❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

दर वर्षी असं होतं...

नेमिच येतो पावसाळाअसं म्हणन्यात काही अर्थ राहीला नाही आजकाल. तो कधीही येतो. कधी कधी येतही नाही. लहरी झालाय तो मानसांसारखाच. मात्र पंचांगाप्रमाणे श्रावण येतो आणि मागोमाग भाद्रपदही येतो. पण श्रावण आला की बायको वैतागते आणि भाद्रपद आला की मुलगी चिडते. निमित्त श्रावण आणि भाद्रपदाची असली तरी या वैताग आणि चिडचिडीला कारण असतो मी. म्हणजे श्रावण आला की मी अचानक फार काटेकोर, रुढीप्रिय वगैरे होतो. अर्थात मला फायद्याच्या असणाऱ्या रुढी आणि परंपराच मी पाळतो हा भाग वेगळा. श्रावणात मी एकही उपवास करत नाही. मला झेपतच नाही उपवास. पण बाकीच्या गोष्टी मात्र मी अगदी कसोशीने पाळतो. श्रावणाचे तिसही दिवस मी ताटात जेवत नाही. कुणाला जेऊही देत नाही. मला रोज केळीची स्वच्छ आणि कोवळी पाने लागतात. उपवास नाही केले तरी फराळाचे वेगवेगळे पदार्थ मला हवे असतात. दर सोमवारी संध्याकाळी मला डावं उजवं व्यवस्थित सजवलेलं पान हवं असतं. फक्त अळूवडीवर माझं भागत नाही. “पाच सहा अळूच्या पानांचं फदफदंही कर गं जरा.” ही फर्माईश असतेच. श्रावणात मला अचानक चौरस आहाराचं महत्व कळतं. आहारात दही, फोडणीचं ताक, सलाड, रायती यांचं किती महत्व आहे हे मला नव्याने जाणवतं
पंचामृत हे काही पुजेसाठी फुलपात्रभर करायची गोष्ट आहे का? चांगलं वाडगाभर कर आज. किती फायदे आहेत पंचामृताचे माहित आहे का?” असं म्हणून मी दोन तिन वाट्या पंचामृत संपवतो. (त्यासाठीचे मध मित्राने गावावरुन पाठवलेले असते. अगदी शेतातल्या झाडावरुन काढलेले.)
सगळे रस आहारात हवेच. मग कुरकूरीत कारल्याच्या खमंग काचऱ्या हव्यातच. मेथीची भाजी हवीच. शनिवारी कोरडं पिठलं पानात हवंच. खिरीशिवाय का कुठे श्रावण होतो? मग खिर हवीच. “परवाची तांदळाची खिर सुरेख झाली होती ना! मला आवडलीच. जरा शेवयांचीही करुन बघ ना. चीऊला आवडते खुप.” असं थोडं कौतुक, थोडं इमोशनल ब्लॅकमेल करुन मी खिरीचे चार तरी प्रकार श्रावण सरेपर्यंत करायला लावतो. दुधीची भाजी आवडत नाही म्हणून मग हलवा करणं क्रमप्राप्तच होतं बायकोला. दुधी पोटात जायला हवा की नको? मग. याशिवाय जन्माष्टमीचा सुंठवडा, नारळीपौर्णीमेचा नारळीभात किंवा साखरभात यासारखे प्रकार सुरुच असतात. आणि या सर्व श्रावणभर चालणाऱ्या व्यापात बायकोला मी काडीचीही मदत करत नाही. काडीची म्हणजे शब्दशः. मेथीची जाऊद्या पण साधी कोथिंबीरीचीही काडी मी निवडून देत नाही. मी कधी वजन केलं नाही पण खात्रीने श्रावणात बायकोचे दोन किलो वजन कमी होत असणार आणि माझे खचितच वाढत असणार. श्रावण सरला की बायको चक्कहुश्शकरते

पण भाद्रपद आला की मग मात्र घरातले काही नियम बदलतात. गणेशचतुर्थीपर्यंत मला ड्रायव्हींगला परवानगी नसते. गाडी चालवणे राहूद्या, संध्याकाळी फिरायलाही परवानगी नसते. फिरायचंच असेल तर चतुर्थीपर्यंत मार्ग बदललेला असतो. आमच्या सोसायटीच्या मागे एक छोटीशी टेकडी आहे. ती एव्हाना छान हिरवाईने नटलेली असते. त्या टेकडीवर फिरायला जाणे सुरु होते. हे सगळं का चाललेलं असतं ते मला कळतं पण मायलेकींपुढे माझे काही चालत नाही. अर्थात मीही काही कमी प्रयत्न करत नाही पण दोघीही अत्यंत सावध असतात
अगं येताना भाजी तरी आणता येते मंडईतुन. टेकडीवरुन काय गवत आणायचे का?” माझा लहानसा प्रयत्न.
