंघोळ करुन येतो. मग घेतो या यमूचा आणि तिच्या चपात्यांचा समाचार. कसं?” ते ऊठले आणि बंगल्याच्या मागील दाराकडे काठी टेकवत निघालेही. तोवर यमुताईंनी वाढलं होतं. मी जेवताना विचारलंकोण आहेत हे काकू?” काकू म्हणाल्यातू ओळखलं नाही? कमाल आहे! अरे हे अण्णा. वसंतराव शिंदेपहिल्यांदा माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. माझा चेहरा पाहून काकू म्हणाल्यामीच वेंधळी, तुझी ओळखही करुन नाही दिली. अरे चित्रपटात काम करतात ते वसंत शिंदे. जेवण झाल्यावर थांब जरा. ते येतीलच थोड्या वेळात.” मी आश्चर्यचकीत झालो. वसंत शिंदे म्हणजे माझा आवडता कलाकार. त्यांचा पडद्यावरचा वावर ईतका सहज असे, बोलणं ईतकं विनोदी आणि मिश्कील असे की आम्ही चक्क शिट्ट्या वाजवायचो. पण प्रत्यक्ष त्यांना पाहील्यावर मात्र ओळखलं नाही. जेवण झाल्यावर मी तिथेच टेबलवर पडलेले पाण्याचे चार थेंब बोटाने एकमेकांना जोडत वेळ काढायला सुरवात केली. तोवर अण्णा आलेच. डोक्यावर रेशमी पांढरे केस, बनशर्ट आणि पायजमा. शांतपणे खुर्ची ओढून बसले. समोरचं ऊलटे ताट सरळ करुन समोर घेतले. चौपात्रातुन चटणी, लोणचं व्यवस्थीत वाढून घेतलं. यमुताईंनी फक्त चपाती वाढली. ती घेऊन वाटीमध्ये अगदी बारीक चुरली. आणि माझ्याकडे पाहून म्हणालेनमस्कार! जेवण व्हायचय का आपलं?” मी म्हणालोआत्ताच झालं तुम्ही यायच्या अगोदरआवाज ऐकून काकू बाहेर आल्या. त्यांनी स्वतःच्या हाताने भाजी वाढली. वाटीत आमटी वाढली. आणि माझी ओळख करुन दिली. मग अण्णांनी कोण, कुठले, आडनाव काय वगैरे सगळं विचारुन घेतलं. शांतपणे जेवण ऊरकलं आणिऊद्या भेटूचम्हणत गेलेही. ही अण्णांची आणि माझी पहिली औपचारीक ओळख. मग अण्णांविषयी बरीच माहीती मिळाली. त्यांचा अन्नपुर्णा शेजारीच बंगला होता. तिथे ते एकटेच रहात. मुलांबरोबर त्यांचे सुर काही जुळले नाही. जेवायला ते रोज अन्नपुर्णावरच येत. मराठी चित्रपट, नाटक पुर्ण बदललेलं. तो बदल काही त्यांना मानवेना. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष केलेलं. वाचन, जुने मित्र हाच त्यांचा विरंगुळा. आमच्या मेस मध्ये मुले कमी होती. आणि जी होती ती मेडीकलची. त्यांना अवातंर वाचन, कला, कलाकार, मौज-मस्ती दुरुनही माहीत नसे. असले तरी वेळ नसे. सुरवातीला अण्णांनी त्यांच्याबरोबर मैत्री करायचा प्रयत्न केलाही. पण ते तेवढ्यावरच राहीलं. मग अण्णा मेसमध्ये येत, जेवत, थोडा वेळ बसत आणि घरी जात. पण दोन-चार भेटीत अण्णांची अन माझी जी तार जुळली की विचारू नका

माझी जेवताना अडचन व्हायची ती ईतर मुलांमुळे. चपातीला पोळी म्हणायचं, वाढा ऐवजी घाला म्हणायचं, चपाती  वरणात बुडवून तिन बोटांनी खायची, आमटीच्या वाटीत पाचही बोटे बुडवून ती थोडी थोडी भातावर घेवून खानं हे काही मला जमेना. आणि त्यांच्या समोर चपाती मस्त चुरुन भरपुर आमटी घेवून कुस्करली की त्यांच्या तोंडावरकुठून आलाय हा कोणास ठावूक!” असा भाव येई. त्यामुळे मी बरेचदा त्यांचं आटोपलं की जेवायला बसे. पण अण्णा आले आणि चित्र बदललं. अण्णांची आणि माझी जेवायची पद्धत एकच. तेही चपाती चुरुन छान काला करुन चवीने जेवत. हळूहळू लक्षात आलं की गप्पांचे विषयही सारखेच. एकदा जेवताना पुलंचं पुस्तक वाचत होतो. अण्णा आल्यामुळे पुस्तक बाजुला ठेवलं आणि त्यांच्यासमोर ताट सरकवलं. त्यांनी विचारलंकाय वाचतोय रे?” मी सांगीतलं. हसुन म्हणालेतुला या भाईची एक गम्मत सांगतो. काय झालं, भाईने नाटक करायची टुम काढली.” अशी सुरवात करुन त्यांनीतुका म्हणे आताया पुलंच्या फक्त तिनच प्रयोग झालेल्या नाटकाच्या आठवणी सांगीतल्या. अशा वेळी जेवताना खरकटा हात वाळून जायचा. मग काकू ओरडायच्या. ओशाळल्यासारखं करत आम्ही जेवायला सुरवात करायचो.
