❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

गुरुवार, १७ मे, २०१८

ज्ञानेश्वरी


   

   मला जेमतेम वाचता यायला लागले आणि वडीलांनी वाढदिवसाला पुस्तके भेट द्यायला सुरवात केली. सुरवातीला कंटाळा यायचा. इतरांना कशा छान भेटवस्तू मिळतात असे वाटे. मग हळूहळू वाचनाची आवड निर्माण झाली. मला आठवतय, पंधरावा वाढदिवस होता माझा. वडिलांनी ज्ञानेश्वरी भेट म्हणून दिली. मनात ज्ञानेश्वरीचा दरारा होता. हे मोठ्या माणसांचे पुस्तक आहे असं वाटे. मग वडीलांनी कानावर पडणाऱ्या सुंदर चालीच्या ओव्या दाखवल्या ज्ञानेश्वरीतल्या. पसायदान समजावून दिले. मग मात्र ज्ञानेश्वरीची भिती गेली. रोज नविन काय सापडते ते पहाण्यासाठी ज्ञानेश्वरी ऊघडायला लागलो. अशा प्रकारे हा ग्रंथराज माझ्या आयुष्यात आला.

ज्ञानेश्वरी वाचताना मी नवव्या अध्यायात जरा जास्त रेंगाळतो. का ते माहीत नाही पण मला नववा अध्याय जास्त भावतो. ‘राजविद्याराजगुह्ययोगअसे काहीसे जड नाव आहे या अध्यायाला. बऱ्याच जाणकारांच्या मते हा अध्याय समजण्यास जरा अवघड आहे. पण मला मात्र हा खुप सोपा आणि जवळचा वाटतो. जवळचा या साठी की माऊलींनी यात लिहिलेल्या काही ओव्या आजसाठी अगदी चपखल बसतात. कधी कधी वाटते की त्या आजच्यासाठीच लिहिल्यात की काय. आज समाजात ज्या वृत्ती फोफावत आहे, माणसाची जी वृत्ती बनली आहे त्याचे अगदी यथायोग्य वर्णन माऊलींनी केले आहे. दुसरीही एक आवडणारी बाजू म्हणजे या अध्यायातली माऊलींनी वापरलेली भाषा. ज्ञानेश्वरीच्या बहुतेक अध्यायाची सुरवात माऊली सद्गुरुंना नमन करुन करतात. त्यातली अनेक गुढ तत्वज्ञान आणि अध्यात्मज्ञान असलेली आहेत जी समजायला खुप अवघड जातात. किंबहुना तेव्हढी योग्यताही माझ्याकडे नाही. पण या अध्यायाची सुरवात ईतकी रसभरीत आहे की वाचताना अक्षरशः मन मोहरुन येते. इतक्या सुंदर सुंदर उपमा देऊन माऊली आपल्याशी संवाद साधतात की विचारू नका. ही काव्यप्रतिभा पाहून थक्क व्हायला होते.  

माणूस किती नम्र होवू शकतो, समोरच्याला किती मोठेपणा देवू शकतो याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे या अध्यायातील सुरवातीच्या ओव्या. आजकाल कुणाची ऐकायची तयारी नसते, समोरच्याचे विचार स्विकारण्याची तयारी नसते. आपलं मात्र ऐकावे हा हट्ट असतो. आणि ते सांगणेही आपल्या पद्धतीने असते. पण येथे मात्र ज्ञानीयांचा राजा, ज्यांनी विश्वशांतीसाठी पसायदान मागीतले त्यांना ईतके नम्र होताना पाहून मन चकीत होते. मला तुम्हाला काही सांगायचे आहे आणि तुम्ही ते कृपया ऐकावे यासाठी माऊलींनी विनयाची अगदी परिसिमा गाठलीय
माऊली म्हणतात:

अवधारां आवडे तेसणा धुंधूरु। परि महातेजीं मिरवे काय करु।
अमृताचियां ताटीं वोगरु। ऐसी रससोय कैंची॥

मी ईतका लहान आहे आपणापुढे की, काजवा कितीही चमकला, तरी सुर्यापुढे त्याने काय मिरवायचे, किंवा ज्या ताटात आगोदरच अमृत वाढले आहे त्या ताटात मी कोणते पक्वान्न वाढणार? पण तरीही तुम्ही प्रेमाने मी काय सांगतो आहे ते ऐकावे. माऊली स्वःताकडे लहानपण घेऊन समोरच्याला फार मोठेपणा देतात. मी मुलासारखा आहे तुमच्या हे सांगताना ते म्हणतात की:

बाळक बापाचिये ताटीं रिगे। रिगौनि बापातेंच जेवऊं लागे।
कीं तो संतोषललेनि वेगें। मुखचि वोडवि॥

लहान मुल जसे वडीलांच्या ताटात जेवते आणि जेवता जेवता वडीलांनाच घास भरवू लागते आणि वडीलही प्रेमाने तोंड पुढे करतात तद्वत मी ही आपले लहान बालकच आहे असे समजून मला सांभाळून घ्या. हे ईतके मनापासून विनवणे कशासाठी? तर ऐकणाऱ्याच्या भल्यासाठी. बरं आपलं भलं झाले तर यात माऊलींचा काय फायदा? मग कशासाठी ईतका विनय? थोडं विषयांतर करतो. तिन प्रकारचे वैद्य असतात. एक जो आलेल्या रुग्णाला तपासुन औषध लिहुन देतो. दुसरा जो निदान करुन स्वतःजवळील औषध देतो आणि तिसरा जो निदान करुन आपल्याजवळील औषध रुग्णाला स्वतःच्या हाताने भरवतो. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहायची आणि मोकळे व्हायचे. पण त्यांना आपल्या भल्याची काळजी. म्हणून एवढी विनवणी. पण एवढ्या कळवळून सांगीतले तरी आपण ऐकतो का? तर नाही ऐकत. वाचतो का? तर नाही वाचत. वाचत नाही म्हणजे मनन चिंतन करायचा प्रश्नच नाही. बरं, आपण आध्यात्म ठेवूया बाजूला. मला ईतकच म्हणायचं आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी अध्यात्म म्हणून नका वाचू पण तिचं साहित्यिक मुल्य जाणून घेण्यासाठी तरी वाचाल की नाही. त्यातलं काव्य जाणून घेण्यासाठी तरी वाचाल की नाही. किमान माऊलींच्या साहित्यावर जगभर अभ्यास केला जातो, तो का केला जातो ते जाणून घेण्यासाठी तरी वाचाल की नाही. किमानमी ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न केला पण काही समजले नाहीअसं म्हणन्यापुरते तरी वाचा. अनेक अनुवादीत कथा, कादंबऱ्या वाचायच्या. काव्यसंग्रह वाचायचे पण ज्ञानेश्वरीला म्हातारपणी वाचायचा ग्रंथ म्हणून बाजुला सारायचे हे काही बरे नाही. वाचल्याशिवाय कसे कळेल की काय खजिना आहे त्यात. माऊलींच्याच ओवीत सांगू का
माऊली एके ठिकाणी म्हणतात की:

नातरी निदैवाचां परिवरी। लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी।
परि तेथ बैसोनि उपवासु करी। का दरिद्रें जिये॥

जमिनीखाली हजार सुवर्णमुद्रा पुरलेल्या आहेत आणि हा शहाणा त्यावर बसुन दरिद्री जीवन जगतो, उपाशी रहातो. बुडाखाली सोनं पुरलं आहे हे माहितीच नाही तर तो तरी काय करेल. आपलीही काहीशी अशीच अवस्था झाली आहे. जवळ जवळ प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे पण त्यात काय मौल्यवान ठेवा आहे हे माहीतीच नाही आपल्याला. मी परत सांगतो, येथे मी अध्यात्मावर बोलतच नाही, ती पात्रताही नाही माझी. मी साहित्यीक दृष्ट्यामौल्यवान ठेवाम्हणतो आहे. इंटरनेट, फेसबुक, टेलीव्हीजन, माहीती तंत्रज्ञानाच्या या जगात आपण नक्की काय सोडून कशामागे धावतो आहे तेच कुणाला समजेनासे झालेय असं मला वाटतं. हातातून काय सुटलय याचे भान नाही आणि कशापाठी धावतोय त्याची जान नाही. यावरुन मला माऊलींची एक ओवी आठवतेय.