मी आणलीए सकाळीच भाजी आणि दही. टेकडीवरच जाऊयात.” बायको शिताफीने माझा प्रयत्न हानून पाडते
कधी कधी मी चप्पल घालून दारातुनच सांगतोऐक रमा, मी जरा केस कापुन येतो. तुला आणायचय का काही?”
बायको तत्परतेने बाहेर येऊन विचारतेआता कुणाचे केस कापायला चाललास? न्हाव्याचे?”
मी आपलातु फारच बुवा विनोदी!’ असा चेहरा करुन उभा असतो तोवर बायको आठवण करुन देतेतु मागच्याच आठवड्यात कापलेत केस. आता काय झिरो मशीन मारणार आहेस?”
मग मात्र मी बहाने वगैरे बाजुला ठेऊन सरळ मुद्यावर येतो. “गणपतीचे स्टॉल्स लागलेत का ते पाहून येतो. चौकात काही स्टॉल्स लागलेत म्हणजे आपलेही स्टॉल्स लागलेच असणार.”
स्टॉल्स लागलेत, पण त्यांची अजुन मांडामांडच चालली आहे. इतक्यात जाऊन काय करणारेस? आतात्यांना जरा मदत करतो मांडायलाअसं काही म्हणून नकोस हां. तुझा काही भरवसा नाही.” बायको टोचून बोलून टाळते.
मग लॅपटॉप उघडून मागील काही वर्षांचे गणपतीचे फोटो पहात कसं बसं समाधान करुन घेतो. घरभर नजर फिरवतो. यावर्षी कुठे स्थापना करायची बाप्पाची, यावर विचार करतो. ‘शास्त्रयावर माझा फारसा विश्वास नसल्याने मला दिशा वगैरे गोष्टी आड येत नाही. पण बायको आणि मुलगी माझी हीनजरदेखील ओळखून असतात. मी असा चौकस नजरेने घरभर पहायला सुरवात केली की पहिली वॉर्नींग असते मुलीची. “बाबा, माझ्या खोलीत नाही बसवायचा हां गणपती. अगोदरच सांगते.” म्हणत ती तिचा निर्णय जाहीर करते. बायकोला तर जणू सुड घ्यायला संधीच मिळालेली असते. तिच्या डोळ्यापुढून सगळ्या श्रावण महिन्यातली धावपळ सरकून जाते. त्यामुळे तिची भुमिका ठाम असते
तुला हवी तिथे स्थापना कर गणपतीची. मी मदत नाही करणार अजिबात. मला माझी कामे आहेत. आणि सोफा अजिबात हलवायचा नाही जागेवरुन. टिव्ही सुध्दा अनमाऊंट नाही करायचा. मागच्या वर्षी दहा दिवस बंद होता टिव्ही.”
