❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, २० मे, २०२४

जिव्हाळा

मला पहाटे चार वाजता उठायची सवय असली तरी कामाला मात्र मी दहा-साडेदहापर्यंत हात लावत नाही. पण परवा सासवडला अत्यंत निकडीचे काम निघाले आणि दहा वाजेपर्यंत पुण्यातही असणे गरजेचे होते. त्यामुळे कधी नव्हे तो माझा पहाटेचा नियम बाजूला ठेवून मला सहा वाजता घर सोडने भाग होते. इतक्या लवकर निघण्याचा हेतू हा होता की सासवड परिसर पक्षिनिरीक्षकांचा आवडता भाग आहे, कदाचित आपल्यालाही काही फोटो मिळतील व अकरापर्यंत पुण्यात येता येईल. रात्री गुगल काढून शोध घेतला आणि एवढ्याशा सासवडमधे कुठे कुठे जायचे याची यादी वाढतच चालली. सासवडजवळील काही भागात रॅप्टर्स पहायला मिळतात. गरुड, ससाणे वगैरे. तेथूनच काही किलोमिटर गेले की हरणांचे भरपुर कळप अगदी सहज दिसतात. सासवड गावात सोपानकाकांचे, महादेवाचे वगैरे मंदिरे पहाण्यासारखी आहेत, दोन मिसळची ठिकाणे यादीत अगोदर होतीच. या सगळ्याला दिवस पुरणार नव्हता. त्यामुळे सगळ्यावर काठ मारुन फक्त काम डोळ्यापुढे ठेवून सकाळी लवकर निघालो. काही दिसलेच तर सोबत असावा म्हणून कॅमेरा मात्र घेतला. मिसळ पुन्हा कधीतरी चाखू म्हणत काही बिस्किटचे पुडे, चॉकलेटस, चार केळी व ज्युसची बाटली गाडीत टाकली आणि निघालो. तोच तोच रस्ता काय पहायचा म्हणून आणि रुट बदलला तर प्रवास जरा सुखकर होतो हा नेहमीचा अनुभव असल्याने दिवे घाटाचा रस्ता टाळून मी गाडी कोरेगावकडे वळवली.
सात आठ किलोमिटर अंतर पार केल्यानंतर सोलापुर महामार्ग सोडून मी उजवीकडे वळालो आणि काही क्षणातच फिरत्या रंगमंचावरील दृष्य बदलावे तसे परिसराचे दृष्य अचानक बदलले. रस्ता एकपदरी झाला. त्याच्या दुतर्फा बाभूळ, वडाची झाडे दिसायला लागली. रस्ता एकपदरी असल्याने दोन्ही बाजूला असलेली शेते अगदी रस्त्याला भिडली होती. अधून मधून असलेल्या कौलारु घरांची अंगनेही जवळ जवळ रस्त्याला लागून होती. अनेक घराच्या कौलांवर हलका धुर रेंगाळताना दिसत होता. दोन्ही बाजूस शेती होती. हवेतला गारवा वाढल्यासारखा वाटला. सुर्योदयाला अजुन वेळ होता पण चांगले फटफटले होते. मागे जाणाऱ्या शेतात माणसांची लगबग जाणवत होती. रस्ता लहान लहान टेकड्यांमधून जात होता. त्या टेकड्यांनी गळ्यात मफलर घालावा तसा विरळ धुक्याचा गोफ गुंडाळला होता. हवेला मातीचा, गवताचा, शेणाचा व धुराचा सुरेख वास होता. थंड वाऱ्याने माझ्या नाकाचा शेंडा हुळहूळल्यासारखा झाला होता. हे वातावरण पाहू गरमागरम, कडक चहा हवा असे फार तिव्रतेने वाटायला लागले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडीत काकडा लावला होता. त्या सुरांना सगळ्या वातावरणामुळे वेगळीच झिलई चढली होती. त्यातील अभंगांचे अर्थ नव्याने उमगायला लागले. हातावर हात चोळत बायकोने खुप वेळा काचा वर करायला सांगूनही मी त्या तशाच ठेवल्या