❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

मंगळवार, १५ मे, २०१८

काही टिप्स

मागच्या लेखात काही टिप्स सांगायच्या राहील्या होत्या त्या आज पुर्ण करुयात. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना मागील टिप्सचा नक्कीच ऊपयोग झाला. असेल. मी लिहाताना जवळ जवळ फायनलच लिहितो. फार क्वचित एडिट करतो. त्या मुळे जसं आठवेल तसं लिहितो आहे. त्यांचे सविस्तर वर्गवारी काही करायच्या भानगडीत मी पडत नाही. या टिप्स माझ्या वापरात असलेल्या, मी स्वतः कधीना कधी वापरलेल्या आहेत. त्या मुळे त्या अर्धवट असायची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत असलेल्या काही युक्त्या तुम्ही कॉमेंट मध्ये सांगीतल्या तर ईतरांनाही त्याचा ऊपयोग होईल. आणि परत एकदा स्वानूभवातून सांगावसं वाटतं की कोणतीही टिप, मग ती कोणीही सांगितलेली असो, कृपया ती एकदा करुन पहा आणि मग ठरवा ती तुम्हाला आवडली की नाही. कोणतीही नविन पाककृती करताना “मला नाही आवडाणार कदाचीत” असं म्हणू नका. करुन पहा, चाखून पहा आणि मग ठरवा. तर चला, करुयात सुरवात!
काम सोपं करायच्या जशा युक्त्या असतात तशाच कामे न करण्याच्याही काही टिप्स आहेत. कामाचा कंटाळा असेल, आणि तुमच्याऐवजी दुसरं कोणी काम करायला घरात असेल तर काही गोष्टी करा. जर तुम्हाला काही काम सांगितलं, उदा. जरा लसुन सोलून दे तर “लसुन टिचभर, साले घरभर” या पद्धतीने सोलावा. कांदाही असाच कापावा. हे जरा सोपं व्हावं म्हणून फॅनचे स्पिड वाढवून त्याखाली बसुन ही कामे करावीत. गॅसवरील दुधाकडे पहायला सांगीतले असेल तर ‘दुध वर कसे येते, ऊतू कसे जाते, गॅसच्या शेगडीवर कसे पसरते’ हे बारकाइने पहावे. कणिक मळायला सांगीतले तर ‘पाणी जास्त झाले म्हणून पिठ, पिठ जास्त झाले म्हणून पाणी’ असं करीत चार मानसांना दहा मानसांची कणीक मळावी, घासलेली भांडी लावायला सांगीतली तर आवर्जून एखादा कप खाली पाडून फोडावा वगैरे. काही दिवसातच आई तुम्हाला कामे सांगायची बंद करेन. पण तुम्हाला मनापासुन कामाची आवड असेल तर ते कमी वेळात कसं होईल यासाठी काही टिप्स…….. 
1. कॉफी मध्ये चिमूटभर मिठ टाकून पहा, चॉकलेटवरही दोन दाने मिठ टाका. काही फळेही मिठ लावून मस्त लागतात. उदा. अर्धी पिकलेली (पाडाची) पोपई, कैरी किंवा आता ऊन्हाळा सुरु झालाय त्यामुळे कलींगड मिठ लावल्यावर अप्रतिम लागतात. 
2. वाफाळता चहा कपात ओतल्यावर वरुन एक चमचा साजूक तुप टाका. थंडीच्या दिवसात असा चहा फार छान लागतो. विकतचे तुप घेण्यापेक्षा विकतचे लोणी घ्या. छान तुप होते. तुप कढवताना त्यात नागवेलीचे पान टाकले तर तुप मस्त कणीदार होते. बेरीही कमी येते. बेरी असलेल्या पातेल्यात पाणी ऊकळायला ठेवा मग त्यात अर्धा तास भिजवलेला तांदूळ टाकून भात करुन घ्या.
3. प्रत्येक डाळी, तांदूळ हे शिजायला टाकायच्या अगोदर किमाण अर्धा तास भिजवून ठेवा. खिचडीसाठी साबूदाने भिजवताना निम्मे पाणी निम्मे ताक घ्या. खिचडी मऊ होते. परतायलाही नेहमीपेक्षा कमी वेळ लागतो. चव तर अप्रतीम लागते. सफरचंदे कापून बाजूला ठेवायची असतिल तर पाण्यात बुडवून ठेवल्यावर काळी होणार नाहीत. वाईन पित असाल विषेश प्रसंगी तर द्राक्षे फ्रिजर मध्ये ठेवा. चार द्राक्षे वाईन मध्ये टाकली तर वाईन थंड राहील. बासुंदी, लस्सीतही टाकू शकता. पदार्थाचे प्रेझेंटेशनही होते.
4. फळे कितीही स्वच्छ दिसली तर निट धुतल्या शिवाय खावू नका. फळविक्रेत्यांपासून अनेकांचे हात लागलेले असतात.
5. आता आंबेही येतील. आमरस-पुरी तर माझा जिव की प्राण पण मी आंबा वेगळ्या प्रकारेही खातो. पिकलेल्या अंब्याची कोयीच्या अगदी खेटून जास्तीत जास्त मोठी फोड कापुन घ्या. त्यावर लाल तिखट, मिरपुड, थोडं मिठ टाकून तुपाचा हात फिरवा आणि ही फोड विस्तवावर मस्त भाजून घ्या. मस्त लागते.
आमरस जर साजुक तुप टाकून खाल्ला तर छान लागतोच पण लहाण मुलांना पचायला त्रास होत नाही. आमरस पितळी किंवा तांब्याच्या भांड्यात साठवू नका अजीबात. अतिशय घातक फुड पॉइजनींग होण्याची शक्यता.