मग माझी तणतण सुरु होते. लहानमोठ्या गोष्टींवरुन मी चिडायला लागतो. कशावरुनही वाद सुरु करुन तो शेवटी गणपतीवर आणून ठेवतो. “गणपती आल्यावर फक्त मलाच आशिर्वाद देणार आहेत जसे काय!” किंवागेल्या जन्मी ख्रिस्तांव होत्या की काय दोघी?” या सारखी वाक्ये मी कुठल्याही वादात वापरायला सुरवात करतो. पण दोघीही एखाद्या योग्यालाच शोभेल अशास्थितप्रज्ञवृत्तीच्या होतात. मग मी ठेवणीतलं हत्यार वापरतो. पानात वाढलेली आवडती भाजी खाता दुध पोळी खाणे, शेवटचा भात घेणे. बोलता जेवणे. वगैरे. या ब्रम्हास्रापुढे काही बायकोचा टिकाव लागत नाही. “बसव तुला कुठे बसवायचाय तिथे तुझा गणपतीअशी वैतागुन का होईना परवानगी मिळते. मुलगी तिचा स्टडी टेबल द्यायची तयारी दाखवते. लढाईतली पहिली चकमक मी जिंकलेली असते. गणपती म्हटलं की मला इतका उत्साह असतो असतो की अशा चकमकींनी काही तो तसुभरही कमी होत नाही. मग यादी सुरु होते दहा दिवसांच्या दहा प्रसादांची. विचार करुन, चारदा नावे खोडून एकदाची मी प्रसादांची आणि नैवेद्यांची यादी बनवून बायकोच्या मोबाईलमध्येटू डू लिस्टमध्ये तसेच कॅलेंडमध्येही टाकून देतो. जरा घाबरत पण वर वर अगदी सहज आवाजात बायकोला सुचना देतोरमा, जरा प्रसादाची यादी बघ टू डू लिस्ट मधली आणि काय काय हवय ते सांग म्हणजे मी आणून देईन तुला.” माझं हेआणून देईन तुलाहे फक्त मधाचं बोट असतं हे बायकोला माहितेए. येथवर दोघीही मला कशाबश्या सहन करतात. पण जेंव्हा गणपतीची मुर्ती बुक करायला जायचे असते तेंव्हा मात्र दोघींच्या अंगावर अगदी काटा येतो. या एका प्रसंगाला टाळण्यासाठी आठ दिवस मला बाहेर कुठे सोडलेलं नसतं दोघींनी. “तुम्ही माझ्याबरोबर साड्या घ्यायला येवू नका आणि मी तुमच्याबरोबर गणपती पसंत करायला येत नाहीअसा एक मार्ग बायकोने गेल्या वर्षी काढून पाहीला होता. पण असलं काही मी ऐकून घेत नाही कधी. “घरचा गणपती कसा सगळ्यांनी मिळून पसंत करायला हवाहे माझं मत अगदी ठाम असतं. म्हणजे फक्त बोलण्यापुरतं. शेवटी मला हवा तोच बाप्पा घरी येतो हा भाग वेगळा.
एका सकाळी मी कुर्ता वगैरे घालून तयार होतो. मुलीला आवाज देतो. “चीऊ चल, गणपती पसंत करुन येऊ. आईला नंतर नेऊ गणपती दाखवायला.”
तेव्हढ्यात बायको टोकून जातेच. “अरे, गणपती पसंत करायला चाललाय की आणायला? झब्बा कशाला घातला लगेच?” खरं तर ती सहज बोलून जाते पण मला या दिवसात दोघी जे बोलतात ते मुद्दाम मलाच बोलतात असं वाटत रहातं. तेव्हढ्यात कन्यारत्नबाबा तु एकटाच जाशील का? मला काम आहे.” म्हणून अंग झटकते
असं काय करते चीऊ! चल की. येताना मॉंजीनीमध्ये लावा केक खाऊयात.” 
नकोय मला केक.”
रमाने येऊन हसत हसत काडी टाकलीचजाऊन ये चीऊ. एवढ्यात कंटाळून कसं चालेल? ही तर पहिली चक्कर आहे बाळ.”
नको गं आई. बाबा फार विचित्र वागतो कधी कधी. मागच्या वेळी स्टॉलमधेच मुर्तीच्या पायावर डोकं टेकवलं. काय तर म्हणे बाप्पाच्या पायाचे दोन्ही अंगठे कपाळाला लागतायेत की नाही व्यवस्थित ते पहात होतो. सगळे हसत होते.” चीऊ वैतागून म्हणाली.
बघ, बघ आपली कारटी. आत्ता कालपर्यंतमाझा बाबा सुपरमॅन आहेम्हणत होती. आता बापाची लाज वाटते म्हणे.” मी नेहमीचेचिडण्याचेहत्यार काढले.
बाबा तू कुठली गोष्ट कुठंही नेऊ नको हां. मी असं काही म्हणाले नाहीए. येते मी हवं तर.” बाण बरोबर लागलेला असतो. खरं तर तिचं काही चुकीचं नसतं. पण मला लागतात बाप्पाचे पाय तसे. लहान मुलांच्या तळव्यांचे अंगठे कसे किंचीत वर उचललेले असतात, अगदी तसे. त्याला काय करणार. रोज सकाळी बाप्पाच्या पाया पडताना त्या दोन अंगठ्यांचा थंड स्पर्श दोन भुवयांच्या मधे झाल्यावर दिवस कसा छान जातो. असो. शेवटी वैतागून का होईना पण चीऊने कपडे बदलले. आम्ही निघालो
नवऱ्याची चक्कर फुकट जाऊ देईल ती बायको कसली! आम्ही पार्कींगमध्ये असताना रमाने मोठ्याने आवाज देऊन सामानाची यादी टेरेसमधून खाली फेकलीच. पण गणपती पहायच्या आनंदात मला काही ती यादी आणि त्यातले सामान जड नव्हते.