होत्या. गाडीचा वेग मात्र जरा कमी करुन मी अगदी रमत गमत चाललो होतो. एका हाताने गाडी चालवत मी माझा उजवा हात गाडीबाहेर काढला होता. थंडीमुळे त्यावर डोळ्यांना स्पष्ट दिसेल असा काटा उभा राहीला होता. मी समोरच्या टेकडीला वळसा घातला आणि समोरच सुर्यनारायणाचे दर्शन झाले. लहान मुलाने उत्सुकतेने खिडकीवर हनुवटी ठेवून पलीकडे चालली एखादी मिरवनूक पहावी तसे समोरच्या टेकडी मागून सुर्य हलकेच डोकावून पहात होता. अलीकडे असलेल्या विजेच्या खांबात तो अडकल्यासारखा वाटत होता. अगदी तापहीन असलेला तो सुर्याचा गोळा डोळ्यांना चक्क सुखावत होता. पंधरा मिनिटांनंतर याच्याकडे पहानेही असह्य होणार होते. मी गाडी बाजूला घेतली. खरेतर कॅमेरा काढून फोटो वगैरे काढण्यात उगाच वेळ घालवावा वाटत नव्हते पण सवयीचा गुलाम असल्याप्रमाणे मी काही स्नॅप घेतले. पुन्हा एकदा चहाचा वाफाळता कप डोळ्यांपुढे फिरुन गेला. मी गाडीत बसलो. निघायला तर पाहीजे होते. बायको का आली नाही म्हणून पाहीले तर ती रस्ता ओलांडून पलिकडे गेली होती. मी पाहिले आणि पहातच राहीलो. रस्त्याच्या कडेलाच अगदी खेटून एक लहानसे कौलारु घर होते. त्याच्या अंगणात बऱ्याच कोंबड्या चरत होत्या. काही शेळ्याही दिसत होत्या. चवड्यावर बसुन एक म्हातारी अंगन झाडत होती. झाडताना ती सारखी डोक्यावरचा पदर आणि नाकातली नथ सावरत होती. पलिकडे अतिशय लहान असलेल्या शेतात एका शेतकऱ्याने नांगर धरला होता. त्याच्या नांगराच्या पुढे मागे अनेक बगळे, कोंबड्या ढेकळातले धान्य, किडे वगैरे टिपत होते. त्या काळ्याभोर रानात त्या रंगीत कोंबड्या आणि पांढरेशुभ्र बगळे छान उठून दिसत होते. एक कुत्रा अधून मधून बगळ्यांच्या मागे लागत होता. बैलही अगदी जीवा शिवाची जोड असावी तशी पांढरी शुभ्र, लांब शिंगाची होती. ती लाल रंगात रंगवलेली शिंगे लांबूनही उठून दिसत होती. शेत अगदी लहानसे होते. बहुतेक घरचा भाजीपाला करण्यासाठी असावे. त्याच्या मागे झाडी दिसत होती. झाडीच्या मागे दुरवर अस्पष्ट डोंगर धुक्यात हरवले होते. एकून ते सगळे दृष्य अगदी चित्रात असावे तसे दिसत होते. चित्रही कसे, तर लहान मुल हट्टाने एखादे चित्र काढते व त्यात त्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी काढते. निळे आकाश, त्यात उडणारी पक्ष्यांची रांग, दोन डोंगरांच्या मधून उगवणारा सुर्य, शेजारून वहानारी नदी, नदीवर मासे पकडणारा कोळी वगैरे सगळे ते मुल एकाच चित्रात बसवायचा प्रयत्न करते तसे येथे बहुतेक सगळ्या गोष्टी एकाच फ्रेममधे होत्या. आणि त्याही अगदी खऱ्याखुऱ्या. माझ्या गावीही साधारण असेच वातावरण असते तरीही ते परिपुर्ण चित्र पाहून मला हरखल्यासारखे झाले. मी काहीही न बोलता गाडी लॉक केली आणि कॅमेरा घेवून शेताकडे निघालो. बायकोही मागोमाग होती. मला या पक्षीनिरीक्षणाचा छंद जडल्यापासून तिलाही एक नविन विरंगुळा