❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

पारध



मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन यावे लागते. या देवराईत जाऊन बसणे हा माझा आवडता छंद. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी रोज मी हजर असल्याने तेथल्या बहुतेक पक्ष्यांचा व माझा परिचय झाला होता. कुठे खुट्ट वाजले तरी लाह्या उधळाव्या तशा चौफेर भिर्र उधळणाऱ्या मुनिया माझी चाहूल लागूनही कणसे टिपत रहायच्या. हे सगळे पक्षी माझ्या दिनचर्येचाच एक भाग झाले होते व त्यांच्या दिनचर्येचा मीही एक छोटासा भाग होतो. प्राण्यांनी, पाखरांनी आपल्याला असं निर्धास्त होऊन स्विकारावं, त्यांना आपली भिती वाटू नये या सारखी दुसरी सुखावणारी भावना नाही.
मला पाहून येथले पक्षी कधी घाबरत नसले तरी कधी जवळ मात्र आले नाहीत. त्यांनी आमच्यातले अंतर नेहमी राखले. मात्र याला अपवाद तिघे जण होते. ईंडीयन रॉबीन, बॅबलर व ओरिएंटल रॉबीन. हे तिघेही माझी वाट पहायचे चक्क. खास करुन माझ्या गाडीची. मी देवराईत गाडी पार्क केली की पाचव्या मिनिटाला एक रॉबिन यायचा व गाडीच्या छतावर बसून रहायचा. त्याला त्यात काय आनंद मिळे माहित नाही. एखाद्या किल्लेदाराने बुरुंजावर उभं राहून अभिमानाने किल्ल्याचा परिसर न्याहाळावा तसा तो माझ्या गाडीच्या छतावर उभा राहून आजूबाजूची देवराई निरखत रहायचा. मधेच जमिनीवर उतरुन मातीत काहीतरी शोधायचा व पुन्हा आपल्या बुरुजावर येऊन छाती काढून उभा रहायचा.
दुसरा होता ओरिएंटल रॉबीन अर्थात दयाळ. माझी गाडी पार्क झाल्यानंतर हा पाच दहा मिनिटातच हजर व्हायचा. हा कधी गाडीजवळ किंवा माझ्या जवळ फिरकला नाही. गाडी जेथे पार्क असे तेथे शेजारी स्टोअर रुमची भिंत होती. हा त्या भिंतीच्या टोकावर बसायचा व खुप मंजूळ आवाजात शिळ घालायचा. त्याचे हे गाणे गाडी जोवर तेथे उभी असायची तोवर चालायचे. मधे मधे तो उड्या मारत नाचतही असे. मी ज्या दिवशी गाडी न नेता पायी जाई, त्या दिवशी तो यायचा नाही. त्याच्या चोचीवर दोन मोठ्ठे ओरखडे होते. हा मला कधी कधी रस्त्याच्या पलिकडे असलेल्या बागेतही दिसायचा. तेंव्हा मात्र तो ओळख देत नसे. अर्थात माझी चाहूल लागली तरी तो निर्धास्त असे. हिच त्याने दिलेली ओळख आहे यावर मी समाधान मानत असे.
तिसरा होता बॅबलर. सातभाई. होता म्हणजे होते म्हणायला हवे. कारण यांचा सात जणांचा लहानसा थवा होता. कधी कधी ते पाचच असत. सातपेक्षा जास्त मात्र कधी एकत्र दिसले नाहीत. हे फार आतूरतेने माझ्या गाडीची वाट पहात. गम्मत म्हणजे मी कधी पायी चालत गेलो व नेहमीच्या ठिकाणी बसलो की हे सातही सातभाई माझ्या समोरच्या जमिनीवर उतरत व प्रचंड कलकलाट करत. यांचा कलकलाट नळावरच्या भांडणालाही लाजवेल असा असतो. डोकं शिणतं अगदी. नक्की काय ते माहित नाही पण माझा अंदाज आहे की ते मी गाडी न आणल्याचा निषेध नोंदवत असावेत. यांचा असा समज होता की माझ्या गाडीत यांच्या शत्रूपक्षाचे सातभाई प्रवास करतात. गाडी बंद करुन मी बाहेर येईपर्यंत हे सातभाई माझ्या गाडीवर झेपावत व आरश्यावर हल्ला करत. हा हल्ला अगदी नियोजन करुन असे. यांच्या दोन तुकड्या असत. प्रथम पहिली तुकडी आरश्यावर हल्ला करी. नंतर ते दमले की गाडीच्या बॉनेटवर बसत व त्यांची जागा दुसरी तुकडे घेत असे. दोन्ही तुकड्या दमल्या की मग यातले दोघे दोघे मिळून आरशाजवळ खिडकीच्या काचेजवळ कसेबसे बसत व आरशातल्या शत्रूंचा अंदाज घेत. त्यांना निरखत.
हे सगळं आठवायचे कारण म्हणजे काल दुपारी मी सहज मळ्यात चक्कर मारायला गेलो होतो. उन्हं तापायला लागली आहेत. ओढ्याच्या काठी असलेल्या अंब्याच्या झाडाखाली छान गारवा मिळतो. फिरत्या पंख्याखाली दुपार घालवण्यापेक्षा आंब्याच्या झाडाखाली काही रेखाटत बसायला जरा बरं वाटतं. मी नुकताच झाडाखाली टेकलो होतो. एवढ्यात समोरचा ओढा चढून चार मुलं वर आली. उन्हाच्या तिरपीमुळे मला ती व्यवस्थित दिसली नाही. माझ्यासमोरुन जाताना मला त्यांच्या हातातल्या गलोली दिसल्या. वाटलं सशे वगैरे मारत फिरत असतील मळ्यात. मी हाक मारुन त्यांना थांबवले.
“काय मग, घावला का एखादा ससुला?” अशी चौकशी केली.
पोरं हसून म्हणाली “सशे नाय गावत या टायमाला. पाखरं मिळत्यात मोप.”
मलाही वाटले, चला काही ना काही मिळतेय यांच्या पोटाला ते बरे आहे. निसर्ग कुणाला उपाशी ठेवत नाही. उत्सुकता म्हणून मी विचारलं “काही मिळालय का सकाळपासून?”
“ह्ये आत्ताच तं आलोय सायेब. लगीच कुटं काय मिळतय. दोन पाखरं पडली फक्त.” असं म्हणत त्या मुलाने खिशात हात घातला व दोन पाखरे काढून माझ्या समोर धरली. ईतक्या वेळ मी अगदी सहजतेने त्यांच्या बरोबर बोलत होतो. मला तोवर या प्रसंगाचे गांभिर्य समजलेच नव्हते. त्याने पुढे केलेला हात पाहीला मात्र काळजात दुखल्यासारखंच झालं. त्याच्या तळहातावर एक दयाळ व एक सातभाई होता. दयाळ शांत झोपल्यासारखा वाटत होता. सातभाईची मात्र चोच तुटली होती. ते पाहून घशात आंवढाच आला. तो दाबताना गळ्याची घाटी दुखावल्यासारखी झाली व मेंदूपर्यंत कळ गेली.
काय बोलायचं आता या मुलांना? तरीही मी म्हणालो “अरे जी पाखरे खात नाहीत तुम्ही, ती कशाला मारता? जी हवीत तिच मारा”
ती कलेवरे खिशात ठेवत ते पोरगं म्हणालं “ही खायलाच पाडलीत सायेब. अजुन पाचसहा मिळाली की ईथच कुटंतरी जाळ करु व भुजून खाऊ”
यासारख्या पोरांनी असे कितीही दयाळ मारले, सातभाई मारले किंवा ईतर लहान पक्षी पाडले तरी पक्ष्यांच्या संख्येवर याचा काही फारसा परिणाम होणार नाही. तसेही या मुलांचा हा पिढ्यान पिढ्यांचा पोट भरण्याचा मार्ग आहे. हे सगळं कितीही खरं असलं तरी ते मला काही पटेना. आजचा दिवस वाईट जाणार. फोटो काढावासा वाटेना तरीही म्हटलं असुदे एखादा फोटो रेकॉर्डला. तरीही फोटो काढताना क्लिकचे बटन दाबायला मन धजेनाच. शेवटी त्या मुलाला दयाळची व सातभाईची मान फिरवायला सांगितली व मग फोटो काढला. बिचारे दयाळ व सातभाई.
कधी कधी वाटतं की माझ्या काळजात ‘निसर्गाची, पक्ष्या-प्राण्यांची ओढ’ ईन्स्टॉल करण्याऐवजी ईश्वराने ‘शिकारी व लाकूडतोड्याची वृत्ती’ ईन्स्टॉल केली असती तर बरं झालं असतं. उगाच एवढ्या तेवढ्यावरुन हे काळजात काटे घेऊन फिरलो तरी नसतो.
(फोटोतला दयाळ व सातभाई हे वर उल्लेख केलेलेच आहेत.)