6. अंडी ऊकडताना पाण्यात मिठ टाका. फुटणार नाही. अंडी ऊकडायच्या अगोदर त्याला सुईने छोटे होल करा, सोलायला सोपे जातील. फ्रिज मध्ये ठेवताना अंडी ऊलटी ठेवा. निमूळता भाग खाली. लवकर खराब होणार नाही. अंडा-मसाला करायचा असेल तर ऊकडलेली अंडी तुपात सोणेरी तळून मग भाजीत टाका. अंडा-करी करणार असाल तर अंडी सुरीने न कापता दोऱ्याने कापा. त्यातील दोन अंड्यांचे पिवळे बलक रस्स्यात कुस्करुन टाका. दाटपणा येतो. ऊकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग कुस्करुन कांदा मिरची कढीपत्याची फोडणी करुन परतुन घेतली तर ऐनवेळी तोंडी लावायला काही तरी होते.
7. फ्रिज मध्ये भाज्या ठेवताना काळजी घ्या. आलं फ्रिजमध्ये ठेवल्यास टिकतेही आणि किसायलाही सोपे जाते. लिंबे फ्रिजमध्ये ठेवताना एखाद्या काचेच्या बाटलीत घट्ट झाकण लावू ठेवली तर जास्त टिकतात. केळी फ्रिजमध्ये कधीच ठेवू नयेत. कोथींबीर फ्रिजमध्ये ठेवायच्या अगोदर निवडून घ्यावी. तिची मुळे कापावीत, मग ठेवावी. सडत नाही लवकर. भाज्या ठेवताना कधीही प्लॅस्टीकच्या पिशवीत ठेवू नये. पेपर बॅगमध्ये ठेवावव्यात. या बॅग मार्केटमध्ये खुप स्वस्त मिळतात. या फ्रिजखालीच स्टोअर कराव्यात. मधाच्या किंव्या त्याआकाराच्या बाटल्या घरात खुप असतात. त्यांच्या झाकणाला ग्ल्यूने मॅग्नेट चिटकवून घ्यावे. या बाटल्यांमध्ये अनेक छोटे पदार्थ ठेवता येतात. उदा. जास्त सोलला गेलेला लसुन. या बाटल्या फ्रिजच्या रॅकला खालच्या बाजूने सहज चिकटवता येतात. त्यामुळे जास्त जागा वापरायला मिळते.
8. बटाट्याची सुकी भाजी करणार असाल तर बटाटे हळद टाकून ऊकडा, साल काढून अर्धा तास फ्रिज मध्ये ठेवा, छान चौकोनी तुकडे कापता येतात.
9. कांदे आणि बटाटे एकत्र ठेवल्यास बटाटे खराब होतात लवकर. केळी नेहमी वेगळी ठेवावी ईतर फळांपासुन. कारण केळ्यांसोबत ईतर फळांची पिकण्याची गती वाढते.
10. पदार्थ खारट झाला तर एक बटाटा सोलून त्याला टोचे मारून भाजीत टाका. खारटपणा कमी होईलच शिवाय ऊकडलेला बटाटा कापुन तुप, जिरे, मिरचीचे तुकडे टाकून परतला तर दोन मिनिटात मस्त जिरा-आलू तयार होईल. बटाटे-वांगी भाजी करताना त्यात आवर्जून सुकी मासळी टाका. मी करंदी टाकतो. वाह! काय लागते भाजी. मटण करतानाही त्यात मुठभर डाळ वापरली तुरीची तर मटण भारी लागते.
