❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

देवा जाग्यावर...३ (अंतिम)

मी आणि नाना खांद्यावर सॅक अडकवून घाईत जीना उतरलो. आज कॉलेजला जरा उशीरच झाला होता. नानाने पार्किंगमधून बाईक बाहेर काढली तेवढ्यात समोरच्या दुकानातल्या भाभींनी आवाज देवून सांगीलतले “अप्पा, भाभींचा फोन होता काल. त्या आज साडेदहा वाजता शिवाजीनगरला येणार आहेत. तुला घ्यायला बोलावलं आहे” या दुकानवाल्या भाभी फार प्रेमळ होत्या पण तितक्याच विसरभोळ्या. कालचा निरोप त्या आज देत होत्या. मी नानाचे घड्याळ पाहीले. दहा वाजले होते. सगळाच घोटाळा झाला होता. माझी होणारी बायको अर्ध्या तासात शिवाजीनगरला येणार होती आणि मला पोहचायला तासभर तरी लागणार होता. मी नान्याला घाई केली आणि त्याला मागे बसायला सांगून गाडीला किक मारली. कॉलेजला दांडीच बसणार आज हे ओळखून नान्याने आमच्या सॅक्स भाभींच्या दुकानात ठेवल्या व तो गाडीवर बसत म्हणाला “अप्पा, मला दत्तमंदिरासमोर सोड आणि तू तसाच पुढे जा गाडी घेवून. मी रिक्षाने येईन घरी” ही कल्पना चांगली होती. मी ट्रॅफीकबरोबर खो खो खेळत गाडी सुसाट सोडली. अर्ध्या तासात मी दत्तमंदिरासमोर गाडी उभी केली. नान्याची उतरायची वाट पहात मी गाडी रेझ करत राहीलो.
नान्या खाली उतरत म्हणाला “च्यायला, वहिनीच्या नुसत्या नावाने काट्यावर आल्यासारखा काय करतो अप्पा. गाडी बंद कर जरा. आवाज ऐक काय गोड आहे”
“नान्या मरुदे तो गोड आवाज. तू काय लग्नाअगोदर माझा काडीमोड करतो की काय” म्हणत मी घाई केली. पण नान्याने हात पुढे करुन गाडीची चावी काढली. नान्यापुढे कधी कुणाचे चालले आहे? मी निमूट गाडी स्टँडवर लावली व कोण गातय ते शोधायला लागलो. रस्त्याच्या पलिकडे एका दुकानासमोर साधारण माझ्याच वयाची एक मुलगी फुटपाथवर बसुन कव्वाली गात होती. तिच्या शेजारी ढोलकवर बसुन एक पन्नाशीचा माणूस तिला साथ देत होता. समोरच स्टिलचे एक ताट होते. त्यात काही चिल्लर दिसत होती. येणारे जाणारे त्या दोघांना ओलांडून जात होते. कुणी एखादा त्या ताटात नाणे टाकत होता. चार पाच बिनकामाची माणसे बाजूला उभी राहून तिची कव्वाली ऐकत होती. साडे दहा-अकराची वेळ असल्याने रस्त्यावर भरपुर वर्दळ होती. नान्याने माझे मनगट पकडले व रस्ता ओलांडला. आम्ही अगदी त्या दोघांच्या समोरच जावून उभे राहीलो. त्या पोरीचा आवाज जरा पुरूषी होता पण त्यामुळे कव्वालीला चांगलाच उठाव मिळत होता. मुळ कव्वाली मी खुपदा ऐकली होती पण ही पोरगी त्या कव्वालीत नसलेल्याही जागा, हरकती अगदी सहजतेने घेत होती. मधेच तिने त्या कव्वालीत नसलेला एक भलताच शेर अगदी बेमालूमपणे त्यात मिसळला. सुरांची आणि शायरीची उत्तम जाण असल्याशिवाय हे शक्य नव्हते. पण तिला साथ देणारा माणूस मात्र होळीचे ढुमके वाजवावे तशी साथ करत होता. त्या पोरीने विणलेल्या रेशमी कव्वालीला त्या माणसाने बारदानाचे ठिगळ लावले होते. सुरेल आवाजातली ती कव्वाली ढोलकमुळे कानांना त्रास देत होती. तरीही नान्या मजेत उभा राहून कव्वालीचा आनंद घेत होता.
मी नान्याच्या हातातली गाडीची चावी घ्यायचा प्रयत्न करत म्हणालो “नान्या, काय ऐकतो हे. त्या माणसाने सगळी डाळ नासवलीय ढोलकामुळे. तू बस ऐकत. मला जावूदे बाबा. जोडे खायला लागतील नाहीतर बायकोचे”
तोवर त्या मुलीने कव्वाली आवरती घेतली होती. अपेक्षेप्रमाणे थाळीत पैसे जमा झाले नव्हते. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
नान्या तिला म्हणाला “क्या रुबी, ये गधा कहासे पकडके लायी तू? लगता है आज तू खाली पेट रहेगी दिनभर”
थाळीतील चार पाच नाणी गोळा करत ती मुलगी म्हणाली “बाप है मेरा. उसकू कायकू फिकर रहेंगी रोटी की, ठर्रे का पैसा जमा होतैच कल्टी मारेगा ये. तू आज कैसे आया इधर भैय्या?”
नान्याने खिशातून पन्नासची नोट काढून तिच्या हातात दिली व म्हणाला “तेरे भाई को क्यू साथ नै लायी तू? और ये पचास की नोट युही नही थमायी, ओ गफलत की नींद में सोनेवाले सुना कडक आवाज मे. तेरे बाप को उठा पहले वहासे”
मी नान्याला म्हणालो “तू ओळखतोस हीला? तू या गल्लीत कुठे कुठे ओळखी वाढवल्या आहेत काय माहीत. मला निघूदे, तू बस कव्वाली ऐकत”
नान्याने माझी शर्टची बाही धरुन ओढले व म्हणाला “तू कुठे जातोस? वहिनी येईल बसने बरोबर. नाना असताना काळजी कसली करतोस? चल ढोलकवर बस. कडक हात चालला पाहीजे एकदम”
मला क्षणभर नान्याला वेड लागले आहे की काय असे वाटले. की माझ्या ऐकण्यात चुक झाली होती? पण मी जे ऐकले होते तेच नान्या म्हणाला होता. त्या पोरीचा बाप उठून उभा राहीला होता. उभ्या जागी तो गारुड्याचा नाग झुलावा तसा झुलत होता. त्याने सकाळीच झोकली असावी. तो नान्याकडे आणि माझ्याकडे अतिशय लाचार नजरेने पहात होता. ती पोरगीही नान्याकडे आश्चर्याने पहात होती.
नान्या तिला म्हणाला “हा माझा मित्र आहे. खतरी तबला वाजवतो. तू गा. हा बसेल ढोलकवर”
रुबी आता माझ्याकडे पहायला लागली. तिला नान्याच्या विक्षिप्तपणा माहित असावा पण तो इतका वेडेपणा करेल असे तिलाही वाटले नसावे. कारण तिच्या डोळ्यात आश्चर्य व माझ्यासाठी सहानभुती दिसत होती.
ती नान्याला म्हणाली “छोड ना भैय्या, उसकू कायकू परेशान करतै तुम?”
माझी रदबदली त्या रस्त्यावर कव्वाली गाणाऱ्या पोरीने करावी याचा मला राग आला. मी नान्याला चिडून म्हणालो “नान्या, हे काही गावकीचे भजन नाहीए रामनवमीचे. आणि तू दिगूभटाच्या भैरवीला साथ कर म्हटल्यासारखा आग्रह काय करतोय? चल, चावी दे. मला निघायला हवे”
नान्याने शांतपणे माझ्याकडे पाहीले आणि म्हणाला “त्या मंडपात खडीसाखर लवंगा चखळत, हाताला पावडर लावून तबला बडवतोस तू तेंव्हा राम प्रसन्न होतो काय रे तुझा आणि या रुबीबरोबर बसलास जरा वेळ तर तो राम काही कोदंड घालणार आहे का तुझ्या टाळक्यात? तिचा बाट लागेल असे नखरे करतोय उगाच. भटा बामणांच्या वरतान करायला लागला तू तर. चल बस. मी पहातो कशी तुझी अब्रू जाते या धुळीत ते. बस येथे”
माझ्या विरोधाला न जुमानता नान्याने माझे खांदे दाबत मला त्या ढोलकसमोर बळेच बसवले आणि पहारेकऱ्यासारखा माझ्या पुढेच उभा राहीला. रस्त्यावरुन जाणारी सारी रहदारी फक्त आणि फक्त माझ्याकडेच उपहासाने हसत पहात आहे असे मला वाटायला लागले. या पोरांचे काय चालले आहे हे पहायला काही बिनकामाची माणसेही तेथे गोळा झाली होती. मी जवळ जवळ त्या पोरीच्या मांडीला मांडी लावूनच बसलो होतो. नान्याने पुन्हा इशारा करताच मी त्याच्याकडे आणि मग त्या पोरीकडे अतिशय हतबल होऊन पाहीले. तिला इतक्या जवळून पहाताना मला तशा अवस्थेतही वाटून गेले की या पोरीला लख्ख धुवून, निटनेटकी केली तर लाखात नाही पण हजारात नक्कीच उठून दिसेल. सुरमा घातलेले टप्पोरे व करारी डोळे, करारी डोळे असुनही चेहऱ्यावर अत्यंत सालस भाव, सावळा रंग. सावळा कसला, काळाच म्हणावा लागेल. डोक्यावर तेल न लावलेले व टोकाला चमकदार पिवळट झालेले केस, कानात लांबलचक झुबे, अंगावर मळकट हिरव्या रंगाचा स्वच्छ पंजाबी ड्रेस, त्यावर वापरुन वापरुन घडयांनी सुरनळी झालेली पिवळी ओढणी, हातात ऍल्यूमिनिअमची बांगडी व पायात काळा दोरा. रंग काळा असल्यामुळे जास्तच गुलाबी दिसणारा तिच्या हाताचा तळवा पाहून मला कृष्णाच्या चित्राची आठवण झाली. मी ढोलक कधी जवळ घेतोय याची रुबी वाट पहात होती व मी तथाकथीत सज्जन समाजात अत्यंत बदनाम असलेल्या त्या गल्लीत तिच्याशेजारी फुटपाथवर धुळीत मांडी घालून असहाय होवून बसलो होतो.
नान्याने नुसत्या हुंकाराने तिला इशारा केला आणि तिने कव्वालीचा पहिला शेर गायला सुरवात केली. डाव्या हातातली घुंगरांची पट्टी मांडीवर हलकेच आपटत तिने ताल धरला होता. काहीही असो पण पोरीच्या आवाजात खरच जादू होती. कुणी जाणकाराने तिच्या आवाजाला चांगले घासुन पुसून तेज केले असते तर पिंपळपानावर विश्व तरावे तसे त्या आवाजावर रुबीचे अख्खे कुटूंब नक्कीच तरले असते. शेर संपवून तिने पहिले कडवे गायला सुरवात केली तरी मी मख्खसारखा नुसता बसुन होतो. गायीच्या पाठीवरुन हात फिरवावा तसे त्या ढोलकाच्या एका कातडी बाजूवर मी उजवा हात फिरवत होतो. रुबीचे पहिले कडवे संपून ती पुन्हा धृपदावर आली तरी माझा ढोलक सुरु होईना. हे पाहून नानाने पुढे होवून माझा खांदा हलवला. काहीही केले तरी आता आपली सुटका होत नाही हे लक्षात येताच मीही मग निर्ढावल्यासारखा निट आरामशिर बसलो. समोरचा ढोलक पुढे ओढून तो व्यवस्थित उजव्या मांडीखाली घेतला. एवढ्या गोंगाटातही हलकेच चाट वाजवून ढोलक कोणत्या पट्टीत लागलाय याचा अंदाज घेतला आणि “होवूनच जाऊदे आता” अशा नजरेने मी रुबीकडे पाहीले. तिलाही अंदाज आल्याने तिने धृपद न घेता तेच कडवे पुन्हा घेतले. मी छातीवर हनुवटी दाबून, डोळे बंद करुन डोके शांत केले. कडवे पुर्ण करुन रुबी समेवर आली आणि मी एकदम कडक पंजाबी उठान वाजवून चक्क केरवातली लग्गी सुरु केली. कव्वालीला केरवा लग्गीची साथ पाहून नान्या एकदम खुष झाला. माझ्या कानावर त्याची दाद आली. या फुटपाथवर तसेही कुणी मला ओळखत नव्हतेच आणि राममंदिरातील मंडपात असणारी जाणकारांची जरब तर अजिबातच नव्हती. रुबीलाही तालाची उत्तम जाण दिसत होती. त्यामुळे मी तिच्या कव्वालीच्या साथीला वाट्टेल ते प्रयोग सुरु केले. दहा मिनिटे झाली होती. मी छातीवर दाबलेली हनुवटी अजुन वर उचलली नव्हती ना घट्ट बंद केलेले डोळे उघडले होते. माझे कान रुबीच्या आवाजाचा मागोवा घेत होते आणि बोटे त्याबरहुकूम ताल उमटवीत होती. आजूबाजूला असणारा कोलाहल हळूहळू मला ऐकू येईनासा झाला. काही वेळाने रुबीचा आवाज आणि त्याला साथ करणारा माझा ढोलक यांची भुमीका नकळत बदलली. आता माझा अंदाज घेवून रुबी गात होती. जणू काही तिचा आवाज आता माझ्यासाठी लेहऱ्याचे काम करत होता आणि मी ढोलकवर तबल्याचे बोल थोडा फार फरक करुन तिच्या कव्वालीच्या चालीच्या साथीत वापरत होतो. येथे काहीही बंधने नव्हती की कुणी नावे ठेवणारे नव्हते. कुठे बसलोय, कुणाला साथ करतोय हे मी आता विसरलो होतो. तबल्यापेक्षा ढोलकमधे काही गोष्टी सहजसोप्या वाटत होत्या. बोल जरा वेगळ्या प्रकारे उमटत होते. ही ढोलकची मजा जरा आगळीच होती हे माझ्या लक्षात यायला लागले होते. त्याचा पुरेपूर फायदा आणि मजा मी घेत होतो. मी जवळ जवळ पंधरा मिनिटे ढोलक वाजवत होतो. या दरम्यान रुबीने कव्वालीची दोन आवर्तने पुरी केली असावीत. तिने शेवटची सुरावट घेतली आणि मी चक्क धुमाळीचे दोन बोल वाजवून हात वर केले. आजूबाजूने टाळ्यांचा आवाज येताच मी कुठे बसलोय याचे मला भान आले. नविन जागी नुकतेच झोपेतून उठल्यावर जो भांबावलेपणा येतो तसे मला झाले. नान्याने माझ्यासमोर चवड्यावर बसुन लहान मुलाला च्यावम्याव करावे तसे माझे दोन्ही कान धरुन माझे डोके पुढे मागे हलवले. कान न सोडताच नान्या म्हणाला “बहार, बहार उडवलीस अप्पा. भयंकर भारी हाणला ढोलक तू आज”
मी आजूबाजूला पाहीले. बरीच गर्दी गोळा झाली होती. बहुतेकांच्या नजरेत कौतूक दिसत होते. माझे कपडे वगैरे पाहून त्यांचा समज झाला असावा की एका भिक मागणाऱ्या मुलीला हा पोरगा मदत करतोय. काही जणांना खरेच माझ्या वाजवण्याचे कौतूक वाटलेले दिसले. अनेकांनी खिशातून दहा-विसच्या नोटा काढून रुबीच्या हातात दिल्या. काहींनी ताटामधे चिल्लर फेकली. काही लोकांनी माझ्या अंगावरही काही नाणी टाकली. एक दोन जणांनी माझ्या समोरच्या ढोलकवर पैसे ठेवले. हळू हळू गर्दी पांगली आणि माझी नजर त्या उरलेल्या बघ्यांमधे उभ्या असलेल्या माझ्या होणाऱ्या बायकोकडे गेली आणि मी चपापलो. मला अशा ठिकाणी, अशा अवस्थेत बसलेले पाहून खरे तर तिने माझी ओळखही नाकारली असती तरी मला गैर वाटले नसते, पण तिच्या डोळ्यात माझ्याविषयी आदर दिसत होता. आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर आपल्याविषयी असे आदराचे भाव पहाणे हे खरच छान असते. नान्या माझ्या कानात कुजबूजला “मी सांगितलय वहिनीला सगळे. काळजी नको करुस”
एवढ्यात कुणी तरी माझ्या अंगावर एक रुपयाची तिनचार नाणी फेकली. फेकणाऱ्याचा हेतू वाईट असेल असे नाही पण बायकोसमोर झालेला प्रकार पाहून मला शरमल्यासारखे झाले. मी नान्याला बाजूला करुन खाली पडलेली नाणी गोळा केली. ढोलकवर असलेल्या एकदोन नोटाही उचलल्या. हातातल्या त्या पैशांकडे पाहून मला जाणवले की गावाकडे असलेले माझे घरचे लोक, त्यांची समाजातली पत, मळ्यात असलेली थोडीफार शेती या गोष्टी काही अहंकार बाळगण्याएवढ्या मोठ्या नाहीत. अंगावर पडलेले ते पैसे पाहून मला लहानपणी आजोबांनी वारंवार सांगीतलेले विचार आठवले. आजोबा म्हणायचे “दारावर आलेल्या कुणाला मोकळ्या हाताने जावू देवू नये अप्पा. दहा विस पैसे द्यावेतच. आणि पैसे हातावर निट ठेवून त्यांना मनोमन नमस्कार करावा. म्हणजे ‘मी देतो’ हा अहंकार आपल्यात येत नाही आणि समोरच्यालाही लाचार असल्यासारखे वाटत नाही. त्यांच्यामुळेच आपल्याला दानाचे पुण्य मिळाले की नाही! म्हणून नमस्कार करायचा” आजोबा काय म्हणायचे त्याचा अर्थ आज इतक्या वर्षांनंतर मला समजला. अंगावर पडलेल्या त्या नाण्यांनी मला माझी पायरी दाखवली होती. मी रुबीकडे पाहीले. ती खुष दिसत होती. आता मला ती रस्त्यावर कव्वाली गाणारी पोरगी एकदम जवळची, आपली वाटायला लागली. त्या गल्लीत बसल्याचा उरला सुरला संकोच कुठल्या कुठे गेला. नान्याने पुढे केलेला हात धरुन मी जमिनीवरुन उठलो. बुड झटकले. ढोलक उचलला व रुबीकडे दिला. हातातले पैसेही तिच्यासमोर धरले. माझ्यातला हा बदल पाहून नान्या सुखावला.
