❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

मैत्र - १०

सकाळी सकाळी शब्दकोडे सोडवत बसलो होतो. बाबांनी पुण्याहुन येताना हे पुस्तक आणले होते. त्याच्या प्रत्येक पानावर अगदी पानभरुन शब्दकोडे होते. या कोड्यांसाठी रविवारच्या वर्तमानपत्राची वाट पहायला लागायची पण आता पुर्ण पुस्तकभरुन कोडी समोर असताना मला पेन हातातुन सोडवत नव्हता. आईने पाठीमागुन हात धरुन हातावर दिड रुपया ठेवला. कोड्याच्या नादात पहिल्यांदा माझ्या लक्षात आले नाही. पण मग हातातला दिड रुपया पहाताच माझी ट्युब पेटली.
मी पैसे खाली ठेवत म्हणालो “मी अजिबात नाही जाणार हां दळण घेऊन आता. मी कोडी सोडवतोय.”
“असं रे काय करतो? हे पण बाहेर गेलेत नाहीतर त्यांना सांगितले असते. जा ना रे अप्पा” म्हणत आईने परत माझ्या हातात पैसे ठेवले.
“बघेन नंतर. अगोदर हे सोडवू दे मला” म्हणत मी पैसे खिशात घातले.
माझे काही उठायचे लक्षण दिसत नाही हे पाहुन आईने त्रास द्यायला सुरवात केली. मला न आवडाणाऱ्या गोष्टी आईला माहित नसणार तर कुणाला असणार?
डोक्यावरुन, गालावरुन हात फिरवत आईचे सुरु झाले “असं रे काय करतोस सोन्या! माझं गुणाचं बाळ ते. असं कुणी आईला त्रास देत का?”
हे असं काही केलं की मी वैतागुन उठणार हे आईला माहीत होतं, तसा मी उठलो आणि सोफ्यामागे ठेवलेली दळणाची पिशवी काढत म्हणालो “जातो बाई मी पण हे थांबव. मी बाळ राहीलो नाही आता. आणि ‘आईसाठी मुलं नेहमी लहानच असतात’ वगैरे सुरु करु नको तुझं. दे आधी दळण.”
मी पिशवीचे दोन बंद दोन हातात धरुन आईसमोर उभा राहीलो. डबा पिशवीत ठेवता ठेवता आई म्हणाली “आणि हे बघ अप्पा..”
तिला मधेच थांबवत मी म्हणालो “माहितीये, दळण गव्हावरच टाकायचं, बारीक दळायचं, अर्ध्या तासात हवं आणि पिठ थंड झाल्यावरच डब्याला झाकन लावायचं. सांगतो भिकोबाला. ठिके?”
आई माझ्या प्रत्येक वाक्याला “हंऽ हंऽ” करत होती. आईचं कधीही काहीही असतं. एकदा कोड्यांची लिंक तुटली की काही केल्या पुढचे शब्द आठवत नाहीत. अगदी डोळ्यासमोर असुनही आठवत नाही. मी पिशवी स्कुटरला लावली आणि गावाकडे निघालो.
गिरणीत लाकडी जाळीवर डबा ठेवला तर भिकोबा हसुन म्हणाला “काय अप्पा, दळण का?”
“नाही, शेंगदाणे आणलेत. तेल गाळून दे पटकन”
“काय रे, चिडलाय एवढा? काय आणलय? गहू?”
मी त्याच्याकडे डबा सरकावत म्हणालो “हे बघ भिकोबा, दळण फक्त…”
माझं वाक्य मधेच तोडून भिकोबा म्हणाला “गव्हावरच टाकायचं, बारीक दळायचं, लगेच पाहीजे, पिठ थंड झाल्यावरच झाकण लावायचं. अजुन काही?”
मी आपला त्याच्या प्रत्येक वाक्यावर “हं” करत होतो. आईचं ऐकुन माझं पाठ झालय, आणि माझं ऐकुन या भिकोबाचं. मला हसु आलं. राग जरा निवळला.
भिकोबा म्हणाला “काय अप्पा, तू रांगत होता तेंव्हा पासुन दळण दळतोय तुमचे. पण मोठ्याईच्या सुचना काही संपत नाही.”
या भिकोबाला मी लहानपणापासुन पहातोय. भरपुर केस आणि भरघोस मिशा. त्या कधी काळ्या होत्या की नाही माहित नाही. कारण जेंव्हा जेंव्हा त्याला पहावे तो पिठ उडुन त्याचे केस, मिशा आणि भुवयासुध्दा पांढऱ्याफेक झालेल्या असायच्या. पुर्वी पिठामुळे आणि आता म्हातारपणामुळे. हा भिकोबा मला आवडायचा. लहान असताना आईबरोबर ‘मागे लागुन’ दळणासाठी मी यायचो ते त्याला पहायला. गिरणीच्या चट्याक फट्याऽक आवाजात भिकोबा उलट्या पिरॅमिडसारख्या चौकोनी तोंडात दळण ओतायचा, हातातल्या हातोडीने पिठ पडणाऱ्या भागावर ठण्ण ठण्ण करुन आवाज करायचा आणि वर टाकलेल्या गव्हात कोपरापर्यंत हात घुसवून फिरवत रहायचा. अशा वेळी त्याला तंद्री लागायची. त्याला पाहुन मी ‘मोठेपणी गिरणीवाला व्हायचे’ हे नक्की केले होते. एकदा घरी आलेल्या पाहुण्यांनी “मोठा होवून कोण होणार बाळ?” या प्रश्नाला मी “गिरणीवाला” असं उत्तर दिल्याचे बाबा अजुनही हसत हसत सांगतात. नेहमीप्रमाणे भिकोबाने गिरणीवर ठण्णऽऽ असा जोरात आवाज करत म्हटलं “अप्पा किती वेळ बसणार या पिठाच्या फुफाट्यात? जावून ये भटाच्या वाड्यावर जायचे असेल तर.”
मलाही ते पटलं, म्हटलं चला जरा ठोब्बाकडे जावून त्याची कलाकुसर बघत बसावं. आजोबांना चांदीचा करगोटा करायचा होता त्याचं डिझाईनही त्याला रेखाटुन देता येईल.
“मी चाललोय म्हणून दळण मागे ठेवू नको रे भिकोबा” असं त्याला बजावत मी ठोब्बाकडे निघालो. जाताना शामला आवाज दिला. तो वाटच पहात असल्यासारखा शर्ट घालतच स्कुटरवर येवून बसला. आम्ही ठोब्बाच्या घरापुढे स्कुटर लावली. ठोब्बाचे घर तसे चार खोल्यांचे. शामच्या वाड्यापुढे काहीच नाही असे. पण जोतं मात्र सहा फुटांच्या आसपास होतं. पायऱ्या चढुन गेलं की पहिल्याच खोलीत काही काचेची कपाटे लावून ठेवलेली. एक बैठे लाकडी डेस्क आणि त्यामागे पांढरी शुभ्र गादी. डेस्कच्या शेजारीच बादलीच्या आकाराची शेगडी आणि तिला हवा घालण्यासाठी लोखंडी पंखा. पंख्याच्या कडेलाच अडकवलेल्या दागीन्यांवर जाळ फुंकायच्या दोन वाकड्या पितळी नळ्या. आम्ही गेलो तर ठोब्बा दोन पायांच्या अंगठ्यांमधे लोखंडी पट्टी धरुन त्यातुन चांदीची तार ओढत होता. पट्टीवर चढत्या क्रमाने आकार असलेली भोके होती. अगोदर मोठ्या आकारातुन तार ओढायची मग एक एक क्रम करत ती लहान छिद्रातुन ओढायची. म्हणजे हव्या त्या जाडीची तार मिळे. ठोब्बा तार ओढण्यात अगदी गुंग झाला होता. प्रयोगशाळेत टंगळमंगळ करणारा ठोब्बा, वडील दागीना घडवायला बसले की तेथुन हलत नसे. त्याला मनापासुन सोनारकाम आवडे. त्यामुळे वडीलही खुष असायचे त्याच्यावर. बरं तसा दागीन्यांच्या बाबतीत बुध्दीमान. त्याने माझ्या आईसाठी बांधलेल्या नथीचे डिझाईन तालुक्यात काय जिल्ह्यात कुठे नव्हते. आम्हाला पहाताच त्याने उरलेली तार पट्टीतुन घाईने ओढली आणि ती भेंडोळी त्याने व्यवस्थीत कपाटात ठेवून गादी झटकली.
एक तक्क्या माझ्याकडे सरकवत तो म्हणाला “अप्पा तू आज करगोट्याचा विषयच काढू नको. मी करीन डिझाईन आणि दाखविन तुला. भुंगा नको लावूस मागे.”
मी गादीवर टेकत म्हणालो “मी काही बोललोही नाही, तूच सुरु केलं कारे ठोब्बा. म्हणजे एखाद्याला वाटेल की अप्पाच मागे लागलाय सारखा याच्या. चालू आहात सगळे तुम्ही. ते म्हणतात ना ‘सोनार, शिंपी, कुलकर्णी अप्पा। यांची संगत नको रे बाप्पा॥’ ते अगदी खरय.”
मला कोपराने ढोसत शाम्या म्हणाला “आयला, त्याच्यावर कशाला घसरत असतो रे अप्पा नेहमी. तू एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तुझा पार वनवासातला राम होतो. झाडा-दगडांमधेही तुला सितामाईच दिसायला लागते अशावेळी. माहितीये सगळ्यांना.” शामने बाजु घेतल्याने ठोब्बाला जरा बरं वाटलं.
तो आत पाहुन ओरडला “आई पाणी दे ग जरा. चहाही टाक.”
मी एक लोड टेकायला घेतला आणि दुसरा मांडीवर घेवून शाम्याला म्हणालो “होळीचे काय करायचे रे या वर्षी? धोंडबा काही आपल्याला मळ्यातुन एका काडीला हात लावू देणार नाही.”
शाम्याही विषयाची वाटच पहात होता. तो म्हणाला “त्याचंही बरोबर आहे रे. कशाला ही एवढी लाकडे जाळायची? एका आळीत एक होळी करायला हवी खरं तर. पण ते सगळं पुढच्या वर्षीपासुन. निदान या वर्षी तरी रामासमोरची होळी सगळ्यांपेक्षा मोठी झाली पाहीजे. धोंडबाला दुरच ठेवू होळीपासुन.”
“तुम्ही मस दुर ठेवान, मी राह्यला पायजे ना.” म्हणत धोंडबाच पायऱ्या चढून वर आला आणि भिंतीला टेकून सप्पय बसला.
मी नाराज होत म्हणालो “तू कसा काय कडमडलास येथे धोंडबा?”
“दळन टाकल रे भिकाकडं. तो म्हनला की तू बामनाच्या वाड्यावं गेलाय. तिकडं गेलो तर इन्नीनं इकडं लावून दिलं मला. पन बरंच झालं. ते व्हळी बिळीचं पार डोक्यातुन काढायचं अप्पा. आन् औंदा धुळवडबी करायची नाय. मे महिन्यात हरिचंद्रावं जातो ते कॅन्सल. धुळवडीलाच हरिचंद्रावर मुक्काम टाकू. इचारत नाय शाम्या, सांगतोय. पार बदल नाय व्हायचा यात.”
तेवढ्यात मालती चहाचे कप आणि चकल्या घेवून आली. मी न बोलता एक कप उचलुन समोर ठेवला आणि एक चकली घेवून दाताने कुरतडत बसलो. आता धोंडबाबरोबर वाद घालण्यात काही अर्थ नव्हता. त्याला झाडं झुडपं, जनावरं यांना कुणी त्रास दिला की अजिबात सहन होत नसे. होळीच्या तर तो अगदी विरुध्द होता. गावाबाहेरच्या ओढ्यातले पाणी सुध्दा कुणी विनाकारण गढूळ केले तरी तो दगड फेकून मारायचा. आणि धुळवडीचेही त्याचे बरोबर होते. मागच्या वर्षी गावातल्याच काही मुलांचे बाहेरुन कब्बडी खेळायला आलेल्या मुलांबरोबर भांडण झाले होते. त्या मारामारीतून धोंडबानेच आम्हाला सुखरुप बाहेर काढून ज्याच्या त्याच्या घरी पोहचवले होते. या वर्षीही त्या भांडणाचा पुढचा अध्याय रंगायची शक्यता होती त्यामुळे या वर्षी धुळवडीला गावात न थांबनेच शहाणपणाचे होते. धोंडबाचे हरीचंद्राचे नियोजन मला पटले आणि आवडले देखील. कारण आम्हाला या भांडणात काडीचाही रस नव्हताच आणि धुळवडीला गडावर मुक्काम म्हणजे छान होळीचा भाकरीसारखा चंद्र असणार होता. मुक्कामाची रंगत वाढणार होती. पण आता त्याच्यापुढे होळीची चर्चा करण्यात काही अर्थ नव्हता. शाम्याचे तोंड अगदी बारीक झाले होते. मागच्या वर्षी शनीच्या मंदिरापुढची होळी खुप मोठी झाली होती, तेंव्हाच त्याने ठरवले होते की पुढच्या वर्षी रामाची होळी सगळ्यात मोठी करायची. सगळ्यात जास्त नैवेद्य आणि नारळ रामाच्या मंदिराच्या होळीतच पडायला हवे होते. दुसऱ्या दिवशी त्या खरपुस भाजलेल्या नारळाच्या वाटणात शिजवलेली कोंबडी खायचे प्लॅनिंगही त्याने वर्षभर आधीच केले होते पण आता धोंडबाने त्यात मोडता घातला होता. बरं धोंडबाला विरोध करणे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्यासारखे होते. बोलायला दुसरा विषयही नव्हता. होळी, कोंबडी यासारख्या गोष्टीत ठोब्बाला रस नव्हता. मग मीच चहा संपवून उठलो. उगाचच बुड झटकत म्हणालो “जातो रे ठोब्बा. उठ शाम्या. भिकाने दळण दळले असेल. जातो घरी.”
माझी नाराजी धोंडबाला कळली. तो म्हणाला “अप्पा, कितीबी नखरे कर तू पण औंदा व्हळी निवद दाखवण्यापुरतीच करायची हे ध्यानात ठेव. नाद केला तर सगळ्यांची वस्ताऱ्याने चंपी करीन. हिंडा मंग टक्कल घेवून गावात. आयला, समद्या गावात तुमी बोंब मारुन सांगायचं की लहानी व्हळी करा, बारकी करा ते राह्यलं बाजुला, तुमीच गावापरीस मोठी व्हळी करायला निगाला. निदान या बामनाला तरी अक्कल असन असं वाटलं व्हतं तर हेच समद्यांच्या पुढं हाय. उठा, करुंद्या त्या ठोब्बाला काम.”
मग मी आणि शाम्याही निघालो. पण धोंडबाच्या बोलण्याचा आमच्यावर फारसा परिणाम झाला नव्हता. आम्ही त्याच्यासमोर बोलत नव्हतो पण दोघांच्या डोक्यात होळीचे प्लॅनिंगच फिरत होते. 
शाम्याला घरासमोर सोडले आणि मी निघालो. इतक्यात इन्नीची हाक ऐकायला आली “अप्पा थांब रे. जावू नकोस इतक्यात.”
मी पुन्हा चावी फिरवून गाडी बंद केली आणि थांबलो. इन्नी हातात झाकलेले ताट घेवून आली. मला रागच आला. शकीलकडेच जायचय तर हिला पायी जाता येत नाही का? उगाच आपलं काहीही.
“इन्ने, तु काही सिंड्रेला नाही की इथे तिथे जायला तुला हरणांची गाडी पाहीजे.” मी गाडी सुरु करत म्हणालो.
इन्नी गाडीवर बसत म्हणाली “गोग्रास द्यायचाय रे गायीला. मग पोवळालाही द्यायला नको? म्हणून तुला थांबवले. नाहीतर मीच गेले असते पायी.”
आळीच्या शेवटी अंबुनाना रहायचे. त्यांच्याकडे गाय होती. आणि त्यांचा एक बैल होता पोवळा नावाचा. हा पोवळा त्यांच्याच गायीला झालेला. तो मोठा झाल्यावर नानांनी कैक बैल पोवळाच्या जोडीला आणले. पण एकही टिकला नाही. शेवटी नानांनी तो नाद सोडला आणि बैलगाडी ‘एका बैलाच्या छकड्यात’ बदलुन घेतली. पोवळा म्हणजे अत्यंत हुशार जनावर. त्याला घरामागे असलेल्या गोठ्यात नावाला बांधलेले असायचे. तो कधी घर सोडून गेला नाही की कुणाच्या रानात कामाला गेल्यावर त्याला कधी मुसके बांधावे लागले नाही. नानांनी घातल्याशिवाय तो कधी चारा खात नसे. तो घरातल्याच काय गावातील कुणालाही कधी जवळ येवू द्यायचा नाही. दत्ता आणि मी मात्र त्याच्याबरोबर हवी तशी मस्ती करायचो. पोवळा मला आणि दत्त्याला जवळ येवू देतो म्हणून नानाही आम्हाला खास वागणूक देत असत. नानांचा या पोवळावर अतिशय जीव. दर रविवारी त्याला कणिक आणि तुपाचे गोळे खावू घालत. नाना एकवेळ पोटच्या पोराकडे दुर्लक्ष करतील पण पोवळाकडे कधी दुर्लक्ष करणार नाही. बैल हा प्राणी कितपत हुशार असतो मला माहीत नाही पण या पोवळाला मात्र नानांची भाषा कळायची. नानांच्या “मागे ये, गोठ्यात जा, थांब जरा, शेताच्या कडेने चाल, मागे फिर” वगैरे आज्ञा तो अगदी तंतोतंत पाळायचा.
