❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, २ जानेवारी, २०२३

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव. अशात जर वाफाळती मिसळ समोर आली तर मोह आवरत नाही. एक वेळ रंभा मेनका समोर आल्या तरी चित्त चळणार नाही पण मिसळ म्हटल्यावर ताबा जातोच मनावरचा. ‘जी मेनकेसी परौते सर म्हणती’ अशी मिसळ समोर असल्यावर त्या रंभेला काय चाटायचय? (माफ करा माऊली)
जसा मानवतेला कोणताही धर्म नसतो तसेच मिसळला कोणतेही गाव नसते. हे कोल्हापुर, पुणे व नाशिकवाले उगाच मिसळवरुन भांडत असतात. (मी पुणेकर आहे तरीही हेच मत आहे माझे) मी तिनही शहरांमधे नावाजलेल्या सगळ्या मिसळ खाल्या आहेत. त्या आपापल्या जागी ठिक असल्या तरी गावाकडच्या मिसळची चव त्यांना नाही. एक तर शहरांमधल्या मिसळमधे असणारी शेव ही अस्सल बेसनपिठाची असण्याची शक्यता फार कमी. निर्भेळ बेसन पिठाची शेव रस्स्यामधे पडल्यानंतर तिस सेकंदात मऊ होते. शहरांमधल्या मिसळमधे असणारी शेव ही मिसळ संपत आली तरी कुरकुरीत रहाते बऱ्यापैकी. यावरुन समजा काय ते. आणि मसाल्याचे म्हणाल तर क्वचितच कुणी मिसळसाठी घरी मसाला करत असतील. गावाकडे तेल, बेसन या गोष्टी निर्भेळच वापरल्या जातात. गावाकडे म्हणजे माझ्या गावाचे कौतूक नाही करत मी. तुम्ही कुठल्याही गावात मिसळ खा. ती उत्तमच असेल. गावच्या मिसळचा नाद शहरातल्या मिसळणे करुच नये. शहरी मिसळ म्हणजे मेंढराच्या कळपामधे वाढलेले व स्वत्व विसरलेले वाघाचे बछडे. नुसते रुप वाघाचे, सवयी सगळ्या मेंढीच्या. अशा मिसळमधे फरसानच असेल, बटाटे-पोहेच असतील, चिंच-गुळच असेल काहीही असेल. आजकाल तर चिज मिसळही मिळायला लागलीय. उद्या न्युटेला मिसळ मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको. बरं तिची सजावट एवढी की नाकापेक्षा मोती जड. स्टिलच्या मोठ्या ताटात, जिलेबीचे दोन वेढे, गुलाबजाम, बासुंदीची वाटी, पापड, बिटाचे तुकडे, लोणचे वगैरे काय वाट्टेल ते असते. मिसळ बिचारी ताटाच्या कोपऱ्यात हिरमुसून बसलेली असते. ‘माणूस अगोदर डोळ्यांनी जेवतो व मग तोंडाने’ असं म्हणतात. हे असलं मिसळच ताट पाहीलं की माझी भुक मरते.
गावाकडे जरा वेशीबाहेर, शेतीभातीने वेढलेले एखादे मिसळचे हॉटेल असते. येथे फक्त मिसळ मिळते. समोरुन अरुंद पण नेटका डांबरी रस्ता गेलेलला असतो, तिनही बाजूने हिरवीगार शेती असते, शेजारीच दोन तिन आंब्यांची झाडे असतात, शेतांमुळे हवेत जास्त गारवा असतो, हॉटेलवाला मित्रच असल्याने मिसळच्या अगोदर गप्पांचा फड जमतो. मिसळही अगदी घरी पंगतीला बसल्यासारखी आग्रह करकरुन वाढली जाते. पाव खाण्याच्या पैजा लावत रस्स्याचे भांडे रिकामे केले जाते, ज्या वेगात ते भांडे रिकामे होते त्याच वेगात हॉटेलवाला ते भरत रहातो. खिशातले रुमाल हातात व मग हातातले रुमाल नाका डोळांपर्यंत जातात. पंगतीत पाळायचे नियम येथेही पाळले जातात. सगळ्यांची मिसळ खाऊन झाल्याशिवाय कुणी हात धुत नाहीत. मग मजेत एकमेकांच्या हातावर पाणी घालत ओट्याच्या कडेला उभे राहून हात धुवायचे. तोवर गोड व घट्ट चहा आलेला असतो. मिसळनंतरचा चहा हा फक्त ‘जिभेच्या शेंड्याला चटका’ म्हणून घ्यायचा असल्याने दोन चहा पाच जणांना पुरतो. मग बिल देताना ‘मी देतो, मी देतो’ असा वाद न होता ‘तू दे, तू दे’चे भांडन होते. एखाद्या कंजुष मित्राच्या खिशाला चाट मारल्याच्या आनंदात, जिभेवर मिसळ व गोड चहाची चव घेऊन मग दिवसाची सुरवात होते. ही असते आमच्या गावाकडची मिसळ.



