❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

गुरुवार, १७ मे, २०१८

‘ययाति आणि सेल्फ/लेस’


नुकताच सेल्फ/लेस नावाचा चित्रपट पहाण्यात आला. मी टाळणार होतो पहायचा पण ‘बेन किंग्जले’ हे नाव दिसलं आणि पुर्ण मुव्ही पाहीली. बेन किंग्जले यांचे फारसे चित्रपट पहाण्यात नाही पण जे पाहीले ते मात्र कायमचे लक्षात राहीले. (‘गांधी’ तर सगळ्यांना आठवत असेलच.) त्यातला सगळ्यात महत्वाचा शिंडलर्स लिस्ट. हा चित्रपट पाहील्यानंतर मी आठ दिवस अस्वस्थ होतो. हा चित्रपट पाहून डोळ्यात पाणी न येणार माणुस विरळा. असो. सेल्फ/लेस हा चित्रपट पाहीला आणि मला नुकतीच या ग्रुपवर ‘ययाति’वर झालेली चर्चा आठवली. कथानक पुर्ण वेगळं असले तरी कल्पना एकच आहे. (आता ईथे कुणी “ते आपल्याच पुराणातल्या कल्पना चोरतात वगैरे ही चर्चा सुरु करु नये.) 
राजा नहुष यांच्या सहा मुलांपैकी ययाती हे दुसरे. बाकी मुलांची नावेही मजेदार आहेत. याति, ययाति, सयाति, अयाति, वियाति आणि कृति. सख्खे भाऊ असुन स्वभावात किती टोकाचा फरक असतो याचे उदाहरण म्हणजे हे याति आणि ययाति. याति हा राजसिंहासन, साम्राज्यसत्ता आणि सुखासीन आयुष्य याबाबतीत पुर्ण ऊदासीन तर ययाति हा पुर्ण सुखलोलूप. असे भाऊ ईतिहासात जागोजागी दिसतात. दारा शुकोह आणि औरंगजेब. औरंगजेबाऐवजी जर दारा शुकोह बादशहा झाला असता तर आज ईतिहास फार वेगळा आणि ईतका रक्तरंजीत झाला नसता. विषयांतर झालं. यावर वेगळा लेख लिहीन. यातिने जेंव्हा राजपद नाकारले तेंव्हा पर्यायाने ते ययातिकडे आले. आणि तेथूनच त्याची भोगवादी वृत्ती जास्तच वाढीस लागली. त्यासाठी त्याने मुलाचे(पुरुवसू) तारुण्यसुध्दा मागितले. हजार वर्ष भोग भोगुनही त्याची तृप्ती काही होईना. तेंव्हा त्याला पश्चाताप झाला आणि त्याने पुरुला त्याचे तारुण्य परत दिले आणि वानप्रस्थ स्विकारुन तपस्या सुरु केली. अर्थात स्वर्गप्राप्तीनंतरही त्यांना तेथून हाकलण्यात आले. त्या कथाही फार छान आहेत पण आजचा तो विषय नाही.
तर या चित्रपटाची साधारण कहाणीही काहीशी अशीच आहे. डॅमेन (बेन किंग्जले) हा एक करोडपती ऊद्योगपती असतो. त्याने मोठ्या कष्टाने त्याचे साम्राज्य ऊभे केलेले असते. त्यासाठी त्याने आपली एकुलती एक मुलगी, तिच्याकडेही दुर्लक्ष केलं असतं. ती वाढली कशी, कधी मोठी झाली, तिला काय आवडतं, काय हवय याकडे डॅमेनचं पुर्ण दुर्लक्ष झालेलं असतं. बाप-लेकीमध्ये एक विचित्र अंतर निर्माण होतं. आयुष्याच्या ऊत्तरार्धात डॅमेनला कळते की त्याला कॅन्सर झालाय. त्याला धक्का बसतो. मुलीच्या काळजीपेक्षा त्याला ‘आपल्या या ईतक्या मोठ्या साम्राज्याचं काय होणार?’ ही चिंता असते. याच दरम्यान त्याला समजते की एका डॉक्टरने असा शोध लावला आहे की ज्यामुळे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करता येतो. या शोधाचे नाव ‘शेडींग’. डॅमेन त्या डॉक्टरला भेटतो व पुर्ण प्रक्रिया समजून घेतो. त्यानुसार प्रयोगशाळेत तयार केलेल्या एका स्वस्थ शरीरात डॅमेन प्रवेश करु शकणार असतो. या प्रक्रियेअगोदर डॅमेन आपल्या सर्व साम्राज्याचे योग्य ते नियोजन करतो आणि ठरल्याप्रमाणे एका सार्वजणीक ठिकाणी, एका रेस्टोमध्ये बेशुद्ध पडल्याचे नाटक करतो. त्याला हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात येते. व ठरल्याप्रमाणे दुसऱ्यादिवशी त्याला मृत घोषीत करण्यात येते. डॉक्टरांबरोबर केलेल्या कराराप्रमाणे डॅमेनला दुसऱ्या निरोगी व तरुण शरीतात ट्रान्सफर करण्यात येते. आणि येथून चित्रपटाला खरी सुरवात होते. डॅमेनला जेंव्हा या प्रयोगाची माहीती दिली जाते तेंव्हा त्याला सांगण्यात आलेले असते की ज्या शरीरात त्याला ट्रान्सफर केले जाणार आहे ते शरीर प्रयोगशाळेत बनवलेले असेल. पण प्रत्यक्षात जेंव्हा शेडींगची प्रक्रिया पुर्ण होते तेंव्हा डॅमेनला काही अनोळखी चेहरे दिसायला सुरवात होते. खरंतर या प्रयोगात काही त्रुटी राहीलेल्या असतात, ज्या डॉक्टरांनी डॅमेनला सांगीतलेल्या नव्हत्या. तसेच काही गोष्टी खोट्याही सांगितलेल्या असतात. शेडींगनंतर डॅमेनच्या लक्षात येते की ज्या शरीरात त्याला ट्रान्सफर केलेले आहे ते प्रयोगशाळेत निर्माण केलेले नसुन ते एका व्यक्तीचे आहे, ज्याला एक पत्नी आणि एक लहाण मुलगीही आहे. त्याला ज्या काही आठवणी येतात, चेहरे दिसतात ते आगोदरच्या व्यक्तीच्या आयुष्यातील आहेत. डॅमेन जरी करोडपती असला, पक्का व्यवसायीक असला तरी तो निर्दय खासच नाहीये. त्यामुळे ऊर्वरीत चित्रपटात तो या प्रयोग करणाऱ्यांविरोधात लढतो. नविन तरुण शरीरात असताना स्वःताच्या मुलीला भेटतो. “तुझ्या वडीलांचा मित्र आहे” असं सांगून स्वःताची बाजू तिच्यापुढे मांडतो. साईड ईफेक्टसाठी घेत असलेली औषधे बंद करुन स्वःता संपतो व ज्याचे ते शरीर आहे त्याला ते परत मिळते. (कसं ते चित्रपटात सविस्तर कळेल.) एकूण काय, तर हा चित्रपट असो किंवा ययाती. दोन्ही नायकांना जे कळते, त्यावर त्यांची जी प्रतिक्रीया असते ती अगदी सारखीच आहे. ययातीला सुद्धा शेवटी या सगळ्याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा त्याचे जे ऊद्गार आहेत ते विचार करायला लावतातच. ययाती म्हणतो:
भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः
तपो न तप्तं वयमेव तप्ताः।
कालो न यातो वयमेव याताः
तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः॥

(मी भोग नाही भोगले, भोगाने मला भोगले आहे, मी तप नाही केले, तप करुन मी तप्त झालो, काळ नाही संपला, मी मात्र संपलो, तृष्णा नाही म्हातारी झाली पण मी मात्र म्हातारा झालो.)
कुठे CD मिळाली तर बघा आवर्जुन हा चित्रपट. डायरेक्शन, कथेची मांडणी वगैरे जेमतेमच आहे. बेन किंग्जले सुद्धा पाहूणा कलाकार आहे. पण बघायला हरकत नाही
.


२ टिप्पण्या:

  1. उत्तम ओळख. ययाती च्या कथेशी चित्रपटाच्या कथानकाशी संबंध खरोखर इंटरेस्टिंग आहे. छान लिहिता.

    उत्तर द्याहटवा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

गण्या

गण्या सातवीत सातव्यांदा नापास झाला आणि वैतागलेल्या गुरुजींनी त्याला मनसोक्त हाताखालून काढला. गण्या त्यादिवशी गुरुजींच्या हातातून जो सुटला ते...