❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, २० मे, २०२४

हगामा

काल उरफाड्या घाटातली धुळ बैलांच्या तोंडच्या फेसानं जाग्यावर बसली होती. गाड्यांच्या शर्यतीने भल्याभल्यांच्या बैलांची रग जिरली होती. दुसऱ्या जत्रेच्या गाड्यांचे नियोजन करत बैलमालक आपापली जनावरं घेऊन दुपारपर्यंत वाटेला लागले होते. उरल्या सुरल्यांची जत्रा तमाशात पहाटपर्यंत हवेत शेमले, टोप्या फेकत संपली होती. आज यात्रेचा दुसरा दिवस. दंगलीचा दिवस, हगाम्याचा दिवस.
गाड्यांचा व तमाशाचा तसाही फारसा काही शौक नसल्याने मी तिकडे फिरकलो नव्हतो. पण कुस्ती माझा जिव्हाळ्याचा विषय. अर्थात फक्त पहाण्यापुरता. कधी पाचवी सहावीला असताना अंगाला आखाड्यातली लाल माती लागली असेल तेवढीच. त्यानंतर माझी वर्दी नेहमी प्रेक्षकांमधेच. जमलं तर जाऊ असा विचार करत असतानाच खालून काकोबाची खणखणीत हाक आली “हय अप्पा, हायेस का रं?”
मी गॅलरीत येऊन पाहीलं. समोर काकोबा उभा. सत्तरीच्या पुढची उमर. डोईला विटकरी रंगाचा घट्ट पटका. डाव्या खांद्यावरुन पुढे आलेला शेमला. पांढऱ्या शुभ्र छपरी मिशा. जत्रेच्या निमित्ताने घोटून केलेली दाढी. धुवट पांढऱ्या रंगाचा नविन बनशर्ट. त्याला साखळ्यांमधे गुंफलेल्या चांदीच्या गुंड्या. खाली धुवट शर्टाला न शोभणारे निळसर पांढरे, लाल काठाचे धोतर. तेही एका पायावर गुडघ्यापर्यंत व दुसऱ्या पायावर गुजराथी शेटजीसारखे अघळपघळ. पायात नविनच बांधून घेतलेल्या करकरीत वहाना. उमरीच्या मानाने ताठ कणा. शिडशिडीत पण काटक कुडी. आयुष्य पहिलवानकी करण्यात गेल्याने कमरेला धोतर असलं तरी चाल मात्र लुंगी घातल्यासारखी व काखेत लिंबं धरल्यासारखी डौलदार. रामोशाची जात सांगणारे सतेज डोळे. कपाळावर फासलेला भंडारा व त्यावर कोरलेली कुंकवाची रेष.
डाव्या खांद्यावरच्या शेमल्याने गळ्यातली चांदीत गोठलेली वाघनखे आजूबाजूला सारत घाम पुसत काकोबा माझ्या गॅलरीकडे डोळे लावून उभा होता.
मी गॅलरीतूनच विचारलं “एवढ्या सकाळी सकाळी ईकडे कसा रे काकोबा? ये वरती.”
शेमला पाठीवर फेकत काकोबा म्हणाला “वर नगं अप्पा. आदीच वखूत झालाय. जरा रानातली कामं, जित्राबांचं सम्द बैजवार वाटंला लाऊन आलोय. हगामा हाय नव्ह आज. तू कव्हा येशीन म्हणं?”
मी त्याला पुन्हा वर यायची खुण करत म्हणालो “येतोय रे मी. अगोदर तुझ्याकडेच येणार होतो, मग सोबतच जायचा विचार होता. किती वाजता सुरु होतोय हगामा?”
वर यायचे टाळत काकोबा म्हणाला “आता नाय वर येत. उन्हं कलायच्या वखताला हुतील रेवड्याच्या कुस्त्या सुरु. तू सिद्दा आखाड्याकडंच ये. मी हायेच. आता हालतो.”
माझ्या ऊत्तराची वाट न पहाता काकोबाने धोतराचे एक टोक हाताच्या तर्जनीला गुंडाळले व सोगा फलकारत तो डौल घालत निघालाही.
मी गेलो तेंव्हा रेवड्याच्या कुस्त्या सुरु झाल्या होत्या. पोरासोरांच्या कुस्त्या असल्या तरी आखाडा खचाखच भरला होता. घड्याळाचे काटे फिरावे तसे दोन हलगीवाले तडतडत आखाड्यात फिरत होते. दहा बारा वर्षांची दोन पोरे मातीत झोंबाझोंबी करत होती. मी काकोबाला शोधलं. तो आयोजकांच्या टेबलवर मांडी घालून सप्पय बसला होता.
