❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, ३० एप्रिल, २०१८

फसता फसता जमलेली गोष्ट

       मी शक्यतो मंगळवारी कोणतही महत्वाचे काम करत नाहीकाही तरी सुचलेलं लिहूण काढणे किंवा फुटपाथवरील पुस्तकांचीरद्दीचीएमपी३ची दुकाने धुंडाळणेजुन्या बाजारात भटकणे किंवा एखाद्या मित्राला सरप्राईज व्हिजीट देणे याच भानगडीत दिवस जातोबऱ्याच जणांना वरिलपैकी एकही गोष्ट आवडत नाहीपण माझ्याकडे असलेल्या अनेक दुर्मीळ गोष्टी याच सवयीतुन मला मिळाल्यातया मंगळवारी मी अति ऊन्हामुळे बाहेर जायचे टाळले होतेघरीच पुस्तके विषयवार लावलॅपटॉपची सफाईबॅकप घेयात गुंतलो होतोइतक्यात बेल वाजलीमी डोअर आय मधुन पाहीले तर मित्र हात हलवत होताआता हे साहेब कशाला आले? असं वाटलंकारण दोन-तिन पुस्तके जाणार हे नक्कीपण दार ऊघडल्यावर मात्र प्रसन्न वाटलंकारण त्याच्या हातात बटरस्कॉच आणि अफगान ड्रायफ्रुट आईस्क्रीमचे फॅमीली पॅक होतेमी तोंडभर हसुन मित्राचे स्वागत करुन त्याला घरात घेतलंबायकोने दिलेले पाणी पिऊन “वहीनी पाणी मस्त झालतं हां!” सारखा रटाळ विनोद करुन हा मला पुस्तके वगैरे आवरायला मदत करायला लागलाहाकेच्या अंतरावर रहात असूनही हा प्राणी काही काम असल्याशिवाय सहसा माझ्याकडे फिरकत नाहीपण बराच वेळ झाला तरी हा ईकडच्या तिकडच्याच गप्पा मारत होताखरंतर हा पेशव्यांच्या साडेतीन शहाण्यांपैकीच एक व्हायचापक्का मुत्सद्दीएकदम बोलघेवडासगळ्या विषयांवर बोलायची कला साधलेलाकधी कुणाला शब्दात गुंतवील ते समजणार नाहीत्यामुळे मी सावध होतोपण माणूस मोठा दिलदारआम्हाला जोडणारी तार म्हणजे खाणेवाचणे आणि किशोरी अमोणकरयातल्या एकएका विषयावर आम्ही रात्र जागवू शकतो

  आम्ही सगळी पुस्तके व्यवस्थित लावून झाल्यावर बाहेर आलो. आईस्क्रीमचे दोन्ही फ्लेवरचे एक एक चांगले लठ्ठ स्लाईस कापुन डिशमध्ये घेतले आणि सोफ्यावर पुढच्या गप्पा सुरु केल्या. लहाणपणी घरी बनवलेली आईस्क्रीम, शाळेपुढे मिळणारी वडाच्या पानावरची कुल्फी, म्हातारीचे केस, करवंदे-कैऱ्या यावरुन आमची गाडी हळू हळू प्रांतिय खान्याकडे वळली. हैद्राबादला खाल्लेली बावर्ची आणि पॅराडाइजची बिर्याणी, टुंडे कबाब खायला जोगेश्वरीला गेलो असताना झालेला आमचा पोपट, औरंगाबादजवळ एका धाब्यावर चुकून मिळालेली काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगाची अप्रतिम भाजी, खानदेशात एका मित्राने त्याच्या शेतात दिलेली भरीत आणि कळण्याच्या भाकरीची भन्नाट पार्टी असं काय काय आठवत समोरची आईस्क्रीम संपवायचं काम चालू होतं दोघांचे. तोवर बायकोने अजुन एक एक स्लाइस आणुन दिली आता संपलेही खोचक सुचनाही केली. कारण आम्ही आईस्क्रीम सुद्धा पोटभर खातो हो.

  मित्र म्हणालाअरे मावशीचा फोन होता पंधरा दिवसांपुर्वी, म्हणाली की बरेच दिवस झाले पोरांना पाहून. येवून जा. मलाही आठवण येतच होती. मग सोमवारची रजा टाकून शुक्रवारी संध्याकाळी निघालो. वाटेतच काही बाही खावून रात्री बारापर्यंत पोहचलो मावशीकडे. वाट पहात बसली होती रे तोपर्यंत.” 
मीहीकशीए मावशी?” वगैरे विचारले.
मला वाटले गप्पांचा ट्रॅक बदलतोय म्हणजे हा आता मुद्यावर येणार. पण त्यानंतर त्याने मला काहीही बोलू देता तास-दिड तास मावशीने या तिन दिवसात काय कायखावूघातले याचे असलं भारी वर्णन केले की विचारता सोय नाही. हा वडे, सागोती आणि सोलकढीवर थांबला असता तर काही हरकत नव्हती. पण कुठेच्या कुठे पोहचला. मुलांसाठी मावशीने तवसोळी आणि शिरवाळे कसे केले, पातोळ्या काय सुंदर लागल्या, बायकोला आवडते म्हणून आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याचे सांबार कसे केले, हलव्याची कळपूटी कसली टेस्टी झाली होती हे आणि काय काय विचारू नका. बरं हे वर्णन अगदी रेसिपीसह. आम्ही पडलो घाटी. आधिच मासे आम्हाला दुर्मीळ, त्यात समुद्री माशांबद्दल तर बोंबच. आम्हीगजाली’, ‘मालवणी' वगैरे नाव असणाऱ्या हॉटेलात जावून मासे खाणार. तिथे जी चव मिळते तिलाच कोकणी चव समजून खूष होणार. कुर्ल्या, तिसऱ्या वगैरे खायचं धाडस करणार नाही शक्यतो. कधी मासेवालीकडे गेलोच तरकमी काटे असलेला मासा द्याम्हणनार. हे आमचे माश्यांबद्दलच ज्ञान! खरा मासेखावू म्हणतो कीकाटा जितका जास्त तितका मासा चवदार.” आम्ही काय बोलणार? आम्ही घाटावरचे लोक जेवताना तोंडात खवट शेंगदाणा आला तर तो चावता बरोबर तोंडाबाहेर काढतो तसे हे मासेखावू जेवताना सहज तोंडातून टोकदार काटे काढतात. मला तर तो चमत्कारच वाटतो. माशांशी नावाने जवळीक साधणारी आपली आवडती डिश म्हणजे मासवड्या. मासवड्या असल्या की मी कंबरेचा पट्टा सैल करुनच जेवायला बसतो. पण मासे म्हटलं की मी ऊगाच याच्या त्याच्या तोंडाकडे वेंधळ्यासारखे पहाणार. माझी चुळबुळ आणि अस्वस्थता पाहून मित्राने आवरते घेतले. म्हणालाजरा कॉफी होवून जावूद्या मस्त वहीनी. ऊशीरही झालाय, निघायला हवे.” मग मीच ऊठून मिक्सरच्या भांड्यात दही, जायफळ, साखर, भरपुर कॉफी आणि बर्फाचे खडे टाकून मस्त फिरवले. बियचे ग्लास काढले, कॉफी ओतली आणि दोघांच्याही हातात दिली. मीही घेतली. मित्र आता बायकोला विचारत होता, “काय वहिणी, कडवे वाल आहेत का संपले? ऊन्हं किती वाढलीयेत, पांढरा कांदा आणायला हवा. आमची चिंच परवाच संपली असं ही म्हणत होती. करंदीही संपली त्यामुळे वांगी बटाट्याची भाजी केलीच नाही हिने बरेच दिवस वगैरे वगैरेयाला कोणताच विषय वर्ज्य नाही. दहा पंधरा मिनिटे गप्पा मारून, तिघांचेही ग्लास स्वच्छ धुवून, पुसुन जागेवर ठेवून मित्र गेला. बायको माझ्याकडे आणि मी बायकोकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले. हा नक्की आला कशाला होता? मोकळ्या हाताने कसा गेला? पुस्तकं कशी मागीतली नाही? काही कळेना. शेवटी विचार केलाजावूदे, आला, बरं वाटलं. तिन-चार तास मजेत गेले. मंगळवार काही अगदीच वाया गेला नाही.’