आज बारस. चिंतुकाकांनी कालच्या एकादशीचा उपवास आज सोडला होता त्यामुळे गोग्रास तर द्यायला हवा. गोदीला भरवला तरी पोवळाला कसा भरवायचा म्हणून इन्नीने त्यासाठी मला थांबवले होते. मी गाडी नानांच्या घरासमोर लावली. इन्नीच्या ताटातुन एक नैवेद्य उचलला आणि मागच्या गोठ्याकडे गेलो. इन्नीने गोदीला घास भरवला आणि मी पोवळाला. त्याने जीभेच्या एका वेढ्यातच सगळा नैवेद्य तोंडात ओढुन घेतला. मी त्याच्या मानेखालची मऊसुत पाळी कुरवाळीत उभा राहीलो. इन्नीने पलिकडच्या उकिरड्यावरची कोरडी राख घेऊन ताट स्वच्छ केले आणि माझ्या शेजारी येवून उभी राहीली. माझे तिच्याकडे लक्षच नव्हते. पोवळ्याच्या पाठीवरुन हात फिरवता फिरवता माझ्या डोक्यात एक कल्पना लख्खकन चमकुन गेली. ती माझी कल्पना मलाच इतकी आवडली की मी पोवळ्याच्या पुठ्यावर जोरात थाप मारुन ठॉप्पऽऽ असा आवाज काढला आणि हसलो.
इन्नी म्हणाली “काय रे, काय आठवलं? का हसलास?”
“काही नाही गं. तु चल लवकर. तुला घरी सोडतो. मला मळ्यात जायचय.” म्हणत मी इन्नीला हाताला धरुन गोठ्याबाहेर आणले. नाना चहाचा आग्रह करत होते पण तिकडे दुर्लक्ष करुन मी गाडी वळवली व पाचच मिनिटात शाम्याच्या घरासमोर उभी केली.
आत जाणाऱ्या इन्नीला ओरडूनच सांगीतले “दादाला पाठव गं बाहेर लवकर. मी गाडी बंद करत नाहीए.”
शाम बाहेर येत म्हणाला “काय रे, घरी नाही गेलास अजुन?”
“शर्ट नको काढूस. गाडीवर बस. जरा मळ्यात चक्कर मारुयात” म्हणत मी स्कुटर मजेत एक्सीलरेट केली.
‘त म्हटल्यावर ताकभात’ हे ओळखणाऱ्या शाम्याच्या लक्षात आले की मला काहीतरी सुचले आहे. तो काही न बोलता गाडीवर बसला.
मी स्कुटरचा गिअर टाकला आणि टाळीसाठी एक हात मागे करत म्हणालो “शामराव, टाळी द्या. होळीचे काम होतेय आपले”
माझ्या हातावर टाळी देत शाम म्हणाला “अप्पा, काय सुचलय ते मळ्यात गेल्यावर सांग बाबा. आता दोन्ही हाताने गाडी चालव पाहू पुढे पाहून”
मी स्कुटर कोंबड्यांच्या खुराड्यासमोर लावली व “दत्तोबा!” अशी हाक मारत ओट्यावर सँडल्स काढल्या. रांजणातले पाणी पायावर घेवून मी आणि शाम ओसरीवर आलो. दत्त्या समोरच्या पितळीमधल्या ताकामधे भाकरी चुरत होता. भाकरी गरम असावी कारण तो चुरता चुरता भाकरी एका हातातुन दुसऱ्या हातात खेळवत होता. आम्हाला पाहील्यावर त्याने एका हाताने पलिकडची घोंगडी जवळ ओढली आणि ती उलगडत म्हणाला “बसा, टायमावर आले पघा तुम्ही. ताक-भाकर पाह्यल्यावरच शाम्याची आठवन आल्ती. आई दोन पितळ्या दे अजुन” अर्थात शेवटचे वाक्य आईसाठी होते.
शाम घोंगडीवर त्याच्या शेजारी बसत म्हणाला “दुसरे ताट नको रे. एकाच ताटात खावूयात.”
ताक भाकरी माझी नावडती त्यामुळे मी वलनीवरची गोधडी काढून मधल्या खांबाजवळ टाकली आणि मांडी घालून, खांबाला टेकून बसलो.
भाकरी कालवता कालवता दत्त्या म्हणाला “व्हय रं अप्पा, आज कस्काय सकाळचा फेरा मारला इकडं? तू तसा यायचा नाय”
माझ्याऐवजी शाम म्हणाला “अरे होळीचे काही तरी केलं पाहीजे. तेच त्याला काहीतरी सुचलय. पण मला धोंडबाची भिती वाटतेय. तो काही या वर्षी होळी करु देणार नाही. बरं तो काही ऐकणाऱ्यातला नाही कुणाचे.”
दत्ता म्हणाला “आरं पन तो तरी काय चुकीच सांगतोय? उगा आपली लाकडं जाळायची व्हळीच्या नावाखाली! मला बी नाय पटत. लईच हौस असन तर पायलीच्या पोळ्या करा पुरनाच्या आन् घाला गावजेवान. कुना गरीबाच्या मुखात तरी गोडधोड पडन.”
मी वैतागुन म्हणालो “आयला, याच्याकडे आलो हा मदत करेल म्हणून तर हा धोंडबाच्या पुढचा निघाला. दत्त्या, आगावुपणा करु नकोस उगाच. काय समाजसेवा करायची ती पुढच्या वर्षापासुन करु. या वर्षी रामाची होळी जंगी झाली पाहीजे. बास, बाकी मला माहित नाही काही.”
दत्ता ताक-भाकरीचा काला भुरकत म्हणाला “बरं, तसं त तसं. मला काय! तेवढं धोंडबाचं कसं करायचं तेवढं पघा म्हनजे झालं.”
“तुझ्या डोक्यात काय होतं अप्पा?” शामला उत्सुकता होती.
मी एकदा दत्त्याकडे व एकदा शामकडे पहात म्हणालो “परवा पाराच्या वाडीत गेलो होतो. गोविंद्या रहातो ती वाडी. त्याच्याकडेच गेलो होतो. बाबांचे काम होते काही.”
दत्त्या हातातला घास तसाच ठेवत म्हणाला “सकाळी सकाळी कह्याला त्या इद्र्या मानसाचं नाव काढलं अप्पा. आरं ते पार कामातून गेलेलं कार्टं आहे. ते काय मानसात हाय का? गैबानं ध्यान कुठलं!”
“अरे ऐक तर अगोदर तू. त्याच्या वडीलांनी बैलजोड विकली मागच्या महिन्यात. बाबांकडेच आले होते ‘बँकेत पैसे भरुन द्या’ सांगायला.”
दत्त्याबरोबर आता शामही गोंधळला “अरे पण त्याचा होळीशी काय संबंध अप्पा? आणि असला तरी त्या गोंद्याचा काही विषय जोडू नकोस तू होळीबरोबर. आतरंगी पोरगं आहे ते. मला अजिबात नाही पटत. कधी तावडीत सापडला तर चांगला धडा शिकवणार आहे मी त्याला.”
मी हसत म्हणालो “मीही तेच म्हणतोय शाम. त्याला धडा शिकवून होईल आणि आपली होळीची सोयही होईल. एका दगडात दोन पक्षी मारुयात.”
शामचा गोंधळ आणखी वाढला “म्हणजे काय करायचं म्हणतो आहेस तू?”
“हे बघ, मी परवा गेलो होतो तेंव्हा गोविंदाचा गोठा रिकामाच होता. गाई बाहेर बांधली होती. पण तिची काळजी नको. गोठ्यात साधारण पंधरा फुटांच्या दोन गव्हाणी होत्या. चांगल्या मांडीपेक्षा जाड असतील. किमान सव्वा फुटाची असेल एक एक. दोन्ही गव्हाणी फोडल्या तर रात्रभर होळी पेटेल राममंदिरासमोर. आहेस कुठे?”
शामचा चेहरा खुलला. त्याच्या डोळ्यासमोर राममंदिरापुढली सगळ्यात मोठी होळी पेटली पण दत्ताने त्याला स्वप्नातुन जमीनीवर आणले.
दत्त्या वैतागुन म्हणाला “आराऽरा, अप्पा सक्काळ सक्काळ काय भांग झोकुन आला का काय तू? दावनीला जनावर नसलं म्हणून काय झालं, कुणाची गव्हान आणायची, तेबी व्हळीसाठी हे काय बरं नाय.”
या दत्त्याला सकाळपासुन माणूसकीचा कोणता किडा चावला होता मला समजेना.
मी वैतागुन म्हणालो “दत्त्या कुणाची कड घेतोय तू? अरे तुझ्या विहिरीवरच्या पंपाचा किती मोठा पाईप चोरला होता गोविंद्याने ते विसरलास का इतक्यात? त्यावेळेस तर मारे कुऱ्हाड घेवून धावत होता पाराच्या वाडीला. सहा महिने देखील झाले नाहीत अजुन.”
पाईपचा विषय निघाल्यावर दत्त्या गप्प बसला. या गोविंद्याने त्याचा पाईप नुसता चोरलाच नाही तर रात्रीत विकून त्याचे पैसे देखील केले होते. कारण नसताना या गोविंद्याने आणि त्याच्या वडीलांनी सगळी पाराची वाडी गावाविरुध्द उभी केली होती. गेले दोन वर्ष २६ जानेवारी, १५ ऑगस्टला ही सगळी वाडी गावापासुन फटकुन वाडीतच झेंडा वंदन करत होती. त्याचे वडील नेहमी डेअरीच्या कामात काही ना काही अडचण उभी करायचे. हिशोबात घोळ तर नेहमीचाच असे.
दत्त्याने रिकाम्या ताटात पाणी ओतले आणि ताट हलवत ते पाणी पिऊन तो म्हणाला “हायला, हुंद्या मंग त्याचा कार्येक्रम औंदाच्या व्हळीला. तशीबी या बाप-लेकांच्या बुडाला जरा चरबीच आलीय.”
दत्तााचे बोलणे ऐकून शामचा जीव भांड्यात पडला. त्याला वाटत होते की या होळीच्या भानगडीत दत्ताही धोंडबासारखा हात वर करतो की काय. तरीही शाम चाचरत म्हणाला “पण अप्पा, ते कुटूंब कितीही वाह्यात असले तरी त्यामुळे आपल्याला अधिकार नाही ना मिळत त्यांचे नुकसान करायचा? ते त्यांच्या कर्माची फळे भोगतील”
शाम्याने हा होळीचा तिढा आणखी वाढवला. खरं तर मलाही काही इरेसरी नव्हती होळी मोठी करायची पण शामचेच चालले होते. पण आता मात्र त्याचं सरळ मन जरा कच खायला लागलं होतं. पण त्याला तो गव्हाणींचा मोहही सुटत नव्हता. आता त्याला व्यवस्थीत समजावल्याशिवाय होळीचे प्रकरण मार्गी लागणार नव्हते. दत्त्या काय, कशालाही हो म्हणायला तयार होता. त्याला होळीपेक्षा पोळीत जास्त रस होता.
मी म्हणालो “शाम थोडावेळ असं समज की आपण गोंद्याला ओळखतच नाही. आपण दरवर्षी कुणाच्या ना कुणाच्या शेतातुनच होळीची लाकडे नेतो ना गुपचूप? मग या वेळी त्यांच्या गोठ्यातुन नेऊयात. त्यांना धडा वगैरे काही शिकवायचे नाहीए आपल्याला.”
शाम्याने मान डोलावली. मी म्हणालो “शाम्या, चोरीची लाकडे नसतील तर होळीला मजा नाही आणि दारा दारात जाऊन आंबिल नाही मागीतली ओरडुन तर ती बिज नाही. याला काही चोरी म्हणत नाही की भिक मागने म्हणत नाही. पटतय का?”
हे मात्र दत्त्याला एकदम पटलं. शाम्यालाही एकदम हायसे वाटले. शेवटी काय, माणसाला जे करायचे आहे त्याला थोडा नैतिक आधार मिळाला की तो तयार होतोच.
दत्त्याने विचारले “अप्पा, ते सम्दं ठिक हाये. पन दोन गव्हानी, त्याबी एवढ्या मोठ्या, आनायच्या कशा? तेबी कुणाला कळाल्या बिगर? नाय म्हनलं तरी पाराची वाडी दोन अडीच किलोमिटर तर नक्कीच आसनं गावापासुन.”
दत्त्याचा प्रश्न ऐकुन शाम्या परत चिंतेत पडला पण माझी मात्र कळी खुलली. कारण होळीची मजा ती पेटवण्यात कमी आणि लाकडे चोरण्यात जास्त असे. जेवढा जास्त थरार, तेवढी होळीची मजा जास्त. अर्थात ज्याची लाकडे चोरीला जात त्यालाही हे दोन दिवसांनी कळेच. पण त्यात त्यालाही समाधान असे की गावच्या होळीत आपली लाकडे होती याचे. हे सगळं खरं असलं तरी होळीच्या आधी आठ दिवस बहुतेक मळेकरी सावध असत.
मी दत्त्याला म्हणालो “मगाशी मी गोदीला गोग्रास द्यायला गेलो होतो इन्नीबरोबर. पोवळा तिला जवळ येवू देत नाही म्हणून.”
माझ्या वाक्याचा कसलाही संदर्भ न लागूनही दोघांनी मला मधे टोकले नाही. मी मांडी मोडत म्हणालो “तर प्लॅन असा आहे की होळीच्या आदल्या रात्री उशीरा अंबुनानांच्या गोठ्यात दत्ता आणि मी जाईन. पोवळा तसाही अगदी बारीक दाव्यानेच बांधलेला असतो. नांगराचे शिवाळ-जु तेथेच असते. ते पोवळ्याच्या गळ्यात घालून त्याला घेवून आम्ही गावाबाहेर येवू. दत्ता आणि मी असलो तर पोवळा निमुटपणे येईल. मग सगळे मिळून पाराच्या वाडीला जावू. गोंद्याच्या गोठ्यातल्या दोन्ही गव्हाणींना दोरांनी घट्ट बांधून त्याला पोवळाला जुपू आणि हळू हळू चालवत गावापर्यंत आणू. दोन्ही गव्हाणी रात्रीच रामच्या वखारीत पोहचवू आणि मिलवर चढवू. तोवर दत्ता पोवळ्याला पुन्हा गोठ्यात बांधुन येईल. सकाळपर्यंत छान हवे तसे सरपण तयार होईल. गव्हाणींचा मागमुसही रहाणार नाही. यासाठी दत्त्या घरुनच कासरे घेवून येईल. या सगळ्या भानगडीपासुन धोंडबाला अगदी दुर ठेवायचे. जे काही सांगायचे ते दुसऱ्यादिवशी हरिचंद्रावर गेल्यावर सांगू. तो ज्या काही शिव्या देईल त्या खावू. कशी वाटली कल्पना?”
एक मिनिट दोघेही कधी एकमेकांच्या तर कधी माझ्या तोंडाकडे पहात राहीले. मग दत्त्या एकदम उठुन उभा राहीला आणि बुड झटकत म्हणाला “आयला, अप्प्या साल्या तू तं नाना फडनिसाचा बाप निगाला राव. तुला लई साधा समजत व्हतो मी. मंग ठरलं. औंदा व्हळी गोंद्याच्या गव्हानींचीच करायची.”
आता शाम्यालाही हुरुप आला “अप्पा, ही तर महाराजांची मोहीमच आखलीस तू. पण धोंडबाचा ‘कात्रजचा घाट’ कसा करायचा ते पहा तेवढं म्हणजे झालं. आतल्या गोटातला गनिम केंव्हाही वाईटच. कधी पाणी फिरवेल मोहिमेवर ते सांगता येणार नाही.”
मी हसत म्हणलो “अरे त्याचा कशाला कात्रजचा घाट करायचा? दत्ता रात्री अकरा वाजता मळ्यातुन निघेल. धोंडबाचा नऊ वाजेपर्यंतच अजगर झालेला असतो. मी, शाम आणि राम वखारीतच थांबतो वेळ काढत. बारापर्यंत जरी पाराच्या वाडीला पोहचलो तरी पहिली गव्हाण अडीच वाजेपर्यंत मिलवर चढेल. पहाटे साडेतिनपर्यंत राममंदिराच्या ओवरीत सरपन रचुन होईल आपले. धोंडबाला काय कळणारे?”
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाहेर पडताना मी आईला सांगितले “काकु आज डाळ-ढोकळी करणार आहेत गं”
याचा अर्थ मी आज शामकडे जेऊन बहुतेक रामकडेच झोपणार हे आईने ओळखले. तिने काही डब्यात घालुन द्यायच्या आत मी बाहेरही पडलो. आज दिवसभर कॉलेजला असताना सुध्दा आमच्या डोक्यात फक्त होळी आणि गव्हाणीच होत्या. मधल्या सुट्टीत आम्ही या सगळ्या प्रकरणात शकीललाही ओढले. आम्हाला वाटले त्याची खुप समजुत काढावी लागेल पण उलट त्याला ही कल्पना फारच आवडली. दोन दिवस थांबायचा आमचा विचार होता पण शकीलनेच “आजही करते है यार. दोन दिवसात काय फाटे फुटतील कुणाला माहित.” म्हणत आम्हाला बळेच घोड्यावर बसवलं होतं. दत्त्याचे मधेच सुरु होते “आपण दांडीच मारायची का दुपारच्याला?” त्याला अगदीच रहावत नव्हते. जे काही करायचे ते रात्री अकरा नंतर करायचे होते पण दत्त्या दुपारीच दांडी मारायच्या तयारीत होता. संध्याकाळी काकुंना ‘वरणफळे खावी वाटतायेत’ एवढंच सांगीतले. अम्मीकडे एक चक्कर मारली आणि शामच्या ओट्यावर येवून बसलो. रामही आला. ठोब्बाला बोलवायची गरज नव्हती. त्याला दुपारीच सांगीतले होते की काकू डाळढोकळी करणार आहेत. त्यामुळे तोही हजर होता. दत्त्याही सहा वाजेपर्यंत गुरांना चारापाणी करुन, दुध काढुन हजर झाला. त्याने येतानाच मणी आणि कासरा आणला होता. (मणी: लाकडी पुलीसारखी छोटी वस्तु) म्हणजे तो आता परत मळ्यात जाणार नव्हता. थोड्यावेळाने शकीलही दुकानात चक्कर मारुन ओट्यावर येवून पोहचला. सगळेच उत्सुक होतो. कधी रात्र होतेय असं झालं होतं सगळ्यांना. दत्त्या तेवढ्यात अंबुनानांकडे चक्कर मारुन पोवळाला गोंजारुन आला होता. आमचा गोंधळ ऐकुन काकूंनी बाहेर येऊन विचारले “आज सगळेच जमलेत. काय विचार आहे अप्पा? आणि सगळेच थांबणारेत का जेवायला? मला डाळ वाढवायला?”
