❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

पारध



मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन यावे लागते. या देवराईत जाऊन बसणे हा माझा आवडता छंद. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी रोज मी हजर असल्याने तेथल्या बहुतेक पक्ष्यांचा व माझा परिचय झाला होता. कुठे खुट्ट वाजले तरी लाह्या उधळाव्या तशा चौफेर भिर्र उधळणाऱ्या मुनिया माझी चाहूल लागूनही कणसे टिपत रहायच्या. हे सगळे पक्षी माझ्या दिनचर्येचाच एक भाग झाले होते व त्यांच्या दिनचर्येचा मीही एक छोटासा भाग होतो. प्राण्यांनी, पाखरांनी आपल्याला असं निर्धास्त होऊन स्विकारावं, त्यांना आपली भिती वाटू नये या सारखी दुसरी सुखावणारी भावना नाही.
मला पाहून येथले पक्षी कधी घाबरत नसले तरी कधी जवळ मात्र आले नाहीत. त्यांनी आमच्यातले अंतर नेहमी राखले. मात्र याला अपवाद तिघे जण होते. ईंडीयन रॉबीन, बॅबलर व ओरिएंटल रॉबीन. हे तिघेही माझी वाट पहायचे चक्क. खास करुन माझ्या गाडीची. मी देवराईत गाडी पार्क केली की पाचव्या मिनिटाला एक रॉबिन यायचा व गाडीच्या छतावर बसून रहायचा. त्याला त्यात काय आनंद मिळे माहित नाही. एखाद्या किल्लेदाराने बुरुंजावर उभं राहून अभिमानाने किल्ल्याचा परिसर न्याहाळावा तसा तो माझ्या गाडीच्या छतावर उभा राहून आजूबाजूची देवराई निरखत रहायचा. मधेच जमिनीवर उतरुन मातीत काहीतरी शोधायचा व पुन्हा आपल्या बुरुजावर येऊन छाती काढून उभा रहायचा.
दुसरा होता ओरिएंटल रॉबीन अर्थात दयाळ. माझी गाडी पार्क झाल्यानंतर हा पाच दहा मिनिटातच हजर व्हायचा. हा कधी गाडीजवळ किंवा माझ्या जवळ फिरकला नाही. गाडी जेथे पार्क असे तेथे शेजारी स्टोअर रुमची भिंत होती. हा त्या भिंतीच्या टोकावर बसायचा व खुप मंजूळ आवाजात शिळ घालायचा. त्याचे हे गाणे गाडी जोवर तेथे उभी असायची तोवर चालायचे. मधे मधे तो उड्या मारत नाचतही असे. मी ज्या दिवशी गाडी न नेता पायी जाई, त्या दिवशी तो यायचा नाही. त्याच्या चोचीवर दोन मोठ्ठे ओरखडे होते. हा मला कधी कधी रस्त्याच्या पलिकडे असलेल्या बागेतही दिसायचा. तेंव्हा मात्र तो ओळख देत नसे. अर्थात माझी चाहूल लागली तरी तो निर्धास्त असे. हिच त्याने दिलेली ओळख आहे यावर मी समाधान मानत असे.
तिसरा होता बॅबलर. सातभाई. होता म्हणजे होते म्हणायला हवे. कारण यांचा सात जणांचा लहानसा थवा होता. कधी कधी ते पाचच असत. सातपेक्षा जास्त मात्र कधी एकत्र दिसले नाहीत. हे फार आतूरतेने माझ्या गाडीची वाट पहात. गम्मत म्हणजे मी कधी पायी चालत गेलो व नेहमीच्या ठिकाणी बसलो की हे सातही सातभाई माझ्या समोरच्या जमिनीवर उतरत व प्रचंड कलकलाट करत. यांचा कलकलाट नळावरच्या भांडणालाही लाजवेल असा असतो. डोकं शिणतं अगदी. नक्की काय ते माहित नाही पण माझा अंदाज आहे की ते मी गाडी न आणल्याचा निषेध नोंदवत असावेत. यांचा असा समज होता की माझ्या गाडीत यांच्या शत्रूपक्षाचे सातभाई प्रवास करतात. गाडी बंद करुन मी बाहेर येईपर्यंत हे सातभाई माझ्या गाडीवर झेपावत व आरश्यावर हल्ला करत. हा हल्ला अगदी नियोजन करुन असे. यांच्या दोन तुकड्या असत. प्रथम पहिली तुकडी आरश्यावर हल्ला करी. नंतर ते दमले की गाडीच्या बॉनेटवर बसत व त्यांची जागा दुसरी तुकडे घेत असे. दोन्ही तुकड्या दमल्या की मग यातले दोघे दोघे मिळून आरशाजवळ खिडकीच्या काचेजवळ कसेबसे बसत व आरशातल्या शत्रूंचा अंदाज घेत. त्यांना निरखत.
