❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

गुरुवार, १० जून, २०२१

पडद्याआडचे मोती

मी कुठेही गेलो तरी काही लोकांबरोबर माझी फार चटकन मैत्री होते. आणि नाही झाली तर मी ती आवर्जून करतो. या मधे प्रामुख्याने असतात परिसरातील हॉटेलमधले आचारी, वेटर, परिसरातील डेअरीवाला आणि खाटीक. पुस्तकं मानसाची खरे मित्र असतात तर असतील बापडे पण मला कधीच ग्रंथालयात तास तासभर घालवूनही कुणी मित्र कधी मिळाला नाही. तेथे समविचारी नक्की मिळतात पण मैत्रीची नाळ जुळतेच असे नाही. एखाद्या मटन खानावळीत मात्र कधी, कोण, कुठला मित्र मिळेल व जीवाभावाचा होईल हे सांगता येत नाही. एखाद्या अप्रतिम बिर्याणी मिळणाऱ्या कुठल्याशा अगदीच अप्रसिद्ध ठिकाणी तुम्ही अगदी चवीने बिर्याणी खात असता आणि समोर बसलेला एखादा मुसलमान भाताच्या शितांनी भरलेला हात अधांतरी तरंगत ठेऊन तुम्हाला विचारतो “कहा से हो साब?” आणि तुम्ही येथलेच असुन मराठी आहात हे समजल्यावर “ह्या! तुम मराठी लोगों को क्या मालूम बिर्याणी क्या होती है! तुम्ही लोग कोंबडीची खिचडी करुन खाता आणि तिलाच बिर्याणी म्हणता” असं बिनदिक्कत आपल्या तोंडावर सांगतो. “बिर्याणी पकती है तो सिर्फ मुसलमान के घर मे, बाकी सब खिचडीवाले” वर हेही ठणकावयाला तो अनमान करत नाही. मग पुर्ण बिर्याणी संपेपर्यंत त्याच्या गप्पा सुरुच रहातात. जेवण संपल्यावर “मराठ्यांना काय माहित गोश्त कशाशी खातात” असं म्हणत हा आपल्या हातावर कौतूकाने पाणी घालतो. येथे धर्मावरुन, जातीवरुन भेदही केले जात नाही व अपमानही केले जात नाही. तेच एखाद्या ग्रंथालयात बसून “अमुक लेखक काही खास लिहित नाही” असं म्हणायची खोटी, तुमच्यावर दोन चार जण शाब्दीक हल्ला करायला तयारच असतात. ग्रंथालयात एखाद्या गोष्टीवरुन मतभेद झाले की मनभेद व्हायला वेळ लागत नाही पण एखाद्या पदार्थावरुन जर तुमचे कुणाबरोबर मतभेद झालेच तर समोरचा तुम्हाला हट्टाने तो पदार्थ खिलवून तुमची मतं खोडतो व मनभेद व्हायच्या ऐवजी मनमिलाफ करुन जातो. कुणी मित्र तुमच्यासमोर तासभर एखाद्या पुस्तकाचे कौतूक करतो व तु्म्ही भारावलेल्या आवाजात त्याला विचारता “भारीच आहे रे पुस्तक, तुझ्याकडे आहे का?” तर तुमचे वाक्य संपायच्या आत उत्तर येते “म्हणजे काय, प्रश्न आहे का? पण भावाने दिलेय कुणाला तरी वाचायला. आले की देईन तुला.” पुस्तक प्रेमी एक वेळ आपल्या कमरेचे सोडून तुम्हाला देईन, पण पुस्तक देणार नाही. तेच एखादा जीवलग मित्र तुम्हाला कट्यावर चहा पिता पिता सकाळी खाल्लेल्या नल्ली निहारीचे रसभरीत वर्णन ऐकवतो व तुमच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून म्हणतो “क्या बात कर रहे हो? निहार चखी नही आजतक? हायला मग आजवर खाल्लं काय आयुष्यात? सकाळी नाष्टा करु नकोस, मी येतो न्यायला. रहेमियामधली निहारी खिलवतो तुला.” आणि खरच तो सकाळी सातलाच घरी हजर होतो. त्याच्या आवडत्या रहेमियामधे बसून आपण निहारी खात असतो आणि कौतूक मात्र त्याच्या चेहऱ्यावर असतं. समोरचा दोन घास जास्त जेवल्यावर सुगरण बाईच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तोच आनंद मित्राच्या चेहऱ्यावर असतो. “हौर, कैसी लगी निहारी? अरे सवाबवालों को ही नसिब होती है अच्छी निहारी” असं म्हणत तो जेंव्हा काऊंटरवर बिल देतो तेंव्हा “अरे राहू दे, मी देतो बिल” असं म्हणून त्याच्या शिव्या खाऊ नयेत आणि त्याच्या आनंदावर विरजणही घालू नये. निमूटपणे समोरची बडीशेप उचलावी व हातावर चोळत बाहेर पडावे. याचा अर्थ मी पुस्तकांच्या छंदाविरुद्ध आहे असं नाही पण माझी कुंडली ‘तबियतने खानाऱ्याबरोब व खिलवणाऱ्याबरोबर’ जास्त जुळते. त्यामुळेच मी कुठेही गेलो की तेथले ग्रंथालय कुठे आहे याची चौकशी करण्याअगोदर तेथली खानावळ कुठे आहे याची प्रथम चौकशी करतो. 

हे मटनवाले, डेअरीवाले यांचा एक अवतार ठरलेला असतो आणि सहसा ते त्याच अवतारात वावरतात. आचारी, वेटर, खाटीक, मासेवाली मावशी यांची एक विशिष्ट कुवत आपण डोक्यात ठेवलेली असते. एक पडदा उभा केलेला असतो आपण त्यांच्या व आपल्यामधे. त्यापलिकडे आपण या लोकांचा फारसा विचार करत नाही. पण त्यांच्यातला खरा माणूस नेमकी त्या पडद्या पलिकडे असतो. तो सदैव आपल्याला अनोळखीच रहातो. कधी कधी आपण टेबलवर बसून चहाची ऑर्डर देतो व चहा येईपर्यंत गालिबचा दिवाण उघडून बसतो. चहा घेवून आलेला पोरगा तुमच्या समोर कप ठेवून म्हणतो “अरे वाह, गालिब का?” आणि जाता जाता “ये मसाईले तसव्वुफ, ये तेरा बयान ‘गालिब'। तुझे हम वली समझते जो न बादा-ख्वार होता” असं काहीसं पुटपुटत गालिबच्या वर्मावरच बोट ठेवतो तेंव्हा आपल्याला चहा पिता पिता ठसका लागतो. या मागे कारण हेच असते की वेटरची एक इमेज आपण मनात केलेली असते. त्यापलीकडचा रसीक माणूस असा अचानक दिसला की आपल्याला चकित व्हायला होते. मी नेहमी या पडद्यापलीकडील माणसांबरोबर मैत्री करायचा प्रयत्न करतो. आपण पडदा दुर करायचा अवकाश असतो, पलिकडे ही माणसे मैत्रीचे दरवाजे सताड उघडून बसलेलीच असतात. 