“कसला इचार न् काय काकू! ढोकळा आसन तं मी हाय जेवायला. वरन घ्या आन त्यात चपाती चुरा असला काय कुटानाच नाय पघा ढोकळ्यात.” असं म्हणत दत्त्या उगाचच मोठ्याने हसला. त्याला आज उत्साहाचे जणू भरतेच आले होते.
त्याच्या डोक्यात टपली मारत इन्नी म्हणाली “चपाती चुरायचा त्रास नको म्हणून वरणफळे हवीत होय रे तुला? आगावूच्चे”
दत्ता सावरुन घेत म्हणाला “तसं नाय गं इन्ने. आवडतो मला. आमच्या म्हतारीला कर म्हणलं तर डाळीत गुळ घालायच्या नावानी वराडती.”
तरी इन्नी आत जाता जाता म्हणालीच “अप्पा, तुमचं काय चाललय ते समजतय बरका मला.”
आता हिला काय समजणार आहे आमचं काय चाललं आहे ते पण उगाच आपला खडा मारुन पहायचा. पण तिला शंका आली होती हे नक्की. इतक्यात नेहमीचे पेंडीचे पोते घेऊन धोंडबा आला.
सायकल ओट्याला टेकवत तो म्हणाला “आज पंचायत भरवल्याली दिसतीय शामरावांनी. काय शकीलमिया, काय इषेश?”
शाम घाई घाईने म्हणाला “काही नाही रे. अप्पा म्हणाला की वरणफळे खायचीत. मग आईने सगळ्यांनाच थांबायला सांगीतले जेवायला.” धोंडबाला आजच्या प्लॅनची कुणकूण लागली असावी असा शामला उगााचच संशय होता. त्यामुळे त्याची कारण नसताना धोंडबापुढे तंतरत होती. धोंडबाने सायकलच्या मधे असलेले पोते काढुन कॅरेजवर टाकले. दत्त्याने क्लिप ओढुन धरत त्याला मदत केली. दोन्ही बाजुंनी पोते रस्सीने घट्ट आवळून बांधता बांधता धोंडबाचे ओट्यावरील दोरखंड आणि मणी याकडे लक्ष गेले. त्याने दत्त्याला विचारले “काय रं दत्ता, हे कासरा आन मनी कह्याला आनले गावात?”
दत्ता गोंधळून म्हणाला “अरे अंबुनानाला फास वढायचा व्हता बाभळीचा. दोन दिवस मागत व्हता. आज आठवनीनं आनला”
पोते आवळून झाल्यावर सायकल मेन स्टँडवर लावत धोंडबा म्हणाला “आयला, आंबुनाना काय आज बैलं राखीतो का काय? त्याला मनी-कासरा ठेवायला जमना व्हय? बिन वस्ताऱ्याचा न्हावी हाय का काय हा आंबुनाना”
आम्ही सगळेच धोंडबाने फार मोठा विनोद केल्या सारखे हसलो. आम्हाला असं झालं होतं की कधी एकदा हा येथून टळतोय. पण त्याने सायकल मेन स्टँडवर लावल्यावर मात्र शाम्याची चुळबुळ सुरु झाली. चोराच्या मनात चांदणे असावे तसे त्याचे एकुनच वागणे गोंधळल्यासारखे व्हायला लागले. मग बराच वेळ आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अर्थात धोंडबामुळे कुणाचेही लक्ष गप्पांमधे लागत नव्हते. त्यालाही काहीतरी गडबड असल्याचे जाणवले पण काय ते त्याच्याही लक्षात आले नाही. आता चांगलेच अंधारुन आले होते. इन्नी ताटे घेतल्याचे सांगायला बाहेर आली. “घ्या जेवून तुमी” म्हणत धोंडबाही निघाला. इन्नीने त्याला बळेच थांबवत म्हटले “धोंडीदादा तुही जेवूनच जा की.”
धोंडबा हसुन म्हणाला “हुंद्या तुमचं निवांत. आपल्याला तसलं गुळमाट जेवान नाय पटत. काय चपात्या शिजवुन खात्यात का कव्हा डाळीत. दत्त्याला वाढ डावभर जास्त.” धोंडबा मनापासुन हसला आणि त्याने सायकलवर टांग मारली. आम्ही मोकळा श्वास घेतला आणि जेवायला उठलो.
रात्री जेवणे वगैरे उरकुन आम्ही ओट्यावर बसलो होतो. आठ वाजत आले होते. अजुनही सगळे ओट्यावर आहेत हे पाहुन इन्नीच्या आणि चिंतुकाकांच्याही आत-बाहेर चकरा सुरु झाल्या. आमच्या गप्पांमध्ये नेहमीचा मोकळेपणा, मोठमोठ्याने हसने नव्हते त्यामुळे इन्नीला जरा जास्तच संशय यायला लागला. मग शकीलने खुणावले तसे आम्ही उठलो आणि राम मंदिराच्या ओट्यावर येऊन बसलो. रामही घरी सांगुन आला की वखारीतच थांबतो आहे म्हणुन. सगळ्या विषयांवर गप्पा झाल्या तरीही घड्याळाचा काटा फक्त दहा वाजल्याचे दाखवत होता. रोज झरझर जाणारा वेळ आज सरता सरत नव्हता. गावात सगळीकडे निजानिज झाली होती पण शकीलच्या म्हणन्यानुसार अकराची वेळ ठरवली तर अकरा वाजताच मोहीम सुरु करायची होती. ठोब्बासारखा थंड माणुसही आज टक्क डोळ्यांनी जागा होता. एक तर गव्हाणी आणायच्या याचा उत्साह तर होताच पण त्या गोविंद्याला परस्पर धडा शिकवला जाणार होता याचा सगळ्यांनाच आनंद होत होता. नाहीतर ठोब्बाने कोणत्याही परिस्थितीत आम्हाला साथ दिली नसती. दत्त्या सारखा चवड्यावर बसत होता तर कधी मंदिराच्या आवारात चकरा मारत होता. घड्याळात सव्वा अकरा वाजले आणि आम्ही “थांब थांब” म्हणत असताना दत्त्याने सगळ्यांना वेशीबाहेर बाजार ओट्यांजवळ थांबायला सांगीतले आणि मला ओढत अंबुनानांच्या घराकडे निघाला. दिवसभर ज्या गोष्टीच्या नुसत्या कल्पनेने उत्साहाचे फवारे उडत होते, प्रत्यक्षात ती गोष्ट करायची वेळ आल्यावर मात्र माझी तंतरली. दत्त्याने माझे मनगट धरले होते आणि मी फरपटल्यासारखा त्याच्या मागे ओढला जात होतो. मला मागच्या मागे पळून जावे वाटत होते. दत्त्याला माझा विरोध जाणवला असावा.
मागे वळून तो म्हणाला “आरं काय हे अप्पा! आयत्या टायमाला शेपुट घालनार पघ तू. चाल लवकर. तु नुस्ता सोबत ऱ्हा. बाकी समदं मी पघतो”
तरीही “लक्ष ठेवायच्या” नावाखाली मी अंबुनानांच्या अंगणातच थांबलो. दत्ता हळूवार पावलांनी गोठ्याकडे वळला. बऱ्यापैकी थंडी असुन मला घाम फुटला होता. अंगणातल्या वडाच्या झाडाचे एखादे पान पडले तरी मला दचकल्यासारखे होत होते. पाचच मिनिटात दत्त्या गोठ्याकडुन येताना दिसला. त्याच्या खांद्यावर जु आणि कासरा दिसत होता. एका हातात त्याने पोवळाची वेसण धरली होती आणि पोवळाही निमुटपणे त्याच्या मागे येत होता. माझा जीव भांड्यात पडला. दत्त्या जवळ आल्यावर मी त्याच्या हातातुन पोवळाची वेसण घेतली व दोघेही बाजारओट्यांकडे निघालो. वेशीतुन बाहेर आलो तर सगळे पिंपळाच्या झाडाखाली चिंतातुर होऊन उभे होते. शाम्याला चिंता होती की रात्रीच्या अंधारात पोवळा आमच्या सोबत येईल की नाही याची पण आम्हाला पाहील्यावर सगळ्यांनी ‘मुक’ जल्लोष केला.
दत्त्या म्हणाला “गोंधळ करु नका. पवळ्याला वाडीत गेल्यावरच कासरा लावू. आता निघा चटशीरी. गव्हानी एकदाच्या वखारीत पोचल्या आणि पवळा त्याच्या दावनीला परत गुतवला का आपन मोकळं.”
त्याचे बोलणे ऐकुन परत सगळे गंभीर झाले. आम्ही सगळेच ओढ्यावरचा दगडी पुल ओलांडुन पाराच्या वाडीच्या रस्त्याला लागलो. रात्रीचे पावनेबारा वाजले असावेत. सगळेच न बोलता चालत होते. पुल ओलांडला आणि गावाचे दिवे मागे पडले. आता चंद्रही खुप वर आला होता. निरव शांतता होती. दोन दिवसांवर पौर्णीमा असल्याने सुरेख चांदणे पडले होते. सगळेच निमुटपणे, न बोलता चालत होते. मी पोवळाची वेसण सोडली होती तरीही तो सुध्दा निमुटपणे माझ्या सोबत चालत होता. नुकत्याच केलेल्या डांबरी रस्त्यावर त्याच्या खुरांचे नाल आणि आमच्या चपलांचे आवाज येत होते. इतक्यात ठोब्बा पळत पळत पलीकडुन आला आणि माझ्या सोबत चालायला लागला.
मी विचारले “काय झाले रे?”
पण त्याच्या ऐवजी दत्त्याच रस्त्याच्या पलीकडे खुणावत, हसत मला म्हणाला “मसनवट!”
भीती वाटत नसुनही मला उगाचच शहारल्यासारखे झाले. अजुनही कुणी गप्पा मारायच्या मुडमधे नव्हते. जो तो निमुट चालत होता. पोवळाही मान वर खाली करत, मधेच कान, शेपटी झटकत शांतपणे आमच्याबरोबर चालत होता. डोक्यावर पगड्या आणि कमरेला तलवारी नव्हत्या इतकच नाहीतर आमची टोळी लाल महालात घुसायला निघालेल्या मावळ्यांच्या टोळीसारखी दिसत होती. स्मशान मागे पडले आणि थोड्याच वेळात पाराची वाडी दिसायला लागली. त्यातल्या त्यात एक गोष्ट आमच्यासाठी चांगली होती. वाडीच्या सुरवातीलाच गोविंद्याचे घर होते. घराच्या मागील बाजुला त्याचे आवाढव्य हिरवेगार शेत पसरले होते. घराच्या पलीकडील बाजुच्या पडवीत त्याचा गोठा होता. सध्या फक्त एकच गाई असल्याची माझी माहिती होती. आम्ही दबक्या पावलांनी गोविंद्याच्या घराजवळ पोहचलो. एखादे कुत्रे वगैरे असण्याची शक्यता होती. कितीही तिखट कुत्रे असले तरी दत्त्या त्याला सहज हाताळीत असे त्यामुळे दत्त्या सगळ्यांच्या पुढे होता. ऐनवेळी त्याला काय सुचले कुणास ठाऊक. त्याने पोवळाला जु चढवले, दोन्ही बाजुंनी शिवळा घातल्या आणि त्याला बाजुच्याच बाभळीला बांधले. गोविंद्याचे घर समोरच दिसत होते. त्याचे म्हणने होते की पोवळाला गोठ्याजवळ न्यायला नको. आपण एक एक गव्हान ओढत येथवर आणू आणि मग पोवळाला जुपू. घराच्या मागच्या बाजुला असलेल्या वळहीतुन दत्त्याने एक कडब्याची पेंढी ओढली आणि तिची गाठ मोकळी करुन पोवळासमोर टाकली. आता त्याने नाही खाल्ली तरी तो शांत नक्कीच रहाणार होता. ठोब्बा म्हणत होता की मी पोवळाशेजारीच थांबतो पण कुजबुजत्या आवाजात त्याला शिव्या घालुन दत्त्याने मागे यायला लावले. शकील गोठ्यात उभा राहुन गव्हाणींचे निरिक्षण करत होता. या अशा वेळी देखील रामचे डोके अगदी वखारीवाल्यासारखे चालत होते.
गव्हाणींकडे पाहुन तो कुजबुजला. “लाकुड घट्ट आहे रे शकील. गाठही नाहीए कुठे. फळ्या चांगल्या पडतील यांच्या.”
शकीलही त्याच्या कानात कुजबुजला “गधे, होळी पेटवायची आहे याची. कोयला कितना मिलेगा इसके बारेमे सोच. फळ्यांचे काय घेवून बसलास”
इतक्यात मी आणि दत्त्या गोठ्यात शिरलो. दत्त्याने अगोदर गोठा बारकाईने पाहीला. कोपऱ्यातच बैलगाडीला घालायच्या वंगणाची बाबूंची नळी होती. बाजुला खताच्या रिकाम्या गोणी होत्या. दत्त्याने वंगण घेवून दोन्ही गव्हाणींना चोळले. “हे कशाला?” विचारले तर म्हणाला “राहुंदे अप्पा. सरपान केलं गव्हाानीचं तरी जो तो आपली गव्हान वळखीतो बराबर. गव्हानच काय, गव्हानीचा धलपा बी वळखाया येतो.”
मी पटल्यासारखी मान डोलावली. दत्त्या आता अंगात आल्यासारखा लयीत काम करत होता. अशा वेळी ‘हाच तो भोळा दत्ता’ हे सांगुनही कुणाला खरे वाटले नसते. कदाचीत त्याच्या या भोळेपणामुळेच त्याच्या अंगात येवढे धाडस येत असावे. त्याने आम्हाला खुण करुन गव्हाण उचलायला लावली आणि खताच्या गोण्यांच्या घड्या दोन्ही गव्हाणींच्या टोकाच्या खाली सरकवल्या. “आता हे कशासाठी?” हे मात्र आम्ही विचारायच्या भानगडीत पडलो नाही. त्याने बाजुला ठेवलेला मोठा कासरा घेतला आणि त्याचे मजबुत फास दोन्ही गव्हाणींच्या टोकाला घातले. त्याचे आजोबा काही वर्ष गोदीत कामाला होते. त्यांच्याकडे खलाशांच्या अनेक गाठींची माहिती होती. ती दत्याने कधीच आत्मसात केली होती. ते आता कामाला आले होते. ज्या सफाईने दत्या मुसके विणायचा, झाडुचा दांडा विणायचा त्याच सफाईने त्याने दोन्ही गव्हाणी अगदी घट्ट बांधल्या. हात झटकत त्याने आमच्याकडे सुचक नजरेने पाहीले. आम्हीही एकदा एकमेकांकडे पाहीले आणि होकारार्थी माना डोलावल्या. दुवा मागायला समोर धरावेत तसे दोन्ही हात समोर धरुन दत्ताने त्यावर हलकेच थुंकल्या सारखे केले. पण तो खाली वाकायच्या आता शकीलने त्याचे तोंड गच्च दाबुन ठेवले. शकीलचे वागणे पाहुन मी, शाम्या, ठोब्बा सगळेच बावरलो. दत्त्या “आयला, बोंब झाली असती आता घेन्यान देन्याची. धरा समदे” म्हणत परत वाकला. काय झाले ते माझ्या लगेच लक्षात आले. सवयीप्रमाणे दत्ता “जे बजरंग बली” ओरडायला निघाला होता. ‘होता शकील म्हणुन वाचला दत्त्या बैल’ असं काहीसं पुटपुटत शाम्यानेही हात लावले. मी हसु दाबत गव्हाणीच्या दुसऱ्या टोकाला जोर लावला. आता शकील आणि दत्ता गव्हाण ओढत होते आणि आम्ही बाकीचे मागुन रेटा देत होतो. दहा मिनिटांच्या मेहनतीनंतर गव्हाण सरकत सरकत पोवळाला बांधले होते त्या बाभळीपर्यंत आली. या दहा मिनिटांच्या कसरतीने आमच्या कपाळावर घाम साठला होता. ठोब्बा गव्हाणीवरच मांडी घालुन टेकला.
