❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

बुधवार, १५ जून, २०२२

शेंगोळी

मावळे म्हटलं की लोकांना फक्त महाराज आठवतात व ‘महाराज’ म्हटलं की मावळे. पण मावळे म्हटलं की मला त्यांच्या तलवारीपेक्षा तवाच जास्त आठवतो. मावळ्यांना खाण्याचा अजिबातच शौक नाही. समोर वाढलेल्या ताटाबाबत हे फार उदासीन. ‘उदरभरण’ एवढाच हेतू. चवीचवीने खाणे मावळ्यांना माहितच नाही. पण त्यांच्या याच वृत्तीमुळे त्यांची एक वेगळीच खाद्यसंस्कृती झालीय. मावळ्यांसारखीच रांगडी व राकट. प्रत्येक मावळ्याच्या पाठीवर ढाल व त्याच्या बुडाखाली असलेल्या घोड्याच्या पाठीवर असलेल्या गाशामधे तवा. कुठेही आडरानात ओढा किंवा विहिर पाहून घोडा थांबवायचा. तिन दगडं मांडून त्यावर तवा चढवायचा. चार मिरच्या, मिठ व आजूबाजूच्या शेतात जी काही माळवं असतील ती किंवा ती नसतील तर रानातली रानभाजी टाकायची. तलवारीच्या मुठीने ते सगळे जिन्नस गरम तव्यावर रगडायचे. त्याच तव्यावर दोन चार अंगठ्याएवढ्या जाड भाकऱ्या भाजायच्या व पळसाच्या पानावर किंवा सरळ हातावर घेऊन मनसोक्त खायच्या. गाडगंभर ओढ्याचे पाणी रिचवायचे. सवड असेलच तर डेरेदार झाडाचा आडोसा पाहून गाशा पसरायचा व ताणून द्यायची. पहाट होता होता गाशा गुंडाळायचा व पुढच्या मोहीमेवर चालू पडायचे. महाराजांच्या सैन्याला यामुळेच गती असायची. शत्रू ही गती पाहून चकित व्हायचा. मुघल मात्र सुर्यास्ताचे सौंदर्य पहात रमायचे, त्यांचा खानसामा तब्बेतीत मुदपाक लावायचा. मग हंड्या चढायच्या. त्यात मटन रटरटायचं. ते शिजेपर्यंत मुघल सैनिक यथेच्छ अपेयपान करुन, बांद्यांचा नाच वगैरे पाहून मग ताटावर बसायचा. यथेच्छ जेवायचा व रात्रभर बेशुद्ध झाल्यासारखा झोपायचा. शुर असुनही मुघल या सवयीमुळे महाराष्ट्रात जिंकू शकले नाहीत. मावळ्यांची ढाल वार अडवायला जशी कामी येई तशीच चुल्हीला आडोसा म्हणूनही कामी येई. समोर शत्रू असताना हजारभर मावळ्यांनी ढालीवर केलेल्या तलवारीच्या मुठींचा खट खट आवाज समोरच्या पन्नास हजाराच्या छावणीला धडकी भरवायचा ते उगीच नाही.
तर अशा या मावळ्यांच्या मावळात काही गोष्टी खासच पिकतात. मावळातली ज्वारी खावी, बाजरी खावी. मावळातला हुलगा खावा. मावळातली मिर्ची खावी. मावळातला तांदूळ खावा. वसुमतीचा बासमती झाला व मुघलांच्या नादी लागून तो बिर्याणीत वगैरे पडला तरी त्याला मावळातल्या तांदळाची सर नाही. मावळातल्या तांदळाच्या पेजेत वात ठेवून पेटवली तर रात्रभर जळते. तो नाद इतर तांदळांनी करुच नये. प्रत्येक प्रांताची आपापली एक खाद्य संस्कृती असते. ती त्याच प्रांताला शोभते. कोकणाने माशांची मिजास करावी. ती मजा आम्हा मावळवासीयांना नाही जमत. आम्ही कितीही नदीतल्या गोजळा पकडल्या तरी कोकणातली गम्मत नाही. कोकणातली एखादी आक्का ढिगभर फडफडीत भाताबरोबर तव्यावर दोनचारदा उलटी पालटी केलेली माशाची एखादी तुकडी वाढते व माणसाचा पोटोबा तृप्त करते. ती कला आम्हा मावळ्यांकडे नाही. पण कोकणात हुलग्याचा कुळीथ करतात व पिठाची पिठी करतात ते काही सहन होत नाही. हुलगा हलक्या काळजाच्या माणसाचे खाणेच नाही. त्याचे पिठले करुन, वरुन तुप घेऊन भाताबरोबर खाणे हा हुलग्याचा अपमान आहे. वर कुळीथाचे पिठले व भात याचे गुणगाण गाणे हा तर अपराध आहे. मुळात कोकणी माणसाला खरा हुलगाच माहित नाहीए. लाल हुलग्याला आम्ही मावळे हुलगा म्हणतही नाही व मानतही नाही. अगदी सपक. मावळातला हुलगा हा मावळ्यांसारखाच रांगडा. जेवढा बरड जमिनीत, डोंगर उतारावर वाढेल तेवढी जास्त चव. एकरभर रान एका दमात नांगरुन उलथवणाऱ्या बैलांचा आहार म्हणजे हुलगा. शाहीर पिराजी