❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

इष्टापत्ती

इष्टापत्ती...
----------
सकाळपासून आठवत होतो पण मी ते फोल्डर कुठे सेव्ह केलय ते काही आठवत नव्हते. तसे फार महत्वाचे नव्हते पण मला ते आता हवे होते. शेवटी मित्राला फोन करुन क्लाऊडवर शेअर करायला सांगावे म्हणून फोन लावला. बराच वेळ रिंग वाजली. आता हा काही मोबाईल घेणार नाही म्हणून मी फोन कट करणार इतक्यात पलिकडून आवाज आला “हा बोल. कशीकाय आठवण काढली मधेच?”
“अरे मला २०१९ चे फोल्डर सापडत नाहीए. जरा तू क्लाऊडवर…” माझे वाक्य अर्धवट तोडत मित्र म्हणाला 
“तुला सांगतो अप्पा, आज काही मी बाबांना सोडत नाही. जरा बरी पाने येवूदे मग पहा. रमी माझीच आहे आज”
मला काही समजेना. हा काय आज बापाबरोबर पत्ते कुटत बसलाय की काय? तेही दुपारी? कसे शक्य आहे? 
मी गोंधळून म्हणालो “म्हणजे?”
शँपेन फेसाळावी तशा आवाजात मित्र म्हणाला “म्हणजे वाघाचे पंजे. अरे आज बाबांबरोबर रमीचे चार डाव टाकायला बसलोय. बाबाही असे आहेत ना, मी म्हणालो की गम्मत म्हणून खेळू तर नाही म्हणाले. पैजेवर नाही खेळली तर ती रमी कसली म्हणाले”
माझा आता पुरता गोंधळ उडाला होता. मला शंका आली की मित्राने चुकून अफू वगैरे तर खाल्ली नसेल ना? मी म्हणालो “अभी, नक्की काय चाललय? मला फोल्डर हवे होते.”
अजुनही त्याच उत्साहात मित्र म्हणाला “काही नाही रे. बाबा म्हणाले की ‘मी जिंकलो तर नेहाने बासूंदीचा बेत करायचा व तू जिंकलास तर हीने पुरणाचा घाट घालायचा. तुला सांगतो, कुणीही जिंकले तरी बेत माझ्याच आवडीचा होणार. बाबा संध्याकाळी फक्त साधे वरण व साळीचा भात खातात. तुला तर माहीत आहे.”
वाक्य पुर्ण करता करता मित्राचा गळा दाटल्यासारखा झाला. शेवटचे शब्द हुंदक्यात ऐकायला आल्यासारखे वाटले. 
मित्राचा भरलेला आवाज ऐकून मला जरा टेन्शन आले. काही तरी झालेय अशी सारखी शंका यायला लागली पण फोनवर काही न बोलता मी फक्त हूंकारलो “हं, बरं मग?”
फोनवर जरा वेळ शांतता पसरली. मित्राने स्वतःला सावरले असावे. आवाज पुर्ववत करत जरा हरवलेल्या आवाजात तो म्हणाला “अरे बाबांबरोबर शेवटची रमी खेळलो त्याला कितीतरी वर्ष झाली. लास्ट इयरला असताना रमी व चेस खेळायचो आम्ही टेरेसवर बसून. पहाट व्हायची रे मात शह देता देता. मग नोकरी, लग्न यातच गुरफटलो अगदी. या पंधरा वर्षात कधी चवीने घास खाल्याचे देखील आठवत नाही या धावपळीत.”
माझ्याकडे बोलायला काहीच नव्हते. काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो “असं काय करतो अभी, माझ्या समोरच आहे ना तुझा सगळा प्रवास”
मित्र म्हणाला “ते आहेच रे. तुला सांगतो अप्पा, रमी खेळायला बसलोय तर काय चेहरा खुललाय बाबांचा. स्मरणशक्ती दगा देतेय आजकाल त्यांना, तरीही काय बारीक लक्ष आहे त्यांचे गेमवर. आयुष्य असो नाहीतर रमी बाप शेवटी बाप असतो यार. या पंधरा वर्षात कधी बाबांबरोबर गप्पा मारत बसलो नाही की घटकाभर आईच्या आजूबाजूला रेंगाळलो नाही. बाबांनीही आयुष्यभर नोकरीच केली, पण आम्हाला कधी वेळ दिला नाही असे कधीच झाले नाही. मग मिच कशामागे धावतोय एवढा की आज बाबांसाठी माझ्याकडे वेळ नाही? ऑफीसमधून घरी आलो की पोरगी कॉलेजातल्या काय काय गमती सांगते पण मी न ऐकताच तिला नेहाकडे पिटाळतो. ती लहान असताना शाळेत काय शिकली आणि तिच्या कोण कोण मैत्रीणी होत्या मला काही माहित नाही. ती जबाबदारी मी नकळत नेहावर ढकलली. पण सकाळपासून पोरीच्या गमती जमती ऐकतोय, तिच्या प्रोजेक्टविषय ऐकतोय तर हरखून गेल्या सारखे झालेय अप्पा. अरे सिंदबादच्या सफरींसारखे सात खंड होतील इतके विषय आहेत पोरीकडे. मी कधी ऐकलेच नाहीत रे.”
फोनवर पुन्हा काही क्षण शांतता पसरली. मीही काही बोलून ती शांतता विस्कटली नाही. 
जरा वेळाने मित्र म्हणाला “या कोरोनाने खरे तर उपकारच केले माझ्यावर. नाहीतर माझा पाय कधी टिकला असता घरी? आणि जेव्हा टिकला असता तेंव्हा वेळ गेली असती. मी ठरवलय अप्पा, दोन चार दिवसात पुन्हा नेहमीचे रुटीन सुरु होईल. माझी धावपळ काही कमी होणार नाही हे त्रिवार सत्य आहे पण कॉलेजातून आल्यावर पोरीला जो उत्साह असतो ना मला सगळं सांगण्यात, त्याच उत्साहात आता मी घरी आलो की बाबांना सगळं सांगणार आहे. मी आठवडाभर ऑफीसला जातो व विकेंडला ऑफीस घरी आणतो. आता तसं न करता दर विकेंडला मी पोरीबरोबर तिच्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. आईबरोबर बसून अधून मधून तिचे जुने कपाट आवरु लागणार आहे. या कोरोनाने इतरांच्या चेहऱ्यावर मास्क घातला पण माझ्या मात्र डोळ्यात अंजन घातलं.”
मला मित्राचा कधी भरुन येणारा तर कधी उत्साहाने फसफसणारा आवाज ऐकून फार बरं वाटत होतं. मलाही उगाच भरुन आल्यासारखं वाटत होतं. एवढ्यात मित्र घाई घाईने म्हणाला “चल अप्पा, ठेवतो फोन. यावेळी दोन जोकर व एक प्युअर सिक्वेन्स आलीय हातात. ही रमी माझीच. आणि काळजी घे. बाहेर पडू नकोस उगाच. मी करतो नंतर तुला फोन.”