ते पाहुन दत्ताने घाई केली. “हय इठुबा, टेकला कह्याला? हालव बुड चटशीरी. अजुन एक गव्हान बाकी हाय. आता अर्ध गिळलय ते मदीच नाय सोडता यायचं. त्या गोंद्याच्या बापाला कळालं तर भाजुन खाईन ऊद्या मला. हाल”
मग मात्र आम्ही थकवा विसरुन दुसऱ्या गव्हाणीच्या मागे लागलो. पुन्हा दत्ताने दुसऱ्या कासऱ्याने गव्हाण घट्ट बांधली आणि पहिल्या गव्हाणीसारखेच तिलाही हळू हळू ओढत दहा मिनिटात पहिलीशेजारी आणुन ठेवली. आम्ही कपाळावरचा, मानेवरचा घाम पुसत होतो तोवर त्याने दोन्ही कासरे व्यवस्थित पोवळाच्या गळ्यातला जुवाला बांधले. शिवळा घट्ट केल्या आणि त्याचा कासरा सोडला. त्याला थोडे दटावताच ते शहाणे जनावर चार पावले पुढे सरकले. तेवढ्यात दत्ताने वेसण धरुन त्याला थांबवले. पोवळाच्या चार पावलांनी दोन्ही गव्हाणी अगदी लिलया हलल्या होत्या आणि एकमेकींशेजारी आल्या होत्या. दत्त्याने हातातल्या लाकडी मण्यात दोर ओवला आणि दोन्ही लाकडांना एकमेकांच्या समांतर बांधुन टाकले. आता सगळे काम त्याच्या मनासारखे झाले होते. अशा कामात आम्ही फक्त सांगकामे असायचो. आम्ही दत्त्याकडे पाहुन प्रश्नार्थक माना हलवल्यावर तो म्हणाला “आरं झालं काम. आता पावलं उचला आणि निघा इथुन. आता पार रामाच्या देवळातच थांबायचं. चला.”
आम्ही एकदाचे ‘हुश्श’ केलं आणि गुमान दत्याच्या मागोमाग चालायला सुरवात केली. शाम, आणि मी गव्हाणींच्या एका बाजुने चालत होतो तर राम, ठोब्बा आणि शकील दुसऱ्या बाजुने चालत होते. पोवळाची वेसन धरुन दत्ता सगळ्यांच्या पुढे चालत होता. आमची चाल अगदीच मंद होती. मी अधुन मधुन पोवळाच्या पुठ्यावर थोपटत होतो. रात्रीचे दोन वाजत आले असावेत. आमच्या आयुष्यातली ही पहिलीच वेळ असेल की सगळे एकत्र असुन कुणीच तिन तास एकमेकांशी बोलले नसेल. आडवी वाट संपुन आम्ही काटकोनात गावाच्या रस्त्याला वळालो तसे मागची पारवाडी नजरेआड झाली आणि समोर दुरवर गावातले दिवे दिसायला लागले. मधेच खुप अंतरावर सखल भागातला स्मशानातला दिवाही दिसत होता. वाडी नजरेआड झाली तरी आम्ही सावधगीरी म्हणुन काहीही बोलत नव्हतो. चाल अजुनही गोगलगाईचीच होती. त्यात दत्त्याने बांधलेल्या गोणींमुळे बराचसा आवाज कमी झाला असला तरी आता डांबरी रस्ता लागल्याने दोन्ही तुळयांचा रस्त्यावर बऱ्यापैकी मोठा आवाज येत होता. पंधरा-विस मिनिटांमधे आम्ही स्मशानाच्या अगदी जवळ पोहचलो होतो. आता आम्ही गाव आणि पारवाडी यांच्या बरोबर मधे होतो. डोक्यावरचा चंद्र आता पश्चीमेला झुकायला सुरवात झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला शेते असल्याने पहाटेची थंडी चांगलीच जाणवत होती. चंद्रप्रकाशात बाजरीची चंदेरी कणसे चमकत होती. चालता चालता दत्या क्षणभर थांबला. जरा अंदाज घेत म्हणाला “अप्पा, गड्या वाडी पार मागं राह्यली. आता काय भ्याव नाय. जरा दम खायचा का? कसं म्हणतो शकील?”
शकीलनेही मान हलवली. तसे आम्ही नुसतेच चालत होतो. काम तर पोवळा करत होता. पण गेले तिन साडेतिन तास मनावर जे दडपण होते त्यामुळे सगळ्यांनाच थकवा आल्यासारखे वाटत होते. दहा पंधरा मिनिटे थांबण्याने आता काही फरक पडणार नव्हता. दत्याने पोवळाला रस्त्याच्या मधेच उभे केले आणि वेसन सोडुन तो मागे आला. शकील आणि ठोब्बा बाजुच्या दगडांवर टेकले. मी आणि शाम गव्हाणी न्याहाळीत होतो. “याचे तुकडे करायला कोणत्या कामगाराला सांगायचे” याचा विचार करत रामही तेथेच उभा होता. कंटाळा आल्यावर आम्ही डांबरी रस्त्यावरच मांडी घालुन निवात बसलो. दत्त्या गव्हाणींवर बसला होता. पोवळा अधुन मधुन शेपटीने पाठीवरच्या माशा उडवत निवांत उभा होता. काही वेळ बसल्यावर शकीलने घड्याळाकडे पहात घाई केली. ठोब्बाही बुड झटकुन उभा राहीला. पारवाडी आता खुप मागे राहीली होती. समोर गाव होते. या मधल्यावेळात सगळ्यांच्याच मनावरचे दडपन दुर झाले होते. वृत्ती फुलल्या होत्या. रामची वखार आता काही मिनिटांच्या अंतरावर होती. आमची मोहीम जवळ जवळ यशस्वी झाली होती. आता गावात जावून गव्हाणी मिलवर चढवल्या की परवाच्या होळीची चिंता मिटणार होती. दत्त्याने उत्साहाच्या भरात दोन्ही गव्हाणींना बांधलेली पोती सोडवली आणि दुर केली. आता लाकडांचा कितीही आवाज आला तरी चिंता नव्हती. खरे तर आवाज यावा म्हणुनच त्याने पोती काढली होती. शकील सँडल घालत होता. एव्हाना मुळ दत्त्या जागा झाला होता. त्याने तोंडात दोन बोटे घालुन लांबलचक शिळ घातली आणि “जे शिरीराऽऽम” म्हणत जोरात आरोळी ठोकली. त्याचा उत्साह पाहुन शाम्याने त्याच्या पेक्षा जोरात “जऽऽय श्रीराऽऽम” म्हणत आरोळी ठोकली. त्या निरव शांततेत त्या आरोळ्या कितीतरी मोठ्या आणि कर्कश्श वाटल्या. मी अजुन रस्त्यावरच बसलो होतो. पण पाठीमागुन या दोघांच्या आरोळ्या अचानक ऐकुन मला एकदम धडकीच भरल्यासारखी झाली. ठोब्बाही चांगलाच दचकला. सँडलचे बक्कल लावणाऱ्या शकीललाही प्रथम काही कळलेच नाही कोण आणि का ओरडले ते. तोही बावरला. दत्त्याच्या आणि शामच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य दिसत होते. आम्ही त्या आरोळ्यातुन सावरतच होतो तोवर गव्हाणीवर उभा असलेला दत्त्या विजेचा शॉक बसावा तसा हिसडा मारल्या सारखा हवेतच आडवा झाला आणि दाणकन खालच्या डांबरी रस्त्यावर आपटला. त्याला प्रथम काही समजलेच नाही काय झाले ते. त्याचा धक्का लागुन शेजारी उभा असलेला शाम्याही रस्त्यावर वेडावाकडा धडपडला. समोरच स्मशान होते त्यामुळे ठोब्बाची तर एकदम पाचावर धारणच बसली. आणि माझ्या चटकन लक्षात आले काय झालं ते. दत्ता आणि शामच्या आरोळ्यांनी आणि शिट्यानी जसे आम्ही दचकलो होतो तसेच पोवळाही दचकला होता. इतक्यावेळ अगदी शांतपणे आम्हाला सोबत करणारं ते शहाणं जनावर जीव खाऊन चौखुर उधळलं होतं. दत्या अजुन सावरला नव्हता. त्याला बहुतेक कमरेला मार बसला असावा. मी आणि शाम्या “पोवळा हो, पोवळा” म्हणत हाकारत होतं. पण तो उधळलेला बैल आमच्या डोळ्यांसमोर दोन्ही जाडजुड गव्हाणी अगदी खेळणी ओढावीत तशी ओढीत काही अंतर रस्त्यावरुन सरळ धावला आणि अचानक उजवीकडे वळून एकदम शेतात घुसला. काय होतय ते शकीलच्याही ध्यानात आले. पण त्याला फक्त शेतात आडव्या तिडव्या उडत जाणाऱ्या गव्हाणीच दिसल्या फक्त. मी आणि शाम तिकडे धावलो व रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधावर चढुन शेतात पहायला लागलो. पण सगळ्या रानात डोक्याच्या वर वाढलेली बाजरी होती. एखाद्या झाडावर चढल्याशिवाय आता काही दिसने अशक्य होते. शाम्या तशातही रानात घुसायच्या तयारीत होता पण मी त्याला खांद्याला धरुन मागे ओढले. आम्ही हताश होऊन मागे आलो. दत्त्या अजुनही मांडी घालुन रस्त्यावर बसला होता. सुदैवाने त्याची कंबर ठिक होती पण एकाच पायावर आपटल्याने उजवा गुडघा चांगलाच दुखावला होता. त्याची चौकशी करायची सोडुन शाम्याने त्याच्या पाठीत जोरात गुद्दा घालुन स्वतःचा राग बाहेर काढला. शकीलने त्याला बाजुला घेतले. ठोब्बा अजुनही बावरलेलाच होता तर राम अवाक होता.
शकीलने दत्त्याला हात दिला आणि म्हटले “उठ खवीस, चल, दो कदम चल के दिखा”
दत्त्या कसाबसा उठला आणि पहिल्याच पावलाला कळवळून खाली बसला. रामने त्याची पँट वर ओढली तर त्याचा गुडघा चांगलाच सुजला होता. मला काहीच सुचत नव्हते. मी दत्याला विचारले “जास्त दुखतय कारे दत्ता?”
दत्त्या कळवळत, तोंड वाकडे तिकडे करत म्हणाला “ते मरुंदे अप्पा. माझ चुकलच गड्या. थोड्यासाठी मी घोळ घातला उगी.”
मी त्याची पँट व्यवस्थित करत म्हणालो “असु दे रे. तु निट बस अगोदर. पोवळा कुठे जात नाही. शोधू आपण त्याला”
दत्ता ओशाळुन म्हणाला “आरं अप्पा, उधाळलेला बैल असा घावत असतो का कुठं. आठाठ मानसांना बैल आकळत नाय अशा टायमला. आता पवळा घावला तर सकाळच्यालाच घावन. सोड त्याचा नाद”
त्याचे बोलणे ऐकुन सगळेच हताश झाले. शाम्याच्या डोळ्यासमोर त्याच्या रामरायाची पेटती होळी विझली. ठोब्बालाही वाईट वाटत होते. तो दत्ताच्या पायावर हात फिरवत निमुट बसुन होता.
मी शकीलकडे पहात विचारले “आता काय करायचे रे शकील?”
शकील म्हणाला “होळी नाही झाली यावेळेस तर काही कयामत नाही येणार अप्पा. पण हा पोवळा जर सापडला नाही तर सकाळी अंबुनानांची काय अवस्था होईल सोच जरा.”
हा मुद्दाच माझ्या लक्षात आला नव्हता इतका वेळ. मला अंबुनानांचा चेहरा दिसायला लागला. मुलांना घास भरवायच्या अगोदर पोवळाला घास भरवणारे अंबुनाना काही माझ्या डोळ्यांसमोरुन हलेनात. दत्ता चालु शकत नव्हता. रात्री पोवळाला शोधने शक्य नव्हते आणि सकाळी शोधने म्हणजे हाताने आत्मनाश ओढवून घेण्यासारखे होते. आम्ही सगळे चांगल्याच खोड्यात अडकलो होतो. अर्ध्या तासापुर्वी आम्ही किती आनंदी होतो. आणि क्षणात कुठे येवून पडलो होतो. या सगळ्यातुन सावरायला आम्हाला काही मिनिटे लागली. जरा वेळाने आम्ही दत्ताला खांद्यांचा आधार देत उठवला. शाम्या, मी, ठोब्बा आणि सगळेच गावाकडे चालु लागलो. कुणाचीच डोकी काम करत नव्हती. दत्ताला माझ्या सोबतच वखारीवर झोपवायचे ठरवले होते. सकाळी शकील त्याला मळ्यात सोडणार होता. पहाट व्हायला आली होती. दत्त्याच्या घरची पहाटेची सगळी कामे आज तशीच रहाणार होती. त्यामुळे तासभरच विश्रांती घेऊन शकील दत्ताला मळ्यात सोडवणार होता. येताना धोंडबाला सगळी कल्पना देणार होता. त्यामुळे शिव्या दिल्या तरी निदान आज दत्त्याच्या घरची दुध काढने वगैरे कामे धोंडबाने केली असती. आमच्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता. आता जे होईल त्याला सामोरे जायलाच हवे होते. 
मी सकाळी जरा उशीराच उठलो आणि गावात न जाता सरळ कॉलेजलाच गेलो. गावात नक्की काय झालं असेल याची खुप उत्सुकता होती मला पण ते पहायला तिकडे जायची हिम्मत मात्र नव्हती. दत्त्या मात्र आज येणार नव्हता कॉलेजला हे नक्की होते. त्यालाही भेटायला जायला पाहीजे होते. दुपारनंतर दांडी माराची इच्छा होती पण धाडस होत नव्हते. हळु हळु शाम, ठोब्बा, शकील, राम सगळे आले. प्रत्येकजन वेगवेगळाच आला होता. कॉलेजमधल्या मुलांनाही आश्चर्य वाटत होते हे सगळे नग आज वेगवेगळे कसे उगवले याचे. प्रार्थना झाल्यावर पहिला तास बंक करुन आम्ही सगळेच गार्डनमधे जावून बसलो. मी शाम्याला खुप उत्सुकतेने विचारले “काय शाम, अंबुनानाच्या घरची काय हकिकत आहे रे?”
शाम म्हणाला “अरे सकाळीच त्यांना समजले की पोवळा गोठ्यात नाही. गेला असेल कुठे म्हणुन सगळा गाव शोधला त्यांनी. पण कुठेच नाही म्हटल्यावर त्यांचा समज झाला की पोवळा चोरीला गेलाय म्हणून. त्यांनी चक्क अंगणात बसुन हंबरडाच फोडला. त्यानंतरचे काहीच माहीत नाही मला कारण मी सरळ इकडेच आलो. सकाळी नाष्टाही केला नाही मी. इन्नीला काहीतरी संशय आलाय. हे ऐकल्यावर आधीच ताळ्यावर नसलेला आमचा जीव पार अंतराळी गेल्या सारखा झाला. हे वाईट स्वप्न आहे आणि थोड्या वेळाने ते संपनार आहे असं वाटत होते. आमचे कुणाचेच वर्गात लक्ष लागत नव्हते. शेवटी दुपारी कॉलेजला दांडी मारुन आम्ही मळ्याचा रस्ता धरला. सकाळी शकीलने दत्त्याला सोडवताना धोंडबाला सगळे सांगीतले होते. धोंडबाने त्याला मळ्यातच रस्त्यावर उभं राहुन यथेच्छ शिव्या घातल्या होत्या.
“एका पायानं काय भागतय तुझं, थांब जरा, दुसराही निखळून ठिवतो.” म्हणत दत्त्यावर तर तो पहार घेवून धावला होता. त्यात हे प्रकरण दुसरं काही असते तर हरकत नव्हती पण आम्ही होळीसाठी लाकडे चोरत होतो, ते ही दुसऱ्याच्या गोठ्यातली गव्हाण हे त्याला समजले होते. आता त्याने जीव जरी घेतला तरी आम्ही हुं का चूं करणार नव्हतो. सगळे दत्ताच्या ओट्यावर बसलो होतो. दत्ताही गोधडी टाकुन पडला होता. त्याच्या पायावर हळदीचा लेप लावलेला दिसत होता. ओट्यावर धोंडबा पिसाळलेल्या वाघासारखा आमच्या अवती भोवती फेऱ्या मारत होता आणि आम्ही त्या वाघाच्या पिंजऱ्यात अडकल्यासारखे जीव मुठीत धरुन बसलो होतो. फिरता फिरता धोंडबा कधी एखादी लाथ घालेल याचा भरवसाच नव्हता.
शेवटी शाम म्हणाला “हे बघ धोंडबा, आता चिडुन काही होणार नाही. जे झाले तो सगळा मुर्खपणा होता आमचा पण आता यावर मार्ग काढायला नको का? मी तर म्हणतो आपण आता गावात जाऊ आणि अंबुनानांना काय झाले ते सर्व सांगुयात. निदान पोवळा चोरीला गेला नाही हे त्यांच्या लक्षात येईल आणि योग्य ठिकाणी त्यांना शोध घेता येईल.”
धोंडबा एकदम उसळला “बामना तुझ्या रामाची पुजा नाय बांदायची. तो आंबुनाना तुमच्या डोक्यात पयलं लॉढनं घालीन आनी मग पवळ्याला शोदायला बाहेर पडन. तु हाय कुटं”
मी करवादुन म्हणालो “अरे मग धोंडबा करायचे काय पुढे? घातले डोक्यात लोढणे तर घालुदे. पण त्यांच्या जीवाचा घोर तर जाईल.”