  पण जाताना मात्र डोक्यात मासळीचे काहूर ऊठवून गेला. रात्री जेवतानाही आवडती गवार असुनही डोक्यात मासेच होते. रात्री झोपताना ऊगाच फुड ब्लॉग्जवर फिश रेसिपीज् पहात राहीलो. पण मासळी काही जाईना मनातून. विचार केला ऊद्या दुपारी जावूमासेमारीला आणि यावेळेस अगदी वेगळ्या डिश ट्राय करु. पण मित्राने ईतकं काही रसभरीत वर्णन केले होते की वाटलेमासेमारीला जायचे म्हणजे पांडूरंगाची आठवण आल्यावर प्रतिपंढरपूरला जाण्यासारखे झाले. विठोबाला भेटायचे तर पंढरपुरपर्यंतच पायपीट केली पाहीजे. त्याशिवाय भेटीची मजा नाही. ठरलं तर. ऊद्या सकाळी मत्स्यपंढरी. मासे खायला कोकणात जायचे. रात्री साडेअकराला मी बायकोकडे दुसऱ्यादिवशीची ट्रिप जाहीर केली. काहीही बदल होणार नाही हे माहीत असुन तिने थोडा विरोध केला. पणकडवे वाल’ ‘चिंच-आमसुलवगैरे सांगून शेवटी पटवले तिला. सहाचा गजर पाचवर सेट केला, सकाळी कोणते फोन करायचेत ते रिमांइईंडर वर टाकले आणि एकदाचासमाधानानेझोपलो

  बुधवारी पाचचा गजर लावूनही साडेचारलाच ऊठलो. अंघोळ वगैरे ऊरकून केन बास्केट पुढे ओढली. दोन बर्मूडा, दोन टिशर्ट, टॉवेल, रुमाल टाकले बास्केटमध्ये. घरात जे काही सटर फटर फरसाण, चिवडा होते तेही टाकले. फ्रिजमधली दोन तिन लिंबे आणि सफरचंदेही घेतली. ब्लुटूथ साऊंड, पेन ड्राईव्ह, कॅमेरा यांची बॅग टाकली. शामने UK वरुन खास दोन व्हिस्की बोटल्स आणल्या होत्या माझ्यासाठी. त्यांना बरेस दिवस मुहूर्त लागला नव्हता. म्हटलं एखादी नीप सोबत घ्यावी. पण ऐन वेळेस हिपफ्लास्क सापडेना. मग अख्खी बाटली बास्केटमधल्या टॉवेलमध्ये गुंडाळली. बास्केट, चटईची गुंडाळी, कॅप्स खाली जावून डिक्कीत ठेवले. वर येवून बायकोला ऊठवलं. बंडी आणि बर्मूडा चढवला आणि बायकोचं आवरण्याची वाट पहात बसलो. स्वतः आवरुन बसले की बायकोला आवरायचं दडपण येतं हा स्वानूभव आहे. साडेसहा वाजले होते. वेळेनुसार गेलो तर दिड-दोन वाजता जेवण. चारला बिचवर. सुर्यास्तानंतर परतीला सुरवात. रात्री एकपर्यंत घरी. एकदम परफेक्ट नियोजन होतं एकून. ईतक्यात मोबाईल वाजला. पाहिलं तर काल आलेल्या मित्राचाच फोन होता. कमाल आहे, ईतक्या सकाळी? मी गुड मॉर्निंग करुन विचारलेलेका ईतक्या सकाळी सकाळी कधीपासून ऊठायला लागलास? बोल.” त्याने काहीतरी थातूर मातूर प्रश्न विचारलेकिनोटमध्ये व्हिडीओ कसे इंपोर्ट करुथ्रीडी चार्ट कसा ॲड करु? प्रेझेन्टेशन mp4 किंवा mov मधे सेव्ह करता येईल का?” मला समजेना, याला यावेळी कशासाठी हवं आहे हे? मी म्हणालोअरे ऊद्या सांगतो तुला सगळे. नाहीतर स्क्रिन रेकॉर्डींग पाठवतो टेलेग्रामवर. अत्ता निघालोय कोकणात. काल तुझ्याहे खाल्ले न् ते खाल्लेमुळेच पेटलोय आणि निघालोय. तुम्हीही येत असाल तर बघ स्वातीला विचारुन.” त्याने स्वातीला ओरडून विचारल्याचे मला फोनवरच ऐकू आले. मग म्हणालाठिके, तु आणि वैनीच आहात ना? मग येतो आम्ही. वहिणीला सोबत होईल आणि तुलाही. पंधरा मिनिटात गेटवरुन हॉर्न दे. आम्ही खालीच येतो. तुम्ही वर आले की परत अर्धा तास मोडेल. ठेवतो रे.” म्हणत त्याने फोन ठेवलाही. मला कळेना या सॅंडीला झालय काय काल पासून. काल घरी काय आला, आतायेतो का?’ विचारलं तर लगेच तयार काय झाला. पण वाटले चला, ड्रायव्हींगला पार्टनर झाला. तोवर बायकोचे आवरुन झाले होते. तिची बॅग ऊचलली आणि मी सरळ पार्कींगला आलो. मला माहीत होते की हिला आवरायला जेव्हढा वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ कुलूप लावायला लागतो. लॅच असुनही. लावलेले कुलूप ऊघडून परत घरात एक चक्कर मार, परत कुलूप लाव. असो. कुलुप लावणे हा एक कार्यक्रमच असतो आमच्याकडे. गाडी बाहेर काढीपर्यंत बायको खाली आली. निघालो. बरोबर पाच मिनिटात मी सॅंडीच्या सोसायटीच्या गेटवर हॉर्न वाजवत होतो.