रविवार, १ जानेवारी, २०२३

दिनूकाका

सकाळचे दहा-साडेदहाच वाजले असावेत. सुर्य ईतक्या सकाळी सकाळीच पेटला होता. ऊन्हं चांगलीच तापली होती. मी सिम्बाला घेऊन मावशीकडे निघालो होतो. ते अमुलचे ताक प्यायचा भारी कंटाळा येतो. मावशीकडचे ताक म्हणजे अमृतच. सोबत ताकासाठी काही भांडे घेतले नव्हते. ती लिटरभर आकाराची किटली पाहून मावशी वैतागते. “जिभ तरी माखन का एवढूशा ताकात?” असा तिचा सवाल असतो. मावशीचा जिभेवर फार जोर. स्वतःही ईतकी बोलते की विचारु नका. “अप्पा दोन घास खातो का? सकाळीच लसुन घसारलाय पाट्यावर. जिभ दुवा देईन” किंवा “ऊलसाक चहा घेतो का? गवती टाकलीय मोप. ऊगा आपला जिभंच्या शेंड्याला चटका” असं तिचं नेहमी काहीतरी सुरु असतं. रस्ता ओलांडला की मावशीचा मळा सुरु होई. जरा आत गेले की तिचे कौलारु घर दिसे. मी रस्ता ओलांडला व सिम्बाची लिश हार्नेसमधून काढली. तो आता समोरच्या लसणाच्या शेतात धावणार असं वाटत असताना तो ऊलट्या दिशेने पळाला व जोरजोरात भुंकायला लागला. रस्त्याच्या कडेला असलेला फुटपाथ काळ्या पांढऱ्या पट्टयांने रंगवत काही मुलं बसली होती. हा त्यांच्यावर भुंकत होता. ती पोरं ब्रश, रोल्स वगैरे टाकून रस्त्याच्या डिव्हाडरवर जाऊन ऊभी राहीली. मी घाईत पुन्हा सिम्बाला लिश लावली व त्याला मागे ओढले. ईतक्यात मागून आवाज आला “काय खातं का काय ते कुत्रं तुम्हाला? ऊगा कसलं बी निमित करायचं आन काम टाळायचं. चला लागा कामाला. दुपारपव्हतर पुलापर्यंत गेलं पाह्यजे काम आज.” हायला लईच कडक मुकादम दिसतोय यांचा असं वाटून मी मागे पाहीलं तर दिनूतात्या फुटपाथवर बसलेले दिसले. वय सत्तरीत आलेले. गुडघ्यापर्यंत असलेले चुरगाळलेले धोतर. बनशर्ट व कुर्ता याचे कॉम्बिनेशन असलेले खादीचे शर्ट. त्याच्या खिशात गांधी टोपी खोचलेली. छातीवरच्या खिशात पाच सहा पेनं. एक लाल कव्हरची जाड डायरी. डोक्यावर घामाने डवरलेले टक्कल. डोळ्यावर एक काच धुरकट केलेला जाड भिंगाचा चष्मा. त्या चष्म्याच्या कडेने दोन कळकट दोऱ्या. चेहऱ्यावर तो प्रसिद्ध वैताग. रानात विस एकरची बागायत असलेला हा करोडपती नेहमी गावाच्या ऊचापती करत हिंडत असतो. मी सिम्बाला मागे ओढत तात्यांच्या शेजारी बसलो. “काय तात्या, बरय ना सगळं? तब्बेत काय म्हणतेय? आज एवढ्या ऊन्हाचं कशाला त्या पोरांच्या मागे लागलाय?”
“कोण? अप्पा का? टेक ऊलसाक. तब्बेत कव्हा काय म्हणती का? आता लागलंय गाडं ऊताराला. कधी असं कधी तसं. चालायचंच. कुढशिक निगालाय? दुर्गीकडं?” मी मान हलवून “हो” म्हणालो. “जरा ताक आणतो मावशीकडून. तुम्ही काय करताय येथे?” खिशातली टोपी काढून ती डोक्यावर चेपत तात्या म्हणाले “अरं ही कार्टी काम करतायेत दोन दिवस. नुसतं थातूर मातूर चाल्लय. कोण हाय का विचारायला यांना? म्हटलं जरा ध्यान द्यावं. पुलापर्यंत काम करुन घेतो आणि मग देतो म्होरं काढून. पुढं करुदे त्यांना काय करायचय ते. कसं?” मी सिम्बाला जवळ ओढत म्हणालो “खरय. सोडू नका अजिबात यांना. चांगलं काम करुन घ्या. खरतरं यांचा मुकादमही जुंपला पाहीजे कामाला. पैसे खातात