❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, २० मे, २०२४

होळी

पुर्वी आमच्या गावी होळीच्या दिवशी संध्याकाळी ‘सोंगे’ निघत. ही सोंगे करणारे काही ठराविक कलाकार असत गावात. यात अर्थात आवडीचा भाग असे, जाती-धर्माचा नाही. होळी महिनाभर पुढे असताना या कलाकारांची गावमारुतीच्या देवळात बैठका बसायला सुरवात होई. यावर्षी कुणी कोणते सोंग काढायचे यावर चार चार तास चर्चा रंगे. या बैठकांना चहा पाणी न सांगता पुरवला जाई, संध्याकाळी मारुतीरायाची आरती सुरु झाल्याचे भानही या मंडळींना नसायचे. होळीपर्यंत यांचे जग वेगळेच होऊन जात असे. एकदा का कुणी काय सोंग काढायचे हे ठरले की मग त्याची तयारी सुरु होई, तालीम सुरु होई. जे कलाकार देवादिकांची सोंगे काढणार असत ते ‘म’कार वर्ज्य करत. मद्य, मदिरा व मदिराक्षी त्याज्य असे त्यांना. काहीतर मारुतीच्या देवळातच झोपायला येत. घर नको आणि घरधनीनीच्या संगाचा मोहही नको. या नियमांमागे पावित्र्य वगैरे जपण्याचा हेतू नसे, तर ते पात्र अंगी भिनवण्याचा हा एक प्रयत्न असे. आजच्या भाषेत ‘कॅरेक्टरमधे घुसण्याचा’ भाग असे. अर्थात शंकराची जास्त सोंगे निघण्यामागे हेच कारण असे. कारण महादेवाच्या सोंगासाठी चिलिम सोडायची गरज नसे. उलट राजरोस बैठक जमवायची परवानगीच मिळे या कलाकारांना. होळीच्या दिवशी दुपारी अकरा बारा वाजता मारुती मंदिराशेजारी असलेल्या मोठ्या तालमीमधे हे कलाकार रंगरंगोटी करायला बसत. हे रंगकाम पहायला ईतरांना मज्जाव असे. तिन साडेतिनच्या दरम्यान एकेक सोंग बाहेर यायला सुरवात होई. हलगी, डफ, ताशा व तुतारीवाले हजर होत. यातून सनई, पिपाणी यासारखी वाद्ये वगळत. रणवाद्यांना प्राधान्य असे. तासाभरात या सोंगांच्या मिरवणूकीची सुरवात तुतारीच्या ललकारीने होई. ऊभी पेठ संपता संपता वाद्ये गरम झालेली असत, तुतारीची वादी तटतटलेली असे, सोंगे पेटायला सुरवात झालेली असे. या सोंगामधे वाघ, दैत्य, मारुतराया व महादेवाची सोंगे आघाडीवर असत. वाघांच्या डरकाळ्या मारत आजूबाजूच्या ओट्यांवर झेपा मारणे सुरु असे. महादेवाच्या तांडवाने रस्त्यावर धुळ ठरत नसे. हनूमानाला आळीतल्या प्रत्येक घरामधे लंका दिसत असे. या गदारोळामागे राम, गणपती, काळ्या व पांढऱ्या दाढीवाले ऋषीमुनी यांचा शांत जथा चालत असे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केलेल्या लोकांना आशिर्वाद देत गणपती व राम पुढे सरकत असत. या रामाला व गणपतीला महादेवाच्या तांडवापासून व हनुमानाच्या सत्राणे उड्डाणापासून वाचवण्यासाठी चारपाच गावकरी सावध होऊन कडे करुन चालत. महादेवाच्या हातात असलेल्या लाकडी त्रिशुळाच्या टोकांवर मोठ्ठी लिंबे टोचून ती भगव्या फडक्याने घट्ट बांधलेली असत. त्रिशुळाचे वजन वाढवण्यासाठी त्याच्या टोकाला जडशिळ डमरु बांधलेले असे. बेभान झालेल्या शंकराचे हे गरगरणारे त्रिशूळ कुणाला लागू नये म्हणून ही काळजी घेतलेली असली तरीही या त्रिशूळाचा भक्कम दणका कुणाला बसेल हे सांगता येत नसे. त्यामुळे भोलेनाथाच्या आजूबाजूला आपोआप एक रिकामे रिंगण तयार होत असे. ही मिरवणूक वरच्या आळीला येऊन बाजारपेठेकडे वळेपर्यंत अगदी बेभान झालेली असे. हलगी खळीला आलेली असे, तुतारीवाल्याच्या तोंडाला फेस आलेला असे. तुतारी फुंकूण फुंकूण त्याचा अगदी मारुती