हे सगळं आठवायचे कारण म्हणजे काल दुपारी मी सहज मळ्यात चक्कर मारायला गेलो होतो. उन्हं तापायला लागली आहेत. ओढ्याच्या काठी असलेल्या अंब्याच्या झाडाखाली छान गारवा मिळतो. फिरत्या पंख्याखाली दुपार घालवण्यापेक्षा आंब्याच्या झाडाखाली काही रेखाटत बसायला जरा बरं वाटतं. मी नुकताच झाडाखाली टेकलो होतो. एवढ्यात समोरचा ओढा चढून चार मुलं वर आली. उन्हाच्या तिरपीमुळे मला ती व्यवस्थित दिसली नाही. माझ्यासमोरुन जाताना मला त्यांच्या हातातल्या गलोली दिसल्या. वाटलं सशे वगैरे मारत फिरत असतील मळ्यात. मी हाक मारुन त्यांना थांबवले.
“काय मग, घावला का एखादा ससुला?” अशी चौकशी केली.
पोरं हसून म्हणाली “सशे नाय गावत या टायमाला. पाखरं मिळत्यात मोप.”
मलाही वाटले, चला काही ना काही मिळतेय यांच्या पोटाला ते बरे आहे. निसर्ग कुणाला उपाशी ठेवत नाही. उत्सुकता म्हणून मी विचारलं “काही मिळालय का सकाळपासून?”
“ह्ये आत्ताच तं आलोय सायेब. लगीच कुटं काय मिळतय. दोन पाखरं पडली फक्त.” असं म्हणत त्या मुलाने खिशात हात घातला व दोन पाखरे काढून माझ्या समोर धरली. ईतक्या वेळ मी अगदी सहजतेने त्यांच्या बरोबर बोलत होतो. मला तोवर या प्रसंगाचे गांभिर्य समजलेच नव्हते. त्याने पुढे केलेला हात पाहीला मात्र काळजात दुखल्यासारखंच झालं. त्याच्या तळहातावर एक दयाळ व एक सातभाई होता. दयाळ शांत झोपल्यासारखा वाटत होता. सातभाईची मात्र चोच तुटली होती. ते पाहून घशात आंवढाच आला. तो दाबताना गळ्याची घाटी दुखावल्यासारखी झाली व मेंदूपर्यंत कळ गेली.
काय बोलायचं आता या मुलांना? तरीही मी म्हणालो “अरे जी पाखरे खात नाहीत तुम्ही, ती कशाला मारता? जी हवीत तिच मारा”
ती कलेवरे खिशात ठेवत ते पोरगं म्हणालं “ही खायलाच पाडलीत सायेब. अजुन पाचसहा मिळाली की ईथच कुटंतरी जाळ करु व भुजून खाऊ”
यासारख्या पोरांनी असे कितीही दयाळ मारले, सातभाई मारले किंवा ईतर लहान पक्षी पाडले तरी पक्ष्यांच्या संख्येवर याचा काही फारसा परिणाम होणार नाही. तसेही या मुलांचा हा पिढ्यान पिढ्यांचा पोट भरण्याचा मार्ग आहे. हे सगळं कितीही खरं असलं तरी ते मला काही पटेना. आजचा दिवस वाईट जाणार. फोटो काढावासा वाटेना तरीही म्हटलं असुदे एखादा फोटो रेकॉर्डला. तरीही फोटो काढताना क्लिकचे बटन दाबायला मन धजेनाच. शेवटी त्या मुलाला दयाळची व सातभाईची मान फिरवायला सांगितली व मग फोटो काढला. बिचारे दयाळ व सातभाई.