100% Natural Organic Body Scrubber Loufah Sponges

पंधरा दिवसांखाली जरा जास्तच थंडी पडली होती. थंडी कमीच होती पण बोचरं वारं वहात होतं सकाळपासून. दुपार झाली तरी हवेतला गारवा कमी होत नव्हता. मग दुपारीच सिम्बाला घेऊन मळ्यात गेलो. ओढ्याच्या काठावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली उन्हाला पाठ देऊन बसलो. समोरच्या रानात मावशीची लगबग सुरु होती. आम्हाला पाहून तिने हाताने बसायची खुण केली पण ती आली मात्र नाही. ओढ्याच्या कडेकडेने शेताला अगदी लागूनच पाच सहा शिंदीची झाडे होती. तेथे तिची काहीतरी खटपट सुरु होती. जरा वेळाने मावशी आली व हुश्श करत पदराने चेहरा, गळा पुसत सिम्बाशेजारी टेकली. सगळ्या लुगड्यावर जळमटं, काटक्या वगैरेंचा कचरा. डोक्यावरच्या पांढऱ्या केसांच्या कापसातही वाळली पाने, पाकळ्या वगैरे अडकलेलं. मी काही विचारायच्या आतच मावशी म्हणाली “लय झाडूरा माजलाय. त्यात आमच्या म्हताऱ्याला नाय उद्योग. मरणाची घोसाळी अन् डांगरं लावलीत. सगळ्या येलींनी बांध आन् वढा येरगाटलाय. काय करायच्चीत ती घोसाळी. उगा अशीच वाळून झुंबरं व्हत्यात त्यांची.” मी म्हणालो “जेसिबी का नाही मागवत सरळ? काढून टाक ती शिंदीची झाडं.”
मावशी उत्साहाने म्हणाली “धाकट्याला तेच सांगितलय मी या टायमाला. काय कामाची हाय सिंदाडं? ना खायच्या कामाची, ना सावलीच्या कामाची. जेसिबीच बोलावलाय सुताराचा. पण त्येला म्हणलं गव्हू निघूंदे. चार सिंदाडापायी माझा गव्हू मोडायचा नायतर. ते सुतार म्हंजे ‘अडाण्याचा आला गाडा आन् तुमचा आड बाजूला काढा’ असं हाय. नुसतं हेंबाडं हाय. काम वाढून ठिवायचं उगा”
मग अर्धा तास बसल्यावर मीही मावशीबरोबर वेली ओढायला गेलो. तेवढीच तिला मदत. सिम्बाला तर अशा वेळी भयानक उत्साह असतो. मावशीने बहुतेक सगळ्या वेळी छाटल्या होत्या. ओढायच्याच बाकी होत्या. वेली ओढताना त्यांचा पसारा किती दुरवर व वरती सिंदाडाच्या टोकापर्यंत पोहचलाय ते समजत होतं. वेली काढून बाजूला ढिग केला. वर पाहीलं तर शिंदीच्या झाडावर चांगली हात हातभर लांबीची वाळलेली घोसाळी लटकली होती.
मावशीला म्हटलं “मावशे जेसिबी आला की तेवढी पाच सहा घोसाळी ठेव माझ्यासाठी बाजूला. जाळात नको टाकूस. तेवढीच अंगघासणीला होतील.”
काल संध्याकाळी ओढा उतरून पलिकडच्या कोबीच्या रानात जाणार होतो ईतक्यात मावशीने मागून हाकारा घातला. वळून पाहीले तर हातातलं खुरपं हलवत मावशी आंब्याकडे जायला सांगत होती. मग पुन्हा ओढा ओलांडून अलिकडे आलो व आंब्याकडे वळालो. आंब्याखाली पोहचलो तर तेथे आंब्याच्या खोडाला टेकवून पाचसहा दांडगी घोसाळी ठेवलेली होती. मावशी थकली असली तर स्मरणशक्ती भारीय तिची. तिने निवडून घोसाळी ठेवली होती. सिम्ब्याला लिश नव्हती. त्याचे लक्ष गेल्यावर त्याने एका उडीत ती घोसाळी गाठली व मी त्याला आवरायच्या अगोदर त्यातल्या तिन घोसाळ्यांना त्याने दात लावलेही. त्याला ते खुळखुळे प्रचंड आवडले होते. मग उरलेली दोन घोसाळी घेतली व बाकीची तिन दोरीत बांधून गळ्यात टाकली. पुर्वी बॅंडमधे स्टिलचे दोन मोठे खुळखूळे घेतलेला एक माणूस असायचा. अगदी त्याच्यासारखे दोन घोसाळ्याचे खुळखूळे वाजवत मी पुढे व मागे वरातीचा घोडा जसा पावले आपटत नाचतो तसा नाचत सिम्बा अशी आमची वरात घराकडे निघाली.
दुसऱ्यादिवशी मळ्यात गेल्यावर मावशीने ती घोसाळ्याची जाळी कशी मऊ करायची याची पद्धत सांगितली. “ध्यान देवून कर, नायतर तशीच तुकडं करुन घेशीन आणि आंग सोलपटल्यावर बश्शील गागत” असं म्हणत तिने तंबीही दिली. अर्थात आम्ही लहानपणी या जाळीचे अनेक प्रकार करायचो. पेन स्टॅंड, वॉल हॅंगिंग, अंग घासण्या वगैरे. बहिणींना या जाळ्यांच्या पर्स करुन देणं तर कंपलसरी असे आम्हाला. ईतक्या वर्षांनी ती जाळी अशी हाताला लागल्याने मजा वाटत होती. त्या उत्साहातच मी मावशीला म्हटलं “एवढं बयाजवार सांगतीय तर तुच का करुन दिल्या नाहित घासण्या? आणि एक कर, या घासण्या ऍमेझॉनवर टाक. लोकं उड्या मारतील त्यांच्यावर.”
“लोकं खुळीच झाल्यात आजकाल” म्हणत मावशी तिच्या कामाकडे वळली.
मी बसल्या बसल्या सहज ऍमेझॉन उघडले. हायला तेथे गोवऱ्या विकायला असतात, मग काय सांगावं या जाळ्याही काहीतरी भारी नावाखाली असतील विकायला. आणि गम्मत म्हणजे घोसाळ्यांच्या या जाळ्या तेथे उपलब्ध होत्या आणि त्या खाली लोकांनी चक्क रिव्ह्यूज लिहिले होते.
मावशी म्हणते ते खरच्चे. लोकं खुळी झालीत आजकाल. काऊ डंग केक च्या नावाखाली गोवऱ्या विकत घेतात आणि रिव्ह्यूजमधे ‘टेस्टलेस ऍन्ड ड्राय केक’ असं लिहून एक स्टार देतात.
😂😂



होलम राजा

जेजुरीला माघी पौर्णिमेच्या निमित्ताने विविध भागातून काठ्या येतात. आमच्या भागातली काठी संगमनेरहून निघते व पौर्णिमेला जेजुरीला पोहचते. गावाबाहेर एकादशीच्या रात्री नऊ साडेनऊच्या आसपास जागरण उभं रहातं. खंजीऱ्या तापवल्या जातात, तुणतुण्याच्या तारा ताणल्या जातात, कडक चहाने गळे शेकले जातात व मग ऐसपैस चौक भरुन जागरणाला सुरवात होते. हे जागरण हळूहळू टिपेला जात नाही. याची सुरवातच मुळी टिपेच्या सुरांनी होते आणि सुरांची ती पट्टी पहाटपर्यंत सांभाळली जाते. तासा दोन तासाला बाजूच्या शेकोटीवर उतरलेल्या खंजीरी पुन्हा तापवल्या जातात. तुणतुण्याच्या खुंट्या आवळल्या जातात. वाघ्यांच्या काळजात प्रत्यक्ष खंडेराया भंडारा फासून ठाण मांडून बसलेला असतो, त्यामुळे त्यांना गळा गाता ठेवायला कोणत्याही खुंट्या आवळाव्या लागत नाही. दहा अकरापर्यंत आजूबाजूचे शेतकरी जेवणं वगैरे उरकून मग निवांत जमायला सुरवात होते. मग वाघ्यांना अजुन जोर चढतो. खंडेरायाचे गुणगाण गाताना त्यांच्या नरड्याच्या शिरा तरारुन फुगतात. खंजीरीवर नाचणारी बोटांची टोके लाल होतात. कपाळावर माखलेल्या भंडाऱ्यातून घामाच्या धारा वाट काढत छातीवर उतरतात. बाणाईचे व म्हाळसेचे भांडण आता खळीला आलेले असते. लोक तल्लीन होऊन ते भांडण ऐकत असतात. ‘सवती सवतींच भांडाण, मधी भक्तांचं कांडान’ ऐकताना नकळत लोकांच्या माना डोलायला लागतात. या कष्टकरी लोकांच्या संसारातही कटकटी असतात व परमार्थातही कटकटी असतात. यांचा खंडोबाही या घरधनीनींच्या त्रासातून सुटलेला नसतो. यांचा देवही यांच्यासारखाच असतो. हे जागरण पहाटेपर्यंत अगदी कळसाला पोहचते आणि थंड वाऱ्याच्या झुळकींसोबत काठी गावाच्या वेशीवर येते. मग या काठ्यांची आरती होऊन जागरण संपते. पालखीच्या भोयांनी जरा विश्रांती घेतली की मग सकाळी नऊच्या आसपास या काठ्या भंडाऱ्याच्या पिवळ्या ढगांवर तरंगल्यासारख्या गावाच्या वेशीतून आत शिरतात. मग सुरु होतो या उंचच उंच काठ्या नाचवण्याचा खेळ. हलग्या घुमायला लागतात, भंडाऱ्याने आसमंत माखून जातो व त्या गर्दीतून या काठ्या बेभान खांदे बदलत बदलत गावमारुतीपर्यंत येतात व भावविभोर झाल्यासारख्या मारुतीच्या देवळाच्या छपरावर मोरपिसांचे गुच्छ टेकवून झुकतात. येथे पु्न्हा आरती होते व या काठ्या पुढे जेजुरीकडे रवाना होतात.
या काठ्या एकदा जेजुरीकडे रवाना झाल्या की मग हौशी लोकांचा होलम सुरु होतो. जिकडे तिकडे उथळ काहील्या जिलेब्यांनी घमघमतात. गोल कांदाभजीचे घाणे निघायला सुरवात होते. रेवड्या व गुडीशेवेची मोठमोठी ताटे रिकामी व्हायला सुरवात होते. दुपारी बारा वाजताची जिलेबी भजी ही बाहेर जाऊनच खायची असते. संध्याकाळी पाच वाजताची जिलेबी मात्र घरी आणून मठ्ठ्याचे ग्लास रिकामे करत खायची. रात्री आठ वाजेपर्यंत आमचा हा होलम शांत होतो. आता उन्हाळ्याची सुरवात झालेली स्पष्ट जाणवते व वेध लागतात चैत्रात येणाऱ्या आमच्या यात्रेचे.
माणसाच्या असंख्य गुणांपैकी मला त्याचा हा उत्सवप्रीय स्वभाव प्रचंड आवडतो. देव आहे की नाही या भानगडीत मला पडायचे नाहीए. असेलही किंवा नसेलही बापडा. पण ‘तो आहे’ या विश्वासावर ज्या यात्रा, जत्रा-खेत्रा, उरुस, संदल, सणवार, वारी-पालख्या, प्रथा-परंपरा वगैरे गुंफलं गेलय ते फार फार सुंदर आहे. त्यासाठी तरी मी ‘देव आहेच’ म्हणेन. माणसांमधली ही उत्सवप्रीयता व उत्साह असाच चिरकाल टिको. माणसांचा देव मानसावर सदैव असाच प्रसन्न राहो.










बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

गावाकडच्या गोष्टी

पुण्या-मुंबईत राहून मी गावाकडच्या अनेक गोष्टींसाठी गहिवरुन यायचो. तास तासभर बायकोला काहीबाही सांगत रहायचो. “झालं याचं सुरु!” असं म्हणत बायको जरी मला झटकत असली तरी माझा उद्देश तिला ऐकवण्याचा नसतोच, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. तिच्या निमित्ताने मी स्वतःशीच या गोष्टींची उजळणी करुन घेतो. अर्थात यामागे “आमच्या काळी यंव अन् त्यंव” किंवा “तुम्हा शहरातल्या लोकांना काय माहित गावची मज्जा” असला काहीही सुर नसतो. त्या त्या गोष्टी माझ्या आनंदाचा ठेवा असतात आणि मी त्यांची आठवण काढत रमतो एवढाच या बडबडीचा अर्थ असतो. गाव सोडून पोटामागे जे शहरात आलेत त्या बहुतेकांची कधी ना कधी ही बडबड असतेच असते. ज्यांचं बालपणच शहरात गेलय त्यांना मुळातूनच या गोष्टी, वस्तू, पदार्थ वगैरे माहित नसल्याने त्यांना त्या अभावाचा पत्ताच नसतो.
या गोष्टींमधे लहानपणच्या खेळांपासून ते त्यावेळी आम्ही वापरलेल्या शाईपेन व लाल-निळ्या खोडरबर पर्यंत काहीही असते. पण मुख्य असतात ते खाण्याचे पदार्थ व ते करण्याच्या पद्धती. हा नॉस्टेल्जियाचा झटका महिना पंधरा दिवसातून एकदा येतोच येतो. तो झटका आला की मग रविवारी आयतं समोर आलेलं फ्रेंच ऑम्लेट असो की बंबईय्या अंडा घोटाला असो, बेचवच लागतं. गाईच्या शेणात लपेटून चुल्हीच्या आ(हा)रात भाजलेली गावठी अंडी आठवतात व त्यापुढे फ्रेंच ऑम्लेट अगदी सपक लागतं. गम्मत म्हणजे ही तुलना आजच्या पोरांना सांगायची सोय नसते. कारण ती चव तर त्यांना माहित असायचे दुरच, अंडी अशाप्रकारे शेणात लपेटून भाजतात हेच त्यांना माहित नसते. गाय दोहताना (धुताना) रिकामा पितळी ग्लास घेऊन धार काढणाऱ्याच्या शेजारी उकीडवे बसण्यातली मजा पोरांना माहित नसतेच, शिवाय असे धारोष्ण दुध प्यायल्यावर येणाऱ्या पांढऱ्या मिशाही त्यांना माहित नसतात. ‘धारोष्ण’ म्हणजे काय येथून त्यांचे प्रश्न सुरु होतात. एकदा मी धारोष्ण म्हणजे काय ते सांगुन ते दुध किती गोड लागते हे सांगायच्या अगोदर मुलांनी तोंडे वाकडी केली होती. त्यांना असं गायीच्या सडातून दुध काढून ते लगेच पिणं हा प्रकारच विचित्र वाटला होता, अनहायजेनिक वाटला होता. आज या गोष्टी कौतूकाच्या झाल्या असल्या तरी गावी मात्र आजही या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आहेत. गावी घरातली मुलंच काय, मांजरही धारोष्ण दुध पिते. जे दुधाचे तेच तुपाचे, तेच मधाचे व तेच रानमेव्यांचे. शहरातल्या मुलांना मधाचे पोळे मधाच्या बाटलीवर असलेल्या स्टिकरवरच पहायला मिळते किंवा ईमारतीच्या नवव्या दहाव्या मजल्यावर असलेले मधाचे पोळे दुरुन दिसते. गावी जरी दुकानात मध मिळत असला तरी तो फार तर सत्यनारायणाच्या पुजेसाठी आणला तर आणतात. खाण्यासाठी मध हवा असला की डोंगरात निरोप पाठवायचा. दोन दिवसात अस्सल मध घरी पोहचतो. या डोंगरातल्या माणसांकडे स्टिलची पिंपे भरुन अस्सल मध साठवलेला असतो. त्यातही कुणाला खास मध हवा असेल तर त्या त्या सिजनच्या अगोदर निरोप धाडला की मधाची बाटली पोहच होते वेळेवर. मग कुणाला औषधासाठी कडुलिंबाच्या रानातला मध हवा असतो तर कुणाला मोहाच्या सिजमधला मध हवा असतो. प्रत्येकाची चव वेगळी, रंग वेगळा व औषधी गुणधर्मही कमीजास्त असतात. मॉलमधल्या मधात असले पर्यात नाहीत. असले तरी ते अवाच्या सवा महाग. त्यातही खात्रीने मिळेलच असेही नाही. अगदी साध्या साध्या गोष्टींची वाणवा असते शहरात. फळबाजारातून कितीही कौतूकाने ड्रॅगन फ्रुट आणले तरी त्याला गावाकडच्या फड्या निवडूंगाच्या बोंडाची सर य़ेत नाही. आणि शहरी पोरांना मुळात फड्या निवडूंगाचे बोंडच माहीत नसल्याने त्यांना त्याचा अभावही जाणवत नाही. त्यांना ड्रॅगन फ्रुटचेच कौतूक. हाच प्रकार विकत आणलेल्या खर्वसाच्या बाबतीत. रानमेव्याच्या बाबतीत. जांभूळ काय विकत घेऊन खायचे फळ आहे का? त्यासाठी दोघांनी झाडावर चढून जांभळाचे घोसच्या घोस खाली चार कोपरे धरुन उभ्या असलेल्या मुलांच्या हातातल्या धोतरात टाकायला हवेत. कोंडाळं करुन ती जांभळं चाखायला हवीत. एकमेकांच्या जांभळ्या झालेल्या जिभा निरखायला हव्यात. तर त्या जांभळांची खरी चव कळते. संध्याकाळी आजोबांनी त्यांच्या धुतलेल्या धोतरावर जांभळी नक्षी पाहीली की मग जो शिव्यांचा भडीमार होतो त्याने जांभळांची खुमारी अधीक वाढते. गाडीची काच खाली करुन पटकुर गुंडाळलेल्या आजीच्या हातून करवंदाचा द्रोण घेऊन खाण्यात धन्यता मानणाऱ्यांना करवंदाच्या जाळीच्या ओरखड्यांची रांगोळी हातापायावर उमटवून घेण्यातली धमाल माहित नसते. हाथगाडीवर मिळणारे सोललेल्या उसाचे तुकडे चघळण्यात काही गोडवा नाही. रानात चांगला काळाभोर उस पाहून तो मित्राच्या सोबत खात खात गावात येण्यातली मजा औरच. रस्त्यावर पडलेल्या चोयट्यांचा माग धरुन कुणीही आपल्या मित्रांचा कंपू धुंडाळू शकतो. हुरड्याच्या पार्ट्या हा प्रकार आता सुरु झाला. गावाकडे या हुरड्याचे कुणाला फारसे कौतूक नाही. कुणी मित्र किंवा पाव्हना रानात आला की सहज चार तुराट्या पेटवून त्यात असेल ती कणसे भाजायची पद्धत आहे आमच्याकडे. त्याला आता आता हुरडा पार्टीचे रुप आलेय. असो. एक ना अनेक गोष्टी. लिहायला बसलो तर कादंबरी होईल.
हे सगळं आठवायचे कारण म्हणजे काल मित्राच्या बायकोने पाठवलेले अस्सल गावठी लोणचे. अगदी आज्जीच्या हातचे असावे तसे. प्रत्येक फोडीला टणक बाठ असलेले लोणचे. हे लोणचे जसजसे मुरत जाते तसतसे ते फुलत न जाता आक्रसत जाते. मऊ न होता जरासे चिवट होते. (वातड नाही) जेवताना बोटांनी हे तुटत नाही, फोड दाताखाली धरुनच खावे लागते. याची गम्मत जेवण झाल्यानंतरही कमी होत नाही. जेवण होता होता ताटातले लोणचे संपते. मग पाणी प्यायल्यावर हात धुवायच्या आधी ही लोणच्याची दशा असलेली बाठ तोंडात टाकायची व हात धुवायचे. नंतर शतपावली करेपर्यंत ही बाठ चोखता येते.
किती साधे साधे पदार्थ असतात हे. लोणचे, खर्वस वगैरे. पण आपण त्यांचे पार भजे करुन टाकलेय. मस्त गुळ टाकून, अगदीच चिमूटभर ईलायची टाकून केलेला खर्वस भन्नाटच. पण त्यात साखरच टाक, जायफळच टाक, केशराच्या काड्याच टाक, ड्रायफ्रुटच टाक असला उद्योग करुन त्या खर्वसाचा जिव गुदमरवून टाकतात लोक. ज्यांना असा खर्वस आवडतो त्यांच्या आवडीबाबत माझा काही आक्षेप नाही पण खर्वस खावा तो गुळ विलायची टाकून चुल्हीवर केलेलाच. चिकाची मुळ चव त्याच खर्वसात असते. लोणच्याचेही तेच. जितके जिन्नस कमी तेवढे लोणचे खुमासदार. पण आजकाल पंजाब, राजस्थान वगैरे भागातल्या रेस्पींची व आपल्या मुळ रेसेपीची ईतकी सरमिसळ झालीय की ते लोणचं खाताना मुळ कैरीची चवच हरवलीय या सगळ्यात. गावाकडे एखाद्या आज्जीने लोणच्याची एक फोड खाल्ली तरी तिचा प्रश्न असे “का गं, औंदा खोबऱ्या आंब्याची कैरी नाय गावली का?” कोणत्या आंब्याच्या कैरीचे लोणचे केलेय हे कळण्याईतकी त्यात कैरीची चव असे व ती चव ओळखणारी आजीची जिभही चवणी असे. अनेकांना माहित असेल किंवा नसेलही, बहुतेक हॉटेल्समधे टेबलवर आणून ठेवलेले आंब्याचे लोणचे हे कैरीचे नसतेच. कैरीचे लोणचे अनलिमिटेड द्यायला परवडणारही नाही. बरेचदा ते भोपळ्याचे लोणचे असते. आपण खातो ते लोणचे नक्की कैरीचेच आहे की अजुन कशाचे हे ओळखता न येण्याईतका त्यात मसालेदार खार असतो व आपले टेस्टबडसनाही मुळ कैरीच्या लोणच्याची सवय राहीलेली नसते. असोच.
गावाकडच्या लोणच्यात मालमसाला कमी असला तरी जिव्हाळा ओतप्रोत असतो. मी शैलाला फोन करुन सांगितले की “लोणचे पाठव रे जरासे. चव नाहीए तोंडाला” तर तिने मोठा डबा भरुन ‘जरासे’ लोणचे पाठवले. सोबत निरोप होता “अजुन पाह्यजे असल तर सांग” चार महिने पुरेल एवढे लोणचे मी आठवड्यात संपवले. परवा पुन्हा तिला फोन करुन सांगितले “लोणचे संपले रे सगळे, थोडेसे पाठव” कालच पुन्हा मोठा डबा भरुन ‘थोडेसे’ लोणचे आलेय. सोबत निरोप आहे “आता तुझ्या वाटेचं संपलं लोणचं. हे पुरवून खा.”
(थोडेसे (?) डिशमधे काढलेय फोटोसाठी. बाकी डब्यातच आहे. गावाकडे ‘जरासे’ म्हणजे ईतके असते.)


सोमवार, २ जानेवारी, २०२३

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव. अशात जर वाफाळती मिसळ समोर आली तर मोह आवरत नाही. एक वेळ रंभा मेनका समोर आल्या तरी चित्त चळणार नाही पण मिसळ म्हटल्यावर ताबा जातोच मनावरचा. ‘जी मेनकेसी परौते सर म्हणती’ अशी मिसळ समोर असल्यावर त्या रंभेला काय चाटायचय? (माफ करा माऊली)
जसा मानवतेला कोणताही धर्म नसतो तसेच मिसळला कोणतेही गाव नसते. हे कोल्हापुर, पुणे व नाशिकवाले उगाच मिसळवरुन भांडत असतात. (मी पुणेकर आहे तरीही हेच मत आहे माझे) मी तिनही शहरांमधे नावाजलेल्या सगळ्या मिसळ खाल्या आहेत. त्या आपापल्या जागी ठिक असल्या तरी गावाकडच्या मिसळची चव त्यांना नाही. एक तर शहरांमधल्या मिसळमधे असणारी शेव ही अस्सल बेसनपिठाची असण्याची शक्यता फार कमी. निर्भेळ बेसन पिठाची शेव रस्स्यामधे पडल्यानंतर तिस सेकंदात मऊ होते. शहरांमधल्या मिसळमधे असणारी शेव ही मिसळ संपत आली तरी कुरकुरीत रहाते बऱ्यापैकी. यावरुन समजा काय ते. आणि मसाल्याचे म्हणाल तर क्वचितच कुणी मिसळसाठी घरी मसाला करत असतील. गावाकडे तेल, बेसन या गोष्टी निर्भेळच वापरल्या जातात. गावाकडे म्हणजे माझ्या गावाचे कौतूक नाही करत मी. तुम्ही कुठल्याही गावात मिसळ खा. ती उत्तमच असेल. गावच्या मिसळचा नाद शहरातल्या मिसळणे करुच नये. शहरी मिसळ म्हणजे मेंढराच्या कळपामधे वाढलेले व स्वत्व विसरलेले वाघाचे बछडे. नुसते रुप वाघाचे, सवयी सगळ्या मेंढीच्या. अशा मिसळमधे फरसानच असेल, बटाटे-पोहेच असतील, चिंच-गुळच असेल काहीही असेल. आजकाल तर चिज मिसळही मिळायला लागलीय. उद्या न्युटेला मिसळ मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको. बरं तिची सजावट एवढी की नाकापेक्षा मोती जड. स्टिलच्या मोठ्या ताटात, जिलेबीचे दोन वेढे, गुलाबजाम, बासुंदीची वाटी, पापड, बिटाचे तुकडे, लोणचे वगैरे काय वाट्टेल ते असते. मिसळ बिचारी ताटाच्या कोपऱ्यात हिरमुसून बसलेली असते. ‘माणूस अगोदर डोळ्यांनी जेवतो व मग तोंडाने’ असं म्हणतात. हे असलं मिसळच ताट पाहीलं की माझी भुक मरते.
गावाकडे जरा वेशीबाहेर, शेतीभातीने वेढलेले एखादे मिसळचे हॉटेल असते. येथे फक्त मिसळ मिळते. समोरुन अरुंद पण नेटका डांबरी रस्ता गेलेलला असतो, तिनही बाजूने हिरवीगार शेती असते, शेजारीच दोन तिन आंब्यांची झाडे असतात, शेतांमुळे हवेत जास्त गारवा असतो, हॉटेलवाला मित्रच असल्याने मिसळच्या अगोदर गप्पांचा फड जमतो. मिसळही अगदी घरी पंगतीला बसल्यासारखी आग्रह करकरुन वाढली जाते. पाव खाण्याच्या पैजा लावत रस्स्याचे भांडे रिकामे केले जाते, ज्या वेगात ते भांडे रिकामे होते त्याच वेगात हॉटेलवाला ते भरत रहातो. खिशातले रुमाल हातात व मग हातातले रुमाल नाका डोळांपर्यंत जातात. पंगतीत पाळायचे नियम येथेही पाळले जातात. सगळ्यांची मिसळ खाऊन झाल्याशिवाय कुणी हात धुत नाहीत. मग मजेत एकमेकांच्या हातावर पाणी घालत ओट्याच्या कडेला उभे राहून हात धुवायचे. तोवर गोड व घट्ट चहा आलेला असतो. मिसळनंतरचा चहा हा फक्त ‘जिभेच्या शेंड्याला चटका’ म्हणून घ्यायचा असल्याने दोन चहा पाच जणांना पुरतो. मग बिल देताना ‘मी देतो, मी देतो’ असा वाद न होता ‘तू दे, तू दे’चे भांडन होते. एखाद्या कंजुष मित्राच्या खिशाला चाट मारल्याच्या आनंदात, जिभेवर मिसळ व गोड चहाची चव घेऊन मग दिवसाची सुरवात होते. ही असते आमच्या गावाकडची मिसळ.