“चल अप्पा, तुला आणि वहिनीला चहा पाजतो झकास” म्हणत नान्याने रुबीलाही सोबत चलण्याची खुण केली. मला वाटले होते की नान्या आम्हाला घेवून कुठेती चांगल्या हॉटेलमधे घेवून जाईल पण तो गल्लीच्या आतील भागाकडे वळला. आता मला त्या गल्लीविषयी फारसे काही वाटत नव्हते. गळ्यात ढोलक अडकवलेल्या रुबीबरोबर नान्या अगदी जवळची मैत्रीण असावे तसे चालत होता. त्यांच्या मागे मी आणि माझी बायको होती. जरा अंतरावर नान्या एका फडतूस हॉटेल समोर थांबला आणि पायरीवर आरामात टेकला. शेजारी रुबी. आम्ही दोघेही तेथे बसलो. जरा वेळाने एका पोऱ्याने काचेच्या ग्लासात चहा आणून दिला. तेथे पायरीवर बसूनच आम्ही चहा प्यायलो. रुबी तिच्या वेगळ्या टोनमधल्या हिंदीत मला खुपदा ‘शुक्रीया भैय्या’ म्हणत होती आणि मी रेड लाईट एरीयातल्या फडतूस हॉटेलच्या पायरीवर बसून चहा पिणाऱ्या बायकोकडे पहात होतो. मला आजही हेच वाटते की त्यादिवशी नान्याने जो प्रकार केला तो मुद्दाम केला असावा. त्याने पंधरा मिनिटात त्या फुटपाथवरच्या धुळीत बसवून माझ्या चष्म्याच्या काचांवर साचलेली धुळ झटकली होती. तेथील बायकांविषयी, त्यांच्या मुलांविषयी माझ्या मनात असलेली घृणा, गैरसमज दुर झाले होते. नान्याच्या या एका कृतीने मला खऱ्या माणसात आणले होते.
फाऊंडेशनचे ते वर्ष पुर्ण करुन परिक्षा द्यायच्या भानगडीत न पडता आम्ही गावी परतलो. या एका वर्षात नान्याने मला हज्जारदा अडचणीच्या प्रसंगात टाकले, कठीण वेळी सावरले. माझे संकट त्याला त्याचे वाटायचे व माझा आनंद तो साजरा करायचा. माझी बहकलेली अक्कल नान्याने खुपदा ताळ्यावर आणली. धमालही खुप केली आम्ही. एकदा रात्री जेवायला म्हणून बाहेर पडलो आणि एका गार्डनमधे सुरु असलेल्या लग्नाच्या रिसेप्शनला नान्याने मला ओढले. जेवायला काय आहे याची चौकशी करुन आम्ही जेवायचा विचारच करत होतो एवढ्यात लॉनच्या मध्ये किशोरची गाणी गाणारा गायक व त्याचा ऑर्केस्ट्रा दिसला. सगळ्या पाहूण्यांनी पुर्ण दुर्लक्षीत केलेला तो गायक घेतल्या पैशाला जागून गात होता. सगळ्यांचे लक्ष स्वागत करण्यासाठी उभ्या असलेल्या वधू-वरांकडे होते. नान्या व मी दोन खुर्च्या टाकून गायकासमोर बसलो. नान्याची काळजातून जाणारी दाद पाहून गायक खुलला. नान्याही त्याला वेगवेगळ्या फर्माईशी करत होता. सगळ्या समारंभात आमचा हा वेगळाच समारंभ सुरु होता. जेवायचे भान विसरुन मी गाणी ऐकत होतो. मध्येच नान्याने फर्माईश केली “साब आपके आवाज मे जो दर्द है उसका क्या कहना! ‘तू औरो की क्यु हो गयी’ सुनाईए थोडा साहब” नान्याची फर्माईश ऐकून गायकानेही सुरेख सुर लावून आर्तपणे गाणे छेडले. तोही आता चांगलाच रंगात आला होता. पहिले कडवे होता होता समारंभातील काही माणसे ऑर्केस्ट्राकडे रागाने धावली तेंव्हा कुठे आम्हाला आमची चुक समजली आणि सुग्रास अन्नावर पाणी सोडून आम्ही कसाबसा तेथून पोबारा केला. बिचारा गायक. त्याची बिदागी मात्र नक्कीच बुडाली असणार. अशा अनंत प्रसंगात नान्याने मला गुंतवले व बाहेरही काढले. तर हे असो. इंजिनिअरींगची डिग्री घेतल्यानंतर ‘मी वर्षभर मला वाटेल ते करणार’ हा माझा निर्णय मी खरा केला होता. आता बाबा जे म्हणतील त्याला नकार द्यायला माझ्याकडे काही कारण नव्हते. बाबांनी त्यांच्या मित्राला सांगून मला एका नावाजलेल्या कंपनीत चिकटवले आणि मी माझ्या आयुष्यातील पहिल्यावहील्या नोकरीच्या निमित्ताने दुर गुजरातमध्ये असलेल्या साईटवर निघून गेलो. जायच्या अगोदर नान्याच्या मळ्यातील खळ्यामध्ये बसुन मनसोक्त बिअर प्यायलो. हसलो, गप्पा मारल्या. नंतर गळ्यात पडून रडूनही झाले. मी गेल्यावर नान्याने डेअरीच्या कामात लक्ष घालून बापूंना जरा मोकळे केले. साईटवर असताना मला होणाऱ्या बायकोची व बाबांची आठवण यायच्या ऐवजी गावी असलेल्या मित्रांची, नानाचीच जास्त आठवण यायची. आजूबाजूला असणाऱ्या गुजराती बोलणाऱ्यांमुळे जास्तच एकाकी वाटायचे. फोन कॉल महाग असुनही नान्या आणि मी शुक्रवारी तास तासभर फोनवर बोलायचो. बापूंनी नानासाठी मुली पहायला सुरवात केली होती, त्यावर पांचट विनोद करायचो. आयुष्य संथ वाहणाऱ्या नदीसारखे निर्धोक वाहत होते. कुठेही खळखळ नव्हती. मला या साईटवर वर्ष होत आले होते. लवकरच काम संपेल असे वाटत होते. या वर्षभरात माझ्या गावाकडे काही चकराही झाल्या होत्या. आमच्या कंपनीची पुण्याजवळच एक साईट सुरु होणार असल्याने मी आनंदी होतो. 
गुरवार होता. मी साईटवर निघणारच होतो इतक्यात ऑफीसवरुन एक माणूस “अप्पासाहेब, तुमचा फोन आहे” हे सांगत पळत आला. कुणाचाही फोन आला तरी तो शुक्रवारीच यायचा. असा मधेच कसाकाय फोन आला? कुणाचा असावा? याचा विचार करत मी ऑफीसमध्ये येवून फोन घेतला. आवाज ओळखीचा वाटला.
“अप्पा, मी बजाबा बोलतोय. बापूंचा गडी. तुमी निघता का लवकर? नानाला जरा जास्त हाय”
मी हडबडलो “नान्याला काय झाले? आणि तोच का नाही आला फोनवर? तु कुणाच्या फोनवरुन बोलतोय बजाबा?”
बजाबाचा आवाज जड वाटला “मी तुमच्या घरीच आलो व्हतो निरोप सांगायला पन तुमचे वडील म्हनले की येथून फोनच कर. नानाचं जास्त हाय त्यामुळे तो न्हाय आला”
माझा जीव घाबरा झाला. मी नान्याची चौकशी करत होतो आणि बजाबा उत्तरे देत होता पण चुकूनही त्याने “काळजी करण्यासारखे काही नाही” असे माझ्या समाधानासाठीही म्हटले नव्हते. मी त्याला बाबांकडे फोन द्यायला सांगीतले. बाबांना नक्कीच माहिती असणार होती. बाबा म्हणाले “तू निघ अप्पा. घाई करु नकोस. काळजी करण्यासारखे काही नाहीए. पण भेटून जा नानाला. बापूंनाही बरे वाटले”
बाबाही मोघमच बोलले होते. काळजी करु नको म्हणत होते, बापूंना बरे वाटेल असही सांगत होते. सगळाच गोंधळ होता. मी साईटवर जाणे रहीत केले आणि रुमवर येवून बॅग भरायला सुरवात केली. आता या नान्याने नक्की काय उद्योग करुन ठेवलाय हे समजायला मार्ग नव्हता. बाबांनीही काही सांगीतले नव्हते. उगाच जीवाला घोर लागला होता. फोन आल्या आल्या जरी मी निघालो असलो तरी जाण्यायेण्याची साधने पहाता मला किमान विस तास तरी लागणार होते. तोवर हा छातीवरचा दगड असाच पेलायला हवा होता. इतक्या दुरुन बाबाही यायला लावणार नाही याचीपण खात्री होती. अशा वेळी कुविचारच का येतात मनात कुणास ठाऊक. मी अठरा-विस तासांचा प्रवास करुन पहाटे गावी पोहचलो. मला चैन पडत नव्हती. मी अंघोळ करुन दोन तिन तास झोप काढणे अपेक्षीत होते पण मी बाबांनाही झोपू दिले नाही. बॅगा घरात टाकल्या व बाबांच्या गाडीची चावी घेत मी विचारले “कोणत्या हॉस्पिटलला ठेवलय नानाला? पुण्याला का नाही हलवले त्याला?”
माझ्या हातातली चावी घेत बाबा म्हणाले “अप्पा, जरा बस. मी काय सांगतोय ते ऐक शांतपणे”
आता माझ्याबरोबर कदाचित बाबांनाही ताण झेपत नसावा. पटकन सांगून या ताणातून मोकळे व्हावे या हेतूने बाबा म्हणाले “अप्पा, नाना परवा रात्री गेला. काल संध्याकाळी अंत्यसंस्कार झाले. बापू म्हणत होते अप्पाची वाट पाहू पण सगळे आले होेते त्यामुळे मीच ‘अप्पासाठी थांबू नका’ म्हणून सांगीतले. उशीर झाला असता. जात्या जीवाचे कशाला हाल करायचे?”
माझं डोकं सुन्न झालं. डोळे कोरडे पडले. घशालाही कोरड पडली. छाती दडपल्यासारखी झाली. मला बाबा सांगत होते त्यावर विश्वासच बसेना. नाना असा कसा जाईल मध्येच उठून? काय खेळ आहे हा विचित्र? माझ्या पोटात ढवळून यायला लागले. रडूही फुटेना. बाबांनी पोटाशी धरुनही माझी पोरके झाल्याची भावना काही जाईना. मला बळेच अंघोळ करायला लावून बाबा म्हणाले “तू झोप दिड-दोन तास. बरे वाटेल. सकाळी नवू वाजता काळांब्यावर जावे लागेल सावडायला”
‘नानाची राख सावडायची’ या कल्पनेनेच मला रडू फुटले. कोरड्या डोळ्यांचा बांध फुटला. 