धोंडबा जरा शांत होत म्हणाला “अप्पा काय टकुऱ्यावर पडलाय का तु? माझं ऐका. उद्या व्हळी हाय. उद्या दुपारपर्यंत वाट पघू. ते आंबुनानाचं जनावर हाय. कुठंतरी अडाकलं असन गव्हानीमुळं. ते घरं गाठल्याबिगार ऱ्हात नाय हे सोळा आनं खरं हाय. जर नाईच फिरला पवळा माघारी तर मंग व्हळी हुंद्या. समद्यांचे निवद झालं की राती सांगु त्याला काय खेळ करुन ठिवलाय तुमी ते. मंग काय व्हायची ती धुळवड हुंद्या एकदाची.”
आम्हाला धोंडबाचे म्हणने पटले. शकीलही जरा निवांत झाला. पण एवढ्या गंभीर प्रसंगातही शाम्याचे डोके भलतीकडेच चालले होते. तो म्हणाला “आपला हरिश्चंद्र वाध्यात येतोय तर. म्हणजे अंबुनानांच्या गोंधळावर आपले ठरणार धुलीवंदनाला गड चढायचा का नाही ते.”
“अरं शाम्या पयली अडाकल्याली मान सोडवायचं पघा जरा. तो हरिश्चंद्र बसलाय डोंगरावर. त्याचं तुमच्या वाचुन आनं तुमचं त्याच्या वाचुन काय अडत नाय. तुझ्या अशा वागन्यानं त्या चिंतुकाकाच्या छातीत कळ येईन एखांद्या दिवशी.”
शाम खजील होवून खाली बघत बसुन राहीला. मग उगाचच काहीतरी टाईमपास करत आम्ही मळ्यातच दिवस काढला आणि अंधारुन आल्यावर सगळे गावाकडे निघालो. मी शामच्या घरी न जाता परस्पर घराकडे वळालो. इन्नीपुढे जायची हिम्मत नव्हती माझ्याकडे. 
सकाळी मला उगाचच टंगळमंगळ करत कामे करताना पाहुन आईला जरा आश्चर्य वाटले. तिने विचारले “अप्पा गावात नाही जात का? अरे होळी आहे ना आज? केलीय का काही तयारी?”
मी कसंबसं हसत म्हणालो “रामने दोन गाठी दिल्यात होळीसाठी. उस वगैरे धोंडबा घेऊन येईल सातच्या आसपास आणि चिंतुकाका पुजा सांगतील. तु नैवेद्य तयार ठेव.”
“बरं, आणि दत्ता येणारे का जेवायला? की काकूंकडेच जाणार आहे?” आई कामे उरकता उरकता म्हणाली.
मी म्हणालो “नाही गं. काल पडला तो झाडावरुन. फार नाही लागले पण गुडघा दुखावलाय.”
आईने माझ्याकडे लसुन सरकवत म्हटलं “तो कशाला कडमडला झाडावर? मधाचे पोळे का?”
लसुन हातावर चोळता चोळता मी म्हणालो “किती चौकशा करतेस गं? असेल त्याचे काही काम म्हणुन चढला असेल झाडावर. मी काय विचारायला नाही गेलो त्याला”
“अरे मग एवढं चिडायला काय झालं? काही उपद्व्याप करुन ठेवलाय का नवीन अप्पा? खरं सांग. सणासुदीचा घोर नको”
मी काही न बोलता समोरचा लसुन सोलत राहीलो. आज होळी असुन अंबुनानांच्या घरी पुरण शिजलं नसणार याची मला खात्री होती. मला एकदम बेचैन झाल्यासारखे वाटत होते. आयुष्यात पहिल्यांदाच अशी होळी आली होती की खरच मनगटावर चुना घालुन बोंब मारायची वेळ आमच्यावर आली होती. गोविंद्याला धडा शिकवायच्या नादात आम्हीच चांगला धडा शिकलो होतो. आजच्या इतकं अस्वस्थ आणि अपराधी मला कधीच वाटलं नव्हते. असं वाटत होतं की उगाच त्या धोंडबाचे ऐकुन गप्प राहीलो. कालच अंबुनानांना सांगायला हवे होते. त्यांनी निदान पोवळाला शोधायचा काही मार्ग काढला असता. चार शिव्यांनी काही आमच्या अंगाला भोके पडणार नव्हती. पण धोंडबालाही दोष देण्यात अर्थ नव्हता. मी विचारांच्या नादात किती लसुन सोलला ते माझ्या लक्षातच आलं नाही. इतक्यात बाहेर शकीलच्या जिपचा हॉर्न ऐकु आला. मागोमाग दार जोरात ढकलत शकील आत आला. त्याच्या अवताराकडे मी आणि आईदेखील पहात राहीली.
शकील म्हणाला “देखा अप्पा, अल्लामियाँ अपने बंदे को कभी मुश्कील में देख नही सकता। चल उठ गावात जाऊयात”
आई म्हणाली “अरे चाललय काय तुमचे? हा सकाळपासुन तोंड फुगवून बसलाय, तु उड्या काय मारत आलास. सांगा गरीब आई बापांना काही”
“कुछ नही मोठ्याई, आज होळी आहे ना म्हणुन. रात्री नैवेद्य दाखवल्यावर मी अप्पाबरोबर इकडेच येणार आहे पोळी खायला. जाताना अम्मीचा डबा नेईन” म्हणत त्याने मला ओढतच घराबाहेर काढले. मी “अरे काय झाले ते तर सांग” म्हणत असताना त्याने मला बळेच जिपमधे कोंबले. गाडी गिर्रेबाज वळवुन घेवून तो गावाकडे निघाला. निदान एका गोष्टीचा मला आनंद होता की शकील आनंदात दिसतोय म्हणजे बातमी चांगली असणार. शकीलने गाडी शामच्या घरापुढे थांबवली. शाम्या टुनकन उडी मारुनच गाडीत बसला. तोही खुशीत दिसत होता. शकीलने गाडी तशीच पुढे नेत अंबुनानांच्या घरासमोर थांबवली. तिथे अगोदरच बरीच गर्दी दिसत होती. जिप पहाताच गर्दीतुन धोंडबा, ठोब्बा, राम जिपकडे आले. मला समजेनाच काय झालंय ते. जिप पाहुन अंबुनाना घाई घाईने गाडीकडे आले. हसतमुखाने त्यांनी मला आणि शामला गाडीतुन उतरवले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. त्यांनी मला हाताला धरत जवळ जवळ खेचतच गर्दीतुन ओट्यापर्यंत नेले. मी समोर पाहीले आणि मला धक्काच बसला. ओट्यावर पोवळा उभा होता. बाजुलाच परातीत तुप कणकेचे गोळे ठेवले होते. पोवळाच्या गळ्यातल्या कासऱ्यांना अजुनही दोन्ही गव्हाणी तशाच होत्या. त्यांच्यावर बरेच गवताची, बाजरीची पाती चिकटलेली होती. दोन्ही गव्हानी चिखलाने बरबटलेल्या होत्या. अंबुनानांनी मला पोवळाशेजारी उभे केले आणि बाजुच्या परातीतला एक गोळा माझ्या हातात देत म्हणाले “अप्पा, भरव तुझ्या हाताने. दत्ताला का नाही आणले. माझ्या मागे फक्त तुमच्या दोघांच्या हातुन खातो पोवळा म्हणुन शकीलभाऊला तुला आणायला पाठवले होते.”
माझ्या डोळ्यातुन खळ्ळकन पाण्याचे दोन थेंब ओघळले. ते सुटकेच्या आनंदाचे होते पण अंबुनानांना वाटले ते पोवळासाठीच आहेत. माझ्या पाठीवर थोपटत ते म्हणाले “गप पोरा, रडु नको. आलाय ना पोवळा घरी आता? मग! भरव तुझ्या हाताने त्याला एक घास.”
मी पोवळाच्या दोन्ही शिंगाच्या मधे खाजवत त्याला कणकेचा गोळा भरवला.
डोळे पुसत अंबुनाना म्हणाले “तुला काय सांगु अप्पा, कुणा भाडखाऊने रात्रीतुन पोवळा नेला परवा. मला तपासही नाही कधी नेला ते. पण आपला पोवळा बघ, दोन दोन गव्हाणीला बांधला त्याला त्या भाड्याने पण हा गव्हाणीसकट गोठ्यातुन पळाला आणि तासाभरापुर्वी अंगणात येवून हंबरला. आता तो जो कोण बाराचा आहे ते कळुदे फक्त मग त्याला कसा दानाला लावतो ते बघच. गव्हानीवरुन आज ना उद्या कळेलच. बरं ते जावूदे. आज पोळ्या खायला माझ्याकडे यायचे सगळ्यांनी नक्की”
गर्दीत गोविंद्याही उभा होता. त्याच्या शेजारीच शाम, धोंडबा उभे होते.
धोंडबा गोविंद्याच्या कानात कुजबुजला “गोंद्या, गव्हानी तुझ्याच दिसत्यात रं. काय भानगड हाय. पारवाडीत एकसारख्या दोन गव्हानी फक्त तुह्याच गोठ्यात हायेत हे म्हायतीय मला.”
गर्दीतुन काढता पाय घेत गोविंद्या म्हणाला “हे पघ धोंडीबादादा गव्हानी माह्यावाल्याच हायती पर आईच्यान माझा कायबी संबंध नाय याच्याशी. गव्हानी गेल्या तं जाऊंदे पर तु माह्या गळ्याला तात लावू नको, लय उपकार व्हतील”
धोंडबाने शाम्याला टाळी दिली आणि म्हणाला “बामना उद्याची तयारी कर. यंघू उद्याच्याला हरिश्चंद्र. काय म्हणतो?”
त्या होळीला गावातल्या मंदिरांपेक्षा आमच्या रामाच्या मंदिरापुढली होळी सगळ्यात लहान होती पण आजवर कधी इतक्या समाधानाने होळीला आम्ही नैवेद्य दिला नव्हता जेवढा आज दिला होता. होळीत लुसलुशीत पुरणपोळी तुपाबरोबर चरचरत होती आणि त्या धुरात होळी भोवती राम, शाम, ठोब्बा, धोंडबा आणि शकीलही अत्यानंदाने बोंब ठोकत होते. मी मात्र एका मनगटाने बोंब ठोकत होतो आणि दुसऱ्या मनगटाने डोळ्यातले पाणी पुसत होतो.

बुधवार, १६ जानेवारी, २०१९

ही तो सुखाची मांडणी.

दिवाळी गटगच्या समारोपातच जानेवारी गटगची नांदी वाजली होती. पण नांदी वाजल्यानंतर प्रत्यक्षात गटगचा पडदा वर जाण्यासाठी बराचसा अवकाश होता. तो गरजेचाही होता. कारण यावेळचे गटग जरा ‘संस्मरणीय’ करायचे असे मी ठरवले होते. बरेचदा ज्यांना सहजशक्य असते असेच सदस्य हजर रहातात त्यामुळे अनेकांच्या भेटी राहुन जातात. यावेळी शक्य तितक्या सदस्यांनी हजर रहावे असे ठरवले होते. औरंगाबाद, नागपुर, नगर, पुणे व मुंबई तसेच गोवा येथुन अनेकजण येणार असल्याने माझे गावाकडील शेत हे सगळ्या सदस्यांसाठी योग्य मध्यवर्ती ठिकाण होते. 
नियोजनाची सुरवात अर्थातच तारीख नक्की करण्यापासुन आणि येणाऱ्या सदस्यांची यादी तयार करण्यापासुन झाली.
जितके जास्त सदस्य तितका सोहळा आनंदाचा होणार हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्षात नियोजन सुरु झाल्यावर जितके जास्त सदस्य, तितका जास्त गोंधळ हे लक्षात यायला लागले, आणि मी सगळ्यात पहिले काम केले ते म्हणजे गटग होईपर्यंत व्हाटसअॅपचा ग्रुप सोडने. (प्रत्यक्ष भेटीत अगदी सौजन्याचा पुतळा असलेला एक एक सदस्य ग्रुपवर मात्र अगदी 'अवली नग’ होऊन छळतो हो खुप.) आमच्या ग्रुपमधे ३५+ असलेल्या सदस्यांची संख्या जास्त आहे पण ते नावाला. प्रत्यक्षात नियोजन सुरु झाले तेंव्हा लहान मुले परवडली असा गोंधळ ग्रुपवर सुरु झाला. या गोंधळाला काहीही शेंडा नव्हता ना बुडखा. सकाळी एखादे गाणे कानी पडावे आणि दिवसभर तेच ओठी येत रहावे तसे ग्रुपवर रोज गटगसंदर्भात एखादा विषय निघायचा आणि दिवसभर त्यावरच तारे तोडले जायचे. तारखेचा विषय निघाला की दिवसभर ‘तारीख पे तारीख’ चालायचे. मेन्यूचा विषय निघाला की प्लम केक पासुन सारणाच्या पुऱ्यांपर्यंत काहीही सुचवले जायचे. येणाऱ्या सदस्यांची संख्या तर वादळात सापडलेल्या नौकेसारखी कधी उंच लाटेवर असायची नाहीतर एकदम गर्तेत. कधी एकदम तिस तर कधी दहा. या सगळ्या चर्चा ऐकुन माझे व बायकोचे नियोजन दिवसाला दहावेळा बदलायचे. शेवटी मला शहानपणा सुचला आणि प्रथम मी ग्रुप लेफ्टला. अर्थात ग्रुप सोडायच्या अगोदर मी माझे पुन्हा एकदा बारसे करुन घ्यायला विसरलो नाही. पासवर्डच्या काही गोंधळामुळे मी मायबोलीवर बायकोचा आयडी वापरुन लिहायला सुरवात केली आणि नकळत तेच कंटीन्यु झाले. पण त्यामुळे मला कायमचे बायकोचे ‘शाली’ हे नाव चिकटले. (अर्थात त्यात आनंदच आहे.) आता सगळ्या ग्रुपने जर मला सासुबाईंपुढे बायकोच्या नावाने हाक मारायला सुरवात केली असती तर परत सासुरवाडीला जायची सोय राहीली नसती. एका गटगसाठी ही जरा जास्तच किंमत झाली असती. तर असो. यजमानानेच ग्रुप सोडला म्हटल्यावर आता गटगची नौका बुडते की काय या भितीने ग्रुपवर गोंधळ झाला असेल पण तो माझ्या कानावर काही आला नाही. आता मला साधनाताई आणि जागुताई या दोघींकडुनच ग्रुपचे अपडेटस् मिळणार होते. त्यामूळे एक झाले, माझ्या डोक्यातली कलकल थांबुन मला गटगवर जास्त लक्ष केंद्रित करता यायला लागले. (हे गटग म्हणजे पाणीपतची मोहीम होती आणि माझा खऱ्या अर्थाने भाऊसाहेब झाला होता.) 
यावेळचे गटग दोन दिवसांचे असल्याने अर्थातच शनिवार-रविवार हे दिवस नक्की ठरले. माझी इच्छा होती की दिवस थोडे पुढे मागे झाले तरी चालतील पण गटग हे पौर्णिमेलाच व्हायला हवे. पौर्णीमेचे टिपुर चांदणे, मस्त थंडी, शेकोटी आणि सगळे मित्र. आणि तसा योग जुळूनही आला. डिसेंबरची पौर्णिमा ही शनिवार-रविवारीच येत होती. गटगचा दिवस इतका सहजासहजी आणि पहिल्याच प्रयत्नात ठरतोय हे पाहुन मला शुभशकुन झाल्या सारखेच वाटले. पण गटगची तारीख इतकी सहजासहजी ठरली तर मग काय पहायचे! एक तारीख ही दोनदा ठरवून तिनदा रद्द झाली नाही तर फाऊल होतो असा एक अलिखित नियमच समस्त सदस्यांमध्ये आहे. त्याला अनुसरुन एका मेंबरने आठवण करुन दिली की या पौर्णिमेला ‘दत्तजयंती’ आहे. मग कुणाला ‘उपवास’ आठवला, कुणाला यात्रा आठवली तर मला स्वतःला “दत्तजयंतीचे गावाकडील नियोजन माझ्याकडे असते” हे आठवले व ती तारीख रद्द झाली आणि गटगतला पहिला फाऊल होता होता वाचला. शेवटी साधनाताईने जानेवारी ५-६, जानेवारी २६-२७ व फेब्रुवारी २-३ अशा तारखा ग्रुपवर टाकुन पोलींग करायला सांगितले. पण सकारात्मक मतांऐवजी नकारात्मक मतांनी मतदानाला सुरवात झाली. (बहुतेक ग्रुपमेंबर मुंबईकर आहेत म्हणून बरं नाहीतर आम्हा पुणेकरांवर घसरले असते.) ५-६ तारखेला जिप्सीची ऑफिस टुर होती. “मला जमणार नाही” हे त्याने सांगुन टाकले. २६-२७ ला त्याला यायला जमणार होते पण “थंडी नसेल तर काय मजा” म्हणत निरुंनी निरुत्साह दाखवत नाराजी नोंदवली व त्या तारखाही रद्द केल्या. मुलीची परिक्षा असल्याने सायुने सगळ्याच तारखांना येवू शकत नाही हे अगोदरच कबुल करुन टाकले. शशांक पुरंदरे आणि शांकली यांना घरी थोडी अडचण होती त्यामुळे ते कुंपणावर होते. ते दोन दिवस अगोदर सांगणार होते. टीनाचा मला स्वतःलाच विश्वास वाटत नव्हता. तीचे नेहमी कसले ना कसले क्लासेस असायचे. याच तारखेला आरतीलाही तिच्या शेतात काही महत्वाचे काम निघाले. मग मात्र मला ग्रुपचा राग यायला लागला. प्रत्येकानेच काहीतरी गैरसोय सहन केल्याशिवाय गटग कसे पार पडायचे? अर्थात ग्रुपवर नसल्याने माझा सगळा राग साधना आणि जागुताईकडेच व्यक्त व्हायला लागला. दोघिंनीही खुप समजुन घेतले, समजुत काढली. साधनाताईतर म्हणाली की “कुणी नाही आले तरी मी आणि निरु येणारच, पण तू रागाऊ नकोस” (मनात म्हणालो, फक्त तुम्ही दोघेच आले तर श्रावणबाळासारखे तुम्हा दोघांना कावडीत बसवून शेत दाखवू का माझे? पण प्रेमापोटी म्हणाल्यामुळे असो..) मग यावर ऊपाय म्हणून मी एक ‘हिवाळी’ गटग करुयात व एप्रिलमधे एक ‘उन्हाळी’ गटग करुयात अशी कल्पना मांडली. पण यालाही सगळ्यांचाच विरोध होता. सगळ्यांनाच एकामेकांना भेटायची अनिवार इच्छा होती, ते ही एकाच गटगमध्ये. शेवटी हो-नाही करता करता ५ आणि ६ तारीख नक्की झाली आणि याच आठवड्यात आमच्या गावी दहा वर्षात पडली नाही अशी विक्रमी थंडीही पडली. (आपण काय नियोजन करतो आणि प्रत्यक्षात होते काय. मी पौर्णीमेचे चांदणे पहात होतो आणि सगळ्यांनी अगदी पंचाग पाहुन ठरवावे तशी गटगसाठी अमावश्या ठरवली होती. आले ग्रुपच्या मना तेथे कुणाचे चालेना.)