बहु मृगजळ देखोनि डोळां। थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा।
तोडिला परिसु बांधिला गळा। शुक्तिकालाभे॥

समोर मृगजळ पाहून तोंडातला नुकताच घेतलेला अमृताचा घोट थुंकून टाकायचा आणि मृगजळामागे धावायचे किंवा पुढे पडलेल्या शिंपल्याची चमक पाहून गळ्यात बांधलेला परीस तोडायचा आणि शिंपला ऊचलायचा. असा काहीसा आपला प्रकार झालाय इंटरनेटच्या जगात. परत एकदा स्पष्ट करतो की मी इंटरनेटला, आजच्या तांत्रीक प्रगतीला अजिबात दोष देत नाहीए पण त्याव्यतिरीक्त सुध्दा आहे ना बरेच काही जे फार सुंदर आहे, छान आहे आणि पटणार नाही पण फार गरजेचही आहे. मी हे का सांगतोय? सुदैवाने घरात ज्ञानेश्वरी आहे, ती वाचणारे वडिलधारेही आहेत. पण दुर्दैवाने वडिलधारे ज्ञानेश्वरी वाचत नाहीत तर तिची पारायणे करतात. माऊलींच्या फोटोची नेमाने पुजा करतात पण कोणी ज्ञानेश्वरी समजुन घेत नाही. घरातल्या लहानांना ती समजावून सांगत नाही. आणि काही कारणांमुळे वडिलधारे नसतील तरी ज्ञानेश्वरी आहेच ना.

असो. या लेखाचा विषय होता माऊलींनी आजच्या काळाला अनुसरुन सातशे पेक्षा जास्त वर्षांपुर्वी लिहिले होते. त्या ओव्या इथे देतोविषय आहेआपली श्रध्दा कशा प्रकारची असते आणि ती कशी दुखावतेआपल्या काय कल्पना असतात ईश्वराविषयी आणि तो नक्की कसा आहे हे सांगता माऊली खुपच परखड मत मांडतात. ते म्हणतात:

जैसा दीपु ठेविला परिवरीं कवणातें नियमी ना निवारी।
आणि कवण कवणिये व्यापारीं राहाटे तेंहि नेणें॥ 

या पेक्षा अजुन किती स्पष्ट लिहावे माऊलींनी? खरं तर यावर अजुन लिहायला हवं पण असो. माऊलींनी फार स्पष्ट लिहिले आहे. लेख मोठा होईल म्हणून अर्थ देत नाही. पण तो सहज समजेल. नाहीच समजला तर विचारा.
माऊली म्हणतात:

मज अनावरणा प्रावरण। भूषणातीतासि भूषण।
मज सकळकारणा कारण।देखती ते॥६२॥

मज सहजातें करिती। स्वयंभातें प्रतिष्ठिती।
निरंतराते आव्हानिती। विसर्जिती गा॥६३॥

मी सर्वदा स्वतःसिद्धु। तो कीं बाळ तरुण वृद्धु। 
मज एकरुपा संबंधु। जाणती ऐसे॥६४॥

मज अकुळाचें कुळ वानिती। मज नित्याचेनि निधनें शिणती।
मज सर्वांतरातें कल्पिती। अरि मित्र गा॥६६॥

सगळ्यात महत्वाची आणि अतिशय स्पष्ट ओवी

जंव आकारु एक पुढां देखती। तवं हा देव येणें भावे भजती।
मग तोचि बिघडलिया टाकिती। नांही म्हणोनि॥

मी आत्मा एक चरारीं। म्हणती एकाचा कैंपक्ष करी।
आणि कोपोनि एकातें मारी। हेंचि वाढविती

खरं तर या पंधरापेक्षा जास्त ओव्या आहेत. पण थांबतो.
थांबता थांबता मला अतिशय आवडणारी ओवी सांगुन संपवतो. ज्ञानोबांची एखादी ओवी आपल्याला लागू व्हावी एवढे कुठले माझे भाग्य पण खालील ओवी मला स्वतःला अगदी तंतोतंत लागू होते.

एथ जाणीव करी तोचि नेणें। आथिलेपण मिरवी तेंची उणें।
आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे। तो कांहींचि नव्हे॥

याचा थोडक्यात अर्थ सांगायचा तर संत भीखा साहिब यांच्या शब्दात

भीखा बात अगम की, कहन सुनन की नाही।
कहे सो जाने ना, जाने सो कहे नाही॥

काय लिहावे, किती लिहावे? मला वाटते प्रत्येकाने एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक हा मुद्दा अगदी गौण आहे अगदी. असो, बाकीचे परत कधी

(ओघात जे सुचले ते लिहिले. कुणाला काही सांगायची माझी पात्रता नाही. किंवा मी कुणाच्या जीवनशैलीविषयी काही भाष्यही करत नाहीए हे कृपया लक्षात घ्यावे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...