दादा कोंडकेंचा पिक्चर लागला की कोणता लागला आहे हे पहाता आम्ही दुपारच्या शोला प्रभातला हजर. पोटभर हसुन संध्याकाळी पोट भरायला अन्नपुर्णा. आता माझ्याबरोबर अजुन दोन मित्रांनीही मेस सुरु केली होती. अण्णांना कधी ऊशीर झाला तर आम्ही आणि आम्हाला ऊशीर झाला की अण्णा वाट पहात थांबायचे जेवणासाठी. आता आताशी मेडीकललाही आमच्या गोंधळाचा अंदाज आणि कंटाळा आल्याने ते लवकर जेवण ऊरकून आम्हाला टेबल (रान) मोकळं करुन देत. मग दुपारी पाहीलेल्या अण्णांच्या विनोदी भागाची ऊजळणी व्हायची. त्या एका ओळीच्या विनोदामागे शुटींगच्या वेळी झालेला मोठा विनोद अण्णा रंगवून सांगत. आणि मग जो साताच्या वर मजले हास्यस्फोट व्हायचा की सांगायची सोय नाही. अशा वेळी काकूही बाहेर येवून म्हणतअण्णा, मलाही कळूद्या तुमचा नविन चुटकूलासांगण्यासारखा असेल तर आमच्यापैकी कुणीतर सांगे. नसेल तर अण्णा मिश्किल हसुन म्हणतसेन्सॉर आहेआणि अण्णांचे बरेच विनोद हे सेन्सॉरच असत. ते ईथेही सांगायची सोय नाही.

अण्णांनापुण्यभुषण पुरस्कारजाहीर झाला. आम्हाला पत्ताही नाही. चार दिवस बोलणी चालली होती. कार्यक्रम कसा, कुठे, केंव्हा करायचा याचा. अण्णा अशा बाबतीत अगदी ऊदासिन असायचे. ठरल्याप्रमाणे बालगंधर्वला कार्यक्रम पार पडला. अण्णा निर्विकारपणे गेले, हार-तुरे, पुरस्कार वगैरे स्विकारलं, दोन औपचारीक शब्द बोलून अन्नपुर्णावरच आले. जेवायला वेळ होता पण आम्ही ऊगाचंच तासभर अगोदर येवून सोफ्यावर बसुन वेळ घालवत होतो. ईतक्यात बाबू आला. हातात मानचिन्ह, मोठा हार, गुच्छ वगैरे सेंटर-टेबलवर ठेवून निघून गेला. थोड्या वेळाने पोर्चसमोरच रिक्षातुन अण्णा ऊतरले. आत आले आणि नेहमी सारख्या आमच्या गप्पा सुरू झाल्या
मी सन्मानचिन्ह पाहून विचारलंअण्णा, कुणा मुर्खाला पुरस्कृत केलय पुणेकरांनी आज कुणास ठावूक” 
अण्णा हसुन नाटकातला संवाद म्हणावा तसे म्हणालेतो मुर्ख तुझ्यासमोरच बसलाय बेटा.”
