❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

बुधवार, २५ जुलै, २०१८

मा.ल.क. - ६

या म्हातारपणात त्याला काय हवे होते? त्याने आपल्या पूर्वायुष्याकडे पहिले तेंव्हा त्याला अपवाद वगळता सर्व सुखच दिसले. साध्या भोळ्या आई वडिलांच्या पोटी जन्म. योग्य वयात लग्न. मनासारखी, जीव लावणारी बायको. सोन्यासारखी मुलं. रानात मोती उपजणारी पोटापुरती जमीन. गावात, भावकीत मान. मुलांनी मनावर घेऊन हट्टाने घडवलेली तीर्थयात्रा. काही बाकी राहिले नाही. पण या सगळ्याला नजर लागू नये म्हणून की काय, देवाने एक बोच त्याच्या मनाला लावून ठेवली होती. त्याचा धाकटा मुलगा. तसा धाकटा कामाला, व्यवहाराला, माणुसकीला कशा कशाला कमी पडायचा नाही. रानात राबायला लागला तर थोरल्याला इरेसरीने मागे टाकायचा. रानात कधी कोणतं पीक घ्यायचे याचा अंदाज कधी चुकला नाही त्याचा. पण होता एकदम एककल्ली. वडील सांगताहेत किंवा भाऊ सांगतोय म्हणून कधी ऐकणार नाही. त्याला पटले तरच एखाद्या कामाला हात घालणार. वडीलांनी परोपरीने समजावून सांगीतलेबाळा, चारचौघांचे ऐकावे लागते कधी कधी. असं मनासारखं वागून नाही पार लागत जिंदगी.” पण धाकटा ठाम होता विचारांवर. एक दिवस म्हातारा रानातून आला तोचअंगात कणकणघेऊन. हात पाय धुवून ओसरीवर बसला. थोरल्याच्या बायकोने दिलेल्या चहाला जेंव्हा तो नको म्हणाला तेंव्हाच तिच्या लक्षात आले कीआज मामांचं काहीतरी बिनसलय.’ तिने रात्री गरम गरम माडगं दिले म्हाताऱ्याला प्यायला आणि अंथरुन घालून म्हणालीमामा, पडा आज लवकर. सकाळपर्यंत बरं वाटेल.” सकाळी म्हाताऱ्याला जाग आली तिच ग्लानीमध्ये. त्याने डोळे किलकीले करुन पाहीले. अंथरुनाभोवती दोन्ही सुना आणि थोरला चिंतातुर होवून बसले होते
त्याने खुनेनेच विचारलेधाकटा कुठं आहे?”
इतक्यात धाकटाही वैद्याला घेवून आला. वैद्यबुवांनी बराच वेळ तपासले. कसलेसे चाटन दिले आणि सकाळी परत येतो सांगुन गेले. म्हाताऱ्याला जाणवले की आता देवघरातलागंगाजलाचा गडूफोडायची वेळ आली आहे. तो क्षिणसा हसला आणि दोन्ही मुलांना जवळ बोलावून घेतले
खोल पण समाधानी आवाजात तो मुलांना म्हणालाहे पहा पोरांनो, फार ईच्छा होती की त्यानेचालता बोलतान्यावे, त्याने तेही ऐकलं. आता काही राहीलं नाही. मी आयुष्यभर जे काही जमवले त्याची वाटणी करतो त्यात समाधान माना म्हणजे मी सुखाने जातो.” 
सगळ्यांनी डोळे पुसत माना डोलावल्या. म्हाताऱ्याने घर, जमीन, दागीने इतरही काही गोष्टी यांची मनाप्रमाणे वाटणी केली. मुलांचा अर्थात वाटणीलाच विरोध होता पण वडीलांच्या ईच्छेपुढे त्यांनी सगळ्याला निमुट होकार दिला
वडील म्हणालेआता एकच आणि महत्वाचे राहीले. मी वडीलांकडुन चालत आलेलं आपल्या कुलदेवीचे सगळं मनापासुन केले. आज जे काही आहे ही देवीचीच कृपा. आता याची जबाबदारी दोघांपैकी एकाने घ्यावी अशी माझी फार ईच्छा आहे.”
दोघा भावांनी एकमेकांकडे पाहीले. थोरला काही बोलायच्या आत धाकटा म्हणालाबाबा, तुम्ही जे म्हणाला त्याला आम्ही होकार दिला. फक्त तुमच्या समाधानासाठी. पण हेदेवीचे काही माझ्याच्याने होणार नाही. ते दादाकडे सोपवा. माझी देवी रानातल्या ढेकळात आहे आणि तिची मी मनापासुन सेवा करतो आहे.”
थोरल्याने जरा रागातच धाकट्याकडे पाहून वडीलांचा हात हातात घेतलाबाबा, मी करीन सगळं आपल्या कुलदेवीचे. तुम्ही काळजी करु नकाते शब्द ऐकतच म्हाताऱ्याने समाधानाने कुडी सोडली.