सापडला आहे. मला दिसायच्या अगोदर एखादा पक्षी शोधायची तिला घाई असते. असा एखादा पक्षी दिसला की मला दाखवून तिला कोण आनंद होतो. “मी आहे म्हणून तुला पक्षी दिसला, नाहीतर तुला दिसला असता का तो?” असा टोमणा मला ऐकवून ती दुसरा पक्षी शोधत बसते. आताही तिला शेतकऱ्याच्या नांगराऐवजी पलीकडे असलेले लहानसे तळे व तेथे अजुन न दिसलेले पक्षी दिसत असाावेत. आम्ही समोरचा बांध उतरलो आणि बगळ्यांच्या मागे लागणारा कुत्रा आमच्याकडे पळत आला. एकून वातावरणामुळे मला त्याची भिती वाटायच्या ऐवजी मीच त्याला “वाघ्या इकडे ये” म्हणत हाका मारल्या. (त्याचे नाव टायग्या म्हणजे टायगर होते हे नंतर समजले) दिसायला जरा उग्र असलेले ते गावठी व म्हणूनच चलाख असलेले कुत्रे जवळ आले. त्याने प्रथम मला, मग बायकोला समाधान होईपर्यंत हुंगले व काही धोका नाही हे समजल्यावर ते शेपटी हलवत पुन्हा मागे पळाले. चला, सुरवात तर चांगली झाली होती. आम्ही अंगणात आल्यावर म्हातारीने झाडू खाली ठेवून आमच्याकडे डोळे किलकिले करत पाहीले. मग तेथेच रचलेल्या गोधड्यांच्या चळतीमधून तिने एक वाकळ बाजूच्या लोखंडी कॉटवर टाकली व “बसा, वाईच पानी आन्ते” म्हणत वाकतच आतमधे गेली. म्हातारीचा मोकळेपणा पाहून मला छान वाटले. मी कॅमेरा तेथेच ठेवून निवांत बसलो. बायको एव्हाना शेजारच्या शेतात पोहचली होती.
म्हातारीने पाण्याचा तांब्या माझ्या हातात दिला व जमीनीवर बसत मला विचारले “कोन गावचं पाव्हनं म्हनायचं?”
पाणी प्यायलावर तांब्या बाजूला ठेवत मी म्हणालो “पुण्याहून आलोय आज्जी. नांगर पाहिला शेतातला म्हणून जरा थांबलो”
“आस्सं! चांगलय. जेजूरीला चाललाय जनू” आज्जीचा पुढचा प्रश्न तयारच होता.
“जेजूरीला नाही आज्जी. येथेच सासवडला काम आहे जरा. दुपारपर्यंत माघारी फिरु” आज्जीचे वय पाहून माझा आवाज उगाच चढा लागला.
“आस्सं! मंग गडावं नाय जात तर. आसुंदे, आसुंदे! बस लेकरा, जरा लेकाला हाकारते. नांगूर धरलाय त्यो थोरला हाय. धाकला रातीच सासवडाला गेलाय. गरम हाय डोक्यानी पर चांगला हाय” असं म्हणत म्हातारी जमीनीला रेटा देत “इठ्ठला, पांडूरंगा” म्हणत उठली. तिच्या थकल्या तनूची धनूकली झाली होती. सहज ऐंशीच्या पुढे असावी. बाजूच्या कुडाचा आधार घेत ती घराच्या टोकापर्यंत गेली. नांगर अगदी समोरच चालला होता. तिने शेताकडे पहात एक दोनदा फक्त हात हलवला व पुन्हा माझ्या समोर येवून बसली. समोरच्या झाडूच्या काड्या निट करायचा चाळा आज्जीने सुरु केला. दहा मिनिटातच घुंगराचा आवाज आला. मागोमाग बनियन व पायजमा घातलेला, डोक्यावर गांधी टोपी असलेला, तिचा मुलगा अंगणात आला. पन्नाशीच्या आसपास असावा. कुडाला पाठ टेकवून त्याने आरामशीर मांडी घातली. डोक्यावरची टोपी मांडीवर आपटून साफ केल्यासारखी केली आणि माझ्याकडे पाहून त्यानेही अगदी तोच प्रश्न मला विचारला “कोन गावचं पाव्हनं म्हनायचं?”