बाबांकडून कळाले की गावच्या केटी बंधाऱ्यात वाडीतली कुणी बाई आणि तिची मुलगी पाय घसरुन पडली. बैल पाण्यावर घेवून गेलेल्या नान्याने काहीही विचार न करता पाण्यात उडी मारुन माय-लेकींना वाचवले. वाडीत नान्याचे खुप कौतूकही झाले. दुपारी नाना व्यवस्थित जेवला आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याला सणसणून ताप भरला. हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करेपर्यंत नाना बेशूद्धीत गेला. डॉक्टरांना निदान होत नव्हते. रात्रभर वाट पाहून सकाळी पुण्याला हलवायचे ठरवले होते. आजार गंभीर आहे हे समजलं असलं तरी काही वेडेवाकडे होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. रात्री बापू आणि आई दिड वाजेपर्यंत नान्याशेजारी बसले होते. त्यांना नर्सने बाहेर बसायला सांगितले. पहाटे केंव्हा तरी नाना गेला. आई बापू बाहेर बसलेले होते, त्यांनाही सुगावा लागू न देता नाना गेला. न बोलता गेला. आम्ही जेंव्हा जेंव्हा वारसी बंधूंची कव्वाली ऐकायचो तेंव्हा “शब को मेरा जनाजा जाएगा यु निकलकर, रह जाएगे सहर तक दुश्मन भी हात मलकर” हा शेर ऐकला की नान्या म्हणायचा “अप्पा, माणसाने असं निघून जायला पाहीजे. कुणाला खबर नाही की त्रास नाही. गुपचूप नाहीसे व्हावे. नंतरही काही विधी वगैरे नाही. नुसती राख, फक्त राख”
नानाने आपले शब्द खरे केले. दुश्मन तर बाजूलाच, आई-बापाला चकवून अंतराळी झाला नान्या.
नाना म्हणायचा ती ‘नुसती राख, फक्त राख’ सावडायला मी बाबांना सोबत घेवून काळांब्यावर गेलो. त्या सगळ्या विधीत ना मला रस होता ना गेलेल्या नानाला कधी होता. मी बजाबाला नानाची रक्षा आणून द्यायला सांगीतली होती. ती त्याने निघताना आणून दिली. तो तांब्यांचा लहानसा गडू माझ्या हातात देताना भरल्या डोळ्याने बजाबा म्हणाला “बापूसायबानी त्यांच्या सवतासाठी गंगा आनली व्हती काशीहून. पर नानासाठी गडू फोडावा लागला. कशी इपरीत तऱ्हा हाय दैवाची बघा. बापाच्या खांद्यावर पोरानी कौतूकानी बसायचं का असं जायचं? या साठी अस्तोय व्हय बापाचा खांदा! पार खचलं बापू या वझ्यानं” 
सगळ्या मित्रांनी खुप विनवूनही मी घरी न थांबता तिसऱ्याच दिवशी गाव सोडले. नानाला सोबत घेवून सज्जन गड गाठला. येथे नानाच्या आणि माझ्या खुप आठवणी होत्या. एकदा येथेच समर्थांच्या समोर बसून नानाने व मी जयवंत कुलकर्णींबरोबर रात्रभर भजन गायली होती. झपाटनारा वळीव झेलला होता. श्रावणात खिर ओरपली होती. धाब्याच्या मारुतीजवळ दोन दोन दिवस तंबू ठोकून भन्नाट वारा अंगावर घेतला होता. नानाची ही अत्यंत आवडती जागा होती. मी समर्थांचे दर्शन घेवून नानाची राख गडावरच्या हवेत उधळली. ही काही नानाची इच्छा नव्हती पण मला वाटले येथेच नानाच्या जीवाला सुख वाटेल. उन्हे कलताना मी गड उतरलो व गाडी साधूच्या गावाकडे वळवली. साडे आठ नवाला मी साधूच्या घरासमोर होतो. त्याचे म्हातारे वडील अंगणात अंथरुन टाकत होते. सर्वत्र सामसूम होती. साधूचे नुकतेच लग्न झाले होते. माझ्या गाडीचा आवाज ऐकून त्या नव्या नवरीने बाहेर येवून पाहीले व साधूला बोलवायला ती आत गेली. जरा वेळाने साधू बाहेर आला. मला पाहून त्याला इतका आनंद झाला होता की काय करु आणि काय नको हे त्याला समजत नव्हते. शेवटी तो धावत येवून मला लहान मुलासारखा बिलगला. तोवर त्याच्या बायकोने पाण्याची बादली बाहेर आणून ठेवली होती. मी पाय धुत असताना साधूने विचारले “आज कशी काय आठवण काढली अप्पा? आणि इतका उशीर करुन कसा काय आलास?”
मी रडका चेहरा करत नुसताच हसलो.
साधू आश्चर्याने म्हणाला “काय झालय अप्पा? आणि एकटा कसा काय आलास? नाना कुठाय?”
मी मठ्ठ सारखा तसाच बसुन राहीलो. सगळ्यांची जेवणे कधीच उरकलेली होती त्यामुळे साधूने बायकोला माझे एकटयाचे ताट वाढायला सांगीतले. त्याला थांबवत मी म्हणालो “साधू जेवायचे राहूदे तू. मी दुपारी गडावर प्रसाद घेतला आणि इकडेच आलोय. आपण झोपू. खुप दमल्यासारखे झालेय”
माझे काही तरी बिनसलेय याचा साधूला अंदाज आला. बायकोला दुध पाठवायला सांगून साधू मला घेवून माडीवरच्या खोलीत आला. मागोमाग वहिनीने दुधाचा ग्लास आणून ठेवला. साधूने अंथरुने घालत मला विचारले “अप्पा बोलल्याशिवाय कसे कळणार? तु केंव्हा आला भावनगरहून? आणि सज्जनगडावर नानाला न घेताच गेला म्हणजे काही तरी गडबड आहे खासच. नानाने पुन्हा पोरगी नाकारली का?”
मी मांडीवर उशी घेवून भिंतीला टेकलो. साधू आता वैतागून माझ्या चेहऱ्याकडे पहात होता. शेवटी चेहरा अगदी निर्विकार ठेवत मी शांत आवाजात साधूला सांगीतले “आपला नाना गेला साधू. पार कुठच्या कुठे गेला. त्याचीच राख गडावर उधळून आलोय मी तुझ्याकडे हे काळे तोंड घेवून. नाना गेला”
ही बातमी ऐकून माझी जी अवस्था झाली होती तिच साधूची झाली. मला सावरायला बाबा तरी होते. येथे मीच अजुन सावरलो नव्हतो तर साधूला काय आधार देणार होतो. उलट साधूला ही बातमी सांगताना नानाचे दुःख मी पुन्हा नव्याने भोगत होतो. नानाने या साधूसाठी खुप केले होते. वर्षभर त्याच्या मेसचे पैसे भरले होते. त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याला खास कारागीराकडून बनवून घेतलेला संबळ दिला होता. संबळ वाजवण्यावरुन साधूच्या आई वडीलांची समजूतही नानानेच काढली होती. त्याच्या लग्नात मुलगी पहाण्यापासून नानाचा मोठा सहभाग होता. सगळ्यात मोठा आहेरही नानाचाच होता. जरा वेळाने साधू कढ आवरत उठला व खाली गेला. खोलीच्या खिडक्यांचे काळेभोर चौकोन अंगावर येत होते. बाहेर रातकिडे किरकीरत होते. दिड दोन तास झाले तरी साधू वर आला नव्हता. मला आता त्याची काळजी वाटायला लागली. एवढ्यात त्याची बायको घाबरी घुबरी होवून वर आली “भावजी, हे संबळ घेवून इतक्या रातीचे रानाकडं गेलेत” असं तिने सांगताच मी खाली धावलो. मला वेड्या साधूची काळजी वाटायला लागली. मागच्या अंगणात लावलेल्या दिव्याचा क्षिण उजेड सोडला तर शेतात बऱ्यापैकी अंधार होता. मी ढेकळे तुडवत साधूला शोधायला धावलो. मधेच धडपडलोही. इतक्यात समोर अंधूक दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाकडून संबळ वाजवल्याचा आवाज आला. मी ठेचा खातच आंब्याजवळ पोहचलो. साधूचा चेहरा दिसत नसला तरी तो दुःखाने अगदी पिळवटला असणार याची मला खात्री होती. कारण तो तांडव केल्यासारखा बेभान संबळ वाजवत होता. मला काय करावे तेच समजत नव्हते. माझ्या मागोमाग साधूची बायकोही अनवानी पळत आली होती. अंधारात ताड ताड संबळ वाजवणाऱ्या नवऱ्याची तिला भिती वाटली असावी. “पोर का पळाली” म्हणत साधूचे वडीलही तेथे येवून पोहचले. “काही झाले नाही. मी येतो साधूला घेवून. तुम्ही जा वहिनीला घरी घेवून” असे म्हणत मी त्या दोघांनाही कसेबसे घरी पाठवले. दहा मिनिटे पिसाटल्यासारखा संबळ वाजवून साधू गलितगात्र होवून गुडघ्यावर बसला. मी त्याच्या गळ्यातला संबळ काठताच तो माझ्या कंबरेला बिलगून हमसून हमसून म्हणाला “अप्पा, आता तू कितीही मोठ्याने ‘देवा जाग्यावर, देवा माघारी फिर’ म्हणून ओरडला तरी आपला नाना काय माघारी फिरायचा नाही रे आता”
मी साधूच्या डोक्यावर हात फिरवत नुसता उभा राहीलो. त्याला मनसोक्त रडण्याची गरज होती. हुंदके देत देत साधू जरा शांत होतोय असे वाटत असतानाच तो काळीज चिरणाऱ्या आवाजात ओरडला “देवा जाग्यावर हां, पार जाग्यावर…”

देवा जाग्यावर...२

जरी आम्ही दोघांनी फाऊंडेशनला ऍडमीशन घेतले असले तरी आम्ही इंजीनिअरींगची डिग्री घेवून वर्षभर घरी बसून मग ऍडमिशन घेतले होते. त्यामुळे वर्गात सर्व मुलं दहावी किंवा बारावीनंतर प्रवेश घेतलेली, ओठांवर नुकतीच सोनेरी लव उमटायला लागलेली असली तरी आमच्या ओठांवर मात्र भगतसींगचा आकडा होता. आम्ही त्याची निगाही राखली होती. खरेतर आमचं वर्गात बसनेच फार विनोदी होते. बाकी पोरं नुकतीच कॉलेज जीवनाला सरावत होती व आम्ही मात्र ते जीवन कोळून प्यायलो होतो. होस्टेल लाईफचे सर्व फेरे घेवून आलो होतो. त्यात नान्या म्हणजे फार महामिश्किल माणूस. फार राग आला की कुणी नकळत मातृभाषेत बोलतो किंवा कुणी फार चिडल्यावर नकळत इंग्रजीत शिव्या देतो तसे नाना फार रंगात आला की स्वतःचं सारे बाजूला सारुन हमखास एखाद्या नाटकातले, चित्रपटातले, कादंबरीतले वाक्य वापरायचा. त्याच्या या सवयीने खुपदा गंभीर प्रसंगातही अगदी धमाल उडायची. एकदा तर त्याने सरांनाही जेरीस आणले होते. त्याचे झाले असे की प्रभातला ‘बोट लावीन तेथे गुदगुदल्या’ लागल्याची बातमी आली. शंभर वेळा पाहीलेला असुनही आम्ही त्याच दिवशी संध्याकाळच्या शोला हजेरी लावली. चित्रपटातील पहिलाच प्रसंग असा होता की दादा कोंडकेंना स्वर्गात जायचे असते व त्यांचे शिष्य त्यांना विचारतात की महाराज तुम्ही स्वर्गात गेल्यावर तुमच्या सामानाचे काय करायचे? तेंव्हा साधू बनलेले दादा म्हणतात की “आम्हा साधूपुरुषांजवळ कसलं आलं आहे सामान?” रात्री पिक्चरमुळे तसाही उशीर झाल्याने आम्ही दुसऱ्या दिवशी कॉलेजलाही उशीराच पोहचलो. पहिला तास कसला होता आठवत नाही पण तो संपला होता. सर पुस्तके घेवून बाहेर पडता पडता म्हणाले “सकाळी सगळ्यांनी कॉलेजला न येता परस्पर सारसबागेत या. तेथेच तुम्हाला मी वॉटरकलरचा प्रात्यक्षिक देईन. येताना सर्वांनी आपापले सामान घेवून यावे” सरांनी शेवटचे वाक्य उच्चारायला आणि आम्ही दारातून आत यायला एकच वेळ झाली. नान्याने सरांचे शेवटचे वाक्य ऐकले आणि एखाद्या ऋषीने शापवाणी उच्चारताना हातातली कुबडी वर करावी तसे दारात उभे राहून त्याने हातातला टी-स्क्वेअर उंचावला व छाती काढून अतिशय धिरगंभीर व मोठ्या आवाजात म्हणाला “सामाऽन? आम्हां साधूपुरुषांजवळ कसलं आलं आहे सामान?” सगळा वर्ग एकदम स्तब्ध झाला. सरही अवाक झाले होते. काही झालेच नाही अशा थाटात नान्या चालत शेवटच्या बँचवर जावून बसला. मागोमाग मी. नान्या बँचवर बसला आणि वर्गात हास्याचा एवढा मोठा स्फोट झाला की सर वैतागून कधी वर्गाबाहेर गेले व दुसऱ्या विषयाचे सर कधी वर्गात आले हे कुणाच्याही लक्षात आले नाही. 
हा नान्या कुणाला कधी काय बोलेल याचा काही नेमच नसायचा. कॉलेजला जाताना एका मुलीच्या स्कुटीने आम्हाला असा काही कट मारला की आम्ही पडता पडता वाचलो. “जाऊदे नाना तिला” असं मी म्हणत असतानाही नान्याने भर ट्रॅफीकमधे त्या मुलीचा पाठलाग करुन अडवले. मला टेन्शन आले होते. ती मुलगी घाबरुन उभी होती. नान्याने बाईक स्टँडवर लावली. त्या मुलीपुढे दोन्ही हात जोडून कमरेत वाकून उभा राहीला व अतिशय नाटकी अंदाजात म्हणाला “धन्यवाद आक्कासाब!”
