❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

रविवार, २६ जून, २०२२

नानासर

मी दहावीला हायस्कुलमध्ये असताना आम्हाला मराठी शिकवायला 'नानासर' होते. माझ्या संपुर्ण शालेय जीवनात नावाने किंवा आडनावाने न ओळखता घरच्या नावाने ओळखले जाणारे हे एकमेव सर. त्यांची मुले व एकूणच घरचे सगळे त्यांना नाना म्हणत. हायस्कुलमध्येही हेडमास्तरांपासून शिपायापर्यंत सगळे त्यांना नानासर म्हणत. साडेपाच फुट उंची, अंगात हाफ बाह्यांचा पांढरा शर्ट, ग्रे रंगाची बेलबॉटम पॅंट, हातात तळहाताच्या बाजूला डायल येईल असे घातलेले एचएमटीचे घड्याळ. खिशात निळा व लाल असे दोन बॉलपेन्स, डोळ्यांवर जाड, काळ्या फ्रेमचा चष्मा. मान किंचित खाली करुन चष्म्यावरुन समोरच्याकडे पहात बोलण्याची लकब. चेहऱ्यावर सदा मिश्किल हसू. हात सदैव खडूच्या पावडरने पांढरे झालेले व शरीराचाच अवयव झालेले फळा पुसायचे डस्टर. वर्ग सोडला तर माणूस अगदी मितभाषी. वर्गावर असले की मात्र त्यांच्या जिभेवर चिवी जोशी नाचत. महामिश्किल माणूस. जितके प्रेमळ तितकेच तिरकस. एखाद्या विद्यार्थ्याला काही सुचना करायची असेल तर ती तिरकीच केली पाहीजे असा त्यांचा नियम होता. आमचा शिपाई अतिशय भोळा होता. सखाराम. नानासर त्याचीही गम्मत करत असत. एकदा सरांनी सखाला काही काम सांगितले. सखाराम ते रितसर विसरला. 
सरांनी त्याला विचारले तर सखा म्हणाला "बुड खाजवायला सवड नसते सर. विसरलो तुमचे काम." 
सर हसत म्हणाले "म्हणजे सवड मिळाल्यावर तू बुड खाजवतोस?"  

