❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

यात्रा

आमचा सगळा पट्टा तसा सधन. पावसावर होणारी शेती अगदीच नावाला किंवा मग गरजेपुरती. म्हणजे बाजरी, ज्वारी यासाठी. आमच्या वरच्या भागात मात्र पावसाचे प्रमाण जास्त. त्यामुळे तेथे मात्र भातशेतीच प्रमुख. हा भाग म्हणजे माळशेज घाटाचा परिसर. साधारण घाटाच्या अलीकडील, म्हणजे कोळेवाडी, मढ, करंजाळे वगैरे. पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरच्या कुशीत वसलेली गावे. भात खावा तर याच भागातला. आजी सांगायची “भाताच्या पेजेत वात वळून लावली तर दिवा पेटायचा आणि भात शिजलेला साऱ्या गावाला कळायचे असा सुवास पसरायचा.” अर्थात पिढ्या दर पिढ्या सगळ्याच गोष्टींचा दर्जा घसरत गेला. तरी आजही पानात मढचा भात नाही पडला तर घास गिळत नाही हे खरे. माझ्या आजीचे माहेर मढ. म्हणजे वडीलांचे आजोळ. आताच्या काळात कोण इतकी जुनी नाती सांभाळत बसणार आहे? पण या भाताच्या मोहाने मी मढबरोबरचं माझं नातं अगदी घट्ट ठेवलय. एकवेळ मी माझ्या आजोळी जाणार नाही पण वडीलांच्या आजोळी जायची टाळाटाळ करणार नाही. अहो, हातसडीचा तांदूळ म्हणजे काय हे माहीत नसलेल्या या काळात माझ्या घरी वर्षभराचा हातसडीचा तांबुस गुलाबी भात मढहून घरपोच होतो. मढहुन जुन्नरला उजव्या हाताला ठेवत खाली उतरले की कोळेवाडी, डिंगोरे करत मग ओतुर लागते. हेच माझे गाव. गावाचा प्रमुख व्यवसार म्हणजे शेती. माझे गावही ओतुर आणि आजोळही. कारण आई याच गावातली. अर्थात मामाचे घर गावापासून चार साडेचार किलोमिटर दुर मळ्यात होते. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये मामाकडे जायचे म्हणजे चालतच जायचे. रस्ता जरा दुरुन जायचा. पण आम्ही कधी रस्ते वापरलेले आठवत नाही. आमच्या शेताच्या बांधावरुन चालायला सुरवात केली की मग या शेताचा बांध, त्या शेताचा बांध असं करत करत तासाभरात रमत गमत, चिखलाने पाय, कपडे बरबटत आम्ही मामाच्या विहिरीवरच पोहचायचो. विहिर अगदी चिरेबंदी बांधलेली होती. तेथे हातपाय धुवून मग मामाच्या घरी. कधी कधी तर विहिरवर हातपाय धुवून तेथेच विहिरीत लोंबकळणारी सुगरनींची घरटी काढत रमायचो. मामाचे केंव्हा तरी लक्ष गेले की मग आमची वरात घरी जाई. मिठ मिरची आणि भाकरीचा तुकडा उतरुन टाकला की मगच आजी घरात घ्यायची. मग चार दिवस नविनच आलेली मामी फक्त आमच्याच सरबराईत असायची. मामी गोरीपान नसली तरी छान होती. ती आम्हा लहान मुलांना अहो जाहो करायची. कारट्या, गाढवा असल्या हाका ऐकायची सवय असलेल्या आम्हाला ते तर भारीच वाटायचं. माझा चुलत भाऊ तर अगदी लहान होता. तोही हट्ट करुन आमच्याबरोबर यायचा. भिती वाटते म्हणून शी करायला मामीला सोबत घेऊन जायचा. मामीच्या एका हातात तांब्या आणि दुसऱ्या हाताचे बोट धरुन भाऊ. शी झाली की शर्ट वर करुन पोटाजवळ धरुन मामी समोर वाकून उभा रहायचा.
त्यावेळेसही मामी त्याला अहो जाहो करत म्हणे “अहो निट उभे रहा पाहू. शर्ट वर धरा अजुन”
आमची तर हसुन हसुन मुरकुंडी वळत असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचे वेगवेगळे प्लॅन असत. पण त्या यादीत मात्र मामाकडे जाणे नसायचे. दिवाळीलाही एखाद दिवस आम्ही मामाकडे जाऊन यायचो. पण श्रावण महिना सुरु झाला की कधी एकदा मामाकडे जातो असे व्हायचे. आमच्या भागातल्या बहुतेक गावांच्या यात्रा या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे असायच्या. किंवा त्याच्या आगेमागे असायच्या. या यात्राही साधारण तिन दिवस चालत. पण उन्हाळ्यातच. पण आमच्या गावची यात्रा मात्र श्रावण महिन्यात यायची. श्रावणात जितके सोमवार असतील तितके दिवस यात्रा. बरेचदा चार दिवस, तर कधी कधी पाच दिवस. म्हणजे दर सोमवारी यात्रा भरे. मग आमची यात्रेची तयारी सुरु व्हायची. श्रावण सुरु व्हायच्या आधी पावसाचा अंदाज घेवून मामाकडे जायचे. मग मामा आम्हा सगळ्यांना त्याच्या शिंप्याकडे घेऊन जाई. शर्ट आणि चड्डीची मापे दिली जात. मग दुपारपर्यंत मामा आम्हाला घरी सोडीत असे. नंतर पहिल्या सोमवारची वाट पहाणे एवढेच काम असे. अधुन मधून शिंप्याकडे चक्कर मारुन “बटन लावायची राहीली आहेत फक्त” हे ऐकून यायचे. मला आठवत नाही तेंव्हापासुन ते अगदी बारावीपर्यंत आमचा हाच शिंपी होता. आणि इतके वर्षे ‘आमची त्याच्याकडची चक्कर’ आणि त्याचे ‘ठरलेले उत्तर’ काही बदलले नाही कधी. अगदी मापे दिल्यानंतर तासाभरातच जरी विचारले “भरतकाका, कपडे?” तरी काका म्हणनार “झालेच, फक्त बटने लावायची आहेत.”