एकदा का तुम्ही हा पडदा हटवला की पलिकडे काय रत्ने मिळतिल ते सांगता येत नाही. लांब बाह्याचे बनियन घालून बसलेला, ओघळत्या ढेरीचा, तेलकट केसांचा पण नुकतीच पुजा आटोपल्यासारखा चेहरा असलेला आमचा डेअरीवाला भैय्या पडद्यामागे वेगळाच असतो. कधी पनिर घ्यायला गेलो की काचेच्या कपाटात पनिरचा मोठा ठोकळा असुनही “आजका पनिर मत लो साब, आवो, अंदर आवो। कुछ सुनाते है” असं म्हणत हाताला धरुन मला काऊंटरच्या आत घेतो व युपीमधल्या त्याच्या गावात गायली जाणारी गोपींची गीते व मराठी गवळणी यातली साम्यस्थळे तो मला समजावून सांगत बसतो. “गोपींची गीते ही पिलू रागातच छान खुलतात. इतर राग कितीही गोड असले तरी कन्हैया की तकरार पिलू रागमेही दिल को छुती है” असं सांगत एखादी ओळ तो पिलू रागात गाऊनही दाखवतो. तेंव्हा वाटते की या दुधा-तुपाच्या वासात बसून हा दुध पनिर का विकत बसला असेल? याच बिस्वासने मला त्याच्या दोन रुमच्या खोलीत अनेक युपीचे पदार्थ खावू घातले. त्याच दोन रुममधे बाहेरची खोली संध्याकाळी मोकळी करुन तेथे रात्र रात्र रंगवलेली भजने ऐकवली. आपल्या वयाला न शोभणाऱ्या ढेरीवर हातातले दोन्ही पितळी टाळ उपडे ठेवून हा भैय्या जेंव्हा त्याच्या ईश्वराला आळवताना तल्लीन होतो तेंव्हा ‘परप्रांतिय' वगैरे भानगड माझ्या मनातून कधीच पुसलेली असते. त्या ‘दुधवाल्या भैय्या’चे ते रुपडे मला प्रचंड भावते. त्याच्या माझ्यामधला ‘दुधवाला भैय्या’ हा पडदा दुर केला म्हणुन मला बिस्वास नावाचा हा हिरा सापडलेला असतो. अन्यथा तो माझ्यासाठी फक्त दुधवालाच राहीला असता. नुकसान त्याचे नाही, माझे झाले असते. 

परिस्थितीने माणसे कुठेही पोहचतात, कुठलाही व्यवसाय करतात. पण काहीजण या जगरहाटीत आपापला छंद आवर्जून जोपासतात. माणूसकी टिकवतात. आपण फक्त त्यांना दाद द्यायची खोटी, ते भरभरुन आपल्यासमोर त्यांच्या पोतडीतला खजिना ओततात व आपले डोळे दिपवतात. आमच्या सोसायटीत पाच वर्षांपुर्वी एक वॉचमन भरती केला होता. मी महिनाभर कामाच्या गडबडीत त्याच्याकडे लक्ष द्यायला विसरलो. जाता येता तो सलाम करताना दिसायचा. एकदा गाडी पार्क करुन मी बाहेर आलो तेंव्हा सोसायटीचा सेक्रेटरी या वॉचमनची चांगलीच खरडपट्टी काढताना दिसला. काय झाले याची सहज चौकशी केली. सेक्रेटरीचे एव्हाना शिव्या देवून झाले होते. तो तणतणत गेला आणि मी त्या वॉचमनला सहानभुती दाखवायला त्याच्या पाठीवरुन हात फिरवला. त्या क्षणी त्याचा बांध फुटला. रडत रडत आपल्या केबिनकडे जाताना तो प्रेमचंदची काही वाक्य पुटपुटत गेला आणि मी चकितच झालो. पुढे या वॉचमनबरोबर मी कित्येक रात्री त्याने लिहिलेल्या कथा त्याच्याच तोंडून ऐकत जागवल्या. स्वतःच्या कवितेंना स्वतःची स्वतंत्र चाल लावून गायलेल्या अप्रतिम हिंदी काव्यरचना मला त्याने ऐकवल्या. त्याच्या नाटकांच्या कथानकांवर मी तास तासभर त्याच्याशी चर्चा केल्या. तिशीच्या आसपास असलेल्या या ‘वॉचमन’ने “सलाम मत करो यार” या माझ्या हट्टापुढे मान तुकवली, तरीही आमच्या सोसायटीतल्या एखाद्या बथ्थड डोक्याच्या व्यापाऱ्याला तो सलाम करतो तेंव्हा उगाच माझ्या काळजात काहीतरी तुटतं. 

दुपारच्या शांत वेळी मोबाईल वाजतो. स्क्रिनवर शब्बिरचे नाव पाहून मी फोन उचलतो. हॅलो म्हणायच्या आतच समोरुन सलाम येतो. या सलामला प्रत्युतर द्यायच्या आत शब्बिरचे सुरु होते “देखो साब, सातो दिन भगवानके, क्या मंगल, क्या पीर” त्याला मधेच थांबवून मी म्हणतो “ते माहितीय शब्बीर पण मी आज नाही येऊ शकणार जेवायला. आपण पुन्हा कधीतरी जमवू” हसून शब्बिर म्हणतो “साब दावत पे नही बुला रहा हू. गोश्त बिलकूल आपको चाहिए वैसा मिला है आज। मै निकाल के रखता हूं, पाच बजेतक आ जाना। वोह आपका पीरका मसला मत रखो सामने” गोश्तपेक्षा शब्बिर आज वेळ काढतोय म्हटल्यावर मी पाच ऐवजी साडेचारलाच दुकानावर पोहचतो. अशा वेळी दुकानात कितीही गर्दी असली तरी शब्बिर मला घेवून पलिकडच्या त्याच्या बंद गाळ्यात घेवून जातो व तेथे मग आमची बैठक बसते. हा शब्बिर व्यवसायाने खाटीक आहे. त्याची आठ दहा मटण चिकनची दुकाने आहेत. पण याचा खरा शौक आहे किचन. हा शौकीया खानासामा आहे. याच्या बरोबर राहून मला किचनमधली असंख्य गुपिते कळाली. अगदी कमी दर्जाच्या गव्हाच्या पिठाच्या रोट्या उत्तम गव्हाच्या रोटीसारख्या कशा बनवायच्या येथपासून ते आपण कांदा कसा कापतो यावर पदार्थाची चव कशी अवलंबुन असते येथपर्यंत त्याने अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकवल्या. एखाद्या सुगरण बाईचेही स्वयपाकात इतके लक्ष नसेल ईतके शब्बिरचे असते. लौकी की सब्जीपासून ते हलीम पर्यंत वाटेल ते पदार्थ बनवणाऱ्या शब्बिरला माझ्याकडचे वरण भात आवडते. पहिल्यांदा तो जेंव्हा माझ्याकडे जेवायला आला होता तेंव्हा वरण भाताच्या पहिल्याच घासाला ‘वाह’ म्हणायच्या अगोदर हा म्हणाला होता “भाभी हिंग फोडणीत नका टाकत जावू. हिंगाचे पाणी करुन ठेवा व ते वापरत जा” नंतर मात्र कौतूक करत तो तब्बेतीत वरण भात चेपून गेला. हिंग फोडणीत टाकलाय की वरुन टाकलाय हे पहिल्याच घासात ओळखणारा शब्बिर मग अगदी ‘फॅमिली फ्रेंड’ झाला. एखादा मुसलमानही रमझानची जेवढी वाट पहात नसेल तेवढी मी पहातो. याला कारण शब्बिरच्या बायकोच्या हातचे रोट व खुद्द शब्बिरच्या हातचे हालिम. मी अगदी जानेमाने खानसामे पाहिले. पण एकाच्याही हातच्या हालिमला शब्बिरच्या हातच्या हालिमची चव नाही. याच शब्बिरला घेवून मी मित्राच्या फार्महाऊसवर किंवा जवळच्या टेकड्यांवर कित्येकदा निहारीची हांडी लावलीय. सात आठच्या दरम्यान घरुन डब्बा घेवून जायचे. गेल्या गेल्या प्रथम टेकडीवर छान जागा पाहून जेवण उरकायचे. अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या की निहारीसाठी चुल पेटवायची. रात्रभर पकवलेल्या निहारीचा आस्वाद पुर्वेला जरा फटफटले की मग घ्यायचा. सुर्याच्या पहिल्या किरणांना आपली रिकामी ताटेच दिसायला हवीत. रात्रभर मारलेल्या गप्पा व पहाटे पहाटे शब्बिरच्या हातची खाल्लेली निहारी याचे वर्णन ‘स्वर्गसुख’ या शब्दातही करता येणार नाही. कितीवेळा मी शब्बिरबरोबर ही हांडी लावलीय पण प्रत्येकवेळी त्याचे काहीतरी प्रयोग सुरु असतातच. आज मी माझ्या घरी जी निहारी बनवतो त्याची पाककृती पाहून कुणी खानसामा नाक मुरडेलही पण कित्येक रात्री जागवून केलेल्या प्रयोगातून ही निहारी शब्बिरने सिद्ध केली आहे. त्यामागे त्याचा रियाज आहे. बुद्धिमत्ता आहे, कष्ट आहेत. घरच्या व्यवसायामुळे एम फिल करता करता राहीलेला शब्बिर जेंव्हा जे कृष्णमुर्तींवर बोलतो तेंव्हा हरखुन जायला होते. 