मी आज्जीला सांगितलेले पुन्हा एकदा त्यांना ऐकवले. यावर त्यांचा प्रतिसाद अगदी आज्जीसारखाच होता.
“आऽऽस्सं! जेजूरीला चाल्लाय जनू दर्शनाला?”
मला उगाच वाटून गेले की गालाला काही हळद वगैरे लागलीय की काय माझ्या.
मी हसुन म्हणालो “नाही. सासवडला जरा काम आहे. तुमचा नांगर पाहिला म्हणून थांबलो”
“ब्येस केलं” म्हणत त्याने आत पहात आवाज दिला “अगं ये! चहा ठ्येव पाव्हन्यांना”
मग माझ्याकडे पहात तो म्हणाला “तुमी चहा घ्या तवर माझा तास उरकीतो. मग भाकर खावूनच निघा”
मला काही समजेनाच. आमच्याकडे कुणी पाहूणे येणार असतील तर आमचे तोंड वाकडे होते आणि येथे ओळख पाळख नसलेल्या माणसांना पाहुणा समजून बडदास्त ठेवली जात होती. एक वेळ चहाचा आग्रह मी समजू शकलो असतो पण “जेवूनच जा” या आग्रहाचा अर्थ समजण्याइतका दिलदारपणा मी कधी कुणाला दाखवलाच नव्हता. कधी कुणा अनोळखी व्यक्तीला पंक्तीला घेवून प्रेमाने खावू खातले असते तर कदाचीत त्या माय-लेकांच्या प्रेमाचा अर्थ मला समजला असता. “भाकर खावूनच निघा” यातली सहजता पाहून चोविस तास दार बंद असलेल्या घरात रहाणाऱ्या माझ्यासारख्याला ठेच लागली. पाचच मिनिटात शेतकरी दादांच्या बायकोने चहाचे कप आणले. बायको अजुन शेताकडेच होती. त्यामुळे एक कप माझ्या हातात देवून तिने एक कप पुन्हा मागे नेला. चहा कपभरुन तर होताच पण बशी देखील अर्धी भरलेली होती. मी बशीतील चहा संपवला व निवांतपणे कपातील चहाचा आनंद घ्यायला सुरवात केली. चहा जरा जास्तच गोड होता. किंचित स्मोकी फ्लेवरही होता चहाला. मला मघापासुनच चहा प्यायची खुप इच्छा झाली होती त्यामुळे तो गोड चहा मला फार टेस्टी लागत होता. मी कप घेवून कॉटवरुन उठलो. रस्त्याच्या कडेला उभा राहून चहा पित राहीलो. समोरचा दिनमनी आता टेकडीमागून बराच वर येवून एका मोठ्या लिंबाच्या झाडामागे लपला होता. टेकडीवर असलेल्या ज्वारी बाजरीच्या शेतातील पिके काळी पण रेखीव दिसत होती. असे वाटत होते की गारव्यामुळे त्या टेकडीच्या अंगावर रोमांच उठले आहेत. हवेत थंडी नसली तरी चांगलाच गारवा होता. धुक्याचा आता मागमुसही नव्हता. पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता. आकाशही क्षितीजावर शेंदरी होत माथ्यावर निळेभोर व्हायला लागले होते. त्या निळसर शेंदरी आकाशात बगळ्यांचे चंद्रहार उडत होते. त्यांच्यामागून करकोच्यांचीही माळ उडताना दिसत होती. “गेल्या त्या बगळ्यांच्या माळा आणि ‘बगळ्या बगळ्या कवडी दे’ म्हणायचा भाबडेपणा देखील हरवला आता” असं मी कैकदा मित्रांकडे गाऱ्हाने गायलो होतो. पण समोरच्या बगळ्यांच्या आणि करकोच्यांच्या उडणाऱ्या रांगा पाहून ‘सगळे जेथल्या तेथे आहे, आपणच या बेगडी जगण्यात हरवलोय’ हे लक्षात आले.