रविवार, १ जानेवारी, २०२३

दिनूकाका

सकाळचे दहा-साडेदहाच वाजले असावेत. सुर्य ईतक्या सकाळी सकाळीच पेटला होता. ऊन्हं चांगलीच तापली होती. मी सिम्बाला घेऊन मावशीकडे निघालो होतो. ते अमुलचे ताक प्यायचा भारी कंटाळा येतो. मावशीकडचे ताक म्हणजे अमृतच. सोबत ताकासाठी काही भांडे घेतले नव्हते. ती लिटरभर आकाराची किटली पाहून मावशी वैतागते. “जिभ तरी माखन का एवढूशा ताकात?” असा तिचा सवाल असतो. मावशीचा जिभेवर फार जोर. स्वतःही ईतकी बोलते की विचारु नका. “अप्पा दोन घास खातो का? सकाळीच लसुन घसारलाय पाट्यावर. जिभ दुवा देईन” किंवा “ऊलसाक चहा घेतो का? गवती टाकलीय मोप. ऊगा आपला जिभंच्या शेंड्याला चटका” असं तिचं नेहमी काहीतरी सुरु असतं. रस्ता ओलांडला की मावशीचा मळा सुरु होई. जरा आत गेले की तिचे कौलारु घर दिसे. मी रस्ता ओलांडला व सिम्बाची लिश हार्नेसमधून काढली. तो आता समोरच्या लसणाच्या शेतात धावणार असं वाटत असताना तो ऊलट्या दिशेने पळाला व जोरजोरात भुंकायला लागला. रस्त्याच्या कडेला असलेला फुटपाथ काळ्या पांढऱ्या पट्टयांने रंगवत काही मुलं बसली होती. हा त्यांच्यावर भुंकत होता. ती पोरं ब्रश, रोल्स वगैरे टाकून रस्त्याच्या डिव्हाडरवर जाऊन ऊभी राहीली. मी घाईत पुन्हा सिम्बाला लिश लावली व त्याला मागे ओढले. ईतक्यात मागून आवाज आला “काय खातं का काय ते कुत्रं तुम्हाला? ऊगा कसलं बी निमित करायचं आन काम टाळायचं. चला लागा कामाला. दुपारपव्हतर पुलापर्यंत गेलं पाह्यजे काम आज.” हायला लईच कडक मुकादम दिसतोय यांचा असं वाटून मी मागे पाहीलं तर दिनूतात्या फुटपाथवर बसलेले दिसले. वय सत्तरीत आलेले. गुडघ्यापर्यंत असलेले चुरगाळलेले धोतर. बनशर्ट व कुर्ता याचे कॉम्बिनेशन असलेले खादीचे शर्ट. त्याच्या खिशात गांधी टोपी खोचलेली. छातीवरच्या खिशात पाच सहा पेनं. एक लाल कव्हरची जाड डायरी. डोक्यावर घामाने डवरलेले टक्कल. डोळ्यावर एक काच धुरकट केलेला जाड भिंगाचा चष्मा. त्या चष्म्याच्या कडेने दोन कळकट दोऱ्या. चेहऱ्यावर तो प्रसिद्ध वैताग. रानात विस एकरची बागायत असलेला हा करोडपती नेहमी गावाच्या ऊचापती करत हिंडत असतो. मी सिम्बाला मागे ओढत तात्यांच्या शेजारी बसलो. “काय तात्या, बरय ना सगळं? तब्बेत काय म्हणतेय? आज एवढ्या ऊन्हाचं कशाला त्या पोरांच्या मागे लागलाय?”
“कोण? अप्पा का? टेक ऊलसाक. तब्बेत कव्हा काय म्हणती का? आता लागलंय गाडं ऊताराला. कधी असं कधी तसं. चालायचंच. कुढशिक निगालाय? दुर्गीकडं?” मी मान हलवून “हो” म्हणालो. “जरा ताक आणतो मावशीकडून. तुम्ही काय करताय येथे?” खिशातली टोपी काढून ती डोक्यावर चेपत तात्या म्हणाले “अरं ही कार्टी काम करतायेत दोन दिवस. नुसतं थातूर मातूर चाल्लय. कोण हाय का विचारायला यांना? म्हटलं जरा ध्यान द्यावं. पुलापर्यंत काम करुन घेतो आणि मग देतो म्होरं काढून. पुढं करुदे त्यांना काय करायचय ते. कसं?” मी सिम्बाला जवळ ओढत म्हणालो “खरय. सोडू नका अजिबात यांना. चांगलं काम करुन घ्या. खरतरं यांचा मुकादमही जुंपला पाहीजे कामाला. पैसे खातात नुसते लेकाचे.” तात्या मिश्किल हसुन म्हणाले “त्यो पिवळा शर्टवाला हाय का, त्योच मुकादम हाय यांचा. अदुगर त्यालाच लावलाय कामाला. नुसता मोबाईलवर बोटं चाळत असतो रांडेचा. आता निट कामाला लागलाय. त्याला म्हणलं अदूगर तू डबडं धर रंगाचं हातात नायतर मवन्याला फोन लावीन. ऊगाच सरपंच केलय का त्याला!” माझ्या डोळ्यापुढे मोहन तरळून गेला. केविलवाना. “बरं तू निघ. येताना माझ्यासाठी तांब्याभर ताक आण दुर्गीकडून. जरा ध्यान देतो यांच्याकडं. आपण गप्पा मारत बसलो की यांना रानच मोकळं भेटातय.” “बरं” म्हणत मी सिम्बाला मळ्याकडे ओढले व पुन्हा त्याची लिश सोडली. मावशी अंगणातच काही निवडत बसली होती. सिम्बाने तेथे खेळत असलेल्या शेळीच्या करडांना मुके दिले. “मावशी ताक” एवढं म्हणताच मावशी लुगडं झटकून ऊठली. “आलेच” म्हणत लगुलग आत गेली. मी अंगणातल्या कौठाच्या झाडाला टेकलो. सिम्बा त्या गोजिरवाण्या करडांसोबत खेळत होता. त्यांच्या शेपट्या हुंगत होता. मावशीने लहान आकाराची पितळी कळशी आणली. “दम जरा दादरा बांधून देते” असं म्हणत त्यावर एक पांढरं कापड बांधून दिलं. “मावशी तांब्याभर ताक दे अजून. दिनूतात्यांनी मागितलय” असं म्हणताच मावशी करवादली. “लय खोडीचं म्हतारं हाय त्ये. ताक पेतय म्हणं” असं काहीसं बडबडत मावशीने तांब्याभर ताक आणुन दिले. “दम जरा” म्हणत पुन्हा आत गेली व चिमूटभर मिठ व दोन कैऱ्या घेऊन आली. मिठ ताकात टाकत मावशी म्हणाली “घे. आन त्याला म्हणावं दुपारला ईकडच ये तुकडा मोडायला. आतरंगी म्हतारं हाय रे त्ये. तसच राहीन ऊपाशी नायतव्हा” चला, माझं काम झालं होतं. दिवसभर मनसोक्त ताक पिऊनही संध्याकाळी बेसन, आलं-लसुन लावून कढी करायला ताक ऊरणार होतं. मी रस्त्यावर आलो तर तात्या रस्त्याच्या मधोमध ऊभे राहून त्या मुलांवर खेकसत होते. एका हातात धोतराचा सोगा, दुसऱ्या हातात निरगुडीचा हातभर फोक धरुन ते चिडचिड करत होते “अदुगर ती माती काढ ना मायझया. तुह्या बापाने असा रंग फासला व्हता का कव्हा!” मला त्या पोरांची किव आली. आज तात्या काही त्यांना सुट्टी देणार नव्हते. मी हाक मारुन त्यांना ताकाचा तांब्या दिला. मावशीने जेवायला बोलावले असल्याचे सांगितले व घरी निघालो. घरी आल्यावर मग मी हे सगळं विसरुन गेलो. दुपारी सहज गॅलरीत आलो तर समोरच तात्या आणि त्यांची सुन चाललेली दिसले. मी आवाज दिला “ओ तात्या दुर्गामावशी वाट पहात असेल ना जेवायला. गेले नाहीत का अजुन? शिव्या देईल मग ती.” तात्या हसुन म्हणाले “ती मोप शिव्या देईन. घुगऱ्या खाल्ल्यात मी तिच्या बारशाच्या. अरं पोरं दिवसभरं काम करत्यात. मघाशी भाकरी खायला बसली तर नुसती भाकर आणि लोणच्याचा तुकडा रे प्रत्येकाच्या फडक्यात. म्हणलं जरा दमा, आणतो कालवण.” सुनबाईच्या हातातल्या बॉक्सकडे बोट करत म्हणाले “आता जेवतील पोटभर. राबणारं पोट ज्येवलं पाह्यजे अप्पा. नाय तर काय मजा हाय सांग बरं” तात्या तुम्ही जेवलात का हे विचारायचं अगदी होठांवर आलं होतं माझ्या पण नाही विचारलं मी.

