❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

गुरुवार, १० जून, २०२१

पडद्याआडचे मोती

मी कुठेही गेलो तरी काही लोकांबरोबर माझी फार चटकन मैत्री होते. आणि नाही झाली तर मी ती आवर्जून करतो. या मधे प्रामुख्याने असतात परिसरातील हॉटेलमधले आचारी, वेटर, परिसरातील डेअरीवाला आणि खाटीक. पुस्तकं मानसाची खरे मित्र असतात तर असतील बापडे पण मला कधीच ग्रंथालयात तास तासभर घालवूनही कुणी मित्र कधी मिळाला नाही. तेथे समविचारी नक्की मिळतात पण मैत्रीची नाळ जुळतेच असे नाही. एखाद्या मटन खानावळीत मात्र कधी, कोण, कुठला मित्र मिळेल व जीवाभावाचा होईल हे सांगता येत नाही. एखाद्या अप्रतिम बिर्याणी मिळणाऱ्या कुठल्याशा अगदीच अप्रसिद्ध ठिकाणी तुम्ही अगदी चवीने बिर्याणी खात असता आणि समोर बसलेला एखादा मुसलमान भाताच्या शितांनी भरलेला हात अधांतरी तरंगत ठेऊन तुम्हाला विचारतो “कहा से हो साब?” आणि तुम्ही येथलेच असुन मराठी आहात हे समजल्यावर “ह्या! तुम मराठी लोगों को क्या मालूम बिर्याणी क्या होती है! तुम्ही लोग कोंबडीची खिचडी करुन खाता आणि तिलाच बिर्याणी म्हणता” असं बिनदिक्कत आपल्या तोंडावर सांगतो. “बिर्याणी पकती है तो सिर्फ मुसलमान के घर मे, बाकी सब खिचडीवाले” वर हेही ठणकावयाला तो अनमान करत नाही. मग पुर्ण बिर्याणी संपेपर्यंत त्याच्या गप्पा सुरुच रहातात. जेवण संपल्यावर “मराठ्यांना काय माहित गोश्त कशाशी खातात” असं म्हणत हा आपल्या हातावर कौतूकाने पाणी घालतो. येथे धर्मावरुन, जातीवरुन भेदही केले जात नाही व अपमानही केले जात नाही. तेच एखाद्या ग्रंथालयात बसून “अमुक लेखक काही खास लिहित नाही” असं म्हणायची खोटी, तुमच्यावर दोन चार जण शाब्दीक हल्ला करायला तयारच असतात. ग्रंथालयात एखाद्या गोष्टीवरुन मतभेद झाले की मनभेद व्हायला वेळ लागत नाही पण एखाद्या पदार्थावरुन जर तुमचे कुणाबरोबर मतभेद झालेच तर समोरचा तुम्हाला हट्टाने तो पदार्थ खिलवून तुमची मतं खोडतो व मनभेद व्हायच्या ऐवजी मनमिलाफ करुन जातो. कुणी मित्र तुमच्यासमोर तासभर एखाद्या पुस्तकाचे कौतूक करतो व तु्म्ही भारावलेल्या आवाजात त्याला विचारता “भारीच आहे रे पुस्तक, तुझ्याकडे आहे का?” तर तुमचे वाक्य संपायच्या आत उत्तर येते “म्हणजे काय, प्रश्न आहे का? पण भावाने दिलेय कुणाला तरी वाचायला. आले की देईन तुला.” पुस्तक प्रेमी एक वेळ आपल्या कमरेचे सोडून तुम्हाला देईन, पण पुस्तक देणार नाही. तेच एखादा जीवलग मित्र तुम्हाला कट्यावर चहा पिता पिता सकाळी खाल्लेल्या नल्ली निहारीचे रसभरीत वर्णन ऐकवतो व तुमच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून म्हणतो “क्या बात कर रहे हो? निहार चखी नही आजतक? हायला मग आजवर खाल्लं काय आयुष्यात? सकाळी नाष्टा करु नकोस, मी येतो न्यायला. रहेमियामधली निहारी खिलवतो तुला.” आणि खरच तो सकाळी सातलाच घरी हजर होतो. त्याच्या आवडत्या रहेमियामधे बसून आपण निहारी खात असतो आणि कौतूक मात्र त्याच्या चेहऱ्यावर असतं. समोरचा दोन घास जास्त जेवल्यावर सुगरण बाईच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तोच आनंद मित्राच्या चेहऱ्यावर असतो. “हौर, कैसी लगी निहारी? अरे सवाबवालों को ही नसिब होती है अच्छी निहारी” असं म्हणत तो जेंव्हा काऊंटरवर बिल देतो तेंव्हा “अरे राहू दे, मी देतो बिल” असं म्हणून त्याच्या शिव्या खाऊ नयेत आणि त्याच्या आनंदावर विरजणही घालू नये. निमूटपणे समोरची बडीशेप उचलावी व हातावर चोळत बाहेर पडावे. याचा अर्थ मी पुस्तकांच्या छंदाविरुद्ध आहे असं नाही पण माझी कुंडली ‘तबियतने खानाऱ्याबरोब व खिलवणाऱ्याबरोबर’ जास्त जुळते. त्यामुळेच मी कुठेही गेलो की तेथले ग्रंथालय कुठे आहे याची चौकशी करण्याअगोदर तेथली खानावळ कुठे आहे याची प्रथम चौकशी करतो. 