मी जिभ चावली. म्हणालोकाय अण्णा, सांगायचं नाही का? आम्ही आलो असतो कार्यक्रमालाअण्णा म्हणालेअरे काय सांगायचं? साधी चहा बिस्किटे देखील नव्हती. मग काय ऊपयोग तुम्हाला सांगून.” असे अण्णा. मग आम्ही एकदम मागनी केली. “अण्णा, ते काही असो. तुम्हाला पुरस्कार मिळालाय म्हणजे आता पार्टी हवी म्हणजे हवी.” अण्णांनी बराच टाळायचा प्रयत्न केला. कारणे सांगीतली. पण आम्ही काही सोडत नाही म्हटल्यावर काकूही म्हणाल्याअण्णा, मुलं ईतकी आग्रह करतायेत तर द्या की पार्टी. आपण गेस्ट हाऊसला सांगू हवं तर.” शेवटी अण्णा तयार झाले. खिशातुन पाकीट काढत काही पैसे माझ्या हातात देत म्हणालेमार्केटयार्डमधून छानशी हापुसची पेटी घेवून ये ऊद्या.” दुसऱ्या दिवशी मस्त आमरस, पुऱ्या, पालक-पकोडे, थालिपिठ असा जंगी बेत जमवून आणला यमुताईंनी. संध्याकाळी छान पंगत बसली. ताटं सजली होती. आम्ही अण्णांनाही सजवलं होतं. फरची टोपी वगैरे. मग अण्णा त्यांच्या जागेवर बसले. शेजारी मी. मी म्हणालोअण्णा, कार्यक्रम घरगुती असला तरी ऊत्सवमुर्तींनी काहीतरी बोलल्याशिवाय काही शोभा नाही पंगतीला.
अण्णा हसले, ऊभे राहीले आणि म्हणालेधन्यवाद! आज तुम्ही माझा रस काढलातआणि पुढचं वाक्य हसण्याच्या कल्लोळात हरवून गेलं.

                                        

मध्यंतरी माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले. वहिणीला घेऊन तोही पुण्यामध्ये आला. मी आणि मित्र शिवनेरी अपार्टमेंट मध्ये फ्लॅट घेऊन रहात होतो. माझ्या समोरचा फ्लॅट मित्राचाच होता. विषेश म्हणजे रिकामाच होता. मी दादाला तिथेच यायला सांगीतलं होतं. वहिणीने खुप आग्रह करुन देखील मी जेवायला अन्नपुर्णालाच जात होतो. दादा-वहिणीला हे समजत नव्हते की घरचे अन्न सोडून मी मेसमध्ये का जातोय. मीही समजून सांगायच्या भानगडीत पडलो नाही. त्यांच्या समाधानासाठी मी सकाळचा चहा वहिणीकडे घेत होतो पण मित्रांसोबत रहाणे आणि अन्नपुर्णाला जेवणे काही माझ्याच्याने सुटले नाही. अभ्यासाव्यतीरीक्त माझा दिवस एक तर मित्रांसोबत फ्लॅटवर नाहीतर अण्णांच्या बंगल्यावर जायचा. अण्णांच्या बंगल्याचा हॉल जणू काही माझी आवड लक्षात घेवूनच सजवला होता. सगळीकडे पुस्तकांचा पसारा, फोटो, कुठल्या कुठल्या जुन्या वस्तू. मन क्षणात निवांत होवून जाई. भिंतीवर अण्णांच्या आईचे पोर्ट्रेट होते. चंद्रकांत यांनी काढलेले. (सुर्यकांत-चंद्रकांत मांढरे या बंधूपैकी एक) ते फार सुंदर चित्रे काढत. दिव्याची काजळी वापरुन. हा माझ्यासाठी नविनच प्रकार होता अर्थात. अण्णांबरोबर बोलायला कसल्याही विषयाचं बंधन नसे, वयाचा अडसर नसे. विषय निघता निघता अण्णा फार पाठीमागे जात. त्या आठवणी ऐकणं म्हणजे अद्भूत गोष्टी ऐकण्यापेक्षा कमी नसे. प्रसंग साधेच असत पण मला एकदम अनोळखी दुनीयेत घेवून जात. बाबांच्या (भालचंद्र पेंढारकर) बरोबर पहिल्यांदा काम केलं तेंव्हा अण्णांना गणपतीची भुमीका करायची होती. तोंडावर गणपतीचा मुखवटा घालून अण्णांनी एन्ट्री घेतली आणि काही वेळातच त्यांच्या लक्षात आलं की सोंडेच्या आत विंचू आहे. मग जी काही धमाल ऊडाली ती अण्णा हसत हसत सांगत. पण ऐकताना माझ्या अंगावर काटा येई. अण्णांना मी कधी गंभीर पाहीलच नाही. आता वय झालं होतं. तोंडातल्या सगळ्या दातांनी