❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

होलम राजा

जेजुरीला माघी पौर्णिमेच्या निमित्ताने विविध भागातून काठ्या येतात. आमच्या भागातली काठी संगमनेरहून निघते व पौर्णिमेला जेजुरीला पोहचते. गावाबाहेर एकादशीच्या रात्री नऊ साडेनऊच्या आसपास जागरण उभं रहातं. खंजीऱ्या तापवल्या जातात, तुणतुण्याच्या तारा ताणल्या जातात, कडक चहाने गळे शेकले जातात व मग ऐसपैस चौक भरुन जागरणाला सुरवात होते. हे जागरण हळूहळू टिपेला जात नाही. याची सुरवातच मुळी टिपेच्या सुरांनी होते आणि सुरांची ती पट्टी पहाटपर्यंत सांभाळली जाते. तासा दोन तासाला बाजूच्या शेकोटीवर उतरलेल्या खंजीरी पुन्हा तापवल्या जातात. तुणतुण्याच्या खुंट्या आवळल्या जातात. वाघ्यांच्या काळजात प्रत्यक्ष खंडेराया भंडारा फासून ठाण मांडून बसलेला असतो, त्यामुळे त्यांना गळा गाता ठेवायला कोणत्याही खुंट्या आवळाव्या लागत नाही. दहा अकरापर्यंत आजूबाजूचे शेतकरी जेवणं वगैरे उरकून मग निवांत जमायला सुरवात होते. मग वाघ्यांना अजुन जोर चढतो. खंडेरायाचे गुणगाण गाताना त्यांच्या नरड्याच्या शिरा तरारुन फुगतात. खंजीरीवर नाचणारी बोटांची टोके लाल होतात. कपाळावर माखलेल्या भंडाऱ्यातून घामाच्या धारा वाट काढत छातीवर उतरतात. बाणाईचे व म्हाळसेचे भांडण आता खळीला आलेले असते. लोक तल्लीन होऊन ते भांडण ऐकत असतात. ‘सवती सवतींच भांडाण, मधी भक्तांचं कांडान’ ऐकताना नकळत लोकांच्या माना डोलायला लागतात. या कष्टकरी लोकांच्या संसारातही कटकटी असतात व परमार्थातही कटकटी असतात. यांचा खंडोबाही या घरधनीनींच्या त्रासातून सुटलेला नसतो. यांचा देवही यांच्यासारखाच असतो. हे जागरण पहाटेपर्यंत अगदी कळसाला पोहचते आणि थंड वाऱ्याच्या झुळकींसोबत काठी गावाच्या वेशीवर येते. मग या काठ्यांची आरती होऊन जागरण संपते. पालखीच्या भोयांनी जरा विश्रांती घेतली की मग सकाळी नऊच्या आसपास या काठ्या भंडाऱ्याच्या पिवळ्या ढगांवर तरंगल्यासारख्या गावाच्या वेशीतून आत शिरतात. मग सुरु होतो या उंचच उंच काठ्या नाचवण्याचा खेळ. हलग्या घुमायला लागतात, भंडाऱ्याने आसमंत माखून जातो व त्या गर्दीतून या काठ्या बेभान खांदे बदलत बदलत गावमारुतीपर्यंत येतात व भावविभोर झाल्यासारख्या मारुतीच्या देवळाच्या छपरावर मोरपिसांचे गुच्छ टेकवून झुकतात. येथे पु्न्हा आरती होते व या काठ्या पुढे जेजुरीकडे रवाना होतात.
या काठ्या एकदा जेजुरीकडे रवाना झाल्या की मग हौशी लोकांचा होलम सुरु होतो. जिकडे तिकडे उथळ काहील्या जिलेब्यांनी घमघमतात. गोल कांदाभजीचे घाणे निघायला सुरवात होते. रेवड्या व गुडीशेवेची मोठमोठी ताटे रिकामी व्हायला सुरवात होते. दुपारी बारा वाजताची जिलेबी भजी ही बाहेर जाऊनच खायची असते. संध्याकाळी पाच वाजताची जिलेबी मात्र घरी आणून मठ्ठ्याचे ग्लास रिकामे करत खायची. रात्री आठ वाजेपर्यंत आमचा हा होलम शांत होतो. आता उन्हाळ्याची सुरवात झालेली स्पष्ट जाणवते व वेध लागतात चैत्रात येणाऱ्या आमच्या यात्रेचे.
माणसाच्या असंख्य गुणांपैकी मला त्याचा हा उत्सवप्रीय स्वभाव प्रचंड आवडतो. देव आहे की नाही या भानगडीत मला पडायचे नाहीए. असेलही किंवा नसेलही बापडा. पण ‘तो आहे’ या विश्वासावर ज्या यात्रा, जत्रा-खेत्रा, उरुस, संदल, सणवार, वारी-पालख्या, प्रथा-परंपरा वगैरे गुंफलं गेलय ते फार फार सुंदर आहे. त्यासाठी तरी मी ‘देव आहेच’ म्हणेन. माणसांमधली ही उत्सवप्रीयता व उत्साह असाच चिरकाल टिको. माणसांचा देव मानसावर सदैव असाच प्रसन्न राहो.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...