मी रिकामा कप खाली ठेवून शेतात गेलो तेंव्हा शेतकरी दादांनी नांगर पुन्हा सुरु केला होता. तेथे शेजारी एक लहानसे डबक्यासारखे तळे होते. बायको अजुनही तेथे उभी राहून काहीतरी शुट करत होती. मी जवळ गेल्यावर मला काही बोलू न देता तिने काय काय दिसले याची यादीच वाचायला सुरवात केली.
“समोर बघ, ते सँडपायपर अजुन बसलेत तेथे आणि वर पहा, किंगफिशर आहेत दोन” असं म्हणत तिने समोर बोट दाखवले.
मी बायकोच्या हातातला कॅमेरा बंद करत घराकडे हात करुन म्हणालो “तु अगोदर घरी जा. आज्जीबरोबर गप्पा मार. मी येतो येवढ्यात”
मी प्रथम तेथे फिरणाऱ्या कोंबड्या व अगदी घोळका करुन बसलेल्या बगळ्यांचे फोटो काढले. नांगराचे फोटो काढले. मग कॅमेरा गळ्यात अडकवून मी नांगराच्या सोबतीने शेतकरीदादांच्या बरोबर गप्पा मारत चालू लागलो. त्यांच्या कोण? कुठले? गाव कोणते? कुठे चाललोय? वगैरे प्रश्नांना उत्तरे देता देता दोन तिन चक्कर पुर्ण झाल्या. घरामागे येताच दादांनी नांगर शेताबाहेर काढला. बैल मोकळे करुन अंगणातल्या खुंट्याला गुंतवले. त्यांच्यासमोर काही गवत टाकून ते मला म्हणाले “लई वखूत थांबावलं तुमाला. चला पह्यली भाकर मोडू. आईबी वाट बघत आसन”
मी त्यांच्या मागून घरात आलो. घर म्हणजे चांगली तिस बाय बारा फुटांची लांबलचक खोली होती. साधारण विस फुटांवर मधेच एक चार फुट उंचीची मातीने सारवलेली भिंत होती. पलीकडे स्वयपाकघर असावे. रांगेत मांडलेली पितळी भांडी दिसत होती. आम्ही होतो त्या भागात एका बाजूला पोत्यांची लहान थप्पी व काही शेतीची औजारे होती. एक मोठा लाकडी पलंग होता. त्यावर दोन पाच सहा वर्षांची मुले खेळत होती. आम्ही आत आलो ते दार सोडून त्या खोलीला अजून दोन दारे होती. त्यातील एका दाराने मागे जात शेतकरी दादा म्हणाले “तुमी बसा. मी पाय खंगाळून आलोच”
मी भिंतीपलीकडील स्वयपाकघरात डोकावलो. बायको विनोदी चेहरा करुन पाटावर बसली होती, समोर बसलेल्या म्हातारीच्या डोळ्यात मिश्किलपणा दिसत होता. बाजूलाच गॅसची शेगडी होती. चहा मात्र चुलीवर ठेवलेला होता.
मी बायकोकडे पाहून म्हणालो “काय झाले? छान गप्पा रंगल्यात की तुमच्या”
बायकोऐवजी म्हातारीच गालभर हसत म्हणाली “काय नाय ओ. तुमच्या बायकूला इचारीत व्हते का केसं भुंडी कशापायी केली? पण एवढी गड्यावानी काम करती बाय तर भांडी धुनी, येनी फनी कव्हा करायची? चांगलं हाय. आसंच एकुनाराला धरुन राह्यचं बाबांनो. दुसरं काय हाय सांग?”