मागे फिरुन गाडीला किक मारुन आम्ही तेथून क्षणात निघूनही गेलो. मागे त्या मुलीची काय अवस्था झाली असेल हे आठवून आजही मला हसु येते. एकदा सारसबागेजवळून जाताना, कमरेपर्यंत केस असलेली मुलगी पाहून या नान्याने तिला “फार सुंदर आहेत केस तुमचे अक्का” म्हणत मला घाम फोडला होता. तर असो.
मुर्तीकलेतील काही बेसीक गोष्टी शिकणे एवढाच माझा उद्देश असल्याने आम्ही फक्त फाऊंडेशनचे एकच वर्ष कॉलेजमधे थांबणार होतो. ऍडमिशन घेताना मी प्राचार्यांना तसे स्पष्ट सांगीतले होते. तसेच वर्षभर कोणत्याही वर्कशॉपला, कुठल्याही वर्गात बसण्याची परवानगीही मी त्यांच्याकडून मिळवली होती. करीअर करायच्या दिवसात दोन मुले कलेसाठी एवढी धडपडतात हे पाहून प्राचार्यांनीही कौतूकाने सगळ्या परवानग्या आनंदाने मान्य केल्या होत्या. अर्थात हे करण्यासाठी त्याच कॉलेजमधे नुकताच शिक्षक म्हणून रुजू झालेल्या आमच्या मित्राचीही मला खप मदत झाली होती. सकाळी मी आणि नान्या कॉलेजला पोहचलो की वेगवेगळ्या वाटांनी जावे तसे वेगळे व्हायचो. मी आजचा दिवस कुठे घालवायचा हे एकदा सर्व कॉलेज फिरुन अंदाज घेई व अॅनॉटॉमी स्केचींग किंवा क्लेवर्क वगैरे सुरु असलेल्या वर्गात बसत असे. नान्याला कलेची उत्तम जाण असली तरी रस अजिबात नव्हता. मग तो कॉलेजच्या पोर्चसमोरच्या कट्ट्यावर आपला दरबार भरवत असे. कॉलेजमधे टगेगीरीत नाव कमावलेली सिनिअर पोरेही नान्याच्या वयापुढे व अनुभवापुढे ज्युनिअर असत त्यामुळे त्याला फारसा विरोध होत नसे. त्याच्या या दरबारात अनेक कथले येत व नान्याही ते उत्साहाने सोडवत असे. कुणाच्या होस्टेलमधल्या रुमचा प्रश्न असे, कुणा मुलीला कुणी त्रास देत असे तर कुणा ज्युनिअरला टगे मंडळी त्रास देत असत. ही सगळी त्रस्त जनता नानासाहेबांच्या दरबारात काकूळतीने हजेरी लावत असत व नाना त्यांच्या कथल्यांचा निवाडा करत असे. नान्याने केलेल्या निवाड्याला शक्यतो कुणी विरोध करत नसे कारण एक तर तो निवाडा न्याय्य असे व कुणाला नाहीच पटले तरी नान्याला विरोध करायचे त्यांच्यात धाडस नसे. एकदा काही मुलांनी “सकाळी नान्या कॉलेजला आला की त्याची सोय करु” अशी धमकी दिली. मी नान्याला या सगळ्यात पडू नकोस म्हणून खुप विनवण्या केल्या पण बेदरकार नान्याने माझे ऐकले नाही. त्याच्या वडीलांचे मार्केट यार्डमध्ये दोन गाळे होते. मी दुपारीच सायकलवरुन मार्केटयार्ड गाठले व तेथील कामगारांना या प्रकरणाची कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी चार पाच हमाली करणाऱ्या आडदांड पोरांनी कॉलेजमध्ये येवून “कंच्या भाडखावने आमच्या नानाशेठला तरास धिला रं?” म्हणत सगळ्या कॉलेजमधे चौकशी केली व नान्याच्या दहशतीचा खुंटा आणखी भक्कम झाला. अर्थात सरळमार्गी नानाने कधी कुणाला त्रास दिला नाही. उलट दोन तिन महिन्यात कॉलेजमधली राडेबाजी बरीचशी कमी झाली. 
नाना त्याच्या दरबारात दंग होता तर मी जे काही शिकता येईल ते अक्षरशः अधाशासारखे ओरबाडत होतो. मुर्तीकलेला शरीरशास्त्राचाही अभ्यास हवा हे माझ्या डोक्यात बसल्याने मी आता संध्याकाळचा बराचसा वेळ स्वारगेट एसटी स्टँडवर लोकांचे स्केचेस करण्यात घालवायला लागलो. नान्याही शेपटाप्रमाणे तेथे माझ्या मागे असेच. तेथेही आठ दिवसात अगदी कंट्रोलरपासून सगळे नान्याचे मित्र झाले. नान्याचा एक गुण मला फार आवडे. लखपती बापाचं हे कार्टं पण त्याला नावालाही अहंकार नव्हता. अगदी कामापुरताही नाही. त्याला स्टँडवरील हमालांचे कष्ट पाहून कळवळताना व त्यांना अवजड सामान एसटीच्या टपावर चढवायला निःसंकोच मदत करताना मी कैकदा पाहीले होते. पण स्टँडवर केलेल्या स्केचेसने माझे काही समाधान होईना. असे म्हणतात की दा विंची स्मशानातली प्रेते उकरुन आणायचा व पाण्यात ठेवायचा. मग दोन दिवसाने घोड्याच्या केसांपासून बनवलेल्या ब्रशने त्या प्रेताच्या त्वचेचे थर घासून काढून आतल्या शिरांचे वगैरे स्केचेस करायचा. ही दंतकथा बाजूला ठेवली तरी मला निदान बेसीक स्केचेस गरजेचे वाटायला लागले. मला काही मुलांनी सांगितले की मुंबईला जेजेमधे प्रत्यक्ष न्युड मॉडेल बसवतात. पण ते पुण्यात तर शक्य नव्हते. मग यावरचा उपायही याच सिनियर्सनी सुचवला. पुण्यातील रेड लाईट भागात कुणाला पैसे दिले तर मॉडेल मिळणे शक्य होते. हे ऐकलं आणि नान्या एकदम खुष झाला. कारण मॉडेलची अडचण माझी होती पण टेन्शन मात्र त्याला होते. हा मार्ग कितपत योग्य आहे हे अजुन मला ठरवता येत नव्हते. नान्या मात्र पुलंच्या स्टाईलमधे “अप्पा, रांडेच्या तु एक नंबर शेपूट घालणारा आहे बघ” म्हणत उद्याच जावू म्हणून मागे लागला. सकाळी अर्थातच कॉलेजला दांडी मारली. समोर मॉडेल बसवून स्केचींग करणे ही कल्पना जरी छान वाटत असली तरी प्रत्यक्षात निघताना मात्र माझे अवसान गळाले. मला खरे तर जायचे होते, फक्त धाडस होत नव्हते. त्यामुळे मी नान्याला जोरदार विरोधही करु शकत नव्हतो व मोकळ्या मनाने त्याच्यासोबत जातही नव्हतो. नानाला बहुतेक माझ्या या अवस्थेचा अंदाज आला असावा. त्याने यावर मधला मार्ग काढला. सध्या घरातून निघू. तेथे गेल्यावर जर नाहीच मन झाले तर श्रीदत्ताचे दर्शन घेऊ व प्रभातला जो लागला असेल तो शो पाहू किंवा बालगंधर्वला नाटक पाहू. “आज नाटकच पहायचे” असे मनाला सांगत मी नान्याच्या गाडीवर बसलो. तासाभरात आम्ही मंडईमधे होतो. उगाच इकडे तिकडे वेळकाढूपणा करत मी मागे मागे रेंगाळत होतो. नान्याने गाडी पार्क केली व माझे मनगट धरुन ‘त्या’ गल्लीकडे मला ओढले. मी एका हातात पॅड व चारकोल सावरत नान्यामागे कसायाने बकरू न्यावे तसा रडत-खडत निघालो. त्याच्या मागे मी चार पावले टाकली असतील नसतील, मला एकदम वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखे वाटायला लागले. सुर्यग्रहणाच्यावेळी जो विचित्र अंधार पडल्यासारखा वाटतो व पाखरे सैरभैर होतात तसे त्या गल्लीत एकप्रकारे अंधारुन आल्यासारखे वाटत होते. आधिच गोंधळलेला मी पाखरासारखा आणखी सैरभैर झालो. नान्याने हात सोडला होता पण तरीही मी त्याच्यामागे भारल्यासारखा चालत होतो. मागे फिरायचे मला सुचत नव्हते. नान्यावर फारसा काही परिणाम झाल्याचे दिसत नव्हते. पाच दहा मिनिटे चालल्यावर एक सप्तरंगी चष्मा घातलेला, गळ्यात मफलर असलेल्या माणसाने नानाला थांबवले. मीही आपसुक थांबलो. नान्याचे आणि त्याचे काही बोलणे झाले आणि नाना त्या माणसाच्या मागे चालू लागला. मीही नान्यामागून निमूट चालत होतो. माझ्यात आजूबाजूला पहायचे धाडस नव्हते तरीही डोळ्यांच्या कोपऱ्यातून जे दिसत होते ते अगदी अगम्य होते. कुणीतरी एकदोन वेळा माझ्या शर्टची बाही ओढल्याचाही मला भास झाला. एक प्रकारचा अनामिक दर्प सगळीकडे भरुन राहीला होता. आजुबाजूला दुर्लक्ष केले तरी समोर तर पहावेच लागत होते. पण त्या रस्त्यावरुन येणारे जाणारेही या विश्वातले वाटत नव्हते. नाही म्हणायला मधेच कुणी माझ्या जगातले वाटणारे नवरा-बायको बाईकवरुन जाताना दिसत होते. त्यांना पाहून मला उगाच धिर आल्यासारखे होत होते. या नान्याच्या नादी लागून मी आज चांगलाच गोत्यात आलो होतो. मोठ्या उत्साहात एखाद्या झाडावर चढावे व एकवेळ अशी यावी की वरही चढता येवू नये व खालीही उतरता येवू नये तशी माझी अवस्था झाली होती. काही बोळांमधून एकदोन वळणे घेतल्यावर आम्ही एक दोन जिने चढलो. सोबतच्या माणसाने एक दरवाजा उघडून दिला आणि तो आल्या पावली माघारी फिरला. आम्ही आत गेलो. बाहेरच्या परिसराशी अगदी विपरीत तेथले वातावरण होते. एकदम चकचकीत पण भडक अशी अंतर्गत सजावट होती. पांढरे झिरझीरीत पडदे. मध्ये मध्ये काचेच्या बांगड्या व रंगीत मण्यांच्या माळा. सर्व भिंतींच्या कडेन लाल भडक सोफे त्यावर बसलेली एक दोन माणसे व बऱ्याच बायका, उग्र सुगंध आणि कर्कश्श व मोठ्या आवाजात वाजणारे संगीत. नान्या अगदी सराईत असल्यासारखा सोफ्यावर जाऊन बसला. मुळात त्याचे मन एखाद्या झऱ्यासारखे निर्मळ असल्याने त्याच्या मनात कधी अपराधीपणाची भावना येत नसे व न्युनगंड हा शब्दच नान्याच्या शब्दकोषात नव्हता. मी मात्र पुर्वी मुली दाखवण्याच्या कार्यक्रमात ती बिचारी मुलगी दाराशी जशी ओठंगून उभी राही तसा बुजून नान्याच्या बाजूला उभा होतो. जरा वेळाने नाना त्या लठ्ठ बाईने खुणावल्यावर तिच्या मागे आत गेला.
पाच मिनिटांनी बाहेर येवून मला म्हणाला “अप्पा, घाबरु नकोस रे. समोर तर दत्तमंदिर आहे. कुठे चंद्रावर नाही आलोय आपण. स्केचींगवर लक्ष दे. मला खाली काम आहे. आलो तर येईन मी येथे नाहीतर तुच खाली ये”
“अरे नान्या, आपण पुन्हा कधी तरी येवू. आता जावूयात” मी असं काही बाही बोलत असताना नाना तेथून गेलाही. त्या लठ्ठ बाईने मला एक दरवाजा उघडून दिला. मी आतल्या खुर्चीवर पॅड सावरत बसलो. काही तरी चाळा हवा म्हणून चारकोलचा बॉक्स काढून उगाचच त्यातले चारकोल निवडत बसलो. पाच दहा मिनिटांनी एक पंचविसच्या आसपास वय असलेली मुलगी आत आली. नान्याने त्या लठ्ठ बाईला व तीने या मुलीला समजावून सांगीतले असणार. पण तिच्या चेहऱ्यावरुन तिला काही समजले नव्हते हे कळत होते. तिने आत येवून दार लावले. मी कारण नसताना पॅडच्या वर असलेला पहिला पेपर स्वच्छ असुनही फाडून काढला. त्याचे बारीक तुकडे करुन ते व्यवस्थित बाजूला ठेवले. चारकोल पुन्हाएकदा सँडपेपरवर घासला. पायावर पाय ठेवून मांडीवर पॅड ठेवले आणि समोर पाहिले. एवढ्या वेळात त्या मुलीने अंगावरचे जवळ जवळ सगळे कपडे उतरवले होते व “पुढे काय करायचेय?” असा प्रश्न चेहऱ्यावर घेवून ती माझ्याकडे पहात होती. मी तिच्याकडे पाहीले आणि ते दृष्य पाहून माझे अवसानच गळाले. घशाला कोरड पडली. कसले न्युड मॉडेल व कसले स्केचींग, येथे पेपरवर साधे वर्तुळ काढायची माझी अवस्था राहीली नाही. बंद खोलीत कोंडलेल्या मांजरासारखी माझी गत झाली. कपाळ, गळा आणि सांगता येईना अशा ठिकाणी मला घाम फुटला. बेंबीला रग लागते हे मला नव्यानेच समजले. माझा तो गोंधळ ती मुलगी मजेने पहात होती. तिला या सर्वाची सवय असावी हे जाणवत होतं. मी समोरची तिची ओढणी मेलेले झुरळ बाहेर फेकावे तशी तिच्या अंगावर दुरुनच टाकून तिला कपडे घालायला सांगितले. माझे सामान मी घाईत आवरले व निघायची तयारी केली. तिने मोडक्या तोडक्या हिंदीत “होताय साएब ऐसा कबी कबी” असं म्हटल्यावर मी चिडलो. हातातले पॅड उघडून मी तावातावाने तिला माझे काही स्केचेस दाखवून माझा हेतू स्वच्छ असल्याचे पटवून द्यायला लागलो. मला समजेनाच मी कुणाला, काय आणि का हे पटवून देत आहे. काय मुर्खासारखा वागत होतो मी! की माझ्यासमोर माझाच हा नविन चेहरा आला होता? आणि मी ते स्वतःशीच नाकारत होतो? तिच्या अंगावर ओढणी फेकताना, तिला पॅडवरचे स्केचेस दाखवताना माझे वागणे असे होते की जणू तिचा नुसता स्पर्श जरी झाला तर मी बाटला जाईल. कोणत्याही प्रायश्चित्ताने मी पुन्हा कधीच शुध्द होवू शकणार नाही. हे सर्व त्या नान्यामुळे झाले होते. मला नान्याचा प्रचंड राग आला. त्या रागातच मी दार उघडून बाहेर पडलो. ज्या मोठ्या हॉलमधून आम्ही आत आलो होतो तेथून बाहेर पडताना सगळ्या बायका मला हसल्या. निदान मला तरी तसा भास झाला. मी धाड धाड करत सगळे जीने उतरुन रस्त्यावर आलो. स्वतःवर व नान्यावर प्रचंड चिडल्याने मला आजुबाजूच्या त्या विचित्र रहदारीचे भान राहीले नव्हते. मी नान्याला शोधत होतो. हाका मारत होतो. तेथून कधी बाहेर पडेन असे मला झाले होते. पाच दहा मिनिटे नान्याला शोधले. तो रस्त्याच्या पलिकडील फुटपाथवर धुळीतच मांडी घालून बसला होता. त्याच्या आजूबाजूला दहा बारा वयाच्या मुलांचा मोठा घोळका होता. मी मुसंडी मारावी तशी डावी उजवीकडे न पहाता रस्ता ओलांडला. बाईकवाल्यांनी घातलेल्या शिव्या कानामागे टाकत मी नान्याची कॉलर धरायला धावलो. त्या मुलांचा घोळका मी बाजूला केला. समोर नान्या फुटपाथवर खडूने आखलेल्या चौकोनांसमोर बसून त्या पोरांबरोबर “कोण चिडीचे खेळले” यावरुन तावातावाने भांडत होता. त्यातली दोन मुलं हिरिरीने नान्याचे बोलणे खोडून काढत होती. आमचेच बरोबर आहे म्हणत होती. नान्याही ऐकायला तयार नव्हता. ते दृष्य पाहून मला हसावे की रडावे तेच समजेना. मी त्या मुलांवर ओरडलो तशी ती दुर पळाली. नाना बुड झटकत उठला.