कधी कधी वाटतं की माझ्या काळजात ‘निसर्गाची, पक्ष्या-प्राण्यांची ओढ’ ईन्स्टॉल करण्याऐवजी ईश्वराने ‘शिकारी व लाकूडतोड्याची वृत्ती’ ईन्स्टॉल केली असती तर बरं झालं असतं. उगाच एवढ्या तेवढ्यावरुन हे काळजात काटे घेऊन फिरलो तरी नसतो.
(फोटोतला दयाळ व सातभाई हे वर उल्लेख केलेलेच आहेत.)









100% Natural Organic Body Scrubber Loufah Sponges

पंधरा दिवसांखाली जरा जास्तच थंडी पडली होती. थंडी कमीच होती पण बोचरं वारं वहात होतं सकाळपासून. दुपार झाली तरी हवेतला गारवा कमी होत नव्हता. मग दुपारीच सिम्बाला घेऊन मळ्यात गेलो. ओढ्याच्या काठावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली उन्हाला पाठ देऊन बसलो. समोरच्या रानात मावशीची लगबग सुरु होती. आम्हाला पाहून तिने हाताने बसायची खुण केली पण ती आली मात्र नाही. ओढ्याच्या कडेकडेने शेताला अगदी लागूनच पाच सहा शिंदीची झाडे होती. तेथे तिची काहीतरी खटपट सुरु होती. जरा वेळाने मावशी आली व हुश्श करत पदराने चेहरा, गळा पुसत सिम्बाशेजारी टेकली. सगळ्या लुगड्यावर जळमटं, काटक्या वगैरेंचा कचरा. डोक्यावरच्या पांढऱ्या केसांच्या कापसातही वाळली पाने, पाकळ्या वगैरे अडकलेलं. मी काही विचारायच्या आतच मावशी म्हणाली “लय झाडूरा माजलाय. त्यात आमच्या म्हताऱ्याला नाय उद्योग. मरणाची घोसाळी अन् डांगरं लावलीत. सगळ्या येलींनी बांध आन् वढा येरगाटलाय. काय करायच्चीत ती घोसाळी. उगा अशीच वाळून झुंबरं व्हत्यात त्यांची.” मी म्हणालो “जेसिबी का नाही मागवत सरळ? काढून टाक ती शिंदीची झाडं.”
मावशी उत्साहाने म्हणाली “धाकट्याला तेच सांगितलय मी या टायमाला. काय कामाची हाय सिंदाडं? ना खायच्या कामाची, ना सावलीच्या कामाची. जेसिबीच बोलावलाय सुताराचा. पण त्येला म्हणलं गव्हू निघूंदे. चार सिंदाडापायी माझा गव्हू मोडायचा नायतर. ते सुतार म्हंजे ‘अडाण्याचा आला गाडा आन् तुमचा आड बाजूला काढा’ असं हाय. नुसतं हेंबाडं हाय. काम वाढून ठिवायचं उगा”
मग अर्धा तास बसल्यावर मीही मावशीबरोबर वेली ओढायला गेलो. तेवढीच तिला मदत. सिम्बाला तर अशा वेळी भयानक उत्साह असतो. मावशीने बहुतेक सगळ्या वेळी छाटल्या होत्या. ओढायच्याच बाकी होत्या. वेली ओढताना त्यांचा पसारा किती दुरवर व वरती सिंदाडाच्या टोकापर्यंत पोहचलाय ते समजत होतं. वेली काढून बाजूला ढिग केला. वर पाहीलं तर शिंदीच्या झाडावर चांगली हात हातभर लांबीची वाळलेली घोसाळी लटकली होती.
मावशीला म्हटलं “मावशे जेसिबी आला की तेवढी पाच सहा घोसाळी ठेव माझ्यासाठी बाजूला. जाळात नको टाकूस. तेवढीच अंगघासणीला होतील.”