मी बायकोकडे पाहीले. तिला काही वाटलेले दिसले नाही. उलट गंमत वाटली असावी. आज्जीने तिच्या मशरुम की कोणत्या हेअरकटला बिनदिक्कत भुंडे केले होते.
मी शेतकरी दादांच्या शेजारी येवून बसलो. त्यांनी बसल्या जागेवरुनच “आई वाढती का गं? भुका लागल्यात” म्हणत आवाज दिला. मी इतक्या काकूळतीला येत त्यांना सांगितले की खरच जेवणाचे काही काढू नका आता. हवं तर पुन्हा एकदा चहा घेतो आम्ही. तसेही आम्ही अकरानंतरच जेवतो. त्यामुळे आता भुक नाही. खरे तर मला रोज सकाळी आठ वाजता पोटभर जेवायची सवय आहे. आता आठ वाजलेही होते. पण त्या कुटूंबाएवढा मनाचा मोकळेपणा माझ्याकडे नव्हता. अस्थानी संकोच मला पिठलं भाकरी खावू देत नव्हता. आम्ही जेवत नाही म्हटल्यावर आज्जी बरीच नाराज झाली.
“इतक्या वखूत बसलासा, थोडा वखूत आजून बसा. घडीभरात गरम भाकर वाढीते” म्हणत आज्जीने खुप आग्रह केला. “आमचं पुन्य कशापाई दवडता” म्हणत ब्लॅकमेलही केले. पण मला आणि बायकोला खरच तेथे इच्छा असुनही जेवायला मन करेना. कोण कुठले कुटूंब. पाणी दिले, चहा दिला, प्रेमाने चौकशी केली यातच आम्हाला खुप काही मिळाले होते.
मी पलंगावरुन खाली बसत म्हणालो “आज्जी चुलीवरचा तो चहाच द्या आता कप भर. जेवायला पुन्हा कधी तरी नक्की येवू आम्ही”
शेवटी अतिशय नाराजीनेच आज्जी कबूल झाली. तोवर बायकोने गाडीतून बिस्किटचे पुडे, चॉकलेट आणले होते. मी बिस्किट आज्जीकडे दिली आणि चॉकलेट त्या मुलांच्या समोर धरली. त्यातल्या एकाने चटकन चॉकलेट घेतले पण दुसऱ्या लहान मुलाने मात्र माझ्याकडे शंकेने पाहीले. त्याने बनियन घातले होते आणि खाली तो दिगंबरच होता. एका हाताचे बोट लाल करगोट्यामधे गुंतवून दुसऱ्या हाताने तो चक्क नुन्नीबरोबर खेळत होता. मान तिरकी करुन माझ्याकडे रोखून पहात होता. त्याच्या आईने त्याला भिंतीमागूनच आवाज देवून “घे बाळा, काका हायेत ना आपले? घे” असं सांगताच मात्र त्याने चटकन चॉकलेट घेतले व धावत आईच्या पदरामागे जावून लपला. तोवर आज्जीने चहा आणला. एका पितळी प्लेटमधे मी दिलेली बिस्किटे होती. माझीच बिस्किटस शेतकरी दादांनी मला आग्रहाने खायला लावली. या चहापानात आमची दहा मिनिटे गेली. बाहेर आता उन चढले होते. चहा घेता घेता मी पक्ष्यांचे फोटो का काढतो? त्याचे मला पैसे मिळतात का? किती मिळतात वगैरे माहिती शेतकरी दादांनी विचारुन घेतली. हा फक्त छंद आहे हे समजल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. माझे हे पक्षी-वेड पाहून त्यांनी मला जाताना कुठे कुठे पक्षी दिसतील याची एक जंत्रीच दिली. मला माहित असलेली नावे आणि ते सांगत असलेली नावे यात बराच फरक असला तरी त्यांना पक्ष्यांची अगदी बारीकसारीक माहिती आहे हे सहज लक्षात येत होते.