मी त्याच्याकडे गेल्यावर काकोबा उगाचच कुणावर तरी खेकसला “उठ रं बेन्या, माणसं बी कळना झाली व्हय रं तुला” त्या बिचाऱ्या पोराने गुमान खुर्ची खाली करुन दिली. मी निवांत टेकलो. तोवर आखाड्यातल्या पोरांची कुस्ती निकाली निघाली. काकोबाने जिंकलेल्या पोराला रेवड्या, भगवा फेटा व शंभर रुपये दिले. दोन्ही बालपहिलवान उड्या मारत आखाड्याच्या गर्दीतून वाट काढत सुसाट पळाले. तोवर दुसऱ्या दोन जोड्या मातीत उतरल्या होत्या. अर्ध्या तासात सात आठ जोड्या माती खंगाळून गेल्या. काकोबा रितीप्रमाणे जिंकणाऱ्याला रेवड्या, पटके व शंभरची नोट देत होता. पाया पडणाऱ्या पोरांच्या पाठीवरुन हात फिरवत होता. मला मात्र काही कुस्त्या पहाण्यात रस वाटेना.
न रहावून मी म्हणालो “काय रे काकोबा, अशी कशी रे ही पोरं! अशी कुठं कुस्ती असते का? जोर नाही एकाही कार्ट्यात आजकालच्या. उगी आपलं एकमेकांची अंगे रापतायेत. जीवावर आल्यासारखी खेळतात. एकाही पोराचा हात शड्डूसाठी उठला नाही की रगेलपणे एकमेकांना भिडले नाहीत. ह्या, मजा नाही.”
काकोबा मोठ्याने हसला व म्हणाला “यांच्या या खेळण्यावं जावू नगस अप्पा. लय बाराची बेनी हायती. ईळभर डोंगर कोळपत हिंडत्यात. येळला करडापायी लांडगा घेत्यात अंगावं. नखऱ्याला आली तर मस्तवाल गोऱ्ह्याला खळीला आणत्यात. हायस कुठं! दम तुला गम्मत दावतो.”
आता काकोबा काय गम्मत दाखवतोय ते समजेना. काकोबा उठला. आखाड्यात उतरलेल्या तेरा चौदा वय असलेल्या पोरांना थांबवत त्याने माईक हातात घेतला. हलगीवालेही थांबले. काकोबाने टेबलवरचा पटका हातात घेऊन उंचावला व म्हणाला “आस्मान दाखवणाऱ्याला जेवढं बक्षीस मिळंन तेवढंच बक्षीस आभाळ पाह्यनाऱ्यालाबी मिळन. जिकलेल्या पैलवानाला पंचायतीतर्फे शाळेची कापडं मिळत्याल. जिकणाऱ्यानं जाताना गोपीनाथाकं माप देवूनच आखाडा सोडायचा हाये. आता हुंद्या जोरात. घ्या हनमंताचं नाव आन् भिडा एकुनाराला.”
काकोबा खाली बसला आणि आखाड्यातली पोरं पळत त्याच्या पाया पडायला आली. काकोबाने दोघांच्याही पाठीवरुन हात फिरवला. दोन्ही हातांचे अंगठे लंगोटामधे सारुन पुढेमागे फिरवत पोरं आखाड्याकडे वळाली. एकमेकांचा अंदाज घेत त्यांनी खालची लाल माती एकमेकांच्या हातात सरकवली. मधे क्षणभर एकमेकांचा अंदाज घेत ते दोन्ही पहिलवान थांबले आणि पापणी लवायच्या आत एक पोरगं विजेच्या गतीने समोरच्या मुलाच्या पटात शिरले. पण त्याच्या अपेक्षापेक्षाही समोरचं पोरगं जास्त सावध होतं. त्याने किंचीत सरकत बगल दिली आणि पटात घुसणाऱ्याचे डोके अलगद त्याच्या कचाट्यात सापडले. मुख्य दंगलीची वाट पहात गप्पा मारणारा आखाडा एकदम स्तब्ध झाला. समोर काहीतरी वेगळं चाललय हे लक्षात येताच पहाणारे सावरले. प्रेक्षकांकडे पहात हलगी वाजवणारे क्षणात मागे फिरुन हलगी वाजवू लागले. त्यातला एक त्या दोन पोरांच्या अगदी जवळ जात त्यांना चेव येईल अशी हलगी तडतडवू लागला. बोलून चालून हलगी म्हणजे रणवाद्य. ते चढीला लागल्यावर भिडलेले पहिलवानही एकदम ईरेसरीला येत भिडले. खळीला आले. नागापेक्षा त्याचं पिल्लू घातकी असतं. तशी ही पोरं थोरल्या पहिलवानांना लाजवतील अशी चपळाई दाखवत एकमेकांचा पट काढायच्या मागे लागली. कालच्या घाटातल्या दारु पाजलेल्या बैलांनी