नुसते लेकाचे.” तात्या मिश्किल हसुन म्हणाले “त्यो पिवळा शर्टवाला हाय का, त्योच मुकादम हाय यांचा. अदुगर त्यालाच लावलाय कामाला. नुसता मोबाईलवर बोटं चाळत असतो रांडेचा. आता निट कामाला लागलाय. त्याला म्हणलं अदूगर तू डबडं धर रंगाचं हातात नायतर मवन्याला फोन लावीन. ऊगाच सरपंच केलय का त्याला!” माझ्या डोळ्यापुढे मोहन तरळून गेला. केविलवाना. “बरं तू निघ. येताना माझ्यासाठी तांब्याभर ताक आण दुर्गीकडून. जरा ध्यान देतो यांच्याकडं. आपण गप्पा मारत बसलो की यांना रानच मोकळं भेटातय.” “बरं” म्हणत मी सिम्बाला मळ्याकडे ओढले व पुन्हा त्याची लिश सोडली. मावशी अंगणातच काही निवडत बसली होती. सिम्बाने तेथे खेळत असलेल्या शेळीच्या करडांना मुके दिले. “मावशी ताक” एवढं म्हणताच मावशी लुगडं झटकून ऊठली. “आलेच” म्हणत लगुलग आत गेली. मी अंगणातल्या कौठाच्या झाडाला टेकलो. सिम्बा त्या गोजिरवाण्या करडांसोबत खेळत होता. त्यांच्या शेपट्या हुंगत होता. मावशीने लहान आकाराची पितळी कळशी आणली. “दम जरा दादरा बांधून देते” असं म्हणत त्यावर एक पांढरं कापड बांधून दिलं. “मावशी तांब्याभर ताक दे अजून. दिनूतात्यांनी मागितलय” असं म्हणताच मावशी करवादली. “लय खोडीचं म्हतारं हाय त्ये. ताक पेतय म्हणं” असं काहीसं बडबडत मावशीने तांब्याभर ताक आणुन दिले. “दम जरा” म्हणत पुन्हा आत गेली व चिमूटभर मिठ व दोन कैऱ्या घेऊन आली. मिठ ताकात टाकत मावशी म्हणाली “घे. आन त्याला म्हणावं दुपारला ईकडच ये तुकडा मोडायला. आतरंगी म्हतारं हाय रे त्ये. तसच राहीन ऊपाशी नायतव्हा” चला, माझं काम झालं होतं. दिवसभर मनसोक्त ताक पिऊनही संध्याकाळी बेसन, आलं-लसुन लावून कढी करायला ताक ऊरणार होतं. मी रस्त्यावर आलो तर तात्या रस्त्याच्या मधोमध ऊभे राहून त्या मुलांवर खेकसत होते. एका हातात धोतराचा सोगा, दुसऱ्या हातात निरगुडीचा हातभर फोक धरुन ते चिडचिड करत होते “अदुगर ती माती काढ ना मायझया. तुह्या बापाने असा रंग फासला व्हता का कव्हा!” मला त्या पोरांची किव आली. आज तात्या काही त्यांना सुट्टी देणार नव्हते. मी हाक मारुन त्यांना ताकाचा तांब्या दिला. मावशीने जेवायला बोलावले असल्याचे सांगितले व घरी निघालो. घरी आल्यावर मग मी हे सगळं विसरुन गेलो. दुपारी सहज गॅलरीत आलो तर समोरच तात्या आणि त्यांची सुन चाललेली दिसले. मी आवाज दिला “ओ तात्या दुर्गामावशी वाट पहात असेल ना जेवायला. गेले नाहीत का अजुन? शिव्या देईल मग ती.” तात्या हसुन म्हणाले “ती मोप शिव्या देईन. घुगऱ्या खाल्ल्यात मी तिच्या बारशाच्या. अरं पोरं दिवसभरं काम करत्यात. मघाशी भाकरी खायला बसली तर नुसती भाकर आणि लोणच्याचा तुकडा रे प्रत्येकाच्या फडक्यात. म्हणलं जरा दमा, आणतो कालवण.” सुनबाईच्या हातातल्या बॉक्सकडे बोट करत म्हणाले “आता जेवतील पोटभर. राबणारं पोट ज्येवलं पाह्यजे अप्पा. नाय तर काय मजा हाय सांग बरं” तात्या तुम्ही जेवलात का हे विचारायचं अगदी होठांवर आलं होतं माझ्या पण नाही विचारलं मी.

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...