मी अगदीच ग्रुपपासुन अलिप्त रहायला नको यासाठी जागुताईने टेलेग्रामवर दुसरा समांतर ग्रुप सुरु केला आणि मला ‘येणाऱ्या सदस्यांची’ पहिली यादी मिळाली. मी यादी वाचायला घेतली आणि मला एकदम दडपणच आले. काही मित्रांनी एकत्र येवून छानसे गटग करणे वेगळे. येथे सगळेच सगळ्यांच्या भेटीच्या ओढीने येत होते त्यामुळे ‘गटग सदस्य संख्या’ एकदम ३५ च्या आसपास गेली होती. ती यादी पाहुन माझा चांगलाच गोंधळ व्हायला सुरवात झाली. अगदी उर दडपले म्हटले तरी चालेल. येणारे ३५ सदस्य+माझे मित्र व घरचे मिळून १० जण असा ४५ पर्यंत आकडा गेला. गावाकडे बायकोचे ३ बेडरुमचे बंगलेवजा घर असले तरी ते एका ‘शेतकऱ्याचे’ घर आहे. ज्यात दोन्ही टेरेसवर, घरात, अंगणात एवढेच काय, पोर्चमधे देखील शेतीचे सर्व साहित्य पडलेले असते. त्यात ४-५ डिग्रिच्या आसपास थंडी पडलेली. आजुबाजुच्या सगळ्याच शेतीत पाणी भरलेले. शेताच्या मागुनच नदी वहात गेलेली त्यामुळे थंडी जास्तच बोचरी झालेली. बरं आमच्या फार्महाऊसचे रुपांतर रिसॉर्टमधे करायचे काम सुरु असल्याने तेथे अगोदरच सिमेंट, विटा, इतर साहित्य आणि कामगार यांचे जोरदार गटग रंगात आलेले. या सगळ्यात आता ४५ व्यक्तिंची झोपण्याची कशी सोय करायची? (माझ्या डोळ्यासमोर आमच्या नुकत्याच रिकाम्या झालेल्या कांद्यांच्या बराखी तरळून गेल्या पण तेथेही नुकताच घेतलेला ट्रॅक्टर पार्क होता.) अंथरुने-पांघरुने कुठून आणायची? बरं, या ४५ जणांमधे ८-१० लहान मुलंही होती. यापैकी कुणालाच आमच्या भागातील थंडीचा थोडाही अंदाज नव्हता. त्यांना हिरव्यागार शेताचे सौंदर्य माहित होते पण हिरव्याकच्च शेतीतल्या थंडीची कल्पना करता येईना. त्यामुळे त्याचे गांभीर्यही कळेना. शेवटी काही गोष्टी स्पष्ट सांगितलेल्याच चांगल्या हे लक्षात घेवून मी साधनाताईला ‘प्रत्येकाने येताना ब्लॅंकेटस, भरपुर गरम कपडे व गाद्या बसमधे टाकुन आणाव्यात’ हे सुचवले. सुचवले म्हणन्यापेक्षा ‘आणलेच’ पाहीजे अशी सुचनाच केली. यामुळे माझ्या मनावरचे एक फार मोठे दडपण दुर झाले. तसेही पंधरा दिवस केलेले नियोजन, मनावर घेतलेला ताण व जागु-साधनातैने दिलेला धिर यामुळे मी आश्वस्त झालो होतो. आता कुठे थोडी फार गम्मत सुचत होती, मिश्किल स्वभाव पुन्हा जागा झाला होता. मी अधुन मधून एखादी पोस्ट ग्रुपवर टाकुन त्यांची थोडी गम्मतही करायला सुरवात केली होती. कधी माझ्या शेतात उमटलेले बिबट्याच्या पावलांच्या ठशांचा फोटो पाठव, तर कधी त्यादिवशी असलेल्या थंडीचा स्क्रिनशॉट पाठव. या दरम्यान दोन तिन वेळा बिबट्या आमच्या अंगणात येवून गेला होता. जाताना त्याने शेजारच्या घरातले पाळलेले कुत्रे नेले होते. त्या बातमीचा स्क्रिनशॉट पाठव असे उद्योग मी अधुन मधून करत होतो. "झाले काही सदस्य कमी तर झाले" असा एक सुप्त हेतुही त्यामागे होताच. अर्थात सदस्यांच्याच काळजीने. पण त्यामुळे पलकच्या घरच्यांनी मात्र तिला जायला विरोध केला आणि तिला मात्र गटगला येता आले नाही. एकुन बाहेरची थंडी रोज वाढत होती आणि इकडे आमच्या गटगच्या गप्पांमधली उबही वाढत होती. उत्साह ओसंडत होता.
गटगचा मेन्यु हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो नेहमी पण मी या वेळी मेन्यू चर्चेला घेतला नव्हता. तेवढं शहानपण एव्हाना मला आलं होतं. स्थानिक पदार्थच करायचे हे नक्की केले होते. मी कुणाकडूनही काहीही सुचना मागवल्या नव्हत्या की कुणाची आवडनिवड विचारली नव्हती. कारण ती विचारली असती तर मला छप्पन भोग थाळीच तयार करावी लागली असती हे नक्की. मासवडी, झणझणीत रस्सा, भरले वांगे, बाजरीची भाकरी आणि आमच्या भागातला खास इंद्रायणीचा वाफाळता भात. सोबत दही-कांदा, लिंबू, लोणचे, पापड, सांडगे इत्यादी होतेच. भर थंडीत या सारखा दुसरा मेन्यु नाही. बऱ्यााच जणांनी मासवडीविषयी फक्त ऐकले होते. काहीजणांनी कुठल्याशा खाद्यमहोत्सवात मासवडीच्या नावाखाली मिळणारा बेचव पदार्थ खाल्ला होता त्यामुळे सगळ्यांनाच ऑथेंटिक मासवडी खाण्याची इच्छा होती. मेन्युवर चर्चा करायची नाही हे ठरले होते तरी जागुताईबरोबर चर्चा होत होती. तिने मधेच सुचवले की संध्याकाळचे जेवण जर लवकर उरकले तर रात्री १२:०० च्या आसपास सगळे ‘पोपटी' खावू शकतील. तशीही थंडीच्या दिवसात भुक लवकर लागते आणि शेकोटीही पेटती रहाणारच आहे. त्यामुळे मेन्युमधे ‘पोपटी’चाही समावेश झाला. घाटावरची मासवडी आणि घाटाखालची पोपटी यांचा छान योग जुळून येणार होता. साधारणपणे गटगला सगळे सोबत जातात पण यावेळी कुठून कुठून सदस्य येणार होते. मलाही या सगळ्याचे नियोजन पुण्यात राहुन करावे लागत होते त्यामुळे थोडा गोंधळ होणे स्वाभाविक होते. (पाणीपतची मोहीम हो. लढाई यमुनेकाठी आणि तयारी मुळे-मुठेकाठी) पण साधनाताईने अगोदरच सांगितले होते की “तुम्ही काही यजमान नाही आणि आम्ही पाहुणे नाही. सगळे मिळून साजरा करु गटग. तू टेन्शन घेवू नकोस.” त्यामुळे माझी बरीचशी चिंता कमी झाली होती. तरीही एक चिंता होतीच. काही किलोमिटरवर जशी भाषा बदलते, पाककृती बदलतात तशाच काही मान्यताही बदलतात. त्याप्रमाणेच आमच्या भागातल्या मान्यतेप्रमाणे स्वतःच्या हाताने रांधले नाही आणि पंगतीत वाढले नाही तर त्याला पाहुणचार म्हणत नाही. आता हे सगळे एकत्र पंगतीत कसे बसवायचे हे एक अवघड कामच होते. शेवटी मी ग्रुपवरच सगळा भार घातला आणि निश्चिंत झालो.
सगळे “काळजी करु नको” म्हणत असले तरी मला 'आपल्या घरी पहिल्यांदाच येणाऱ्यांची' काळजी वाटत होती. महिनाभर त्याचाच विचार करुन, अनेक अडचणींच्या नुसत्या विचाराने डोके सैरभर झाले होते. त्यामुळे प्रत्यक्षात पाच तारीख उजाडली तेंव्हा मात्र मनाला अगदी वैराग्य प्राप्त झालं होतं. वृत्ती सन्यस्त झाली होती. आता गाडी काढून गटगसाठी गावी जायचे काय आणि “अल्लखऽऽ” करुन हिमालयात जायचे काय, दोन्ही मला सारखेच वाटत होते. माझा रोजचा लहान मुलापेक्षा जास्त असलेला गोंधळ पहायची सवय असलेली बायको माझा हा शांत अवतार पाहुन जरा धास्तावलीच. एक टिशर्ट, एक जिन्स आणि छोटी टॉयलेटरी बॅग एवढीच माझी तयारी पाहून आता ही माझ्या कपाळाला हात लावून ताप वगैरे पहाते की काय असं वाटले. कारण एक दिवसासाठी जरी कुठे जायचे असले तरी माझी तयारी म्हणजे एक प्रकरणच असते. तिकडे दुर्लक्ष करुन मी पार्कींगला जाऊन तिची निर्विकारपणे वाट पहात थांबलो. पंधरा मिनीटात ती बॅग्ज घेऊन खाली आली आणि त्याचवेळी वॉचमनने गाडीसाठी उघडलेल्या गेटमधुन आमची भाजीवाली आत आली. मला पेरुची कोशिंबिर आवडते म्हणून तिने टोपलीतुन आणलेले पिवळे धम्मक पेरु बायकोकडे देत विचारले “कुठं असं विचारु नये म्हणून नाही विचारत, पण उगाच कशाला अवसेला बाहेर पडता ताई? त्यात शनीअमुशा आहे.”
मी मनात म्हटलं “चला गटगला सुरवात झाली म्हणायची” 
आणि खरेच या शनीने सगळ्या प्रवासात त्रास दिला. घरातुन बाहेर पडलो व काही किलोमिटरवरच लक्षात आले की लॅपटॉपची बॅग घरीच राहीली आहे. तसा एक लॅपटॉप नेहमी सोबत असतोच पण बॅगमधे असलेल्या केबल्स, चार्जर, बॅटरीज, पेनड्राईव्ह सगळे घरीच राहीले. म्हणजे आता फोटो, व्हिडीओ काही काढता येणार नव्हते. मग काही वेळाने बायकोला विचारले “निदान सगळ्यांसाठी नविन वर्षांसाठी घेतलेल्या डायरीज घेतल्यात का?” तर उत्तर म्हणून बायकोने प्लेयरवर सुरु असलेला ‘जसराज’ बदलुन ‘नुसरत’ लावला. मी काय समजायचे ते समजलो. एव्हाना जरा भुकही लागायला लागली होती म्हणून “पेरु तरी दे एखादा” म्हणालो तर पेरु सिटवर ठेवल्यानंतर नकळत तिने तिची बॅग त्यावरच ठेवली होती आणि पेरुची कोशिंबिर झाली होती. मग विचार केला “हरकत नाही, या भागातले माझे आवडते हॉटेल जवळच आहे मिसळचे, तेथे जावूयात” पंधरा मिनिटांनी मी हॉटेलसमोरुन “काही कारणामुळे हॉटेल दोन दिवस बंद आहे” असा बंद दारावर चिटकवलेल्या कागदाचे दर्शन घेऊन गाडी गावाच्या दिशेने वळवली. एवढ्यात ग्रुपवरचा पहिला फोटो अवतरला. जिप्सीने आणलेल्या इडली चटणीचा बसमधे सगळे जण आस्वाद घेत होते. त्या फोटोला “वाह!” अशी कॉमेंट लिहुन ‘यम्’ची स्मायली टाकली. प्रत्येकवेळी खरा प्रतिसाद नाही देता येत हो. उपाशी पोटी आवडत्या पदार्थाच्या फोटोला लाईक देणे म्हणजे काय त्रास असतो ते एक उपाशीच जाणे. आजोबा म्हणायचेच “भुका निकले-फाका मिले, खाके निकले-बांके मिले” ते आता पुरेपुर पटले होते. आता घर गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे जरा सवय मोडून स्पिड वाढवला आणि काही मिनिटातच लक्षात आले की काही तरी गडबड आहे. मग पुन्हा गाडी बाजुला घे, जॅक काढ, स्टेपनी काढ वगैरे सोपस्कार सुरु झाले. ग्रुपवर ‘उशिर होईल’ हे सांगण्याऐवजी बायकोने ‘धुळीत मांडी घालुन टायर बदलणाऱ्या नवऱ्याचा’ अगदी योग्य अँगलने फोटो काढुन ग्रुपवर टाकला आणि फार मोठे काम केल्याच्या आविर्भावात मस्त सावलीला उस खात बसली. आज शनी अमावस्या होती पण शनीऐवजी माझ्याच डोक्यावर तेल थापायची वेळ आली होती.
(गटगचा वृत्तांत लिहितोय हेच विसरलो. अशा गोष्टी कुठे सांगायच्या असतात का? त्यामुळे असो. आता छान छान सांगतो फक्त.)
आम्ही गावी पोहचलो, तेथुन कोदंडपाणीला सोबत घेतले व प्रथम बायकोला तिच्या माहेरी सोडवले. खरं तर टीनाला मी खुप फोन करुन पाहीले पण तिने ऐनवेळी नकारच दिला, नाहीतर बायकोला तिची खुप मदत झाली असती. कारण पहिल्या दिवशी सगळे तिच्याच शेतात जमणार होते. मुक्कामही तेथेच करायचे ठरले होते. स्वागताची थोडी फार तयारी तिलाच करावी लागणार होती. एवढ्यात सामीचाही मेसेज आला की ती येणार नाहीए. अधुन मधून बस कोठवर पोहचली याची चौकशी करत होतो. अर्थात दिलेल्या वेळेत कुणी येणार नाही याची खात्रीच होती. कारण माणूस एकदा माळशेज परिसरात रमला की मग वेळेचे फारसे भान रहात नाही. मी फोन केला तेंव्हा हे सगळे माळशेज पॉईंटला भरपुर वेळ घालवून आता पिंपळगाव जोगाच्या बॅकवॉटरमधे उतरुन मस्ती करत असल्याचे समजले.
1xgtg.JPG
माळशेज पॉईंट (फोटो: जिप्सी)
2xgtg.JPG
पिंपळगाव जोगा बॅकवॉटर-१ (फोटो: जिप्सी)
3xgtg.JPG
पिंपळगाव जोगा बॅकवॉटर-२ बच्चेकंपनीची जपुन मस्ती. (फोटो: जिप्सी)
मी किरकोळ गोष्टींची यादी काढली तर बऱ्याच गोष्टी निघाल्या. मग गाडी पुन्हा माझ्या गावाकडे वळवली आणि प्रथम वस्तू गोळा करायला सुरवात केली. सगळे बसू शकतील अशी मोठी सतरंजी गाडीत टाकली, दुधाची व्यवस्था केली, कॉफी, चॉकलेटस्, सनीसाठी (घरचा कुत्रा) बिस्किटस, आणि सगळ्यांना दुसऱ्या दिवशी द्यायच्या ‘वानवळ्या’चा बंदोबस्त केला. बिचाऱ्या कोदंडपाणीची मात्र खुपच धावपळ होत होती. इतक्यात ग्रुपवर डॉ. पटवर्धनांचा मेसेज आला “आम्ही डेस्टिनेशन पासुन फक्त १५ किलोमिटर दुर आहोत” म्हणजे ते आता माझ्या जवळपासच असणार याचा अंदाज आला. त्यांना फोन केला तर ते माझ्यापासुन हाकेच्या अंतरावरच होते. त्यांना तेथेच थांबायला सांगुन मी 'बाकीची तयारी नंतर करु' म्हणत त्यांना रिसिव्ह करायला गेलो. त्यांना मी पाहीले नव्हते त्यामुळे उत्सुकता होतीच. त्यांना भेटलो आणि आश्चर्य वाटले. फक्त मित्रांच्या भेटीच्या ओढीने हे डॉक्टर दांपत्य स्वतः ड्राईव्ह करत औरंगाबादवरुन आले होते. तेही अगदी वेळेवर. डॉक्टरांच्या ड्रायव्हींगचे कौतुकच वाटले. त्यांना कारमागे यायला सांगुन मी निघालो. पंधरा मिनिटात आम्ही घरी पोहचलो. डॉक्टरांनी कार पार्क केली आणि घराच्या अंगणात आले. दोघांचेही चेहरे इतके प्रफुल्लीत दिसले की मी विचारायच्या अगोदरच मानसीताई म्हणाल्या “अहो स्वर्ग आहे हो हा. हिरवी शेते पाहुन अगदी डोळे निवले आमचे.” मी हसुन डॉक्टरांकडे पाहीले तर ते सगळी औपचारीकता विसरुन अंगणातल्या गुलाबांचे, तुळशीवृंदावनाचे फोटो काढत होते. त्यांना पायावर घ्यायला पाणी देवून मी आणि कोदंडपाणी पुन्हा निघालो. कारण साडेचार वाजले होते आणि पोपटीची अजुन काहीच तयारी झाली नव्हती. जेवणानंतर काहीतरी गोड हवे म्हणून 'कुंदा' करायला सांगितला होता मित्राला तोही अजुन आणला नव्हता. पुनश्च गावाकडे निघालो. अजुन किती फेऱ्या माराव्या लागणार होत्या कुणास ठाऊक!