काय धुरळा उठवला असेल अशी लाल मातीची धुंद उठवली पोरांनी. बिनावस्तादी पहिलवान ते. फिरत जत्रेत आलेले व गम्मत म्हणून आखाड्यात उतरलेले. त्यांना चेतवायला कुठला आलाय त्यांचा वस्ताद! पण जशी आंधळ्याची गुरे देव राखतो तसेच विनावस्तादाच्या पहिलवानाला त्याची आळी राखते. एक पोरगं आपलं आहे हे लक्षात येताच सगळा रामोसवाडा त्याला पेटवायला उभा राहीला. आपसुकच दुसऱ्या पोरासाठी सगळी पारवाडी पुढे सरसावली. जो आखाडा दिवस मावळतीला नामी पहिलवानांच्या दंगलीने उसळायचा तो आताच या पोरांनी रंगाला आणला. तसेही नामी पहिलवानांची कुस्ती म्हणजे ख्याल. ते अंदाज घेत बसणार, जपून भिडणार, बचावाचा खेळ करणार, एकमेकांना कैची घालून पंच सोडवत नाही तोवर मातीत अजगरासारखे पडून रहाणार वगैरे. या पोरांची कुस्ती म्हणजे एकदम द्रुत लयीतली बंदीशच. स्वरविस्तार वगैरे भानगडच नाही. नुसता विजेचा खेळ, सौदामिनीची मस्ती, वळवाची झड. चार मिनिटही पोरं एकमेकांना भिडली नाहीत तोवर एकदम सगळा आखाडा उभा राहीला. टोप्या हवेत उडाल्या. “भले शाब्बास!” “वा रं वाघरा” चा गजर झाला. त्या लाल धुळीतून ती कुस्ती निकाली काढलेली दोन्ही पोरं चालत काकोबाकडे आली. नामवंत पहिलवानाला द्यावा तसा मान देत काकोबा पुढे झाला. बंडी खराब होईल याची फिकीर न करता जिंकलेल्या पोराला त्याने खांद्यावर घेतले. हाताने त्याच्या तोंडात खडीसाखर भरवली. त्याच्या लहानग्या डोक्यावर कौतूकाने पटका बांधला. बक्षिसाचे शंभर देवून वर स्वतःचे पाचशे त्या बालमारुतीच्या हातात कोंबले. एव्हाना गोपीनाथानं मापं घ्यायला टेप आणन्यासाठी पोरगं गावाकडं पिटाळलं होतं.
जरा वेळाने मी काकोबाला विचारलं “एवढा वेळ थातूरमातूर खेळणारी पोरं एवढी पेटली कशी रे काकोबा? वाटलं नव्हतं पोरं एवढी जालीम दंगल करतील म्हणून!”
काकोबा हसुन म्हणाला “अप्पा अरं येडाय तू. तुला ईकून येतील ही बेनी. आरं ती आदीच ठरवून येत्यात आखाड्यात. जरा वखुत झोंबाझोंबी करायची. मंग एकान पाडायचं, दुसऱ्यानं पडायचं. हाय काय त्यात. बक्षिसाचं शंभर मिळालं की गावात जावून भेळ, भजी, लाडू खायचं. उरलेलं पैसं वाटून घ्याचं.”
मी डोक्याला हात लावला.
काकोबा म्हणाला “आता जो जिकन त्याला कापडं. आन् ते बी माप द्यावं लागणार, वाटून घ्यायचा सवालच नाय. मंग कसा सौदा तुटायचा? पैशाचं म्हणावं तर ते दोगांनाबी मिळत्यात. मंग भिडली पोरं. आन् पहिलवान एकदा भिडलं की मंग त्ये कुणाचं नस्त्यात अप्पा. ईरेसरी जशी चांगली तशी वाईटबी हाय. पोरं हाय गुणाची पण लबाडी त्यांना ईरंला पडू द्येत नाय. हाय ते बरंय.”
पोरं कितीही बिलंदर असली तरी काकोबाने पोरांच्या बापाच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात. असं असलं तरी मला काकोबाचा स्वभाव फार आवडतो. सगळं काही समजत असुन तो कधी “आमच्या वख्ताला असं नव्हतं गा” असं रडगाणं लावत नाही. काकोबाने त्याचं असंख्याचा अभाव असलेलं लहानपणही आनंदाने स्विकारलं असणार आणि आताच्या पोरांचं बिलंदर लहानपणही तो तेवढ्याच सहजपणे स्विकारतो. ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ या रोगाला बळी न पडलेला एवढा एकच म्हातारा मी पाहीलाय.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...