रविवार, २६ जून, २०२२

नानासर

मी दहावीला हायस्कुलमध्ये असताना आम्हाला मराठी शिकवायला 'नानासर' होते. माझ्या संपुर्ण शालेय जीवनात नावाने किंवा आडनावाने न ओळखता घरच्या नावाने ओळखले जाणारे हे एकमेव सर. त्यांची मुले व एकूणच घरचे सगळे त्यांना नाना म्हणत. हायस्कुलमध्येही हेडमास्तरांपासून शिपायापर्यंत सगळे त्यांना नानासर म्हणत. साडेपाच फुट उंची, अंगात हाफ बाह्यांचा पांढरा शर्ट, ग्रे रंगाची बेलबॉटम पॅंट, हातात तळहाताच्या बाजूला डायल येईल असे घातलेले एचएमटीचे घड्याळ. खिशात निळा व लाल असे दोन बॉलपेन्स, डोळ्यांवर जाड, काळ्या फ्रेमचा चष्मा. मान किंचित खाली करुन चष्म्यावरुन समोरच्याकडे पहात बोलण्याची लकब. चेहऱ्यावर सदा मिश्किल हसू. हात सदैव खडूच्या पावडरने पांढरे झालेले व शरीराचाच अवयव झालेले फळा पुसायचे डस्टर. वर्ग सोडला तर माणूस अगदी मितभाषी. वर्गावर असले की मात्र त्यांच्या जिभेवर चिवी जोशी नाचत. महामिश्किल माणूस. जितके प्रेमळ तितकेच तिरकस. एखाद्या विद्यार्थ्याला काही सुचना करायची असेल तर ती तिरकीच केली पाहीजे असा त्यांचा नियम होता. आमचा शिपाई अतिशय भोळा होता. सखाराम. नानासर त्याचीही गम्मत करत असत. एकदा सरांनी सखाला काही काम सांगितले. सखाराम ते रितसर विसरला. 
सरांनी त्याला विचारले तर सखा म्हणाला "बुड खाजवायला सवड नसते सर. विसरलो तुमचे काम." 
सर हसत म्हणाले "म्हणजे सवड मिळाल्यावर तू बुड खाजवतोस?"  

नानासरांना कधी कधी फार कंटाळा यायचा शिकवायचा. मग ते पुस्तक बाजूला ठेवत व आमच्याबरोबर गप्पा मारत बसत. मग तास संपल्याची घंटा होईस्तोवर वर्गात हास्याचे बॉम्ब फुटत. ईतकी चौफेर माहिती मिळे त्यांच्या बोलण्यातून, तेही अगदी विनोदी भाषेत. आम्ही मुलं कधी कधी म्हणायचो "नानासर, आज तुम्हाला नक्की कंटाळा आलाय शिकवायचा. हो ना?" मग मुड जरा बरा असेल तर सर "कार्ट्यांनो आज गप्पा मारयच्यात वाटतं! चला आज तुम्हाला शनवारवाडा दाखवून आणतो" असं म्हणत मग पेशव्यांचा ईतिहास न शिकवता पेशवाईतल्या मजेशिर गोष्टी सांगत. अनेकदा या गोष्टी वरवर मजेशिर असल्या तरी मनावर आसूड ओढणाऱ्या असायच्या. आम्ही सरांपुढे हसत असलो तरी आतून अगदी हललेलो असायचो, अस्वस्थ व्हायचो. हा गप्पांचा तास संपता संपता अनेक मुलांनी मनातल्या मनात निश्चय केलेले असत, संकल्प सोडलेले असत. कुणी जातपात न पाळण्याचा, कुणी नेहमी सत्य बोलण्याचा, कुणी संयम पाळण्याचा वगैरे वगैरे. कधी कधी सर मिश्किलपणा विसरुन फार गंभीर होत. विशेषतः आमच्या भविष्याविषयी बोलताना त्यांचा आवाज कातर होई. वर्गातल्या गरिब मुलांना उद्देशून म्हणत "शिका रे बाळांनो. लक्ष द्या जरा वर्गात. अभ्यास करा. अन्यथा फार मागे पडाल जगाच्या. नंतर पश्चाताप करुन काही होणार नाही. आई बाप राबराब राबतात त्याची तरी जाण ठेवा रे बाळांनो. मी का पगार मिळतो म्हणून शिकवतो का तुम्हाला?" वगैरे वगैरे. एकदा असेच ते कळवळ्याने बोलत होते. बोलून झाल्यावर मागे बसलेल्या एका वात्रट मुलाने म्हटले "बरं मग?" आणि मग आधिच शांत, गंभीर असलेला वर्ग अगदी चिडीचुपच झाला. नानासर क्षणभर गोंधळले. काहीवेळ भ्रमात असल्यासारखे आमच्याकडे पहात राहीले आणि मग खळ्ळकन त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळली. ती न पुसताच ते झटकन वर्गाबाहेर पडले. त्यांचे डस्टरसुद्धा न्यायला विसरले ते. खरं तर कुणा सरांची टिंगल करायची असली की आमचा सगळा वर्ग आपापसातले मतभेद विसरुन एकत्र येई. पण त्या दिवशी सगळ्या वर्गाने मिळून त्या वात्रट मुलाला यथेच्छ चोप दिला. अगदी मुलीही मागे नव्हत्या. नंतर आम्ही सगळे मिळून स्टाफरुममध्ये सरांची माफी मागायला गेलो. तर काही झालेच नाही असे हसत हसत सरांनी आम्हाला वर्गाकडे पिटाळले.
एकदा असेच पुस्तक उघडून कोणता धडा घ्यायचाय ते सांगून त्यांनी प्रास्ताविक सुरु केले. बराच वेळ प्रास्ताविक झाल्यावर ते म्हणाले "तर आता आपण मुख्य विषयाकडे वळू." मग किंचीत थांबून, चष्म्याच्या वरुन सगळ्या वर्गाकडे पहात म्हणाले "वळू म्हणजे बैल नव्हे" काही क्षणांच्या शांततेनंतर वर्गात एकदम हास्याचा आगडोंब उसळला. त्यानंतर कधी बाजारच्या दिवशी बाजारओट्यावर किंवा आईने घर सारवायला शेण आणायला पाठवले की मळ्यात नेहमी वळू दिसत. अशावेळी मला चटकन अभ्यास आठवत असे. कोणत्या विषयाचा गृहपाठ राहिलाय, कोणती कविता पाठ करायची राहीलय ते सगळं त्या वळूदर्शनाने डोळ्यापुढून जाई. एवढेच काय सोमवारी शंकराच्या मंदिरात गेल्यावरही नंदीच्या दोन शिंगांमधून पिंडीकडे पहाताना भक्तीभावाऐवजी हास्याचेच भाव चेहऱ्यावर येत. नंदी पाहूनही मला नानासरच आठवत. मला वाटायचे हे फक्त माझ्याच बाबतीत होतेय. पण एक दिवस जिवशास्त्राच्या तासाला कशावरुन तरी विषय निघाला व तो नंदीकिड्यापर्यंत (Antlion) पोहचला. हा किडा मातीत मऊ धुळ गोळा करुन विहिरीसारखे घरटे कसे बांधतो, आत दबा धरुन कसा बसतो, वरच्या घुमटात एखादी मुंगी वगैरे पडली तर तो किडा त्या मुंगीला कसा पाताळात ओढतो वगैरे सर सांगत होते. मग शेवटी सरांनी पुस्तक बाजूला ठेवले व सगळ्या वर्गाला बाहेर काढले. हायस्कुलच्या मागील जागा पडीक होती. तेथूनच मळ्यात जाणारा धुळभरला रस्ता गेला होता. सरांनी आम्हा सगळ्यांना मागे रस्त्यावर नेले व दहा पंधरा मिनिटात त्या किड्याची अनेक घरे दाखवली. त्या घरातली माती एका काडीने हलवल्यावर बाहेर आलेला किडाही दाखवला. आम्ही पुन्हा वर्गात येत असताना बाजूच्या माळावर चरणाऱ्या वळूकडे एका मुलाचे लक्ष गेले. तो मोठ्याने ओरडला "अरे ते पहा काये!"
आम्ही सगळ्यांनी वळून पाहीले व त्या वळूला पाहून सगळे एक साथ नमस्ते म्हणावे तसे ओरडले "नानासरांचा अभ्यास"
आमचे जिवशास्त्राचे सर त्यानंतर कित्येक दिवस "वळू पाहील्यावर मुले 'अभ्यास' असे का ओरडली असतील" याचा विचार करत असावेत.
(फोटो आंतरजालावरुन.)