11. पोहे म्हटलं की लिंबू हवेच. पोहे करुन झाले की गॅस बंद करायच्या एक मिनिट अगोदर त्यावर लिंबाची साल बारीक किसणीने किसुन टाकावी. फक्त वरची पिवळी सालच किसली जाईल याची काळजी घ्या. आतला पांढरा भाग कडू असतो. लिंबाच्या सालीत तेल असते ज्यामुळे पोह्यांना हटके फ्लेवर येतो. “हे जरा वेगळं पण भारी लागतय. काय टाकलय?” असा भाव खानाऱ्याच्या चेहऱ्यावर आला की मला मजा वाटते.
12. शक्यतो वरण, आमटी आणि ऊसळींमध्ये साखर टाकण्याऐवजी गुळ टाका. साखरेला फक्त गोडवा असतो पण गुळाला गोडव्यासोबत खमंगपणा असतो. साखरेच्या डब्यात लवंग टाकल्यातर मुंग्या लागत नाही.
13. भाजी ऊरली असेल तर नाष्त्याला वेगळं काही करण्यापेक्षा त्याच भाजीत बेसनपीठ, गव्हाचे, ज्वारीचे पीठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, भरपुर कोथिंबिर, चाटमसाला टाका. भातही टाका असेल तर. मळूण घ्या छान आणि तव्यावर मस्त बटर टाकून थालिपिठ लावा. कधी कधी भाजणीच्या थालिपिठापेक्षाही हे थालिपिठ चवदार लागते.
14. सकाळी इडली करताना जर भात असेल रात्रीचा तर तो थोडासा इडलीच्या पिठात टाकून मिक्सरमधुन फिरवून घ्या. इडल्या हलक्या व नरम होतात. सकाळचा भात उरला असेल कुकरच्या भांड्यात तर संध्याकाळी कुकर लावताना त्याच भांड्यात तांदूळ-पाणी टाकून नेहमीसारख्या शिट्ट्या घ्या. सकाळचा भात आणि ताजा भात या फरक करता येत नाही खाताना.
15. भाताशिवाय जेवण पुर्ण होत नाही. पण एखाद्या दिवशी खालील प्रमाणेही भात करुन पहा. अर्धा कांदा एकदम पातळ ऊभा कापून भांड्यामध्ये तुपावर सोनेरी परतून घ्या. थोडे जिरे टाका. त्यात अर्धातास भिजवलेला तांदुळ छान परतून घ्या. जास्त परतू नका नाहीतर तांदूळ तुटेल. त्यात गरम पाणी टाकून नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्या. छान गुलाबी रंगाचा, सुवासीक भात तयार. 
16. कुकरऐवजी भांड्यात भात करत असाल तर भात साधारण ८० % शिजल्यावर झाकण काढा. ते झाकड जाड कापडात गुंडाळून भांड्यावर ठेवा व भात पुर्ण शिजवून घ्या. गटका/गचका होत नाही भाताचा.
17. नैवेद्यासाठी मुद करायची असेल भाताची तर वाटीमध्ये लिंबाची चकती, वरणातील एक टोमॅटोचा तुकडा, वरणातीलच दोन कढीपत्ता पाने, थोडी कोथींबिर, ओला नारळाचा चव टाकून मग भात दाबून भरा. ही वाटी ताटात उलटी करुन त्यावर खुप थोडं घट्ट वरण टाकून तुपाची धार टाका. ही मुद पाहूनच भुक लागते.