कपड्यांचे काम उरकले की वडील आम्हाला ‘बापुसाहेबा’कडे पाठवायचे. बापुसाहेब म्हणजे आमचा फॅमीली डॉक्टरसारखा फॅमीली न्हावी. त्याच्या दुकानात दोन खुर्च्या आणि दोन मोठे आरसे असत. आडव्या फळीवर त्याची हत्यारे असत. भिंतीवर एक चामड्याचा जाड पट्टा टांगलेला असे. तो एका हातात धरुन दुसऱ्या हाताने बापु वस्तरा वर खाली फिरवत च्यटक फटॅक असे मजेशीर आवाज काढे बराच वेळ मग गिऱ्हाईकाची दाढी करायला घेई. आमची कटींग मात्र खाली मांडी घालूनच करी. आरसा नाही नी काही नाही. त्याच्या समोर मांडी घालून बसलो की मान त्याच्या ताब्यात द्यायच्या अगोदर मी त्याला सांगायचो “हे इथले केस मोठेच ठेव, इकडचे जरा जरा बारीक कर, भांग इकडून पडला पाहीजे” वगैरे. बापु अगदी लक्षपुर्वक ऐकुन घेई. मग एकदा त्याच्या मशीनचे कट कट सुरु झाले की संपेपर्यंत मान वर करायची सोय नसे. थ्रीडी साउंड सारखा त्याच्या हत्यारांचा आवाज डोक्याच्या वेगवेगळ्या भागातुन येत राही. अचानक गाफील असताना बापु एकदम भुस्स भुस्स करीत पाण्याचा फवारा उडवी आणि श्वास अडकल्यासारखे होई. खसा खसा डोके स्वच्छ पुसुन बापु एखादी लाकडी पेटी झटकावी तसे माझ्या अंगावरचे केस झटकी. मग मी बापुची कलाकारी पहायला आरशासमोर उभा राही. आणि दरवेळे प्रमाणे बापुने आमचा पार भोपू केलेला असे. वडीलांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे काम झालेले असे. मग आम्ही भावंडे नाराज होवून घरी यायचो. अर्थात ही नाराजी सकाळपर्यंतही टिकत नसे हा भाग वेगळा. कपडे, केस या गोष्टी झाल्या की आमची श्रावणाची तयारी होई. श्रावणात आम्ही मुले फारच आज्ञाधारक, शिस्तीचे वगैरे व्हायचो. आईनी सांगितलेली कामे त्वरीत करायची. अभ्यास वेळेवर करायचा. मस्ती कमी कराची. अश्या विविध मार्गाने आम्ही आईपर्यंत ‘आम्ही शहाण्यासारखे वागतो’ हे पोहचवायचो. कारण ‘यात्रेत खाऊ आणि खेळणी’ यासाठी किती पैसे मिळणार ते या शहाणपणावरच अवलंबून असे.
हळूवारपणे श्रावण येई. पहिल्या सोमवारी असणाऱ्या यात्रेत आम्हा मुलांना फारसा रस नसायचा. कारण पहिल्या सोमवारी घरातली सगळी मोठी माणसे पहाटेच उठून दर्शनाला जाऊन येत. मग दिवसभर दर्शनासाठी रांगच लागे. यात्रेतली खेळण्याची दुकाने, पाळणे, मिठाईची दुकाने यांची मांडामांड पहिल्या सोमवारी सुरु होई. त्यांनाही पहिल्या सोमवारी फारसी गिऱ्हाईके नसतच. पहिल्या दिवशी फक्त पेढ्यांची आणि बत्ताश्यांची दुकाने लागत. अधुन मधून अबिर-गुलाल, हळद-कुंकू यांची चमकदार रंगाची दुकाने असत. त्या रंगांच्या पार्श्वभुमीवर तुळशी आणि बेलपानांची दुकाने खुप खुलून दिसत. श्रावणातल्या सरींचा आणि उन्हाचा खेळ सुरु असे. शंकराचे मंदिर आणि केशव चैत्यन्यांची समाधी मांडवी नदी काठी आहे. गावापासुन जरा दुर. आजुबाजूला शेती. त्यामुळे या यात्रेसाठी बरेचजण आपल्या शेताचा काही भाग न पेरता तसाच ठेवत. यात्रेकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांपैकी एक रस्ता आमच्या शेतातूनच जाई. पण आजोबा इतरांसारखे शेत मोकळे न ठेवता त्यात मेथी, कोथिंबीर, गाजर या सारखे काही ना काही लावत असत. अर्थात हे यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी असे. ज्याला जे हवं ते त्याने घेऊन जावे हा हेतू असे. दुसऱ्या सोमवारी मात्र सकाळी सकाळी वडील आम्हाला यात्रेसाठी थोडे थोडे पैसे देत. अर्थात कित्येकदा हे पैसे खर्चही होत नसत. एकदा आम्हा मित्रांची टोळी यात्रेत घुसली की खावू वगैरे घ्यायचे भानच रहात नसे. कारण यात्रेसाठी येणारे पाहुणे खुप खावू घेवूनच येत. यात्रेत गेल्यावर पहिल्यांदा दर्शन घेतले की मग आम्ही उंडारायला मोकळे. दिवस कसा जाई हे समजतही नसे. सुर्य अस्ताला गेलेलाही ढगांमुळे कळत नसे. यात्रेतले पेट्रोमॅक्स लागायला सुरवात झाली की पावले घराकडे वळत. आम्हा भावंडांना अंगणात रांगेत उभं करुन आई कडकडीत पाण्याने आंघोळ घाली. अर्थात यात श्रावणाचा किंवा सोमवारच्या उपवासाचा काही भाग नसे. आम्ही चिखलाने इतके बरबटलेलो असायचो की अंघोळीशिवाय घरात पाऊल टाकणेच शक्य नसे. मात्र कढत पाण्याने अंघोळ केली की मग मात्र दिवसभर न जाणवलेली भुक जाणवे. आजोबांनी केळीची पाने आणलेली असत. या महिन्यात बाबांना बेलाची पाने आणि आईला वेगवेगळ्या व्रतांसाठी ‘पत्री’ आणायचे काम आम्हा मुलांकडेच असे पण केळीची पाने आणायचे काम फक्त आजोबाच करत. तेही महिनाभर. केळीच्या बागेतून निवडून पाने आणत जी तशीही कापायचीच असत. एकवेळ पत्रावळीवर उपास सोडतील पण केळीची चांगली आणि कोवळी पाने कधी तोडत नसत. आम्ही म्हणायचो “आपले आजोबा जरा विचित्रच आहेत नै?” मग सगळ्यांची पंगत बसे. आजोबा नैवेद्य दाखवत. एक नैवेद्याचे पान गोठ्यात जाई. एक पान शेतातल्या विहिरीला जाई आणि मग पंगत सुरु होई. आई सुगरणच होती पण श्रावणाच्या महिन्यात तिच्या हाताला काय सुंदर चव येई! मग आमची अंथरुने पडत आणि निजानिज होई. कित्येकदा अती भटकण्यामूळे पाय असह्य दुखत. अशा वेळी आई माझे पाय चुरुन देत असे. आई पाय दाबत असतानाच आम्ही मुलं पुढच्या सोमवारची स्वप्ने पहात झोपी जात असू.
आम्ही जसजसे मोठे होत गेलो तसतशी यात्रेतली आमची आकर्षणे बदलत गेली. यात्रा तिच होती, तशीच होती पण आमची जाण वाढली आणि आवडीनिवडी बदलायला लागल्या. नववी दहावीला असताना आम्हाला यात्रेतले पाळणे न दिसता कुस्तीचे आखाडे दिसायला लागले.
आजोबा थकले होते. ते म्हणायचे “तो जटाधारी गाभाऱ्यात नाही बसला तुमच्या शिवामुठींची आरास पहायला. तो बसलाय आखाड्यात. एका मुठीतुन दुसऱ्या मुठीत जाणारी लाल माती पहात. त्याचं दर्शन घ्यायचे असेल उतरा आखाड्यात.”