दिवस जात होते. थोरला आणि धाकटा आपापल्या रानात राबत होते. पण थोरल्यावर देवीचीही जबाबदारी होती. तिची व्रत-वैकल्ये, उपास, पुजा, वर्षाचे सण, दोन वेळचा नैवद्य यात त्याचा बराच वेळ जाई. या सगळ्यामध्ये त्याचे शेतीकडे आणि स्वतःच्या तब्बेतीकडेही दुर्लक्ष होई. पण वडीलांना दिलेला शब्द पाळल्याचे समाधानही त्याला होते. दिवस जाता जाता हळूहळू पालटले. ते छोटे घर पुरेसे पडेना म्हणून धाकट्याने शेतातच टुमदार घर बांधले. त्याला आता शेतावर जास्त लक्ष पुरवता यायला लागले. थोरल्यानेही घर मोकळे झाल्याने देवघर व्यवस्थित बांधून घेतले. फुलांसाठी बाग जोपासली. पुजेमधे, व्रत-वैकल्यांमधे त्याचा जास्त वेळ जायला लागला. पण उपवासांमुळे थोरल्याची तब्बेत ठिक राहीनाशी झाली. परिणामी शेतीकडे त्याचे दुर्लक्ष व्हायला लागले. आर्थीक बाजूही घसरली. रोज काही ना काही अडचण ऊभी राहू लागली. या सगळ्याचा संबंध थोरलाआपल्याकडून देवीचे काहीतरी करायचे राहीलेयाच्याशी लावू लागला. कधी पुजेला बेल नव्हते म्हणून मुलगी आजारी पडली. तर कधी नैवेद्य दाखवायचा राहून गेला म्हणूनच धान्याला भाव मिळाला नाही. आज काय तरनकोते खावून दर्शन घेतले म्हणून पिकावर रोग आला. तिकडे धाकट्याची दिवसेंदिवस प्रगती होत होती. थोरला वैतागला. देवीचे इतके करुनही थोडे काही चुकले तर देवी शिक्षा का करते आपल्याला? आज त्याने देवीकडे याचे गाऱ्हाणे घालायचे ठरवले. सकाळी अंघोळ करुन त्याने देवीची यथासांग पुजा बांधली, स्तुती स्तवने गायली आणि व्याकूळतेने देवीला हाक मारली. आज देवीने त्याच्या हाकेला दिली आणि प्रकट झालीबोल बाळ, का हाक मारलीस?” 
त्याने नतमस्तक होत विचारलेआई, माझे थोडेही चुकले तर तू मला शिक्षा करतेस. आणि धाकट्याला तुझी साधी आठवणही नाही तरी तु काहीच का करत नाहीस?”
देवी मंद हसली आणि म्हणाली
तो जर मला मानतच नाही तर त्याला कशी शिक्षा करु मी?”



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...