हे मटनवाले, डेअरीवाले यांचा एक अवतार ठरलेला असतो आणि सहसा ते त्याच अवतारात वावरतात. आचारी, वेटर, खाटीक, मासेवाली मावशी यांची एक विशिष्ट कुवत आपण डोक्यात ठेवलेली असते. एक पडदा उभा केलेला असतो आपण त्यांच्या व आपल्यामधे. त्यापलिकडे आपण या लोकांचा फारसा विचार करत नाही. पण त्यांच्यातला खरा माणूस नेमकी त्या पडद्या पलिकडे असतो. तो सदैव आपल्याला अनोळखीच रहातो. कधी कधी आपण टेबलवर बसून चहाची ऑर्डर देतो व चहा येईपर्यंत गालिबचा दिवाण उघडून बसतो. चहा घेवून आलेला पोरगा तुमच्या समोर कप ठेवून म्हणतो “अरे वाह, गालिब का?” आणि जाता जाता “ये मसाईले तसव्वुफ, ये तेरा बयान ‘गालिब'। तुझे हम वली समझते जो न बादा-ख्वार होता” असं काहीसं पुटपुटत गालिबच्या वर्मावरच बोट ठेवतो तेंव्हा आपल्याला चहा पिता पिता ठसका लागतो. या मागे कारण हेच असते की वेटरची एक इमेज आपण मनात केलेली असते. त्यापलीकडचा रसीक माणूस असा अचानक दिसला की आपल्याला चकित व्हायला होते. मी नेहमी या पडद्यापलीकडील माणसांबरोबर मैत्री करायचा प्रयत्न करतो. आपण पडदा दुर करायचा अवकाश असतो, पलिकडे ही माणसे मैत्रीचे दरवाजे सताड उघडून बसलेलीच असतात. 

एकदा का तुम्ही हा पडदा हटवला की पलिकडे काय रत्ने मिळतिल ते सांगता येत नाही. लांब बाह्याचे बनियन घालून बसलेला, ओघळत्या ढेरीचा, तेलकट केसांचा पण नुकतीच पुजा आटोपल्यासारखा चेहरा असलेला आमचा डेअरीवाला भैय्या पडद्यामागे वेगळाच असतो. कधी पनिर घ्यायला गेलो की काचेच्या कपाटात पनिरचा मोठा ठोकळा असुनही “आजका पनिर मत लो साब, आवो, अंदर आवो। कुछ सुनाते है” असं म्हणत हाताला धरुन मला काऊंटरच्या आत घेतो व युपीमधल्या त्याच्या गावात गायली जाणारी गोपींची गीते व मराठी गवळणी यातली साम्यस्थळे तो मला समजावून सांगत बसतो. “गोपींची गीते ही पिलू रागातच छान खुलतात. इतर राग कितीही गोड असले तरी कन्हैया की तकरार पिलू रागमेही दिल को छुती है” असं सांगत एखादी ओळ तो पिलू रागात गाऊनही दाखवतो. तेंव्हा वाटते की या दुधा-तुपाच्या वासात बसून हा दुध पनिर का विकत बसला असेल? याच बिस्वासने मला त्याच्या दोन रुमच्या खोलीत अनेक युपीचे पदार्थ खावू घातले. त्याच दोन रुममधे बाहेरची खोली संध्याकाळी मोकळी करुन तेथे रात्र रात्र रंगवलेली भजने ऐकवली. आपल्या वयाला न शोभणाऱ्या ढेरीवर हातातले दोन्ही पितळी टाळ उपडे ठेवून हा भैय्या जेंव्हा त्याच्या ईश्वराला आळवताना तल्लीन होतो तेंव्हा ‘परप्रांतिय' वगैरे भानगड माझ्या मनातून कधीच पुसलेली असते. त्या ‘दुधवाल्या भैय्या’चे ते रुपडे मला प्रचंड भावते. त्याच्या माझ्यामधला ‘दुधवाला भैय्या’ हा पडदा दुर केला म्हणुन मला बिस्वास नावाचा हा हिरा सापडलेला असतो. अन्यथा तो माझ्यासाठी फक्त दुधवालाच राहीला असता. नुकसान त्याचे नाही, माझे झाले असते. 