मी कधीही श्रद्धेचा, वारांचा आणि आहाराचा एकमेकांशी संबंध जोडत नाही, आणि मानतही नाही. त्यामुळे पहाटेच्या गार वाऱ्यात दोन पेग व्होडका झाल्यावर नल्ली निहारी खाता खाता शब्बिरच्या तोंडून उर्दूमधे जे कृष्णमुर्ती ऐकणे हा माझ्या आयुष्यातल्या मोजक्या आनंदांपैकी एक आनंद आहे.

आज निहारीची पाककृती द्यायची म्हणून लिहायला बसलो आणि विषय भलतीकडेच गेला. त्यामुळे पाककृती पुढच्या वेळी देईन, सध्या या रविवारी केलेल्या निहारीचा फक्त फोटो देत आहे.

लेखनकंटाळ्यामुळे लेखनसिमा.
😂😍🤤



बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

मुनियाचा खोपा

सुगरणींचा मोठा थवा जेंव्हा एखादे झाड निवडतो व त्यावर घरटी बांधायला सुरवात करतो तेंव्हा तेथे फार धांदल असते. एखाद्या बिल्डरच्या मोठ्या साईटवर जी अव्याहत गडबड उडालेली असते तेच दृष्य येथे असते. फांदी निवडने, मग घरटे बांधने, मादीला आकर्षीत करणे, अंडी, मग पिल्ले, त्यांचे पोषण, उडायला शिकणे, मग यथावकाश सगळ्या थव्यानेच कष्टाने बांधलेली ती वसाहत अगदी निर्मोही मनाने सोडून निघून जाणे हा सगळा प्रवास मी फार जवळून पाहीलाय. ज्या नरांना आळशीपणाने मादी मिळत नाही असे वेडे ब्रम्हचारीही मग या थव्यामागे निघून जातात. तेथून जाताना मग अशी मोकळी पडलेली वसाहत काही दिवस उदास करत रहाते. दिवाळी संपल्यानंतर किंवा आठ दिवसांसाठी आलेले जिवलग पाहूणे गेल्यानंतर घर जसं उदास वाटतं ना अगदी तसच या वसाहतीकडे पाहून वाटत रहातं. तोवर निसर्ग मस्त हिरवा झालेला असतो. इतर पक्ष्यांची वर्दळ सुरु होते आणि मग नकळत ही उदासी मागे पडते आणि मनावरुन झटकली जाते. तेथून जाताना मग या वसाहतीकडे फारसे लक्षही जात नाही.
असेच एकदा भल्या सकाळी त्या वसाहतीशेजारुन जात होतो. लक्ष अर्थातच आजूबाजूच्या झाडांवर होणाऱ्या हालचालींकडे होते. एक नजर या वसाहतीवरुनही फिरली. आणि मी क्षणभर थांबलो. पुन्हा दोन पावले मागे आलो. या समोरच्या पन्नास एक खोप्यांमधला एक खोपा हलके हलके झोका घेत होता. खरं तर सुरवातीला त्यात लक्ष देण्यासारखे काही वाटले नाही. मग झटकन डोक्यात प्रकाश पडला. सगळे खोपे (घरटी) अगदी शांत असताना हे एकच खोपटे का हलत असावे. एखादा वेडा ब्रम्हचारी अजुनही रमला असेल का? पण वसाहत खाली होऊन बराच काळ लोटला होता. असा ब्रम्हचारीही मागे रेंगाळणे शक्य नव्हते. एवढ्यात पुन्हा तो खोपा हलला व त्यातून काहीतरी फर्र आवाज करत वेगाने उडून गेले. एखाद्या ओसाड पडलेल्या गावातील झपाटलेल्या घराचे दार हलावे तसे दृष्य होते ते. विचार करुनही काही समजले नाही. मला वाटले एखादा चुकार पक्षी खोप्यावर बसला असेल. चाहूलीने उडाला असेल. मग वसाहतीचा नाद सोडला व पलीकडच्या शेताकडे निघून गेलो.
तासाभराने परतताना जेंव्हा मी त्या वसाहतीशेजारुन गेलो तेंव्हा सगळे विसरलोही होतो. आज काय पहायला मिळाले याचेच विचार माझ्या डोक्यात सुरु होते. इतक्यात पुन्हा त्याच खोप्यातून काही तरी उडाले. आता मात्र माझी खात्री झाली की नक्की काहीतरी वेगळे घडतेय. वेगळे या साठी की या अशा वसाहती मी कैक वर्ष पहातोय पण अशी हालचाल कधी पाहीली नव्हती. पक्ष्यांकडे कधी आवर्जून पहायची सवय नसल्याने कधी ते जाणवले नव्हते ईतकेच. आता गेले काही महिने सगळ्यां गोष्टींची नोंद ठेवायला सुरवात केल्याने अशा हालचाली सहज नोंदवल्या जात होत्या. जो कुणी पाहूणा त्या वसाहतीत आला होता तो तासाभरात दोनदा दिसल्याने एक गोष्ट लक्षात आले की उद्याही तो नक्कीच दिसेल. त्यामुळे मी खोप्याच्या जवळ न जाता घरी परतलो. दुसऱ्या दिवशी मी त्या वसाहतीजवळच निवांत बसून तासभर घालवणार होतो.
मी त्या खोप्यांपुढे येवून बसलो होतो. सुर्योदय नुकताच झाला होता. मी आल्यानंतर दहाच मिनिटांनंतर मला एक लहान पक्षी पलिकडील बाजूने खोप्यांकडे आलेला दिसला. नक्की कोण होता ते ओळखता आले नाही पण मला आता जागा सोडता येणार नव्हती. ईकडे तिकडे उडून तो कालच्याच खोप्याशेजारी येवून बसला. मी कॅमेरा झुम करुन पाहिले आणि माझा एकदम भ्रमनिरास झाला. ती पांढऱ्या कंठाची मनोली होती. (Indian Silver-bill) या मुनियांना मी नेहमीच सुगरणींच्या जुन्या घरट्यांच्या काड्या नेताना पाहीले होते. घरटे बनवन्यासाठी एकाच जागी मिळणारे असे मटेरिअल म्हणजे लॉटरीच. सुगरणींनी आधीच खुप बारकाईने निवडून आणलेल्या असतात या काड्या. त्यामुळे मुनियांना वेगळी निवड करावी लागत नाही. येथे उगाच अर्धा तास वाया घालवला असं वाटून मी ऊठणारच होतो पण अचानक लक्षात आले की या मुनियाला मी काल दोन वेळा व आज एकदा पाहीले होते. तिन्ही वेळेस ती इतक्या खोप्यामधील त्या विशिष्ट खोप्यावरच येवून बसली होती. माझ्या हेही लक्षात आले की काल घरी जाताना मी या मुनियाला घरट्याच्या आतून बाहेर पडताना पाहीले होते. जर काड्याच न्यायच्या असत्या तर ही मुनिया खोप्याच्या बाहेरील बाजूवरच बसली असती. कारण तेथीलच काड्या विस्कटलेल्या असतात. खोप्याच्या आतली बाजू तर घट्ट बांधणीची असते. या मुनियाचे काहीतरी वेगळेच चालले होते हे नक्की.