काल संध्याकाळी ओढा उतरून पलिकडच्या कोबीच्या रानात जाणार होतो ईतक्यात मावशीने मागून हाकारा घातला. वळून पाहीले तर हातातलं खुरपं हलवत मावशी आंब्याकडे जायला सांगत होती. मग पुन्हा ओढा ओलांडून अलिकडे आलो व आंब्याकडे वळालो. आंब्याखाली पोहचलो तर तेथे आंब्याच्या खोडाला टेकवून पाचसहा दांडगी घोसाळी ठेवलेली होती. मावशी थकली असली तर स्मरणशक्ती भारीय तिची. तिने निवडून घोसाळी ठेवली होती. सिम्ब्याला लिश नव्हती. त्याचे लक्ष गेल्यावर त्याने एका उडीत ती घोसाळी गाठली व मी त्याला आवरायच्या अगोदर त्यातल्या तिन घोसाळ्यांना त्याने दात लावलेही. त्याला ते खुळखुळे प्रचंड आवडले होते. मग उरलेली दोन घोसाळी घेतली व बाकीची तिन दोरीत बांधून गळ्यात टाकली. पुर्वी बॅंडमधे स्टिलचे दोन मोठे खुळखूळे घेतलेला एक माणूस असायचा. अगदी त्याच्यासारखे दोन घोसाळ्याचे खुळखूळे वाजवत मी पुढे व मागे वरातीचा घोडा जसा पावले आपटत नाचतो तसा नाचत सिम्बा अशी आमची वरात घराकडे निघाली.
दुसऱ्यादिवशी मळ्यात गेल्यावर मावशीने ती घोसाळ्याची जाळी कशी मऊ करायची याची पद्धत सांगितली. “ध्यान देवून कर, नायतर तशीच तुकडं करुन घेशीन आणि आंग सोलपटल्यावर बश्शील गागत” असं म्हणत तिने तंबीही दिली. अर्थात आम्ही लहानपणी या जाळीचे अनेक प्रकार करायचो. पेन स्टॅंड, वॉल हॅंगिंग, अंग घासण्या वगैरे. बहिणींना या जाळ्यांच्या पर्स करुन देणं तर कंपलसरी असे आम्हाला. ईतक्या वर्षांनी ती जाळी अशी हाताला लागल्याने मजा वाटत होती. त्या उत्साहातच मी मावशीला म्हटलं “एवढं बयाजवार सांगतीय तर तुच का करुन दिल्या नाहित घासण्या? आणि एक कर, या घासण्या ऍमेझॉनवर टाक. लोकं उड्या मारतील त्यांच्यावर.”
“लोकं खुळीच झाल्यात आजकाल” म्हणत मावशी तिच्या कामाकडे वळली.
मी बसल्या बसल्या सहज ऍमेझॉन उघडले. हायला तेथे गोवऱ्या विकायला असतात, मग काय सांगावं या जाळ्याही काहीतरी भारी नावाखाली असतील विकायला. आणि गम्मत म्हणजे घोसाळ्यांच्या या जाळ्या तेथे उपलब्ध होत्या आणि त्या खाली लोकांनी चक्क रिव्ह्यूज लिहिले होते.
मावशी म्हणते ते खरच्चे. लोकं खुळी झालीत आजकाल. काऊ डंग केक च्या नावाखाली गोवऱ्या विकत घेतात आणि रिव्ह्यूजमधे ‘टेस्टलेस ऍन्ड ड्राय केक’ असं लिहून एक स्टार देतात.