बुधवार, १५ जून, २०२२

शेंगोळी

मावळे म्हटलं की लोकांना फक्त महाराज आठवतात व ‘महाराज’ म्हटलं की मावळे. पण मावळे म्हटलं की मला त्यांच्या तलवारीपेक्षा तवाच जास्त आठवतो. मावळ्यांना खाण्याचा अजिबातच शौक नाही. समोर वाढलेल्या ताटाबाबत हे फार उदासीन. ‘उदरभरण’ एवढाच हेतू. चवीचवीने खाणे मावळ्यांना माहितच नाही. पण त्यांच्या याच वृत्तीमुळे त्यांची एक वेगळीच खाद्यसंस्कृती झालीय. मावळ्यांसारखीच रांगडी व राकट. प्रत्येक मावळ्याच्या पाठीवर ढाल व त्याच्या बुडाखाली असलेल्या घोड्याच्या पाठीवर असलेल्या गाशामधे तवा. कुठेही आडरानात ओढा किंवा विहिर पाहून घोडा थांबवायचा. तिन दगडं मांडून त्यावर तवा चढवायचा. चार मिरच्या, मिठ व आजूबाजूच्या शेतात जी काही माळवं असतील ती किंवा ती नसतील तर रानातली रानभाजी टाकायची. तलवारीच्या मुठीने ते सगळे जिन्नस गरम तव्यावर रगडायचे. त्याच तव्यावर दोन चार अंगठ्याएवढ्या जाड भाकऱ्या भाजायच्या व पळसाच्या पानावर किंवा सरळ हातावर घेऊन मनसोक्त खायच्या. गाडगंभर ओढ्याचे पाणी रिचवायचे. सवड असेलच तर डेरेदार झाडाचा आडोसा पाहून गाशा पसरायचा व ताणून द्यायची. पहाट होता होता गाशा गुंडाळायचा व पुढच्या मोहीमेवर चालू पडायचे. महाराजांच्या सैन्याला यामुळेच गती असायची. शत्रू ही गती पाहून चकित व्हायचा. मुघल मात्र सुर्यास्ताचे सौंदर्य पहात रमायचे, त्यांचा खानसामा तब्बेतीत मुदपाक लावायचा. मग हंड्या चढायच्या. त्यात मटन रटरटायचं. ते शिजेपर्यंत मुघल सैनिक यथेच्छ अपेयपान करुन, बांद्यांचा नाच वगैरे पाहून मग ताटावर बसायचा. यथेच्छ जेवायचा व रात्रभर बेशुद्ध झाल्यासारखा झोपायचा. शुर असुनही मुघल या सवयीमुळे महाराष्ट्रात जिंकू शकले नाहीत. मावळ्यांची ढाल वार अडवायला जशी कामी येई तशीच चुल्हीला आडोसा म्हणूनही कामी येई. समोर शत्रू असताना हजारभर मावळ्यांनी ढालीवर केलेल्या तलवारीच्या मुठींचा खट खट आवाज समोरच्या पन्नास हजाराच्या छावणीला धडकी भरवायचा ते उगीच नाही.
तर अशा या मावळ्यांच्या मावळात काही गोष्टी खासच पिकतात. मावळातली ज्वारी खावी, बाजरी खावी. मावळातला हुलगा खावा. मावळातली मिर्ची खावी. मावळातला तांदूळ खावा. वसुमतीचा बासमती झाला व मुघलांच्या नादी लागून तो बिर्याणीत वगैरे पडला तरी त्याला मावळातल्या तांदळाची सर नाही. मावळातल्या तांदळाच्या पेजेत वात ठेवून पेटवली तर रात्रभर जळते. तो नाद इतर तांदळांनी करुच नये. प्रत्येक प्रांताची आपापली एक खाद्य संस्कृती असते. ती त्याच प्रांताला शोभते. कोकणाने माशांची मिजास करावी. ती मजा आम्हा मावळवासीयांना नाही जमत. आम्ही कितीही नदीतल्या गोजळा पकडल्या तरी कोकणातली गम्मत नाही. कोकणातली एखादी आक्का ढिगभर फडफडीत भाताबरोबर तव्यावर दोनचारदा उलटी पालटी केलेली माशाची एखादी तुकडी वाढते व माणसाचा पोटोबा तृप्त करते. ती कला आम्हा मावळ्यांकडे नाही. पण कोकणात हुलग्याचा कुळीथ करतात व पिठाची पिठी करतात ते काही सहन होत नाही. हुलगा हलक्या काळजाच्या माणसाचे खाणेच नाही. त्याचे पिठले करुन, वरुन तुप घेऊन भाताबरोबर खाणे हा हुलग्याचा अपमान आहे. वर कुळीथाचे पिठले व भात याचे गुणगाण गाणे हा तर अपराध आहे. मुळात कोकणी माणसाला खरा हुलगाच माहित नाहीए. लाल हुलग्याला आम्ही मावळे हुलगा म्हणतही नाही व मानतही नाही. अगदी सपक. मावळातला हुलगा हा मावळ्यांसारखाच रांगडा. जेवढा बरड जमिनीत, डोंगर उतारावर वाढेल तेवढी जास्त चव. एकरभर रान एका दमात नांगरुन उलथवणाऱ्या बैलांचा आहार म्हणजे हुलगा. शाहीर पिराजी म्हणायचे की ‘वंशाला मुलगा, होडीला व्हलगा व बैलाला हुलगा असावा’. मावळी हुलग्याची रग बैलांनीच जिरवावी, येरांचे ते काम नोव्हे. आवडतात म्हणून आठवड्यातून दोनदा हुलगे खाल्ले तर भल्या भल्या खवय्यांना त्रास होतो. ही रग कोकणातल्या कुळीथामधे नाही. आमच्या हुलग्यांना मांजे म्हणतात. रंगाने काळेभोर व उग्र. हुलग्याचे पिठ मळण्यासाठी त्यात पाणी टाकले तरी सगळ्या घरात त्याचा वास पसरतो असे तिव्र असतात मांजे. या हुलग्याचे लाड करावेत तर ते आम्ही घाटी लोकांनीच. मावळातली बाई हुलग्याचे असंख्य प्रकार करते. बाहेर माघाची थंडी चराचर गोठवते तेंव्हा बहुतेक घरांमधे चुलीच्या वैलावर मोड आलेले हुलगे रटरटत असतात. सकाळचा स्वयंपाक उरकला की चुलीतला विस्तू मागे ओढायचा व बाजूच्या वैलावर मोठं पातेलं ठेवायचं. त्यात भरपुर पाणी, मिठ, दोन चार हिरव्या मिरच्या, हळद व मोड आलेले हुलगे टाकायचे व शेताचा रस्ता धरायचा. दुपारपर्यंत हे पाणी निम्मे आटते. रानात राबून आले की हे कढण पितळीने प्यायचे. दुसऱ्या आहाराची गरजच नाही. पण त्यातल्या त्यात माडगं व शेंगोळी हे प्रकार आमचे जरा जास्तच लाडके. लाडके म्हणजे किती, तर शेंगोळी असेल तेंव्हा मटनाच्या खुमासदार रश्यालाही दुर सारतो आम्ही. ‘मटनाते परौते सर म्हणती’ अशी असते शेंगोळी. मी एवढं शेंगोळीचे गुणगाण गातोय म्हटल्यावर कुणाला वाटेल की एकदा ट्राय करावाच हा पदार्थ. पण ते इतकं सोपंही नाही. एकतर मांजे हुलगे मिळणे कठीण. मिळालेच तर त्यांची उठाठेव करणे अवघड. कारण बरड माळावर उगवलेल्या या धान्यात खडे, माती व इतर कचरा खुप. तो साफ करुन हुलगे दळून आणलेच तर शेंगोळी करणे कौशल्याचे काम. एवढं करुनही शेंगोळी केलीच तरी ती तब्बेतीला झेपायला हवी, चवीची सवय हवी. कारण माझं एक ठाम मत आहे की शेंगोळीची ही आवड वारशानेच तुमच्याकडे येते. उगाच करु नविन पदार्थ ट्राय म्हणून शेंगोळी खाऊन तिची आवड निर्माण होत नाही. एक तर या पदार्थाला रंग नाही, रुप नाही. आपल्या मराठी माणसाची सवय असते की घरी काही खास केलं की ते शेजारी देणे. त्याशिवाय आपल्या घशाखाली घास उतरत नाही. तर एकदा शेंगोळी केली होती व मी ती डिशमधे ठेऊन शेजारी रहाणाऱ्या गुजराती भाभींना नेऊन दिली कौतूकाने. त्यांनी ते पहाताच “ईऽऽ काय्ये हे?” असं म्हणत असा काही चेहरा केला की मी पुन्हा कधी अनोळखी व नॉनमराठी माणसाला शेंगोळीचे आमंत्रण दिलेच नाही. ही काही लॉस्ट रेसेपी नाहीए पण आजकालच्या मुलींना ही हातावर वळता येत नाही. पाटावर वळलेल्या शेंगोळीला हातावरच्या शेंगोळीची चव नाही. माझं लग्न झालं तेंव्हा बायकोला शुन्य स्वयंपाक येत होता. मी एक एक पदार्थ शिकवला. स्वयपाकाच्या बाबतीत पुर्ण अडाणी मुलीला मी पहिला कोणत पदार्थ शिकवला असेल तर तो हा शेंगोळी. आता बायको इतकी छान शेंगोळी वळते हातावर की पहात रहावं. तर शेंगोळी पुराण जरा बाजूला ठेऊयात. बाहेर पाउस पडत असताना जर हातात हुलग्याचे माडगे आले तर स्वर्गच. जर उद्या मला कळाले की स्वर्गात माडगे मिळत नाही तर मी लाख पुण्य केले असले तरी ऐनवेळी स्वर्ग नाकारेण. मुळात जेथे हुलगा नाही, शेंगोळी नाही, माडगं नाही तो स्वर्ग असुच कसा शकतो?
कधी जमलच तर या मला भेटायला. मस्त शेंगोळीचा मेन्यू करु. दुसऱ्या दिवशी पहाटेच हुलगे शिजायला ठेउ. दुपारखाली मस्त त्याचे माडगे करु. शिवनेरी सगळेच पहातात, त्यापलिकडे जाऊन मस्त नाणेघाट पाहू. रात्री झकास मासवड्यांचा बेत करु. झणझणीत रश्यात भाकरी चुरुन खाऊ. खळ्यात गोधड्या अंथरुन स्वच्छ आभाळातला चांद पहात गप्पा मारत झोपू.




शुक्रवार, १० जून, २०२२

माशुक का बुढापा

रात्रीच्या पावसामुळे आजची सुर्यकिरणे बरीचशी शितल आणि स्वच्छ होती. त्यामुळे आजचे सर्वच फोटो सुर्याला सामोरे ठेऊन काढले. तसेही सुर्य पाठीवर घेऊन समोरचे जे रुप दिसते त्याहून सुर्य समोरा असताना दिसणारे वस्तुंचे रुप फार वेगळे व विलोभनिय असते.
मोहर गळाल्यावर आता चिंचेच्या काही पानांनीही माना टाकायला सुरवात केलीय. त्यांची जागा नविन पालवी घेते आहे. कधीकाळी तजेलदार पोपटी रंग मिरवलेली ही पाने आता सुकून शेंदरी होत चालली आहेत. ही सुकनारी पानेही आपलं वेगळं सौंदर्य राखून आहेत.
माशूक का बुढापा, अब लज्जत दिला रहा है
अंगूर का मजा अब, किसमिस मे आ रहा है।
😀😛




शनिवार, २१ मे, २०२२

 माझा संध्याकाळी फिरायला जायचा रस्ता ठरलेला आहे. वॉकिंक हा ऊद्देश नसल्याने मी हाच रस्ता घेतो. हा साधारण दहा फुट रुंदीचा डांबरी रस्ता आहे. घरातून निघालो की जरा अंतरावर ओढ्यावर ऐसपैस बांधलेला सिमेंटचा पुल आहे. पुलाखाली असलेल्या पाईपच्या व्यासाएवढीच पुलाची ऊंची. पुल संपला की गरज नसताना रस्त्याने मारलेला किंचीत मुरका आहे. तेथून सरळ पुढे गेले की मळ्यातली तुरळक घरे सुरु होतात. ही घरेही मागून कढीपत्ता व पुढून जाई जुई मोगऱ्याने वेढलेली, मढलेली. आळूच्या पानांचे बेट तिट म्हणून लावलेली. रस्त्याच्या एका बाजूला चिकूची सदैव बहरलेली बाग. त्या बागेला एका बाजूने आंबा, गुलमोहर, चिंच, करंज, शिरीष अशा झाडांचा वेढा. व दुसऱ्या बाजूने ओढ्याची गार गचपानाची कुस. मांजर जसं माणसाच्या पायाशी अंग घासत घोटाळत रहातं तसा हा ओढा गावाला अंग घासत हायवे ओलांडून या बागेला कव घालतो. मग तसाच पुढे जात तो पुर्वाभीमुख होत वहिवाटीच्या डांबरी रस्त्याला छेद देत मळ्याबरोबर वामांगी लगट करत पुढे खळाळतो. चिकूची बाग संपली की शेताचे दोन-चार तुकडे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र फक्त शेती. पाण्याच्या मुबलकतेमुळे या दोन्ही बाजूंच्या शेतामधे नेहमी कांदा, लसुन, गवार, भेंडी यासारख्या भाज्या. अधे मधे कोथींबिरीचा कच्च हिरवा पट्टा. लहान मुलाने खडूने आडव्या तिडव्या रेघोट्या ओढाव्यात तसे अधून मधून बांध. तेही नावालाच. फुटभरही ऊंची नसलेले. ते बांधही तसे शौकीन. नेहमी वालपापडीसारख्या फुलांचे तुरे माळून डोलणारे. कधी खांद्यावर बेफीकीरपणे ऊपरणे टाकावे तसे डांगराचे, भोपळ्याचे, घोसाळ्याचे वेल बांधाच्या गळ्यात पडलेले. त्यावर पिवळ्या फुलांचे जडावाचे काम. 