त्यामुळे सहावीपासुनच आम्ही यात्रा पहायला जाताना चड्डीच्या आत लंगोट कसुनच जायचो. यात्रेत भटकून होईपर्यंत दुपार व्हायची आणि आखाडा मानसांनी फुलायला लागायचा. आमची पावलेही तिकडे वळायची. पहिले दोन तास आमच्या सारख्या पहिलवानांच्या कुस्त्या व्हायच्या. अर्थात बक्षीस असायचे दहा रेवड्यांचे. त्या कुस्त्यांना नावच मुळी ‘रेवड्यांच्या कुस्त्या’ असे. आम्ही चड्डी शर्ट काढून आखाड्यात उतरायचो. या आखाड्यात मात्र आजोबांचा दरारा काही कामी येत नसे. येथे खरी कुस्ती होई. ‘रावबा पाटलाचा नातू’ म्हणून आमची गय केली जात नसे, लाडही केले जात नसत. पहिल्या काही कुस्त्या मी हरत असे. पण ‘जोपर्यंत समोरच्याला आभाळ दाखवत नाही तो पर्यंत आखाडा सोडणार नाही’ ही खुमखूमी असल्यामुळे पाय रोवून दुसरी जोड शोधत असे. तास दोन तास प्रयत्न केले की मग कुठे कुणाला तरी आस्मान दाखवण्यात यश येई आणि हातात दहा रेवड्या पडत. मला आजही आठवते, दहा रेवड्या आणि भगवा पटका हे बक्षीस असले तरी मी कधी पटका बांधून घेतला नाही. रेवड्या शर्टमधे बांधून एका बगलेत दाबायच्या तर दुसऱ्या बगलेत पटक्याची घडी दाबायची. आणि नुसत्या लंगोटावर शेताच्या बांधावरुन उड्या मारत, ओरडत घरी यायचे. बाकी भावंडे आणि मित्र जयजयकार करायला असायचीच. आमचा गदारोळ ऐकून आजोबा बाहेर येत. त्यांच्या हातावर पटका ठेवायचा आणि त्यावर रेवड्या ठेवायच्या. आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं. मग आजोबा पटक्याची घडी मोडून मला चांगला घट्टमुट्ट फेटा बांधायचे. वर छान तुरा काढून द्यायचे, पाठीवरचा पटक्याचा शेव खांद्यावरुन पुढे काढायचे. बाबांना, आईला दाखवले की अंगणातल्या अंघोळीच्या दगडावर बसायचे. आई पटक्याला सांभाळत मानेपासून खाली अंघोळ घाली. पदर भिजवून त्याने तोंड स्वच्छ पुसून देई. खास यावेळेसाठी राखून ठेवलेला ड्रेस काढून देई. ते नविन कपडे घालून, थोडंस दुध वगैरे पिवून आम्ही सगळी मुलं मग परत मावळत्या उन्हात बाहेरुन आलेल्या पहिलवानांच्या कुस्त्या पहायला परत यात्रेकडे निघायचो. पुढे कॉलेजला गेल्यावर मात्र हा कुस्त्यांचा आखाडा फक्त पहाण्यापुरता उरला. त्यात उतरायची धुंदी कमी कमी होत जावून शेवटी संपली. आता नामांकित पहिलवानांच्याही कुस्त्या पहायला जाण्यात रस राहीला नाही. आजोबाही राहीले नव्हते. रात्रीची जेवणे उरकून नवू दहा वाजता आमची पावले यात्रेकडे वळू लागली. आज कोण आलंय? याची चौकशी व्हायची. आवडता गायक असेल तर फर्माईशी आठवून ठेवायच्या. त्या हट्टाने गायला लावायच्या. पहाटेच्या भैरवीनंतरच आम्ही घराकडे परतायचो. रात्रभर रंगलेल्या भजनातल्या काही काही जागा अगदी डोक्यात बसलेल्या असायच्या. त्या मनातल्या मनात घोळवतच अंगणात पावूल पडायचं. एव्हाना आई उठलेली असे. ती सडा घालायचे काम थांबवून विचारी “एवढ्या वेळ थांबतं का रे कुणी भजनाला! अंघोळ कर आणि मग झोप हवं तितकं.”
पोटामागे शहरात आलो. मित्रही कुठे कुठे व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने पांगले. काही गावीच राहीले. आता वर्षातुन दोन तिन वेळा सगळे एकत्र येतो. त्यातल्या त्यात यात्रेला आवर्जुन. मग दहा अकरा वाजता सगळे मिळून दर्शनाला जातो. दर्शन झाले की तसेच मंदिराच्या पलिकडील बाजूला उतरुन नदिकाठी निवांत जागा पाहून बसतो आणि यात्रेजवळच बसुन यात्रेच्याच आठवणी काढत रहातो. 
किती वर्षे झाली, मी यात्रेला जावूनही यात्रा पाहिलीच नाही. यावेळी नेमकी रविवारी नारळीपौर्णीमा आली. मग फोनाफोनी करुन सगळ्या भावांना कल्पना दिली. दुपारपर्यंत एक एक करत सगळे जमा झालो. मुलांनी एकच कल्ला केला. राख्या बांधल्या गेल्या. नारळीभाताची पंगत झाली. रात्री ढगातून चंद्र कधी दिसत होता, कधी नाहीसा होत होता. अंगणात चटया टाकल्या. सगळ्या पोरांना गोळा केलं आणि ‘आमच्या लहानपणीची यात्रा’ कशी होती ते तास दिड तास भान हरपुन सांगत बसलो. आश्चर्य म्हणजे मुलांनी सगळं डोळे मोठे करीत ऐकलं. आयपॅड, मोबाईल गेमची कुणी आठवणही नाही काढली. "आम्हालाही यात्रा पहायची आहे!” चा गजर झाला. मला बरं वाटलं. ‘आपल्याला वाटतं तेव्हढी काही मुलं गावाला दुरावली नाहीत अजुन’ हे पाहून भरुनही आलं. सकाळी भरपुर खिचडी आणि दह्याचा नाष्टा करुन आमची मिरवणूक यात्रा पहायला घरातुन बाहेर पडली. आणि या पोरांच्या नादाने मी परत एकदा ती लहानपणीची आमची यात्रा डोळे भरुन पाहिली. तिच गोडीशेवेची दुकाने, अबिर गुलालाची ताटे, तेच लाकडी बैल आणी बैलगाड्यांचे स्टॉल्स, प्रसादाचे पेढे आणि बर्फीची ताटे, उत्साहानी ओसंडणारी रंगीबेरंगी माणसे, गृहपोयोगी वस्तुंच्या दुकानांच्या जरा सुधारीत आवृत्या. दर्शन झालं, केशव चैत्यन्यांच्या समाधीवर सगळ्या पोरांनी मनोभावे डोकं टेकवलं. समाधीच्या आवारात बसुन ‘तुकाराम महाराजांचे सद्गुरु केशव चैत्यन्य आहेत’ हे सांगुन त्यांची छोटीसी कथा मुलांना ऐकवली. तोपर्यंत आखाडा माणसांनी फुलला होता. त्या गर्दीत प्रत्येकाला आळीपाळीने खाद्यावर घेवून दंगल दाखवली. हायजेन अनहाजेनचा विचार न करता मुलांना रेवडी, गुडीशेव खावू घातली. हळू हळू यात्रेतल्या पाळण्यांवरची रोषणाई चमकू लागली तसे आम्ही घराकडे वळालो. सगळ्या बच्चेकंपनीला अंघोळी घातल्या. केळीच्या पानावर पंगत बसली. हसत खेळत पोरांची जेवणं उरकली. सगळ्यांची झोपायची सोय करुन मग आम्ही सगळे जेवायला बसलो. गप्पा मारत, आईच्या चौकशीला उत्तरे देत देत जेवणं उरकली. झोपायच्या अगोदर मुलांकडे एक चक्कर टाकली. दहा वाजले असावेत. सगळे गाढ झोपले होते. दिवसभरात एकदाही शहराची आठवण न आलेली पिल्लं मस्त एकमेकांच्या अंगावर हात पाय टाकून झोपली होती. झोपेतही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होतं. या सगळ्या मुलांमध्ये मला माझंच बालपण दिसत होतं.