बाजूच्या फांदीवर बसलेल्या मुनियाकडे पहात असताना दुसरी एक मुनीया आली व अगदी सराईतपणे खालील बाजूने आत गेली. तिच्या तोंडात चक्क एक काडी होती. ती कधी बाहेर येतेय याची मी वाट पहात होतो तोवर बाजूच्या फांदीवर बसलेली मुनियाही आतमधे गेली. आता खोपा हलके झोका घेत होता. आत गेलेल्या मुनियांपैकी एक मुनिया खालील बाजूने मान काढून आजूबाजूला लक्ष ठेवावे तशी पहायला लागली. माझे डोके आता काम करेना झाले होते. इतक्यात एक मुनिया बाहेर येवून पुन्हा मघाच्याच फांदीवर बसली. जरा वेळाने दुसरी आली व दोघीही एकत्रच उडून दिसेनाशा झाल्या. मला पक्ष्यांचे वेड लहानपणापासूनच असले तरी रितसर पक्षीनिरिक्षण सुरु करुन मला सहाच महिने झाले होते. समोर जे दिसतय ते या अगोदर कधी पाहीले नसल्याने व फारशी ऐकीवातही नसल्याने अगदी वेगवेगळे तर्क लावूनही मला त्याचा अर्थ लागत नव्हता. जवळ जवळ अर्धा तासाने एका मागोमाग एक दोन्ही मुनिया पुन्हा आल्या. त्यातली एक पुन्हा बाजूच्या फांदीवर बसली व दुसरी आत गेली. मग मघाप्रमाणेच दुसरीही आत गेली. पुन्हा एक मान बाहेर काढून लक्ष ठेवू लागली व दुसरी आत काही काम करत राहीली. दिड तासात मी त्या जोडीला पाच खेपा घालताना पाहिले. त्यातल्या दोन वेळा एका मुनियाच्या चोचीत काडी होती. मी हे निरिक्षण सलग तिन दिवस केले. तिनही दिवस त्यांचा तोच क्रम होता. या तिन दिवसात मी नोंदवलेली अजुन एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे या दोन्ही मुनियांचे वागणे अगदी सुगरणींच्या जोडी सारखेच होते. सुगरण व मुनिया यांचा दुरान्वयानेही काही संबंध नाही हे मला माहित होते. काही पक्षी दुसऱ्या पक्ष्यांच्या अंड्यांमधे आपले अंडे घालतात, हे माहित आहे. काही पक्षी दुसऱ्या पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करतात हेही माहीत आहे पण एक पक्षी दुसऱ्या पक्ष्यांच्या वागण्याची का नक्कल करेल हे काही मला समजत नव्हते. मी नेटवर या प्रकाराची माहीती शोधायचा प्रयत्न केला तर मला काहीही माहिती मिळेना.
तिन दिवसांनंतर मात्र मला एकच मुनिया दिसायला लागली. याचा अर्थ मुनियाने खोप्यामधे अंडी दिली असावीत.
या सगळ्या प्रकारातून मी काढलेला अंदाज असा…
सुगरणींनी सोडलेल्या घरट्यातून काड्या न्यायच्या ऐवजी मुनियांनी ते घरटेच वापरायचे ठरवले असावे. एकदा घरटे वापरायचे ठरल्यावर मुनियाच्या जोडीने त्या खोप्याची बारकाईने पहाणी केली. नुकत्याच संपलेल्या पावसाने व वाऱ्याने जे काही नुकसान झाले होते ते त्या जोडीने आपल्या मनासारखे दुरुस्त केले. आतले मला पहाता आले नाही पण नर किंवा मादीने आतला भाग त्यांच्या मनासारखा बदलून घेतला असावा.
मुनियांचे घरटे अगदी अडचणीच्या ठिकाणी, एखाद्या काटेरी झाडावर कमी उंचीवर असते. त्यांनी ताब्यात घेतलेले सुगरणीचा खोपाही अतिशय अडचणीच्या जागी, बाभळीच्या झाडावर कमी उंचीवर होता. या साम्यामुळेही त्यांनी तो खोपा ताब्यात घेतला असावा.
रहाता राहीले त्या मुनियांचे वागणे अगदी सुगरणींसारखे का होते. तर त्याचा मी लावलेला अर्थ असा…
सुगरणीचा आकार असतो १५ सेमि व मुनियाचा आकार असतो ११ सेमि. म्हणजे बराचसा सारखा.
सुगरणींचा खोपा अशा पद्धतिने विणलेला असतो की त्यात ठरावीक पद्धतिनेच प्रवेश करता येतो. मुनिया जरी आत गेली तरी तिला त्याच पद्धतिने जावे लागले.
सुगरण खोप्यातून बाहेर मान काढून ज्या पद्धतिने लक्ष ठेवते तसे लक्ष ठेवण्यासाठी मुनियालाही तसेच बसणे भाग होते. खोप्याचा आकार लक्षात घेता त्यावर सुगरण बसली किंवा मुनिया जरी बसली तरी त्यांना एकाच लकबीने बसणे भाग आहे.
दोघांच्याही घरट्यांचा आकार जरी पुर्णपणे वेगळा असला तरी वापरले जाणारे मटेरिअल सारखेच असते.
सुगरण घरटे बांधण्यासाठी गवताची पाती आणते व मुनिया दुरुस्तीसाठी आणत होती, एवढाच फरक.
आणि मी दिड महिण्यांपुर्वीच सुगरणींचे खोपा बांधणे ते पिल्ले उडायला शिकणे हा पुर्ण प्रवास बारकाईने पाहील्याने त्याचा प्रभाव अजुन माझ्यावर होता.
या सगळ्यामुळे मला उगाचच मुनिया व सुगरणींच्या वागण्यात अतोनात साम्य वाटले होते.
मी या प्रकाराचा नेटवर फार शोध घेतला. विकीपिडियावर एका ओळीचा संदर्भ होता. त्या व्यतिरिक्त हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याच्या फक्त दोनच नोंदी मला आढळल्या. याचा अर्थ मला पांढऱ्या कंठाच्या मनोलींचे एक दुर्मिळ वर्तन पहायला मिळाले. नशिब म्हणतात ते हेच.
सुगरणीच्या खोप्यात बसलेली मनोली.