आम्ही प्रथम चौकात जाऊन प्रत्येक स्टॉलवर थांबतो. प्रत्येक मुर्ती बारकाईने पहातो. मग आमच्या नेहमी च्या स्टॉल्सकडे मोर्चा वळवतो. बाईक पार्क करत असतानाच पाटीलभाऊ आमच्याकडे पाहून हसतात. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो. बायको आणि मुलगी कितीही हसल्या माझ्या या सवयीला तरी पाटीलभाऊ मात्र माझ्यावर जाम खुष आहेत. इतक्यावर्षांच्या सवयीने त्यांना माझा चिकित्सक स्वभाव माहित झालेला आहे. त्यांचे नाव पाटील. पदवीधर आहे, स्वतः मुर्तीकार आहे. त्यांचा हडपसरजवळ कारखाना आहे. जवळ जवळ दहा महिने मुर्ती बनवण्याचे काम चालते त्यांचे. त्यांनी एका रविवारी अगदी हट्टाने मला त्यांच्या कारखान्यावर नेऊन मुर्ती कशा बनतात, नविन मॉडेलचे क्लेवर्क कसे होते, त्यांचा साचा कसा तयार होतो इत्यादी गोष्टी अगदी प्रात्यक्षिकासहीत दाखवून माझा रविवार सार्थकी लावला होता. ‘मला मुर्तीकलेतली जाण आहेअसा त्यांचा एक गैरसमज आहे. त्यामुळे मी पन्नास स्टॉल्स पालथे घालून जेंव्हा त्याच्याच दुकानातून मुर्ती घेतो तेंव्हा त्यांचा चेहरा अगदी पारितोषीक वगैरे मिळाल्यासारखा होतो
आम्हाला पाहूनकाय दिदी, मम्मीला नाही आणले?” असं एखादं वाक्य म्हणून अगदीसहर्षस्वागत करतात
साहेब, तुम्ही पहिल्यांदा सगळ्या मुर्ती पाहून घ्या व्यवस्थित मग बोलूम्हणत कामावरच्या एखाद्या मुलाला ज्युसची ऑर्डर द्यायला पिटाळतात. चीऊ मला जेव्हढी वैतागते त्यापेक्षा जास्त या स्टॉलवाल्या काकांवर वैतागते. कारण मी ज्या उत्साहात मुर्ती पहातो त्यापेक्षा दुप्पट उत्साहाने ते मुर्ती दाखवत असतात. “बाबाला नाही उद्योग पण यांना बाकीच्या गिऱ्हाईकांची काळजी नाही का?” असा तिला प्रश्न पडतो

ज्युस पितापीता आमच्या सगळ्या मुर्ती पाहून होतात. मग पाटीलभाऊ आम्हाला पाठीमागचा पडदा बाजूला सारुन दुकानाच्या मागील बाजूला नेतात. तिथे भाताच्या तुसांच्या पसाऱ्यात अनेक खोकी रचलेली असतात. तिथेच एका कोपऱ्यात काही मुर्ती ठेवलेल्या असतात. या मुर्तीखासग्राहकांसाठी भाऊंनी निवडून ठेवलेल्या असतात. आहा हा, काय सुरेख आणि मोहक रुप असतं एकेका मुर्तीचं. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मग या मुर्तींची व्यवस्थीत पहाणी करुन आम्ही निघतो
संध्याकाळी येतो मुर्ती बुक करायला.” म्हणत मी गाडीला किक मारतो.
केली मुर्ती बुक? आणि सामान कुठेय?” बायको विचारते
नाही गं. चार पाच आवडल्यात. तुला घेऊन जाईन संध्याकाळी तेंव्हा तुच निवड त्यातली एक.” सामानाचा विषय मी शिताफीने टाळतो.
बाबा, आज रविवार होता म्हणून मी आले. संध्याकाळी तू आणि आई दोघेच जा. माझा अभ्यास राहीलाय बराच.” म्हणत चीऊ अंग काढून घेते.