यात्रेत प्रवेश करताना सुरवातीलाच ही हळदी कुंकवाची, अबीर गुलालांची दुकाने दिसतात.
आम्ही लहानपणी खेळायचो त्या लाकडी बैलगाडी सारख्या खेळण्यांची दुकाने आजच्या आयपॅडच्या जमान्यातही दिसतात. हिच खरी यात्रा.
यात्रा, मग ती कोणत्याही गावची असो. त्या यात्रेत गुडीशेव हवीच. त्या शिवाय यात्रेला मजा नाही.
ज्या वयात आम्ही खेळायचो, बागडायचो त्याच वयात हा चिमूरडा हार विकताना दिसला.
या साध्या साध्या गोष्टी पण रंगामुळे किती आकर्षक दिसत आहेत.
हे किचेन्सही किती सुंदर दिसताहेत.
कुस्तीचा आखाडा नाही, ती यात्राच नाही. आमच्या यात्रेतील मानसांनी फुललेला कुस्तीचा आखाडा.
हा कुस्तीच्या आखाड्याचा पॅनोरमा.
ही आमची मांडवी नदी.

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

मैत्र-६

अगं, किती ओरडशील त्याला? जातोय डॉक्टरकडे आम्हीबाबा कपडे घालता घालता आईला म्हणाले. पण आईचा राग काही कमी होत नव्हता.
मला हौस आहे म्हणून चिडलेय मी! ‘जरा सडा घालायचाय, शेण आणून देतो का?’ म्हटलं तर तोंड फिरवून जातो हा. मग आता कशाला गेला होता त्या बैलाची शेपटी ओढायला?” म्हणत आईने ओट्यावर भांडे आदळले.
काळजीपोटी बडबडत असली तरी मला आता वैताग आला होता तिच्या बडबडीचा. “काही होत नाही, जरासं तर लागलयअसं सगळ्यांना सांगता सांगता आता हात चांगलाच दुखायला लागला होता. इन्नीने लावलेल्या चंदनानेही काही फारसा फरक पडला नव्हता. इकडे हात फण फण करत होता आणि तिकडे आई तण तण करत होती.
बाबा जवळ येवून हळूच म्हणालेअरे अप्पा, काळजी वाटते रे तीला. तुला नाही कळायचे. आवर बरं पटकन. आपण निघू.”
इतक्यात बाहेर शकीलच्या जीपचा हॉर्न वाजला. दोन मिनिटात शकील दार उघडून आत आला. मागोमाग दत्ता आणि इन्नीही. दोघे सोफ्यावर बसले. इन्नी आत गेली. दोघांचा आवाज ऐकून आई किचनच्या दारात येवून उभी राहीली. हातात भाजीचा चमचा, पदर खोचलेला, चेहऱ्यावर वैताग.
काय रे दत्ता, इर्जीक घालायला बैल लागतात का टोळभैरव लागतात?” आईच्या तावडीत सापडलेला दत्त्या बावचळला. आपण तर आत्ताच आलो. काय पण केलं नाही. मग मोठ्याईला काय झालं? त्याला काही समजेना. इन्नीही आईच्या शेजारी येवून उभी राहीली. तर आई तिच्यावरही घसरली
काय गं, काकूंना मदत करायची सोडून यांच्या बरोबर काय उंडारते सकाळी सकाळी?” इन्नीने बाबांकडे पाहून डोळे मिचकावले आणि खुणेनेच विचारलेकाय झालय?’ बाबांनी माझ्या हाताकडे बोट केलं
पहातेय तुमच्या खाणाखूना. मलाच मेलीला काळजी फक्त. तू काय पहाते! चहा टाक त्या दोघांसाठीम्हणत आई आत गेली. आमच्याकडे पाहून अंगठा वर करत इन्नीही चहा करायला आत गेली. शकील आपलाआपण त्या गावचेच नाही बुवाअसा चेहरा करुन बसला होता
त्याच्या पाठीवर थाप मारत बाबा म्हणालेकाय शकील, कसं काय?”
सब खैरीयत गुर्जी।म्हणत शकील हसला.
अप्पाला घेवून जातो मोडक काकांकडे. मग पाहू ते काय म्हणतात ते.” शकील म्हणाला.
मग तर फार बरं होईल रे. मी आज रजाच टाकावी म्हणत होतो. मग मी निघू का?” म्हणत बाबा चप्पल घालायला लागले. तोवर इन्नी चहा आणि शंकरपाळे घेवून आली. बाबांनी भिंतीजवळचा टिपॉय मधे ओढला. इन्नीने कप आणि डिश ठेवल्या. दत्त्याने एका कपातला थोडा चहा दुसऱ्या कपात ओतला आणि मुठभर शंकरपाळ्या कपात टाकल्या. मोठ्याई चिडलीये वगैरेचं काही घेणंदेनं नाही त्याला. दुसरा कप त्याने शकीलच्या हातात दिला
शकील म्हणालागुरुजी थांबा ना. आम्हीही लगेचच निघानार आहोत. जाताना तुम्हाला शाळेत सोडून पुढे जातो.” 
मग बाबाही परत चप्पल काढत सोफ्यावर बसले. शकीलने चहा संपवला. दत्त्याने अजुन कपाला हातही लावला नव्हता
शकीलने त्याला ढोसलेअरे आवरना दत्ता. जाताना गुरुजींनाही सोडायचय. उशीर होईल.” दत्त्याच्या शंकरपाळ्या चहात भिजल्या नव्हत्या त्याच्या मनासारख्या, त्यामुळे नाराज होऊनच तो उठून आत गेला आणि चमचा घेवून बाहेर आला. त्याने घाईने शंकरपाळ्या संपवल्या. उरलेला चहा एका घोटात संपवला आणि पॅंटला हात पुसत म्हणालाचला. झालं माझं
इन्नीला हाक मारली तर आई म्हणालीराहू दे तीला येथे, नाहीतरी सुट्टीच आहे कॉलेजला. पोरीला कुठे नेता दवाखान्यात उगाच.” म्हटलं राहूदे. मला माहित होतं की आता दिवसभर इन्नीचे काय काय लाड होणार ते. (मला सख्खी बहिण नाही त्यामुळे आई मुलीची सगळी हौस इन्नीचे लाड करुन पुर्ण करते. अगदी वेणी घालण्यापासुन.)
