❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

इष्टापत्ती

इष्टापत्ती...
----------
सकाळपासून आठवत होतो पण मी ते फोल्डर कुठे सेव्ह केलय ते काही आठवत नव्हते. तसे फार महत्वाचे नव्हते पण मला ते आता हवे होते. शेवटी मित्राला फोन करुन क्लाऊडवर शेअर करायला सांगावे म्हणून फोन लावला. बराच वेळ रिंग वाजली. आता हा काही मोबाईल घेणार नाही म्हणून मी फोन कट करणार इतक्यात पलिकडून आवाज आला “हा बोल. कशीकाय आठवण काढली मधेच?”
“अरे मला २०१९ चे फोल्डर सापडत नाहीए. जरा तू क्लाऊडवर…” माझे वाक्य अर्धवट तोडत मित्र म्हणाला 
“तुला सांगतो अप्पा, आज काही मी बाबांना सोडत नाही. जरा बरी पाने येवूदे मग पहा. रमी माझीच आहे आज”
मला काही समजेना. हा काय आज बापाबरोबर पत्ते कुटत बसलाय की काय? तेही दुपारी? कसे शक्य आहे? 
मी गोंधळून म्हणालो “म्हणजे?”
शँपेन फेसाळावी तशा आवाजात मित्र म्हणाला “म्हणजे वाघाचे पंजे. अरे आज बाबांबरोबर रमीचे चार डाव टाकायला बसलोय. बाबाही असे आहेत ना, मी म्हणालो की गम्मत म्हणून खेळू तर नाही म्हणाले. पैजेवर नाही खेळली तर ती रमी कसली म्हणाले”
माझा आता पुरता गोंधळ उडाला होता. मला शंका आली की मित्राने चुकून अफू वगैरे तर खाल्ली नसेल ना? मी म्हणालो “अभी, नक्की काय चाललय? मला फोल्डर हवे होते.”
अजुनही त्याच उत्साहात मित्र म्हणाला “काही नाही रे. बाबा म्हणाले की ‘मी जिंकलो तर नेहाने बासूंदीचा बेत करायचा व तू जिंकलास तर हीने पुरणाचा घाट घालायचा. तुला सांगतो, कुणीही जिंकले तरी बेत माझ्याच आवडीचा होणार. बाबा संध्याकाळी फक्त साधे वरण व साळीचा भात खातात. तुला तर माहीत आहे.”
वाक्य पुर्ण करता करता मित्राचा गळा दाटल्यासारखा झाला. शेवटचे शब्द हुंदक्यात ऐकायला आल्यासारखे वाटले. 
मित्राचा भरलेला आवाज ऐकून मला जरा टेन्शन आले. काही तरी झालेय अशी सारखी शंका यायला लागली पण फोनवर काही न बोलता मी फक्त हूंकारलो “हं, बरं मग?”
फोनवर जरा वेळ शांतता पसरली. मित्राने स्वतःला सावरले असावे. आवाज पुर्ववत करत जरा हरवलेल्या आवाजात तो म्हणाला “अरे बाबांबरोबर शेवटची रमी खेळलो त्याला कितीतरी वर्ष झाली. लास्ट इयरला असताना रमी व चेस खेळायचो आम्ही टेरेसवर बसून. पहाट व्हायची रे मात शह देता देता. मग नोकरी, लग्न यातच गुरफटलो अगदी. या पंधरा वर्षात कधी चवीने घास खाल्याचे देखील आठवत नाही या धावपळीत.”
माझ्याकडे बोलायला काहीच नव्हते. काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो “असं काय करतो अभी, माझ्या समोरच आहे ना तुझा सगळा प्रवास”
मित्र म्हणाला “ते आहेच रे. तुला सांगतो अप्पा, रमी खेळायला बसलोय तर काय चेहरा खुललाय बाबांचा. स्मरणशक्ती दगा देतेय आजकाल त्यांना, तरीही काय बारीक लक्ष आहे त्यांचे गेमवर. आयुष्य असो नाहीतर रमी बाप शेवटी बाप असतो यार. या पंधरा वर्षात कधी बाबांबरोबर गप्पा मारत बसलो नाही की घटकाभर आईच्या आजूबाजूला रेंगाळलो नाही. बाबांनीही आयुष्यभर नोकरीच केली, पण आम्हाला कधी वेळ दिला नाही असे कधीच झाले नाही. मग मिच कशामागे धावतोय एवढा की आज बाबांसाठी माझ्याकडे वेळ नाही? ऑफीसमधून घरी आलो की पोरगी कॉलेजातल्या काय काय गमती सांगते पण मी न ऐकताच तिला नेहाकडे पिटाळतो. ती लहान असताना शाळेत काय शिकली आणि तिच्या कोण कोण मैत्रीणी होत्या मला काही माहित नाही. ती जबाबदारी मी नकळत नेहावर ढकलली. पण सकाळपासून पोरीच्या गमती जमती ऐकतोय, तिच्या प्रोजेक्टविषय ऐकतोय तर हरखून गेल्या सारखे झालेय अप्पा. अरे सिंदबादच्या सफरींसारखे सात खंड होतील इतके विषय आहेत पोरीकडे. मी कधी ऐकलेच नाहीत रे.”
फोनवर पुन्हा काही क्षण शांतता पसरली. मीही काही बोलून ती शांतता विस्कटली नाही. 
जरा वेळाने मित्र म्हणाला “या कोरोनाने खरे तर उपकारच केले माझ्यावर. नाहीतर माझा पाय कधी टिकला असता घरी? आणि जेव्हा टिकला असता तेंव्हा वेळ गेली असती. मी ठरवलय अप्पा, दोन चार दिवसात पुन्हा नेहमीचे रुटीन सुरु होईल. माझी धावपळ काही कमी होणार नाही हे त्रिवार सत्य आहे पण कॉलेजातून आल्यावर पोरीला जो उत्साह असतो ना मला सगळं सांगण्यात, त्याच उत्साहात आता मी घरी आलो की बाबांना सगळं सांगणार आहे. मी आठवडाभर ऑफीसला जातो व विकेंडला ऑफीस घरी आणतो. आता तसं न करता दर विकेंडला मी पोरीबरोबर तिच्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. आईबरोबर बसून अधून मधून तिचे जुने कपाट आवरु लागणार आहे. या कोरोनाने इतरांच्या चेहऱ्यावर मास्क घातला पण माझ्या मात्र डोळ्यात अंजन घातलं.”
मला मित्राचा कधी भरुन येणारा तर कधी उत्साहाने फसफसणारा आवाज ऐकून फार बरं वाटत होतं. मलाही उगाच भरुन आल्यासारखं वाटत होतं. एवढ्यात मित्र घाई घाईने म्हणाला “चल अप्पा, ठेवतो फोन. यावेळी दोन जोकर व एक प्युअर सिक्वेन्स आलीय हातात. ही रमी माझीच. आणि काळजी घे. बाहेर पडू नकोस उगाच. मी करतो नंतर तुला फोन.”

मला माझे फोल्डर नाही सापडले पण आत कुठेतरी, कधीतरी सेव्ह करुन ठेवलेले महत्वाचे फोल्डर आज मित्राला सापडले होते हे नक्की.

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...