❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, २० मे, २०२४

नागराज


हाताला इतर काही उद्योग नसला की गावाच्या हद्दीवर असलेल्या खिंडीच्या परिसरात भटकणे हा माझा आवडता उद्योग. काल मित्राला सोबत घेऊन या खिंडीत उतरलो होतो. सगळा परिसर लहान टेकड्यांनी वेढलेला आहे. हिरवी मखमली शाल पांघरुन हत्तींचा कळप विसावल्यासारखं देखणं दृष्य. या टेकड्या कमी, हिरवी पठारेच जास्त आहेत. वाऱ्याची झुळूक आली की एका टेकडीच्या अंगावर शहाऱ्याची जी लाट ऊठते ती हळूहळू टेकड्या ओलांडत जात मधेच कुठेतरी विरते. या वेळोवेळी शहारणाऱ्या टेकड्यांच्या मधून बारमाही वहाणारा ओढा आहे. त्यालाही कदंब-करवंदं व वेड्या बाभळींनी अगदी येरगाटून टाकलय. जिथे टेकड्या जरा सप्पय होतात तेथे हा ओढा डोह बनुन विश्रांती घेतो. रानफुले हुडकत आम्ही दोघे एका मागून एक टेकड्या भटकत होतो. रानफुले आता बरीच कमी झालीत. बाजरीच्या दाण्याएवढी गुलाबी फुले मात्र सगळीकडे पसरलीत. मध्ये मध्ये सोनकीच्या फुलांच्या पिवळ्या बिंद्या खुलून दिसतात हिरव्या शालूवर. टेकड्यांना नजर लागू नये म्हणून मधेच एखादी ऐसपैस खडकाची लालसर राखाडी तिट पोपटी मखमलीवर उठून दिसत होती. दुपारचे दोन वाजत आले होते. सुर्य डोक्यावर होता. फुलपाखरे तुरळक दिसत होती. सकाळचे पक्षी कुठेतरी अदृष्य झाले होते व दुपारच्या शिफ्टचे चंडोल, खडपाकोळ्या वगैरे पक्षी दिसायला लागले होते. चालून चालून आता मला दमायला झाले होते. टेकडीच्या अगदी माथ्यावरच असलेल्या एका झाडाखाली आम्ही टेकलो.
तिन चार तास गप्पा मारत भटकल्याने आता बोलायला काही विषय राहीला नव्हता व उत्साहही उरला नव्हता. मी कॅमेऱ्याची लेन्स उगाच एखाद्या गवताच्या पात्यावर फोकस करायचा खेळ खेळत होतो. ईतक्यात शेजारी बसलेल्या मित्राने दोन्ही हात डोक्यावर नेत नमस्कारासाठी जोडले व तो मोठ्याने म्हणाला “शंभोऽऽऽ हर हर!” त्या निरव शांततेत त्याच्या त्या शंभोने मला दचकवलेच. भानावर येत मी आजुबाजूला पहात त्याला विचारले “कुठे दिसला रे?”
माझा हा मित्र जरा विचित्र आहे. तो अनेक डोळस अंधश्रद्धा बाळगून आहे. शंकराला आवडतो म्हणून तो बेलाचे झाड जपतो. कृष्णाला आवडते म्हणून तो कुठे कदंबाचे रोप दिसले की त्याला लगेच आळे करतो. वेगवेगळ्या देवांना आवडतात म्हणून वेगवेगळ्या रंगांची फुलझाडे जपतो, जोपासतो. शंकराचे वाहन म्हणून तो बैलांवर कधी आसूड ओढत नाही. कार्तिकेयाचे वाहन म्हणून कधी मोरांना त्रास देत नाही. खंडोबाचा व दत्तगुरुंचा आवडता म्हणून नेहमी कुत्र्यांना भाकरी वगैरे वाढतो. लक्ष्मीचे वाहन म्हणून घुबडांना मारत नाही. (कोंबडीला कोणत्याही देवाने वाहन म्हणून निवडले नाही म्हणून तो देवांचे आभारही मानतो.) शंकराचा दागीना म्हणून कधी नाग व ईतर साप मारत नाही. देवराई देवाची असते म्हणून त्यातल्या झाडांची पानेही तो तोडत नाही. त्याच्या शेतातल्या बाजरीवरचा पाखरांचा, चिमण्या-राघूंचा अधिकार त्याला मान्य असतो. तो कधी शेतात बुजगावणे उभारत नाही. एकून काय तर, प्रत्येक गोष्ट या ना त्या मार्गाने तो निसर्गाशी नेऊन भिडवतो व जपतो. मला त्याचं असं अंधश्रद्ध असणं आवडतं. असो.