आम्ही बाबांना शाळेत सोडले आणि मोडक काकांच्या दवाखान्यापुढे गाडी उभी केली. मोडक डॉक्टर आमचेच नाही तर जवळ जवळ निम्म्या गावाचे फॅमील डॉक्टर होते. उंचे पुरे, गोरेपान. जन्माला येतानाच चेहऱ्यावर हसु घेवून आलेत की काय असे वाटावे असा चेहरा. मृदू बोलणं. काकांनी तपासले. “फार दुखलं तरच खायचीम्हणत एक पेन किलर दिली. आणि तालुक्याला जायला सांगीतले. जीप न्यायचीच आहे म्हणून मग राम, शामलाही बरोबर घेतले आणि निघालो. मोडक काकांचा अंदाज बरोबर निघाला. हेअर लाईन फ्रॅक्चर होते. दवाखान्यात दोन तास घालवून, हात गळ्यात बांधून परतलो. आयुष्यात पहिल्यांदाच प्लॅस्टर केले होते हाताला. आता आई आणखी चिडणार हे ओळखून शकीलने मला घराबाहेरच सोडले आणि इन्नीला पाठवायला सांगीतले.

दुसऱ्या दिवशी सगळा दिवस घरातच बसुन काढला. या हाताने अगदी परावलंबी करुन टाकलं होतं. रोज जेवायला बसलो की आई सवयीने पहिला घास मला भरवायची, मग जेवायची. (एका पोराचा बाप झालोय मी आता, तरी आईची ही सवय अजुनही आहे.) पण आज तिने भरवलं आणि रागच आला. ठरवलं, प्लॅस्टर आहे तोवर दुध भातच खाऊया फक्त चमच्याने. सकाळची अंघोळही तिने साबण लावून दिला तेंव्हा झाली. बरं, काही बोलायची सोय नाही. नाहीतर तिचं लगेच सुरु झालं असतंमी सांगीतले होते का नानाच्या बैलाची शेपटी ओढायला?” वगैरे. तसा मी पक्का आळशी. ठोब्बाला, दत्त्याला कामं सांगायचो नेहमी. पण जेंव्हा स्वतःची कामे स्वतःला करता येत नाही म्हणून दुसरे कुणी करुन दिलं की मग राग येतो. संध्याकाळी शकील न्यायला आला. त्याच्याबरोबर गावात गेलो. जरा बरे वाटले
शकील म्हणालाघरी जाऊ पहिल्यांदा. अम्मीला काही तु दिसल्याशिवाय चैन पडणार नाही.” 
घरी गेलो तर अम्मी वाटच पहात होती. तिने हात पाहिला आणिया अल्ला!” म्हणत डोळे मोठे केले
अगं काही नाहीए, केसाईतका क्रॅक आहे फक्तमी म्हणालोहोईल आता ठिक”  
आम्ही बाहेरच्या खोलीतच बसलो. शकीलने एक लोड दिला हात टेकवायला. कळ लागू नये म्हणून दुसरा गुडघा वर घेवून त्यावर डावा हात ठेवला आणि मागे रेललो. शकील आतुन सरबत घेऊन आला आणि खो खो हसायला लागला
म्हटलंकाय झालं?”
तर शकील हसु आवरत म्हणालागजरा बांधू काय हातात? आता मला कळलं पेशवे असे का बसायचे? लढाईत हात मोडून घेत असतील नेहमी
मग माझ्या लक्षात आलं. नकळत मी अगदी पेशव्यांच्या पध्दतीने बसलो होतो. मलाही हसू आलं. तोपर्यंत प्रत्येकजन शामच्या घरी जाऊन, चौकशी करुन मग शकीलकडे आले. अम्मीने सगळ्यांना शेवया करुन दिल्या. वरुन दुध साखर घालून दिली.
म्हणालीखा अप्पा. चमच्याने खाता येतील तुला.”
अम्मी, जरा आईला सांगना. खाता येत नाही मला हाताने तरी ती उसळी कसल्या करते? सांजा, पोहे खाईन की काही दिवस. तिच्या हाताने खाऊ का लहान मुलासारखा?”
अम्मी हसून म्हणालीअप्पा, येडा आहेस. तू नही समजेगा
अम्मी, तुप देना जरा शेवयांवरम्हणत शाम्या अम्मीच्या मागे किचनमध्ये गेला.
हे बरं आहे. बाबा म्हणतात तुला कळणार नाही, अम्मी म्हणते तू नही समजेगा
शेवया खाता खाता दत्त्याने विचारलेमंग शकील, कशा झालत्या मासवड्या राती? म्हतारीसारख्या कुणाला जमत नाय मळ्यात. बाकी इन्नीचं हात पार कामातुन गेलं असत्याल भाकऱ्या बडवून.”
शकील म्हणालारात की बातच विचारु नको दत्ता. ‘रुत अलबेली, रात सुहानी, हाय वो आलम, तौबा तौबा।
च्यायला, याच्या इर्जिकीपायी मी हात गळ्यात बांधून घेतला आणि तुला रात सुहानी वाटते होय रे!” मी वैतागलो.
तसं नाही रेशकील एवढं म्हणतोय तोवर दत्ता शेवया संपवून ऊठलाच
अप्पा, तुला पघायला इकडच आल्तो सरळ. दुध नाय घातलं अजुन डेरीत. किटल्या सायकललाच हायीत. तुमचं हुंद्या निवांत.” म्हणत दत्त्या सटकला
धोंडबा आला नव्हता. ठोब्बाही शेवया संपवूनकाळजी घे अप्पाम्हणत गेला. “थांब रे ठोब्बा, मिही येतोम्हणत शाम्याही निघाला.
तुला सोडायला येतो परतम्हणत शकीलही चाचांना गाडी द्यायला दुकानाकडे गेला. किचनमध्ये अम्मी स्वयपाकाची तयारी करत होती. मग आत जाऊन तिच्याबरोबर गप्पा मारत बसलो

सुट्टीचे तिन दिवस असेच इकडे तिकडे गेले होते. दत्त्याची इर्जिक चांगलीच महागात पडली होती. आज वादविवाद स्पर्धा होती. त्याची कुणालाच आठवण नव्हती. जोशीसरांनी घरी बोलावले होते, तेही जमले नव्हते. सकाळी शकील गाडी घेऊन आला कॉलेजला नेण्यासाठी. अर्थात सगळ्यांनाच गोळा करत आला होता. आईने एका शर्टची बाही पुर्ण कापुन दिली होती. तो शर्ट आईनेच घालून दिला. बाहेर येऊन जीपमध्ये बसलो. वह्या पुस्तके काही घ्यायची नव्हतीच त्यामुळे तो एक ताप वाचला
माझ्या शर्टची कापलेली बाही पाहून इन्नी मोठ्याने हसली. म्हणालीअप्पा, तुझातर अगदी दादोजी कोंडदेव केला मोठ्याईने
तिचं ऐकून राम आणि शाम्या मोठ्याने खिदळले. दत्त्याला काही तरी विनोद झाला एवढंच कळाले.