खोपा विणत असलेली सुगरण.

सुगरणींची वसाहत.


बुधवार, ६ जानेवारी, २०२१

गाफील का माल

वर्षाचा पहिलाच आठवडा. नविन वर्षाच्या पार्ट्यांचा धुरळा खाली बसला होता. हा पहिला आठवडा आम्हा मित्रांना निवांत भेटायला आवडतो. ठरल्याप्रमाणे मी सोमवारी भल्या पहाटे पुण्यातून निघालो. यातही जरा वेडेपणा असतोच. म्हणजे कोणत्या लेखकाचे पुस्तक वाचताना कोणते स्नॅक्स सोबत हवे, कोणत्या रस्त्यावर ड्राईव्ह करताना कोणती वेळ हवी वगैरे गोष्टी मी ठरवून टाकल्यात. त्यात सहसा बदल होत नाही. त्यातलाच हा रोड. पहाटेची वेळ, जुना मुंबई पुणे हायवे सोबत मेहदी हसन हे माझे फार आवडते कॉम्बो आहे. ज्यांना कामाची खुप घाई आहे त्यांनी एक्सप्रेस वे पकडावा गाडीच्या मानेवर पाय दिल्यासारखे यंत्रवत गाडी चालवत प्रवास करावा. फारच कंटाळा आला तर एखादी लेन बदलावी. तेथे वळणे नाहीत, लहान मोठी गावे नाहीत, टूव्हिलर्स नाहीत, धाबे नाहीत की रमत गमत चहा घ्यायला कोणते कट्टे नाहीत


साधारण साडेसात वाजता मी कळवा ब्रिजच्या जवळ पोहचलो असेन. ब्रिजवरचे नेहमीचे ट्रॅफीक अजुन सुरु झाले नव्हते. रस्त्यावरही तुरळक वाहतूक होती. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सगळीकडे मरगळलेले वातावरण होते. तसेही पुण्याहून आलो की मुंबईतले वातावरण मरगळलेलेच वाटते. त्या वातावरणात रुळण्यासाठी मला दुपार होते. इतक्यात माझ्या डाव्या बाजूने एक रिक्षा मला ओव्हरटेक करुन पुढे गेली. त्यात मागे बसलेल्या एका व्यक्तीने हात हालऊन माझे लक्ष वेधले माझ्या गाडीच्या बॉनेटकडे पहात काहीतरी खानाखुणा केल्या रिक्षा निघून गेली. त्याने केलेल्या खुणा मला समजल्या नव्हत्या. काहीतरी प्रॉब्लेम होता असं त्याच्या खुणांवरुन वाटत होते. गाडी तर स्मुदली चालली होती. मी गाडीची नेहमीच काळजी घेतो. आणि आपल्या गाडीबरोबर आपले एक बॉंडीग असते. काही अडचण असेल तर नक्की जाणवते. मला तसेही काही जाणवेना. पण एकदा शंका आली की मग चैन पडत नाही. मी गाडी बाजूला घेतली. खाली उतरुन गाडीला दोन पुर्ण प्रदिक्षणा घातल्या. कुठेही काही वेगळे वाटले नाही. ‘असेल काही तर समजेलचअसा विचार करत मी पुन्हा गाडीत बसलो. मी पहिला गिअर टाकून निघणार इतक्यात समोरुन येणाऱ्या दोन मुलांपैकी एकाने जोरजोरात हात हालऊन मला थांबायला सांगीतले. हा पोरगाही माझ्या गाडीच्या बॉनेटकडे पाहूनच काहीतरी सांगत होता. आता मात्र मी बावचळलो. नक्की काय झालय ते मला समजेना. मी पुन्हा गाडी बंद करुन खाली उतरलो. तोवर ती मुले जवळ आली होती. त्यातल्या एकाने सांगीतलेसाहेब, गाडीच्या बॉनेटखाली खुप स्पार्कींग होतय.”

मला एकदम काळजी वाटली. आजवर रस्त्यात कार पेटल्याच्या बातम्या डोळ्यांपुढे येऊन गेल्या. काय करावे समजेना. तो मुलगा म्हणालाबॉनेट ऊघडा गाडी सुरु करा साहेब. पाहूया काय झालय. मी ड्रायव्हर आहे. काही समजले तर सांगतो.” 

मी दार उघडून बॉनेटचे लिव्हर खेचले गाडी सुरु करुन खाली उतरलो. मला गाडीची फारशी काळजी वाटत नव्हती पण वेळ जात होता त्याची चिंता होती. मी बॉनेट शेजारी उभा राहीलो. त्या मुलाने मला उडणारे स्पार्क दाखवले. ते स्पार्क पाहीले आणि सेकंदाच्या शंभराव्या भागात माझ्या मेंदूने प्रचंड विचार केला. समोरचा एक स्पार्क माझ्याही मेंदूत पडला. जेंव्हा त्याने मला बॉनेट उघडायला गाडी सुरु करायला सांगितले होते तेंव्हाच बॉनेट वर करताना त्याने चार नंबरची स्पार्क प्लग केबल काढून ती आत खोचली होती. मला समोर दिसत होत्या त्या थिनग्या त्याच्याच होत्या. तेच स्पार्क दाखऊन तो मुलगा मला घाबरवत होता. एकून हे प्रकरण सरळ नव्हते हे क्षणातच माझ्या लक्षात आले. केबल कॅप पुन्हा बसवली की मी जायला मोकळा होतो. पण आता मला या प्रकरणात जरा रस निर्माण झाला होता.

उगाच पेटली तर काय करणारअसं म्हणत त्याने चिंतातूर आवाजात मला गाडी बंद करायला सांगितली. अगोदर तणाव असलेल्या माझ्या चेहऱ्यावर क्षणभर चिडल्याचे, मग कुटील हसण्याचे पुन्हा पॅनीक झाल्याचे भाव आलटून पालटून येऊन गेले. अर्थात त्या मुलाच्या ते लक्षात आले नसावे

मी त्या मुलाचे इतक्या मनापासून आभार मानले की आता माझ्या डोळ्यातून पाणी येते की काय असे त्याला वाटले असावे. (बरा अभिनय केला असावा मी.) अगदी देवासारखा धावलास तू. असं कोण कुणाला मदत करतं मुंबईत. गाडी पेटली असती तर काय झाले असते वगैरे वगैरे. आता मला उत्सुकता होती की तो पुढे काय करतोय. माझ्या दीनवान्या चेहऱ्याकडे पाहून तो म्हणालासाहेब समोर साई मोटारचे शोरुम आहे. तेथे काही मेकॅनिक मुक्कामालाच असतात. तुम्ही त्यांना बोलाऊन आणा. ते काहीतरी मदत करतील. किंवा येथून दहा मिनिटाच्या अंतरावर एक गॅरेज आहे, तेथे तुम्हाला कुणीतरी मदत करेल. गॅरेज अजून उघडले नसेल. तुम्हाला थांबावे लागेल. काही ही झाले तरी गाडी सुरु करु नका.”