संध्याकाळी पुनश्च माझी स्वारी सपत्नीक गणपतीच्या स्टॉलवर हजर होते. मग सकाळी निवडलेल्या चार पाच मुर्तींवर पुन्हा एकदा सखोल चर्चा होऊन एक मुर्ती निवडली जाते. १०१ रुपये देऊन ती बुक केली जाते. अर्थात दरवर्षीच्या अनुभवामुळे बायकोचा या बुकींगवर फारसा विश्वास नसतो. मग दोन दिवस काय डेकोरेशन करायचे, कुणाकुणाला फोन करायचेत, आजी आजोबांना कधी बोलवायचे या सारख्या असंख्य प्रश्नांवर खल होतो. म्हणजे मीच बोलत असतो, ठरवत असतो आणि दोघी फक्त माना हलवत असतात. या दोन दिवसात जेंव्हा जेंव्हा गणपतीच्या स्टॉलसमोरुन जायची वेळ येते तेंव्हा तेंव्हा मागच्या सिटवरुन चीऊमी काय म्हणते बाबा, जर समजा आपण…” असं म्हणून लक्ष वेधून 
घेते.
अगं बोलना, काय समजा..?” मी मागे वळून काही म्हणेतोवर स्टॉल मागे गेलेला असतो. चीऊचे काम झालेले असते. “सॉरी, विसरलेम्हणत ती हसते फक्त. मायलेकी अशा वेगवेगळ्या शक्कल वापरुन मला जरी गणपती स्टॉलपासुन दुर ठेवत असल्या तरी त्यांना नकळत मी चीऊची सायकल घेवून स्टॉलवर चार पाच चकरा मारलेल्या असतात.
ऐक ना रमा, मी काय म्हणत होतो…”
काय? बाप्पा सोडून काहीही बोल.”
बरं गणपती राहूदे बाजूला. पण तू पाहीलस का, आपण जी मुर्ती निवडलीये ना तिच्या डोळ्यातले भाव पाहीले कसे आहेत?”
हूं…”
अगं गणपतीच्या चेहऱ्यावर प्रसन्नपणाच नाहीए. डोळ्यात पाहीले की असं वाटतंयाला आपल्या घरी यायचंच नाहीए.”
तासभर होतो ना आपण तिथे? त्यावेळेस तरकिती गोड, किती छानकरत होतास. तू गेलाच कशाला परत तिकडे.”
असं काय करतेस रमा. पहिल्यांदा पाहिल्यावर होतं असं. पण दुपारी मी चक्कर मारली परत. पण डोळ्यातले भाव असे आहेत की बळेच आपल्या घरी येतोय बाप्पा.”
कमाल आहे. कॉलेजमधे असताना तुला माझ्या डोळ्यातले भाव नाही वाचता आले कधी. आणि आता बाप्पाच्या डोळ्यात तुला एवढं दिसतं?”
चीऊ हसू दाबते. तिच्या चेहऱ्यावरझालं बाबाचं सुरुअसे स्पष्ट भाव असतात.
हे खरय की कॉलेजमधे असताना स्वभावामुळे असेल पण मी आमच्या प्रकरणात कधी पुढाकार घेतला नव्हता. जेंव्हा निकराची वेळ आली तेंव्हा रमानेच पुढाकार घेऊन, माझ्या मित्रांच्या मदतीने सगळं जुळवून आणलं होतं. पण ते असं चीऊपुढे बोलून दाखवायची काही गरज होती का
पण चीऊच माझी बाजू सावरत म्हणालीकाय गं आई, एका साडीसाठी सगळा लक्ष्मीरोड पालथा घालतेस तरी बाबा काही बोलतो का? बाबानी एकदा गणपती बदलला तर तुला कशाला त्रास व्हायला पाहीजे एवढा?”
चीऊमुळे मला जरा आधार मिळाला. रमा म्हणालीबरं बाबा, जाऊ संध्याकाळी परत आणि दुसरा बुक करुयात. तू कॉफी घेणारेस का थोडी?”

संध्याकाळी बायको सोबत भाजी घेताना माझं सारखं चाललेलं असतंआवर गं लवकर. घे समोर दिसतीय ती भाजी. भोपळा तर भोपळा. घे तू.”