प्रवासाचा ऊद्देश फक्त खादाडी असल्याने ताम्हीणी घाटाला टांग मारुन सरळ एक्सप्रेस-वेने पेण-वडखळ करीत अलीबाग गाठायचे ठरले. माझ्याकडे फरसाण-फळे होतीच. स्वातीनेही दशम्या, चटणी, लोणचे आणि फोडणी घातलेला दहीभात घेतला होता. त्यामुळे नाष्ट्यासाठी हॉटेल शोधायचा वैताग नव्हता. हवाही छान होती. कुमारांचेअवधुता, गगन घटा गहरानी रेलावले आणि निघालो. चार तासाचा तर प्रवास होता. त्यामुळे रमत गमत निघालो. एक्सप्रेसवेवर यायच्या अगोदर ईंद्रायणी नर्सरी जवळ गाडी बाजूला घेतली. शेतात मस्त चटई टाकली आणि सकाळचा नाष्टा ऊरकला. कुणाच्या हातात काय जादू असते कळत नाही. आता दही-भातात काय करायचे असते? पण स्वातीने आणलेला दही-भात काय सुंदर लागला. अप्रतिम. अर्धा तास तिथेच वेळ घालवत बसलो. घाई नव्हतीच. साडेनऊ झाले होते. पण ऊन्हाचा चटका जाणवायला लागला होता. मग सगळे आवरुन, चटई बुडे झटकून ऊठलो. दहाच मिनिटात आम्ही एक्सप्रेसवेवर होतो. आता कुठे थांबायचं नव्हते. मागे बायकांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. पुढे आम्ही कुमार गंधर्वांसोबत गुंगलो होतो. टोलनाका आला. टोल भरुन पुढे सरकलो. आता दहा मिनिटे बायकांचेईतका कुठे टोल असतो का? रस्ते तरी करा निट मग. एसटीने गेलेले काय वाईट.” हे चालले. जणू काही या मुद्द्यांवर बोलले नाही तर शिक्षा होईल, अशा पद्धतीने ही चर्चा होतेच होते. जेजूरीला गेल्यावर जसा भंडारा लावावाच लागतो, तसा टोल दिल्यावर ही चर्चा करावीच लागते. असो. पोयनाडला आलो तसे मित्राला विचारलेसांग कोकण्या, कोठे घ्यायची गाडी?” कारण मी कैकदा कोकणात भटकत असतो. पण काहीही कारण नसताना आजवर अलीबाग वगळले होते. मी साधारण तिन टप्यात फिरतो. त्यातला एक म्हणजे, ताम्हीनीमार्गे उतरुन रोह्यावरुन रेवदंडा ऊजवीकडे टाकून कोर्लईवरुन सरळ काशीदला मुक्काम. सकाळी ऊठून मुरुड, राजापुरी, फेरीने दिघी. दिवेआगार, भरडखोल, शेखाडी, अरावी करत सरळ हरिहरेश्वरला मुक्कामी. दिवेआगार-शेखाडी-अरावी हा माझ्यासाठी स्वर्गाचा रस्ता. या पन्नास-पंचावन्न किलोमिटरसाठी मला दिवस सुध्दा लागू शकतो. सॅंडी मालवनचा. पण त्याचाही अलिबागशी काही संबंध नाही. त्यानेही हात वर केले. मग काय करणार. गाडी थांबवून नेटवर शोध घेतला. ‘हॉटेल सन्मानचा बऱ्याच ठिकाणी ऊल्लेख दिसला. ‘हायवे ऑन माय प्लेटनेही ट्राय कराच असे सांगीतले होते. रिव्ह्यू बरे होते. डेस्टीनेशन सेट केले. अलिबाग नगरपरिषदेची पावती भरुन आम्ही सगळे दिड वाजता सन्मानला पोहचलो. ज्या साठी हा सगळा अट्टाहास केला होता ते समोर होते. बऱ्यापैकी भुक लागली होती. हात-पाय धुवून, जरा साईटचा निवांत टेबल निवडून बसलो. मेन्यूकार्ड सॅंडी आणि स्वातीकडे सरकवले. तेच सगळ्यांची ऑर्डर देणार होते. त्याने एक व्हेज, एक सुरमई, एक पॉंफ्रेट आणि एक जिताडा थाळी मागवल. तिसऱ्या मसाला आणि बोंबिल फ्राय मागवले. एक पुलाव राईस जास्तीचा मागवला. जिताडा हा प्रकार मला नविनच होता. पंधरा मिनिटात प्लेटस् आल्या. पाहूनच डोळे निवले. मी आमटी भाताचा एक घास घेतला आणि सोलकढीचा घोट घेतला….आणि माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. तरीही मी सुरमईचा एक तुकडा तोंडात टाकला. परत तेच. मी थोडे बोंबील ट्राय केले. पुन्हा तेच. माझंच चुकतय की काय म्हणून मी स्वातीकडे पाहीले तर तिचे तोंड माझ्यापेक्षाही वाईट झाले होते. एकून आमचा चांगलाच पोपट झाला होता. माझे एक वेळ ठिक आहे पण स्वाती-सॅंडीने तोंड वाकडे केल्यावर मात्र माझी खात्री झाली की सगळी कामे सोडून या माश्यांच्या नादात, भर ऊन्हात जो दोनशे किलोमिटर प्रवास केला होता तो चक्क व्यर्थ झाला होता. आमच्या मत्स्यवारीचा पारपोपटझाला होता. बायको मात्र मनापासुन जेवत होती. तिच्या व्हेज थाळीतील भाज्या तिला आवडल्याचे दिसत होते. शेवटी मी भातात सुकट चटणी टाकली, बायकोच्या ताटातील वरण घेतले आणि बोंबील तोंडी लावत कसे तरी जेवण ऊरकले. सँडी-स्वातीनेही जेवण संपवले. सँडी हात धुवून परस्पर गाडी काढायला गेला. मी बिल पेड केलं. दहा पंधरा रुपये टिप म्हणून ठेवले आणि निघालो. स्वातीने मात्र चुकता टिप म्हणून ठेवलेले पैसे परत घेतले होते. सँडीने गाडी दारातच ऊभी केली होती आणि कांऊटंरवरच्या माणसाकडे रागाने पहात थांबला होता. मी डिक्कीतील क्रेटमधून चार पाण्याच्या बाटल्या काढून चारही दरवाजांच्या बोटल होल्डरमध्ये ठेवल्या. एसी वाढवला आणि सँडीला गाडी एखाद्यारसवंतीवर घ्यायला सांगुन गाडीत बसलो. सगळ्यांचीच तोंडे बारीक झाली होती. वर हजार बाराशे पाण्यात गेले होते ते वेगळेच. पाच दहा मिनिटातच रस्त्याच्या ऊजवीकडे आईस्क्रीम पार्लर पाहून सँडीने गाडी थांबवली. निमुटपणे ऊतरलो. ज्याने त्याने आपापली ऑर्डर दिली. एव्हाना बायकोला झाल्या गोष्टीचं फारच वाईट वाटत होतं. नवरा भर ऊन्हात एवढ्या लांब आला आणि जेवण हेअसंमिळाले हे तिने फारच मनाला लावून घेतलं होतं बहूतेक. नको नको म्हणत असताना तिने रुक्मीणीला फोन लावला. तिला थोडक्यात सगळं सांगीतलं आणि फोन माझ्या हातात दिला. हॅलो म्हणताच रुक्मीणी जी सुरु झाली की मला बोलूच देईना. तिच्या आवाजातला आनंद लपत नव्हता. म्हणालीदादा, आता काही विचार करु नका. ताईंनी सांगीतलय मला सगळं. सरळ ईकडे गाडी वळवा. अजिबात काहीही कारणे मी ऐकणार नाही. सोबत कुणी आहे का अजून?” मी सांगीतलेहो, मित्र आणि त्याची बायको आहे” “मग निघा लवकर, सावकाश याम्हणत काहीही बोलायच्या आत रुक्मीणीने फोन ठेवून दिला