मी पुन्हा पुन्हा त्याचे आभार मानले. एवढे होईतोवर त्याचा मित्र मात्र त्याला चलण्याची खुप घाई करत होता. “चल ना यार, कहा किसी के फटे मी पैर अडाता हैवगैरे म्हणून त्याला निघायला सांगत होता

तो मुलगा मला म्हणालासाहेब, येथेच थांबा. गाडी सोडून जाऊ नका कुठे. शोरुममधे कुणी आहे का पहातो पाठऊन देतो.”

माझ्या चेहऱ्यावर आता शंभर सशांच्या डोळ्यातली हतबलता आली होती आणि तो मुलगा मला धिर देत होता

आठ वाजत आले असावेत. ते दोघेही मधला उंच डिव्हायडर ओलांडून पलिकडे गेले. अगदी समोरच साई मोटारचे बंद गेट शोरुमची इमारत दिसत होती. ते दोघेही गेटवर गेले. कुणाशी तरी मिनिटभर बोलले. गेटशेजारीच असलेल्या एका टपरीमागून एक निळा ड्रेस घातलेला माणूस बाहेर आला. तो मुलगा माझ्याकडे बोट करुन त्या माणसाशी काहीतरी बोलला. मी देखील इकडून हात हलवला. तो निळा ड्रेस घातलेला माणूस पुन्हा आत गेला. ती दोन मुले रस्त्याच्या अलिकडे येताच निघून गेली. जाताना त्याने मला ओरडून सांगितलेसाहेब, फिटर येईल. त्याच्याकडून काम करुन घ्याजाताना ते दोघे असे काही निघून गेले की जणू काही त्यांचा या सगळ्याशी काहीही संबंध नव्हता. मगाशी भेटलेली रिक्षातली मुले, नंतर हे दोघे आता मला मदत करायला येणारा मेकॅनिक हे एकाच टिमचे असूनही अगदी सराईतपणे त्यांचे काम ते करत होते. आता या प्रकरणाला छान रंग यायला सुरवात झाली होती. मला मित्रांना भेटायला जायचे असल्याने घाई काही नव्हतीच. पुढे काय करायचेय ते मी एव्हाना ठरवले होते या रंगलेल्या डावाची छान मजा घेत होतो. ती मुले मॅकेनिकबरोबर बोलत असताना मी मित्राला फोन केला. हा पोलिस खात्यात बऱ्याच अधिकारावरच्या पोस्टवर आहे. त्याला सविस्तर सगळे सांगितले. त्याच्या म्हणन्यानुसार मी त्याला व्हाटसपवर करंट लोकेशन गाडीचा फोटो पाठवून दिला


जरा वेळाने तो मेकॅनिकसारखा दिसणारा माणूस आला त्याने काय झालेय ते विचारुन घेतले. मला गाडी सुरु करायला सांगीतली. एसी सुरु करुन पुन्हा बंद करायला सांगितले. मी अगदी नम्र भांबावलेला चेहरा करुन त्याच्या प्रश्नांना उत्तरे देत होतो. असाध्य व्याधी झालेला माणूस जसा डॉक्टरकडे आशेने पहातो तसे मी त्याच्याकडे पहात होतो. त्याने मला गाडी बंद करायला सांगितली विचारलेसाहेब, गाडीचा एसी कंटीन्यू दोन अडीच तासांपेक्षा जास्त सुरु होता का?”

(माझ्या गाडीचा नंबर MH-12 पाहूनच हे सर्व प्रकरण सुरु झाले होते.)

तुम्हाला कसे समजले असा भाव चेहऱ्यावर आणून मी त्याला सांगितलेहो, मी पुण्यावरुन आलोय. एसी कंटीन्यू सुरुच होता.”

कपड्याला हात पुसत तो म्हणालावाचलात साहेब. योग्य वेळी तुमच्या ड्रायव्हरच्या हे लक्षात आले. नाहीतर काहीही होऊ शकले असते. चांगला आहे ड्रायव्हर तुमचा.”

मी त्याला कृतज्ञतेने म्हणालोनाही हो. तो ड्रायव्हर नाहीए माझा. रस्त्यावरचा भला माणूस होता. त्याने मदत केली.”

इन्सानियत खतम नही हुई साब अभीअसं म्हणत तो इकडचे तिकडचे बोलायला लागला.

शेवटी मिच विचारलेआता काय करावे लागेल? मला गाडी टो करुन न्यावी लागेल का?”

तो म्हणालासाहेब, गाडीचा अल्टरनेटर उडालाय. बदलावा लागेल. त्याशिवाय गाडी सुरु केली तर प्रॉब्लेम होतील. कदाचीत इंजिन ब्लॉक होईल.”

त्याचे बोलणे ऐकून मला मजा वाटली. अल्टरनेटर काय, इंजीन ब्लॉक काय आणि काय काय. बाटलीचे झाकण उघडण्यापेक्षाही सोपी असणारी केबल काढून हा मला किती आत्मविश्वासाने गुंडाळत होता. रिक्षावाल्यापासून ते या मेकॅनिकपर्यंत सगळे किती सहज अभिनय करत होते. आपापली भुमिका झाली की सहज निघून जात होते. वाह! हा प्रयोग आता चांगलाच रंगायला लागला होता. पात्रे येत होती जात होती. माझ्यासमोर पाचवे पात्र उभे होते. अजून कोण एंट्री घेणार आहे त्याची मला उत्सुकता होती

मी पाच मिनिट चेहऱ्यावर हात फिरवत उभा होतो. आभाळ कोसळल्याचे भाव चेहऱ्यावर होते. काय पनौती लागलीय सकाळपासून या सारखी वाक्यं मी पुटपुटत होतो. मी फारच टेंशनमधे आहे हे पाहून त्याने प्लग केबलच्या पलिकडील एक वायर प्लग खेचला म्हणालासाहेब, मी गाडी डायरेक्ट केलीय. एखाद किलोमिटर गाडी जाईल. पुढे गॅरेज असेल तर पहा.”

मला मनातल्या मनात इतके हसू येत होते की विचारु नका. गाडी डायेक्ट करतो म्हणत त्याने कसली तरी वायर काढली होती. मी त्याला ती पिन पुन्हा आहे तेथे लावायला सांगून म्हणालोमी मुंबईत नविन आहे. आता कुठे मी गॅरेज शोधणार? तुम्हीच काही होतय का पहा ना प्लिज.”

तो म्हणालासाहेब, आम्हाला शोरुमच्या वर्कशॉपबाहेरचे काम करायला परवानगी नाहीए. दहा वाजता शोरुम सुरु होईल. अकरा पर्यंत मॅनेजर येतील. तुम्ही त्यांना विचारा. त्यांनी सांगितले तर मी काम करुन देईन.”