😂😂



होलम राजा

जेजुरीला माघी पौर्णिमेच्या निमित्ताने विविध भागातून काठ्या येतात. आमच्या भागातली काठी संगमनेरहून निघते व पौर्णिमेला जेजुरीला पोहचते. गावाबाहेर एकादशीच्या रात्री नऊ साडेनऊच्या आसपास जागरण उभं रहातं. खंजीऱ्या तापवल्या जातात, तुणतुण्याच्या तारा ताणल्या जातात, कडक चहाने गळे शेकले जातात व मग ऐसपैस चौक भरुन जागरणाला सुरवात होते. हे जागरण हळूहळू टिपेला जात नाही. याची सुरवातच मुळी टिपेच्या सुरांनी होते आणि सुरांची ती पट्टी पहाटपर्यंत सांभाळली जाते. तासा दोन तासाला बाजूच्या शेकोटीवर उतरलेल्या खंजीरी पुन्हा तापवल्या जातात. तुणतुण्याच्या खुंट्या आवळल्या जातात. वाघ्यांच्या काळजात प्रत्यक्ष खंडेराया भंडारा फासून ठाण मांडून बसलेला असतो, त्यामुळे त्यांना गळा गाता ठेवायला कोणत्याही खुंट्या आवळाव्या लागत नाही. दहा अकरापर्यंत आजूबाजूचे शेतकरी जेवणं वगैरे उरकून मग निवांत जमायला सुरवात होते. मग वाघ्यांना अजुन जोर चढतो. खंडेरायाचे गुणगाण गाताना त्यांच्या नरड्याच्या शिरा तरारुन फुगतात. खंजीरीवर नाचणारी बोटांची टोके लाल होतात. कपाळावर माखलेल्या भंडाऱ्यातून घामाच्या धारा वाट काढत छातीवर उतरतात. बाणाईचे व म्हाळसेचे भांडण आता खळीला आलेले असते. लोक तल्लीन होऊन ते भांडण ऐकत असतात. ‘सवती सवतींच भांडाण, मधी भक्तांचं कांडान’ ऐकताना नकळत लोकांच्या माना डोलायला लागतात. या कष्टकरी लोकांच्या संसारातही कटकटी असतात व परमार्थातही कटकटी असतात. यांचा खंडोबाही या घरधनीनींच्या त्रासातून सुटलेला नसतो. यांचा देवही यांच्यासारखाच असतो. हे जागरण पहाटेपर्यंत अगदी कळसाला पोहचते आणि थंड वाऱ्याच्या झुळकींसोबत काठी गावाच्या वेशीवर येते. मग या काठ्यांची आरती होऊन जागरण संपते. पालखीच्या भोयांनी जरा विश्रांती घेतली की मग सकाळी नऊच्या आसपास या काठ्या भंडाऱ्याच्या पिवळ्या ढगांवर तरंगल्यासारख्या गावाच्या वेशीतून आत शिरतात. मग सुरु होतो या उंचच उंच काठ्या नाचवण्याचा खेळ. हलग्या घुमायला लागतात, भंडाऱ्याने आसमंत माखून जातो व त्या गर्दीतून या काठ्या बेभान खांदे बदलत बदलत गावमारुतीपर्यंत येतात व भावविभोर झाल्यासारख्या मारुतीच्या देवळाच्या छपरावर मोरपिसांचे गुच्छ टेकवून झुकतात. येथे पु्न्हा आरती होते व या काठ्या पुढे जेजुरीकडे रवाना होतात.
या काठ्या एकदा जेजुरीकडे रवाना झाल्या की मग हौशी लोकांचा होलम सुरु होतो. जिकडे तिकडे उथळ काहील्या जिलेब्यांनी घमघमतात. गोल कांदाभजीचे घाणे निघायला सुरवात होते. रेवड्या व गुडीशेवेची मोठमोठी ताटे रिकामी व्हायला सुरवात होते. दुपारी बारा वाजताची जिलेबी भजी ही बाहेर जाऊनच खायची असते. संध्याकाळी पाच वाजताची जिलेबी मात्र घरी आणून मठ्ठ्याचे ग्लास रिकामे करत खायची. रात्री आठ वाजेपर्यंत आमचा हा होलम शांत होतो. आता उन्हाळ्याची सुरवात झालेली स्पष्ट जाणवते व वेध लागतात चैत्रात येणाऱ्या आमच्या यात्रेचे.