तो म्हणालाम्हंजी? दादोजी कोंडदेव बिनबाह्याचा शर्ट घालायचा? काय इचीत्र मानूस ठेवला होता म्हाराजांनी गुरु म्हनून!”
हे ऐकून शकीललाही हसू आवरेना. “गप रे दत्ताम्हणत त्याने जीप कॉलेजच्या आवारात घेतली.
आम्हाला तसा उशीरच झाला होता. कॉलेजचे आवार गर्दीने आणि उत्साहाने फुलून गेले होते. व्हरांड्याचाच भाग वाढऊन त्याचे कायमस्वरुपी स्टेज केले होते. ते अनेक कार्यक्रमांना, कॉलेजचा गणपती बसवायला उपयोगी पडायचे. आज ते छान सजवलं होतं. सरांसाठी खुर्च्या मांडल्या होत्या. डायसला झेंडूच्या फुलांच्या माळा सोडून सजवले होते. डायसच्या मागे टेबल ठेवले होते. त्यावर सुरेख रचना करुन पुष्पगुच्छ ठेवला होता. शेजारीच एक उंच स्टुल सजवून त्यावर यावर्षीचा करंडक ठेवला होता. मुलं समोरच्या ग्राऊंडवर खालीच बसणार होती त्यामुळे मांडव घातला होता. आज गर्दीही जास्त होती. कारण इतर कॉलेजच्या भाग घेणाऱ्या विद्यार्थांसोबतच त्या त्या कॉलेजचे बाकी विद्यार्थीही स्पर्धा ऐकण्यासाठी आले होते. आम्हाला पहाताच जोशीसर धावतच आले. त्यांच्या चेहऱ्यावर वैताग दिसत होता. त्यांनी जवळ जवळकरंडकहातातून गेल्याचे गृहीतच धरले होते
ते शाम्यावर ओरडलेहोता कुठे तुम्ही तिन दिवस? कांडात काढणार वाटतं कॉलेजचं तुम्ही. काय काय तयारी केलीये? बघू जरा तुम्ही काढलेले मुद्दे
शाम्या ऐवजी दत्त्याच म्हणालाकाय सर, जरा अप्पाच्या हाताकडं तरी पघा. ते बिचारं दोन दिवस धुत्या हातानं खातय आन् तुमाला कपाचं आन् बश्यांचं पडलय.”
सरांचे माझ्या हाताकडे लक्षच गेले नव्हते. त्यांना खरच काळजी वाटली. पण त्यांना याक्षणी कॉलेजचा यावर्षीचा कप दिसत होता फक्त
ते म्हणालेअरे अप्पा, आता कोणाच्या फाटक्यात हात घालायला गेला होतास तू? जास्त लागलय का?
नाही हो सर. फक्त हेअर लाईन फ्रॅक्चर आहे. होईल ठीकमी गेल्या दोन दिवसात कितव्यांदा हे वाक्य उच्चारले होते कुणास ठाऊक
पण सरांच्या डोक्यातून स्पर्धा काही जात नव्हतीअरे अप्पाचा हात दुखावलाय ना, की मेंदू? आणि त्याचा हात दुखावला म्हणून तुम्ही का थोटे झाला सगळे? शामराव काही तयारी केलीय का?”
नाही सर. काही तयारी वगैरे नाही केली. त्या मुळे मी बोलणारच नाहीए. अप्पाही नाही बोलू शकणार. इन्नीचे माहित नाही.”
माती टाकलीत रे सगळ्यावर तुम्ही करंट्यांनो. करा काय करायचे ते.” म्हणत सर हताश होऊन स्टेजच्या तयारीकडे वळले.

आम्ही पुढच्या दोन तिन रांगांमध्ये बसलो होतो. प्रत्येक स्पर्धक अगदी पोटतिडीकेने बोलत होता. कुणी भाषणाच्या मध्ये मध्ये स्वरचीत कविताही घेत होते. प्रत्येकाचे भाषण ऐकताना वाटत होतं कीहाच जिंकणार’, पण दुसरा त्यापेक्षाही सुरेख भाषण करत होता. इन्नीही फार पोटतिडकेने बोलली. पहिला पॅराच फक्त तिने लिहिलेल्या भाषणातून घेतला बाकी मग ती जे सुरु झाली की विचारु नका. सर्व काही उत्स्फूर्त. पोटातून आलेले. त्यामुळे तिचे भाषण प्रभाविच झाले. सरांच्या चेहऱ्यावर तिच्या भाषणामुळे जरा आशा दिसायला लागली. पण एक मात्र झाले. स्पर्धा वादविवादाची असुनही सगळ्यांनी एकच बाजू मांडली. ‘हुंडा घेऊ नये, देऊ नये’. अर्थात ते अपेक्षितही होते. सगळ्यांची भाषणे उरकली होती. परीक्षक उठायच्या तयारीतच होते इतक्यात शकील उठला. हात वर करुन म्हणालाथांबा सर, मलाही बोलायचं आहे.” मीही जरा चकितच झालो. मला कल्पना नव्हती हा असा मध्येच उठेल याची. दत्त्याने मात्र जोरात शिट्टी वाजवली. म्हणालाआता पघा, आमचा कसाई कसा खिमा करतोय समद्यांचा ते. हुन् जाऊंद्या.” जोशीसरांना तर आनंदाने भरतेच आले

शकील स्टेजवर गेला. त्याने प्रथम डायसच्या फुलांच्या माळा व्यवस्थित केल्यासारखे केले आणि मग डाव्या हाताचा कोपरा डायसवर टेकवला दुसऱ्या हाताने डायसचा कोपरा पकडला. एकदा समोर बसलेल्या सगळ्यांकडे नजर फिरवली माईकजवळ झुकत हलकेच म्हणालानमस्कार मित्रांनो! सलाम!”
त्याच्या या एका वाक्याने आमच्या कॉलेजच्या मुलींनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. ते पाहून मग मुलांनीही शिट्ट्या, आरोळ्या मारुन एकदम गदारोळ केला. त्याला मिळालेला तो उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून मला उगाचच भारी वाटलं. या एका वाक्यासाठी त्याला कप द्यावा असं वाटून गेलं. शकीलने मग रुबाबत एक हात वर करत सर्वांना शांत केलं. वातावरण निर्मीती झाली होतीच पण शकीलने अजुन एक खात्रीचा वेढा द्यायचा म्हणून मागे बसलेल्या सगळ्या सरांकडे हसुन पाहिले.
भाषण सुरू करायच्या अगोदर येथे जे माझे आदरणीय शिक्षक बसले आहेत त्यांना काही विचारायचे आहे. परवानगी आहे ना सर?” शकीलने जोशीसरांकडे पहात विचारले
सर घाई घाईत म्हणालेअरे विचार ना? काही शंका आहे का?”