  नाथा आणि रुक्मीणी. रत्नागिरीजवळच्या छोट्या गावातील जोडपे. दोघेहे ग्रॅज्यूएट. रुक्मीणी नाथाच्या मामाचीच मुलगी. घरच्यांच्या पसंतीने लग्न झालं. लग्नानंतर दोघांनीही मुंबईत नशिब आजमवायचा प्रयत्न केला पण मुंबई काही दोघांनाही मानवली नाही. दोन वर्षातच दोघेही गावी परतले. मग रत्नागिरीतच एक बंद पडलेले छोटे हॉटेल चालवायला घेतले. वर्षभरातच चांगला जम बसला. याच काळात कोकण भटकंतीत त्याची आणि माझी ओळख झाली. पुढे ओळख मैत्रीत बदलली. आता तर नाथा आणि रुक्मीणी कुटूंबातील सदस्यच झाले होते. असो. वर्षभरातच मालकाने हॉटेल सोडायला लावले. दोघेही पुन्हा बेरोजगार. एक दिवस नाथा माझ्याकडे पुण्याला आला. आम्ही रात्रभर विचार करुन शेवटीनाथाने स्वतःचे हॉटेल सुरु करावेअसे ठरवले. काशीदमध्ये त्याच्या एका नातेवाईकाची अर्धा एकर जमीन होती समुद्रावर. रुक्मीणीने दागीने गहाण ठेवले. त्याच्या आईनेही जमवलेली पुंजी याच्या हवाली केली. ऊरलेली गरज मी पुर्ण केली. पुन्हा नव्याने श्रीगणेशा केला. मस्त कुंपण घातले, चार खोल्या बांधल्या, एक ऐसपैस ओपन किचन बांधले. कष्ट करायची तयारी, प्रामाणिकपणा, रुक्मीणीच्या हाताची चव आणि नाथाचे आपुलकीच्या वागण्याने नाथा लवकरच स्थिरावला. माझे पैसेही त्याने हट्टाने वर्षभरातच परत केले. गावाकडचे घर सुधरवले. अतिशय साधी आणि प्रेमळ जोडी. मी वर्षातनं एकदाच नाथाकडे चक्कर मारतो. तो पैसे घेत नाही आणि त्याच्या व्यवसायात ऊगाच अडचण नको म्हणून मीही टाळतो. म्हणूनच त्याच्याकडे जायच्या ऐवजी मी अलिबागला जायचा मुर्खपणा केला होता. आणि शेवटी नाथाकडेच यावे लागले  होते. तर हेही असो.