म्हणायचे की ‘वंशाला मुलगा, होडीला व्हलगा व बैलाला हुलगा असावा’. मावळी हुलग्याची रग बैलांनीच जिरवावी, येरांचे ते काम नोव्हे. आवडतात म्हणून आठवड्यातून दोनदा हुलगे खाल्ले तर भल्या भल्या खवय्यांना त्रास होतो. ही रग कोकणातल्या कुळीथामधे नाही. आमच्या हुलग्यांना मांजे म्हणतात. रंगाने काळेभोर व उग्र. हुलग्याचे पिठ मळण्यासाठी त्यात पाणी टाकले तरी सगळ्या घरात त्याचा वास पसरतो असे तिव्र असतात मांजे. या हुलग्याचे लाड करावेत तर ते आम्ही घाटी लोकांनीच. मावळातली बाई हुलग्याचे असंख्य प्रकार करते. बाहेर माघाची थंडी चराचर गोठवते तेंव्हा बहुतेक घरांमधे चुलीच्या वैलावर मोड आलेले हुलगे रटरटत असतात. सकाळचा स्वयंपाक उरकला की चुलीतला विस्तू मागे ओढायचा व बाजूच्या वैलावर मोठं पातेलं ठेवायचं. त्यात भरपुर पाणी, मिठ, दोन चार हिरव्या मिरच्या, हळद व मोड आलेले हुलगे टाकायचे व शेताचा रस्ता धरायचा. दुपारपर्यंत हे पाणी निम्मे आटते. रानात राबून आले की हे कढण पितळीने प्यायचे. दुसऱ्या आहाराची गरजच नाही. पण त्यातल्या त्यात माडगं व शेंगोळी हे प्रकार आमचे जरा जास्तच लाडके. लाडके म्हणजे किती, तर शेंगोळी असेल तेंव्हा मटनाच्या खुमासदार रश्यालाही दुर सारतो आम्ही. ‘मटनाते परौते सर म्हणती’ अशी असते शेंगोळी. मी एवढं शेंगोळीचे गुणगाण गातोय म्हटल्यावर कुणाला वाटेल की एकदा ट्राय करावाच हा पदार्थ. पण ते इतकं सोपंही नाही. एकतर मांजे हुलगे मिळणे कठीण. मिळालेच तर त्यांची उठाठेव करणे अवघड. कारण बरड माळावर उगवलेल्या या धान्यात खडे, माती व इतर कचरा खुप. तो साफ करुन हुलगे दळून आणलेच तर शेंगोळी करणे कौशल्याचे काम. एवढं करुनही शेंगोळी केलीच तरी ती तब्बेतीला झेपायला हवी, चवीची सवय हवी. कारण माझं एक ठाम मत आहे की शेंगोळीची ही आवड वारशानेच तुमच्याकडे येते. उगाच करु नविन पदार्थ ट्राय म्हणून शेंगोळी खाऊन तिची आवड निर्माण होत नाही. एक तर या पदार्थाला रंग नाही, रुप नाही. आपल्या मराठी माणसाची सवय असते की घरी काही खास केलं की ते शेजारी देणे. त्याशिवाय आपल्या घशाखाली घास उतरत नाही. तर एकदा शेंगोळी केली होती व मी ती डिशमधे ठेऊन शेजारी रहाणाऱ्या गुजराती भाभींना नेऊन दिली कौतूकाने. त्यांनी ते पहाताच “ईऽऽ काय्ये हे?” असं म्हणत असा काही चेहरा केला की मी पुन्हा कधी अनोळखी व नॉनमराठी माणसाला शेंगोळीचे आमंत्रण दिलेच नाही. ही काही लॉस्ट रेसेपी नाहीए पण आजकालच्या मुलींना ही हातावर वळता येत नाही. पाटावर वळलेल्या शेंगोळीला हातावरच्या शेंगोळीची चव नाही. माझं लग्न झालं तेंव्हा बायकोला शुन्य स्वयंपाक येत होता. मी एक एक पदार्थ शिकवला. स्वयपाकाच्या बाबतीत पुर्ण अडाणी मुलीला मी पहिला कोणत पदार्थ शिकवला असेल तर तो हा शेंगोळी. आता बायको इतकी छान शेंगोळी वळते हातावर की पहात रहावं. तर शेंगोळी पुराण जरा बाजूला ठेऊयात. बाहेर पाउस पडत असताना जर हातात हुलग्याचे माडगे आले तर स्वर्गच. जर उद्या मला कळाले की स्वर्गात माडगे मिळत नाही तर मी लाख पुण्य केले असले तरी ऐनवेळी स्वर्ग नाकारेण. मुळात जेथे हुलगा नाही, शेंगोळी नाही, माडगं नाही तो स्वर्ग असुच कसा शकतो?
कधी जमलच तर या मला भेटायला. मस्त शेंगोळीचा मेन्यू करु. दुसऱ्या दिवशी पहाटेच हुलगे शिजायला ठेउ. दुपारखाली मस्त त्याचे माडगे करु. शिवनेरी सगळेच पहातात, त्यापलिकडे जाऊन मस्त नाणेघाट पाहू. रात्री झकास मासवड्यांचा बेत करु. झणझणीत रश्यात भाकरी चुरुन खाऊ. खळ्यात गोधड्या अंथरुन स्वच्छ आभाळातला चांद पहात गप्पा मारत झोपू.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...