व्हायच्या बेताला आलेला असे. हलगीवाला अधून मधून शेजारी चालणाऱ्या मशालजीच्या हातातल्या मशालीवर हलगी तापवून घेई. डफवाला कातडी पानावर ओला रुमाल फिरवून डफाचा घुमारा वाढवी. मिरवणूकीच्या पुढे असणाऱ्या मारुतीच्या व वाघांच्या डोळ्यात रक्त उतरलेले असे. या सगळ्याच सोंगांचा त्या दिवशी निरंकार ऊपवास असुनही त्यांना कुठून तरी सातत्याने उर्जेचा पुरवठा होत असल्यासारखे ते घुमत असत. ही मिरवणूक बाजारपेठतून माघारी वळून धनगर आळी, सुतार आळी, बामणवाडा फिरत पुन्हा मारुतीच्या देवळापुढे येई. तेथे मारुतीच्या समोर पुन्हा एकदा सगळ्या वाद्यांचा गजर होई. तुतारीचा नाद आकाशाला भेदून जाई. सोंगे स्प्रिंग लावल्यासारखी नाचत व एकदाची मिरवणूक संपे. मारुतीची आरती होऊन गावकरी पांगत. घरोघरी होळीचा नैवेद्य भरायला घेतला जाई. रचलेल्या होळीभोवती ब्राम्हण ताटकळलेले असत. त्यांचे मंत्रोच्चार सुरु होत. तासाभरासाठी सगळे गाव शांत होई. सातच्या आसपास मारुती, रामराया व शनीपुढली होळी पेटत असे. मग विजेच्या माळेतले बल्ब पेटावेत तसे उभ्या आळीत प्रत्येक घरासमोर होळीचा शेंदरी ठिपका पेटत असे. तासभर शांत असलेले गाव पुन्हा एकदा ठोकलेल्या बोंबांच्या गदारोळात हरवून जाई. गावाच्या डोक्यावर हलक्याशा धुराची टोपडी अंधारातही दिसायला सुरवात होई.
ही होळी रात्रीत विझुन जाई. दुसऱ्या दिवशी धुळवड करुन गावासाठी होळीचा सण संपून जाई. मात्र या होळीत नाचलेल्या सोंगांपैकी काही सोंगासाठी ही होळी संपत नसे. दोन चार जणांसाठी हमखास डॉक्टर पहावा लागे. महिनाभर आधीपासून तयारी केलेल्या या कलाकारांच्या अंगातून सोंगांची पात्रं निघता निघत नसत. वाघ नाचवलेला माणूस धुळवडीच्या दिवशीच घरात बांधून घालावा लागे. पुढे आठाठ दिवस हा वाघ हातापायाला बांधलेल्या दोरखंडांना झटके देत डरकाळ्या फोडत असे. होळीनंतर साताठ दिवस गावात फिरणारा त्रिशूळधारी शंकर हमखास दिसे. दरवर्षीचाच हा प्रकार असल्याने आम्हाला यात काही नाविन्य नसे.
हळू हळू सोंगांची प्रथा बंद होत गेली. वाघाची एखाद दोन सोंगे तेवढी शिल्लक राहीली. आमच्या आगोदरची पिढी गेली आणि हे वाघही त्यांच्यासोबतच गेले. आता घरटी होळी पेटत नाही. पुरणावरणाचे महत्व राहिले नाही. ब्राम्हणांच्या मंत्रोच्चाराशिवाय होळी पेटू लागली. तिचेही महत्व कमी होत गेले, धुळवड महत्वाची झाली. धुळवडीचे नैवेद्य मागे सरले व भांग आणि रंग आले. सोंगे गेली, ते कलाकार गेले. ‘कॅरेक्टरमधे घुसणं’ हा प्रकार निव्वळ वाक्प्रचार बनुन राहीलाय. पात्रांविषयी कलाकारांच्या मनात असलेला आदर गेला. आता एखादा ऋषी ग्लासात दाढी भिजणार नाही याची काळजी घेत व्हिस्की प्यायला लागला व सिताही हातवारे करत अर्वाच्य शिव्या द्यायला लागली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चांगले दिवस आलेत.
मी मात्र आजही मारुतीच्या देवळापुढे तांडव करणाऱ्या महादेवाचे त्रिशूळ चुकवून त्याच्या पायाखालची माती कपाळाला लावण्यासाठी धडपडतो आहे. पेटत्या हुडव्यातून नारळ काढताना भाजलेला माझा हात अजुनही हुळहूळतोय. कालाय तस्मै नमः म्हणत मला आजच्या पिढीशी जुळवून घेता येत नाहीए. माझ्यापुरता काळ त्याच आळीत मारुतीच्या देवळापुढे थांबलाय, गोठलाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...