परिस्थितीने माणसे कुठेही पोहचतात, कुठलाही व्यवसाय करतात. पण काहीजण या जगरहाटीत आपापला छंद आवर्जून जोपासतात. माणूसकी टिकवतात. आपण फक्त त्यांना दाद द्यायची खोटी, ते भरभरुन आपल्यासमोर त्यांच्या पोतडीतला खजिना ओततात व आपले डोळे दिपवतात. आमच्या सोसायटीत पाच वर्षांपुर्वी एक वॉचमन भरती केला होता. मी महिनाभर कामाच्या गडबडीत त्याच्याकडे लक्ष द्यायला विसरलो. जाता येता तो सलाम करताना दिसायचा. एकदा गाडी पार्क करुन मी बाहेर आलो तेंव्हा सोसायटीचा सेक्रेटरी या वॉचमनची चांगलीच खरडपट्टी काढताना दिसला. काय झाले याची सहज चौकशी केली. सेक्रेटरीचे एव्हाना शिव्या देवून झाले होते. तो तणतणत गेला आणि मी त्या वॉचमनला सहानभुती दाखवायला त्याच्या पाठीवरुन हात फिरवला. त्या क्षणी त्याचा बांध फुटला. रडत रडत आपल्या केबिनकडे जाताना तो प्रेमचंदची काही वाक्य पुटपुटत गेला आणि मी चकितच झालो. पुढे या वॉचमनबरोबर मी कित्येक रात्री त्याने लिहिलेल्या कथा त्याच्याच तोंडून ऐकत जागवल्या. स्वतःच्या कवितेंना स्वतःची स्वतंत्र चाल लावून गायलेल्या अप्रतिम हिंदी काव्यरचना मला त्याने ऐकवल्या. त्याच्या नाटकांच्या कथानकांवर मी तास तासभर त्याच्याशी चर्चा केल्या. तिशीच्या आसपास असलेल्या या ‘वॉचमन’ने “सलाम मत करो यार” या माझ्या हट्टापुढे मान तुकवली, तरीही आमच्या सोसायटीतल्या एखाद्या बथ्थड डोक्याच्या व्यापाऱ्याला तो सलाम करतो तेंव्हा उगाच माझ्या काळजात काहीतरी तुटतं. 