नाही सर शंका नाही. पण आजच्या आपल्या सभेचा विषय आहे हुंडा घ्यावा की नाही. तर मला या माझ्या आदरणीय गुरवर्यांचा मान राखत विचारायचं आहे की तुमच्या पैकी किती जणांनी हुंडा घेतला नाही? म्हणजे मला माझे मुद्दे मांडायला.”
सर्व सरांमध्येच काय तर मुलांमध्येहीपिन ड्रॉप सायलेन्सपसरला. शकीलच्या आवाजात, भाषेत उध्दटपणा नसला तरी प्रश्न अगदीच थेट आणि वर्मी होता. ट्रिकी होता.
दत्त्या मात्र चेकाळला होता हे ऐकून. म्हणालामला म्हायतीच व्हतं, हे कसायाचं बेनं असंच नरडीला सुरा लावनार ह्यांच्या. द्या उत्तर म्हनावं आता.”
मी दत्त्याला गप्प करत होतो. शकील सगळ्या सरांकडे मंद हसत पहात होता. सगळी पोरं तणावाखाली होती. आणि सगळे सर गोंधळले होते. विचित्र परिस्थिती होती. इतक्यात फिजीक्सचे सर उभे राहून म्हणालेशकील, अगदी स्पष्ट प्रश्न विचारलास तू. मला आवडले. मी माझ्या लग्नात हुंडा घेतला नाही.” बाकीच्या सरांना हायसे वाटले इतक्यात शकीलने फिजीक्सच्या सरांकडे वरपासून खालपर्यंत नाटकीय पध्दतीने पाहीले आणि त्याच सुरात विचारलेकाय सर, हुंडा घेतला नाही की, दिला नाही तुम्हाला?
इतक्यावेळची ताणलेली शांतता खळ्ळकन काच फुटावी तशी भंगली आणि एकदम हास्याचा स्फोटच झाला. स्टेजवर बसलेल्या सर्व सरांनाही हसु आवरेना. फिजिक्सच्या सरांनाकुठून झक मारली आणि उठून उत्तर दिले असं झालं. त्यांचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. मलाही बरं वाटले. या सरांचा काहीही कारण नसताना आम्हा मित्रांच्या ग्रुपवर दात होता. दत्त्याला गावंढळ भाषेबद्दल बोलायचे, मान खाली घालून सगळं ऐकून घेतो म्हणून ठोब्बाला वाट्टेल तसे बोलायचे. शकीलने चांगलीच जिरवली होती त्यांची. शकीलने परत हात वर करुन सगळ्यांना शांत केले. मग सावकाश सुरवात केली.

इथे बसलेल्या बहुतेक सरांनी हुंडा घेतला आहे हे खरं आहे. पण मला तरी त्यात गैर काही वाटत नाही. तो काळच तसा होता. हुंड्यासारखी सुंदर आणि लोभस प्रथा दुसरी तरी मला दिसत नाही. पण तो हुंडाहुंडाम्हणून द्यायला पाहिजे आणिहुंडाम्हणूनच स्विकारला पाहिजे. आज मात्र आपण या प्रथेतला लोभसपणा काढला आणि फक्त लोभ ठेवला आहे. हुंड्याचे आपण विकृतीकरण केले आहे स्वार्थापोटी. पण एक लक्षात घ्यायला हवे सर्वांनीच की जेंव्हा लहान मुल आपल्या मांडीवर शी करते तेंव्हा आपण मांडी कापत नाही तर साफ करतो. तसेच हुंडा ही प्रथा नाहीशी करण्यापेक्षा त्या प्रथेतलं नापाक जे आहे ते काढून, परत साफ करुन तिला तिचे मुळचे स्वरुप द्यायला हवे. आपण मात्र हुंड्याचे झालेले विकृतिकरण पाहून हुंडा ही प्रथाच बंद करायला निघालो आहोत. हे म्हणजे असं झालं की, आमच्या अप्पाचा हात परवा मोडला तर त्याला प्लॅस्टर करायचे सोडून त्याचा हातच तोडायचा. हे चुक आहे. मी आज या मंचावरुन सगळ्यांसमोर लाजता अभिमानाने सांगतो की मीहूंडाया प्रथेचा अगदी कट्टर म्हणावा असा समर्थक आहे. येथे समोर माझी लाडकी बहिण बसली आहे. तिच्या हातावर आता काही वर्षातच शादीची मेहंदी काढावी लागणार आहे आम्हाला. काय इन्ने, खरं की नाही? (इन्नी लाजुन चुर) तिला द्यायच्या हुंड्याची तयारी मी आतापासुनच करतो आहे. माझी अम्मी करते आहे. तिला केसांमधले सुर्य-चंद्राचे आकडे हवेत सोन्याचे. ते तर देणारच आहे मी पण त्याहीपेक्षा महत्वाचे माझी सगळी पुस्तके देणार आहे. मला माहिती आहे, तिचा डोळा आहे अब्बांनी मला दिलेल्या पेनवर. तो पेनही मी देणार आहे. अम्मीने काय ठरवलय मला माहीत नाही पण अम्मी सगळ्यात पहिल्यांदा तिला तिने खास शिवलेले दस्तरखान देणार हे नक्की. इन्नी जेंव्हा जेंव्हा रागवेल, रुसेल तेंव्हा भाईचा नुसता पेन पाहूनही तिला किती बरे वाटेल. तिची मुलं शकीलमामूनी वाचलेल्या गोष्टी वाचतील मामूच्याच किताबांमधून. उदास असताना अम्मीने दिलेल्या दस्तरखानवर बसुन ती जेवेल तेंव्हा तिची उदासी पळभरमधे दुर होईल. अम्मी जवळ असल्यासारखंच वाटेल तिला याची मला खात्री आहे. आता तुम्हीच सांगा नको देऊ का माझ्या बहिणीला हुंडा? तुम्हीच ठरवा की जर मी दिलेला हा हुंडा इन्नीच्या सासरच्या लोकांनीआम्ही हुंडा घेत नाहीअसं म्हणून नाकारावा काय? काय गं इन्ने? नको का तुला हुंडा? शकील क्षणभर थांबला. पळभर शांतता राहीली आणि मग एकच टाळी पडली. काही मुलींनी उभं राहूनहुंडा हवाच! हुंडा हवाच!” म्हणत टाळ्या वाजवायला सुरवात केली. मी इन्नीकडे पाहिलं तर ती डोळे पुसत होती आणि तिच्या आजुबाजूच्या मुली तिच्याकडे कौतूकाने पहात होत्या.