“आवं हे तं कायीच नाय. आमचं वडील व्हते तव्हा हे एक एक गिधाड उतरायचं रानात. दांडग्या गड्याला भ्या वाटन असा एक एक पक्षी. पन या कैकाड्यांनी आन फासेपारध्यांनी पार मारुन खाल्ली सम्दी गिधाडं. वस्तीवरच्या कोंबड्या चोरायच्या आन फास लावून गिधाडाला चारा म्हणून ठिवायच्या. कोंबड्या देवून गिधाडं मारनारी ही इपारी मानसं. पाक साफ केली गिधाडं. ढोक तर औशीदालाबी ठिवला नाय. आन काय काय पाखरं व्हती पन सम्दी गेली. पघायला मिळना आता ही पाखरं”
मी सर्व माहिती हरखल्यासारखी ऐकत होतो. छान वाटत होते.
“जाताना आपन नांगूर धरला व्हता का, त्या अंगाला चक्कर मारा एक. दोन चार खंडूबा असत्यात तिथ दिसभर. ढोकरीबी दिसन. तुताऱ्या तर इळभर असत्यात तिथं. आन इथून चार मैल गेलं का मंग एक चढ लागन. तिथं कुनालाबी इचारा फॅक्ट्री कुठशीक हाये. आपली पत्रावळीची फॅक्ट्री हाय ओ. तिथून खालच्या अंगाला कासराभर आत एक रस्ता उतारलाय. तिथून मैलभर गेलं की मोप हरनाचे कळप दिसतील. एखादा गरुड तर दिसनच दिसन. ससानं बी मोकार हायीत. उशीर व्हत नसन तर तसच पुढं निगायचं. मोठं तळं हाय. तिथं काय बाय दिसनच. तिथच दुपार केली त हरनं तिथच पान्यावर येत्यात. दिसतील तुमाला. पार ताप आनत्यात मानसाला. उभं पिक नासावत्यात. लई हावरी आन चवन्याची जात हाय ती. कोल्हं बाकी गेल्या दहा वर्षात दिसलं न्हाई पघा”
हे सगळं ऐकून मला उगाच तासभर वाया घालवल्यासारखे वाटले. या दादांना घेवून बसलो असतो तर तासाभरात त्यांनी सासवड परिसरातील पक्षी, प्राणी, त्यांची ठिकाणे यांची इत्यंभुत माहिती मला दिली असती. मी एकदोन बिस्कीटे खावून चहा संपवला. त्यांच्या सुनेने (सुनच असावी) बायकोला हळदी कुंकू लावले. मग बायको आज्जीच्या चक्क पाया पडली. (ही तिची जुनी सवय आहे) आम्ही निघालो तेंव्हा ती दोन पोरं, त्यांची आई, शेतकरीदादा, आज्जी अगदी डांबरी रस्त्यावर निरोप द्यायला आले. आज्जीचे अजुनही “दोन घास खाल्लं अस्त तर बरं वाटलं अस्त जीवाला” हे पालूपद सुरुच होते. आम्ही गाडीत बसलो. दोघांनीही पुन्हा जेवायला यायचे अगदी वचनच घेतले. “पुढच्या टायमाला आला की लेकाचीही भेट व्हईन तुमची” म्हणत शेतकरी दादांनी हात हलवला. मघाशी बुजलेली पोरेही आता अगदी हसत, ओरडत टा टा करत होती. गाडी दुर जाईपर्यंत मला रस्त्यावर उभी असलेली म्हातारीच्या शरीराची धनूकली आरशात दिसत राहीली.
किती वेळ घालवला आम्ही त्या लहानशा घरात? फार तर दिड तास. पण या दिड तासाने मला पुढच्या पुर्ण आठवडाभर पुरेल इतकी उर्जा दिली. मला एक सुफी शेर आठवला. “हैराँ हूं मेरे दिल मे समाये हो किस तरहा, हालाके दो जहाँ मे समाते नही हो तुम” याचे उत्तर त्या शेतकरी कुटूंबाने मला दिले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...