  माझा चेहरा पाहून सँडीला काही समजले नाही. त्याला आणि स्वातीलाही नाथा हेप्रकरणमाहीत नव्हते. त्याला काही स्पष्टीकरण देत बसता मी एखादे सुपर मार्केट शोधायला सांगीतले आणि गाडीत बसलो. पाच दहा मिनिटातचसुपर मॉलअसा बोर्ड असलेलेकिराणा मालाचेदुकान सापडले. तेथून पाच किलोचा दावत तांदळाचा पॅक, टिश्यू पेपरचे बॉक्स, टुथपिक्सचे बॉक्स, बडीशेप असं हॉटेलला लागणारे काय काय ऊचलले आणि निघालो. चौल रेवदंडा करत सव्वा तासात आम्ही नाथाच्यागेस्ट हाऊसच्या गेटवर पोहचलो

  मी नेहमीच्या ठरावीक पद्धतीने हॉर्न वाजवला आणि आतुन काळूने भुंकतच प्रतिसाद दिला. मागोमाग रुक्मीणीने गेट ऊघडले. तिच्या चेहऱ्यावरुन आनंद नुसता ओसंडत होता. तिने हातातला भाजलेला पापड गाडीवरुनच ओवाळला आणि बाजूला चुरडून टाकला. “आता या आत मध्येम्हणत ती घाईने परत आत गेली. तिचा हा ऊत्साह पाहूनच मला फार बरं वाटले. सँडीने गाडी आत घेतली आणि अगदी बाजूला, अडचण होणार नाही अशी पार्क केली. तोवर रुक्मीणी पाण्याची बादली घेवून बाहेर आली. मी जरा गम्मत करायची म्हणून म्हटलेकाय मणी, एवढी शिकली आणि नजर काय ऊरतवते?” 
ती हसुन म्हणालीअसुद्या आमचं आमच्या जवळ. अगोदर पाणी घ्या पायावर. चहा घ्या अन् मग करा अंघोळी.”
मी विचारलंनाथा दिसेना कुठे. बाहेर गेलाय का?”
तर म्हणालीतुमचा फोन झाला आणि गाडी घेवून बाहेर पडले लगेच. ‘काही मिळतय का पहातो म्हणालेयेतील ईतक्यात.”
मला माहीत होतं नाथा काय मिळवायला गेला होता. एक नविनच २२-२३ वर्षांचा पोरगा दिसला. रुक्मीणी त्याला गाडीतले सामान काढायला मदत करत होती. आम्ही हातपाय धुतले. चार खोल्यांना काटकोणात एक गवताची सुबक खोपी ऊभारली होती. पाच सहा टेबल मांडले होते. मी आणि सँडी खुर्च्यांवर मस्त पाय ताणून बसलो. समोरच समुद्राला भरती सुरु झाली होती. बायको आणि स्वाती रुक्मीणीच्या मागे मागे किचनमध्येच गेल्या होत्या. थोड्याच वेळात मघाचा पोरगा ताटात चहाचे तिन कप घेवून आला
त्याला म्हणालोअरे दोघेच आहोत, एक घेवून जा
तर म्हणालाअक्का म्हणाली, लांबून आलेत, लागेल जास्तीचा
काहीही म्हणा पण रुक्मीणी हुशारच. खरच मला दोन कप चहाची गरज होतीच.
त्याला नाव विचारलं, म्हणालाप्रसाद पण सगळे बाबूच म्हणतात.”
काळू सारखा पायात घोटाळत होता. त्यालाही आनंद झाल्याचं दिसत होतं. अस्सल अल्सेशीअन ब्रिडचं हे पिल्लू मी नाथाला पुण्यावरुन आग्रहाने आणून दिले होते. चांगला मोठा झाला होता गडी. अल्सेशिअन असुन नामकरण मात्रकाळू’. त्याची बिस्कीटे घ्यायला मात्र विसरलोच. चहा पित होतो तोवर बाबूने बॅग आणि बास्केट शेवटच्या खोलीत नेवून ठेवली होती. मी आणि सँडीने अंघोळी ऊरकल्या. साडे पाच वाजले होते. बायकाही फ्रेश होवून, कपडे बदलून आल्या. आम्ही समुद्रावर निघालो. समुद्रावर काय जायचे, तो तर जवळ जवळ अंगणातच होता. आज आठ वाजता बरेच लोक जेवायला येणार होते त्यामुळे रुक्मीणी आणि नाथा कामात होते. मग आम्हीच निघालो. मी आणि सँडी मस्त वाळूत बसलो. बायका वॉटरस्पोर्ट्सकडे वळाल्या. छान हवा सुटली होती. आम्ही बराच वेळ वाळूत बसुन निवांतपणाचे सुख अनुभवित होतो. थोड्यावेळातच सुर्यास्त झाला. अंधारुन आले. नाथाने सगळ्या लाईट लावल्याचे दिसत होते. बायको आणि स्वाती आल्या. पुर्ण भिजलेल्या, दमलेल्या. चेहरे प्रसन्न, आनंदी. भरपुर हुंदडल्या असणार पाण्यात.
सँडी म्हणालाअप्पा, आपला खादाडीचा बेत फसला पण यांच्याकडे पाहूनबरं झालो आलोअसं वाटतय. वैतागते रे स्वाती दिवसभर ऑफीस आणि घरचे काम करुन
मग मी ऊठताऊठताच म्हणालोआता रडशील बाबा तू. चल जावू” 