माणसाच्या असंख्य गुणांपैकी मला त्याचा हा उत्सवप्रीय स्वभाव प्रचंड आवडतो. देव आहे की नाही या भानगडीत मला पडायचे नाहीए. असेलही किंवा नसेलही बापडा. पण ‘तो आहे’ या विश्वासावर ज्या यात्रा, जत्रा-खेत्रा, उरुस, संदल, सणवार, वारी-पालख्या, प्रथा-परंपरा वगैरे गुंफलं गेलय ते फार फार सुंदर आहे. त्यासाठी तरी मी ‘देव आहेच’ म्हणेन. माणसांमधली ही उत्सवप्रीयता व उत्साह असाच चिरकाल टिको. माणसांचा देव मानसावर सदैव असाच प्रसन्न राहो.










बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

गावाकडच्या गोष्टी

पुण्या-मुंबईत राहून मी गावाकडच्या अनेक गोष्टींसाठी गहिवरुन यायचो. तास तासभर बायकोला काहीबाही सांगत रहायचो. “झालं याचं सुरु!” असं म्हणत बायको जरी मला झटकत असली तरी माझा उद्देश तिला ऐकवण्याचा नसतोच, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. तिच्या निमित्ताने मी स्वतःशीच या गोष्टींची उजळणी करुन घेतो. अर्थात यामागे “आमच्या काळी यंव अन् त्यंव” किंवा “तुम्हा शहरातल्या लोकांना काय माहित गावची मज्जा” असला काहीही सुर नसतो. त्या त्या गोष्टी माझ्या आनंदाचा ठेवा असतात आणि मी त्यांची आठवण काढत रमतो एवढाच या बडबडीचा अर्थ असतो. गाव सोडून पोटामागे जे शहरात आलेत त्या बहुतेकांची कधी ना कधी ही बडबड असतेच असते. ज्यांचं बालपणच शहरात गेलय त्यांना मुळातूनच या गोष्टी, वस्तू, पदार्थ वगैरे माहित नसल्याने त्यांना त्या अभावाचा पत्ताच नसतो.
या गोष्टींमधे लहानपणच्या खेळांपासून ते त्यावेळी आम्ही वापरलेल्या शाईपेन व लाल-निळ्या खोडरबर पर्यंत काहीही असते. पण मुख्य असतात ते खाण्याचे पदार्थ व ते करण्याच्या पद्धती. हा नॉस्टेल्जियाचा झटका महिना पंधरा दिवसातून एकदा येतोच येतो. तो झटका आला की मग रविवारी आयतं समोर आलेलं फ्रेंच ऑम्लेट असो की बंबईय्या अंडा घोटाला असो, बेचवच लागतं. गाईच्या शेणात लपेटून चुल्हीच्या आ(हा)रात भाजलेली गावठी अंडी आठवतात व त्यापुढे फ्रेंच ऑम्लेट अगदी सपक लागतं. गम्मत म्हणजे ही तुलना आजच्या पोरांना सांगायची सोय नसते. कारण ती चव तर त्यांना माहित असायचे दुरच, अंडी अशाप्रकारे शेणात लपेटून भाजतात हेच त्यांना माहित नसते. गाय दोहताना (धुताना) रिकामा पितळी ग्लास घेऊन धार काढणाऱ्याच्या शेजारी उकीडवे बसण्यातली मजा पोरांना माहित नसतेच, शिवाय असे धारोष्ण दुध प्यायल्यावर येणाऱ्या पांढऱ्या मिशाही त्यांना माहित नसतात. ‘धारोष्ण’ म्हणजे काय येथून त्यांचे प्रश्न सुरु होतात. एकदा मी धारोष्ण म्हणजे काय ते सांगुन ते दुध किती गोड लागते हे सांगायच्या अगोदर मुलांनी तोंडे वाकडी केली होती. त्यांना असं गायीच्या सडातून दुध काढून ते लगेच पिणं हा प्रकारच विचित्र वाटला होता, अनहायजेनिक वाटला होता. आज या गोष्टी कौतूकाच्या झाल्या असल्या तरी गावी मात्र आजही