मला माझे फोल्डर नाही सापडले पण आत कुठेतरी, कधीतरी सेव्ह करुन ठेवलेले महत्वाचे फोल्डर आज मित्राला सापडले होते हे नक्की.

मंगळवार, २ जून, २०२०

रख कदम फुंक फुंक कर नादाँ...

अंधश्रध्दा ही केंव्हाही वाईटच. या बद्दल कुणाचेच दुमत नाही. पण गेले काही वर्ष मी एका अंधश्रध्देची गोड फळे चाखतो आहे. मीच काय आमची सगळी सोसायटी या अंधश्रध्देमुळे खुष आहे.

पुणे जसजसे वाढत गेले तसतसे बिल्डरलोकांचे उपनगरांकडे जास्त लक्ष जावू लागले. अनेक शेतकऱ्यांनी आपली जमिन विविध बिल्डर्सला देऊ केली. आमच्याही जागेच्या मालकाने स्वतःची बरीच जमिन बिल्डरला डेव्हलप करण्यासाठी दिली. पण ही जमिन देताना जमिनमालकाने परंपरेने चालत आलेल्या श्रध्देला मात्र दुर लोटले नाही. या शेतकऱ्याच्या सलग काही एकरमधे पसरलेल्या शेताच्या मधोमध अगदी जुनी असलेली आंबा, लिंब, पिंपळ, बाभूळ या सारख्या मोठ्या झाडांचे एक बेट आहे. त्यात कडेवर असलेल्या एका प्रशस्त लिंबाच्या झाडाखाली चिऱ्याचे बांधकाम केलेली छोटेखानी विहिर आहे. या विहिरीच्या शेजारीच गोल गरगरीत दगडाला शेंदूरलेपन केलेली एक देवता आहे. नाव असेच काहीतरी अगम्य आणि कुणाला शिवी देण्यासाठी वापरावे असेच आहे. या देवाच्या तिनही बाजुने आकर्षक आणि चमकदार टाईल्सने सजवलेल्या तिन-साडेतिन फुट उंचीच्या तिन भिंती आहेत. वरती छप्पर नाहीच. ते काम वृध्द लिंबाचा फांद्या आणि पानांचा संभार पार पाडतो. देवासमोर अगदी छोटीशी पितळी घंटा आहे. तिही झाडाच्याच एका आडव्या फांदीला देवासमोर येईल अशी टांगलेली आहे. समोर चांगला पन्नास फुट बाय चाळीस फुटांचा शहाबादी फरशीचा प्रशस्त आणि बसका ओटा आहे. हा देव येथे एकटाच बसलेला नाही. त्याच्या सोबत कुणाच्या तरी घरची भंगलेली लक्ष्मी आणि लाभलेला एक गणपती देखील आहे. वृध्दाश्रमात किंवा अनाथालयात सोडावे तसे कुणीतरी त्यांना येथे आणून सोडलेले आहे. या गणपती लक्ष्मीच्या मुर्तींवर असलेले डाग त्यांनी भोगलेले हळदी-कुंकवाचे, पंचामृत-नैवेद्याच्या सोहळ्यांची ग्वाही देतात. आता मात्र त्यांच्या इंचभर नैवेद्याची जबाबदारी सांगताच आमच्या सोसायटीतील काही लोकांनी घेतली आहे. लिंबाच्या झाडाखाली गणपती लक्ष्मीच्या जोडीने नांदणारा हा तेजस्वी शेंदरी देव आजुबाजूच्या शेतावर पर्यायाने सोसायटीवर लक्ष ठेवून असतो. राखण करत असतो. त्याबदल्यात वर्षातुन