❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

100% Natural Organic Body Scrubber Loufah Sponges

पंधरा दिवसांखाली जरा जास्तच थंडी पडली होती. थंडी कमीच होती पण बोचरं वारं वहात होतं सकाळपासून. दुपार झाली तरी हवेतला गारवा कमी होत नव्हता. मग दुपारीच सिम्बाला घेऊन मळ्यात गेलो. ओढ्याच्या काठावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली उन्हाला पाठ देऊन बसलो. समोरच्या रानात मावशीची लगबग सुरु होती. आम्हाला पाहून तिने हाताने बसायची खुण केली पण ती आली मात्र नाही. ओढ्याच्या कडेकडेने शेताला अगदी लागूनच पाच सहा शिंदीची झाडे होती. तेथे तिची काहीतरी खटपट सुरु होती. जरा वेळाने मावशी आली व हुश्श करत पदराने चेहरा, गळा पुसत सिम्बाशेजारी टेकली. सगळ्या लुगड्यावर जळमटं, काटक्या वगैरेंचा कचरा. डोक्यावरच्या पांढऱ्या केसांच्या कापसातही वाळली पाने, पाकळ्या वगैरे अडकलेलं. मी काही विचारायच्या आतच मावशी म्हणाली “लय झाडूरा माजलाय. त्यात आमच्या म्हताऱ्याला नाय उद्योग. मरणाची घोसाळी अन् डांगरं लावलीत. सगळ्या येलींनी बांध आन् वढा येरगाटलाय. काय करायच्चीत ती घोसाळी. उगा अशीच वाळून झुंबरं व्हत्यात त्यांची.” मी म्हणालो “जेसिबी का नाही मागवत सरळ? काढून टाक ती शिंदीची झाडं.”
मावशी उत्साहाने म्हणाली “धाकट्याला तेच सांगितलय मी या टायमाला. काय कामाची हाय सिंदाडं? ना खायच्या कामाची, ना सावलीच्या कामाची. जेसिबीच बोलावलाय सुताराचा. पण त्येला म्हणलं गव्हू निघूंदे. चार सिंदाडापायी माझा गव्हू मोडायचा नायतर. ते सुतार म्हंजे ‘अडाण्याचा आला गाडा आन् तुमचा आड बाजूला काढा’ असं हाय. नुसतं हेंबाडं हाय. काम वाढून ठिवायचं उगा”
मग अर्धा तास बसल्यावर मीही मावशीबरोबर वेली ओढायला गेलो. तेवढीच तिला मदत. सिम्बाला तर अशा वेळी भयानक उत्साह असतो. मावशीने बहुतेक सगळ्या वेळी छाटल्या होत्या. ओढायच्याच बाकी होत्या. वेली ओढताना त्यांचा पसारा किती दुरवर व वरती सिंदाडाच्या टोकापर्यंत पोहचलाय ते समजत होतं. वेली काढून बाजूला ढिग केला. वर पाहीलं तर शिंदीच्या झाडावर चांगली हात हातभर लांबीची वाळलेली घोसाळी लटकली होती.
मावशीला म्हटलं “मावशे जेसिबी आला की तेवढी पाच सहा घोसाळी ठेव माझ्यासाठी बाजूला. जाळात नको टाकूस. तेवढीच अंगघासणीला होतील.”
काल संध्याकाळी ओढा उतरून पलिकडच्या कोबीच्या रानात जाणार होतो ईतक्यात मावशीने मागून हाकारा घातला. वळून पाहीले तर हातातलं खुरपं हलवत मावशी आंब्याकडे जायला सांगत होती. मग पुन्हा ओढा ओलांडून अलिकडे आलो व आंब्याकडे वळालो. आंब्याखाली पोहचलो तर तेथे आंब्याच्या खोडाला टेकवून पाचसहा दांडगी घोसाळी ठेवलेली होती. मावशी थकली असली तर स्मरणशक्ती भारीय तिची. तिने निवडून घोसाळी ठेवली होती. सिम्ब्याला लिश नव्हती. त्याचे लक्ष गेल्यावर त्याने एका उडीत ती घोसाळी गाठली व मी त्याला आवरायच्या अगोदर त्यातल्या तिन घोसाळ्यांना त्याने दात लावलेही. त्याला ते खुळखुळे प्रचंड आवडले होते. मग उरलेली दोन घोसाळी घेतली व बाकीची तिन दोरीत बांधून गळ्यात टाकली. पुर्वी बॅंडमधे स्टिलचे दोन मोठे खुळखूळे घेतलेला एक माणूस असायचा. अगदी त्याच्यासारखे दोन घोसाळ्याचे खुळखूळे वाजवत मी पुढे व मागे वरातीचा घोडा जसा पावले आपटत नाचतो तसा नाचत सिम्बा अशी आमची वरात घराकडे निघाली.
दुसऱ्यादिवशी मळ्यात गेल्यावर मावशीने ती घोसाळ्याची जाळी कशी मऊ करायची याची पद्धत सांगितली. “ध्यान देवून कर, नायतर तशीच तुकडं करुन घेशीन आणि आंग सोलपटल्यावर बश्शील गागत” असं म्हणत तिने तंबीही दिली. अर्थात आम्ही लहानपणी या जाळीचे अनेक प्रकार करायचो. पेन स्टॅंड, वॉल हॅंगिंग, अंग घासण्या वगैरे. बहिणींना या जाळ्यांच्या पर्स करुन देणं तर कंपलसरी असे आम्हाला. ईतक्या वर्षांनी ती जाळी अशी हाताला लागल्याने मजा वाटत होती. त्या उत्साहातच मी मावशीला म्हटलं “एवढं बयाजवार सांगतीय तर तुच का करुन दिल्या नाहित घासण्या? आणि एक कर, या घासण्या ऍमेझॉनवर टाक. लोकं उड्या मारतील त्यांच्यावर.”
“लोकं खुळीच झाल्यात आजकाल” म्हणत मावशी तिच्या कामाकडे वळली.
मी बसल्या बसल्या सहज ऍमेझॉन उघडले. हायला तेथे गोवऱ्या विकायला असतात, मग काय सांगावं या जाळ्याही काहीतरी भारी नावाखाली असतील विकायला. आणि गम्मत म्हणजे घोसाळ्यांच्या या जाळ्या तेथे उपलब्ध होत्या आणि त्या खाली लोकांनी चक्क रिव्ह्यूज लिहिले होते.
मावशी म्हणते ते खरच्चे. लोकं खुळी झालीत आजकाल. काऊ डंग केक च्या नावाखाली गोवऱ्या विकत घेतात आणि रिव्ह्यूजमधे ‘टेस्टलेस ऍन्ड ड्राय केक’ असं लिहून एक स्टार देतात.
😂😂



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...