पण बायकोला जणूकाही मी दिसतच नसतो. तिचं नेहमीप्रमाणेकाका निट द्याहो पाहून. मागच्या वेळी निम्मी खराब निघाली.” किंवाकाय मावशी, कशीये तब्बेत आता?” मुलाला पाठवत जा आताअसं निवांत चाललेलं असतं. मागच्या वेळी नक्की काय खराब निघालं ते त्या काकाला बरोबर कळतं. नथ सावरत म्हातारी मावशीखरय तुझं बाई. दारच्याला काळजी पन घरच्याला काय हाय का?” अशी व्यथा बोलून दाखवत भाजी देते. आता ही म्हातारी पोराच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचते की काय अशी भिती वाटल्यामुळे मी अगोदरच पुढे गेलेला असतो. कशीबशी मंडई उरकून बॅग मागच्या सिटवर फेकून आम्ही गणपती स्टॉलवर हजर. आम्हाला पाहून पाटीलभाऊंना अजिबात आश्चर्य वाटत नाही. त्यांना आता सवय झालीय इतक्या वर्षात. ते पुन्हा तसंच सहर्ष स्वागत करतात. आम्ही दोघे परत मुर्ती पहायला सुरवात करतो. आम्ही दोघे म्हणजे बायको मस्त खुर्चीवर टेकलेली असते, मीच वर खाली करत असतो. मागे मागे पाटीलभाऊ. मग पुन्हा परवाचा क्रम पार पडतो. चार पाच मुर्ती निवडून पाटीलभाऊ समोर शेजारी शेजारी मांडतात. एखादा चित्रकार जसा आपल्या पेंटींगकडे जरा दुर जाऊन कधी इकडे मान करुन पहातो, कधी तिकडे मान करुन पहातो तसं माझं चाललेलं असतं. रमा उठते. सगळ्या मुर्ती नजरेखालून घालते. माझा अंदाज घेऊन चाणाक्षपणे मला आवडलेल्या मुर्तीवर बोट ठेऊन म्हणतेमला तर हिच सगळ्यात जास्त आवडली. तुला?”
तुझी न् माझी आवड अगदी सेम आहे. मलाही तोच आवडलाय. हाच फायनल करु. आता दुसरे काही बघायला नको.”
नक्की ना? निट बघ परत. वरदहस्ताची बोटे तुला हवी तशी बाकदार आहेत. मोदकाचा हातसुध्दा एकदम सुबक आहे.” रमा खात्री करुन घेते.
हो गं. पाहिलीत मी. म्हणूनच आवडलाय. पायाचे अंगठे बघ कसे सुरेख आहेत. चीऊ झाली त्यावेळी तिचे असेच होते अगदीमी फारच खुष असतो त्या मुर्तीवर.
तरीही रमा खात्री करुन घ्यायची म्हणून विचारतेडोळे बघ तुला हवेत तसे आहेत का? मला तर छानच दिसतायेत.”
डोळे तर सुरेखच. अगदी मधाचा थेंब टाकल्यासारखे दिसतायेत. हसतोय असं वाटतं की नाही डोळ्यात पाहून?”
रमा फक्त हसते.
हसू नको. खरच! निट बघ. तुला काय दिसणार म्हणा. मनात भाव पाहीजे ना.” 
माझं आता समाधान झालेलं असतं. मी मोबाईल काढून सगळ्या बाजुने बाप्पाचे फोटो घेतो. आपला निर्णय कसा योग्य होता मुर्ती बदलण्याचा हे बायकोला कळावे म्हणून मी पाटीलभाऊंना परवा बुक केलेली मुर्ती दाखवायला सांगतो. भाऊ ती मुर्ती या नविन मुर्तीच्या शेजारी ठेवतात. आम्ही आज निवडलेली मुर्ती खचितच सुंदर असते. बायकोही हे मान्य करते. पण परवाच्या मुर्तीच्या सोंडेत बुकींगची पावती पाहून ती विचारतेभाऊ, चिठ्ठी लावू नका सांगूनही का लावलीत?  
भाऊ कसंनुसं हसत म्हणताततुमच्या गणपतीच्या सोंडेत कधी चिठ्ठी लावली आहे का वहीणी? हा दुसऱ्याने बुक केलाय म्हणून लावली. साहेब हा घेणार नाही, बदलणार मुर्ती हे माहितच होतं. मग कशाला दुसरं गिऱ्हाईक सोडायचं?”
बायको माझ्याकडे पाहून हसते. त्या हसण्यातली टिंगल पाटीलभाऊंना जरी नाही दिसली तरी मला स्पष्ट दिसते.