चार महत्वाच्या सणाला त्याला चार बोटे आकाराची पुरणपोळी, एखादे भजे, कुरडईच्या चार काड्या इत्यादी चालते. तसा हा देव स्वस्तात काम करणारा असला तरी आहे मात्र उग्र. टिचभर पुरणपोळीच्या बदल्यात बरकत देणाऱ्या या देवाच्या अवती-भोवती असलेल्या छोटेखानी देवराईतील एखादे झाड जर कुणी तोडले तर तो त्याच्या घरातील कर्त्या व्यक्तीला आयुष्यातून उठवतो. याचा अनुभव जमिन मालकाच्या पुर्वजांनी घेतला आहे असे मालकच सांगतात. “त्याचा निवद त्याला दिला की मंग त्याचा आपल्याला काही तरास नाही. उलट राखणच करतो तो सगळ्या बारदान्याचीअसं म्हणत मालकांनी अगदी सहज एकर-दिड एकर जमिनिवरील देवराई या देवासाठी सोडून दिली आहे. ‘पेरत नाही तो शेतकरी पापीअशीही एक अंधश्रध्दा या मालकांच्या मनात असल्याने देवराईतील काठोकाठ भरलेल्या विहिरीवर तेपाप लागू नयेम्हणून थोडी शेतीही करतात. बरं, या मालकाची मुलेही अशीच अंधश्रध्दाळू निघाल्याने त्यांनीही हीच परंपरा पुढे चालवत त्या जमिनिवरील देवराईला हात लावला नाही. त्यामुळे तिनही बाजुला असलेल्या दहा बारा मजली सोसायट्यांच्या मधे असलेले हे देवराई लहान शेताचे हिरवे बेट उठून दिसते. या ओट्यावर सकाळी मॉर्निंग वॉक करणारे विश्रांतीसाठी बसतात. संध्याकाळी निवृत्त मंडळी गप्पा मारत बसतात. काही आया मुलांना येथेच खेळायला आणतात. झाडे, फुले, पक्षी, किडे दाखवतात. मुख्य रस्त्यापासुन अर्धा किलोमिटर आत असल्याने येथे ट्रॅफीकचा किंवा इतर कोणताही मानव निर्मित आवाज सहजी पोहचत नाही. येथे या देवराईच्या आश्रयाने पक्षांची, किड्यांची छान समृध्द अशी जीवनसाखळी सुखेनैव नांदत आहे. जोपर्यंत मालकांच्या मनातून किंवा त्यांच्या मुलांच्या मनातून ही अंधश्रध्दा जात नाही तोवर हे सगळे जीव येथे असेच सुखाने नांदतील. आता जर कुणी अंधश्रध्दा दुर करणारा मालकांना भेटला आणि त्याने या कुटूंबाच्या मनातील ही अंधश्रध्देची भिती दुर केली तर मात्र या देवराईचे काय होईल हे सांगता येणार नाही. जमिनीच्या मालकांना असाच कुणी ज्ञानामृत देणारा भेटत नाही तोवर नकोसे झालेले हे गणपती-लक्ष्मी आणि दहशतीच्या जोरावर नैवेद्य वसुल करणाऱ्या या शेंदऱ्या देवाच्या कृपेन ही जैवसाखळी तुटता अशीच सुखेनैव चालत राहील. उद्याचे कुणी पाहीले आहे? दिसत असुनही कुणी उद्याचे पहात नाही. निदान निसर्गाच्या बाबतीत तरी नाही.