  स्वातीने आणि बायकोने किचनमध्ये रुक्मीणीच्या कामात लुडबूड सुरु केली. मी रुक्मीणीला म्हणालोमणी, आम्ही परत समुद्रावर चाललोय. तिथेचबसणारआहोत बराचवेळ. तुमचं सावकाश होवू द्या मग जेवायला हाक मार आम्हालाबाहेर येवून नाथालासोयकरायला सांगीतली आणि आम्ही दोघेहे परत समुद्रावर निघालो. नाथाने बाबूकडे चार पाच ओंडके दिले, स्वतः एका हातात बास्केट दुसऱ्या हातात हातभर लांबीची फळी घेतली. अंधार पडला होता. नुकताच चंद्र ऊगवला होता. दोन दिवसांनी पौर्णीमा असावी. बाबूने जरा खड्डा केला वाळूत, लाकडे रचली. तेलाचा बोळा टाकून पेटवला. बाजूला मोठी चादर अंथरली, फळी ठेवली. ग्लास, बाटली बाहेर काढून ठेवली. (मला आता कळाले नाथाने फळी कशासाठी आणली होती.) पाण्याच्या बाटल्या ठेवल्या. “काही लागले तर बाबूला हाक मारा. मी होईन तास दिडतासात मोकळा. मग बसू गप्पा मारतम्हणत नाथा परत गेला. मस्त वातावरण होते. चांदणे मस्त पडले होते. लाटांवर चांदणे आणि खोपीतल्या दिव्यांचा मिळून केशरी पांढरा रंग चमकत होता. सँडीने बऱ्याच वेळाने ग्लास भरले. (खरंतर गरजच नव्हती वाटत आज त्याची) तेव्हढ्यात बाबूने स्टिलच्या  दोन प्लेट आणल्या. वाळूत छोटा खड्डा करुन चार निखारे टाकून बुजवला आणि प्लेट त्यावर ठेवल्या. पाँफ्रेट फ्राय, आणि बटरवर फक्त काळीमिरी, मिठ टाकून परतलेले प्रॉन्स होते. हे रुक्मीणीचे डोके. सँडीने साऊंड काढून अभिषेकीबुवांचेतपत्या झळा ऊन्हाच्यालावलं. समुद्राची गाज होतीच साथ द्यायला. आम्हीचांगभलंकरुन एक एक घोट घेतला. प्रॉन्स तोंडात टाकले. आहाsहा! काय मस्त वाटलं म्हणून सांगू. दिवसभराचा सगळा शिणवटा, वैताग क्षणात कुठच्या कुठे पळाला.

  आम्ही मासळीचा आणि अधूनमधून वारुणीचा आस्वाद घेत होतो. हळुहळू मन कसं तरल व्हायला लागलं होतं. अभिषेकीबुवांवरुन आम्ही किशोरींच्यासहेला रेवर आलो होतो. गप्पा फारशा होत नव्हत्याच. अधूनमधून एखाद्याजागेलामस्त दाद फक्त जात होती दोघांची. मध्ये बाबू येवून सुरमईच्या तुकड्या देवून, पाण्याच्या बाटल्या बदलून गेला होता. दिड तासात आम्ही किशोरींवरुन मेहदी हसनच्याचिरागे तुर जलावोवर घसरलो, गुलाम अलींच्याशिशमहलची मजा घेतली. जगजितच्याइश्ककी दास्तसाँन है प्यारेऐकले. शेवटी नुसरतसाहेंबांवर आलो. एक एक नोटेशन ऐकताना अंगावर अक्षरशः रोमांच ऊभे राहीले. हवा आता जास्तच सुखद वाटत होती. समुद्राची गाज एका समेवर आदळते, ती सम सापडली होती. नुसरतचा आवाज आज जरा जास्तच काळजाला भिडत होता. वारुनीची मेहरबाणी, दुसरं काय.

इश्क की चोट का कुछ दिल पे असर हो तो सही
दर्द कम हो या जियादा हो मगर हो तो सही।

या शेरवर सँडीची जोरदार शिट्टी आणि माझी टाळी पडली. चांदणं अजून ठळक झाले होते. ऊजवीकडे समुद्रात घुसलेली टेकडी दिसायला लागली होती. आत दुर कुठेतरी एक दोन होड्यांवर दिवे दिसत होते. चादरीखाली वाळूचा ढिग करुन त्यावर मी रेललो होतो. नुसरतसाहेबांनी दुसऱ्या कव्वालीला हात घातला होता. अगोदरची गझल विनासंगीत ते आळवीत होते.

आग को खेल पतंगोने बना रख्खा है
सबको अंजाम का डर हो ये जरुरी तो नही।

ह्या! भारीचम्हणून मागून दाद आली. वळून पाहीलं तर बाबू आला होता. या शेर ला दाद म्हणजे पोरगं दर्दी होतं तर.
त्याला म्हणालो बस तरफक्त बसतोम्हणत शेजारी टेकला. त्याला म्हटलं “लेका, नुसताच बस. नाहीतर मणीच्या शिव्या खाव्या लागतील” बाबू हसला फक्त.
त्याला विचारलेगेले कारे सगळे कस्टमर्स जेवून?” 
बाबू म्हणालाहो, आत्ताच गेले. नाथाभाऊ येईल दहा मिनिटात सगळं आवरुन. माझं काम ऊरकलं म्हणून आलो.”
महीलामंडळ काय करतय विचारल्यावर म्हणालादोन्ही ताईंना मगाशीच जेवायला लावलं अक्काने. एव्हाना झोपल्याही असतील त्या.”
ही रुक्मीणी एका छोट्या खेड्यात वाढली. पण शहरी लोकांपेक्षा चांगली मानूस वाचायची कला मात्र तिला फार छान साधलीये. मला खात्री होती की ती बायकोला आणि स्वातीला अंघोळ वगैरे करायला लावून म्हणाली असणारतुम्ही त्या दोघांच्या नका नादी लागू आज. तुम्ही घ्या जेवून अगोदर आणि झोपा निवांत.”
किती दिवसांनी आज बायको साडेनवूलाच झोपली असणार. मग बाबूबरोबर जरा गप्पा माराव्यात म्हणून विचारले नुसरत आवडतो का तुला? तर म्हणालानाही ऐकलं जास्त. पण जगजीत सिंग, किशोरकुमार, संदिप-सलील आवडतात ऐकायला. शायरीही आवडते.” मग गडी जरा खूलला. मी साऊंड बंद केला
बाबूच पुढे म्हणालाकाय खरं नसतं दादा ती शायरी न् कविता. परवा परवा पर्यंत मुकेश ऐकला की रडायला यायचं. मी नाथाभाऊच्याच गावातला. गावातल्याच मुलीवर प्रेम होतं माझं. घरच्यांना कळालं. मग वडिलांनी मला ईकडे नाथाभाऊकडे पाठवलं कामाला. पाच सहा महीने झाले. ईथेच समुद्रावर बसुन रडायचो रात्री. मागच्या महिन्यात वडिलांनी परस्पर लग्न ठरवलं माझं. मग आणखीच राग आला. पण अक्का म्हणाली म्हणून गेलो भेटायला मुलीच्या घरी. या महिन्यात दोनदा भेटलो आम्ही. फोन रोज असतो दुपारी. खरं सांगतो दादा, या मुलीच्या प्रेमातच पडलोय मी पार. अगोदरचं काय खरं नव्हतं बघा. बावळटपणा होता नुसता. मे महिन्यात लग्न आहे. तुम्हाला पत्रीका देईनच. त्यावेळेस असे शेर ऐकले की डोळ्यात पाणी यायचं. पण आता खरी शायरीची मजा यायला लागलीय बघा.”
बाबूला वाटलं, आपण जरा जास्तच बोललो की काय? मग त्याने विषय बदलला. “दादा एक कविता ऐकवू का? माझी नाहीये. पुरींची आहे. मागे खुप गाजली होती.” म्हटलं होवून जावूदे. नाहीतरी ईतकावेळ आम्ही जे ऐकत होतो त्याने जरा मेंदूवर तानच पडला होता. मग बाबूने आवाज लावला. ‘तु तुळशीवानी सत्वशिल, मी आग्याबोंड वेताळ प्रिये’ ‘तु सुप चायनिज चटकदार, मी झेडपीची सुगडी खिचडी’ ‘तु विडा रंगीला ताराचा न् मी रसवंतीचा चोथा गंबाबू कडक आवाजात गात होता आणि आम्ही पोटधरुन हसत होतो. शेवटी ध्रुवपद तर आम्ही तिघांनीही मोठ्याने कोरसमध्ये म्हणालो 