मी हतबल होत म्हणालोअहो, तुमचे मॅनेजर यायला अजून तिन तास आहे. मी किती वेळ थांबणार? त्यातही ते ऐन वेळी नाही म्हणाले तर मग काय?”

त्या निळ्या मॅकेनिकने खिशातून मोबाईल काढून मला नंबर दिला मॅनेजरशी बोलून पहायला सांगितले.

मी फोन केला. मॅनेजर अगोदर ठामपणे नाहीच म्हणत होता. माझी नोकरी जाईल वगैरे कारणे देत होता. मी फारच विनंती केल्यावर त्याने मेकॅनिककडे फोन द्यायला सांगितले. काही बोलणे झाल्यावर मग पुन्हा माझ्याशी बोललासाहेब, अडचणीत असलेल्या माणसाला नाही म्हणू शकत नाही मी. आमचेही ह्युंदाईचेच शोरुम आहे. मी मेकॅनिकला सांगितले आहे काम करायला. वर्कशॉपमधला कनेक्टर नाही देऊ शकणार आम्ही पण तो तुम्हाला शोरुमशेजारच्या दुकानातून एखादा कनेक्टर देईल रिप्लेस करुन. त्याच्याकडे ७५०० रुपये द्या. तसेही कोणताही कनेक्टर असला तरी तो किमान तिन वर्ष चालतोच चालतो. पण तुम्हाला शोरुमच्या नावाने बिल मिळेल. ते चालत असेल तर मेकॅनिकला सांगा काम करायला

हायला, आज मला सगळी देवमाणसेच भेटत होती. तिही एका मागून एक भेटत होती. अगदी मला भेटायला आतूर असल्यासारखी भेटत होती

अल्टरनेटर उडाला होता हे मॅनेजर विसरला होता आता तो मला कनेक्टर रिप्लेस करुन देणार होता. पण देवमानसांना तेवढे माफ करायला काही हरकत नव्हती. एव्हाना साडेआठ वाजून गेले होते. रस्त्यावरची वर्दळ वाढायला लागली होती. “साहेब, नऊ नंतर ब्रिजच्या कामामुळे ट्रॅफीक जाम होते येथे.” असं म्हणत मेकॅनिकही पैसे देण्यासाठी घाई करायला लागला. मला खात्री होती की या खेळातले अगोदर येऊन गेलेले खेळाडू कुठून तरी आमच्यावर लक्ष ठेवून असणार होते. सगळे आजूबाजूलाच असणार होते. मॅनेजर हे पात्र फक्त फोनवरुनच या खेळात उतरल्याने मी त्याला पाहिले नव्हते पण अगोदरची दोन मुले आता समोर उभा असलेला मॅकेनिक यांचे फोटो माझ्या मोबाईमधे मी घेतले होते. माझ्या सहज अभिनयामुळे त्या सगळ्यांची खात्री झाली होती की सावज पुर्ण जाळ्यात अडकले आहे. आता काही मिनिटातच पैसे हातात येतील याची त्यांना खात्री असावी. प्रत्यक्ष परिस्थिती अशी होती की ती सगळी टिम आता माझ्या जाळ्यात फसली होती. गाफील का जो माल है, वो अकलमंद का खुराक है हे अगदी सत्यवचन आहे पण येथे गाफील मी नाही तर ते होते. एव्हाना मदत यायला हवी होती. या पेक्षा जास्त वेळ मी त्या मॅकेनिकला बोलण्यात गुंतवू शकणार नव्हतो. ती सगळी टिम ज्या पद्धतिने काम करत होती ते पहाता ते अगदी सराईत असणार होते. माझ्या थोड्याशा चुकिनेही पाखरे जाळ्यातून उडाली असती. इतका वेळ मी टेंशनची ऍक्टींग करत होतो पण आता मला खरेखुरे टेंशन यायला सुरवात झाली. तासभर वाया घालवूनही जर ते हातातून गेले तर पुन्हा मिळणे अशक्य होतेत्यातही त्या टिम मेंबरपैकी आता माझ्या समोर एकच उभा होता. मी स्वतःहून काहीही करु शकत नव्हतो. मी काही ऍक्शन घेतली असती तर पाच सहा किंवा त्या पेक्षा जास्त जणांनी माझ्याकडे धाव घेतली असती अशी भिती मला वाटत होती. एक तर त्याला जावू देणे किंवा मदतीची वाट पहाणे एवढेच माझ्या हातात होते. एवढ्यात मागून बुलेटवर दोघेजण आले. त्यांनी बुलेट स्लो केली त्यातल्या एकाने हातातला कागद हलवत मेकॅनिकला काहीतरी पत्ता विचारला. अर्थात मेकॅनिकला व्यवस्थित काही ऐकू आले नाही. नाईलाज झाल्यासारखी ती बुलेट थांबली मागे बसलेल्याने मेकॅनिकला व्यवस्थित पत्ता विचारला. तो काय विचारतोय हे ऐकताच मेकॅनिकमालूम नही, आगे पुछोएवढेच त्रासीकपणे म्हणाला. आता तो माणूस मला विचारायला लागला. “पाहूम्हणत मी त्याच्या हातातला कागद घेतला. मला अंदाज नाही, खात्रीच होती की ही मित्राने पाठवलेली मदत आहे. मी तो कागद हातात घेवून पाहू लागलो. एवढ्यात त्या माणसाने खाली उतरुन घार जशी कोंबडीच्या पिल्लावर झडप घालते तशी झडप घालून त्या मेकॅनिकची कॉलर कमरेचा पट्टा पकडला. डावाचे पारडे फिरल्याचे त्या मेकॅनिकच्या क्षणातच लक्षात आले. तोवर दुसऱ्याने बुलेट स्टॅन्डवर लावली जवळ येताच त्याने प्रथम मेकॅनिकच्या गालावर पाचही बोटे उठवली. त्या दोघांचा तो झपाटा वागणे पहाताच मी मात्र हादरलो. मला हे असं काही अपेक्षित नव्हते. मला वाटले फिल्मी स्टाईलने ते त्याला व्यवस्थित गाडीवर बसऊन घेवून जातील. कानाखाली खणखणीत आवाज काढल्यावर त्या मेकॅनिकपेक्षा मीच जास्त सटपटलो. आजूबाजूला कुणी आमच्यावर लक्ष ठेऊन असतीलच तर केंव्हाच उडाले असणार होते


त्या हवालदाराने मेकॅनिकची कॉलर सोडली फक्त मागून त्याच्या पँटचा पट्टा पकडला मला गाडी सुरु करायला सांगितली. मी आता खरोखरीचा भांबावलो होतो. आपण हे प्रकरण वाढवून चुक तर केली नाही ना असं मला वाटायला लागले होते. मी झटकन प्लग केबल तिच्या जागेवर दाबून बसवली. बॉनेट खाली करुन गाडी सरु केली. हवालदाराने मेकॅनिकचे गाठोडे गाडीत ढकलले तो स्वतःही बसला. त्याच्या म्हणन्यानुसार मी गाडी बुलेटच्या मागे मागे घ्यायला सुरवात केली