आम्ही पोपटीसाठी लहान माठ (मडकी) घेतले चार पाच. मामाच्या शेतात ज्या ताज्या भाज्या दिसल्या त्या तोडुन घेतल्या. एसटी स्टँडवरच्या नेहमीच्या मुलाण्याला गावठी कोंबड्या साफ करायला सांगितल्या होत्या, त्याच्या दुकानासमोर गाडी लावली आणि खाली उतरलो इतक्यात साधनाताईचा फोन आला की ते एसटी स्टँडवर पोहचले आहेत. म्हणजे आता थांबायला वेळ नव्हता. त्याने एकच कोंबडी साफ केली होती तेवढीच घेतली व पुन्हा गाडी वळवत स्टँडवर पोहचलो.
सगळ्यांना पाहुन समजेनाच की हे प्रवासाला निघालेत की प्रवास करुन आलेत? ही सगळी मंडळी सकाळी मुंबईवरुन निघुन, माळशेज घाटात मनसोक्त मस्ती करुन, पिंपळगावच्या बॅकवॉटरमधे हुंदडून मग येथे आली होती, शिवाय ८-१० मुलांचा अवखळ कळप सांभाळत आली होती, पण कुणाच्याही चेहऱ्यावर प्रवासाचा शिण दिसत नव्हता. मग पुन्हा बसड्रायव्हरला मागे यायला सांगुन गाडी घराकडे वळवली. आता काहीही काम असले तरी पुन्हा गावाकडे यायचे नाही असं ठरवलं. तेवढी एनर्जीही एव्हाना राहीली नव्हती.
सगळे घरी पोहचलो. बसड्रायव्हरने घराशेजारीच बस लावली. एक एक करत सगळे उतरले. चेहरे प्रसन्न. हायवे सोडुन आत वळाल्यावर त्यांना हिरवा रंग सोडुन दुसरा रंगच दिसला नसावा फारसा. तिच हिरवाई आता प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होती. सगळ्यांना पाहुन खुप बरे वाटले. महिनाभर ज्यांच्या भेटीची आतुरतेने वाट पहात होतो ते सगळे आता हसतमुखाने माझ्या अंगणात उभे होते. सगळ्यांनी बॅग्ज ठेवल्या, पायावर पाणी घेतले आणि कुणी सोफ्यावर तर कुणी खुर्चीवर विसावले. प्रवास कसा झाला? सारखे औपचारीक प्रश्न विचारावेच वाटले नाहीत. मुलं तर अजुन अंगणातच होती. त्यांनी क्षणातच सनी बरोबर गट्टी जमवली होती त्यामुळे त्यांची काही घरात यायची तयारी दिसेना. हास्यविनोदाला खंड नव्हताच. सगळे जरा विसावले. चहा-पाणी झाले पण कुणाचे सोफ्यावरुन हलण्याचे काही लक्षण दिसेना. पुर्वाभीमुख असलेल्या घराच्या मागच्या शेतात सुर्यनारायण अस्ताचलाला निघाला होता आणि आज येथे एकच मुक्काम असल्याने हे दृष्य कुणी चुकवावे असे मला वाटेना. त्यामुळे एक दोघांना बाहेर काढले. बाकीचे आपोआप मागोमाग आले. घर शेतातच असल्याने दुर जायचेच नव्हते. सगळ्या रानात यावेळी कांदा केला असल्याने मधल्या पाण्याच्या पाटाने सगळेजन शेतात निघाले. समोरच सुर्य डोंगराच्या माथ्यावर टेकायला आला होता. पाटाच्या पाण्यातुन व्यवस्थित चालता येत असल्याने नकळत सगळे एका रांगेत निघाले होते. दुरुन पहाताना 'पताका नसलेली मित्रवेड्या निसर्गप्रेमींची दिंडीच' चालल्यासारखे वाटत होते.
6xgtg.jpeg
"दिंडी चालली..." (फोटो: शाली)
4xgtg.jpeg
घरापासुन डोंगराच्या पायथ्यापर्यंत पसरलेले हिरवेगार शेत. मधे पाटाच्या कडेला घरच्यापुरता लावलेला गहू. (फोटो: शाली)
5xgtg.jpeg
माझे माहेर आणि सासर एकच असल्याने, शेतातुन दिसणारे 'आमच्या दोघांचे' गाव. (फोटो: शाली)
आकाशाच्या निळाईच्या पार्श्वभुमीवर निळसर पिवळे डोंगर आणि डोंगरांच्या पार्श्वभुमीवर पसरलेले समतल हिरवेगार शेत. समोरच क्षितिजावर जमा व्हायला लागलेली लाली आणि हवेत किंचीत गारवा. एकुन सगळ्यांच्या चित्तवृत्ती बहरल्या होत्या. मुलांनीच काय त्यांच्या पालकांनीही बहुतेक प्रथमच असे शेत पाहीले असावे. प्रत्येकाचा मोबाईल हातात होता. कशा कशाचे फोटो काढु असे सर्वांनाच झाले होते. गप्पांना, शाब्दीक कोट्यांना तर ऊत आला होता. इतक्या शुध्द हवेचा फारच कमी अनुभव असावा बहुतेकांना. ध्वनीप्रदुषण तर शुन्यच होते. कुठेही गाड्यांच्या हॉर्नचा, मानसांच्या गोंधळाचा किंवा इतर कुठलाही कृत्रीम आवाज कानावर येत नव्हता. ‘सांज ये गोकुळी, सावळी सावळी' गाण्यातले वातावरण प्रत्यक्ष अनुभवत होते सगळे. सगळ्यांचेच “हे काय आहे?” “ते काय आहे?” सुरु होते. काही गमती जमतीही होत होत्या. मधेच कुणीतरी गव्हाची ओंबी पाहुन हे काय आहे ? असं विचारुन मला धक्का दिला आणि त्यातुन सावरायच्या आत कुणी तरी “अगं ते गव्हाचे झाड आहे” म्हणून दुसरा धक्का दिला. हे कमी म्हणून की काय मागुन नितिनने मजेने “अगं तो गव्हाचा वृक्ष आहे” म्हणून अगदी कळस केला. मधेच कुणी तरी बिबट्याचाही विषय काढून जरा गम्मत केली.
7-2xgtg.jpeg
टच्च भरलेल्या गव्हाच्या ओंब्या. (फोटो: शाली)
एकुन लहान मुलंच काय तर सगळे मोठे सुध्दा लहान होऊन शेतातल्या शेंदरी संध्याकाळचा आनंद मनमुराद अनुभवत होते.
IMG_4620 2.jpeg
(फोटो: शाली)
सुर्य मावळला आणि आम्ही शेताच्या अगदी शेवटच्या टोकाला पोहचलो. तेथे शेत संपते आणि नदी सुरु होते. पण बंधारा बांधल्याने नदीला पाणी अगदीच नावाला आहे. आणि शेताच्या पातळीपासुन नदी बरीच खालच्या पातळीवर वहाते. लहान दरीतुन वाहील्यासारखी. त्यामुळे मुलांवर जरा जास्त लक्ष ठेवावे लागत होते. शेताच्या शेवटच्या भागात पुढच्या कांद्याच्या पिकासाठी बियाणे हवे म्हणून थोडा कांदा केला होता. तो छान फुलोऱ्यावर आला होता. मग त्याचे सविस्तर फोटोसेशन झाले. त्यांना डेंगळे म्हणतात हेही बऱ्याच जणांना माहीत नव्हतेच.
6xgtg.JPG
बियाणांसाठी ठेवलेला कांदा. (फोटो: जागुतै)
7-1xgtg.JPG
कांद्याचा डेंगळा. याच्यातुन कांद्याच्या बिया मिळतात. (फोटो: जागुतै)
7-0xgtg.jpeg
हा त्याचा क्लोजअप (फोटो: जिप्सी)
आता मात्र चांगलेच अंधारुन आले. मी शेवटी सगळ्यांना घराच्या दिशेने वळवले. पुन्हा एकदा सगळ्यांची दिंडी पाण्याच्या पाटाच्या मार्गाने घराकडे निघाली.
8xgtg 2.JPG
"सांज ये गोकुळी, सावळी सावळी" (फोटो: जिप्सी)
घरी परतलो तर अंगणातच डॉक्टर दांपत्य सासरेबुवांबरोबर गप्पा मारताना दिसले. मी त्या दोघांना घरी सोडुन पुन्हा गावात गेलो होतो त्या दरम्यान सासरेबुवांनी त्यांना सगळे शेत फिरवून दाखवले होते. ते तिघेच बराच वेळ एकत्र भटकल्याने त्यांची छान तार जुळल्याचे दिसत होते. मी आणि भैय्याने (कोदंडपाणी) चटकन अंगणात मोठी सतरंजी अंथरली आणि मग त्यावर सगळेच विसावले. गारवा वाढायला लागला होता. महिलामंडळ आता बच्चेकंपनीच्या मागे लागली होती. गप्प बसा रे! खाऊन घ्या रे! वगैरे सुरु झाले होते. बाहेर अंगणात मात्र आमच्या गप्पा सुरु झाल्या. गटग गप्पांशिवाय झालेय असं कुठे होतं का? आता याला उगाच गप्पा म्हणायचे, नाही तर ही एखादा विषय घेऊन झडलेली बौध्दीक चर्चाच असते. गप्पांचा विषय अर्थात शेतीभोवती फिरणार हे ओघानेच आले. माणसाने गरजा कमी कशा केल्या पाहिजेत, निसर्गाकडे कसे वळले पाहिजे यावर मग मतमतांतरे सुरु झाली. हातात आयफोन घेऊन मी मारे “मला तांत्रीक प्रगती नसली तरी चालेल, हवे तर पुन्हा नांगर बैल वापरुन शेती करु पण समाधान हवे” अशी मते मांडत होतो. तर कुणी आयटी इंजीनिअर मात्र “अगदीच इतकं निकरावर यायला नको. तांत्रिक प्रगती हवी पण तंत्रज्ञानाचा जरा डोळस आणि संयमीत वापर व्हावा” असा विचार मांडत होता. डॉक्टर तर अगदी मिश्किल होते. हास्योपचाराने पेशंट बरे करतात की काय अशी शंका यावी इतके. तोवर घरच्या मंडळींची जेवणाची तयारी झाली होती. आतुन सारखा बसुन घ्या, बसुन घ्या अशा सुचना यायला सुरवात झाली. मग तेथेच सतरंजीवर छान पंगत बसली. पण सगळ्यांचाच गोंधळ सुरु होता. कुणी बुफेसारखे हातात घेवून खावे या विचारात होते तर कुणी स्वतः वाढून घ्यायच्या तयारीत होते. या गोंधळाची मला पुर्वकल्पना होतीच त्यामुळे प्रत्येकाला व्यवस्थीत पंगतीत बसवून दोन जनांनी वाढायला घेतले. प्रत्यक्षात वाढताना लक्षात आले की दही-कांदा करण्यासाठी दही ऐनवेळी पोहचले पण ते चुकीच्या घरी गेले म्हणजे बायकोच्या काकांच्या घरी. दही नाही त्यामुळे ताक करायचेही राहीलेच. स्विट म्हणून आमच्या भागातला प्रसिध्द ‘कुंदा’ आणायचे भैय्याच्या लक्षात राहीले नव्हते. जेवणानंतर खायला पाने आणायची लक्षात राहीले नव्हते. पण आहे तो मेन्यच खुप असल्याने सगळ्यांची पंगत बसली. बरेचजण पहिल्यांदाच मासवडी खात असल्याने ‘कशी खायची’ येथुन सुरवात होती. पण चवदार पदार्थ असले की फारसे प्रश्न पडत नाही त्यामुळे छान हसत खेळत जेवणे सुरु झाली. भाकरी गरम होत्या, रस्सा जरा जास्तच झणझणीत होता, मासवडीत अगदी योग्य प्रमाणात लसुन पडला होता, तोही गावठी त्यामुळे वडीचाही छान झटका लागत होता, भरल्या वांग्यांचा मसाला अगदी वांग्याला लपेटुन प्रमाणात होता आणि या सगळ्यात भर म्हणजे छान थंडी पडली होती. बहुतेकांच्या हातात आता रुमाल दिसायला लागले होते. ते रुमाल आता नाक आणि डोळे असे क्रमाणे फिरत होते. याचा अर्थ मासवडी जमुन आली होती. निरुदांनी मात्र स्वभावाप्रमाणे ‘हे काय आहे? ते काय आहे?’ विचारत प्रत्येक पदार्थाला अगदी योग्य न्याय दिला. जेवणे उरकत आल्यावर इंद्रायणीच्या वासामागोमाग वाफाळता भात आला आणि उदरभरन यज्ञाचा उत्तरार्ध सुरु झाला. सगळे अगदी मनसोक्त जेवले. आवडते जेवण, तेही मनासारख्या वातावरणात, प्रिय मित्र-मैत्रीणींसोबत असल्यावर अजुन काय हवे असते माणसांना. याच साठी तर सगळा अट्टाहास असतो. 
9-1xgtg.jpeg
या आकारामुळे मासवड्यांना 'मासवडी' हे नाव पडले. अनेकांना हा पदार्थ मांसाहारी असावा असे वाटते. पण हा पुर्ण शाकाहारी पदार्थ आहे. (फोटो: शाली)
9-2xgtg.jpeg
कापायला घेतलेल्या मासवड्या. काही अर्धवट कापल्या आहेत. (फोटो: शाली)
12xgtg_0.jpeg
हा अजुन एक मासवडीचा सुरेख क्लिक. (फोटो: जिप्सी)
10xgtg.jpeg
हा मासवडी सोबत खायचा झणझणीत रस्सा. हा रस्सा जर जमुन आला तर मटण रश्याच्या तोंडात मारतो. आमचा अगदी तसाच जमुन आला होता. (फोटो: शाली)
11xgtg.jpeg
फक्कड जमुन आलेले 'भरले वांगे'. आमच्याकडची बारीक आणि काटेरी असलेली वांगी छान चवदार असतात. अगदी कृष्णाकाठच्या वांग्यांइतकीच. (फोटो: शाली)
जेवणे उरकली आणि मग जे मागे जेवायचे राहीले होते, ज्यांनी वाढायचे काम केले होते त्यांची पंगत बसली. तोवर काहीजनांनी घराच्या शेजारी, जेथुन शेत सुरु होते तेथे शेकोटीसाठी जागा साफ करायला घेतली. थंडी आता वाढायला लागली होती. आम्ही अंगणात गप्पा मारत बसलो होतो तेंव्हा जागुताईने किचनमधे सगळा मसाला वाटुन तो भाज्यांना लावून ठेवला होता. मुंबईवरुन येतानाच रस्त्यात थांबुन सगळ्यांनी भरपुर भांबुर्ड्याचा पाला आणला होता तो बाहेर काढून ठेवला होता. ते सगळे साहित्य घेऊन जागुताई पोपटी लावायला बसली. अन्नपुर्णा अन्नपुर्णा म्हणत सगळ्यांनी बिचारीला चांगलेच कामाला लावले होते. जिप्सी मात्र तिला मदत करत होता. मी आणलेली कोंबडी जिप्सीने बाहेरच ठेवली होती. सासरेबुवा वारकरी असल्याने चिकन आत नेले नव्हते. त्यालाही जागुताईने व्यवस्थीत मॅरीनेट करुन ठेवले. 
13xgtg.jpg
जागुताईने करुन ठेवलेली पोपटीची तयारी. जास्त फोटो होतील म्हणुन कोलाज टाकला आहे. (फोटो: शाली, जिप्सी)
तोवर रात्रीचे दहा वाजुन गेले होते. हॉलमधे जिथे जागा होती तिथे गाद्या घातल्या गेल्या आणि दमलेल्या बच्चेकंपनीला एकदाचे झोपवण्यात आले. तोवर बाहेर थंडीबरोबर शेकोटीही झकास पेटली होती. मग जे दमले ते गाद्यांकडे वळाले व ज्यांचा उत्साह अजुनही टिकून होता ते शेकोटीकडे वळाले. पोपटीची मडकी लावण्यात आली आणि शेकोटी आणखी धगधगीत केली गेली.