या देवराईत विविध झाडांसोबत अनेक लहान मोठी झुडपे, गवत फोफावलेले आहे. या झुडपांच्या गवताच्या आधारावर अनेक प्रकारचे लहान मोठे किडे, नाकतोडे, मुंग्या, पाकोळ्या, फुलपाखरे, पतंग यांची खुप समृद्ध वसाहत नांदते आहे. या किड्यांच्या वसाहतीवर कित्येक प्रकारचे पक्षी उदरनिर्वाह करत वावरत, विहरत असतात. एकुनच या देवराईमुळे एक सुंदर जैवसाखळी येथे सुखेनैव नांदत असते, वाढत असते. पक्ष्यांच्या शिळेचा मागोवा घेत, मान वर करुन चालताना किती पायवाट तुडवली जाते याचे जसे येथे भान रहात नाही तसेच मान खाली घालून जमीनीवरील जीवांचे विश्व न्याहाळत चालतानाही आजूबाजूची जाणीव शिल्लक रहात नाही. हे लहानसे विश्व पहाताना सगळा जीव डोळ्यात येतो हाताची बोटे तोंडात जातात.


रोज सकाळी मी साधारण पाच किलोमिटर चालतो. त्यातले तिन किलोमिटर मी मजेत चालतो शेवटचे दोन किलोमिटर अक्षरशः शरीर ढकलत पार करतो. पण देवराईत शिरलो की किती चाल होते ते समजतच नाही. ऍप कधी सहा किमी दाखवते तर कधी सात. दोन तास अगदी दोन मिनिटांसारखे निघून जातात. मात्र पायाखाली पहात चालायचे म्हटले की तासाला विस फुट इतकी चाल मंदावते. गवताच्या इवल्या इवल्या पानांखाली एक विश्व सुखेनैव नांदत असते. येथे अव्याहतपणे धावपळ सुरु असते. या पानांखाली कोण घर बांधत असतो, कोण शिकार करत असतो तर कुणी शिकार होत असतो, कुणाचे प्रीयाराधन चाललेले असते तर कुणी मध, पराग वगैरे गोळा करण्यात गुंग असते. प्रत्येकजण कशात ना कशात मग्न असतो. हे सगळे पाहीले की थक्क व्हायला होतं. या गवताखाली यांचे विश्व बहरत असते तर तृणपात्यांवर सकाळी सकाळी दवबिंदूचा असा काही नजारा असतो की विचारु नका. एखाद्या जवाहीऱ्याच्याही दुकानात इतक्या नजाकतीने मांडलेले हिरे नसतील एवढी दौलत येथे पाना पानांवर विखुरलेली असते. प्रत्येक पान अगदी हिरेजडीत झालेले असते. त्यामुळे येथे पाऊल टाकायला मला नेहमीच भिती वाटते. इतर वेळी झपझप चालत असताना आपल्या पावलांखाली किती जणाचे जीव, कष्ट चिरडले जात असतील असे वाटून जाते. “उन्हे होश तक ना आया, मेरी लुट गयी जवानीकाहीसा असाच प्रकार होत असावा. आपण टाकलेली दोन चार पावले या कृमी किटकांना अगदी मातीत मिळवत असतील आणि त्याची आपल्याला जाणीवही होत नसेल. मी जेवढे जास्त बारकाईने या जगाकडे पाहीले तेवढे मी काळजीपुर्वक पाऊल टाकायला लागलो. या लहानग्यांचे हे लहानसे विश्व पाहीले की मला एक शेर आठवतो. अगदी समर्पक अशा ओळी आहेत.

रख कदम फूंक-फूंक कर नादान
जर्रे-जर्रे में जान है प्यारे।


Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...