प्रेमाचा जांगड गुत्ता , जीव झाला हा खलबत्ता
ऊखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा

धमाल! धमाल! धमाल! काही विचारु नका. बाबूही खुशित होता. साहेबलोकांनी त्याला आपल्या सोबत बरोबरीने घेतलं होतं ना, म्हणून. त्याला काय सांगू की बाबारे तु आम्हाला सोबत घेतलं, ऊपकार झाले. असो. ईतक्यात नाथाही आला. आल्या आल्या म्हणालाऐकली का बाबूची लव्हस्टोरी? पहिला भाग आणि दुसराही भाग?” बाबू चक्क लाजला. मी नाथापुढे ग्लास सरकावला. त्याने एकच पटीयाला बनवला बॉटल बाबूकडे दिली. म्हणालाबाबूशेठ, आवरा सगळं. बास्केट ठेव किचनमध्येच.” बाबूने निखाऱ्यांवर राख टाकली, सगळे सामान आवरले आणि गेला. मग दहा पंधरा मिनिटे नाथाचा अहवाल ऐकला. गावाकडची खुशाली ऐकली. रुक्मीणीचा फोन आलाताटं केलीतहे सांगायला. मग मात्र ऊठलो. साडेअकरा वाजून गेले होते. नाथाने चटई गुंडाळली. आम्ही हातपाय धुतले आणि खोपीत आलो. बाबूने टेबल एकावरएक रचुन बाजूला ठेवले होते. खाली मोठी प्लॅस्टीकची चटई अंथरली होती. रुक्मीणी ताटे करत होती. आम्ही कोंडाळे करुन बसलो. सगळी भांडी मध्ये ठेवली होती. ज्याला जे हवं ते घेण्यासाठी. रुक्मीणीने माझं ताट वाढलं. अगदी मला हवं तसे. मध्ये भाताचा मोठा ढिग, एका बाजूने पापलेट-सुरमईच्या तुकड्या, शेजारी सुक्के मसाला प्रॉन्स, घट्ट बटाट्याची भाजी, सुकट चटणी, भातावर तुरीची तिखट आमटी, लपथपीत बिरडं. (बायको शाकाहारी, त्यामुळे तिच्यासाठी केलं असणार रुक्मीणीने.) वाटीत फिशकरी, बशीत कांदा, टॉमेटो, काकडी, कोथींबीर आणि ऊकडलेले चणे मिक्स करुन भरपुर लिंबू पिळलेले सलाड. ताट काय भरगच्च दिसत होतं. कुणी असं मिक्स घेवून खात नाही पण मला भयानक आवडते. गेल्या चार तासात ईतके चरलो होतो तरीही ताट पाहून भुक लागल्यासारखं झालं. सँडीचे ताट नेहमी हॉटेलमध्ये असते तसे भरले होते. बाबूनेही फक्त भात आणि आमटी घेतली. नाथा आणि रुक्मीणी एकाच ताटात बसले होते. मग गणपतीनंतर काय काय वाढवायचय गेस्ट हाऊसमध्ये, गावाकडे काय नविन करायचय, रुक्मीणीच्या भावाचं काय चाललय अशा वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत, एकमेकांना आग्रह करत, हसत जेवण सुरु झाले. दोन घासानंतर   रुक्मीणीने डोळे मोठे करुन माझ्याकडे पाहीलं. मी हसुन मान डोलावली. तिने विचारलं होतं कसं झालय जेवण आणि मी ऊत्तर दिले होतेनिव्वळ अप्रतिम