या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आहेत. गावी घरातली मुलंच काय, मांजरही धारोष्ण दुध पिते. जे दुधाचे तेच तुपाचे, तेच मधाचे व तेच रानमेव्यांचे. शहरातल्या मुलांना मधाचे पोळे मधाच्या बाटलीवर असलेल्या स्टिकरवरच पहायला मिळते किंवा ईमारतीच्या नवव्या दहाव्या मजल्यावर असलेले मधाचे पोळे दुरुन दिसते. गावी जरी दुकानात मध मिळत असला तरी तो फार तर सत्यनारायणाच्या पुजेसाठी आणला तर आणतात. खाण्यासाठी मध हवा असला की डोंगरात निरोप पाठवायचा. दोन दिवसात अस्सल मध घरी पोहचतो. या डोंगरातल्या माणसांकडे स्टिलची पिंपे भरुन अस्सल मध साठवलेला असतो. त्यातही कुणाला खास मध हवा असेल तर त्या त्या सिजनच्या अगोदर निरोप धाडला की मधाची बाटली पोहच होते वेळेवर. मग कुणाला औषधासाठी कडुलिंबाच्या रानातला मध हवा असतो तर कुणाला मोहाच्या सिजमधला मध हवा असतो. प्रत्येकाची चव वेगळी, रंग वेगळा व औषधी गुणधर्मही कमीजास्त असतात. मॉलमधल्या मधात असले पर्यात नाहीत. असले तरी ते अवाच्या सवा महाग. त्यातही खात्रीने मिळेलच असेही नाही. अगदी साध्या साध्या गोष्टींची वाणवा असते शहरात. फळबाजारातून कितीही कौतूकाने ड्रॅगन फ्रुट आणले तरी त्याला गावाकडच्या फड्या निवडूंगाच्या बोंडाची सर य़ेत नाही. आणि शहरी पोरांना मुळात फड्या निवडूंगाचे बोंडच माहीत नसल्याने त्यांना त्याचा अभावही जाणवत नाही. त्यांना ड्रॅगन फ्रुटचेच कौतूक. हाच प्रकार विकत आणलेल्या खर्वसाच्या बाबतीत. रानमेव्याच्या बाबतीत. जांभूळ काय विकत घेऊन खायचे फळ आहे का? त्यासाठी दोघांनी झाडावर चढून जांभळाचे घोसच्या घोस खाली चार कोपरे धरुन उभ्या असलेल्या मुलांच्या हातातल्या धोतरात टाकायला हवेत. कोंडाळं करुन ती जांभळं चाखायला हवीत. एकमेकांच्या जांभळ्या झालेल्या जिभा निरखायला हव्यात. तर त्या जांभळांची खरी चव कळते. संध्याकाळी आजोबांनी त्यांच्या धुतलेल्या धोतरावर जांभळी नक्षी पाहीली की मग जो शिव्यांचा भडीमार होतो त्याने जांभळांची खुमारी अधीक वाढते. गाडीची काच खाली करुन पटकुर गुंडाळलेल्या आजीच्या हातून करवंदाचा द्रोण घेऊन खाण्यात धन्यता मानणाऱ्यांना करवंदाच्या जाळीच्या ओरखड्यांची रांगोळी हातापायावर उमटवून घेण्यातली धमाल माहित नसते. हाथगाडीवर मिळणारे सोललेल्या उसाचे तुकडे चघळण्यात काही गोडवा नाही. रानात चांगला काळाभोर उस पाहून तो मित्राच्या सोबत खात खात गावात येण्यातली मजा औरच. रस्त्यावर पडलेल्या चोयट्यांचा माग धरुन कुणीही आपल्या मित्रांचा कंपू धुंडाळू शकतो. हुरड्याच्या पार्ट्या हा प्रकार आता सुरु झाला. गावाकडे या हुरड्याचे कुणाला फारसे कौतूक नाही. कुणी मित्र किंवा पाव्हना रानात आला की सहज चार तुराट्या पेटवून त्यात असेल ती कणसे भाजायची पद्धत आहे आमच्याकडे. त्याला आता आता हुरडा पार्टीचे रुप आलेय. असो. एक ना अनेक गोष्टी. लिहायला बसलो तर कादंबरी होईल.