“कुठेय रे?” असं विचारुन मी आजुबाजूला नजर फिरवली. मित्र म्हणाला “हलू नकोस. डाव्या हाताला पहा.” मी सहज डाव्या बाजूला नजर फिरवली आणि माझ्या सगळ्या अंगातून भितीची लहर अगदी स्पष्ट जाणवेल अशी सरसरली. हातावरचे केस एकदम शहारा आल्यासारखे भितीने उभे राहीले. माझ्यापासून अगदी पाच-साडेपाच फुटांवरच गवताच्या पात्यांमधून अर्धवट उघडलेला फना वर काढून तो आमच्याकडेच पहात होता. कॉलेजमध्ये असताना अमावश्येच्या मध्यरात्री स्मशानातली खापरे उचलून आणायच्या पैजा सहज जिंकल्यात मी. पण साप पाहीला की माझी तंतरते. मग तो विषारी असो अथवा बिनविषारी. मी त्या प्राण्यापासून हजार फुट दुर असतो. आणि येथे हजार फुट तर सोडाच, तो शेषाचा वंशज माझ्यापासून फक्त पाच फुटांवर होता व चक्क आमच्याकडेच पहात होता. भितीने माझी बसल्या जागी अहल्येची शिळा झाली. मित्राचा आवाज दुर कुठल्या डोंगराच्या मागून यावा तसा ऐकायला यायला लागला. भितीचा पहिला आवेग ओसरल्यावर मी भानावर आलो. तो अजुनही आमच्याकडेच पहात होता. अगदी न हलता. ईतका स्तब्ध की कुणी प्लॅस्टिकचा नाग समोर ठेवलाय की काय अशी शंका यावी. कॅमेरा माझ्यासमोर जमिनीवरच होता. त्याची लेन्स किंचीत वर उचलून मी एक फोटो काढला. भिती कमी झाली असली तरी गेली नव्हती. विचार केला, एखादा रेकॉर्ड शॉट मिळाला तरी खुप झालं. आपण आज नाग पाहिला एवढी नोंद करण्यापुरता फोटो असला की झाले. (ईतकं घाबरुन काढलेला हा पहिलाच क्लिक मला सगळ्या फोटोंमध्ये जास्त आवडला.) मी मित्राकडे पाहीले. तो शांत होता. मला घाबरलेले पाहून तो म्हणाला “बस रे शांत. जाईल तो त्याच्या वाटेने.” जरा निर्ढावल्यावर मी अजुन दहा बारा फोटो काढले. तो अजुनही हलत नव्हता. एकाच जागेवरुन किती फोटो काढणार म्हणून मी कॅमेऱ्याचा नाद सोडला व त्याच्याकडे पहात राहीलो. दोन तिन मिनिटे तो तसाच उभा राहीला व मग अर्धवट उघडलेला फना मिटवत तो पुढे सरकला. आता गवतामुळे तो मला दिसत नव्हता. मी मित्राला तेथून निघायची घाई करत होत पण त्याला काही फरक पडत नव्हता. आपल्यापासून पाच सहा फुटांवर नाग आहे आणि तो आता आपल्याला दिसत नाहीए याचं त्याला काहीच वाटत नव्हतं. “तो स्वतःहुन जवळ येणार नाही. कदाचित गेलाही असेल तो.” यावर मित्र ठाम होता. हा शेष माझ्यापासून काही फुटांवर असुन नजरेआड होता. त्याची एकही मुव्ह मला कळत नव्हती. समोर ब्रम्हराक्षस जरी उभा ठाकला तरी मला काही वाटणार नाही पण नजरेआड असलेला किंचितसा धोकाही मला जास्त धडकी भरवतो. माणसाला यामुळेच अंधाराची भिती वाटत असावी. मधे चार पाच मिनिटे गेली आणि अगोदर तो जेथे दिसला होता त्या ठिकाणापासून उजवीकडे काही फुटांवर त्याने पुन्हा अर्धवट उघडलेली फना वर काढली. नजर अजुनही आमच्यावरच होती. मीही बुड हलवून माझा त्याच्याकडे पुढा केला. पुन्हा एक दोन फोटो काढले. मिनिटभर तो तसाच डोलत राहीला व पुन्हा त्याने फना खाली केली. माझी नजर सारखी भिरभिरत होती. पुन्हा पाच दहा मिनिटाने त्याने आणखी उजवीकडे पाच सहा फुटांवर फना वर केली. आता मात्र मी फोटो काढायचे सोडून दिले व त्याला न्याहाळत राहीलो. पुढील अर्ध्या तासात या शेषमहाराजांनी आमच्याभोवती जवळ जवळ वर्तूळ पुर्ण केलं होतं. एवढ्या वेळात मला त्याची फक्त फनाच दिसत राहीली. त्याला पुर्ण पहायला मिळाले नाही. तो जसजसा फिरत होता तसतसे मीही माझा मोहरा वळवत होतो. त्याच्यासोबत माझी बसल्या जागीच स्वतःभोवती एक प्रदिक्षणा पुर्ण झाली होती. एव्हाना आता तो पाच सहा मिनिटाने कुठून फना वर काढेल याचा मला अंदाज आला होता. मी अपेक्षीत ठिकाणी नजर रोखून होतो. बराच वेळ झाला तरी त्याने मान काही वर केली नाही. इतक्यात मित्राने समोरच्या कातळाच्या पट्टीकडे बोट केले. मी पाहीले तेंव्हा हा संथपणे त्या कातळाच्या शेजारुन पुढे सरकत जात होता. फना अजुनही अर्धवट उघडलेलाच होता. उघड्या फन्यासह चालणारा नाग मी प्रथमच पाहीला. पंधरा एक फुटांवर असणाऱ्या खडकाच्या मागे तो हळूहळू दिसेनासा झाला तेंव्हा मी ईतक्यावेळ अनियमित असलेला श्वास सोडला व पुन्हा छाती भरुन घेतली.