रस्ता जरी डांबरी असला तरी तो मळ्यातल्या फक्त आठ दहा ऊंबऱ्यांच्या वहिवाटीसाठीच वापरला जातो. त्यामुळे रस्त्याला कधी कार, टेंपो वगैरेंची सवय नाही. निवांतपणा भाग्यातच लिहिलेला या रस्त्याच्या. या निवांतपणामुळे आजूबाजूच्या चिंचेवर, आंब्यांवर व चिकूच्या बागेत पाखरांचा नुसता गोंधळ. कुणाची भितीच नाही त्यांना. अन्नाची कमतरता नाही व ऐन ऊन्हाळ्यातही ओढ्याला कुठे ना कुठे पाणी मिळेच. यामुळे अनेक चिमुकल्या पाखरांची अनेक घरटी आजूबाजूला असतात. चिकूच्या बागेत झाडांची आळी सोडली तर सगळीकडे वाळलेल्या पानांचा गालीचा पसरलेला. सुर्य जरा कुठे मलूल होऊन अस्ताकडे टेकला की नाचणच्या अनेक जोड्या शेपटीचे पंखे फुलवत या गालिच्यावर नाचत बसतात. त्यांचं नाचणे कमी व धावपळच जास्त असा प्रकार. त्यामुळे खारींची विनाकारण धावपळ उडते. संध्याकाळी या खारींची गालिच्यावर अशी धावपळ सुरु झाली की हमखास एखादा बागलफण्या या गालिच्यावर ऊतरणारच. खारींच्या धावपळीमुळे पाचोळ्यातल्या किड्यांची, नाकतोड्यांचीही तारांबळ ऊडते व हुदहुद्याला बसल्या जागी शिकार मिळते. या मेजवाणीत कधी कधी ओढ्याच्या बाजूने सात-आठ चितूरही ऊतरतात. पण ते ओढ्याचा काठ सोडून सहसा बागेत जास्त आत येत नाहीत. हे चितूर जसे त्यांची हद्द सोडत नाहीत तसेच अलिकडच्या गचपनातून हळूच निघालेली मुंगसाची जोडीही तिची हद्द सोडत नाही. कुठे झाडावरचा चिकू पडला तरी ही मुंगसाची जोडी क्षणात ओढ्यात गायब होते. जरा वेळाने त्यांची हुळहूळती लाल नाके गवतातून बराच वेळ बाहेर डोकावत रहातात व मग ते दोघे पुन्हा पाचोळ्यात घुसतात. हुदहुद, एखादी पाणकोंबडी, चितूरचं कुटूंब, मुंगसाची जोडी हे सगळे शांततेत पाचोळ्यातले किडे शोधत, माना झटकत, पायाने पाचोळा ऊडवत फिरत असतात. मात्र कधी कधी या मेजवाणीला सातभाईंची नजर लागते. त्यांचा थवा एकदा का बागेतल्या पाचोळ्यावर ऊतरला की मग मात्र तेथे हुदहुद्या, चितूर, साळूंक्या कुणी थांबत नाही. पाणकोंबडी तर कधीच ओढ्यात नाहीशी झालेली असते. मुंगसाची जोडी बाजूच्या टेकाडावर थांबून माना मागे करुन या सातभाईंचा अंदाज घेत असते. वाढता वाढता या सातभाईंचा ईतका गोंगाट वाढतो की विचारता सोय नाही. मधेच यांना सुर मारायची हुक्की येते. मग एकामागोमाग एक सातभाई जमिनीवरुन काटकोनात वर सुर मारायला सुरवात करतात व चिकूच्या झाडात दिसेनासे होतात. जमिनीपासून झाडाची पालवी पाच फुटांवर सुरु होते. त्या पाच फुटात यांचे सटासट सुर मारणे सुरु होते ते सगळा थवा संपेपर्यंत सुरुच रहाते. बागेबाहेरुन हे दृष्य पहाताना विचित्र दिसते. झाडावरुन चिकू गळून तो जमिनीवर पडायला हवा. त्या ऐवजी जमिनीवरुनच काही फळे वेगाने वर जाऊन झाडांमधे दिसेनाशी होत आहेत असा काहीसा भास या सातभाईंच्या सुरावटींमुळे होतो. गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारं असं ते दृष्य पहायला फार विलोभनिय दिसते.


शेतात लाखमोलाची तर्कारी असली तरी ओढ्याच्या कडेकडेने मात्र प्रत्येकाने गायी-गुजींसाठी हत्तीगवतासारख्या चाऱ्याची लागवड केलेली आहे. ओढ्याच्या ओलसर मातीत हा चारा चांगला तरारतो. ओढ्याच्या कडेने या चाऱ्याची दाट रेष तयार होते. ओढ्याजवळ मात्र या हिरव्या रेषेचे बेटात रुपांतर होते. ते बेट मग जमेल तसे विस्तारते. ओढ्यालगतचा सगळा भाग पार येरगाटून टाकते. हा ओढा आहे, नदी नाही. त्यामुळे त्याला स्वतःच्या सत्तेचे पाणी नाही. पुर्वी पावसाळ्यात ओढा दुथडीभरुन वहायचा. पुढे दिवाळीपर्यंत त्याच्या पाण्याच्या धारेला करंगळीशी बरोबरी करावी लागे. हिवाळा सरता सरता ओढ्याला कोरड्या ठाक गोट्यांची आणि वाळलेल्या शेवाळाच्या पापुद्र्यांचीच सोबत ऊरे.  पण आता महिन्यातल्या ठरावीक तारखांना कॅनलचे पाणी ओढ्याला सोडले जाते त्यामुळे मोजकेच दिवस असले तरी त्याला बारमाही पाण्याचा शेर मिळतो. त्या पाण्याच्या आशेने गायबगळे, ढोकरी, पाणकोंबड्या ओढ्याशी लगट करतात. तेवढीच ओढ्याला सोबत होते. बाजुच्या हत्तीगवताच्या तुऱ्यात अनेक प्रकारच्या मुनिया सदैव किलबिलत असतात. तेवढाच ओढ्याच्या जिवाला विरंगुळा. ओढ्यावर असलेल्या पुलाला कठडा नाही. दोन्ही बाजूला मैलाचे दगड असतात तसे सिमेंटचे दिड फुटांचे ठोकळे लावलेले आहेत. संध्याकाळी शेतावरुन फुलोऱ्यावरील पिकाचा, भिजलेल्या मातीचा, धुराचा वास घेऊन पश्चिमेचा अवखळ वारा या गवताच्या तुऱ्यांमधे घुसला की सगळ्या बेटाच्या अंगात संचारते. तुरे शहारा आल्यासारखे थरथरतात. एखादा सुफी अवलीया स्वतःच्याच मस्तीत हात वर करुन डुलावा तसे हे तुरे आनंदाने डोलत रहातात. त्यांचे ते डोलणे पाहून वारा आणखी मस्तीला येतो. तुरे आणखी शहारुन डुलत रहातात. पुलाच्या कडेला असलेल्या ठोकळ्यावर बसुन ही आवर्तने पहाताना तंद्री लागते. या तुऱ्यांची लय नकळत आपल्याही मनात झिरपते. काही काळ का होईना पण सारे व्याप विसरायला होतात. आपल्याच मस्तीत झुलणारे हे तुरे पाहून तुकोबांना भंडाऱ्या डोंगरावर नक्की काय मिळालं असेल याचा जरासा अंदाज येतो.





बुधवार, २० एप्रिल, २०२२

कोतवाल (Black Drone)

काळा गोविंद (Black Drongo)


एकदा एक ड्रोंगोची जोडी कुठूनशी भिरभिरत आली. जरा वेळ या त्या झाडांच्या माथ्यावर आठचा आकडा काढत फिरली समोरच्या विजेच्या तारेवर जाऊन बसली. ड्रोंगो भिरभिरतायेत म्हणून मीही लक्ष ठेवले होते. वाटले जरा जवळ बसावेत कुठेतरी म्हणजे व्यवस्थित पहाता येतील. फक्त फोटोंमधे रस असतो तेंव्हा पक्षी कुठेही बसलेला चालतो, पण जेंव्हा मनापासून त्या पक्ष्याचे निरिक्षण करायचे असेल तर तो साधारण डोळ्यांच्या पातळीत बसला तर व्यवस्थित पहाता येते. त्याच्या हालचाली निरखता येतात. त्याचा पोटाचा, मानेचा, गळ्याचा, शेपटीचा रंग आकार पहातो येतो. विजेच्या तारेवर बसलेल्या पक्ष्यांचे कोणतेही वैशिष्ट्य नजरेत येत नाही. ड्रोंग जरा भटकले समोरच्या तारेवर बसले तेंव्हा वाईट वाटले. बायको म्हणालीअरे ते तरी काय करतील? येथे कुठे त्यांना बसायला व्यवस्थित जागा आहे?” तिचेही बरोबरच होते. प्रत्येक पक्ष्याची सवय वेगवेगळी असते. खंड्या, गप्पीदास, गांधारी, कोतवाल वगैरे पक्ष्यांना नेहमी एखाद्या निष्पर्ण फांदीच्या टोकावर बसायला आवडते. ते त्यांना शिकारीसाठी सोयीस्करही असते. कोकीळ, भारद्वाज, नाचरा, चष्मेवाला यासारखे पक्षी भरगच्च पाने असलेल्या झाडाच्या आतमधे वावरणे जास्त पसंत करतात. साळूंकी, चंडोल, भुरुळका, मुरारी या सारखे पक्षी जमिनीवर मजेत फिरतात. “दिसतील पुन्हा केव्हा तरीअसं म्हणत मी घरात आलो.

————

पक्ष्यांच्या आवाजाबरोबरच आता बायकोचा आवाजही ओळखता यायला लागलाय मला. त्यामुळे सकाळी सकाळी बायकोने हाक मारुन बाल्कनीत बोलावले तेंव्हा लक्षात आले की हिला काहीतरी दिसले असणार. बाहेर येवून पाहीले तर एका फांदीवर ड्रोंगोची जोडी अगदी आरामात बसली होती. मला आश्चर्य वाटले. आमच्या पार्किंगच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक झाडाची फांदी न् फांदी मला माहित झालीय. मग ही जोडी बसलेली फांदी का मला कधीच दिसली नव्हती? एकही पान नसलेली, पक्ष्यांना बसायला अगदी आदर्श असलेला कोन साधणारी, आरामदायक फांदी पाहून मला काही समजेना. मग बायकोने तिने केलेला उद्योग सांगीतला. काल भाजीला जाताना तिने वॉचमनला हाताशी धरुन गुलमोहराची सगळ्यात खालची लहान फांदी साफ करुन घेतली होती. ती जमीनीला बरीचशी समांतर होईल अशी वाकवून घट्ट केली होती. फांदीच्या वर भरगच्च गुलमोहर असल्याने भरपुर सावली होती. सुरक्षा देणारे नैसर्गीक छप्पर होते. सकाळची पहीली किरणे कोणत्याही अडथळ्याविना अगदी सरळ फांदीवर पडत होती. कोवळ्या सुर्यकिरणात बास्किंगसाठी पक्ष्यांना ती आदर्श फांदी होती. विशेष म्हणजे ती फांदी पक्ष्यांइतकीच माझ्याही सोयीची होती. कारण फांदी कंपाऊंड वॉलला खेटून पण पलिकडील बाजूला होती. मी उभा राहीलो तर भिंतीमुळे पक्ष्यांना मी दिसणार नव्हतो.

