❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शनिवार, २१ मे, २०२२

 माझा संध्याकाळी फिरायला जायचा रस्ता ठरलेला आहे. वॉकिंक हा ऊद्देश नसल्याने मी हाच रस्ता घेतो. हा साधारण दहा फुट रुंदीचा डांबरी रस्ता आहे. घरातून निघालो की जरा अंतरावर ओढ्यावर ऐसपैस बांधलेला सिमेंटचा पुल आहे. पुलाखाली असलेल्या पाईपच्या व्यासाएवढीच पुलाची ऊंची. पुल संपला की गरज नसताना रस्त्याने मारलेला किंचीत मुरका आहे. तेथून सरळ पुढे गेले की मळ्यातली तुरळक घरे सुरु होतात. ही घरेही मागून कढीपत्ता व पुढून जाई जुई मोगऱ्याने वेढलेली, मढलेली. आळूच्या पानांचे बेट तिट म्हणून लावलेली. रस्त्याच्या एका बाजूला चिकूची सदैव बहरलेली बाग. त्या बागेला एका बाजूने आंबा, गुलमोहर, चिंच, करंज, शिरीष अशा झाडांचा वेढा. व दुसऱ्या बाजूने ओढ्याची गार गचपानाची कुस. मांजर जसं माणसाच्या पायाशी अंग घासत घोटाळत रहातं तसा हा ओढा गावाला अंग घासत हायवे ओलांडून या बागेला कव घालतो. मग तसाच पुढे जात तो पुर्वाभीमुख होत वहिवाटीच्या डांबरी रस्त्याला छेद देत मळ्याबरोबर वामांगी लगट करत पुढे खळाळतो. चिकूची बाग संपली की शेताचे दोन-चार तुकडे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र फक्त शेती. पाण्याच्या मुबलकतेमुळे या दोन्ही बाजूंच्या शेतामधे नेहमी कांदा, लसुन, गवार, भेंडी यासारख्या भाज्या. अधे मधे कोथींबिरीचा कच्च हिरवा पट्टा. लहान मुलाने खडूने आडव्या तिडव्या रेघोट्या ओढाव्यात तसे अधून मधून बांध. तेही नावालाच. फुटभरही ऊंची नसलेले. ते बांधही तसे शौकीन. नेहमी वालपापडीसारख्या फुलांचे तुरे माळून डोलणारे. कधी खांद्यावर बेफीकीरपणे ऊपरणे टाकावे तसे डांगराचे, भोपळ्याचे, घोसाळ्याचे वेल बांधाच्या गळ्यात पडलेले. त्यावर पिवळ्या फुलांचे जडावाचे काम. 


रस्ता जरी डांबरी असला तरी तो मळ्यातल्या फक्त आठ दहा ऊंबऱ्यांच्या वहिवाटीसाठीच वापरला जातो. त्यामुळे रस्त्याला कधी कार, टेंपो वगैरेंची सवय नाही. निवांतपणा भाग्यातच लिहिलेला या रस्त्याच्या. या निवांतपणामुळे आजूबाजूच्या चिंचेवर, आंब्यांवर व चिकूच्या बागेत पाखरांचा नुसता गोंधळ. कुणाची भितीच नाही त्यांना. अन्नाची कमतरता नाही व ऐन ऊन्हाळ्यातही ओढ्याला कुठे ना कुठे पाणी मिळेच. यामुळे अनेक चिमुकल्या पाखरांची अनेक घरटी आजूबाजूला असतात. चिकूच्या बागेत झाडांची आळी सोडली तर सगळीकडे वाळलेल्या पानांचा गालीचा पसरलेला. सुर्य जरा कुठे मलूल होऊन अस्ताकडे टेकला की नाचणच्या अनेक जोड्या शेपटीचे पंखे फुलवत या गालिच्यावर नाचत बसतात. त्यांचं नाचणे कमी व धावपळच जास्त असा प्रकार. त्यामुळे खारींची विनाकारण धावपळ उडते. संध्याकाळी या खारींची गालिच्यावर अशी धावपळ सुरु झाली की हमखास एखादा बागलफण्या या गालिच्यावर ऊतरणारच. खारींच्या धावपळीमुळे पाचोळ्यातल्या किड्यांची, नाकतोड्यांचीही तारांबळ ऊडते व हुदहुद्याला बसल्या जागी शिकार मिळते. या मेजवाणीत कधी कधी ओढ्याच्या बाजूने सात-आठ चितूरही ऊतरतात. पण ते ओढ्याचा काठ सोडून सहसा बागेत जास्त आत येत नाहीत. हे चितूर जसे त्यांची हद्द सोडत नाहीत तसेच अलिकडच्या गचपनातून हळूच निघालेली मुंगसाची जोडीही तिची हद्द सोडत नाही. कुठे झाडावरचा चिकू पडला तरी ही मुंगसाची जोडी क्षणात ओढ्यात गायब होते. जरा वेळाने त्यांची हुळहूळती लाल नाके गवतातून बराच वेळ बाहेर डोकावत रहातात व मग ते दोघे पुन्हा पाचोळ्यात घुसतात. हुदहुद, एखादी पाणकोंबडी, चितूरचं कुटूंब, मुंगसाची जोडी हे सगळे शांततेत पाचोळ्यातले किडे शोधत, माना झटकत, पायाने पाचोळा ऊडवत फिरत असतात. मात्र कधी कधी या मेजवाणीला सातभाईंची नजर लागते. त्यांचा थवा एकदा का बागेतल्या पाचोळ्यावर ऊतरला की मग मात्र तेथे हुदहुद्या, चितूर, साळूंक्या कुणी थांबत नाही. पाणकोंबडी तर कधीच ओढ्यात नाहीशी झालेली असते. मुंगसाची जोडी बाजूच्या टेकाडावर थांबून माना मागे करुन या सातभाईंचा अंदाज घेत असते. वाढता वाढता या सातभाईंचा ईतका गोंगाट वाढतो की विचारता सोय नाही. मधेच यांना सुर मारायची हुक्की येते. मग एकामागोमाग एक सातभाई जमिनीवरुन काटकोनात वर सुर मारायला सुरवात करतात व चिकूच्या झाडात दिसेनासे होतात. जमिनीपासून झाडाची पालवी पाच फुटांवर सुरु होते. त्या पाच फुटात यांचे सटासट सुर मारणे सुरु होते ते सगळा थवा संपेपर्यंत सुरुच रहाते. बागेबाहेरुन हे दृष्य पहाताना विचित्र दिसते. झाडावरुन चिकू गळून तो जमिनीवर पडायला हवा. त्या ऐवजी जमिनीवरुनच काही फळे वेगाने वर जाऊन झाडांमधे दिसेनाशी होत आहेत असा काहीसा भास या सातभाईंच्या सुरावटींमुळे होतो. गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारं असं ते दृष्य पहायला फार विलोभनिय दिसते.