आश्चर्याने त्याने विचारले “काय रे अप्पा, झाले इतक्यात? मला तर वाटले तुला ओढून आणावे लागेल तेथून. बघू पॅड”
मी त्याचा दंड धरुन ओढले व म्हणालो “अगोदर येथून बाहेर पडू मग सांगतो तुला काय झाले ते. चल लवकर”
दहा मिनिटात नान्याने पार्कींगमधून गाडी बाहेर काढली. नाना गाडी चालवत होता व मागे बसुन मी त्याला खुप शिव्या घालत होतो. तुला कुणी हा उपद्व्याप करायला सांगीतला होता? तूला कशी माहिती तेथली? वगैरे वगैरे. नान्या रुमवर येईपर्यंत काही बोलला नाही. मीच एकटा मागे बसुन बडबड करत होतो. मी हातपाय न धुताच गादीवर लवंडलो. मला अगदी गळून गेल्यासारखे झाले होते. नान्या सावकाश अंघोळ करुन, चहाचे कप घेवून बाहेर आला. कसे कुणास ठाऊक पण मला नुकतेच आजारातून उठल्यासारखे वाटत होते. समोर चहाचा कप पाहूनच मला बरे वाटले. एक दोन घोट घेतल्यावर नान्या म्हणाला “अप्पा, मला जरा अंदाज होताच. एक तर तू भरपुर स्केचेस घेवून बाहेर पडशील नाही तर आता आला तसा येशील. तुझं काही एक चुकलं नाहीए”
मी नुसतच हं म्हणून चहा पित राहीलो.
“हे बघ अप्पा, बहुतेक जण आतून वाह्यातच असतात हे लक्षात ठेव आणि तसं कबुल कर स्वतःशी. आणि त्यात काही गैरही नाहीए. त्या पोरीला तशा अवस्थेत पाहून तू जर गडबडला नसता तर तुला मी एक तर डॉक्टर दाखवला असता नाहीतर भगवी कफनी घालून हिमालयात धाडला असता. आयला नशिब तू नॉर्मल निघालास”
नान्या भारी विनोद केल्यासारखा जोरात हसला.
मला पटतही होते आणि नाहीही. मी मान हलवत नान्याकडे नुसता पहात राहीलो.
नान्या मला उठवत म्हणाला “चल उठ. हनीला जाऊन बसू. एखादी बिअर प्यायलो की बरे वाटेल. तेथेच जेवू आज. अन्वरला बैदा-करी करायला सांगू खास”
“नको नाना. बरे वाटत नाहीए अजिबात. त्राण गेल्यासारखे झालेय मला. उद्या जाऊ” असं म्हणत मी पुन्हा गादीवर लोळायला लागलो.
नान्या हसत म्हणाला “च्यायला शक्तिपात झालाय तुझा. एनर्जी भरुन घेवू पहिल्यांदा. उठ लवकर”
“अरे काय लाज विकून खाल्ली की काय नान्या? कसल्या उपमा देतोय निर्लज्जसारख्या” असं कुरबूरत शेवटी मी नान्याच्या मागून निघालो. हनीला निवांत जागा पाहून बसलो. नान्याने अन्वरला बैदा करी कशी हवीय ते किचनमधे जाऊन सांगीतले आणि वेटरला ऑर्डर देवून तो माझ्यासमोर येऊन बसला. पाच दहा मिनिटात वेटरने बिअरचे फेसाळते ग्लास समोर आणून ठेवले.
मी नान्याकडे पहात म्हणालो “हायला नान्या, घाबरलो मी आणि राग काढला त्या पोरीवर. मी फार तुच्छतेने वागलो रे तिच्याबरोबर”
नान्याने काही न बोलता ग्लास उचलला. मग मीही त्याला कंपनी दिली. सुरवातीला दोघेही काहीही न बोलता बिअर पीत राहीलो. दोन ग्लास नंतर मला त्या मुलीविषयी फार वाईट वाटायला लागले, मग अपराधी वाटायला लागले व नंतर खुप दुःख व्हायला लागले. नान्या माझ्या मनातील गिल्ट काढण्याच्या नादात महाराज झाला. “ज्याला मनाचे आवेग आवरता येतात तो साव, ज्याला आवरता येत नाही तो चोर ठरतो अप्पा या जगात. आवेग वाईट नाये, ते आवरता येणे न येणे येथे गोम आहे खरी” वगैरे वगैरे. नान्याचे प्रवचन सुरु झाले. प्रवचन देता देता त्याला दाढी मिशा फुटल्या. हळू हळू त्या पोटापर्यंत वाढून पांढऱ्याशुभ्र झाल्या. त्याच्या डोक्यावर जटांचे जंगल उगवले. टीशर्ट नाहीसे होवून तेथे कधीच भगवी कफनी आली. एखादा तुटका नळ गळावा तसं त्याच्या तोंडातून अविरत प्रवचन गळायला लागले. आणि मग प्रवचन देता देता नानामहाराज हळू हळू हुंदके देत रडायला लागले. “त्या पोरांसाठी काही करता येत नसेल तर व्यर्थ जन्माला आलो आपण अप्पा” असं काहीसे बरळत तो स्वतःचे केस विस्कटायला लागला. तो काय बोलतोय त्याचा मला काहीच संदर्भ लागत नव्हता व मी काय बोलतोय याच्याकडे त्याचे लक्ष नव्हते. दिडेक तासाने “वाढू का?” विचारायला अन्वर आला व आमची अवस्था पाहून त्याने वेटरला हाक न मारता स्वतःच टेबल साफ करायला घेतला. जेवण संपता संपता मला एवढेच समजले की नान्या त्या गल्लीतल्या बायकांच्या मुलांसाठी व्याकूळ झाला होता. आम्ही रुमवर कसे आलो, कोणी सोडवले हे आम्हाला काहीच आठवत नव्हते पण सकाळीही नान्याच्या डोक्यातून ती मुले गेली नव्हती. माझे नेहमीसारखे कॉलेज सुरु होते. पण आता नाना मला कॉलेजच्या गेटपर्यंतच सोडायचा व गायब व्हायचा. कुठे जातो, काय करतो काही सांगेना. मध्ये दोन दिवस एकटाच गावीही जाऊन आला. आठ दिवसांनी मला घेवून सदाशिवातील कुठल्याशा ऑफिसमधे आला. तेथील दोन मुलींबरोबर तासभर चर्चा करुन त्याने बरेच काही ठरवले त्या मुलांपैकी पाच मुलांची सर्व जबाबदारी नानाने उचलली. या पाच मुलांची बॅच दर वर्षी बदलायचेही त्याने ठरवले. एखाद्या वारकऱ्याने जीवाच्या कराराने एकादशीचे व्रत पाळावे तसे नान्याने ‘पाच मुलांचे पालकत्व’ हे व्रत शेवटपर्यंत पाळले. विशेष म्हणजे बापूंनी त्याला यात सर्वतोपरी मदत केली. आम्हाला भेटायला ते जेंव्हा जेंव्हा रुमवर येत तेंव्हा जाताना ते “हं हे घे. घाल त्या रांडांच्या पोरांच्या बोडक्यावर” असं म्हणत नान्याच्या अंगावर पैशांचे बंडल फेकत. नंतर नंतर नान्या कॉलेजकडे फिरकेनासा झाला. मला गेटवर सोडून तो तिकडे जाई. दुपारी घरी परते. त्यानंतर मला नानाने खुपदा त्या भागात नेले. ती मुले भैय्या भैय्या करत त्याच्या भोवती नाचत. मी मात्र कधीच या मुलांमधे रमू शकलो नाही. त्यांच्या आयांबरोबर कधी विनासंकोच बोलू शकलो नाही. पण समाजाने नेहमीच तुच्छतेने पाहिलेल्या या गल्लीमधे नान्याने माझ्यावर खुपदा “हे धरणीमाय आता तुच ठाव दे” म्हणायची पाळी आणली आणि याच गल्लीत त्याने माझ्यातल्या अहंकाराचा रेच मोडला.

देवा जाग्यावर...१

रात्रीचे दिड वाजले असावेत. अंगणात मुहुर्तमेढ रोवलेली होती. लहानसा मांडव बांधलेला होता. शेजारीच मनगटाएवढ्या जाडजुड उसांनी ऐसपैस चौक बांधला होता. अनेक प्रकारची फुले, फळे, नागवेलीची पाने, सुपारी यांनी चौक रंगीबेरंगी दिसत होता. समोर देवीचे, खंडोबाचे टाक वगैरे होते. तेथेच हातभर उंचीची दिवटी आणि पितळी बुधला होता. त्या दिवटीचा आणि जमीनीत खोचलेल्या मशालींचा उजेड चौकावर पडल्याने तो मोहक दिसत असला तरी भितीदायकही दिसत होता. अंगणात एक-दोन पिवळ्या प्रकाशाचे प्रखर दिवे लावलेले होते त्यांचा काही प्रकाश जागरण-गोंधळ जेथे सुरु होता तेथवर पोहचत होता. सात आठ गोंधळ्यांच्या भोवतीने मोठे कडे करुन श्रोते बसले होते. साडेनऊ दहाला असणारी गर्दी आताशा बरीच कमी झाली होती. लहान मुलांना झोपवायला गेलेल्या आया परतल्या नव्हत्या, कामाची पुरुषमंडळीही केंव्हाच झोपायला गेली होती. अंबरीष राजाचे आख्यान ऐकायला थांबलेले, लोककलेची आवड असलेले व ज्यांना थांबणे कर्तव्यच आहे असे घरातील काही जण एवढेच तेथे उरले होते. काही म्हाताऱ्या बायाबापड्या गोंधळ्याने केलेले विनोदसुध्दा हात जोडून श्रध्देने ऐकत होत्या. चांदव्याची कोर नुकतीच उगवली होती. रात्र पहाटेकडे सरकत होती. बाहेर थंडी आणि चौकासमोर संबळाची काडी इरेसरीने चढीला लागली होती. त्यातच तुणतूण्याची तुण तुण घाईला येऊन भर घालत होती. समोरच्या दिवटीत बुधलीने तेल घालायचे काम माझ्याकडे असले तरी आता मला त्याचा विसर पडला होता. थंडीमुळे मी हात बांधून मुठी बगलेत गच्च धरल्या होत्या. डोळे विस्फारुन मी समेळ आणि धुमावर फिरणारी साधूची काडी पहात होतो. तो दोन मांड्यांमधे दाबलेला धुम घुमवून संबळ वाजवताना बेभान झाला होता. तुणतूण्याच्या कडक घाईसोबत आलेल्या “माझ्या कानड्या मल्हाऽऽरी” या ओळीवर साधूने संबळाची अशी काही सम गाठली की मी नकळत बगलेतला हात वर करुन “आंग्गंऽ आश्शी, भले शाब्बास साधू!” म्हणत ओरडलो. तुणतुण्याची घाई, साधूच्या संबळाचा झपाटा आणि खंडोबाचे कौतूक करताना टिपेला लागलेला गोंधळ्याचा आवाज याचा एकत्रीत परिणाम म्हणून की काय पलिकडे बसलेल्या बायांच्या मागून एक धिप्पाड माणूस नशेत असल्यासारखा तोल सावरत, घुमत चौकासमोर आला. येताना त्याने एक दोन बायांच्या मांड्यांवर पाय दिल्याने त्या बिचाऱ्या कळवळल्या होत्या. कुणीतरी उठून त्या माणसाने बांधलेला केसांचा लहान अंबाडा मोकळा केला. त्याच्या कपाळावर हळद कुंकू फासत “आई राजा उदं उदं! खंडूबाच्या नावानं चांगभलं” अशी जोरदार आरोळी दिली. चांगला उंच व धिप्पाड असणारा, मानेवर केस मोकळे सोडलेला तो माणूस मला एकदम भयंकर दिसायला लागला. कपाळावर हळद कुंकू फासताना ते त्याच्या गालावर व छातीवरच्या अंगरख्यावरही उडाले होते. त्याची थरथरणारी बुबूळे अंतराळी झाल्याने ते ध्यान अधीकच अभद्र दिसत होते. दर्शनासाठी तो चौकाच्या दिशेने यायला लागला. मी दिवटीत तेल घालण्यासाठी चौकाशेजारीच बसल्याने मला तो माझ्याच दिशेने येतो आहे असे वाटले. त्याची धुळभरली घाणेरडी पावले लवकरच माझ्या छातीवर पडतील असं मला वाटलं. माझ्या मणक्यातून बर्फ सरकला. एवढ्या थंडीतही मी घामाने डवरलो. त्या माणसाची जवळ आलेली पावले मला दोन फुटांएवढी मोठी दिसायला लागली आणि मी बेंबीच्या देठापासून जोरात ओरडलो “नान्या बघ रे, मेलो मी आता”
मला वाटले मी ओरडलो पण प्रत्यक्षात घशातून फक्त घर घर बाहेर पडली होती. मी भितीने मान गुडघ्यात घातली व शरीराचे मुटकूळे केले. माझ्यासाठी जग तेथेच संपले होते. आता संबळाचा आवाज दुर डोंगारापलीकडून यावा तसा ऐकायला येत होता. आपण कधी तुडवले जातोय याची वाट पहात मी डोळे गच्च मिटले होते. इतक्यात माझ्या कानावर नान्याचे खणखणीत शब्द आले “होऽऽऽ ओ, देवा जाग्यावर हांऽऽ”
त्या आरोळीबरोबर अंगात आलेला देव अगदी स्थिर झाला आणि मग झुलत झुलत पुन्हा मधे जाऊन हलके हलके झूलू लागला.