  बाबूने पटकन सगळं आवरलं. भांडी आत नेवून ठेवली. नाथाला म्हणालोयार, ईथेच टाका अंथरुने. पडू ईथेच. रुममध्ये नको. मग अंथरुणे पडली. सँडी नाथाला पहिल्यांदाच भेटत होता. त्यामुळे गप्पांमध्ये त्याला फारसा भाग घेता येत नव्हता. दोन रुममध्ये मुंबईची जोडपी होती. त्यामुळे आमच्या हलक्या आवाजातच गप्पा चालल्या होत्या. “मला झोप आली बाई खुपम्हणत मधूनच रुक्मीणी ऊठून गेली. नाथाहीसकाळी लवकर ऊठायचयम्हणत गेला.
सँडी म्हणालाअप्पा, काल तुला म्हणालो ना की मावशीचा फोन आला होता म्हणून
मी म्हणालोत्याचं काय आता ईथे?”
फोन आला होता एवढच खरय. बाकी सगळ्या मी तुला थापा मारल्या. कामामुळे जायला जमलच नाही रे. मग तुला पेटवलं. माझ्या अंदाजाप्रमाणे तु लगेच निघालाही. म्हणून तर तुयेतो का?’ विचारल्यावर पंधरा मिनिटात आलो. नाहीतर ऐनवेळी नाष्टा वगैरे तयारी कशी झाली असती?”
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला म्हणालोपण हे सारं तु आता का सांगतो आहेस?”
सँडीवर व्हिस्कीचा अंमल होता. म्हणालामला वाटलं कुठे तरी चांगल्या हॉटेलात जेवू, संध्याकाळी घरी जावू. पण वहिनीमुळे ईकडे आलो. तुझ्या नाथाचे, त्याच्या बायकोचे हे ईतकं निर्व्याज प्रेम पाहून, आदरातिथ्य पाहून मला माझीच लाज वाटली तुला फसवल्याची. त्यांनाही फसवल्यासारखं वाटतय. म्हणून बोलल्यावाचून रहावेना.” 
म्हटलंलेका सँडी, तुला झालीय वाटतं. झोप बरं मस्तपैकी. सकाळी परतायचय पुण्यात.”
तरीही सँडी काहीतरी बोलत राहीला, मी हां हूं करत राहीलो. सँडी अगोदर झोपला की मी, ते काही आठवत नाही. एक वाजून गेले असावेत. झोप अगदी गाढ लागली. सकाळी सातलाच जाग आली एकदम.

  रुक्मीणी-नाथा कधिच ऊठले होते. बाबू आणि रुक्मीणीची सकाळची लगबग चालू होती. बाबू आम्ही ऊठायची वाटच पहात होता. त्याने पटकण अंथरुने काढून टेबल मांडायला घेतले. रुममध्ये डोकावले तर कुणीच नव्हते. बाबूने सांगितले की त्या सहालाच समुद्रावर गेल्यात. नाथाही गावात गेला होता. रुक्मीणीची मासेवाली आली होती गेटवर. ती तिकडे गुंतली होती. मग  आम्हीही समुद्रास्नानाला निघालो. समुद्रावर रात्री मुंबईची आलेली जोडी म्हणजे नुकतीच एंगेजमेंट झालेली जोडी, त्यांचे मित्र आणि एक कॅमेरामॅन होता. नविन फॅशनप्रमाणे त्यांचेगोल्डन लाईटमध्ये फोटो सेशन चालले होते. दुर स्वाती आणि बायको पाण्यात खेळताना दिसत होत्या. बाकी कुणी नव्हते किनाऱ्यावर. समुद्रस्नान ऊरकले. आम्ही चौघेही रुमवर आलो. अंघोळी ऊरकल्या. नाथाही आला होता. नाष्टा करायला किचनमध्येच गेलो. रात्री नाथाने भरपुर शहाळी आणली होती. (त्याला वाटले नेहमीप्रमाणे व्होडका असेल म्हणून पाण्यासाठी.) नाष्ट्याला शहाळ्याच्या मलईची तिखट-गोड रस्साभाजी आणि आंबोळ्या होत्या. सँडी खुष. पक्का कोकण्या ना तो. पोटभर नाष्टा झाला. बाबूने सामान गाडीत भरले. निघायची वेळ झाली. रुक्मीणीच्या डोक्यावर थोपटल्यासारखं करुन मनापासुन आशिर्वाद आणि शुभेच्या दिल्या. नाथाला मिठी मारली. त्याची छोटी मुलगी सुट्टीला आज्जीकडे गेली होती तीची भेट तेव्हढी राहीली. आतमध्ये हळदी कुंकू लावून झाल्यावर स्वातीने हट्टाने रुक्मीणीच्या हातात दोन हजारची नोट कोंबली, बाहेर मी नाथाच्या खिशात घातली. “पिल्लूसाठी ड्रेस घेम्हटल्यावर घेतले त्याने पैसे. बाबूला खिशातलं पेन काढून दिले. सगळे गाडीत बसलो तेंव्हा नाथा म्हणालागाडीत कडवेवाल, कुळीथ, कांदा, करंदी, सोडे, आईचे लोणचे सगळं सगळं टाकलय. चिंचेचा गोळा आहे सिटखाली. रस्त्यात कुठे थांबून घेवू नका काही. चार शहाळी आहेत, फक्त शेंडा ऊडवा. सरप्राईजही आहे. फोन करुन कळवा कसं वाटले ते.” रुक्मीणी घाईत किचनमधून आली. हातात झाकणासहीत कापडात बांधलेले पातेले होते. बहुतेक सरळ गॅसवूरुनच आणले असावे. म्हणालीताई जावून काही लगेच चुलीशी लागणार नाही. तिखट सांजा दिलाय. पातेलं गरम पाण्यात ठेवून मग खा.” बाबूने गेट ऊघडले. काळूची शेपटी काही हलायची थांबत नव्हती. प्रत्येकवेळेप्रमाणे आजही नाथा रुक्मीणीच्या डोळ्यात पाणी होते. वेडी माणसे. स्वातीचेही डोळे भरले होते. मला जड वाटत होतच. “गणपतीला येऊ नेहमीप्रमाणेम्हणत मी गाडी बाहेर काढली. मागे पहाता गती वाढवली. मला माहीत होते, गाडी वळनावर दिसेनाशी होत नाही तोवर नाथा-रुक्मीणी हात हलवत असणार.







६ टिप्पण्या:

  1. अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. अगदी सर्व डोळ्यापुढे ऊभे राहिले चित्र.
    वैदेही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रतिसादाबद्दल धन्यवाद वैदेही.

      हटवा
    2. तुम्ही हे मिपावर लिहिले आहे का? ‘शाली’ या नावाने?

      हटवा
    3. हो. हा लेख मिपावर लिहिलेला आहे. शाली या नावाने.

      हटवा
  2. वा! पुर्ण प्रवासात तुमच्या बरोबरच होतो असे वाटले. ओधवते लिहिलय अगदी.

    उत्तर द्याहटवा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

गण्या

गण्या सातवीत सातव्यांदा नापास झाला आणि वैतागलेल्या गुरुजींनी त्याला मनसोक्त हाताखालून काढला. गण्या त्यादिवशी गुरुजींच्या हातातून जो सुटला ते...