गणपतीला आठ दिवस राहीलेले असतात. माझी बहुतेक तयारी झालेली असते. दोन कुर्ते, एक धोतरजोडी, कद घेऊन झालेले असते. डेकोरेशन झालेले असते. फक्त चतुर्थीच्या आदल्या दिवशी असेंबल करायचे बाकी असते. आई बाबांना दोन वेळा फोन झालेला असतो. मित्रांच्या गणपतींचे फोटो मेसेंजरवर आलेले असतात. त्यांच्या बरोबर माझ्या बाप्पाची तुलना करुन झालेली असते. बाप्पाचे फोटो आयपॅडवर झुम करुन करुन पहाण्याव्यतिरीक्त काही काम नसते. फोटो पहाताना मला अचानक जाणवते.
चीऊ, जरा इकडे येना.”  मला रहावत नाही.
काय्ये बाबा? डेकोरेशन करु ऐनवेळी. नाहीतरी फक्त भिंतीवर लावयचे तर आहे यावेळी.”
डेकोरेशन नाही गं. हे बघ.” मी तीला आमच्या बाप्पाचा फोटो झुम करुन दाखवतो.
तिला समजत नाही मी काय दाखवतोय तेतुला काय म्हणायचय बाबा? बॉडीटोन नाही आवडला का?”
नाही गं. बॉडीटोन सुरेखच आहे. फ्लोरोसंट नाही वापरला भाऊंनी या वर्षी. हे बघ निट.”
छान तर आहे.” चीऊच्या आवाजात भिती. आता बाबा काय नविन खुसपट काढतोय याची
बघ निट. बेंबी किती उथळ आहे बाप्पाची. कसं दिसतय ते! अगोदर कसं लक्ष गेलं नाही आपलं?”
हे ऐकलं मात्र चीऊ इतक्या जोरजोरात हसायला लागली की रमा बेडमधून बाहेर आली
काय झालं? मलाही सांग की. एकटीच काय हसते?”
चीऊला हसण्यामुळे बोलताच येत नव्हतं. ती माझ्याकडे बोट दाखऊन अजुनच हसायला लागली
रमा माझ्याकडे पाहून विचारत होतीकाय झालं?”
आता तिला काय सांगू? चीऊ हसणं कसंबसं आवरत म्हणालीबाबा म्हणतोय गणपतीची बेंबी उथळ आहेआणि ती परत हसायला लागली. हे ऐकून रमाला हसावं की रडावं तेच समजेना
मी जरा समजावण्याच्या सुरात म्हणालोयात हसण्यासारखं काय आहे? मी माणसांच्या बेंबीविषयी नाही बोलत. बाप्पाच्या बेंबीविषयी बोलतोय. चांगली गरगरीत, खोल बेंबी किती मोहक दिसते.”
आता चीऊच्या हसण्यात रमाही सामील झाली. दोघींच्याही डोळ्याला पाणी आले अक्षरशः
अगं हसतेस काय अशी तुही. मी बाप्पाच्या बेंबीविषयी बोलतोय. खरच गोड दिसते बाप्पाची बेंबी.”
रमा हसु आवरत म्हणालीठिके. मग काय करायचं? बदलायचा हाही बाप्पा?”
मी माझी बाजू लावून धरत म्हणालोतसंच काही नाही पण एखादी चक्कर मारुयात की भाऊंकडे. बेंबी सोडली तर हा सुंदरच आहे.”
चीऊ मधेच म्हणालीआणि बदलायचाच असेल तर भाऊंना काय सांगणार बाबा तू? एक गणपती चांगला खोल बेंबी पाहून द्या?”
आता तर रमाला ठसकाच लागला हसताना. मी रागाने उठून गेलो. चीऊ आईसाठी पाणी आणायला किचनमध्ये पळाली.

मी रात्री झोपायला बेडरुमकडे चाललो होतो. चीऊच्या रुममधून मायलेकींच्या गप्पांचा आवाज येत होता
चीऊ तिच्या आईला म्हणत होतीबाबा अतीच करतो कधी कधी पण त्याने आणलेला बाप्पा आपल्या सोसायटीमध्ये दरवर्षी सगळ्यात जास्त गोड आणि सुरेख असतो.”


तिन वेळा बुकींग बदलूनही चतुर्थीलामात्र चवथाच बाप्पा घरी येतो. गणपती आले की दरवर्षी माझं आणि बाप्पाचं असंच होतं.

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...