तोवर कुणीतरी माझ्या दोन्ही बगलेत हात घातले आणि जमीनीतुन गाजर उपटावे तसे चौकाशेजारुन मला अलगद उचलले.
नान्याच होता तो. माझ्या गालावर थोपटत तो विचारत होता “ए अप्पा, घाबरलास का? अरे साधूच्या घरी आहोत ना आपण? घाबरतो कशाला लहान मुलांसारखा?” शब्दांपाठोपाठ तोंडावर थंड पाण्याचा हपका बसला.
मी काही क्षणातच भानावर आलो. पण शरीरातले त्राणच नाहीसे झाले होते. पाय जमीनीवर ठरत नव्हते. अंगाची थरथर कमी होत नव्हती. मात्र भिती कधीच गेली होती. सोबत नान्या आहे हे लक्षात येताच मला खुप बरे वाटले. नान्याने मला घराच्या अंगनात आणून बसवले. घरातून मुठभर साखर आणून खायला दिली. प्यायला पाणी दिले तेंव्हा मला खुप बरे वाटले. 
त्याचे झाले असे होते की साधू हा गेले दोन वर्षांपासुनचा आमचा खुप जवळचा मित्र झाला होता. स्वतः खुप सुरेख संबळ वाजवी. त्याच्या भावाच्या लग्नाच्या गोंधळाला आम्ही त्याच्या गावी आलो होतो. लोकसंगीत हे माझे अगदी जीव की प्राण. या संगीताच्या नादात आम्ही मित्रांनी कोल्हापुर सांगली पासुन नाशिकपर्यंतच पट्टा रात्री अपरात्री तुडवला होता. गावी असताना परिसरातले एकही भजन, भारुड मी सोडले नव्हते. घरातल्या भाकरी व भाजी देऊन एका बैराग्याची एकतारीवरील भजने पहाटे साडेतिन वाजता ऐकली होती. एकदा धनगराचा पावा ऐकून घरच्यांना काळजीत टाकून त्याच्या मेंढ्यांच्या वाड्याबरोबर दोन दिवस सिंहगडचा पायथा फिरलो होतो. एवढे असुनही अगदी न कळत्या वयापासून ‘अंगात आलेली व्यक्ती’ व ‘मरीआईचा देव्हारा घेवून येणारा पोतराज’ यांची मला भयानक भिती वाटायची. पोतराजाचा तो कोरडा म्हणजे मला यमाच्या हातचा पाशच वाटायचा. वय वाढले तशी ही भितीही वाढली. सगळं कळूनही या दोन व्यक्तींना पाहीले की मला काय होई हे समजत नसे. भितीने मला कापरे भरत. शुध्द जाण्यापर्यंत मजल जाई. यातून बाहेर पडायचा मार्ग म्हणजे कुणी तरी प्रेमाने दहा मिनिटे समजुत काढत रहाणे. मग कुठे मी थोडासा भानावर येई. एक प्रकारे मानसीक भितीच होती ही. लहानपणापासुन मित्र असलेल्या नानाला हे माहीत होते. त्यामुळे त्याने मला वेळेवर सावरले होते. सकाळी आम्ही पुण्याला निघालो तेंव्हा एसटी स्टँडवर साधू अगदी अपराध्यासारखा आमच्या समोर उभा होता.
“नाना शप्पथ मला माहित नव्हती ही अप्पाची भानगड. खरच मला माफ कर यार. मी तुम्हाला बोलवायलाच नको होतं”
नाना त्याची समजुत काढत म्हणाला “काही काय साधू! झकास झाला कार्यक्रम. तुमच्याकडे कुणाच्या अंगात येते हे माहित असते तर अप्पाला बसुच दिले नसते मी जागरणात. तुझा काही दोष नाही. का असा गाय मारल्यासारखा चेहरा केलाय? लवकर ये पुण्यात”
तरीही साधूला काही बरे वाटेना. “नाना तुम्हाला सोडू का पुण्यात? मी फिरेन माघारी दुपारपर्यंत”
त्याची तगमग मला जाणवली. मी त्याच्या राजदुतची चावी फिरवत म्हणालो “काहीही काय साधू! घरी कार्याची धावपळ आहे तुझ्या. पुण्याला कुठे येतोस आमच्या मागे. तू जा. आम्ही जाऊ एसटीने”
तो ऐकत नसताना मी त्याला बळेच घरी पाठवले. दुपारपर्यंत आम्ही पुण्यात पोहचलो.
रात्री नानाने मेसला दांडी मारली. मलाही जाऊ दिले नाही. केरु, विन्या वगैरे मात्र नेहमीप्रमाणे मेसला गेले होते. खाली जाऊन नान्याने चटकन खिचडीचे सामान आणले. फ्लॅटवर रोजच्या दुध-बोर्नव्हिटासाठी गॅसची शेगडी होती. त्याने चटकन चवदार खिचडी बनवली. भरपुर तुप टाकून वाफाळती खिचडी, लोणचे वाढले. आम्ही एकाच ताटात बसुन जेवलो. जी काळजी फक्त आई बाबाच घेऊ शकतात त्यापेक्षाही जास्त प्रेमाने नान्याने सर्व केले. (आज हे सर्व आठवून जरी डोळे भरुन येत असले तरी त्यावेळी त्याचे काही वाटत नसे. आई, बाबा यांचे जसे हे कर्तव्य आहे तसे मित्रांचेही हे कर्तव्यच आहे असे वाटे.) ताट व भांडे विसळून तो येऊन माझ्या शेजारी गादीवर पसरला. त्याने “का रे एवढा घाबरलास?” “कसे वाटतेय?” किंवा “आली का ताकद अंगात?” या पैकी काहीच विचारले नाही. हा समजुतदारपणा नानाकडे त्याच्या आईकडून आला असणार. ती माऊलीही कधी अडचणीत आणनारे प्रश्न अवघड वेळी विचारत नसे. मुलांना कधी, काय व कसे विचारावे हे त्या अडाणी बाईला अतिशय अचुक माहित होते.
नाना कुशीवर वळून हाताचा त्रिकोन करत त्यावर कानशील टेकऊन म्हणाला “काय देवाची करणी असते बघ अप्पा, हा साधू ना जातीने गोंधळी, ना घरात संगीताचे वेड, ना संबळ हे वाद्य इतरांनी आवर्जून शिकावे असे, तरी काय संबळ वाजवतं यार हे कार्टं! याचा संबळ ऐकून खंडोबा देखील बाणाईला विसरत असेल”
मी हसुन म्हणालो “साधू काय साधूच आहे नान्या. अरे त्याची काडी आणि हात संबळवर चालत नाही, समोरच्याच्या छातीवरच चालतात जणू. घरचे उगाच राग राग करतात त्याचा संबळवरुन”
नाना नुसताच हुंकारला. मी उत्सुकतेने विचारले “ते मरुदे नान्या, मला एक सांग तु नुसत्या एका आवाजावर देव कसा काय रोखला रे? तोही तुझं ऐकून निमुटपणे थांबला आणि माघारी कसा काय गेला? कसली विद्या शिकला बावा तू?”
“अरे कसली विद्या न काय. आमच्या वाडीत पाटलाची माघारी आलेली बहीण आहे ना, गौरात्या, तिच्या अंगात येते कधीमधी. मग पाटील गावातून जगू गोंधळ्याला बोालावतात. तो येतो संभळ घेऊन. खंडोबाची स्तुती गातो खड्या आवाजात. गौरात्या घुमते पंधरा-विस मिनिटे आणि शांत होते. घुमताना जर ती बेफाम झाली तर जग्गू खड्या आवाजात ओरडतो “बघ हां देवा…जाग्यावं” किंवा “ओ देवा माघारी फिरायचं बरं का” आणि गौरात्या ऐकते त्याचे. तेच सुचलं काल मला. गम्मत म्हणजे साधूच्या घरचा देव सुध्दा फिरला की माघारी”
नान्या मोठ्याने हसला आणि म्हणाला “ते काहीही असुदे अप्पा पण हे अंगात येणे खरे असते. म्हणजे देव वगैरे नाही येत अशा लोकांच्या अंगात पण ती बेभान अवस्था मात्र खरी असते. कुणी फार दुखावलेला, उरात सुरी असलेला या अवस्थेत जातो. सासुरवास असलेल्या बायाबापड्यांच्याही असेच अंगात येते. काही संगीतवेडी माणसेही भान हरपून बसतात. आपण त्रास देवू नये त्यांना शक्यतोवर.
मी नुसताच “हं” म्हणत छताकडे पहात राहीलो.
उशीवर डोके ठेवत नान्या म्हणाला “झोप अप्पा आता. सकाळी माझे तिन शिटस् तुला पुर्ण करुन द्यायचेत. मला ते ड्रॉईंग काय झेपत नाही”
बाकीचेही मेसवरुन आले होते. नान्याने त्यांना हाताने खुण करुन गप्प बसायला सांगितले आणि झोपला. मीही अगदी गलितगात्रच होतो. छतावरच्या फॅनचा कऽट्ट कट आवाज ऐकत, विन्या व केरुचे दबके हसणे ऐकत मग मी देखील झोपी गेलो. 
हा नाना माझ्याच गावचा. माझे गाव तसे बऱ्यापैकी मोठी बाजारपेठ असलेले व तालूक्याच्या राजकारणात चांगले वजन ठेऊन असलेले. गावाच्या आजुबाजूला तिन चार किलोमिटरच्या परिसरात पाच वाड्या. त्यातली एक वाडी फक्त नानाच्या गोतावळ्याची होती. कधीतरी त्याच्या पणजोबांच्याही आधी कुणीतरी तेथे वस्ती केली. जसजसा काळ गेला तशा एका चुलीच्या अनेक चुली होत होत आजची वाडी तयार झाली. या वाडीत कुणाकडे कार्य असले की सगळ्यांच्या चुली बंद असत व कुणी गेले की सर्व वाडीला सुतक पडत असे. सध्या या वाडीच्या सगळ्या नाड्या नानाच्या वडीलांकडे होत्या. त्याचे घर म्हणजे एक मोठे खटलेच होते. पंधरा विस म्हशींचा गोठा, दारात दोन ट्रॅक्टर, पंचवीस तिस एकराचे दोन तुकड्यातले सलग काळेभोर रान असा सगळा पसारा होता. वडीलांचे म्हणजे बापूंचे बोलणे फटकळ व शिवराळ असले तरी वृत्ती कर्णाची. पैशांच्या जोरावर नाही तर निव्वळ सत्शिल वृत्तीमुळे आमच्या गावच्या कारभारात, देवस्थानावर बापू वचक ठेऊन होते. कपाळावर नाम, कानांच्या पाळ्यांना गंध व गळ्यात टपोऱ्या मन्यांची तुळशीमाळ असलेल्या बापूंच्या तोंडात मात्र ‘विठ्ठल विठ्ठल’ ऐवजी ‘रांडेच्या’ आणि ‘भडव्या’ हेच शब्द जास्त असत. नान्याची आणि माझी मैत्री आठवीपासून झाली. कारण आम्ही सातवीपर्यंत गावच्या मराठी शाळेत शिकलो तर बापूंनी वाडीतल्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरु करुन पहिला विद्यार्थी म्हणून नान्याला घातले. नान्या याच शाळेत सातवीपर्यंत शिकला. 
आम्ही आठवीसाठी हायस्कुलमधे प्रवेश घेतला तेंव्हा नान्या आणि मी एका वर्गात, एकाच बाकावर आलो. आम्हा मित्रांच्या ‘गँगमधे’ आलेला नाना हा शेवटचा सदस्य. हा पहिल्या दिवशी वर्गामधे आला, बेदरकारपणे आमच्या कळपात घुसला आणि थोड्याच दिवसात गँगचा अविभाज्य भाग झाला. आम्ही केलेल्या गुन्ह्यांच्या छड्या त्यानेही निमुट खाल्या, स्वतःच्या व आमच्याही आई बाबांची बोलनी खाल्ली. स्वतःच्याच पेरुच्या बागेत हा आमच्यासोबत गुपचूप पेरु चोरायला आला, कॉलेजमधे आमच्या मारामाऱ्यांमधे हाही समरसुन सहभागी झाला, मार द्यायला आणि खायलाही नान्याने कधी मागेपुढे पाहिले नाही. इंजीनिअरींगला असताना माझे काही मुलांशी वाजले. एकदा मी, नान्या आणि काही मित्र कॅंटीनमधे बसलो असताना ही मुलेही तेथे आली. त्यांना पहाताच मला माझा संताप आवरता येईना. मी समोरचा पाण्याचा जग घेवून त्या मुलांवर धावलो. चार अर्वाच्य शिव्या देणे म्हणजे माझे हमरी तुमरीवर येणे व एखादी मुस्काडात मारणे म्हणजे माझी मारामारी असे. त्यापुढे धाव घ्यायची माझी वृत्ती आणि ताकद दोन्हीही नसे. पण मला धावताना पाहून नान्या स्टिलचे पाय असलेली खुर्ची घेवून असा काही त्या मुलांवर तुटून पडला की आम्हाला त्या मुलांना धोपटण्याऐवजी नान्याच्या तावडीतून सोडवावे लागले. ती मुलं “बघून घेऊ तुम्हाला” अशा धमक्या देत पळून गेली तेंव्हा कुठे नानासाहेब शांत झाले.
पुन्हा चहाची ऑर्डर देत नाना मला म्हणाला “काय केलं रे त्यांनी अप्पा?”