हे सगळं आठवायचे कारण म्हणजे काल मित्राच्या बायकोने पाठवलेले अस्सल गावठी लोणचे. अगदी आज्जीच्या हातचे असावे तसे. प्रत्येक फोडीला टणक बाठ असलेले लोणचे. हे लोणचे जसजसे मुरत जाते तसतसे ते फुलत न जाता आक्रसत जाते. मऊ न होता जरासे चिवट होते. (वातड नाही) जेवताना बोटांनी हे तुटत नाही, फोड दाताखाली धरुनच खावे लागते. याची गम्मत जेवण झाल्यानंतरही कमी होत नाही. जेवण होता होता ताटातले लोणचे संपते. मग पाणी प्यायल्यावर हात धुवायच्या आधी ही लोणच्याची दशा असलेली बाठ तोंडात टाकायची व हात धुवायचे. नंतर शतपावली करेपर्यंत ही बाठ चोखता येते.
किती साधे साधे पदार्थ असतात हे. लोणचे, खर्वस वगैरे. पण आपण त्यांचे पार भजे करुन टाकलेय. मस्त गुळ टाकून, अगदीच चिमूटभर ईलायची टाकून केलेला खर्वस भन्नाटच. पण त्यात साखरच टाक, जायफळच टाक, केशराच्या काड्याच टाक, ड्रायफ्रुटच टाक असला उद्योग करुन त्या खर्वसाचा जिव गुदमरवून टाकतात लोक. ज्यांना असा खर्वस आवडतो त्यांच्या आवडीबाबत माझा काही आक्षेप नाही पण खर्वस खावा तो गुळ विलायची टाकून चुल्हीवर केलेलाच. चिकाची मुळ चव त्याच खर्वसात असते. लोणच्याचेही तेच. जितके जिन्नस कमी तेवढे लोणचे खुमासदार. पण आजकाल पंजाब, राजस्थान वगैरे भागातल्या रेस्पींची व आपल्या मुळ रेसेपीची ईतकी सरमिसळ झालीय की ते लोणचं खाताना मुळ कैरीची चवच हरवलीय या सगळ्यात. गावाकडे एखाद्या आज्जीने लोणच्याची एक फोड खाल्ली तरी तिचा प्रश्न असे “का गं, औंदा खोबऱ्या आंब्याची कैरी नाय गावली का?” कोणत्या आंब्याच्या कैरीचे लोणचे केलेय हे कळण्याईतकी त्यात कैरीची चव असे व ती चव ओळखणारी आजीची जिभही चवणी असे. अनेकांना माहित असेल किंवा नसेलही, बहुतेक हॉटेल्समधे टेबलवर आणून ठेवलेले आंब्याचे लोणचे हे कैरीचे नसतेच. कैरीचे लोणचे अनलिमिटेड द्यायला परवडणारही नाही. बरेचदा ते भोपळ्याचे लोणचे असते. आपण खातो ते लोणचे नक्की कैरीचेच आहे की अजुन कशाचे हे ओळखता न येण्याईतका त्यात मसालेदार खार असतो व आपले टेस्टबडसनाही मुळ कैरीच्या लोणच्याची सवय राहीलेली नसते. असोच.
गावाकडच्या लोणच्यात मालमसाला कमी असला तरी जिव्हाळा ओतप्रोत असतो. मी शैलाला फोन करुन सांगितले की “लोणचे पाठव रे जरासे. चव नाहीए तोंडाला” तर तिने मोठा डबा भरुन ‘जरासे’ लोणचे पाठवले. सोबत निरोप होता “अजुन पाह्यजे असल तर सांग” चार महिने पुरेल एवढे लोणचे मी आठवड्यात संपवले. परवा पुन्हा तिला फोन करुन सांगितले “लोणचे संपले रे सगळे, थोडेसे पाठव” कालच पुन्हा मोठा डबा भरुन ‘थोडेसे’ लोणचे आलेय. सोबत निरोप आहे “आता तुझ्या वाटेचं संपलं लोणचं. हे पुरवून खा.”
(थोडेसे (?) डिशमधे काढलेय फोटोसाठी. बाकी डब्यातच आहे. गावाकडे ‘जरासे’ म्हणजे ईतके असते.)


Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...