नानासरांना कधी कधी फार कंटाळा यायचा शिकवायचा. मग ते पुस्तक बाजूला ठेवत व आमच्याबरोबर गप्पा मारत बसत. मग तास संपल्याची घंटा होईस्तोवर वर्गात हास्याचे बॉम्ब फुटत. ईतकी चौफेर माहिती मिळे त्यांच्या बोलण्यातून, तेही अगदी विनोदी भाषेत. आम्ही मुलं कधी कधी म्हणायचो "नानासर, आज तुम्हाला नक्की कंटाळा आलाय शिकवायचा. हो ना?" मग मुड जरा बरा असेल तर सर "कार्ट्यांनो आज गप्पा मारयच्यात वाटतं! चला आज तुम्हाला शनवारवाडा दाखवून आणतो" असं म्हणत मग पेशव्यांचा ईतिहास न शिकवता पेशवाईतल्या मजेशिर गोष्टी सांगत. अनेकदा या गोष्टी वरवर मजेशिर असल्या तरी मनावर आसूड ओढणाऱ्या असायच्या. आम्ही सरांपुढे हसत असलो तरी आतून अगदी हललेलो असायचो, अस्वस्थ व्हायचो. हा गप्पांचा तास संपता संपता अनेक मुलांनी मनातल्या मनात निश्चय केलेले असत, संकल्प सोडलेले असत. कुणी जातपात न पाळण्याचा, कुणी नेहमी सत्य बोलण्याचा, कुणी संयम पाळण्याचा वगैरे वगैरे. कधी कधी सर मिश्किलपणा विसरुन फार गंभीर होत. विशेषतः आमच्या भविष्याविषयी बोलताना त्यांचा आवाज कातर होई. वर्गातल्या गरिब मुलांना उद्देशून म्हणत "शिका रे बाळांनो. लक्ष द्या जरा वर्गात. अभ्यास करा. अन्यथा फार मागे पडाल जगाच्या. नंतर पश्चाताप करुन काही होणार नाही. आई बाप राबराब राबतात त्याची तरी जाण ठेवा रे बाळांनो. मी का पगार मिळतो म्हणून शिकवतो का तुम्हाला?" वगैरे वगैरे. एकदा असेच ते कळवळ्याने बोलत होते. बोलून झाल्यावर मागे बसलेल्या एका वात्रट मुलाने म्हटले "बरं मग?" आणि मग आधिच शांत, गंभीर असलेला वर्ग अगदी चिडीचुपच झाला. नानासर क्षणभर गोंधळले. काहीवेळ भ्रमात असल्यासारखे आमच्याकडे पहात राहीले आणि मग खळ्ळकन त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळली. ती न पुसताच ते झटकन वर्गाबाहेर पडले. त्यांचे डस्टरसुद्धा न्यायला विसरले ते. खरं तर कुणा सरांची टिंगल करायची असली की आमचा सगळा वर्ग आपापसातले मतभेद विसरुन एकत्र येई. पण त्या दिवशी सगळ्या वर्गाने मिळून त्या वात्रट मुलाला यथेच्छ चोप दिला. अगदी मुलीही मागे नव्हत्या. नंतर आम्ही सगळे मिळून स्टाफरुममध्ये सरांची माफी मागायला गेलो. तर काही झालेच नाही असे हसत हसत सरांनी आम्हाला वर्गाकडे पिटाळले.
एकदा असेच पुस्तक उघडून कोणता धडा घ्यायचाय ते सांगून त्यांनी प्रास्ताविक सुरु केले. बराच वेळ प्रास्ताविक झाल्यावर ते म्हणाले "तर आता आपण मुख्य विषयाकडे वळू." मग किंचीत थांबून, चष्म्याच्या वरुन सगळ्या वर्गाकडे पहात म्हणाले "वळू म्हणजे बैल नव्हे" काही क्षणांच्या शांततेनंतर वर्गात एकदम हास्याचा आगडोंब उसळला. त्यानंतर कधी बाजारच्या दिवशी बाजारओट्यावर किंवा आईने घर सारवायला शेण आणायला पाठवले की मळ्यात नेहमी वळू दिसत. अशावेळी मला चटकन अभ्यास आठवत असे. कोणत्या विषयाचा गृहपाठ राहिलाय, कोणती कविता पाठ करायची राहीलय ते सगळं त्या वळूदर्शनाने डोळ्यापुढून जाई. एवढेच काय सोमवारी शंकराच्या मंदिरात गेल्यावरही नंदीच्या दोन शिंगांमधून पिंडीकडे पहाताना भक्तीभावाऐवजी हास्याचेच भाव चेहऱ्यावर येत. नंदी पाहूनही मला नानासरच आठवत. मला वाटायचे हे फक्त माझ्याच बाबतीत होतेय. पण एक दिवस जिवशास्त्राच्या तासाला कशावरुन तरी विषय निघाला व तो नंदीकिड्यापर्यंत (Antlion) पोहचला. हा किडा मातीत मऊ धुळ गोळा करुन विहिरीसारखे घरटे कसे बांधतो, आत दबा धरुन कसा बसतो, वरच्या घुमटात एखादी मुंगी वगैरे पडली तर तो किडा त्या मुंगीला कसा पाताळात ओढतो वगैरे सर सांगत होते. मग शेवटी सरांनी पुस्तक बाजूला ठेवले व सगळ्या वर्गाला बाहेर काढले. हायस्कुलच्या मागील जागा पडीक होती. तेथूनच मळ्यात जाणारा धुळभरला रस्ता गेला होता. सरांनी आम्हा सगळ्यांना मागे रस्त्यावर नेले व दहा पंधरा मिनिटात त्या किड्याची अनेक घरे दाखवली. त्या घरातली माती एका काडीने हलवल्यावर बाहेर आलेला किडाही दाखवला. आम्ही पुन्हा वर्गात येत असताना बाजूच्या माळावर चरणाऱ्या वळूकडे एका मुलाचे लक्ष गेले. तो मोठ्याने ओरडला "अरे ते पहा काये!"
आम्ही सगळ्यांनी वळून पाहीले व त्या वळूला पाहून सगळे एक साथ नमस्ते म्हणावे तसे ओरडले "नानासरांचा अभ्यास"
आमचे जिवशास्त्राचे सर त्यानंतर कित्येक दिवस "वळू पाहील्यावर मुले 'अभ्यास' असे का ओरडली असतील" याचा विचार करत असावेत.
(फोटो आंतरजालावरुन.)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...