मी डोक्याला हात लावत विचारले “नान्या, भडव्या तुला काहीच माहित नाहीए का? मग खिंड लढवणाऱ्या बाजीप्रभुच्या थाटात कशाला तुटून पडला एवढा?”
नान्या हसत चहाच्या ग्सासच्या कडेवर गोल गोल बोट फिरवत म्हणाला “असं कसं अप्पा! मित्रकार्य म्हटल्यावर मागे कसं रहायचं?”
“अरे नान्या, कसलं बोडक्याचे मित्रकार्य घेवून बसलाय? एखाद्याचा हात पाय मोडला असता तर घरचा रस्ता धरायला लागला असता. तु काय घरची शेतीच सांभाळणार आहे. मला परवडायचं नाही रस्टीकेट होणं”
तर असो.
मी बारावीनंतर इंजीनिअरींगला ॲडमिशन घेतली आणि शिक्षणात नक्की काहीच ध्येय नसलेला पण तल्लख बुध्दीच्या नानानेही माझ्यासोबत ॲडमिशन घेतले. कॉलेजमधे, होस्टेल-मेसमधे भरपुर धिंगाणा करुन नाना माझ्यासोबतच उत्तम ग्रेड मिळवून पास झाला. आयुष्यात पुन्हा कधी छंदांसाठी वेळ मिळेल न मिळेल म्हणून मी स्कल्पचरचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला ॲडमिशन घेतले आणि मुर्तीकलेतले काहीही कळत नसताना नान्याही माझ्यासोबत फाऊंडेशनला आला. कितीही आणि काहीही शिकला तरी त्याच्या करीयरची गंगा घरच्या सहकारी डेअरीलाच जाऊन मिळणार असल्याने त्याला अभ्यास, सबमिशन, पास-फेल वगैरेंची फिकीर नसायची. मैत्रीशिवाय दुसरे कसले व्यसन नाही, पास-फेलची चिंता नाही व खिशात कधी पैशांची कडकी नाही असे असल्याने तो नेहमीच बेदरकार असे. बुध्दी तल्लख असल्याने नान्याच्या मेंदूतून नेहमी चित्र-विचित्र कल्पना बाहेर पडत. या कल्पनांचा उपयोग तो प्रामुख्याने कुणी त्याच्या मित्रांना त्रास दिला तर त्याचा सुड घेण्यासाठी करायचा.

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

हैराँ हूं मेरे दिल में समाए हो किस तरहा...

मला पहाटे चार वाजता उठायची सवय असली तरी कामाला मात्र मी दहा-साडेदहापर्यंत हात लावत नाही. पण परवा सासवडला अत्यंत निकडीचे काम निघाले आणि दहा वाजेपर्यंत पुण्यातही असणे गरजेचे होते. त्यामुळे कधी नव्हे तो माझा पहाटेचा नियम बाजूला ठेवून मला सहा वाजता घर सोडने भाग होते. इतक्या लवकर निघण्याचा हेतू हा होता की सासवड परिसर पक्षिनिरीक्षकांचा आवडता भाग आहे, कदाचित आपल्यालाही काही फोटो मिळतील अकरापर्यंत पुण्यात येता येईल. रात्री गुगल काढून शोध घेतला आणि एवढ्याशा सासवडमधे कुठे कुठे जायचे याची यादी वाढतच चालली. सासवडजवळील काही भागात रॅप्टर्स पहायला मिळतात. गरुड, ससाणे वगैरे. तेथूनच काही किलोमिटर गेले की हरणांचे भरपुर कळप अगदी सहज दिसतात. सासवड गावात सोपानकाकांचे, महादेवाचे वगैरे मंदिरे पहाण्यासारखी आहेत, दोन मिसळची ठिकाणे यादीत अगोदर होतीच. या सगळ्याला दिवस पुरणार नव्हता. त्यामुळे सगळ्यावर काठ मारुन फक्त काम डोळ्यापुढे ठेवून सकाळी लवकर निघालो. काही दिसलेच तर सोबत असावा म्हणून कॅमेरा मात्र घेतला. मिसळ पुन्हा कधीतरी चाखू म्हणत काही बिस्किटचे पुडे, चॉकलेटस, चार केळी ज्युसची बाटली गाडीत टाकली आणि निघालो. तोच तोच रस्ता काय पहायचा म्हणून आणि रुट बदलला तर प्रवास जरा सुखकर होतो हा नेहमीचा अनुभव असल्याने दिवे घाटाचा रस्ता टाळून मी गाडी कोरेगावकडे वळवली.

सात आठ किलोमिटर अंतर पार केल्यानंतर सोलापुर महामार्ग सोडून मी उजवीकडे वळालो आणि काही क्षणातच फिरत्या रंगमंचावरील दृष्य बदलावे तसे परिसराचे दृष्य अचानक बदलले. रस्ता एकपदरी झाला. त्याच्या दुतर्फा बाभूळ, वडाची झाडे दिसायला लागली. रस्ता एकपदरी असल्याने दोन्ही बाजूला असलेली शेते अगदी रस्त्याला भिडली होती. अधून मधून असलेल्या कौलारु घरांची अंगनेही जवळ जवळ रस्त्याला लागून होती. अनेक घराच्या कौलांवर हलका धुर रेंगाळताना दिसत होता. दोन्ही बाजूस शेती होती. हवेतला गारवा वाढल्यासारखा वाटला. सुर्योदयाला अजुन वेळ होता पण चांगले फटफटले होते. मागे जाणाऱ्या शेतात माणसांची लगबग जाणवत होती. रस्ता लहान लहान टेकड्यांमधून जात होता. त्या टेकड्यांनी गळ्यात मफलर घालावा तसा विरळ धुक्याचा गोफ गुंडाळला होता. हवेला मातीचा, गवताचा, शेणाचा धुराचा सुरेख वास होता. थंड वाऱ्याने माझ्या नाकाचा शेंडा हुळहूळल्यासारखा झाला होता. हे वातावरण पाहू गरमागरम, कडक चहा हवा असे फार तिव्रतेने वाटायला लागले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडीत काकडा लावला होता. त्या सुरांना सगळ्या वातावरणामुळे वेगळीच झिलई चढली होती. त्यातील अभंगांचे अर्थ नव्याने उमगायला लागले. हातावर हात चोळत बायकोने खुप वेळा काचा वर करायला सांगूनही मी त्या तशाच ठेवल्या होत्या. गाडीचा वेग मात्र जरा कमी करुन मी अगदी रमत गमत चाललो होतो. एका हाताने गाडी चालवत मी माझा उजवा हात गाडीबाहेर काढला होता. थंडीमुळे त्यावर डोळ्यांना स्पष्ट दिसेल असा काटा उभा राहीला होता. मी समोरच्या टेकडीला वळसा घातला आणि समोरच सुर्यनारायणाचे दर्शन झाले. लहान मुलाने उत्सुकतेने खिडकीवर हनुवटी ठेवून पलीकडे चालली एखादी मिरवनूक पहावी तसे समोरच्या टेकडी मागून सुर्य हलकेच डोकावून पहात होता. अलीकडे असलेल्या विजेच्या खांबात तो अडकल्यासारखा वाटत होता. अगदी तापहीन असलेला तो सुर्याचा गोळा डोळ्यांना चक्क सुखावत होता. पंधरा मिनिटांनंतर याच्याकडे पहानेही असह्य होणार होते. मी गाडी बाजूला घेतली. खरेतर कॅमेरा काढून फोटो वगैरे काढण्यात उगाच वेळ घालवावा वाटत नव्हते पण सवयीचा गुलाम असल्याप्रमाणे मी काही स्नॅप घेतले. पुन्हा एकदा चहाचा वाफाळता कप डोळ्यांपुढे फिरुन गेला. मी गाडीत बसलो. निघायला तर पाहीजे होते. बायको का आली नाही म्हणून पाहीले तर ती रस्ता ओलांडून पलिकडे गेली होती. मी पाहिले आणि पहातच राहीलो. रस्त्याच्या कडेलाच अगदी खेटून एक लहानसे कौलारु घर होते. त्याच्या अंगणात बऱ्याच कोंबड्या चरत होत्या. काही शेळ्याही दिसत होत्या. चवड्यावर बसुन एक म्हातारी अंगन झाडत होती. झाडताना ती सारखी डोक्यावरचा पदर आणि नाकातली नथ सावरत होती. पलिकडे अतिशय लहान असलेल्या शेतात एका शेतकऱ्याने नांगर धरला होता. त्याच्या नांगराच्या पुढे मागे अनेक बगळे, कोंबड्या ढेकळातले धान्य, किडे वगैरे टिपत होते. त्या काळ्याभोर रानात त्या रंगीत कोंबड्या आणि पांढरेशुभ्र बगळे छान उठून दिसत होते. एक कुत्रा अधून मधून बगळ्यांच्या मागे लागत होता. बैलही अगदी जीवा शिवाची जोड असावी तशी पांढरी शुभ्र, लांब शिंगाची होती. ती लाल रंगात रंगवलेली शिंगे लांबूनही उठून दिसत होती. शेत अगदी लहानसे होते. बहुतेक घरचा भाजीपाला करण्यासाठी असावे. त्याच्या मागे झाडी दिसत होती. झाडीच्या मागे दुरवर अस्पष्ट डोंगर धुक्यात हरवले होते. एकून ते सगळे दृष्य अगदी चित्रात असावे तसे दिसत होते. चित्रही कसे, तर लहान मुल हट्टाने एखादे चित्र काढते त्यात त्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी काढते. निळे आकाश, त्यात उडणारी पक्ष्यांची रांग, दोन डोंगरांच्या मधून उगवणारा सुर्य, शेजारून वहानारी नदी, नदीवर मासे पकडणारा कोळी वगैरे सगळे ते मुल एकाच चित्रात बसवायचा प्रयत्न करते तसे येथे बहुतेक सगळ्या गोष्टी एकाच फ्रेममधे होत्या. आणि त्याही अगदी खऱ्याखुऱ्या. माझ्या गावीही साधारण असेच वातावरण असते तरीही ते परिपुर्ण चित्र पाहून मला हरखल्यासारखे झाले
मी काहीही बोलता गाडी लॉक केली आणि कॅमेरा घेवून शेताकडे निघालो. बायकोही मागोमाग होती. मला या पक्षीनिरीक्षणाचा छंद जडल्यापासून तिलाही एक नविन विरंगुळा सापडला आहे. मला दिसायच्या अगोदर एखादा पक्षी शोधायची तिला घाई असते. असा एखादा पक्षी दिसला की मला दाखवून तिला कोण आनंद होतो. “मी आहे म्हणून तुला पक्षी दिसला, नाहीतर तुला दिसला असता का तो?” असा टोमणा मला ऐकवून ती दुसरा पक्षी शोधत बसते. आताही तिला शेतकऱ्याच्या नांगराऐवजी पलीकडे असलेले लहानसे तळे तेथे अजुन दिसलेले पक्षी दिसत असाावेत. आम्ही समोरचा बांध उतरलो आणि बगळ्यांच्या मागे लागणारा कुत्रा आमच्याकडे पळत आला. एकून वातावरणामुळे मला त्याची भिती वाटायच्या ऐवजी मीच त्यालावाघ्या इकडे येम्हणत हाका मारल्या. (त्याचे नाव टायग्या म्हणजे टायगर होते हे नंतर समजले) दिसायला जरा उग्र असलेले ते गावठी म्हणूनच चलाख असलेले कुत्रे जवळ आले. त्याने प्रथम मला, मग बायकोला समाधान होईपर्यंत हुंगले काही धोका नाही हे समजल्यावर ते शेपटी हलवत पुन्हा मागे पळाले. चला, सुरवात तर चांगली झाली होती. आम्ही अंगणात आल्यावर म्हातारीने झाडू खाली ठेवून आमच्याकडे डोळे किलकिले करत पाहीले. मग तेथेच रचलेल्या गोधड्यांच्या चळतीमधून तिने एक वाकळ बाजूच्या लोखंडी कॉटवर टाकली बसा, वाईच पानी आन्तेम्हणत वाकतच आतमधे गेली. म्हातारीचा मोकळेपणा पाहून मला छान वाटले. मी कॅमेरा तेथेच ठेवून निवांत बसलो. बायको एव्हाना शेजारच्या शेतात पोहचली होती
म्हातारीने पाण्याचा तांब्या माझ्या हातात दिला जमीनीवर बसत मला विचारलेकोन गावचं पाव्हनं म्हनायचं?”
पाणी प्यायलावर तांब्या बाजूला ठेवत मी म्हणालोपुण्याहून आलोय आज्जी. नांगर पाहिला शेतातला म्हणून जरा थांबलो
आस्सं! चांगलय. जेजूरीला चाललाय जनूआज्जीचा पुढचा प्रश्न तयारच होता.
जेजूरीला नाही आज्जी. येथेच सासवडला काम आहे जरा. दुपारपर्यंत माघारी फिरुआज्जीचे वय पाहून माझा आवाज उगाच चढा लागला.
आस्सं! मंग गडावं नाय जात तर. आसुंदे, आसुंदे! बस लेकरा, जरा लेकाला हाकारते. नांगूर धरलाय त्यो थोरला हाय. धाकला रातीच सासवडाला गेलाय. गरम हाय डोक्यानी पर चांगला हायअसं म्हणत म्हातारी जमीनीला रेटा देतइठ्ठला, पांडूरंगाम्हणत उठली. तिच्या थकल्या तनूची धनूकली झाली होती. सहज ऐंशीच्या पुढे असावी. बाजूच्या कुडाचा आधार घेत ती घराच्या टोकापर्यंत गेली. नांगर अगदी समोरच चालला होता. तिने शेताकडे पहात एक दोनदा फक्त हात हलवला पुन्हा माझ्या समोर येवून बसली. समोरच्या झाडूच्या काड्या निट करायचा चाळा आज्जीने सुरु केला. दहा मिनिटातच घुंगराचा आवाज आला. मागोमाग बनियन पायजमा घातलेला, डोक्यावर गांधी टोपी असलेला, तिचा मुलगा अंगणात आला. पन्नाशीच्या आसपास असावा. कुडाला पाठ टेकवून त्याने आरामशीर मांडी घातली. डोक्यावरची टोपी मांडीवर आपटून साफ केल्यासारखी केली आणि माझ्याकडे पाहून त्यानेही अगदी तोच प्रश्न मला विचारलाकोन गावचं पाव्हनं म्हनायचं?” 
मी आज्जीला सांगितलेले पुन्हा एकदा त्यांना ऐकवले. यावर त्यांचा प्रतिसाद अगदी आज्जीसारखाच होता.
आऽऽस्सं! जेजूरीला चाल्लाय जनू दर्शनाला?”