काही वेळातच आमची वरात चौकीवर पोहचली. मला आत यायला सांगून तो हवालदार मेकॅनिकला घेवून चौकीत गेला. बुलेटवर आलेला हवालदार तेथून पुढे कुठेतरी निघून गेला होता. मी गाडी लॉक करुन, उगाचच बाहेर जास्त वेळ काढून चौकीत गेलो. आतमधे मात्र मला अपेक्षित असलेले वातावरन नव्हते. सकाळच्या वेळी एखाद्या एकत्र कुटूंबाच्या घरात असते तशी वर्दळ होती चौकीत. कामांची गडबड दिसत होती. मी आत गेलो. बाजूलाच मेकॅनिकला जमिनीवर उकीडवे बसवले होते. शेजारच्या खुर्चीत एक भक्कम हवालदार बसला होता. मी आवर्जून नोंद केली की चौकीत दिसणारे बहुतेक पोलिस हे मस्त तब्बेत कमावलेले दिसत होते. क्वचित एखादा ढेर सुटलेला होता. मला वाटले की मला कुठे सही वगैरे करावी लागेल म्हणून त्यांनी चौकीवर बोलावले असावे. पण त्यांच्या बोलण्यातून समजले की मी त्यांच्याआवडत्या सायबाचामित्र होतो म्हणून त्यांनी मला चहासाठी चौकीवर आणले होते. चौकीत बसून पोलिसांचा चहा पिने ही कल्पनाच मला फार विनोदी वाटली. चहा येईपर्यंत मी तेथल्या रिवाल्व्हिंग चेअरवर बसलो होतो. समोरचा हवालदारकाय मग, दिसला नाहीत बरेच दिवसअशा घरगुती सुरात बोलावे तसे त्या मेकॅनिकला तू कुठला? सोबत कोण कोण होतं वगैरे विचारीत होता. इतका घरगुती सुर ऐकून मेकॅनिकही सांगत होता की आम्ही साहेबाला मनापासून मदत करत होतो. आमचा काही वाईट हेतू नव्हता. साहेबाचा काहीतरी गैरसमज झाला वगैरे. पण लवकरच माझ्या लक्षात आले की हॉटेलमधे मिळणारे घरगुती जेवण जसे फसवे असते तसाच त्या हवालदाराचा घरगुती आवाजही फसवा होता. कारण मेकॅनिकच्या काही लक्षात यायच्या आधीच त्या हवालदाराची भक्कम थप्पड त्याच्या थोबाडात बसली. तो कळवळत कोलमडला. ते पाहून मला पोटातून कालवून आलं. आपण हे उगाच केलं असं वाटायला लागलं. त्या मेकॅनिकची किव यायला लागली. ते अपराधी भाव माझ्या चेहऱ्यावरही आले असावेत. कारण टेबलच्या पलिकडे बसलेला एक अधिकारी मला जवळ बोलवत म्हणालासाहेब, ही एक मोठी गँग आहे. आम्ही शोधात होतोच. तुम्हाला एवढं वाईट वाटून घ्यायची आवश्यकता नाही. आणि फारच वाईट वाटत असेल तर एक विचार करा की तुम्ही यांना पकडून दिल्यामुळे तुमच्यानंतर त्या भागातून जाणारे कितीतरी भोळे कारवाले यांच्या जाळ्यात सापडण्यातून वाचले. फार चिंता करु नका. एक सापडलाय म्हणजे तासाभरात सगळी पोरं सापडतील. तुमचे काही गेले नसणारच कारण तुम्ही फार हुशारीने वागलात. गेल्या महिन्यात अनेक लॅपटॉप मोबाईल पळवलेत या चोरांनी. ते ऐकून मात्र मला खरच असे वाटले की कुणी अगदीच भोळा असलेला कारवाला याच्या जाळ्यात सापडला असता तर नक्की आठ नऊ हजाराला फटका बसत असणार त्याला. वेळे परी वेळही जात असणार. आठ-नऊ हजार ही काही लहान रक्कम नव्हे. आपले दहा रुपये हरवले तर दिवसभर चैन पडत नाही. त्या विचारांनी माझ्या मनातली त्या मुलांविषयीची करुणा कुठल्या कुठे गेली. उलट आपणच एखादी सणसणीत ठेऊन द्यावी असं वाटायला लागलं


चौकीतूनच मित्राला फोन लावला. काम झाल्याचे सांगितले. त्या मेकॅनिकच्या चेहऱ्याकडे एकदा पाहीले एकदाचा निघालो. या वेळात मित्रांनाही काय चालले आहे त्याची कल्पना दिली होती त्यामुळे त्यांचेही अधून मधून फोन येवून गेले होते. आज जर माझे सात आठ हजार गेले असते तर मला वाईट नक्कीच वाटले असते पण त्यापेक्षाही जास्तआपण फसवले गेलोयाचीच बोच मला कितीतरी दिवस छळत राहीली असती


ते म्हणतात नाकम्बख्त को भी किस वक्त खुदा याद आयाअगदी तसेच त्या मुलांना त्यांचा धंदा सुरु करताना मलाच आडवावे वाटले. त्यांनी नंबरप्लेट पाहून गाडी मुंबईबाहेरची आहे एवढच पाहीलं. पण त्यांनी गाडीचा नंबर MH-12 आहे हे लक्षात घेतलं असतं तर हा प्रसंगच उभा राहीला नसता. पुणेकरांबरोब पंगा घेतला त्यांनी. त्याला कोण काय करणार?



एवढं सगळं लिहिल्यावर चार सुचना द्यायलाच हव्यात की नाही? पण मी काय काळजी घेतो तेवढेच सांगतो. बाकी तुम्ही ठरवा.


कुणी अशी गाडी थांबवली तर मी दुर्लक्ष करत नाही. काही प्रॉब्लेम असुही शकतो. पण आम्ही सगळे एकदम गाडीतून खाली उतरत नाहीत.

सर्व काचा वर घेतलेल्या असतात

एकटा असलो तर गाडी लॉक केल्याशिवाय मी उतरत नाही. दार उघडताना माझा हात नकळत सेंटर लॉकवरुन फिरतोच फिरतो.

गाडीत लॅपटॉपची बॅग, बायकोची पर्स असेल तर मी मागच्या सिटवर सिटबेल्टमधे बॅगचा बेल्ट अडकवून सिटबेल्ट लावतो. कुणीही सहज ओढली तरी बॅग जागेवरच रहाते.

पुढील दोन्ही सिटकव्हरला, जेथे आपली पायाची पोटरी येते तेथे मी चेन असलेली पॉकेट शिवून घेतलीत. तेथे मोबाईल, सुट्टेपैसे, पैशाचे पाकीट, गॉगल्स वगैरे आरामात ठेवता येते. तेथवर कुणाचा हात शक्यतो पोहचत नाही

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी ड्राईव्ह करत असताना काहीही झाले तरी पॅनिक होत नाही. अगदी टायर फ्लॅट झाला किंवा बंद पडली किंवा इतर काही प्रॉब्लेम आला तरी मी शांत रहातो. पॅनिक झाल्याने प्रश्न मिटत नाहीत, उलट वाढतात

प्रवासात असताना काही ना काही निमित्ताने मी मित्रांच्या किंवा ज्यांच्याकडे चाललोय त्यांच्या संपर्कात रहातो.






Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...