14-1xgtg.jpg
शेकोटीत लावलेली पोपटी. यातल्या फक्त एकात चिकन होते. आणि मडकी चांगली फिरवून लावली होती तरी सगळ्यांना माहित होते की चिकन कोणत्या मडक्यात आहे. (फोटो: शाली)
मग जो चावटपणा सुरु झाला की विचारु नका. अमावश्या असल्याने व प्रकाशाचे अजिबातच प्रदुषण नसल्याने चांदण्या जास्तच लखलखीत दिसत होत्या पण आकाशदर्शनाचा प्लॅन असुनही आता कुणी शेकोटी आणि गप्पा सोडून मान वर करायला तयार नव्हता. शेकोटीमुळे समोरुन जरी सगळे ‘तापले’ होते तरी पाठी मात्र अगदी गार पडल्या होत्या. मला ऐनवेळी एकच कोंबडी आणता आल्यामुळे सगळ्यांचे लक्ष गप्पा मारतानाही चिकन असलेल्या मडक्याकडेच होते. हवेत आता गारव्याबरोबरच भांबुर्ड्याच्या पाल्याचा मिरमिरीत वास आणि शेतावरुन येणारा पिकांचा वास पसरला होता. साधारण बाराच्या दरम्यान पराग यांनी (जागुताईंचे ‘हे’) एक एक मडके बाहेर काढले. मग स्टिलच्या ताटात पोपटी काढली गेली. वाटलेल्या नारळाच्या मसाल्याचा आणि भांबुर्ड्याच्या पाल्याचा एक मिरमिरीत फ्लेवर सगळ्या भाज्यांना, शेंगांना आणि चिकनला येत होता. दहा पंधरा मिनिटात पोपटी खावून मग हळू हळू शेकोटीभोवतीचा एक एक सदस्य कमी होत गेला. शेवटी मी, बायको, जागुताई आणि पराग येवढेच राहीलो. मग मात्र पाणी टाकुन शेकोटी पुर्ण विझवली आणि घरात आलो. ज्याला जेथे जागा मिळेल तो तिथे झोपला होता. वरच्या दोन्ही बेडमधे भरले थोडीही जागा नव्हती. शेवटी मी आणि जिप्सीने टेरेसमधे गाद्या टाकाल्या. इतक्या वर्षात पहिल्यांदा 'जावाईबापु' कुठे झोपले हे सासुरवाडीला समजले नाही. बाकीच्यांचे माहित नाही पण मी आणि जिप्सी न आलेल्या सदस्यांच्या आठवणी काढत दोन वाजेपर्यंत जागे होतो. नंतर कधी झोप लागली ते मात्र आठवत नाही. 
रात्री जागुनही सकाळी जाग मात्र लवकर आली पण थंडीमुळे अंथरुनातून हलावेसे वाटेना. खाली सगळे उठल्याची चाहूल येत होती. जिप्सीही लवकर उठला होता. दहा मिनिटातच समोरच्या डोंगराआडुन सुर्य डोकावला.
14-2xgtg.jpg
हा आहे टेरेसमधुन अंथरुनावर पडल्या पडल्या दिसणारा सुर्योदय. (फोटो व्यवस्थित आला नाही. (फोटो: जिप्सी)
मग मात्र अंग झाडुन उठलो. खाली आलो तर पराग व निरु चक्क मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. कमाल झाली या लोकांची. बऱ्याच जनांच्या अंघोळी उरकल्या होत्या. जे राहीले होते ते करणारच नव्हते. मग घाईत बाथरुममधे घुसलो. माझे नशिबच असे आहे की कुठेही गेलो तरी गरम पाण्याची अंघोळ काही नशिबात नसते. सगळ्यांच्या अगोदर गेलो तर पाणी कितीही गरम असले तरी माझ्या वाट्याला सुरवातीचे पाईपमधले दोन बादल्या थंड पाणी येते आणि सगळ्यांच्या नंतर गेलो तर गरम पाणी संपलेले असते म्हणून थंड पाणी वाट्याला येते. आजही तेच. शेवटी थंड पाण्याने अंघोळ करुन बाहेर आलो. सगळ्यांची चहाची गडबड सुरु होती. निरुदा, जिप्सी आणि पराग सगळे गाद्या व बाकीचे सामान बसमधे चढवत होते. मोनालीपच्या नवऱ्याला सकाळीच मुंबईला निघायचे असल्याने त्यांना मेव्हण्याच्या बाईकवर एसटी स्टँडवर पाठऊन दिले. बच्चेकंपनी बाहेर सनीबरोबर (घरचा कुत्रा) खेळत होते. तोही चांगलाच रमला होता मुलांमधे. माझी कार रात्री भैय्या घेऊन गेल्यामुळे मलाही बसमधेच जायचे होते. कपडे वगैरे करुन चहा घेतला. तेवढ्यात आमच्या सासुबाईंनी गावठी लसणाच्या गड्ड्या हॉलमधे आणुन ठेवल्या. प्रत्येकाला एक एक गड्डी दिली
गार्लीक.jpg
हा शालीच्या म्हणजे बायकोच्या शेतातला 'गावठी लसुन' (फोटो: शाली)
बाजारात मिळणारा लसुण आणि गावठी लसुण यावर चर्चा सुरु व्हायच्या बेतात होती पण सगळ्यांना घाईत बाहेर काढले. कारण आज आमच्याकडे फक्त दुपारपर्यंतच वेळ होता. माझे सासु सासरे बाहेर येवून हात हलवत होते, त्यांचा निरोप घेऊन बस गावाकडे वळवली. एवढ्यात मानुषीताईंचा फोन आला. ते नगरवरुन सकाळी निघाले होते आणि वेळेवर भैय्याच्या हॉटेलवर पोहचले होते. त्यांना तेथेच थांबायला सांगीतले. रात्री छान झोप झाल्याने सगळ्यांच्याच बॅटरीज फुल चार्ज झाल्या होत्या. काहीतरी विषय हवा म्हणून मग कोदंडपाणी यावरुन चर्चा सुरु झाली. रामाला का कोदंडपाणी म्हणतात? मग पीनाकपाणी म्हणजे कोण? वगैरे चर्चा फिरु लागली. दहाच मिनिटात आम्ही कपर्दिकेश्वरला येऊन पोहचलो. येथेच आमची यात्रा भरते. (ज्यावर माझा छोटासा लेख लेख आहे.) मग पुन्हा सगळे उतरले. दर्शन घेतले. तेथेच तुकाराम महाराजांच्या गुरुंची समाधी आहे. तिचेही दर्शन घेतले. परिसरात निरव शांतता होती. सकाळचे वातावरण व सुंदर परिसर यामुळे येथे आमचा तासभर छान गेला. येथेही साधनाताईने कसल्या कसल्या बिया गोळा केल्या.
15-1xgtg.jpg
हे आमचे कपर्दिकेश्वराचे मंदिर. येथे श्रावण महिन्यात दर सोमवारी यात्रा भरते. (फोटो: शाली)
15-2xgtg.jpg
हे शालीचे घर, म्हणजे माझी सासुरवाडी. आणि मंदिराच्या आतला भाग, गाभारा.
18-1xgtg.jpeg
ही आहे तुकाराम महाराजांचे सद्गुरु 'बाबाजी चैत्यन्य' यांची समाधी. आम्ही गेलो तेंव्हा फुलांनी छान पुजा झालेली होती. (फोटो: शाली)
18-2xgtg.jpg
समाधी परिसर-१ (फोटो: शाली)
16xgtg.jpeg
समाधी परिसर-२ (फोटो: शाली)
17xgtg.jpeg
समाधी परिसर-३ (फोटो: शाली)
भैय्याचे सारखे फोन येत होते “निघालात का? कोठवर आलात?” मग एकदाचे निघालो. रस्ता अतिशर सुंदर असल्याने पंधरा मिनिटातच भैय्याच्या ढाब्यावर बस पोहचली. मानुषीताईंना आणि त्यांच्या अहोंना जवळ जवळ तासभर आमची वाट पहात थांबावे लागले होते. रात्री मित्राकडे गेलेले पटवर्धन दांपत्यही येवून पोहचले होते. आम्हालाच उशीर झाला होता. मग पटापट पोहे खावून निघालो. प्रथम भैय्याने आणि मी लावलेली फळझाडे आणि आमचा देशी गाईंचा गोठा पाहीला आणि मग मोर्चा शेताकडे वळवला. 
20-2xgtg.JPG
पुर्वी जास्त गायी होत्या पण कामाच्या व्यापामुळे आता फक्त एक गिर आणि एक खिल्लार गाय ठेवली आहे. (फोटो: शाली)
सकाळचे दहा वाजले असावेत. हवेतला गारवा गायब झाला होता. बस सरळ शेतातच नेऊन उभी केली. खरं तर येथे चुल मांडून स्वयपाक करायचा प्लॅन होता पण तो ऐनवेळी सगळ्यांनी नाकारल्यामुळे आता नक्की असे काही नियोजन नव्हते. समोर शेवग्याची, डाळीबांची बाग होती. पलीकडे पपईचे रान होते. विहिरीवर पुर्ण जाळी बसवल्याने मुलांची काही चिंता नव्हती. त्यामुळे सगळ्यांना “आपलाच मळा आहे, जसे भटकायचे तसे भटका” असे सांगीतले आणि मी निवांत झाडाच्या सावलीला बसलो. सगळी मुले शेवगा आणि फुललेली डाळीबांची बाग पाहुन खुष झाली होती. भैय्याची गार्गीही त्यांच्यात मजेत मिसळली. त्यांच्याकडे आता खास लक्ष द्यायची गरज नव्हती. मग पुन्हा एकदा मानुषीताई, मानसीताई आणि इतर यांच्या अगदी गळाभेटी सुरु झाल्या. मायबोलीवर लेखातुन, प्रतिसादातुन एकमेकांना भेटणारी ही मानसे प्रत्यक्षात एकमेकांना भेटताना अगदी आनंदाने भरुन आली होती. मानुषीताईंनी त्यांचा ‘फेमस’ ड्रायफ्रुट फज आणला होता सगळ्यांसाठी. त्याची चव चाखत डाळींबाच्या बागेत तास दिड तास कसा गेला ते समजलेच नाही. मग शेवग्याच्या शेतात सगळ्यांनी शोधुन शोधुन भरपुर शेंगा तोंडल्या. थोड्या वेळाने सगळे पपईच्या शेतात पोहचले आणि लहान मुले अगदी हरखुन गेली. अगदी सहज हाताशी येणाऱ्या पपया पाहुन त्यांना आश्चर्य वाटले असावे.
21xgtg.jpeg
आमचे पपईचे शेत. (फोटो: जिप्सी)
22xgtg.jpeg
गटगसाठी पुढे ढकललेला पपईचा तोडा. (फोटो: जिप्सी)
20xgtg.jpeg
सगळ्यांना देण्यासाठी काढलेल्या पपया. पण प्रत्येकाने स्वतःला आवडेल तिच तोडली. (फोटो: शाली)
23xgtg.jpeg
शेताच्या बांधावर लावलेली तुर. (फोटो: जिप्सी)
सगळ्यांनी “आपलेच शेत आहे ना?” याची खात्री करुन घेतली आणि मग मनसोक्त पपया तोडल्या. भैय्याने सुरी मागवली होती पण ती यायचीही कुणी वाट पाहीली नाही. साधनाताईने बोटांनीच कशी अलगद पपई उघडता येते याचा शोध लावला आणि मग सगळ्यांची पपई खायची धांदल उडाली. तोवर सुरी येवून पोहचली होती. सुरवातीचा उत्साह आता बराच कमी झाल्यामुळे आणि तिन साडेतिन तास रानात भरपुर भटकल्यामुळे सगळे लिंबाच्या थंड सावलीत विसावले. निरुदांनी, उजुने आणि जागुताईने व्यवस्थीत पपई कापुन दिल्यावर सगळ्यांनी पुन्हा सावलीच्या गारव्याला बसुन पपई खाल्ली. मग झाडाखालीच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत, एकमेकांची टिंगल, मस्करी करत बराच वेळ काढला. मुलांचा मात्र अजुनही दंगा सुरु होता. शेवग्याच्या शेंगांच्या तलवारी करुन युध्दही पेटले. कांचनच्या मुलाने तर अगदी धमाल उडवली होती. त्याने आवाक्यात असलेली पपई पाहुन तिला दोन्ही हात लावले आणि निमित्ताला टेकलेली ती मोठी पपई धप्पकन त्याच्या अंगावर पडली. पोरगं बावरलं. त्यात त्याला कुणीतरी झाडाखालुनच ओरडुन सांगीतले “तुला आता ओरडनार सगळे.” तो आणखीच गांगरला. पण क्षणभर विचार करुन त्याने चटकन आजुबाजुचा पाचोळा उचलुन झटकन ती पपई झाकून टाकली आणि मी त्या गावचाच नाही असा चेहरा करुन सगळ्या मुलांमधे मिसळला. हे पाहुन आमची मात्र चांगलीच करमणूक झाली. त्याला पाहुन मला सारखी पलकच्या वेदची आठवण येत होती.
ऋग्वेद.jpg
ऋग्वेदने पपईला हात लावला आणि कुणीतरी तोच क्षण अलगद कॅमेऱ्यात टिपला. (फोटो: जिप्सी)
एकुन सगळ्यांची धमाल चालली होती. पपया खावून झाल्यामुळे आता प्रत्येकाने घरच्यांसाठी नेण्यासाठी भरपुर पपया घेतल्या. शेवग्याच्या शेंगाही मनासारख्या घेतल्या आणि आम्ही बसकडे वळालो. तरीही एकटा दुकटा सारखा मागे बागेत रेंगाळत होताच. उन्हं आता चढली होती. मी प्रत्येकासाठी आमच्या भागातला इंद्रायणी तांदुळ पॅक करुन ठेवला होता. ते पॅकेट बायकोने प्रत्येकाच्या हाती सोपावले. कुणी कुणी आणलेल्या भेटी आम्हालाही दिल्या. मानुषीताईने फज करुन आणला होता, तो आम्ही खाल्ला होताच पण जाताना काजुकतली आणि छान फरसान दिले. कांचननेही गुळाच्या पोळ्या (शेंगापोळ्या) आणल्या होत्या त्या दिल्या. डॉक्टरांनी खास औरंगाबादहुन शाल आणली होती ती दिली. उजूने आणि कांचने सुरेख पितळी दिवे आणले होते ते दिले. साधनाताईने मस्त मोबाईल पाऊच दिले, जागुताईने सुरेख आणि उपयोगी ‘सारी’ कव्हर आणि बॅग दिली. निरुदांनी अत्यंत उत्तम दर्जाची संत्राबर्फी आणली होती, मोनालीपने पौष्टीक ढोकळा पिठ जे तिचे स्वतःचे प्रॉडक्ट आहे ते आणले होते. कुणी कुणी प्रेमाने काय काय आणले होते. माझीही अल्पशी भेट सगळ्यांनी प्रेमाने स्विकारली होती. जे आले नाही त्या सगळ्यांची खुपदा आठवण काढुन झाली होती. आता निरोपाचा सोहळा उरकत आला होता.
25.jpg
डाळींब, शेवगा आणि पपई (फोटो: जिप्सी, शाली)
26xgtg.jpeg
कांचनची कलाकुसर. (फोटो: कांचन कुलकर्णी)
19-1xgtg.jpeg
आमच्या शेताचा समोरील भाग. हे शेत मी आणि भैय्या (कोदंडपाणी) मिळून करतो. (फोटो: कोदंडपाणी)
दुपार झाली होती. शनिवार रविवारचे अत्यंत महत्वाचे काम सोडून मी गटगला आल्यामुळे माझे लक्ष आता पुण्याकडे लागले होते हे तर खरेच, पण खरं तर “आता हे सगळे निघणार” या विचारांनीच मी जास्त अस्वस्थ झालो होतो. बायकोला बाजुला घेवून मी विचारलेही होते की मी जातो पुढे, यांना माझ्या मागे जायला सांग म्हणजे मला त्रास नाही होणार. पण “ते बरं दिसेल का?” म्हणत बायकोने मला थांबवून ठेवले होते. एखादा मित्र पुण्याला आला आणि सकाळी गेला तर मला दुसरा दिवस करमत नाही. येथे तर इतकी माणसे मुले दोन दिवस माझ्याबरोबर फिरत होती. आणि आता त्यांना निरोप द्यायचा होता. मी राहुन राहुन हा विचार करत होतो की कोण कुठली ही माणसे, आणि कुठे इतक्या जिव्हाळ्याने, प्रेमाने येवून भेटतात काय, सगळ्या गैरसोयींकडे दुर्लक्ष करुन माझ्या घरी आनंदाने रहातात काय! सगळेच अगम्य. ‘पुर्वजन्मीचे ऋणानुबंध’ मी मानत नसलो तरी अशा वेळी विश्वास ठेवावा वाटतो.
मानुषीताईंनी त्यांची कार आणली होती. त्यांना निरोप दिला. मानसीताईंनीही त्यांची कार आणली होती, त्यांचाही निरोप घेतला.
मग मी सगळ्यांना बळेच बसमधे बसवले. कुणाकुणाला ड्रॅगनफ्रुटचे फुटवे पाहीजे होते त्याचे एक लहानसे बोचकेच बसमधे टाकले. ड्रायव्हरला खुण केली आणि तो निघाला. माझ्या समोरुन बस शेतातली धुळ उडवत निघुन गेली. “कारे इतका लळा लावूनी नंतर मग ही गाडी सुटते?” ही कविता लिहिताना संदिपला आतुन किती तुटले असेल हे त्या दिवशी पुन्हा कळाले. 
गटग नंतर काही दिवसांनी ग्रुपवर गप्पा मारताना साधनाताई सहज मजेने म्हणाली की “त्या दिवशी अप्पाने आम्हाला फुटवले तेथुन” आणि मिही त्यावर काहीतरी मिश्किल उत्तर दिले होते. पण तिला काय सांगू की “हो खरच त्या दिवशी मी फुटवले होते सगळ्यांना. रेंगाळत निरोप घेतला असता तर कदाचीत मी लहान मुलासारखा सगळ्यांपुढे रडलो देखील असतो.”

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...