मला उगाच वाटून गेले की गालाला काही हळद वगैरे लागलीय की काय माझ्या
मी हसुन म्हणालोनाही. सासवडला जरा काम आहे. तुमचा नांगर पाहिला म्हणून थांबलो
ब्येस केलंम्हणत त्याने आत पहात आवाज दिलाअगं ये! चहा ठ्येव पाव्हन्यांना
मग माझ्याकडे पहात तो म्हणालातुमी चहा घ्या तवर माझा तास उरकीतो. मग भाकर खावूनच निघा
मला काही समजेनाच. आमच्याकडे कुणी पाहूणे येणार असतील तर आमचे तोंड वाकडे होते आणि येथे ओळख पाळख नसलेल्या माणसांना पाहुणा समजून बडदास्त ठेवली जात होती. एक वेळ चहाचा आग्रह मी समजू शकलो असतो पणजेवूनच जाया आग्रहाचा अर्थ समजण्याइतका दिलदारपणा मी कधी कुणाला दाखवलाच नव्हता. कधी कुणा अनोळखी व्यक्तीला पंक्तीला घेवून प्रेमाने खावू खातले असते तर कदाचीत त्या माय-लेकांच्या प्रेमाचा अर्थ मला समजला असता. “भाकर खावूनच निघायातली सहजता पाहून चोविस तास दार बंद असलेल्या घरात रहाणाऱ्या माझ्यासारख्याला ठेच लागली. पाचच मिनिटात शेतकरी दादांच्या बायकोने चहाचे कप आणले. बायको अजुन शेताकडेच होती. त्यामुळे एक कप माझ्या हातात देवून तिने एक कप पुन्हा मागे नेला. चहा कपभरुन तर होताच पण बशी देखील अर्धी भरलेली होती. मी बशीतील चहा संपवला निवांतपणे कपातील चहाचा आनंद घ्यायला सुरवात केली. चहा जरा जास्तच गोड होता. किंचित स्मोकी फ्लेवरही होता चहाला. मला मघापासुनच चहा प्यायची खुप इच्छा झाली होती त्यामुळे तो गोड चहा मला फार टेस्टी लागत होता. मी कप घेवून कॉटवरुन उठलो. रस्त्याच्या कडेला उभा राहून चहा पित राहीलो. समोरचा दिनमनी आता टेकडीमागून बराच वर येवून एका मोठ्या लिंबाच्या झाडामागे लपला होता. टेकडीवर असलेल्या ज्वारी बाजरीच्या शेतातील पिके काळी पण रेखीव दिसत होती. असे वाटत होते की गारव्यामुळे त्या टेकडीच्या अंगावर रोमांच उठले आहेत. हवेत थंडी नसली तरी चांगलाच गारवा होता. धुक्याचा आता मागमुसही नव्हता. पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता. आकाशही क्षितीजावर शेंदरी होत माथ्यावर निळेभोर व्हायला लागले होते. त्या निळसर शेंदरी आकाशात बगळ्यांचे चंद्रहार उडत होते. त्यांच्यामागून करकोच्यांचीही माळ उडताना दिसत होती. “गेल्या त्या बगळ्यांच्या माळा आणिबगळ्या बगळ्या कवडी देम्हणायचा भाबडेपणा देखील हरवला आताअसं मी कैकदा मित्रांकडे गाऱ्हाने गायलो होतो. पण समोरच्या बगळ्यांच्या आणि करकोच्यांच्या उडणाऱ्या रांगा पाहूनसगळे जेथल्या तेथे आहे, आपणच या बेगडी जगण्यात हरवलोयहे लक्षात आले
मी रिकामा कप खाली ठेवून शेतात गेलो तेंव्हा शेतकरी दादांनी नांगर पुन्हा सुरु केला होता. तेथे शेजारी एक लहानसे डबक्यासारखे तळे होते. बायको अजुनही तेथे उभी राहून काहीतरी शुट करत होती. मी जवळ गेल्यावर मला काही बोलू देता तिने काय काय दिसले याची यादीच वाचायला सुरवात केली
समोर बघ, ते सँडपायपर अजुन बसलेत तेथे आणि वर पहा, किंगफिशर आहेत दोनअसं म्हणत तिने समोर बोट दाखवले
मी बायकोच्या हातातला कॅमेरा बंद करत घराकडे हात करुन म्हणालोतु अगोदर घरी जा. आज्जीबरोबर गप्पा मार. मी येतो येवढ्यात

मी प्रथम तेथे फिरणाऱ्या कोंबड्या अगदी घोळका करुन बसलेल्या बगळ्यांचे फोटो काढले. नांगराचे फोटो काढले. मग कॅमेरा गळ्यात अडकवून मी नांगराच्या सोबतीने शेतकरीदादांच्या बरोबर गप्पा मारत चालू लागलो. त्यांच्या कोण? कुठले? गाव कोणते? कुठे चाललोय? वगैरे प्रश्नांना उत्तरे देता देता दोन तिन चक्कर पुर्ण झाल्या. घरामागे येताच दादांनी नांगर शेताबाहेर काढला. बैल मोकळे करुन अंगणातल्या खुंट्याला गुंतवले. त्यांच्यासमोर काही गवत टाकून ते मला म्हणालेलई वखूत थांबावलं तुमाला. चला पह्यली भाकर मोडू. आईबी वाट बघत आसन
मी त्यांच्या मागून घरात आलो. घर म्हणजे चांगली तिस बाय बारा फुटांची लांबलचक खोली होती. साधारण विस फुटांवर मधेच एक चार फुट उंचीची मातीने सारवलेली भिंत होती. पलीकडे स्वयपाकघर असावे. रांगेत मांडलेली पितळी भांडी दिसत होती. आम्ही होतो त्या भागात एका बाजूला पोत्यांची लहान थप्पी काही शेतीची औजारे होती. एक मोठा लाकडी पलंग होता. त्यावर दोन पाच सहा वर्षांची मुले खेळत होती. आम्ही आत आलो ते दार सोडून त्या खोलीला अजून दोन दारे होती. त्यातील एका दाराने मागे जात शेतकरी दादा म्हणालेतुमी बसा. मी पाय खंगाळून आलोच
मी भिंतीपलीकडील स्वयपाकघरात डोकावलो. बायको विनोदी चेहरा करुन पाटावर बसली होती, समोर बसलेल्या म्हातारीच्या डोळ्यात मिश्किलपणा दिसत होता. बाजूलाच गॅसची शेगडी होती. चहा मात्र चुलीवर ठेवलेला होता
मी बायकोकडे पाहून म्हणालोकाय झाले? छान गप्पा रंगल्यात की तुमच्या
बायकोऐवजी म्हातारीच गालभर हसत म्हणालीकाय नाय . तुमच्या बायकूला इचारीत व्हते का केसं भुंडी कशापायी केली? पण एवढी गड्यावानी काम करती बाय तर भांडी धुनी, येनी फनी कव्हा करायची? चांगलं हाय. आसंच एकुनाराला धरुन राह्यचं बाबांनो. दुसरं काय हाय सांग?”
मी बायकोकडे पाहीले. तिला काही वाटलेले दिसले नाही. उलट गंमत वाटली असावी. आज्जीने तिच्या मशरुम की कोणत्या हेअरकटला बिनदिक्कत भुंडे केले होते
मी शेतकरी दादांच्या शेजारी येवून बसलो. त्यांनी बसल्या जागेवरुनचआई वाढती का गं? भुका लागल्यातम्हणत आवाज दिला. मी इतक्या काकूळतीला येत त्यांना सांगितले की खरच जेवणाचे काही काढू नका आता. हवं तर पुन्हा एकदा चहा घेतो आम्ही. तसेही आम्ही अकरानंतरच जेवतो. त्यामुळे आता भुक नाही. खरे तर मला रोज सकाळी आठ वाजता पोटभर जेवायची सवय आहे. आता आठ वाजलेही होते. पण त्या कुटूंबाएवढा मनाचा मोकळेपणा माझ्याकडे नव्हता. अस्थानी संकोच मला पिठलं भाकरी खावू देत नव्हता. आम्ही जेवत नाही म्हटल्यावर आज्जी बरीच नाराज झाली
इतक्या वखूत बसलासा, थोडा वखूत आजून बसा. घडीभरात गरम भाकर वाढीतेम्हणत आज्जीने खुप आग्रह केला. “आमचं पुन्य कशापाई दवडताम्हणत ब्लॅकमेलही केले. पण मला आणि बायकोला खरच तेथे इच्छा असुनही जेवायला मन करेना. कोण कुठले कुटूंब. पाणी दिले, चहा दिला, प्रेमाने चौकशी केली यातच आम्हाला खुप काही मिळाले होते
मी पलंगावरुन खाली बसत म्हणालोआज्जी चुलीवरचा तो चहाच द्या आता कप भर. जेवायला पुन्हा कधी तरी नक्की येवू आम्ही
शेवटी अतिशय नाराजीनेच आज्जी कबूल झाली. तोवर बायकोने गाडीतून बिस्किटचे पुडे, चॉकलेट आणले होते. मी बिस्किट आज्जीकडे दिली आणि चॉकलेट त्या मुलांच्या समोर धरली. त्यातल्या एकाने चटकन चॉकलेट घेतले पण दुसऱ्या लहान मुलाने मात्र माझ्याकडे शंकेने पाहीले. त्याने बनियन घातले होते आणि खाली तो दिगंबरच होता. एका हाताचे बोट लाल करगोट्यामधे गुंतवून दुसऱ्या हाताने तो चक्क नुन्नीबरोबर खेळत होता. मान तिरकी करुन माझ्याकडे रोखून पहात होता. त्याच्या आईने त्याला भिंतीमागूनच आवाज देवूनघे बाळा, काका हायेत ना आपले? घेअसं सांगताच मात्र त्याने चटकन चॉकलेट घेतले धावत आईच्या पदरामागे जावून लपला. तोवर आज्जीने चहा आणला. एका पितळी प्लेटमधे मी दिलेली बिस्किटे होती. माझीच बिस्किटस शेतकरी दादांनी मला आग्रहाने खायला लावली. या चहापानात आमची दहा मिनिटे गेली. बाहेर आता उन चढले होते. चहा घेता घेता मी पक्ष्यांचे फोटो का काढतो? त्याचे मला पैसे मिळतात का? किती मिळतात वगैरे माहिती शेतकरी दादांनी विचारुन घेतली. हा फक्त छंद आहे हे समजल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. माझे हे पक्षी-वेड पाहून त्यांनी मला जाताना कुठे कुठे पक्षी दिसतील याची एक जंत्रीच दिली. मला माहित असलेली नावे आणि ते सांगत असलेली नावे यात बराच फरक असला तरी त्यांना पक्ष्यांची अगदी बारीकसारीक माहिती आहे हे सहज लक्षात येत होते
आवं हे तं कायीच नाय. आमचं वडील व्हते तव्हा हे एक एक गिधाड उतरायचं रानात. दांडग्या गड्याला भ्या वाटन असा एक एक पक्षी. पन या कैकाड्यांनी आन फासेपारध्यांनी पार मारुन खाल्ली सम्दी गिधाडं. वस्तीवरच्या कोंबड्या चोरायच्या आन फास लावून गिधाडाला चारा म्हणून ठिवायच्या. कोंबड्या देवून गिधाडं मारनारी ही इपारी मानसं. पाक साफ केली गिधाडं. ढोक तर औशीदालाबी ठिवला नाय. आन काय काय पाखरं व्हती पन सम्दी गेली. पघायला मिळना आता ही पाखरं
मी सर्व माहिती हरखल्यासारखी ऐकत होतो. छान वाटत होते
जाताना आपन नांगूर धरला व्हता का, त्या अंगाला चक्कर मारा एक. दोन चार खंडूबा असत्यात तिथ दिसभर. ढोकरीबी दिसन. तुताऱ्या तर इळभर असत्यात तिथं. आन इथून चार मैल गेलं का मंग एक चढ लागन. तिथं कुनालाबी इचारा फॅक्ट्री कुठशीक हाये. आपली पत्रावळीची फॅक्ट्री हाय . तिथून खालच्या अंगाला कासराभर आत एक रस्ता उतारलाय. तिथून मैलभर गेलं की मोप हरनाचे कळप दिसतील. एखादा गरुड तर दिसनच दिसन. ससानं बी मोकार हायीत. उशीर व्हत नसन तर तसच पुढं निगायचं. मोठं तळं हाय. तिथं काय बाय दिसनच. तिथच दुपार केली हरनं तिथच पान्यावर येत्यात. दिसतील तुमाला. पार ताप आनत्यात मानसाला. उभं पिक नासावत्यात. लई हावरी आन चवन्याची जात हाय ती. कोल्हं बाकी गेल्या दहा वर्षात दिसलं न्हाई पघा
हे सगळं ऐकून मला उगाच तासभर वाया घालवल्यासारखे वाटले. या दादांना घेवून बसलो असतो तर तासाभरात त्यांनी सासवड परिसरातील पक्षी, प्राणी, त्यांची ठिकाणे यांची इत्यंभुत माहिती मला दिली असती. मी एकदोन बिस्कीटे खावून चहा संपवला. त्यांच्या सुनेने (सुनच असावी) बायकोला हळदी कुंकू लावले. मग बायको आज्जीच्या चक्क पाया पडली. (ही तिची जुनी सवय आहे) आम्ही निघालो तेंव्हा ती दोन पोरं, त्यांची आई, शेतकरीदादा, आज्जी अगदी डांबरी रस्त्यावर निरोप द्यायला आले. आज्जीचे अजुनहीदोन घास खाल्लं अस्त तर बरं वाटलं अस्त जीवालाहे पालूपद सुरुच होते. आम्ही गाडीत बसलो. दोघांनीही पुन्हा जेवायला यायचे अगदी वचनच घेतले. “पुढच्या टायमाला आला की लेकाचीही भेट व्हईन तुमचीम्हणत शेतकरी दादांनी हात हलवला. मघाशी बुजलेली पोरेही आता अगदी हसत, ओरडत टा टा करत होती. गाडी दुर जाईपर्यंत मला रस्त्यावर उभी असलेली म्हातारीच्या शरीराची धनूकली आरशात दिसत राहीली


किती वेळ घालवला आम्ही त्या लहानशा घरात? फार तर दिड तास. पण या दिड तासाने मला पुढच्या पुर्ण आठवडाभर पुरेल इतकी उर्जा दिली. मला एक सुफी शेर आठवला. “हैराँ हूं मेरे दिल मे समाये हो किस तरहा, हालाके दो जहाँ मे समाते नही हो तुमयाचे उत्तर त्या शेतकरी कुटूंबाने मला दिले

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...