मुली विस बाविस वर्षे आपल्या अम्मी अब्बूबरोबर रहातात. ससुरालला जाताना हे सगळं मागे सोडून जाणे आसान वाटले काय तुम्हाला? या इतक्या वर्षात काय काय दिलेले असते अम्मी अब्बूंनी भेट म्हणून मुलींना. किती आठवणी असतात त्याभोवती. माझ्या अम्मीने तर दहेज मागुन घेतला होता. काय आणले असेल अम्मीने दहेजमधे, तर दादीची बिर्याणीची हांडी, मसाल्याचा इमाम-दस्ता, दोन दस्तरखान आणि हसाल तुम्ही पण पांघरायच्या काही रजया. दादीच्या साडीपासुन केलेल्या. आता दादी राहीली नाही. पण अम्मी अजुनही मसाला कुटताना तो इमाम-दस्ता कुरवाळते आणि घरी त्याच हांडीत बिर्याणी पकवते. त्या वस्तुतून ती तिच्या अम्मीला परत परत भेटते. आपण एखादे रोपटे एका जागेवरुन उपटून दुसऱ्या जागेवर नेऊन लावतो तेंव्हा ते फक्त मुळांसकट नाही उपटत, तर मुळांच्या आजुबाजूला असलेल्या मातीसह उपटतो आणि मग दुसऱ्या जागी लावतो. ती मातीच त्या रोपट्याला नव्या जमीनीत रुजायला मदत करते. हुंडा म्हणजे त्या मुळांभोवती असलेली माती आहे. ही माती मुलींना नव्या जमीनीत रुजायला मदत करते.”
शकील थोडं थांबून म्हणालाहुंडा म्हणजे अम्मी अब्बांनी आपल्या लाडक्या मुलीला दिलेला नायाब तोहफा असतो. आणि आपण काय करतो? तर लग्नाच्या अगोदर याद्या करतो. पैसे, स्कुटर, टिव्ही मागुन घेतो. मुलीच्या अब्बूला कर्जे के निचे दाबून टाकतो. हुंड्यासारखी जन्नतहुन खुबसूरत चिज आम्ही अगदी बदसुरत करुन टाकतो. काहींचं मागणं तर लग्नानंतरही सुरुच रहाते. ‘संसार मोडला तर बापको तकलीफ होईलम्हणून मुलगी गप्प रहाते आणि मॉंग पुरी नाही केली तर पोरीचा संसार मोडेल म्हणून बाप कर्ज काढून मॉंगे पुरी करत रहातो. ‘नको पोटाला मुलगीअसं वाटतं त्या बापाला. गलत, बिलकूल गलत, सरासर गलत

शकील चाळीस मिनिटांचीच वेळ असुनही दिड तास बोलत होता. हुंडा देणे किती सुंदर प्रथा आहे, नुसती सुंदरच नाही तर किती गरजेचीही आहे मुलींचे भावविश्व परत उभारायला. हुंड्याची नविन दांपत्याला आर्थीक मदतही कशी होते गरज असेल तर. हुंड्यात दिखाऊपणा कसा येत गेला. व्यवहार कसा येत गेला. आज ही प्रथा विकृतीकडे कशी झुकली आहे. हुंडा आपण कसा प्रतिष्ठेचा विषय केला आहे वगैरे अगदी आपल्या, समोरच्याच्या घरातील उदाहरणे देऊन सांगत होता. मुली रडत होत्या, रुमालाने डोळे पुसत होत्या, विनोदाला हसत होत्या. मुलं टाळ्या वाजवत होती. दिड तास शकीलने सगळी सभा मंत्रमुग्ध केली होती. “…तर मी जे काही बोललो त्यातले जे काही वेडेवाकडे होते ते माझे होते आणि जरासे बरे होते ते आमच्या जोशीसरांचे होते. शुक्रीया.” म्हणत शकील टाळ्यांच्या कडकडाटात स्टेजवरुन खाली उतरला. सगळे सरही उभे राहून टाळ्या वाजवत होते. अगदी फिजिक्सचे सर देखील. दहा मिनिटे परिक्षकांनी आपापसात चर्चा केली. एव्हाना बाकीच्या कॉलेजच्या विद्यार्थांना आणि शिक्षकांनाहीआपला करंडक गेलायाची जाणीव झाली होती. पण विशेष म्हणजे कोणालाही त्याचे वाईट वाटत नव्हते. प्राचार्यांनी माईक हातात घेत विजेत्यांची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे शकीलला प्रथम, दुसऱ्या कॉलेजांना द्वितीय आणि तृतिय बक्षीस जाहिर झाले. इन्नीलाउत्तेजनपरवरच समाधान मानावे लागले. प्राचार्यांनी विजेत्यांना स्टेजवर बोलावले. अभिनंदन करत बक्षिसे दिली. सगळ्यात शेवटी शकील करंडक घ्यायला आला. संभूसमॅडमच्या पाया पडला. जोशीसरांच्या पाया पडताना सरांनी त्याला उठवूनकरंडक राखलास, लाज राखलीस मियॉंम्हणत चक्क मिठी मारली.
शकील प्राचार्यांना म्हणालासर तुमची हरकत नसेल तर दत्ताकडुन आणि इन्नीकडून हा करंडक मला मिळावासरांनी हसत अनुमती दिली आणि दत्त्याला, इन्नीला स्टेजवर बोलावून घेतले. दत्त्याची छाती शर्टच्या गुंड्या तुटतील इतकी फुगली होतीपुष्पगुच्छ वगैरे दिल्यानंतर दत्ताने आणि इन्नीने शकीलमियॉंना करंडक दिला. एक कॉलेजसाठी आणि एक शकीलसाठी असे दोन तिन फोटो काढण्यात आले
शकीलने करंडक इन्नीकडे दिला आणि म्हणालाइन्ने ते भाषणातलं फारसं मनावर नाही घ्यायचं बरका. मै कुछ दहेज नही देने वाला. माझे पेन आणि पुस्तके तर बिलकूल नही.” सगळेच हसले. इन्नीने तेवढ्यात त्याच्या दंडाला करकचून चिमटा काढून घेतला. दत्त्याने इन्नीकडून करंडक घेतला आणि जनुकाही तो त्यालाच मिळालाय अशा पध्दतीने डोक्यावर धरुन मिरवत माझ्याकडे आला.

संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे शामच्या ओट्यावर बसलो होतो. इन्नीचे स्केचपेननी माझ्या हाताच्या प्लॅस्टरवर मेहंदीची डिझाईन काढने सुरु होते
दत्त्या हसत म्हणालाअप्पा, तु पघीतलं का?”
काय पहायचं राहीलय आता दत्ता?”
अरं, मी शकीलला कप द्येताना असा धरला व्हता की फोटोत कळायचंबी नाय की कोण कप द्येतोय आणि कोण घेतोय. हाय का नाय शक्कल?”
शकील म्हणालाअरे पण तुझ्या या शक्कलचा उपयोग काय? का उगाच आपलं कुछ भी!”
दत्त्या बेरकी हसत म्हणालाकळन तुला फोटो धुवून आल्यावं


आजही दत्त्याच्या नविन घराच्या हॉलमध्ये टिंट कलरचा ब्लॅक ॲंड व्हाईट फोटो फ्रेम करुन लावलाय आणि प्रत्येकाला तो फोटो दाखऊन दत्त्या सांगतोअसा फाडला व्हता एकेकाला त्या टायमाला की इचारु नका. आपल्या शकीलभाऊच्याच हातुन कप मिळाला व्हता मला. इचारा शकीलला.”

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...