रजा घेतली होती. बाहेर अण्णा दातांची कवळी वापरत. पण घरी असले की काढून ठेवत. त्यावेळेस ते अगदी लहाण मुलासारखे दिसत. हसतही फार निर्व्याज. कुठल्याही गोष्टीवर मिश्किल टिपणी करत. कधी कधी त्यांचा विनोद कमरेखाली घसरे. पण तो त्यांना शोभून दिसे. त्यात अश्लील काही वाटत नसे. एकदा मित्राच्या चित्रांचे प्रदर्शन होते बालगंधर्वला. त्याने मला गळच घातली की ऊद्घाटन अण्णांच्याच हस्ते करायचं आहे. तू काहीही करुन अण्णांना तयार कर. मी अण्णांना सांगीतलं. ते लगेच तयार झाले. ज्या दिवशी ऊद्घाटन होतं त्या दिवशी सकाळी मी बंगल्यावर गेलो. अण्णा तयारच होते. मी म्हणालोजरा थांबा अण्णा, मी रिक्षा घेवून येतोतर म्हणालेनको रिक्षा, तुझ्या फटफटीवरुन जावूबरं एकदा त्यांचं ठरलं म्हणजे ऐकण्याशिवाय मार्ग नाही. निघालो. अण्णा मस्त बाईक रायडींगचा आनंद घेत होते. ईतक्यात एक रिक्षावाला नको ईतक्या वेगाने शेजारुन गेला. मीही गडबडलो. तोंडात लगेच शिवी आली पण ती हासडायच्या अगोदर अण्णा म्हणालेअऽरेऽऽ बाराच्या!” रिक्षाचा नंबर MH 12 AR xxxx असा काही तरी होता. त्यावर ही कोटी. जिभ हवी तेंव्हा, हवी तशी वाकडी वळवायचे. खरं तर अण्णांच्या आठवणी लिहायच्या म्हणजे आठवणी टाळायलाच जास्त लागतात. कारण त्यांच्या तोंडातली वाक्य प्रत्यक्ष ऐकताना फार निर्मळ वाटली तरी ईथे लिहायची म्हणजे फार अवघड आहे.

अण्णा विनोदी, मिश्किल, कधी कधी चावट असले तरी वागण्यात मात्र खुप शिस्त असे. जेवायची वेळ सहसा दहा बारा मिनिटांपेक्षा जास्त कमी जास्त होत नसे. कपडे नेहमी टापटीप असत. चेहऱ्यावर कधी दुर्मूखलेला, रागावलेला भाव नसे. रोज दाढी केलेली असे. जेवणाचं ताट लख्ख करीत. एवढंही खरकटे सांडलेलं त्यांना खपत नसे. माझा चुलत भाऊ संगमनेरला ईजिनिअरींग करत होता. होस्टेलला रहायचा. मेसही होस्टेलचीच होती. माझ्या मेसविषयी आणि अण्णांविषयी ऐकून त्याने हट्ट धरला की माझीही ओळख करुन दे अण्णांबरोबर. मग एक दिवस शनिवार-रविवारची सुट्टी पाहून तो पुण्यात आला. संध्याकाळी त्याला घेवून मी अन्नपुर्णावर गेलो. अण्णा वाट पहात होते. आम्ही जेवायला बसलो. माझा भाऊ म्हटल्यावर अण्णांनी खुप ऊत्साहात त्याच्याबरोबर गप्पा मारायला सुरवात केली. आम्ही पाच-सहा जण होतो. जसं जसं जेवण ऊरकत होतो, बाबू ताटे ऊचलून नेत होता. पण जोवर अण्णा ऊठत नाही तोवर कुणी टेबलावरुन ऊठायचाच नाही. गप्पांमध्ये सहभागी होत बसुन रहायचा. भावाचेही जेवण झाले. त्याने ताटात हात धुतला तेंव्हा त्याच्या ताटात थोडी भाजी, आमटी-भात तसाच होता. अण्णानी विचारलेहे हो काय? तुम्ही ताटात अन्न तसेच ठेवलेभाऊ म्हणालात्याचं काय आहे अण्णा, होस्टेलच्या मेसमध्ये जेवतो रोज. त्यामुळे ऊष्ट्याची सवय आहेअण्णा आवाजातला खेळकरपणा तसाच ठेवत म्हणालेअहो तुम्हाला ऊष्ट्याची सवय आहे हे अगोदर नाही का सांगायचं. आम्ही सगळ्यांनी तुमच्यासाठी थोडं थोडं ऊष्टे ठेवले असते ताटातअण्णांना जावून आज ईतकी वर्षे झाली पण भावाचं त्यांच्या विषयीचं मत अजूनही तेच आहेखडूस होता म्हातारा. तुझं कसं काय जमायचं त्यांच्या बरोबर कोण जाणेज्यांनी ज्यांनी अण्णांना वर वरुन पाहीलं त्यांचं असच काहीसं मत असणार त्यांच्या विषयी.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...