18. कणिक मळल्यानंतर कमित कमी अर्धा तास तरी ओल्या फडक्याने झाकून ठेवा. नाहीतर पोळ्या चांगल्या होणार नाही. कणकेला जोपर्यंत छान तुकतुकी येत नाही तोवर कणिक छान मळली गेली नाही हे नक्की. रात्री ऊरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवण्या पेक्षा पाण्यात पुर्णपणे बुडवून ठेवा. या पाण्यात बुडवलेल्या कणकेच्या पोळ्या ईतक्या रेशमासारख्या मऊ होतात की खाणारा नक्की विचारील “गहू कोणता आहे?” पोळी भाजताना चांगली टम्म फुगली की समजा पोळी मस्त भाजली. पण तिच्या आकाराच्या प्रेमात न पडता पोळी तव्यावरुन डब्यात ठेवताना तिरकी करुन दाबावी. पुर्ण वाफ निघाली पाहीजे. पोळ्यांच्या डब्यात नेहमी एक ताजा आल्याचा तुकडा ठेवा. पोळ्या मऊ रहातात. एखाद्या दिवशी चपाती ऐवजी रोटी खावी वाटली तर नेहमी सारखीच पण जरा जाड आणि छोटी चपाती लाटावी. तेल न लावता स्वच्छ कपड्याची घडी करुन त्याने ती दाबत दाबत तव्यावर फिरवावी. ही रोटीही फार चवदार लागते.
19. मी तळणीच्या पदार्थांच्या फारसे वाटेला गेलो नाही. आजही जात नाही. पण भजी आणि पुरी मी बरेचदा करतो. पावसाळ्यात बायकोकडे फर्माईश करण्यापेक्षा तिला करुन खायला घालायला आवडते. तर जेंव्हा बायको घरी नसते तेंव्हा बाहेरचं खान्यापेक्षा आम्रखंडाचा डबा आणून चार पुऱ्या तळायला मला आवडतं. भजी करायची असेल तर पिठ (बॅटर) पाण्यात भिजवण्यापेक्षा क्लब सोड्यामध्ये भिजवा. भजी कुरकूरीत होतात. भजी एकाच प्रकारची करण्यापेक्षा फ्रिजमधील असेल त्या भाज्या वापरल्या तर भजी खायला मजा येते. कांदा, बटाटा, वांगे, घोसाळे, फ्लॉवर, पालक वगैरे. पनिरही चालेल. पुऱ्यांसाठी पिठ मळताना अर्धा चमचा साखर टाकावी व जरा घट्टसर मळावे. पुऱ्या जास्त खुसखूशीत होतात. वातड होत नाहीत. भजी किंवा पुरी तळायच्या अगोदर गरम झालेल्या तेलात चिमुटभर मिठ टाकले तर पुऱ्या किंवा भजी तेलकट होणार नाही. तेलही कमी लागेल.
अहो हे सांगता सांगता वाढतच चालले आहे. अजून कितीतरी लिहिन्यासारखं आहे. हे वाचन्याच्या वेळात तुमचा स्वयंपाक ऊरकला असता येव्हाना. असो. थांबतो. तुम्हालाही काही सुचले तर कॉमेंटमध्ये लिहायला विसरु नका मात्र. 

1 टिप्पणी:

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

गण्या

गण्या सातवीत सातव्यांदा नापास झाला आणि वैतागलेल्या गुरुजींनी त्याला मनसोक्त हाताखालून काढला. गण्या त्यादिवशी गुरुजींच्या हातातून जो सुटला ते...