एकदाचा हा प्रसंग टळला. तो अर्धा तास मला दोन तासांसारखा वाटला होता. तो गेला त्या खडकाकडे माझी अधूनमधून नजर जात होती. नशिब आम्ही गाडी पार्क केली होती त्याच्या उलट दिशेने तो गेला होता. आता मागच्या मागे निघून येणे जास्त सुरक्षित होते. मी लेन्स कव्हर खिशात टाकले व उठायची तयारी केली. (जोवर स्पॉट सोडत नाही तोवर मी कॅमेरा कधीच बॅगेत ठेवत नाही. मला मिळालेले काही उत्तम फोटो हे निघताना ऐनवेळी मिळालेले आहेत.) उठायच्या अगोदर सहज सोमरच्या खडकाकडे नजर टाकली आणि मी चकीतच झालो. हा त्या खडकावर शरीराचा जवळ जवळ तिस टक्के भाग उभा करुन पुर्ण फना उघडून आमच्याकडे पहात होता. ईतक्यावेळ तो आम्ही बसलेल्या झाडाच्या सावलीत होता. पण आता दुपारची तळपती किरणे त्याच्या फन्यावर पडली होती. आम्ही बसलो होतो त्या जागेपासून खडक बराच उंचावर होता त्यामुळे त्याच्या मागे निळेशार आकाश दिसत होते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर हातभर शरीर उचावलेला तो सर्पराज उन्हात तळपत होता, चमकत होता. ओंजळीएवढी फना काढलेल्या नागावर समोरचा बेडूक मुग्ध होतो. नागाची नजर त्याला मोहित करते असं म्हणतात. फना काढल्या मृत्यूवर मोहून गेलेला मंडूक ही कविकल्पना वाटत होती मला. पण जेंव्हा मी त्याला असं तळपताना पाहिलं तेंव्हा मला तो प्रचंड सुंदर दिसला. माझ्यावर गारुड झाल्यासारखं मी त्याच्याकडे पहात राहीलो. आता भितीचा लवलेशही नव्हता मनात. मी चटकन कॅमेरा काढला व आभाळाच्या बॅकग्राऊंडवर त्या सर्पराजाचे अनेक फोटो काढले. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणारा फोटोग्राफर नेहमी अतृप्त असतो. कितीही चांगला फोटो मिळाला तरी त्याचे "जरा हा ऍंगल पाहीजे होता" किंवा "तमूक बॅकग्राऊंड मिळायला हवे होते" असं काही ना काही सुरुच असते. तासाभरापुर्वी रेकॉर्ड शॉट मिळाला तरी खुप झाले असं म्हणत होतो मी पण मला आता त्याचा वेगळ्या ऍंगलने फोटो हवा होता. त्याची नजर कॅमेऱ्यावरुन हटतच नव्हती व मला त्याने आजुबाजूला पहातानाचे फोटो हवे होते. मी मित्राला हे सांगितल्यावर "हायला, एवढंच ना?" म्हणत तो उठला व त्याने अत्यंत सावकाश व दुरुन त्या नागाला प्रदिक्षणा मारली. आता मित्र जसा फिरेल तसा नाग आपली फना फिरवत होता. मला अगदी हव्या त्या सगळ्या ऍंगलने फोटो मिळाले. कितीही फोटो काढले तरी मन भरणार नव्हतेच पण अचानक बॅटरी एक्झॉस्ट झाल्याचा मेसेज स्क्रिनवर झळकला व कॅमेरा बंद झाला. नंतर पाच दहा मिनिटे त्याच्याकडे पहात आम्ही झाडाखाली बसलो व शेवटी निघालो. मी अगदी गाडीत बसेपर्यंत त्याचा फना मला अधून मधून दिसत राहीला. आम्ही गेलो तरी तो तेथेच होता.
एक मात्र जाणवलं. त्याने क्वचितच त्याची फना पुर्ण उघडली होती व त्याची जिभही मला अगदी क्वचित लवलवताना दिसली होती. याचा अर्थ त्याला आमच्याकडून काही धोका जाणवला नव्हता. आम्ही तेथे होतो तोवर त्याने फक्त सावधगीरी बाळगली होती. पहिली पंधरा मिनिटे सोडली तर नंतर मलाही त्याची भिती वाटेनाशी झाली होती.
टेकडी उतरुन मी गाडी हायवेवर वळवली तेंव्हा मित्र पुन्हा हात जोडून म्हणाला "सोमवारी दर्शन दिले शंभू महादेवाने."
त्याच्या या वाक्याची मी टिंगल करायला हवी होती पण मीही म्हणालो "खरय रे. भाग्यच म्हणायचं"
या मित्राच्या अंधश्रद्धा मला नेहमीच भावतात.
अंधश्रद्धा नसावीच आणि असलीच तर ती अशी असावी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...