————

त्या दिवशी ड्रोंगो पुर्ण दिवस त्या फांदीवर बसून शिकार करत होते. त्यांचे खुप फोटो काढले मी. नंतर नंतर मी कॅमेरा घेताच खाली जायला लागलो. अक्षरशः पाच फुटांच्या अंतरावरुन मी त्यांना तास न् तास न्याहाळले. अनेक नोंदी केल्या. त्या फांदीसाठी झालेले ड्रोंगोंचे युद्धही पाहीले. नंतर झालेले सत्तांतरही पाहीले. नविन ड्रोंगोंच्या जोडीने ती फांदी बळकावल्यानंतर अगोदरचे दोन्ही ड्रोंगो आता पुन्हा विजेच्या तारांवर दिसायला लागले. या सगळ्या सत्तांतराच्या भानगडींमधे मला तटस्थ रहायला फार कष्ट पडले. अगदी नकळत मी अगोदरच्या ड्रोंगोच्या बाजूने झालो होतो. हे नविन आलेले ड्रोंगो मला आवडले नाहीत. त्यांना त्या फांदीवरुन हुसकाऊन लावावे असेही खुपदा मनात आले. नंतर माझ्या या अविचाराचे माझे मलाच हसू आले शेवटी मी महत्प्रयासाने तटस्थ भुमिका घेतली. दोन दिवसांनंतर तारेवरची जोडी दिसेनाशी झाली. कदाचीत त्यांनीही माझ्यासारखेच हे सत्तांतर स्विकारले असावे. माझा आता फोटोंमधला रस संपला होता. मी ठरलेल्या वेळी खाली जाऊन त्या भिंतीवर लहान मुलासारखी हनुवटी टेकवून ड्रोंगोंना न्याहाळत राहीलो. त्यांची शिकार पहात राहीलो. त्यांच्या चोचीत वेळोवेळी दिसणारे किडे कोणकोणते आहेत ते नोंदवीत राहीलो. त्यांनाही माझी सवय झाली असावी. कारण कळ लागल्यामुळे मी एका पायाचा भार दुसऱ्या पायावर टाकायच्या नादात कैकदा ड्रोंगोच्या तिन फुटांपर्यंत जवळ गेलो होतो. त्यांच्या आणि माझ्या मधे फक्त एक फुटाची भिंत होती. पण त्यांनी एक सावध कटाक्ष टाकण्यापलिकडे काही हालचाल केली नव्हती. बायको एकदा गमतीने म्हणालीही होती कीछान मैत्री झालीय तुमची. एकादे दिवशी तो ड्रोंगो तुला एखादा किडा ऑफर करुनया जेवायलाअसेही म्हणेल.” मधे काही दिवस गेले आणि जोडीपैकी आता एकच ड्रोंगो दिसायला लागला. दुसरा दुरवरही कुठे दिसेना. हा एकटाच सकाळी सातच्या आसपास येई. अकरा वाजेपर्यंत त्याचे पोट भरे. मग तो काहीवेळ गप्पीदासांना त्रास देई. खरे तर याला त्रास नाही म्हणता येणार, तो खेळ असावा किंवा गप्पीदासांना उगाच जरब बसवण्याचा प्रकार असावा. कारण ड्रोंगो कितीही मागे लागला तरी गप्पीदास कधी त्याच्यापासून दोन चार फुटांपेक्षा दुर गेला नाही, किंवा घाबरलाय असेही वाटले नाही कधी. उलट इतके दिवस फक्त ड्रोंगोची मालकी असलेल्या फांदीवर आता गप्पीदासही सौ. गप्पीदासला सोबत घेवून बसायला लागला. मधे चार दिवस गेले. ड्रोंगो काही दिसला नाही मला. अगोदर जोडीतला एक निघून गेला होता. दुसरा एकटाच येवून बसत होता काही दिवस. तो एकटा यायचा तेंव्हा मला उगाचच तो केविलवाना, प्रेमभंग झाल्यासारखा वाटायचा. मग तोही यायचा बंद झाला. बिचारा देवदास बनून दिगंतराला गेला की काय असे वाटले. हा माझ्याच मनाचा विरंगुळा. ऐन उमेदीच्या भरात असताना एखाद्या पाटलाच्या वाड्याचा रुबाब असतो. मात्र पाटलामागे जशी त्या वाड्याची रया जाते, ड्रोंगो गेल्यावर तसंच काहीसं त्या फांदीच झालं असं मला वाटायला लागले. आता तेथे बसून गप्पीदास, चिमण्या साळूंख्या फांदी पांढरी करायला लागल्या. मला काय, कोणताही पक्षी इतक्या जवळून पहाण्यात रस असायला हवा होता पण तसे काही होईना. मला त्या फांदीवर चिमण्यांनी साळूंक्यांनी बसलेले आवडेना. मी अजुनही त्या दोन काळ्या गोविंदांमधे गुंतलो होतो. काय झाले असेल? का गेले असतील ते? दोघेही अचानक यायचे बंद झाले असते तर काही वाटले नसते. एक अगोदर गेला मग काही दिवसांनी दुसरा गेल्याने मला जास्त वाईट वाटत होते का? मला काही समजेना. पण वाईट वाटत होते हे खरे. त्या फांदीवर बसलेल्या चिमण्यांचा साळूंक्यांचा मी कधीही फोटो काढला नाही.

———

एक दिवस मी खाली जावून नेहमी प्रमाणे गाडी स्वच्छ केली. वर येताना जरा वेळ फांदीवर लक्ष टाकावे म्हणून भिंतीजवळ उभा राहीलो. नेहमी प्रमाणे गप्पीदासाची मादी तेथे बसली होती. जेथे ड्रोंगो बसायचा अगदी त्याच जागेवर बसली होती. आजूबाजूला कुठे नर दिसतोय का हे मी पहात होतो इतक्यात एखाद्या फायटर विमानाने सुर मारावा तसा कुठून तरी ड्रोंगोने फांदीच्या दिशेने सुर मारलेला मी पाहीला. काय होतय हे समजायच्या आत ड्रोंगो गप्पीदासाच्या डोक्यावरुन अगदी झपकन उडाला. गप्पीदासाच्या मादीची तारांबळ अगदी पहाण्यासारखी होती. ती तेथून उडायच्या ऐवजी कोसळल्यासारखी जमीनीवर उतरली माझ्या नजरेआड झाली. नक्कीच तिचा उर धापावत असणार. ड्रोंगोने तशीच १२० अंशात वर भरारी घेतली अर्धवर्तूळात फिरत झपकन फांदीवर येवून बसला. एखादा बाण फांदीत येवून रुतावा तसा तो अगदी गतीने येवून एकदम फांदीवर स्थिरावला होता. त्याचा तो सुरवातीचा जोश पहाताच माझ्या तोंडूनज्जे बातनिघाले. दहा बारा दिवसांनंतर ड्रोंगोने एकदम हिरोसारखी एंट्री घेतली होती. हा माझाच ड्रोंगो होता हे पहाताच कळले. बसल्याजागी त्याने त्याची बसायची दिशा दोन तिन वेळा बदलली. मग आरामदायक वाटेल अशा पद्धतीने तो माझ्याकडे पाठ करुन बसला. तो जरा स्थिरावतोय ना स्थिरावतोय तोच अजुन एक ड्रोंगो संथ उडत आला त्याच्यापासून काही अंतर राखून माझ्याकडे तोंड करुन बसला. मला वाटले की जोडी पुन्हा एकत्र आली. मी नेहमी प्रमाणे भिंतीवर हनुवटी टेकवून उभा राहीलो. मला पहाताच मात्र नंतर आलेला ड्रोंगो दचकल्यासारखा उडाला विजेच्या तारेवर जाऊन बसला. पाच दहा मिनिटानंतर तो पुन्हा संथ उडत फांदीवर येवून माझ्याकडे तोंड करुन बसला. आता माझ्या लक्षात आले. त्याच्या दोन्ही पंखाच्या वरच्या कडा किंचीत बाहेर निघालेल्या होत्या. त्यातून दिसणारी पंखांची आतली बाजू पांढरट करडी होती. पोटावर पांढऱ्या रेषा होत्या. शेपटीखालीही बराचसा भाग पांढरा होता. शेपटीला दोन टोके नव्हती. छाती भरदार नव्हती. मानेवरची पिसे विस्कटलेली होती. मान छातीवर अजिबात निळसर झाक नव्हती. डोक्यावर एकूलते एक पांढरे पिस इतर काळ्या पिसांमधून बाहेर आले होते. हे तर पिल्लू होते. आता मला त्या ड्रोंगोपैकी एकाचे जाणे लक्षात आले. मग दुसऱ्याच्या जाण्याचे कारणही समजले. ही जोडी पिल्लांचे पोषण करत होती तर. त्यांचे घरटे कुठे होते ते काही मला समजले नाही. त्या पिल्लाला भरवताना पहायची संधी मी घालवली होती. आता ते पिल्लू उडायला शिकल्यावर तो बाबा त्याला घेवून त्या फांदीवर आला होता. या पिल्लाचा प्रवासही मी नंतर पाहीला. अगदी ते पुर्ण वाढीचे होवून स्वतंत्र किडे पकडायला लागेपर्यंत आई बाबांपासुन वेगळं होईपर्यंत मी नोंदी केल्या. एक दिवस अगोदरचे दोन्ही ड्रोंगो येईनासे झाले हे पुर्ण वाढ झालेले पिल्लू त्याच फांदीवर येवून बसायला लागलेलेही मी पाहीले. जणू काही त्याच्या आई वडीलांनी ती फांदी त्याला वारसा हक्कात दिल्यासारखे ते पिल्लू तेथे वावरायला लागले. पुन्हा एकदा सत्तांतर झाले. यावेळी वेड्या राघूंनी या भरदार पिल्लावर मात केली. हे सगळे मी बारकाईने पाहीले. दिसायला भरदार तुकतुकीत असले तरी पिल्लू हे पिल्लूच असते. अनुभव नसल्याने वेड्या राघूकडूनही मग हार मानावी लागते हे मी पाहीले. पक्षी कसे अनुभवातून शिकतात, अनुनभवी पक्ष्याला इतर कशी मात देतात हेही मला याच फांदीवर पहायला मिळाले. ड्रोंगोंनी या फांदीचा पुर्ण नाद सोडल्यानंतर तेथे वेडे राघू श्राईक, साळूंख्या मैना यांच्यात वर्चस्वासाठी झालेली भांडणे पाहीली. या भांडणात पडता जेंव्हा फांदी रिकामी असेल तेंव्हा तिचा उपयोग करणारी दयाळची लबाड जोडी पाहीली. या फांदीवर वर्दळ सुरु व्हायच्या आत भल्या सकाळी येवून पंधरा मिनिटात मासे पकडून आपल्या मार्गाला लागणारा छोट्या खंड्या पाहीला. ही तर ड्रोंगोची थोडक्यात कहाणी झाली. येथे मी अनेक कहाण्या पाहील्या. प्रत्येक कहाणी लिहायची तर कादंबरी लिहून होईल. एकून १७ पक्ष्यांना या फांदीवर विश्रांती घेताना मी नोंदवलं. अजुनही ही फांदी तेथेच आहे. सत्तांतरे होतच आहेत. आता थंडीचे दिवस आलेत. गेले काही दिवस हळद्या दिसायला लागलेत. कदाचीत तेही या फांदीवर हक्क सांगतील. पुन्हा सत्तांतर होईल. मला पुन्हा नविन कथानक पहायला मिळेल.

————

या फांदीवर येवून बसलेल्या काही पक्ष्यांचे फोटो खाली देत आहे. यात फक्त फोटो घेता येत असल्याने बाकीचे नंतर देईन. किंवा माझ्या टाईम लाईनवर ते कुठे ना कुठे असतीलच.

एक मात्र आहे. मी फार वर्षांपुर्वी सरदारजींवरचे जोक सांगणे ऐकणे बंद केले होते. आता मी बायकांवर असलेले जोक सांगणे ऐकणे बंद केलय. बायका हुशारच असतात हो. तिने ही फांदी तेथे लावली नसती तर मी कितीतरी गोष्टींना मुकलो असतो ज्या मला कधीच पहायला मिळाल्या नसत्या.

इतर पक्ष्यांच्या कहाणीविषयी पुन्हा कधीतरी लिहिन. आज इतकेच पुरे.

------


फोटोतील पक्ष्यांची नावे देतो. कुणाला गुगल करायचे असल्यास सोपे जाईल.

कृष्ण थिरथिरा (Black Redstart)

कोतवाल (Black Drongo)

वेडा राघू (Green bee-eater)

गप्पीदास (Pied Bushchat Female)

खंड्या (White-throated Kingfisher)

छोटा धिवर (Common Kingfisher)

गांधारी (Long-tailed Shrike)

नाचरा (Fan tail)

दयाळ (Oriental Magpie Robin)



















Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...