शेतात लाखमोलाची तर्कारी असली तरी ओढ्याच्या कडेकडेने मात्र प्रत्येकाने गायी-गुजींसाठी हत्तीगवतासारख्या चाऱ्याची लागवड केलेली आहे. ओढ्याच्या ओलसर मातीत हा चारा चांगला तरारतो. ओढ्याच्या कडेने या चाऱ्याची दाट रेष तयार होते. ओढ्याजवळ मात्र या हिरव्या रेषेचे बेटात रुपांतर होते. ते बेट मग जमेल तसे विस्तारते. ओढ्यालगतचा सगळा भाग पार येरगाटून टाकते. हा ओढा आहे, नदी नाही. त्यामुळे त्याला स्वतःच्या सत्तेचे पाणी नाही. पुर्वी पावसाळ्यात ओढा दुथडीभरुन वहायचा. पुढे दिवाळीपर्यंत त्याच्या पाण्याच्या धारेला करंगळीशी बरोबरी करावी लागे. हिवाळा सरता सरता ओढ्याला कोरड्या ठाक गोट्यांची आणि वाळलेल्या शेवाळाच्या पापुद्र्यांचीच सोबत ऊरे.  पण आता महिन्यातल्या ठरावीक तारखांना कॅनलचे पाणी ओढ्याला सोडले जाते त्यामुळे मोजकेच दिवस असले तरी त्याला बारमाही पाण्याचा शेर मिळतो. त्या पाण्याच्या आशेने गायबगळे, ढोकरी, पाणकोंबड्या ओढ्याशी लगट करतात. तेवढीच ओढ्याला सोबत होते. बाजुच्या हत्तीगवताच्या तुऱ्यात अनेक प्रकारच्या मुनिया सदैव किलबिलत असतात. तेवढाच ओढ्याच्या जिवाला विरंगुळा. ओढ्यावर असलेल्या पुलाला कठडा नाही. दोन्ही बाजूला मैलाचे दगड असतात तसे सिमेंटचे दिड फुटांचे ठोकळे लावलेले आहेत. संध्याकाळी शेतावरुन फुलोऱ्यावरील पिकाचा, भिजलेल्या मातीचा, धुराचा वास घेऊन पश्चिमेचा अवखळ वारा या गवताच्या तुऱ्यांमधे घुसला की सगळ्या बेटाच्या अंगात संचारते. तुरे शहारा आल्यासारखे थरथरतात. एखादा सुफी अवलीया स्वतःच्याच मस्तीत हात वर करुन डुलावा तसे हे तुरे आनंदाने डोलत रहातात. त्यांचे ते डोलणे पाहून वारा आणखी मस्तीला येतो. तुरे आणखी शहारुन डुलत रहातात. पुलाच्या कडेला असलेल्या ठोकळ्यावर बसुन ही आवर्तने पहाताना तंद्री लागते. या तुऱ्यांची लय नकळत आपल्याही मनात झिरपते. काही काळ का होईना पण सारे व्याप विसरायला होतात. आपल्याच मस्तीत झुलणारे हे तुरे पाहून तुकोबांना भंडाऱ्या डोंगरावर नक्की काय मिळालं असेल याचा जरासा अंदाज येतो.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...