दुपारच्या शांत वेळी मोबाईल वाजतो. स्क्रिनवर शब्बिरचे नाव पाहून मी फोन उचलतो. हॅलो म्हणायच्या आतच समोरुन सलाम येतो. या सलामला प्रत्युतर द्यायच्या आत शब्बिरचे सुरु होते “देखो साब, सातो दिन भगवानके, क्या मंगल, क्या पीर” त्याला मधेच थांबवून मी म्हणतो “ते माहितीय शब्बीर पण मी आज नाही येऊ शकणार जेवायला. आपण पुन्हा कधीतरी जमवू” हसून शब्बिर म्हणतो “साब दावत पे नही बुला रहा हू. गोश्त बिलकूल आपको चाहिए वैसा मिला है आज। मै निकाल के रखता हूं, पाच बजेतक आ जाना। वोह आपका पीरका मसला मत रखो सामने” गोश्तपेक्षा शब्बिर आज वेळ काढतोय म्हटल्यावर मी पाच ऐवजी साडेचारलाच दुकानावर पोहचतो. अशा वेळी दुकानात कितीही गर्दी असली तरी शब्बिर मला घेवून पलिकडच्या त्याच्या बंद गाळ्यात घेवून जातो व तेथे मग आमची बैठक बसते. हा शब्बिर व्यवसायाने खाटीक आहे. त्याची आठ दहा मटण चिकनची दुकाने आहेत. पण याचा खरा शौक आहे किचन. हा शौकीया खानासामा आहे. याच्या बरोबर राहून मला किचनमधली असंख्य गुपिते कळाली. अगदी कमी दर्जाच्या गव्हाच्या पिठाच्या रोट्या उत्तम गव्हाच्या रोटीसारख्या कशा बनवायच्या येथपासून ते आपण कांदा कसा कापतो यावर पदार्थाची चव कशी अवलंबुन असते येथपर्यंत त्याने अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकवल्या. एखाद्या सुगरण बाईचेही स्वयपाकात इतके लक्ष नसेल ईतके शब्बिरचे असते. लौकी की सब्जीपासून ते हलीम पर्यंत वाटेल ते पदार्थ बनवणाऱ्या शब्बिरला माझ्याकडचे वरण भात आवडते. पहिल्यांदा तो जेंव्हा माझ्याकडे जेवायला आला होता तेंव्हा वरण भाताच्या पहिल्याच घासाला ‘वाह’ म्हणायच्या अगोदर हा म्हणाला होता “भाभी हिंग फोडणीत नका टाकत जावू. हिंगाचे पाणी करुन ठेवा व ते वापरत जा” नंतर मात्र कौतूक करत तो तब्बेतीत वरण भात चेपून गेला. हिंग फोडणीत टाकलाय की वरुन टाकलाय हे पहिल्याच घासात ओळखणारा शब्बिर मग अगदी ‘फॅमिली फ्रेंड’ झाला. एखादा मुसलमानही रमझानची जेवढी वाट पहात नसेल तेवढी मी पहातो. याला कारण शब्बिरच्या बायकोच्या हातचे रोट व खुद्द शब्बिरच्या हातचे हालिम. मी अगदी जानेमाने खानसामे पाहिले. पण एकाच्याही हातच्या हालिमला शब्बिरच्या हातच्या हालिमची चव नाही. याच शब्बिरला घेवून मी मित्राच्या फार्महाऊसवर किंवा जवळच्या टेकड्यांवर कित्येकदा निहारीची हांडी लावलीय. सात आठच्या दरम्यान घरुन डब्बा घेवून जायचे. गेल्या गेल्या प्रथम टेकडीवर छान जागा पाहून जेवण उरकायचे. अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या की निहारीसाठी चुल पेटवायची. रात्रभर पकवलेल्या निहारीचा आस्वाद पुर्वेला जरा फटफटले की मग घ्यायचा. सुर्याच्या पहिल्या किरणांना आपली रिकामी ताटेच दिसायला हवीत. रात्रभर मारलेल्या गप्पा व पहाटे पहाटे शब्बिरच्या हातची खाल्लेली निहारी याचे वर्णन ‘स्वर्गसुख’ या शब्दातही करता येणार नाही. कितीवेळा मी शब्बिरबरोबर ही हांडी लावलीय पण प्रत्येकवेळी त्याचे काहीतरी प्रयोग सुरु असतातच. आज मी माझ्या घरी जी निहारी बनवतो त्याची पाककृती पाहून कुणी खानसामा नाक मुरडेलही पण कित्येक रात्री जागवून केलेल्या प्रयोगातून ही निहारी शब्बिरने सिद्ध केली आहे. त्यामागे त्याचा रियाज आहे. बुद्धिमत्ता आहे, कष्ट आहेत. घरच्या व्यवसायामुळे एम फिल करता करता राहीलेला शब्बिर जेंव्हा जे कृष्णमुर्तींवर बोलतो तेंव्हा हरखुन जायला होते. 

मी कधीही श्रद्धेचा, वारांचा आणि आहाराचा एकमेकांशी संबंध जोडत नाही, आणि मानतही नाही. त्यामुळे पहाटेच्या गार वाऱ्यात दोन पेग व्होडका झाल्यावर नल्ली निहारी खाता खाता शब्बिरच्या तोंडून उर्दूमधे जे कृष्णमुर्ती ऐकणे हा माझ्या आयुष्यातल्या मोजक्या आनंदांपैकी एक आनंद आहे.

आज निहारीची पाककृती द्यायची म्हणून लिहायला बसलो आणि विषय भलतीकडेच गेला. त्यामुळे पाककृती पुढच्या वेळी देईन, सध्या या रविवारी केलेल्या निहारीचा फक्त फोटो देत आहे.

लेखनकंटाळ्यामुळे लेखनसिमा.
😂😍🤤



Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...